अनवट किल्ले ११ : वळणदार तटबंडीचा भुदरगड ( Bhudargad)

कोल्हापुर जिल्ह्याच्या उत्तरेला पन्हाळा, विशाळगड असे महत्वाचे किल्ले आहेत. तर दक्षिण बाजुला रांगणा, सामानगड असे किल्ले आहेत, या दरम्यान होणार्‍या वाह्तुकीला आणि लष्करी हालचालीवर नजर ठेवण्यासाठी एका बळकट ठाण्याची नितांत आवश्यकता होती, यासाठीच पन्ह्याळ्याच्या शिलाहार दुसर्‍या भोज राजाने एका सपाट पठारावर या दुर्गाची निर्मीती केली. शिलाहार राजा भोज (दुसरा) यांने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. थोरल्या महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली व एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. दुर्दैवाने हा गड पुन्हा अदिशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला. जिंजीवरुन परत येताना, छत्रपती राजाराम महाराज या गडावर काही काळ वास्तव्यास होते. ९ मार्च १६९१ च्या पत्रानुसार भुदरगड मराठ्यानी सोडून दिला. काही वर्षानी तो पुन्हा स्वराज्यात दाखल झाला.
अठरावे शतक सरताना, परशुरामभाऊ पटवर्धनांनी हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर १० वर्षांनी करवीरकर छत्रपतींनी हा किल्ला जिंकून घेतला. १८४४ साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडात हया गडावरील शिंबदीने भाग घेतला होता. बाबाजी आयेरकर हा शूर गडकरी त्यावेळी होता, त्याला सुभाना निकम याने आपल्या ३०० साथीदारांसह उत्तम साथ दिली होती. त्यांचा बीमोड करण्यासाठी जनरल डिलामोटीने ससैन्य कुच केले. १३ ऑक्टोबर १८४४ रोजी ईंग्रजाच्या सैन्याने भुदरगडावर पुर्ण ताबा प्रस्थापित केला. परत असे बंडाचे प्रयत्न होउ नयेत म्हणून इंग्रजांनी यावेळी डागलेल्या तोफांनी गडाचा मुख्य दरवाजा व तटबंदीचा भाग जमीनदोस्त झाला होता.
भुदरगडाला जायचे म्हणजे दोन पर्याय आहेत.
१) गारगोटीहून गडावरच्या पेठ शिवापुर गावी जायला सकाळी साडे नउ, दुपारी साडे अकरा व संध्याकाळी पाच अशा तीन गाड्या आहेत. पेठ शिवापुर जवळपास भुदरगडावर वसलेले आहे.
२ ) स्वत:चे वाहन असल्यास गारगोटी – पुष्पनगर – शिंदेवाडी मार्गे राणेवाडी मार्गे पेठशिवापूर – भुदरगड गाठता येते. पाटगावला जाणार्‍या गाड्या पुष्पनगरला थांबतात. रांगणा किल्ला बघून भुदरगडही करायचा असल्यास हा रस्ता सोयीचा.
रंगपंचमीचा दिवस म्हणजे हक्काची सुट्टी. आज रंग खेळायचा मुड नव्हता आणि घरात लोळत पडणे कोणत्याही ट्रेकर्ससाठी अब्राम्ह्यण्यच. सो एनवेळी ट्रेक प्लॅन करायचा तर फार लांब जाणे शक्य नव्हते. फार चढाई नाही आणि फार लांबही नाही आणि बरेच दिवस विनाकारण राहून गेलेला भुदरगड नक्की केला. रंगपंचमीमुळे गाडीवरुन जाणे अशक्य होते अर्थात एस.टी. ला पर्याय नव्हता. कोल्हापुरहून गारगोटी स्टँड गाठले तर पहिली गाडी सकाळी आठ वाजता निघून गेल्याचे चौकशी या पाटीखाली बसणार्‍या ईसमाने नम्रपणे सांगितले. पुढची बस थेट एक वाजता होती. शेवटी गडहिंग्लजला जाणार्‍या गाडीने पाल या गावी उतरलो. गावातून थोडे पुढे गेलो, तो रंग खेळणार्‍या पोरांनी अडविले. मी सरकारी कर्मचारी असून कामाची पहाणी करायला आलो आहे असे त्यांना दटावताच, पोरे निमूट बाजुला झाली.
