अनवट किल्ले ३: मानवाक्रुती सुळक्यांचा कोहोज ( Kohoj )

अशेरी गडाची भटकंती संपवून आम्ही मस्तान फाट्याला उतरलो. ईथे मुंबई -अहमदाबाद रस्त्याला पालघर- वाडा रस्ता छेदतो. जवळच मनोर हे गाव आहे. मनोरला देखील नदीकाठी किल्ला होता, पण आता तो नष्ट झाला आहे. मस्तान नाक्यावर मोठ्याप्रमाणात हॉटेल, लॉज आहेत. अगदी थिएटरही आहे. आम्ही विठ्ठल कामत रेस्टॉरंट मधे जेवण घेतले. जेवण सो सो च होते.
ईतिहासः-
कोहोजवरची पाण्याची खांबाटाकी पाहता गड नक्कीच प्राचीन आहे यात शंका नाही, बहुधा शिलाहारांच्या उत्तर कोकणातल्या शाखेने याची उभारणी केली असावी. काही अभ्यासकांच्या मते इ.स. १६७० मधे शिवाजीराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला ताब्यात घेतला, पण सन १६५६-५७ च्या सुमारासच उत्तर कोकणातली आदिलशहाची सत्ता संपुष्टात आल्याने बहुधा शिवाजी राजांनी हा गड १६५७ च्या आसपास जिंकून घेतला असावा.
पुरंदर तहात शिवाजी राजांनी मिर्झाराजाना जे तेवीस किल्ले दिले त्याच्या काही याद्यात याचाही उल्लेख आहे. गडाचे स्वराज्यापासून एकूण लांब असलेले स्थान बघता त्यात तत्थ्य वाटते. ( या तेवीस किल्ल्यांच्या यादीबध्दल एक स्वतंत्र धागा मिपावर लिहीनच).
मोगलाचा मनसबदार व जव्हारचा जमीनदार विक्रम पंतगराव याने संभाजी महारांज्याच्या काळात ७ एप्रिल १६८८ रोजी हा किल्ला जिंकून घेतला.
असो.
मस्तान नाक्यावरून कोहोज गडाला जायचे तर दोन पर्याय आहेत.
१ ) नाणे या गावात जाउन गडावर जाणे. किंवा
२ ) वाघोटे गावातून गडावर जाणे.
शक्यतो जास्तीत जास्त वाटानी गड चढण्यावर माझा कटाक्ष असतो, कारण पुन्हा पुन्हा एखाद्या किल्ल्यावर जाणे होत नाही. त्यामुळे आम्ही नाणे गावात जाण्याचा निर्णय घेतला. नाणेला जाण्यासाठी पालघरहून बसेस आहेत, तसेच मस्तान नाक्यावरून रिक्षा देखील आहेत. आम्ही एका रिक्शाने नाणे गाव गाठले.
k1
गावातून कोहोज व त्याचे सुळके स्पष्ट दिसत होते.
कोहोज अस्ताव्यस्त पसरलाय, गडावर येण्यास तब्बल पाच वाटा आहेत.
१) नाणे गावातून
२ ) सांगे गावातून
३ ) गोर्‍हे गावातून
४ ) वाघोटे गावातून
५ ) आमगावातून
पैकी लाल रंगात नाणे गावातून जाणारी व निळ्या रंगात सांगे गावातून जाणारी वाट फोटोत दाखविल्या आहेत.
k86
नाणे गावाजवळच एक डोंगर सोंड उतरली आहे, त्यावरुन चढायला सुरवात केली तरी योग्य वाटेला लागतो. शक्यतो गावातुन वाटाड्या घेतला तर वाटा शोधण्यात वेळ जात नाही. नाणे गावातून चढणारी वाट हळुहळू चढत एका विस्तीर्ण पठारावर येते. आपली अपेक्षा नसताना हे पठार पाहून थक्क व्हायला होते.
