तेरेखोल किल्ला/Terekhol fort/ Tiracol fort

पाणी हि मानवाची मुलभुत गरज, त्यामुळे प्राचीन काळी मानवी वस्ती वाढली ती नद्यांच्या काठी. पुढे निरनिराळ्या प्रदेशाची सीमा आखणी करायची वेळ आल्यानंतर सहाजिकच नदी हिच हद्द ठरविण्यासाठी वापरली गेली. सह्याद्रीत आंबोलीजवळ उगम पावून आणि पर्यटकांना धबधब्यात मनसोक्त भिजवून तेरेखोल नदी गोवा राज्याची उत्तर सीमा आखत समुद्रात विलीन होते. नदीच्या उत्तर काठावर आपण महाराष्ट्रात असतो, तर फक्त तरीने नदी ओलांडली तरी राज्य बदलून गोव्यात पोहचतो. पण नियमाला अपवाद असतो,तस चक्क नदीच्या उत्तर किनार्‍यावरचा अगदी समुद्राला खेटून असणारा भाग हा गोवा राज्याच्या हद्दीत येतो. नेमका ईथेच खडा आहे, “तेरेखोल किल्ला”. विशेष म्हणजे तेरेखोल गाव वेंगुर्ला तालुक्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात येतो मात्र याच गावातील तेरेखोल किल्ला मात्र पेडणे तालुक्याचा म्हणजे उत्तर गोवा जिल्ह्याचा भाग आहे. आज आपण तिथलीच सैर करणार आहोत.

आधी या टेकडीवर उभारलेल्या भुईकोटासारख्या चिमुकल्या किल्ल्याचा इतिहास समजून घेउया. १७ व्या शतकात सावंतवाडीच्या खेमसावंतांनी या किल्ल्याची उभारणी पोर्तुगिजांवर लक्ष ठेवण्यासाठी केली. पोर्तुगिजांना हे सहन न झाल्याने १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडा या चव्वेचाळीसाव्या व्हॉइसरॉयच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नुतनीकरण केले. किल्ल्यावरील सेंट अन्थोनी चर्च या व्हाईसरॉय अल्मेडा याने बांधल्याचे इतिहासकार सांगतात. पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेले कॅप्सुल बुरुज त्यावेळी बांधण्यात आले. १७९४ मध्ये थोड्या काळासाठी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पण पोर्तुगिजांनी तो परत जिंकून घेतला. किल्ल्याच्या ताब्याचा हा रस्सीखेचीचा खेळ सुरु असतानाच मध्येच अचानक पोर्तुगीजांना हुक्की आली कि गोव्यात जन्मलेल्या कोण्या सक्षम व्यक्तीला गव्हर्नर करावे. आणि त्यांनी डॉ बरनादी पेरेस डिसिल्वा यांना सन १८२५ मध्ये गर्व्हनर केले. पण मुळच्या या भुमीपुत्राने मातृभुमीचे ऋण जाणुन तेरेखोलच्या किल्ल्यातून पोर्तुगिजांविरुध्द उठाव केला, तो उठाव पोर्तुगिजांनी मोडून काढला. १९२५ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध डॉ. बर्नाडो पेरेझ डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या वहिल्या गोवन बंडाची आखणी याच किल्ल्यावरुन केली गेली. १५ ऑगस्ट १९५४ रोजी अल्फ्रेड आल्फांसो यांच्या नेत्वृत्वाखाली गोवा मुक्ती संग्रामच्या कार्यकर्त्यांनी किल्ला १ दिवसासाठी ताब्यात घेतला होता. १५ ऑगस्ट १९५५ रोजी पनवेल येथील हिरवे गुरुजी (तुळशीदास बाळकृष्ण हिरवे) व शेषनाथ वाडेकर यांच्यासह १२७ निशस्त्र कार्यकर्त्यांनी किल्ल्यासमोर सत्याग्रह केला.

त्यावेळी पोर्तुगिजांनी केलेल्या गोळीबारात हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर शहीद झाले.

त्यांचे स्मारक किल्ल्यासमोर डाव्या हाताला आहे. १९६१ मध्येही पोर्तुगीजांविरुद्धच्या गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळी या किल्ल्याचा एक तळ म्हणून मुक्तिसैनिकांनी वापर केला. १९६१ ला गोवा मुक्त झाला आणि ९ डिसेंबर १९७६ ला किल्ल्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले.
अश्याप्रकारे गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतीकारकांना निवारा देण्याचे मोठे काम तेरेखोल किल्ल्याने केले. त्यामुळे तेरेखोलचा हा किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे.
अश्या या छोट्याश्या पण देखण्या किल्ल्याला भेट देण्याचे दोन पर्याय आहेत. मालवण – पणजी सागरी महामार्गावर असलेले तेरेखोल गाव, मालवण पासून ६० किमी व पणजी ४० किमी वर आहे. मालवणहून वेंगुर्ले आणि वेंगुर्ल्याहून बसने तेरेखोल गावात जाता येते. किल्ल्याच्या अगदी दारापर्यंत गाडीरस्ता आहे. महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटचे गाव असलेल्या रेडीपासून तेरेखोल फोर्ट ५ कि.मी. अंतरावर आहे त्यामुळे वेळ असल्यास जवळच असणारा रेडीचा यशवंतगड देखील वाकडी वाट करून पाहता येतो. दुसरा मार्ग गोव्यातून आहे. पणजीवरुन म्हापसामार्गे आरम्बोल बीच आणि खेरी बीच पाहून फेरीने तेरेखोल नदी ओलांडून येथे येता येईल.याशिवाय थोड रमतगमत जायचे असेल तर पणजी ते कलंगुट ते सायोलीन (siolim) ते केरीम (querim) हा समुद्रालगतचा प्रवास आणि मैन्द्रेम (mandrem) शेवटी आरम्बोल खाडी केरीम गावातून फेरी बोट आहे.थेट गाडी घेवून खाडी पार करता येते आणि तेरेखोल किल्ल्यावर जाता येतं.

गोव्यातील गावाचे नावाचे एक मजेदार वैशिष्ट्य आहे, गावांच्या नावाचा मराठी उच्चार वेगळा आणि त्याचे ईंग्लिश स्पेलिंग भलतेच असते. गोव्यात फिरताना हा गोंधळ फार होतो. हा तेरेखोल किल्लादेखील त्याला अपवाद नाही. तेरेखोल नदीच्या नावाचे स्पेलिंग Terekhol River असले तरी किल्ल्याच्या नावाचे स्पेलिंग मात्र Tirakol किंवा Tirakhol असे आहे. असे का ? सोडवा कोडे.

तेरेखोल हा तसा एक आटोपशीर किल्ला आहे. गोवा सरकारने या छोटेखानी किल्ल्याचे तारांकीत हॉटेलमध्ये रुपांतर केल्यामुळे किल्ला अतिशय स्वच्छ व नीटनीटका ठेवलेला असला तरी सामान्य पर्यटकांना संपूर्ण किल्ला पाहण्याची परवानगी नाही. तसेच किल्ला पाहण्यासाठी सकाळी १० नंतरच परवानगी मिळते आणि तेही फक्त काही जणांनाच.

समुद्राच्या टोकाशी असलेल्या टेकडीवर या किल्ल्याची उभारणी झाल्याने तटबंदीचा एक भाग थेट खाली खाडीपर्यंत नेला आहे.
किल्ल्यात हॉटेल असल्यामुळे सगळीकडे आकर्षक रंगरंगोटी केलेली असली तरी किल्ल्याचे मूळ स्वरुप बऱ्याच प्रमाणात तसेच ठेवले गेले आहे. जांभ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याच्या स्थापत्यकलेत कोकणी, पोर्तुगीज व गॉथीक शैलीचा प्रभाव आढळतो.