त्यांचे हिरमुसलेले चेहरे बघून कॅमेरा काढला व एक स्नॅप घेतला. हुर्र करून सगळी पळाली. पाल गावातून पेठ शिवापुरला जायचे दोन पर्याय आहेत. डांबरी सडकेवरुन चालत तासा दिडतासात शिवापुरला पोहचू शकतो किंवा पाल गावासमोरच दिसणार्‍या टेकडी वरून शॉर्ट्कटने त्याच डांबरी सड्केवर पोहचू शकतो. पण एकटाच असल्याने झाडीतून जाण्याची रिस्क नको यासाठी रस्त्यावरून “चल अकेला! चल अकेला!!” करत निघालो. एवढ्यात मनवले गावाकडे जाणारा एक एम.एटी. स्वार आला. हात केल्याबरोबर त्याने शिवापुर फाट्यावर सोडले. ईथून घाट रस्ता वळणे घेत घेत, वर चढतो. दुतर्फा गर्द झाडी असल्याने चालण्याचा शीण जाणवत नव्हता.
bhr1
अखेरीस एका वळणावर गडाच्या तटबंदीचे दर्शन झाले.
bhr2
गड डाव्याहाताला ठेवून थोडे अंतर चालल्यानंतर निरनिराळ्या वृक्षांच्या गर्द सावलीत वसलेले पेठ शिवापुर हे ईटुकले गाव सामोरे आले. ईथे सोमवारी बाजार भरतो.
bhr3
इथून एक रस्ता राणेवाडी मार्गे पुष्पनगरला जातो, तर डावीकडची डांबरी सडक थेट गडावर जाते. स्वताची गाडी असेल तर ती थेट गडमाथ्यावर जाते शिवाय माथा बर्‍यापैकी सपाट असल्याने गडावर फिरूही शकते. या फाटयाच्या आधी डावीकडे एक जुने महादेव मंदिर आणि गजपॄष्टावर धारण केलेली दिपमाळ दिसते. डाम्बरी सडक एक छानसे वळण घेउन गडमाथ्यावर पोहचवते. ईथे आपण समुद्रसपाटीपासुन ९७८ मी. उंचीवर असतो.
bhr3
गडमाथ्यावर पोहचल्याबरोबर प्रचंड सपाटी सामोरी येते. आणि अर्थात लक्ष वेधून घेते ते भैरवनाथाचे हे अनोखे बांधणीचे मंदिर.
bhr4
मंदिर परिसरात गडाचा नकाक्षा आणि माहिती देणारा फलक कागलच्या लोकराज्यमंचने लावला आहे. मंदिरात प्रवेश करताक्षणी शरीरात गारवा पसरला. मंदिराचे छत गजपृष्टाकार म्हणजे हत्तीच्या पाठीसारखे आहे.
bhr5
मुळ मंदिर हेमाडपंथी आहे. गाभार्‍यात भैरवनाथाची मुर्ती आहे. भैरवनाथाच्या हातातली शस्त्रे न्याहाळली, देखणे अलंकारही पहाण्याजोगे. आजुबाजूच्या परिसरातील गावकर्‍यांचे हे कुलदैवत, त्यामुळे बरीच भक्तमंडळी दर्शनाला आली होती. त्यांच्या पाउसपाण्याच्या गप्पा एकायला मजा आली, विशेषत: तो खास कोल्हापुरी टोन. दर रविवारी ईथे भरपुर भक्तगण जमतात, पण माघात कृष्ण एकादशी ते दशमी अशी ईथे मोठी यात्रा असते तेव्हा पुन्हा या असे आंमत्रण द्यायला हे साधेभोळे लोक विसरले नाहीत. सह्याद्रीत भटकताना नेहमी येणारा अनुभव. ई.स. १६७२ मधे मराठ्यांनी जेव्हा हा किल्ला मोघलांकडून जिंकून घेतला, तेव्हा त्यांनी मोघल सरदाराला तर मारलेच , पण त्याची निशाने भैरवनाथाला दिली जी गाभार्‍यात आपणाला पाहण्यास मिळतात.
