अनवट किल्ले १२ : स्वराज्याची कोयरी, रांगणा उर्फ प्रसिध्दगड ( Rangana, Prasidhhgad)

कोल्हापुर जिल्ह्यातून अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरतात, पैकी एतिहासिक हणमंत्या घाटावर नजर ठेवून आहे, एक प्रचंड पसरलेला कुंकवाच्या कोयरीच्या आकाराचा एक किल्ला, “रांगणा”. जणु स्वराज्याच्या कुंकवाचा हा रक्षकच. तळ कोकण, अर्थात सध्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दोन रक्षक आहेत. सिंधुसागराची सीमा सांभाळायचे काम शिवाजी महाराजांची निर्मिती असलेला सिंधुदुर्ग ईमाने ईतबारे करतो आहे तर सह्याद्रीच्या मुख्य रांगेत खडा होउन रांगणा कणकवलीपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत नजर ठेवून आहे. ई.स. १७८१ च्या एका पत्रात एक मार्मिक उल्लेख आहे, “येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल” या एकाच ऐतिहासिक उल्लेखात या किल्ल्याचे महत्व स्पष्ट होते. छत्रपती शिवरायांना सर्वच किल्ले प्रिय होते पण रांगणा हा त्यांचा अत्यंत आवडत्या किल्ल्यापैकी एक. दस्तूरखुद्द गडपती शिवरायांचा सहवास लाभलेल्या या गडाच्या डागडुजीसाठी इतिहासकाळात सहा हजार होन खर्च केल्याची नोंद आढळते. मराठ्यांच्या इतिहासात हा किल्ला प्रसिद्धगड या नावाने देखील ओळखला जातो. फक्त नावच प्रसिध्दगड असलेला हा किल्ला आज फारश्या ट्रेकर्सनाही पाहून माहिती नाही.
रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. पुढे १९ जुलै १४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला. त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली’. बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंतांकडे हा गड होता. सन ५ मे १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला ५ सप्टेंबर १६६६ मधे घेतला. सिध्दी जोहरच्या तावडीतून महाराजांची सुटका हा त्यांच्या आयुष्यातील एक रोमांचक आणि महत्वाचा प्रसंग. बहुतेक एतिहासिक साधने महाराज पन्हाळ्यावरुन विशाळगडाला गेले असे मानतात. मात्र मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यासक ग्रँट ड्फ असे मानतो कि महाराज पन्हाळ्यावरुन सुटून रांगण्यावर गेले असावेत. अर्थात एकूण पन्हाळ्यापासूनचे रांगण्याचे अंतर आणि पावनखिंडीचा रणसंग्राम बघता यात काहीही तथ्य नाही.
पुढे अदिलशहाने रांगण्याविरुध्द मोहिम उघडली. त्यावेळी छत्रपती आग्य्राला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वत: जिजाबाईंनी खास मोहिम काढून दि १५/०८/१६६६ रोजी रांगणा जिंकला. ही एक अद्‌भूत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्व अधोरेखीत करते. दि १७/०८/ १६६६ रोजी महाराजांनी आग्य्राच्या कैदेतून पलायन केले. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो.
औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. रांगण्याजवळील भुदरगड, सामानगड हे किल्ले त्याला जिंकता आले , मात्र रांगण्याचा ताबा तो मिळवु शकला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू – ताराबाई संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन मार्च १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला, त्यावेळी ताराबाईला सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यानी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. वेढा चालू असताना एके दिवशी रांगण्याजवळच्या एका टेकडीवर चढत असताना त्यांचा घोडा घसरला. तेव्हा खंडोबल्लाळांनी त्यांना वाचविले. पावसाळा सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला.
सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्व होते. सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता. परंतु करवीरकरांचा निधडया छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला. या युध्दात सावंतवाडी करांचे पंचवीस सैनिक ठार झाले. पंचाहत्तर सैनिकांनी केवळ धास्तीने कड्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तर ज्यांनी गडाशी फितुरी केली त्या माणसांचा शोध घेउन पन्नास जणांची मुंडकी उडवली. करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो. या नंतर १७८१ मधे खेमसावंतानी तब्बल आठ महिने रांगण्यास वेढा घातला. मात्र पुढे सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणा इंग्रजाचे राज्य येई पर्यंत करवीरकरांकडे राहिला. मात्र १८४४ च्या बंडात ईंग्रजानी रांगण्यावर तोफा डागून तटबंदीचे बरेच नुकसान केले.