सुस्थितीत असणाऱ्या गडाच्या दक्षिणाभीमुखी प्रवेशद्वाराने गडात प्रवेश करताच प्रवेशद्वाराच्या समोरच भिंतीलगतच ठेवलेला एक भला मोठा जुना पेटारा आपले लक्ष वेधून घेतो.

आता हा जादूचा पेटारा आहे का? या विचारात न पडता पुढे जाउया.

भिंतीना दोन्ही बाजूंनी भाले अडकवले आहेत.

प्रवेशद्वाराचे दरवाजे जुने दिसत असले तरी रंगरंगोटी करून आकर्षक केलेले असल्यामुळे मुळचे आहेत कि हॉटेलसाठी जुन्या पद्धतीने बनवून घेतले आहेत ते कळत नाही.

आकर्षक झुंबर

किल्ल्यात प्रवेश करताच समोर दिसते ते पोर्तुगीज धाटणीचे सेंट अँथनी चर्च / चापेल (Church of Holy Trinity) व किल्ल्याच्या तटबंदीला लागून हॉटेलसाठी बांधण्यात आलेल्या आखीवरेखीव खोल्या. पण या खोल्या आणि चर्च कायमच बंद असतात.

किल्ल्याच्या आत प्रवेश करताच एक St. Andrew यांचा पुतळा लक्ष वेधून घेतो

प्रवेशद्वारावरील सज्ज्यावर जाण्यासाठीचा जिना केलेला आहे तर समोर असणाऱ्या चर्चच्या मागे उजव्या बाजूस असलेल्या जिन्याने देखील मागील बुरुजावर जाता येते.

किल्ल्याचा एवढाच काय तो परिसर सामान्य पर्यटकांसाठी खुला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या तटावरुन प्रवेशद्वारापर्यंत फेरी मारुन गड दर्शन आटोपते घ्यावे लागते.

पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेला कॅप्सुल आकाराचा बुरुज, मध्यभागी असलेले एक चॅपल, गडाची चौरस तटबंदी, एक भरभक्कम दरवाजा आणि किल्ल्यावरील सैनिकांच्या व अधिकाऱ्यांच्या निवासासाठी बांधलेल्या खोल्या एवढे मोजके अवशेष पाहून साधारण २० मिनिटांत गडफेरी उरकता येते. किल्ल्याच्या आवारात एक जिवंत पाण्याचा झरा असून त्याकाळी किल्ल्यातील शिबंदीला लागणाऱ्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था या झऱ्याच्या पाण्यातूनच होत असे.

किल्ल्यावरून दिसणारा खेरीचा समुद्रकिनारा, त्यावरील पांढरी शुभ्र रेती आणि अरबी समुद्राचे निळेशार पाणी असे दृश पाहून मन सुखावते.

(महत्वाची तळटीप :- काही प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

तेरेखोल किल्ल्याची व्हिडीओतून सैर

संदर्भः-
१) जलदुर्गांच्या सहवासातः- प्र.के. घाणेकर
२) https://itsgoa.com/forts-in-goa-know-more-about-them/ हे संकेतस्थळ
३) www.durgwedh.blogspot.in हा श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग
४ ) पोर्तुगीज-मराठा संबंध- श्री. स.शं. देसाई
५) चला माझ्या गोव्यात- मिलींद गुणाजी
६ ) ईंटरनेटवरुन मिळालेले संदर्भ

दिल चाहता है / शापोरा किल्ला/चापोरा किल्ला/Chapora fort

गोव्याच्या दक्षीण आणि उत्तर बाजुला अनेक देखणे किनारे आहेत. बहुतेक किनार्‍यांना पार्श्वभुमी लाभली आहे ती निळ्या अथांग सागराची, मउशार सोनेरी वाळू, किनार्‍यावरच्या नारळी, पोफळीची गर्द झाडी यांची.

पण यासगळ्यात एका किनार्‍याला खास पार्श्वभुमी मिळाली आहे, तो बीच म्हणजे “व्हॅगॅतोर बीच ( Vagator Beach )”.

थोडा खडकाळ असलेला आणि हेच वेगळेपण जपणार्‍या या बीचच्या मागे छोट्या टेकडीवर लवलवणारे सोनसळी गवत पांघरुन मस्तकावर जांभ्या दगडाची तटबंदीचा शिरपेच असणारा “शापोरा किल्ला”. ईतक्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या जागी किल्ला बांधण्याची ईच्छा झालेला तो सरदार नुसता कोरडा लष्करी अधिकारी नसून, जणू ईथला निसर्गपट पुर्ण करणारा चित्रकार असला पाहिजे.


पेर्णे तालुक्यात मोर्जी येथे उगम पावणारी शापोरा नदी बारदेश तालुक्यात, या किल्ल्याजवळ समुद्राजवळ मिळते. म्हापसा शहरापासून केवळ १० कि.मी. वर हा किल्ला आहे.

शापोरा नदी ते मांडवी नदी यांच्या दुआबात बारदेश प्रांत (तालुका) पसरला आहे. बारदेशच्या पूर्वेला आहे डिचोली, तर पश्चिमेला आहे अरबी समुद्र. बारदेश हा प्रदेश पोर्तुगीजांच्या ताब्यात जाण्यापूर्वी येथे विजापूरच्या अली आदिलशाहची सत्ता होती व त्याच्या अधिकाऱ्याने येथे किल्ला बांधला. ह्या भागाचे मुल नाव शाहपुरा. पोर्तुगीजांनी त्या नावाचा अपभ्रंश शापोरा करून टाकलं. याच गडाचे “कायसुव” हे दुसरे कागदोपत्री नाव सापडते.

पुढे १३ डिसेंबर १५७१ रोजी आदिलशहा आणि पोर्तुगीज व्हाइसरॉय ‘दों आंतोनियु द नोरोन्य’ यांच्यामध्ये तह झाला. या तहान्वये सासष्टी व बारदेश या प्रदेशांवरील आपला हक्क आदिलशहाने सोडला व हे प्रदेश कायमचे पोर्तुगीजांना मिळाले. पण या प्रदेशात उपटसुंभ असणार्‍या पोर्तुगीजांच्या बारदेश प्रांताला उत्तरेकडून मुस्लीम सत्ता, पूर्वेकडून मराठे तसेच त्या भागातील देसाई व सावंत अशा स्थानिक शत्रूंकडून धोका होता. त्यामुळे पोर्तुगिजांनी १६१७ मधे शापोरा किल्ल्याचे बांधकाम केले. हा किल्ला आग्वाद किल्ल्यानंतर पाच वर्षांनी बांधण्यात आला. पोर्तुगीजांनी १५० हुन अधिक वर्षे या किल्ल्यावर राज्य केले खरे पण गोव्यातील पोर्तुगीज सत्तेचा अंत होण्यापूर्वी हा किल्ला बऱ्याच वेळा वेगवेगळ्या सत्तांच्या ताब्यात गेला. १६८४ मधे संभाजी महाराज गोव्याच्या स्वारीवर असताना शापोर्‍याला मराठ्यांनी वेढा दिला,आतील पाद्रयाला गोळी घालून ठार केले व मराठ्यांनी हा किल्ला जिंकला. त्यावेळी आतील चाळीस लोकांना कैद केले. इ.स. १७१७ च्या सुमारास मराठा सैन्याने या किल्ल्यातून माघार घेताच पोर्तुगिजांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला व त्यावेळी गोव्याचा गव्हर्नर काउंट ऑफ ईरिसिएरा याने किल्ल्याची युद्धशास्त्राच्या दृष्टीने बळकट करण्यासाठी पुर्नबांधणी केली. किल्ल्याची बळकटीकरण करतानाच जमीनीखाली भुयारांची बांधणी केली. आणीबाणीच्या काळात बचाव करण्यासाठी व पळून जाण्यासाठी पोर्तुगीजानी बांधलेल्या या भूयारांचा उपयोग होत असे. पुढे १७३९ मध्ये हा किल्ला सावंतवाडीकरांच्या ताब्यात आला. पण पुढे दोनच वर्षांनंतर म्हणजे १७४१ मधे पोर्तुगिजांना उत्तरेकडील पेडणे तालुका दिल्यानंतर किल्ला त्यांना सुपूर्त करण्यात आला. पुढे मात्र १८९२ मध्ये पोर्तुगिजांनी या किल्ल्याचा वापर कायमचा बंद केला व तेव्हापासून या किल्ल्याने आपले पूर्वी असलेले वैभव गमावले.