bhr6
मंदिरातून बाहेर आल्यानंतर दिपमाळा व पालखीचा चौथरा दिसतो. समोरच निशाण बुरुज आहे, त्यावर भगवा डौलाने फडकताना दिसतो.
bhr7
ईथे काही जाती दिसतात.
bhr8
तसेच एक ब्रिटीश बांधणीची तोफ आहे. गावकर्‍यानी ती जांभ्याच्या चिर्‍यात व्यवस्थित बांधून ठेवली आहे.
bhr10
त्यावर हे चिन्ह सांगून जाते कि ती कोण्या ईंग्रजाने ओतली आहे.
bhr11
आता गडफेरीला सुरवात करुया. भैरवनाथ मंदिराच्या मागच्या बाजुला जांभ्या दगडात बांधलेला वाडा दिसतो, त्याला कचेरी म्हणतात. आतमधे एक चौथरा आहे, ती आहे गडाची सदर. ईथूनच पुर्वी गडाचा कारभार चालत असे. मागे बघता कमानीणि अलंकृत भैरवनाथाचे मंदिर सुंदर दिसत होते.
bhr12
जवळच करवीरकर छत्रपतींनी बांधलेले पुरातन शिवमंदिर आहे. गाभारर्‍यात शिवपिंडी तर आहेच पण बाहेर सह्याद्रीच्या शिवाचा अर्धपुतळा आहे. जर भुदरगडावर मुक्कामची वेळ आली तर हे मंदिर पथारी पसरायला बेस्ट.
bhr13
ईथून पुढे सरळ गेले कि समोर भव्य तलाव दिसतो. क्वचितच एखाद्या गडावर इतका मोठा तलाव असेल. एका बाजुला बांध घालून हा तलाव धरणासारखा उभारलेला आहे. आजुबाजूची पांढरी माती धुपून पाण्यात मिसळत असल्याने पाण्याच्या रंग दुधी झाला आहे. म्हणून याला “दुधसागर” म्हणतात. तलावा शेजारीच भग्नावस्थेतील भवानी मंदिर आहे. आत मधे शस्रसज्ज , देखणी भवानी मातेची मुर्ती आहे. मंदिराचे चिरे आजुबाजूला विखुरले आहेत. रोहिड्याच्या मंदिराप्रमाणे एखाद्या संस्थेने मंदिर पुन्हा उभारून गतवैभव मिळवता येईल.
bhr14
उत्तर टोकाकडे निघाल्यानंतर तलावाकाठी बर्‍याच समाध्या दिसतात.
bhr18
एक छोटा तलाव या बाजुला आहे. शिवाय हे मंदिर आहे. मुळ मंदिर गुहेत असून हा सभामंडप आहे. ईथेले शिल्पकाम पहाण्यासारखे आहे.आतमधे अनेक मुर्त्या आहेत.
bhr15
ईथली तटबंदी बहुधा ईंग्रजांच्या मार्‍यातून वाचली असावी. जिन्यावरून चढून तटावरून फेरी मारावी. या बाजुला एक पामचे झाड आहे. खालच्या बाजुला कोणतेही शहरी ताणतणाव नसणारे, निंवातपणे पडलेले शिवापुर दिसते. उत्तरेला लांबवर दुधगंगा व वेदगंगा नद्यांची खोरी दिसतात.
bhr16
तर मागे किल्ल्याच्या पठाराचा पसारा दिसतो.
bhr17
गडाला दोन दरवाजे असावे हे महाराजांचे दुर्गशास्त्र, त्याप्रमाणे या गडालाही दोन दरवाजे आहेत. पण सध्या हा दरवाजा बुजलेल्या अवस्थेत आहे. जवळच महादेवाचे सुंदर बांधणीचे मंदिर आहे.
