चहाडघाटाचा रक्षक काळदुर्ग (Kaldurg )

आतापर्यंत पाहिलेले किल्ले बलदंड आणी सामरीकद्रुष्ट्या महत्वाचे आहेत. पण  आज आपण माहिती घेत असलेला काळदुर्ग हा तुलनेने कमी महत्वाचा किल्ला म्हणावा लागेल. पालघरच्या पुर्वेला समुद्राला संमातर उत्तर दक्षिण अशी एक डोंगररांग आहे. या रांगेत तीन किल्ले आहेत, असावा, काळदुर्ग आणि तांदुळवाडी. हि डोंगररांग घनदाट वनश्रीने नटलेली आहे, ईथे किल्ला आणि  त्याच्या पायथ्याशी पाझर तलाव अशी रचना आहे. या गडाची उंची ३५० मी. आहे.
आज आपण जाणार्‍या काळदुर्ग हा किल्ला पालघर – मनोर- वाडा या रस्त्यावर  असलेल्या चहाड घाटावर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला आहे. या भागात असलेल्या सागवानी झाडांची तोड करून जहाज बांधणीसाठी त्याची वहातुक चालायची , त्यावर देखरेख करण्यासाठी या किल्ल्याची उभारणी झाली असावी.
ईतिहासात डोकावले असता, हा किल्ला माहिमच्या बिंब राजाकडे होता. याची  उभारणी बहुतेक शिलाहारानी केली असावी. शिवकाळात हा किल्ला पोर्तुगीजांच्या  ताब्यात असावा. पुढे संभाजी रांज्याच्या काळात हा किल्ला मराठ्यांनी  घेतला.
काळदुर्ग ह्या किल्ल्याला काळमेघ, नंदिमाळ अशीही नावे आहेत.
इथे यावयाचे झाले तर दोन मार्ग आहेत. १) मुबंई – अहमदाबाद धावणार्या पॅसेंजर पालघरला थांबतात किंवा विरार – डहाणु लोकलने पालघरला उतरावे. किल्ला जरी पुर्वेला असला तरी पालघर पश्चिम हुन मनोर किंवा वाडाकडे जाणार्‍या बस किंवा खाजगी जीप पकडायच्या व वाघोबा देवस्थान हा स्टॉप सांगायचा. चहाड घाटात हे मंदिर आहे. इथे मांकडाचा प्रचंड सुळसुळाट आहे.
२) स्वताची गाडी असेल तर विरार हून अहमदाबादच्या दिशेने निघाल्यानंतर मस्तान नाक्यापाशी गाडी डावीकडे मनोर रस्त्याला वळवायची आणी चहाड घाटामधे वाघोबा मंदिरापाशी थांबायचे.

या रस्त्याने जाताना किल्ल्याचे दर्शन होते, तेंव्हा शंकराच्या पिडिसमोर बसलेल्या नंदीसारखा आकार दिसतो, कदाचित यामुळेच याचे नाव नंदिमाळ पडले असेल.

वाघोबा देवस्थान हे छोटे मंदिर आहे. जंगल्यातल्या खिंडीत अशी व्याघ्रस्थाने  दिसतात, उदा. अशेरी, हरिश्चंद्रगड.

मंदिराच्या मागे हा पाण्याचा हातपंप आहे. हवे असेल तर पाणी या ठिकाणी भरुन घेतलेले चांगले कारण गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. ठीक याच्या जवळुन चढायला सुरवात करायची हे लक्षात ठेवायचे. डाव्या, उजव्या वाटा सोडून सरळ चढत रहायचे. शक्य  झाल्यास एखादा स्थानिक वाटाड्या घ्यावा म्हणजे चुकण्याची शक्यता नाही तसेच  कमी वेळात किल्लाही पाहून होतो. साधारण पाउण ते एक तासात आपण एका सपाटीवर पोहचतो.

इथे किल्ला डाव्या हाताला किंवा पुर्वेला दिसत असतो, जर तासाभरात सपाटी आली नाहीतर वाट चुकली असे समजावे.

पठाराजवळुन दिसणारा माथा.
या पठारावरून सरळ चालात राहिल्यानतंर एक वाट सरळ जाते तर एक वाट डावीकडे चढाला लागते, या डाव्या वाटेने चढण्यास सुरवात करायची कि अर्ध्या तासात एका छोट्या सुळक्यासारख्या दगडाजवळ आपण पोहचतो,

जणु हा नैसर्गिक बुरुजच. इथे थोड्यावेळ थांबुन आजुबाजुचा नजारा बघायचा. घाटातून अंखड गाड्यांची वर्द्ळ चालू असते. इथून पंधरा वीस मिनीटात आपण गडमाथ्यावर पोहचतो.

नैसर्गिक बुरुजापासून एखद्या सुळक्यासारखा दिसणारा कातळमाथा.

माथ्याजवळ आलो कि आधी हे कड्यालगत कोरलेले पाण्याचे टाके दिसते. माथा म्हणजे चौकोनी कातळ आहे. याचे पायर्‍यासारखे दोन भाग पडतात. आपला प्रवेश आधी खालच्या माची वर होतो.

इथे एक मोठ टाक कोरलेल आहे तसेच काही खळगे आहेत. या खळग्याजवळुन एक वाट उतरते,

या वाटेने उतरल्यास एका भग्न शिवमंदिराजवळ आपण येतो. हे आहे मेघोबाचे मंदिर. इथे शिव पिंड, नंदी व इतर काही मुर्त्या दिसतात. उत्तर कोकणातला पहिला पाउस इथे पडतो म्हणुन हा आहे “मेघोबा”.

हे पाहुन कातळ कोरीव पायर्‍या चढून आपण येतो सर्वोच्च माथ्यावर.
इथेही एक कोरडे टाके आहे. गडावरुन विस्त्रूत परिसर दिसतो. उत्तरेला असावा किल्ला, ईशान्येला अशेरी, पुर्वेला कोहोज, आग्नेयेला टकमक , दक्षिणेला तांदुळवाडी, तर पश्मिमेला पालघर शहर दिसते. हवा स्वच्छ असेल तर समुद्राची रेघ्ही दिसेल, तर वायव्येला देवखोप पाझर तलाव दिसतो.

देवखोप पाझर तलाव व मागे काळदुर्ग
गडाचा एकंदर चिंचोळा माथा विचारत घेता हा फार महत्वाचा किल्ला नसणार, फक्त निरीक्षणाचे ठाणे असणार असा अंदाज बांधता येतो. दोन दिवसाची सवड असेल तर, या भागातले काळदुर्ग, असावा व तांदुळवाडी असे तीनही किल्ले पहाता येतील.

काळदुर्ग किल्ल्याच्या परिसराचा नकाशा ( किल्ल्यावर विशेष अवशेष नसल्याने गडमाथ्याचा नकाशा दिलेला नाही)
(टिपः- या भटकंतीचे मी काढलेले फोटो सापडत नसल्याने सर्व फोटो आंतरजालावरुन साभार)
संदर्भ ग्रंथः-
१ ) दुर्गसंपदा ठाण्याची- सदाशिव टेटविलकर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध – सतीश गुरुसिध्द अक्कलकोट
३ ) ठाणे जिल्हा गॅझेटिअर
४ ) सांगाती सह्याद्रीचा – यंग झिंगारो ट्रेकर्स
५ ) http://www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s