आज किल्ला अवशेष रुपात शिल्लक असला तरी या किल्ल्याला असणारे पोर्तुगीज धाटणीचे कॅप्सुल बुरुज ( याना बार्टीझन असे म्हणतात ), एक सुस्थितीत असलेला दरवाजा आणि किल्ल्याला सर्वबाजूने असणारी भक्कम तटबंदी असे अवशेष आवर्जून पाहण्यासारखे आहेत.या किल्ल्याला चार प्रवेशद्वारे आहेत. एकेकाळी या किल्ल्यात सेंट अंथोनी चर्च होती असे म्हणतात.पण पर्यटक मात्र या किल्ल्याला भेट देतात ते या किल्ल्यावरून दिसणाऱ्या समुद्राच्या पॅनोरमिक व्ह्यूसाठी. हे सुंदर विहंगम दृश्य पाहण्यासाठी एकदा तरी या किल्ल्याला भेट दयायला हवी.

एक पायवाट अगदी वॅगॅतोर बीचवरुन थेट किल्ल्यावर जाते आपण त्याने रमतगमत जाउ शकतो किंवा एक डांबरी रस्ता थेट किल्ल्याच्या जवळ जातो.
शापोरा किल्ला म्हापसापासून अंदाजे १० किमी तर प्रसिद्ध कलंगुट बीचपासून फक्त १५ किमी अंतरावर आहे. तसेच व्हॅगेटर/वागातोर व अंजुना हे गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे किल्ल्यापासून अगदीच जवळ आहेत. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५,३० पर्यंत किल्ला पर्यटकांसाठी खुला असतो.

बॉलिवुडमधील एक गाजलेला चित्रपट म्हणजे “दिल चाहता है”. या चित्रपटातील एका दृश्यामध्ये समुद्रकिनारी असलेल्या एका किल्ल्याच्या तटबंदीवर बसलेले तिघे मित्र दाखविले आहेत. हाच तो गोव्यातला शापोरा किल्ला होय. “दिल चाहता है” चित्रपटात येथील दृश्य दाखवण्यापूर्वी या किल्ल्यावर इतिहासप्रेमी लोकांशिवाय इतर कोणी भटकत नसे पण “दिल चाहता है” चित्रपटात या किल्ल्याचे व परिसरातील निसर्गाचे सौंदर्य दाखवल्यापासून हा किल्ला गोव्यातील एक must visit डेस्टिनेशन बनला आहे. तांबूस पिवळ्या रंगाची आभा पश्चिम समुद्रावर पसरत असताना, पाण्यात बुडत जाणारा दिनकर इथल्या तटबंदीवरून निरखणे आणि भुतकाळात हरवणे म्हणजे एक विलक्षण योग आहे.

( महत्वाची तळटीपः- काही प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

शापोरा किल्ल्याची व्हिडीओतून सैर

संदर्भः-
१) जलदुर्गांच्या सहवासातः- प्र.के. घाणेकर
२) https://itsgoa.com/forts-in-goa-know-more-about-them/ हे संकेतस्थळ
३) पोर्तुगीज-मराठा संबंध- श्री. स.शं. देसाई
४) चला माझ्या गोव्यात- मिलींद गुणाजी
५) शिवपुत्र संभाजी- कमल गोखले
६) www.durgwedh.blogspot.in हा विनीत दाते यांचा ब्लॉग
७) ईंटरनेटवरुन मिळालेले संदर्भ

अग्वाद ( Aguad Fort)

बहुतेक जण गोव्याला भेट देतात, ते बीच, मंदिर आणि चर्चसारखी ठिकाण पहायला. ईथे काही एतिहासिक ठिकाणे आहेत, याचा सहसा गंध नसतो, पण याला अपवाद म्हणजे “फोर्ट अग्वाद”. गोव्याच्या पर्यटन स्थळामधील एक नक्कीच भेट देण्याचे ठिकाण म्हणजे अग्वादचा किल्ला.

पणजीपासून फक्त १७ कि.मी. वर असलेला हा किल्ला कांदोळी जिल्ह्यात असून ,एक दुपार सार्थकी लावण्यासाठी उत्तम आहे. ह्या जुन्या किल्ल्यावरुन समुद्राचे उत्तम दर्शन होते आणि एक आठवणीतील सूर्यास्त पहायलाही मिळतो. कलंगुट या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यापासून फक्त सहा कि.मी. अंतरावर आहे. हा किल्ला गोवा राज्य पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्यामुळे पर्यटकांसाठी दररोज सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुला असतो.

Aguada Fort overlooking the Arabian Sea

या किल्ल्याच खरं नाव मात्र सांता कातारीन. १७ व्या शतकाच्या सुरवातीला पोर्तुगीज गोव्यात चांगलेच स्थिरावले असताना अचानक एके दिवशी सात डच जहाजे मांडवी नदीच्या मुखाशी जुन्या गोव्यासमोर असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावर उभी ठाकली. सशस्त्र अश्या या डच जहाजांनी मनात आणले असते तर तेव्हाच गोवे जिंकून घेतले असते. पण त्यांनी फक्त पोर्तुगीजांच्या ताब्यात असणाऱ्या गोव्याची प्रचंड लुट केली व ते निघून गेले. त्यावेळी मांडवी किनारी असणाऱ्या रेईश मागुश व गाश्पार दियश या पोर्तुगीजांच्या दोन किल्ल्यांनी कसेबसे या आक्रमणाला उत्तर दिले पण ते कमकुवत ठरले. या प्रकरणानंतर मात्र पोर्तुगीजांचे डोळे खाडकन उघडले आणि मांडवीच्या मुखाशी सांता कातारीन उर्फ आग्वाद किल्ल्याचा जन्म झाला. १६०९ ते १६१२ अशी पाच वर्ष या किल्ल्याचे बांधकाम सुरु होते. अग्वादच्या दरवाज्यात पोर्तुगीज भाषेतील शिलालेख आहे, त्याचे वाचन याप्रमाणे:-” परम धार्मिक राजा फिलीप दुसरा, पोर्तुगालमध्ये राज्य करत असताना, त्याच्या आदेशावरुन हा किल्ला उभारला गेला, त्यावेळी रुब द ताव्होरा गोव्याचे व्हाईसराय होते”. मात्र पोर्तुगीजांच्या ४०० वर्षांच्या राजवटीत हा एकच किल्ला कुठल्याच आक्रमणकर्त्याला जिंकता आला नाही. सलग शेकडो वर्ष हा किल्ला पोर्तुगीज अधिपत्याखालीच राहिला. जेंव्हा पोर्तुगीज गेले, तेंव्हा १९६२ च्या सुमारास हा किल्ला आपल्या ताब्यात आला.