k3
समोरच बालेकिल्ल्याचे पठार दिसत असते, इथून एक वाट झडीतुन थेट पठारावर चढते, पण ती सापडायला हवी, अन्यथा रुळलेल्या वाटेवरुन सरळ चालत राहायचे. उजव्या बाजुला एक ओढा लागतो, ईथेच सांगे गावातून येणारी नाळेची वाट मिळते. वाट डावी कडे वळून चढणीला लागते आणि माचीवर आपला प्रवेश होतो. ईथपर्यंत येण्यास जवळपास दोन ते अडीच तास लागतात.
k4
डावीकडे एका प्रचंड मोठ्या ईमारतीचे अवशेष दिसतात.
k6
समोरच छोटेखानी शंकराचे मंदिर दिसते. हे कुसुमेश्वर मंदिर.
k7
हि शिवपिंड. महाशिवरात्रीला येथे जत्रा भरते.
k9
समोरच पाण्याची दोन कोरीव टाकी दिसतात. मात्र पाणी खराब आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दोन पर्याय आहेत, एक तर बालेकिल्ल्याच्या खांबटाक्यातून पाणी आणणे किंवा मंदिराच्या दक्षीणेला म्हणजेच मंदिराकडे तोंड करुन उभारल्या नंतर डाव्या दिशेने गेल्यास सात टाक्यांचा एक समुह दिसतो, त्यात पिण्यायोग्य पाणी आहे.
k8
मंदिराकडे तोंड करुन उभे राहिल्यानंतर डावी कडे जाणारी वाट खाली उतरून आमगावच्या दिशेने जाते,पण या वाटेने उतरण्यास माहितगार पाहिजे, शिवाय हि बरीच लांबची वाट आहे.
k12
आमगावच्या वाटेवरून दिसणारे सुळके.
k8
मंदिराच्या मागच्या बाजुला बर्याच मुर्ती दिसतात.
हे सगळे पाहून झाल्यानंतर आपला मोर्चा वळवायचा कोहोजच्या मुख्य आकर्षणाकडे, त्यासाठी बालेकिल्ल्याकडे जाणारी वाट पकडायची.
k10
माचीवरून दिसणारी बालेकिल्ल्याची टेकडी
k14
बालेकिल्ल्याकडे जाताना.
k15
कातळ कोरीव पायर्‍या आपल्याला तीन कोरीव टाक्यांच्या समुहाजवळ आणुन सोडतात,
k14
पैकी मधल्या खांब टाक्याचे पाणी पिण्यायोग्य आहे. या खांबटाक्यावरून या किल्ल्याचे प्राचीनत्व सिध्द होते.
k16
कातळकोरीव टाक्यापासून दिसणारा माचीचा नजारा. ( प्रकाश चित्र आंतरजालावरून साभार )
k17
हाच पायर्‍यांचा मार्ग आपल्याला दोन उध्वस्त बुरूजांमधून बालेकिल्ल्यावर पोहचवतो.
k189
ईथे एक जीर्णोध्दार केलेले मारुती मंदिर आहे. या मारुती वरून गड मराठ्यांच्या ताब्यात होता याला पुष्ठी मिळते.
k18
ईथेच एक कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे.
आता जाउ या सर्वोच्च माथ्याकडे, ईथेच आहेत वार्‍याच्या घर्षणाने तयार झालेले मानवाक्रुती सुळके.
k19
या सुळक्यांचे फोटो बघूनच या गडाला भेट द्यायची असे मी ठरवले होते.
k78
विविध कोनातुन सुळक्यांचे निरनिराळे आकार पाहण्यास मिळतात.
k125
या सुळक्यांवर चढता देखील येते.
k56
आणखी एका अँगलने दिसणारा सुळका ( प्रकाश चित्र आंतरजालावरून साभार )
k45
या दक्षिण सुळक्याच्या म्हणजे मानवाक्रुती सुळक्याच्या खाली श्रीक्रुष्णाचे मंदिर आहे. श्रीक्रुष्णाचे मंदिर सहसा कुठल्या किल्ल्यावर पहाण्यास मिळत नाही.
k78
गड माथ्यावर पुर्वी तोफाही होत्या, मात्र काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या दरीत लोटून दिल्या, म्हणुन गावकर्‍यांनी काही सुस्थितीतील तोफा नाणे, सांगे व गालथरे गावात आणुन ठेवल्या आहेत. पैकी नाणे गावात श्री. माधव कामडी यांच्या घरासमोर ठेवलेली तोफ आपण पाहू शकतो.