bhr18
या वाटेने खाली उतरल्यास जखीणपेठ गावी जाउ शकतो. ईथे एक दुर्गविशेष आहे. पायर्‍याच्या वाटेने खाली उतरल्यास एक मोठी शिळा कोरून पहारेकर्‍यांसाठी खोली कोरलेली दिसते, स्थानिक गावकर्री तीला “पोखर धोंडी” म्हणतात. जिज्ञासूनी ती आवर्जुन पहावी.
bhr19
यानंतर पुढे येते जखुबाईचे गुहा मंदिर. जमीनी कोरून काढलेले हे भुयारच आहे. जमीनीवर असणार्‍या नंदीमुळे ते लांबुनच ओळखता येते. भुयारातल्या दहा कोरीव पायर्‍या उतरल्या कि जखुबाईची शेंदुरचर्चित मुर्ती दिसते. आजुबाजुला आणखी काही प्राचीन मुर्ती आहेत.
bhr20
तटावर चढून पाहिल्यास हे घनदाट जंगल नजरेला सुखावते. सतत येणारी पक्षांची शीळ भट्कंती सुरेल करते.
bhr23
इथुन एकसलग खणखणीत तटबंदी असून जागोजागी जिने आहेत, तसेच शौचकुपही आहेत. तटावरूनच भैरवनाथ मंदिराच्या दिशेने निघायचे कि हि दुहेरी तटबंदी दिसते, बहुधा गडाची हि नाजुक बाजु हेरुन शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा गड असताना हि तटबंदी उभारली असावी. काहिशी राजगडासारखीच वाटते.
गडफेरी आटपून परत भैरवनाथ मंदिरात येऊन टेकलो. थोडी विश्रांती घेतली. परत शिवापुरकडे निघालो. रंगपंचमीच्या सुट्टीच्या निमीत्ताने काही शहरी मंडळी मित्रपरिवारासह पिकनिकला आली होती आणि चुलीवरच्या जेवणाचा बेत चालू होता. गावाकडे उतरताना या उत्तर बाजुलाच दरवाजा असला पहिजे पण ईंग्रजांच्या अखेरच्या हल्ल्यात त्याची पाडापाड झाली असावी. असो.
bhr24
लवकर बस नसल्याने पायगाडीवरूनच राणेवाडीमार्गे पुष्पनगरला उतरलो. गावातून गड असा दिसत होता.
थोड्यावेळाने पाटगावहून आलेली गाडी मिळाली आणि एक मस्त भटकंती संपली. गावातूनच गडाचा निरोप घेतला.
गेल्याच वर्षी म्हणजे ३ जुन २०१६ रोजी याच किल्ल्याने एक दुर्दैवी प्रसंग पाहिला. कोल्हापुरचे वहातुक पोलिस श्री. पाटील आपल्या पत्नी व मुलीसह या गडावर सहलीसाठी गेले असता, मोबाईल वापरताना नेमकी वीज पडल्याने त्यांचा मृत्यु झाला. विशेषता मे महिन्यात आकाशात वीजा चमकत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा दुर्घटना घडतात. असाच अनुभव माझा मित्र विकास कडुसकर याला आला. लोणावळ्याजवळच्या डुयक्स नोझ ईथे रॅपलिंग व व्हॅली क्रॉसिंग यासाठी विकास व त्याचे मित्र याच काळात गेले असताना अचानक वीजांचा वर्षाव झाला. पण सुदैवाने कोणतिही दुर्घटना घडली नाही. असाच वैराटगडावरचा अनुभवही माझ्या वाचनात आला होता. हल्ली दुर्गसंवर्धन करताना बर्‍याचदा अपघात होऊ नये म्हणुन रेलिंग लावली जातात, पण वळीवाच्या काळात याच धातुच्या रेलिंगकडे वीज आकर्षित होउन दुर्घटना होउ शकते. तेव्हा सर्वांनीच याबाबतीत काळजी घ्यावी.
bhr26
भुदरगडाचा नकाशा
bhr26
भुदरगड परिसराचा नकाशा.
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध -सतीश अक्कलकोट
३ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
५ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
६ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! – प्र. के. घाणेकर
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८ ) सांगाती सह्याद्रीचा – यंग झिंगारो ट्रेकर्स

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s