हा किल्ला बांधत असताना पोर्तुगीजांना या किल्ल्याच्या एन किल्ल्याच्या दरवाज्याजवळच एक विहीर व खडकात एके ठिकाणी गोड्या पाण्याच्या जिवंत झऱ्याचा शोध लागला. उत्कृष्ट आणि मुबलक पाणी मिळाल्यानंतर किल्लेदाराने तेथे हौद बांधला व रहाट आणि पन्हाळीची सोय करुन किल्ल्यावरुन पाणी खाली जहाजांना देण्याची व्यवस्था केली. गोड्या व थंड पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे मग हळू हळू या किनाऱ्यावर पोर्तुगीजांची जहाजे थांबू लागली. त्यामुळे मग पुढे या किल्ल्याचा जहाजांतून येणाऱ्या प्रवाशांना पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी उपयोग केला जाऊ लागला.पोर्तुगीज भाषेत “आग्व” म्हणजे पाणी त्यामुळे भरपुर पाणी मिळणार्‍या झर्‍याला नाव पडले “माय द आग्वा” म्हणजे “पाण्याची आई”. पुढे शब्दाची उलटपालट होउन झाले, “अग्वाद”. हेच नाव पुढे रुळले. साहजिकच मग सांता कातारीन हे जुने नाव विस्मृतीत जाऊन हा किल्ला आग्वाद या नावाने ओळखला जाऊ लागला. जहाजामधे पाणी भरण्यासाठी या किल्ल्यातील एका भूमिगत टाकीत जवळपास २४ लाख गॅलन पाणी साठवले जात असे. १७ खांबावर उभी असलेली ही भुमिगत टाकी हे या किल्ल्याचे एक खास वैशिष्ठ्य आहे. पोर्तुगालमधून येणाऱ्या जहाजांचा हा भारतातला हा पहिला थांबा असायचा.

अग्वादच्या पायथ्याशी असलेला जहाजांचा धक्का

या किल्ल्यावरून चारही बाजूला व्यवस्थित नजर ठेवता येते त्यामुळे साहजिकच किनाऱ्यावर येणाऱ्या पोर्तुगीज जहाजांना या किल्ल्याद्वारे पुर्ण संरक्षण पुरवता यायचे.
किल्ल्यावरून खोल समुद्रात दुरवर व चारही बाजूला व्यवस्थित नजर ठेवता येत असल्याने किनाऱ्यावर येणाऱ्या पोर्तुगीज जहाजांना संरक्षण मिळत असे. तांबड्या चिऱ्याने बांधलेला हा किल्ला आजही वारा पावसाशी टक्कर देत दिमाखात उभा आहे. सलग ४०० वर्ष हा किल्ला पोर्तुगीज अधिपत्याखाली होता. पोर्तुगीज काळात ह्या किल्ल्यावर कोणाचा हल्ला वगैरे झालेला नाही. गोवा मुक्ती संग्रामानंतर पोर्तुगीज गेल्यावर १९६२च्या सुमारास हा किल्ला भारतीय राज्यात सामील झाला.
या किल्ल्याच्या बांधकामाची तुलना सह्याद्रीतील दगडी किल्ल्यांशी करता हा किल्ला एकदम तकलादू वाटतो. तोफेचा भडीमार केल्यास तटबंदी सहज कोसळून पडेल असे वाटत असले तरी याच किल्ल्याच्या भरवशावर गोव्याच्या किनाऱ्यावर येणाऱ्या जहाजावर नजर ठेवण्याचे काम पोर्तुगीज करत हो्ते. अग्वाद किल्ला मांडवी नदीच्या मुखावर असुन इथून पुढे मांडवी नदी अरबी समुद्राला मिळते.

किल्ल्याच्या दरवाजापर्यंत गाडीरस्ता असल्याने आपण सहजपणे तटबंदी जवळ पोहोचतो.

जेव्हा आपण सिक्वेरी बीचवरुन टेकडी चढून आग्वादकडे येत असतो, तेव्हा रस्त्याचा एक फाटा रस्ता सोडून डावीकडे सेंट्रल जेल कडे गेल्यास, जेलच्या दरवाजासमोर डावीकडील पायवाटेने खाली उतरताच आग्वाद किल्ल्याचा विस्तीर्ण असा दक्षिण तट पहायला मिळतो.


  दक्षिण तटावरील किल्ल्याचा काही भाग हा गोव्यातील सर्वात मोठ्या व अजूनही वापरात असणाऱ्या सेंट्रल जेलसाठी वापरला जातो.

त्यामुळे या किल्ल्याचे सध्या अप्पर अग्वाद (टेकडीवरील किल्ला) व लोअर आग्वाद (खालच्या भागातील किल्ला) असे दोन भाग झालेले आहेत. आता या किल्ल्याचा बराचसा भाग हा टाटा ग्रुपच्या ताज विवांता (ताज फोर्ट आग्वादा रिज़ॉर्ट एन्ड स्पा) या पंचतारांकित हॉटेलला दिलेला आहे. त्यामुळे ताज विवांता हॉटेलचा परिसर व कारागृह ही दोन ठिकाणे सोडल्यास इतर ठिकाणी मात्र पर्यटकांना किल्ल्यात मुक्त प्रवेश आहे.

अग्वादकडे जाताना टेकडी चढणार आहोत, यासाठी घाट चढायचा आहे, तोपर्यंत अग्वादच्या ईतिहासातील काही घटना पाहुया. इ.स. १६१२ मध्ये अग्वादचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर आदिलशहाचा सरदार अब्दुल हकीम याने गोव्यावर आक्रमण करुन अग्वाद ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, मात्र या पराक्रमी सरदारचा प्रयत्न अपुरा ठरला. पुढे गोव्यातील पोर्तुगीज छळवाद संपवायला इ.स. १६६६ मध्ये शिवाजी महाराजांनी तर पुढे संभाजी महाराजांनी मोहीम उघडली. मात्र या अग्वाद रुपी बलदंड लष्करी ठाण्यामुळे कदाचित त्यांना समुद्रमार्गाने हल्ला करुन हे फिरंगाण संपवता आले नाही. पुढे भारत ईंग्रजांच्या ताब्यातून मुक्त होण्याचा दिवस जवळ आला, तरी गोवा काही पोर्तुगीजांच्या तावडीतुन स्वतंत्र होण्याची शक्यता दिसेना. १८ जुन १९४६ या दिवशी डॉ. राम मनोहर लोहीया यांनी गोमांतक मुक्ततेचे रणशिंग फुंकले. त्यांना याच अग्वादच्या किल्ल्यात बंदी बनवले होते. हा दिवस आजही क्रांतिदिन म्हणून साजरा केला जातो. नुकतेच १९९६ या घटनेला पन्नास वर्षे पुर्ण झाली.

स्वातंत्रसैनिक संघटना आणि शासनाने संयुक्त प्रेरणेने या घटनेचे शिल्प या अग्वाद परिसरात उभारलेले आहे. या शिल्पात गोव्याची स्वातंत्र्य देवता पारतंत्र्याच्या बेड्या तुटलेल्या आणि हात उंचावून मुक्त झालेली दाखविली आहे. मागे अशोकस्तंभ आणि पायथ्याशी मुक्तीसैनिकाचे शव खांद्यावर घेउन दुसरा योध्दा, असे हे शिल्प श्री. विष्णू कुकळ्येकरांनी निर्माण केले आहे. अग्वाद भेटीत हे ठिकाण आवर्जुन पहावे असेच आहे.

आधी आपण वरचा बालेकिल्ला पाहुया.यालाच “फोर्तालेज रियाल” किंवा “रियल फोर्ट” म्हणतात.

किल्ल्याच्या सभोवती खंदक खोदलेला आहे.