या दोन्ही सुळक्याच्या मधे एक अरुंद सपाटी आहे, तिथे जाउन बसता येते. मात्र ईथून समोर अचानक खोल दरी दिसते त्यामुळे अक्षरशः डोळे फिरतात.
हवा स्वच्छ असेत तर विस्त्रुत परिसर दिसतो, उत्तरेला गंभीरगड व सुर्या नदीचे खोरे, वायव्येला अशेरीगड, पश्चिमेला काळदुर्ग, नैॠत्येला तांदुळवाडी किल्ला, दक्षिणेला टकमक गड तसेच वैतरणा नदीचे खोरे दिसते, तर आग्नेयेला माहुली दिसतो. पायथ्याची नाणे, सांगे, आमगाव व वाघोटे हि गावे दिसतात. तसेच पालघर – वाडा रस्ता व त्यावरची वर्दळ दिसत असते.
k74
किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी एक बदामाक्रुती तळे दिसते, हा आहे शेलते पाझर तलाव. ह्याला हार्ट लेक असे कुणी नावही दिलेले आहे. ( प्रकाश चित्र आंतरजालावरून साभार )
k46
समोरच किल्ल्याला चिकटून एक भेदक सुळका दिसतो, त्याचे नाव “नागनाथ लिंगी”. अर्थात तिथे जायचे झाले तर, प्रस्तरारोहणा शिवाय पर्याय नाही.
मनसोक्त गड दर्शन केल्यानंतर आम्ही दुसर्‍या वाटेने म्हणजे वाघोट्याच्या वाटेने उतरलो. यासाठी आधी मगाशी सांगितलेल्या सांगे गावाच्या नाळेच्या वाटेने उतरण्यास सुरवात करायची, हा पावसाळी ओढा आहे. निम्मे उतरल्यानंतर एक वाट डावीकडे फुटते, हि वाट वाघोट्याला उतरते, तर समोर उतरणारी वाट सांगे किंवा नाणे गावात उतरते, मात्र संध्याकाळी या दोन्ही गावातून परतण्यासाठी वाहन मिळेल याची खात्री नसल्याने, आम्ही वाघोट्याला उतरण्याचा निर्णय घेतला. गड पुर्ण उतरल्यानंतर आपण शेलते पाझर तलावापशी येतो, इथे आम्ही हातपाय बुड्वून सगळा शीण घालवला व वाघोट्याकडे निघालो.
k75
पाझरतलावा जवळुन दिसणारा कोहोज ( प्रकाश चित्र आंतरजालावरून साभार )
लगेचंच एक रिक्षा मिळाली, त्याने मस्तान नाक्याकडे परत निघालो.
ट्रेक संपल्याची हुरहुर मनात होती, पण तीन अविस्मरणीय दिवस आठवणीत जमा झाले होते. मागे वळून पाहिले असता,
k85
सुर्यकिरणात न्हाउन निघालेला कोहोज परत येण्याचे आवतान देत होता. बघुया पुन्हा कधी योग येतो ते?
किल्ल्याचा व परिसराचा नकाशा पोस्ट करतो.
map of fort
हा परिसराचा नकाशा
surrounding
सदर्भ ग्रंथः-
१ ) दुर्गसंपदा ठाण्याची- सदाशिव टेटविलकर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध – सतीश गुरुसिध्द अक्कलकोट
३ ) ठाणे जिल्हा गॅझेटिअर
४ ) सांगाती सह्याद्रीचा – यंग झिंगारो ट्रेकर्स
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s