हा खंदक ओलांडून एका दरवाजातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो.

दारातच किल्ल्याची माहिती देणारा फलक लावला आहे.

किल्ल्याच्या भोवती खंदक खणून तिथला दगड तटबंदीला वापरला आहे.

दरवाज्यातून चिंचोळ्या मार्गाने किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर समोरच मोकळे मैदान, त्यामधे एक दीपगृह, मध्यभागी पाण्याची टाकी आणि चारही बाजूला तटबंदी असे अवशेष दिसतात.

किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी जमा करण्यासाठी किल्ल्याच्या आतील भागातील जमीन जांभा दगडाने बांधुन काढलेली असुन या जमिनीला टाकीच्या दिशेने उतार दिलेला आहे. या पाण्याची टाकीची क्षमता 2,376,000 गॅलन आहे.जमिनीवर चिरे बसवलेले असल्याने कुठेही उघडी जमीन दिसत नाही आणि किल्ला एकदम स्वच्छ वाटतो. ह्या किल्ल्याचा उपयोग पाणी व दारूगोळा साठविण्यासाठी केला जायचा. किल्ल्याच्या आत असणारी दारूगोळ्याची कोठारं मोठया प्रमाणात तुटलेली आहेत असुन त्यांचे अवशेष पहायला मिळतात.

किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितित असुन पाण्याची टाकी व खंदक खोदताना निघालेला दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला गेला. तटबंदीच्या फांजीवर जाण्यासाठी उतार दिलेला आहे, त्यावरुन गाड्यावर तोफा ठेउन नेणे सोपे जात असे. तसेच थेट घोड्यावर बसून पहारा देणेही शक्य होइ.

  किल्ल्याला मुख्य आक्रमणाचा धोका समुद्राच्या बाजूने असल्याने पोर्तुगीजांनी या बाजुला दोन बुरुज उभारलेत, एकाचे नाव “गालव्हांव बुरुज” तर दुसर्‍याचे नाव “लिआरिंश बुरुज”, दोन्ही बुरुजावर अनुक्रमे सात व दहा तोफा खाडीच्या दिशेने आ वासून मारा करायला सज्ज असत.

किल्ल्यामधे १८६४ साली बांधलेला आणि आशिया खंडातील सर्वात जुना दीपगृह पाहता येते. सुरवातीला या दीपगृहातून साधारण दर सात मिनीटांनी प्रकाश बाहेर पडायचा, ज्याची वेळ १८३४ मध्ये कमी करुन दर ३० सेंकदाला प्रकाश पडेल अशी व्यवस्था केली गेली.

पुढे इ.स. १८४१ मध्ये लोपीश दलीम याच्या कारकीर्दीत या दीपगृहाजवळ दीडशे मण वजनाची प्रचंड मोठी घंटा उभारली गेली.दर तासाला हि घंटा यांत्रिक मार्गाने वाजवली जाईल अशी सोय केली होती. सध्या हि घंटा पणजीच्या “चर्च ऑफ ईम्याक्युलेट कॉन्सेप्शन” मध्ये आहे असे समजते. मात्र प्रदीर्घ सेवा बजावलेल्या या दीपगृहाला १९७६ साली कायमचे बंद करण्यात आले. सध्या या दीपगृहावर जाण्यास परवानगी नाही. किल्ल्याच्या परिसरात सध्या नवीन दीपगृह उभारलेले आहे, त्याला “अग्वाद लाईट हाउस” म्हणतात. दरवाजातून आत आल्यावर समोरच तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. तटबंदीवरून संपुर्ण गडाला फेरी मारता येते. किल्ल्याची लांबीरुंदी ४५० x ३५० फुट असुन एकुण क्षेत्रफळ अडीच एकर आहे. किल्ल्याची तटबंदी काही ठिकाणी चार फुट रुंद तर काही ठिकाणी सहा फूटापेक्षा जास्त रुंद आहे. किल्ल्याला एकुण पाच बुरुज असुन, इथे एकेकाळी दोनशे तोफा होत्या असे सांगितले जात असले तरी किल्ल्यात एकही तोफ दिसुन येत नाही.

अग्वादच्या तटावरुन फिरताना पुर्ण पणजी शहर तर दिसतेच, पण काबो राजप्रसाद कांदोलीचा काही भाग, समोरच मीरामार बीच आणि पश्चिमेला अथांग समुद्र दिसतो.

किल्ल्याला अतीरीक्त सरंक्षण मिळावे यासाठी किल्ल्याच्या चारही बाजूंनी खंदक खणलेला आहे. किल्ला सुरक्षित करण्यासाठी किल्ल्याच्या तटबंदीला समांतर असलेल्या खंदकावर दुसरी तटबंदी बांधलेली आहे.

या शिवाय अग्वादमध्ये गुप्त भुयार असून आणीबाणीच्या प्रसंगी त्याचा वापार होत असे.

आग्वादमधील कैदखाना आणि तळघराकडे जायची वाट

अग्वादमध्ये दारुगोळा ठेवायची जागा, कैदखाना आणि अग्वादपासून सुमारे १ कि.मी. वर “सेंट लॉरेन्स चर्च” आहे. अग्वादचे परकीय आक्रमणापासून संरक्षण व्हावे यासाठी हे चर्च उभारले गेले. दर वर्षी १० ऑगस्ट या संताचा स्मृतीदिन. यादिवशी येथे मोठी जत्रा भरते. त्यात भाविकांना सहभागी होता यावे यासाठी मांडवी नदीतील वाळुचा पट्टा त्यादिवशीपुरता सरकतो आणि जहाजांना तिथे येण्यास मोकळीक मिळते, अशी येथील भाविकांची श्रध्दा आहे.

किल्ल्याच्या तटबंदीची एक भिंत खाली समुद्रापर्यंत गेली आहे पण या भागात कारागृह असल्याने तेथे जाण्यास परवानगी नाही. किल्ल्याच्या उजव्या बाजूला समुद्राच्या पाण्याने झिजलेला खडकाळ किनारा आणि सिक्वेरीम बिच दिसतो.

आग्वाद किल्ला बालेकिल्ला पाहिल्यानंतर खाली ताज हॉटेल जवळील लोअर आग्वाद पाहायलाच हवा. सिक्वेरीम (साकेरी) बिच परिसरात असणारा लोअर आग्वाद किल्ला म्हणजे समुद्राच्या पाण्यात घुसलेला व अनेक वर्षे समुद्राच्या धडाकणाऱ्या लाटांना छेदत उभां ठाकलेला विशाल बुरुज, इथे कुण्या एके काळी जहाज उभी करत असं म्हणतात. या बुरुजावर उभारून फेसाळणाऱ्या समुद्रात अस्ताला जाणारा सूर्य बघण्यात एक वेगळीच मजा आहे. या परिसरात या भव्य बुरूजाव्यतिरिक्त एक सलग बांधलेल्या दुहेरी तटबंदीचे अवशेष व या तटबंदीमधे समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने असणारे आणखी दोन बुरुज देखील पाहता येतात.
एकंदरीत पोर्तुगीज सत्तेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणारा आणि एकेकाळी ईथलया कैदखान्यामुळे दहशत असणारा आणि निसर्गाचे वेगळे रुप दाखविणारा हा किल्ला गोव्याला गेल्यावर एकदा तरी भेट देण्यासारखा आहे.

( महत्वाची तळटीपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

अग्वादच्या किल्ल्याची व्हिडीओतून सफर

संदर्भः-
१) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
२) जलदुर्गांच्या सहवासातः- प्र.के. घाणेकर
३) https://itsgoa.com/forts-in-goa-know-more-about-them/ हे संकेतस्थळ
४) पोर्तुगीज-मराठा संबंध- श्री. स.शं. देसाई
५) चला माझ्या गोव्यात- मिलींद गुणाजी
६) ईंटरनेटवरुन मिळालेले संदर्भ

रेइश मागुश/रीस मागोस/रइस मॅगोज/Reis Magos fort आणि ग्यास्पर दियश ( Gaspor Dios )

बहुतेक पर्यटक गोव्याला गेले कि आग्वादला भेट देतात, मात्र याच परिसरातील नितांत सुंदर रिस मागोला मात्र क्वचितच भेट दिली जाते. रीस मागोस किंवा रेईस मागोस हा कलंगुट ते पणजी रोड वरील एक देखणा गिरीदुर्ग आहे. एखादा किल्ला कसा ठेवावा किंवा एखादा किल्ला कसा जतन करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोव्यातील हा रेइश मागुश किल्ला. गोवा सरकारने याची पुनर्बांधणी करून इतिहासाचं फाटलेले सुवर्णपान पुन्हा पुस्तकात चिकटवलं आहे.

मांडवी नदीकाठचा हा किल्ला पाहण्यास अर्धा पाऊण तास पुरे. रीस मागोस आणि गास्पर डायस हे किल्ले आदिलशाही राजवटीखाली होते. पोर्तुगीजानी ते ताब्यात घेऊन त्यावर आपला छाप उमटवला. इंग्रजी ‘व्ही’ अक्षरा सारखे बांधलेले चौरस बूरुज हे पोर्तुगीज दुर्गबांधणीचे एक वैशिष्ट्य, गडाची बांधणीही चौरस. पोर्तुगीज दुर्ग स्थापत्याची आणखीही उदाहरणे आहेत. अलिबाग जवळील रेवदंडाचा सातखणी महाल, रेल्वेच्या डब्यासासारख्या बांधलेल्या तटबंदीचा कोर्लई किल्ला. याशिवाय मोटी दमन-नानी दमन हे किल्ले, मुंबईजवळ केळवेचा पाचूच्या वनात दडलेला भूईकोट किल्ला आणि वसई किल्ला’ हे पोर्तुगीज बांधणीची छाप असलेले आणखी काही किल्ले. रेईस मागो हा आग्वाद किल्ला, मिरामार बीच, काबो किल्ला आणि मांडवी नदीतील जहाजांवर करडी नजर ठेवणारा आणि आकाराने लहान असला तरी दक्ष व सर्व सोयींनी परिपूर्ण असलेला गोव्यातील हा एक पुरातन किल्ला आहे.

पणजी शहर, मांडवी नदी आणि खाडी रक्षण करण्यासाठी उभारलेले तीन किल्ले

या किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास, रेइश मागुश हे किल्ल्याला पोर्तुगीजांनी दिलेले नाव असले तरी गोव्यात पोर्तुगीजांचे आगमन होण्यापूर्वी याच ठिकाणी मांडवी नदीच्या किनारी एक गढी होती. पोर्तुगीजांच्याही आधी गोमंतकावर इ. स. १४७२ साली बहामनी राज्याचा प्रधान महमुद गवाण याने आक्रमण करून गोवा जिंकून घेतल. तेव्हा त्याच्याबरोबर युसुफ आदिलशहा होता, पण तेव्हा तो एक साधा सरदार होता. इ. स. १४८२ साली बहामनी सुलतान महमद शहा मरण पावल्यावर बहामनी राज्याचे तुकडे होण्यास सुरुवात झाली. त्यातच युसुफ आदिलशहाने विजापुरात स्वातंत्र्य घोषित केले. इ. स. १४८९ साली त्याने गोमंतक जिंकून घेतले व जुने गोवे येथे राजधानी करण्याच्या दिशेने पावले टाकली. त्याने येथे अनेक राजवाडे, मशिदी व इमारती गोव्याच्या भूमीत बांधल्या. याच काळात राजधानीच्या रक्षणार्थ मांडवी नदीच्या उत्तर तीरावरील टेकडीवर छोटासा टेहळणी किल्ला बांधून मांडवी नदी आणि संपूर्ण बारदेश आपल्या हुकमतीखाली आणला.

१६ व्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे १५१० मधे अल्फासो दि अल्बुकर्क याचे मांडवी नदी मार्गे गोव्याच्या भूमीत आगमन झाले. त्यावेळी गोव्याचा बराचसा प्रदेश विजापूरच्या युसुफ आदिलशहा याच्या ताब्यात होता. पण अल्फान्सो द अल्बुकर्क याने विजयनगरच्या सम्राटाच्या मदतीने गोव्यावर स्वारी करून गोव्याचा बराचसा प्रदेश जिंकला. बार्देशचा प्रदेश ताब्यात येताच पोर्तुगीज गव्हर्नर डॉन अल्फान्सो डी नोरोन्हा ह्याने १५५१ मधे गोव्याच्या तत्कालीन राजधानीला संरक्षण देण्यासाठी व मांडवी नदीच्या खाडीच्या तोंडावरील अरुंद रस्ता रोखण्यासाठी १५५१ मध्ये येथे किल्ला बांधला. पुढे डॉन फ्रान्सिस्को द गामा याने या किल्ल्याच्या बांधकामात वेगवेगळ्या काळात बरेच बदल आणि विस्तार केला. किल्ल्यात एकूण सात तळघरे असून ती किल्ल्याच्या तटबंदीतून एकमेकांशी जोडली आहेत. इ. स. १५८८-८९ साली गव्हर्नर जनरल मॅन्युअल डिसुझा कुटिन्हो याने ही तळघरे खास बांधून घेतली.

दक्षिणेकडे म्हणजे मांडवी नदीकिनारी गलबतांसाठी धक्का (बंदर), उंच तटबंदी, बुरूज, भक्कम सागरद्वार अशी पोलादी संरक्षण व्यवस्था किल्ल्यासाठी करण्यात आली. बुरूज आणि तटबंदीवर त्याकाळी एकूण ३३ तोफा होत्या, त्यापैकी नऊ तोफा अद्यापही किल्ल्यात पाहता येतात. इ. स. १७०४ साली केटेनो दे मेलो इ-कॅस्ट्रो हा व्हाईसरॉय असताना त्याच जागी जवळपास नवा किल्ला बांधला व तसा शिलालेख तेथील दारावर बसवला . त्याकाळी ह्या किल्ल्यात लिस्बनहून आलेल्या किंवा लिस्बनला जाणाऱ्या व्हायसरॉय व इतर महत्वाच्या व्यक्तींना राहाण्याची सोय केली जात असे. सुरवातीला या किल्ल्याचा उपयोग व्हायसऱॉयचे निवासस्थान म्हणून केला जात होता पण नंतर त्याचे किल्ल्यात रुपांतर झाले. पुढे नाव घ्यावा असा समरप्रसंग इ.स. १६८३- ८४ साली गोव्यातील फिरंगाणाचे उच्चाटन करण्यासाठी संभाजी राजे गोव्यात शिरले. साष्टी व बारदेश तालुके जिंकून पोर्तुगीज व्हॉइसरॉयशी बोलणी करण्यासाठी आपला वकील पाठवला. त्याने २५ नोव्हेंबर १६८३ रोजी व्हॉईसरायची भेट घेतली. खंडणी देउन शांतता विकत घेण्याची पोर्तुगीजांची तयारी नव्हती. यावेळी निकोलाय मनुची हा ईटालियन प्रवासी हजर होता. शंभुराजांनी चार हजार सैन्य पाठ्वून कुंभारजुव्याचा किल्ला उर्फ सेंट एस्टोव्हचा किल्ला ताब्यात घेतला. पण नेमके त्याचवेळी मोगल सरदार शाह आलम ४० हजाराचे सैन्य घेउन गोव्याच्या सीमेवर दाखल झाला. त्याने मराठ्यांनी पादाक्रांत केलेला प्रदेश व किल्ले जिंकले. नाईलाजाने शंभुराजांना कुंभारजुव्याचा ताबा सोडावा लागला. अर्थात हाव वाढलेल्या शाह आलमला आता गोवा ताब्यात घेण्याचे वेध लागले, त्याने पणजीसमोरच्या मांडवी खाडीतुन मोगली जहाजे आत आणण्याची परवानगी पोर्तुगीज व्हॉईसरॉयकडे मागितली. मात्र भविष्यातील धोका ओळखून व्हॉईसरॉयने ती नाकारली, आणि मांडवी खाडी एवजी बारदेशच्या खाडीतुन जहाजे आत आणण्याची परवानगी दिली. पण शहा आलमने लष्करी बळावर जहाजे मांडवीच्या खाडीत घुसवलीच, त्यात अग्वादच्या किल्लेदाराने वेळीच प्रतिकार न केल्याने मोगली जहाजे रेईस मागोजवळ पोहचली. रेईस मागोवर पोर्तुगीज नौदलाचा अधिकारी डिकास्टा याने रेईस मागोवरील तीन तोफांनी हल्ला करायचा आदेश दिला. त्याचवेळी मागून अग्वादच्या किल्ल्यावरुन तोफांचा मारा झाल्याने, शाह आलमने आपली जहाजे रेईस मागोच्या मागील बाजुला असणार्‍या नदीत म्हणजे नेरूळ खाडीत नेली आणि जहाजे तिथेच अडकून बसली. शेवटी पोर्तुगीजांच्या सर्व अटी मान्य करुन आपली जहाजे सोडवून घेतली.
बारदेश तालुक्यातील हा किल्ला गोव्याचे राजधानीचे शहर पणजीपासून फक्त ८ किमी अंतरावर आहे. प्रत्येक सोमवारी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो तर इतर दिवशी किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ अशी मर्यादित आहे. या वेळातील बदल तसेच किल्ल्याच्या अधिक माहितीसाठी www.reismagosfort.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. पणजीवरून मांडवी नदीवरचा पुल ओलांडून मुंबई हायवेला लागले कि उजवीकडे नवीन विधानसभेची इमारत दिसते, तर डावीकडे एक रस्ता पुलावरुन खाली उतरुन बेतीम बीचकडे जाणारा रस्ता पकडावा. डाव्या हाताला मांडवी नदीचे पात्र आणि त्यात बोटींची वर्दळ पहात, बघता बघता आपण बेतीम बीच मागे टाकून रेइस मागोच्या पुढ्यात येतो.

पूर्वी उत्तरेकडून किल्ल्याच्या शिखर माथ्यावर जाण्यासाठी उंच पायऱ्या बांधल्या होत्या पण आता तेथे रस्ता केला आहे. प्रत्येकी ५० रुपयांचे तिकीट काढून किल्ल्यात प्रवेश घ्यावा असला तरी एकुण राखलेला हा किल्ला बघताना ते सार्थकी लागतात.

वास्तविक आधी लष्करी ठाणे, मग तुरुंग आणि शेवटी हॉस्पिटल असा प्रवास केल्यानंतर हा किल्ला १९९३ साली पार मोडकळीला आला होता. मात्र या किल्ल्याचे एतिहासिक महत्व जाणून “द हेलेन हॅम्लीन ट्रस्ट” यांनी पुर्नबांधणी केली आणि ५ जुन २०१२ साली पर्यटकांसाठी हा गड खुला झाला.

गडाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक वटवृक्ष आहे.. हा महाकाय वटवृक्ष एका नारळाच्या झाडावर परावलंबी (Parasite) होवून वाढला.. पुढे हे मूळ नारळाचे झाड कोसळले आणि हा वृक्ष उन्मळण्याच्या बेतात होता, पण याची २००८ सालामध्ये दुरुस्त करण्यात आली.. झाडाच्या खोडात सिमेंट कॉन्क्रीट (Concrete) चा कॉलम भरून त्याला स्थैर्य देण्यात आले.. झाडाच्या फांद्या स्टीलच्या तारांनी ओढून धरल्या आणि अखेर हा वृक्ष तगला.. इकडे गोव्यात एका झाडाला वाचवण्यासाठीही ही वणवण तर तिकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘कॉन्क्रीट (Concrete) जोडो टेकडी फोडो’ अभियान केवढा हा विरोधाभास.

कोकणात सहज उपलब्ध होणाऱ्या पण अत्यंत टिकाऊ अश्या जांभ्या दगडात या किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले आहे.

किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील कोट ऑफ आर्म

माहितीफलक

किल्ल्याच्या भिंती, उंच व भव्य तर आहेतच पण त्याचबरोबर किल्ल्याला असणारे पोर्तुगिजांच्या खास शैलीतील चौकोनी बुरूज देखील बघण्यासारखे आहेत.

किल्ल्याच्या तटबंदीमधे लाईट लावलेले आहेत.

बुरूजावर लाकडी चाकांवर रोखलेल्या तोफा कल्पकतेने मांडून ठेवलेल्या दिसतात.

गडाच्या दक्षिण बुरुजावरून दिसणारा जुन्या गोव्याचा नजारा तर केवळ अफलातून असाच आहे. किल्ला अत्यंत स्वच्छ ठेवलेला असून किल्ल्यातील जुन्या निवासस्थानांचा अत्यंत खूबीने चित्रप्रदर्शन मांडण्यासाठी उपयोग केलेला आहे.

किल्ल्यातील वेगवेगळ्या दालनात गोव्याचा इतिहास तसेच गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतलेल्या वीरांची चित्रे हिरिरीने मांडून ठेवलेली दिसतात. या सर्व चित्रात एक चित्र खूप खास आहे. शिवाजी महाराज घोड्यावर बसले असून त्यांच्या आजूबाजूला त्यावेळची गोमंतकीय जनता आपली पोर्तुगीजांच्या अन्यायापासून सुटका करण्याची विनवणी करत आहेत असे दाखवले आहे.

येथील एका दालनामध्ये मध्यभागी किल्ल्याची लाकडी प्रतिकृती ठेवलेली आहे व सभोवतालच्या भिंतींवर किल्ल्याचे जुने व नवीन फोटो लावलेले दिसतात.

चित्रप्रदर्शन पहात वेगवेगळ्या दालनातून फिरत असताना एका दालनात जमिनीत एक मोठे भोक दिसते व त्यासमोर डेथ होल (Death Hole) असे लिहलेले आहे.हे म्हणजे साक्षात झरोक्यातून डोकावणारा मृत्यूच. पूर्वी या भोकातून खालच्या मजल्यावर (तळघरात) ठेवलेल्या कैद्यांच्या अंगावर उकळते तेल अथवा गरम पाणी वगैरे टाकण्याची भयंकर शिक्षा दिली जात असावी.

किल्ल्याच्या आवारात एक जिवंत पाण्याचा झरा असून त्याकाळी किल्ल्यातील शिबंदीला लागणाऱ्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था या झऱ्याच्या पाण्यातूनच होत असे.

गोव्यातील एक प्राचीन आणि ऐतिहासिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा असा हा देखणा किल्ला गोव्यात जाऊन न पाहणे म्हणजे दुर्भाग्यच म्हणायला हवे. त्यामुळे पुढच्या गोवा भेटीत जेव्हा जवळच असणाऱ्या प्रसिद्ध अश्या कलंगुट बीचला भेट द्याल तेव्हा थोडी वाट वाकडी करून हा रेइश मागुश किल्ला आवर्जून पहावा.

गॅस्पर दियश ( gaspar dias )

गोव्यात जाउन पणजीला मुक्काम असेल तर एक संध्याकाळ घालवायचे ठिकाण म्हणजे, “मीरामार बीच”.पणजीपासून अगदी चालायच्या अंतरावर असलेला आणि समोर उत्तरेला अग्वादचे दीपगृह, एका बाजुला मांडवीचा प्रवाह, त्यातील बोटींची ये-जा, खाद्य स्टॉल्स, पाम वृक्ष , वाळूच्या मस्त पुळण आणि गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे स्मारक अशी अनेक आकर्षण असणारा ह्या बीचला बहुतेक जण भेट देतातच. मात्र या किनार्‍याचे मुळ नाव मीरामार बीच” नव्हते, हे किती जणांना माहिती असते ? ह्या बीचचे मुळचे नाव “गॅस्पर डायस बीच” म्हणून ओळखले जात असे. एक पोर्तुगीज किल्ला एकदा 16 व्या शतकाच्या शेवटी, समुद्रकिनार्‍याजवळ उभा होता. या ठिकाणाचे हे नाव पडण्याचे कारण म्हणजे या परिसरात गॅस्पर डायस या जमीनदाराच्या नावावर बराचसा भुप्रदेश होता. इ.स. १५९८ मध्ये पोर्तुगीज व्हॉईसरॉय डोम फ्रान्सिस्को दे गामा, काउंट ऑफ विदिगुएर (हा वास्को दा गामाचा नातू म्हणूनही ओळखला जातो) च्या कारकीर्दीत सध्या अस्तित्त्वात नसलेल्या या किल्ल्याची उभारणी झाली. नदीच्या उत्तर बाजुला रेईस मागो तर दक्षीण तीरावर गास्पर दियश अशी रचना झाली. अर्थात मांडवी नदीच्या प्रवाहात झालेले बदल विचारात घेता, हा किल्ला नदीच्या किनार्यावर असावा. अर्थातच अग्वादप्रमाणेच या किल्ल्याच्या उभारणीचे कारण डचांनी गोव्यावर केलेला हल्ला हेच होते. सुरवातीला या किल्ल्याचे नाव या परिसरावरुनच ठेवले गेले, “फोर्ते दा पोंटे दी गास्पर दियश” ( Forte da ponte de Gaspar Dias ). पुढे ब्रिटीशांनी इ.स. १७९७ -९८ व १८०२-१४ असा दोन वेळा या परिसरावर ताबा मिळवला होता. अर्थात पुढे राजकीय परिस्थिती बदलली, फक्त किनारपट्टीचा आश्रय घेणार्‍या पोर्तुगीजांनी आजुबाजुच्या प्रदेशावर कब्जा केला. त्यात संभाजी महाराजांनी आक्रमण केल्यानंतर ते अधिक सावध झाले व पोर्तुगीजांनीच हा गॅस्पर दियश पाडण्याचा हुकुम केला, मात्र त्यावेळी त्याची अंमलबजावणी होउ शकली नाही.

 नंतर १८३५ साली पणजीमध्ये तैनात असलेल्या सैन्याच्या रेजिमेंटने गोव्यात पोर्तुगीज अधिकार्‍यांविरूद्ध बंड केले. बंडखोरी लवकरच चिरडली गेली. मात्र यामध्ये किल्ल्याला पेटविले गेले. पण यामुळे गॅस्पर डियश किल्ल्याचे बरेच नुकसान झाले व पुढे जवळजवळ सात वर्षे त्याकडे दुर्लक्ष केले गेले. पुढे १८४२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार झाला. इ.स. १८६९ मध्ये एका समितीने केलेल्या पहाणीनंतर असे सुचविण्यात आले होते की जखमी झालेल्या सैनिकांच्या उपचारासाठी हा किल्ला वापरला जाऊ शकतो. या समितीने गॅस्पर डियश किल्ला आता कोणत्याही युद्धासाठी उपयोगी नसल्याचे सुचविले. नंतर 1878 मध्ये सुचविलेल्या उद्देशाने याचा वापर जखमी सैनिकांसाठी हॉस्पिटल म्हणून केला जाउ लागला. पुढे ईतिहासाबरोबरच या परिसराचा भुगोलदेखील बदलला. पणजी हे केवळ बेटांचा समुह न रहाता, त्यात भर टाकली गेली, शिवाय मांडवी नदीचे खाडीकिनारी असलेले मुख विस्तारले, सहाजिकच बदलत्या परिस्थितीत या किल्ल्याचे महत्व उणावले आणि केवळ दोन शतकापुर्वी अस्तित्वात असणारा हा किल्ला कायमचा पुसला गेला.
  

आज या किल्ल्याच्या कोणत्याही स्मृती या परिसरात राहिलेल्या नाहीत. मीरामार जंक्शन येथील ट्रॅफिक बेटावर दाखविण्यात आलेली तोफ म्हणजे आज किल्ल्याचे अवशेष आहेत.असे मानले जाते की मिरामार येथील किल्ला सध्याच्या क्लब कंपाऊंडच्या उत्तरेकडील भिंतीपासून सध्याच्या मारुती मंदिरापर्यंत पसरलेला होता आणि साळगावकर लॉ कॉलेजच्या मागील टोंका येथे राज्य कृषी विभागाच्या कार्यालयाशेजारील रोड जंक्शनपर्यंत विस्तार असावा.

मीरामार बीचला भेट देताना एक आठवण म्हणून पर्यटक येथील तोफेजवळ फोटो काढतात, पण ईथे असा काही किल्ला होता हे कोणालाही माहिती असणे शक्यच नाही.

सध्या नाही म्हणायला “गास्पर दियश”ची एकमेव आठवण म्हणजे त्याच जागी उभारलेला, “क्लब टेनिस डी गास्पर डायस”. नाही म्हणायला मुळ किल्ल्याचे १८७६ मधील एक चित्र उपलब्ध आहे.

गास्पर दियशचे मुळ चित्र

हँड्स-ऑन हिस्टोरियन्स या ग्रुपचे श्री. संजीव सरदेसाई गोवाभरातील संस्थांमधील व्याख्यानांच्या माध्यमातून मीरामारच्या या अल्प-ज्ञात इतिहासाबद्दल जागरूकता वाढवतात. गास्पर डायस कसा दुर्लक्षित होउन बेवसाउ झाला आणि नंतर हा भाग दफनभूमी आणि स्मशानभूमी म्हणून वापरला गेला याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आता एकच प्रश्न उरतो, ‘या परिसराला “मीरामार” हे नाव कसे पडले?’. जेव्हा या भागात बसेस धावू लागल्या तेव्हा बस कंडक्टरने हॉटेल मिरामारचा उपयोग प्रवाशांना स्टॉप समजावा म्हणून केला. अखेरीस ते ‘हॉटेल’ मिटले आणि फक्त ‘मीरामार’ हा शब्द उरला. आणि म्हणूनच या परिसराला मीरामार हे नाव पडले.
मीरामारचा अर्थ आहे “Mirage of the Sea”, समुद्रातील दृष्टीभ्रम !

(मह्त्वाची तळटीपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

माझे सर्व लिखाण तुम्ही येथे एकत्र वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

रेइस मागो किल्ल्याची व्हिडीओतून सफारी https://www.youtube.com/embed/VXZvo1YJYT4

संदर्भः-
१) जलदुर्गांच्या सहवासात- प्र.के.घाणेकर
२ ) माझ्या या गोव्यात- मिलींद गुणाजी
३) हा श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग
४) ईंटरनेटवरील माहिती