ईतके एतिहासीक महत्व असलेला रांगणा बघायचे कधीपासून डोक्यात होते. सावंतवाडीहून मनोहर-मनसंतोषगडाकडे जाताना, थेट रायगडाच्या टकमक टोकासारखी दिसणारी माची आव्हान देउन गेली होती. अखेरीस बरोबर कोणीही सोबती न मिळाल्याने हा बेत एकट्याने तडीस न्यायचा ठरविला. कोल्हापुर -गारगोटी- पाटगाव मार्गे जायचे तर भटवाडीनंतर सात आठ कि.मी.ची वाटचाल जंगलातून एकट्याने करावी लागणार होती. अस्वल, गवे आणि बिबटे असणार्‍या जंगलातून असले साहस धोकादायक ठरले असते. पर्यायी आणि त्यातला त्यात सुरक्षित मार्ग म्हणजे कोकणातून जाणे. एकतर कुडाळहून पायथ्याच्या नारुर पर्यंत बसने जाउन कोणी वाटाड्या सोबत घेउन रांगणा बघणे सोयीचे ठरले असते. शेवटी कुडाळकडून जाणे फायनल केले.
सह्याद्रीच्या मुख्य रांगेत स्थान पटकावलेल्या ह्या प्रंचड पसरलेल्या किल्ल्यावर जायला तब्बल पाच वाटा आहेत.
१ ) सगळ्यात सोयीची आणि तुलनेने रुळलेली वाट कोल्हापुर- गारगोटी- पाटगाव-भटवाडी -चिकेवाडी अशी आहे. कोल्हापुरहून भटवाडी साठी ६.३०, ३.०० व रात्री १० ( मुक्कामी ) अशा तीन एस.टी. बस आहेत. सकाळची बस अर्थातच सोयीची. या बसने साधारण सकाळी दहा वाजेपर्यंत आपण भटवाडीला पोहचतो. इथून जवळच असलेल्या सिध्दाच्या गुहा पाहून आपण साधारण २ वाजे पर्यंत सात ते आठ कि.मी. वरच्या चिकेवाडीला पोहचतो. स्वताची गाडी असेल तर हि वाट सर्वात सोयीची, मात्र भटवाडी ते चिकेवाडी हा कच्चा रस्ता लक्षात घेता जीपसारखे भक्कम वाहन आवश्यक आहे. दुचाकी नेतानाही काळजी घेणे आवश्यक आहे. कारण या रस्त्यावर गाडीत काही बिघाड झाला किंवा पक्चंर झाले तर पाटगाव शिवाय काहीही सोय नाही.
२ ) दुसरी वाट कुडाळ तालुक्यातील नारुर या गावातून चढते. थेट गावातून खड्या वाटेने आपण दोन तासात कोकण दरवाज्यातून गडावर प्रवेश करतो.
३) नारुर गावातूनच तिसरी वाट थोडी लांबचा वळसा घेउन रांगणा आणी सह्याद्रीची मुख्य रांग यांच्यामधील सपाटीवर येते. याच ठिकाणी तीला चिकेवाडीकडून येणारी वाट मिळते. या वाटेने रांगण्याच्या महादरवाज्या पर्यंत पोहचायला सधारण अडीच तास लागतात. वाट क्र्मांक २ व ३ साठी आपल्याला कुडाळहून सुटणारी नारुर गाडी पकडावी लागते. कुडाळहून नारुर साठी ९.३०,११,२,४,६.२० अशी बस सेवा आहे.
४ ) चौथी वाट केरवडे गावातून चढते. या गावातील प्रसिध्द महादेवाच्या मंदिरामुळे त्याला “महादेवाचे केरवडे” म्हणतात. या वाटेने दोन ते अडीच तासात रांगण्याच्या माचीवर उभ्या असलेल्या दरवाज्यातून आपण प्रवेश करतो.
५ ) रांगण्याच्या माचीवर उभ्या असलेल्या पुर्वेकडच्या दरवाज्यातून पाचवी वाट वर चढते. हळदीचे नेरुर या गावातून हि वाटेने माथा गाठायला तब्बल अडीच ते तीन तास लागतात. केरवडे किंवा नेरुर या गावाना जायला, दुकानवाडी किंवा शिवापुरला जाणारी एस.टी. सोयीची आहे. शिवापुरहून मनोहर-मनसंतोषगड सर करता येत असल्याने रांगण्याला जोडून तेही पहाता येतील. शिवापुरला जायला कुडाळहून ५ वाजता गाडी आहे तर सावंतवाडीहून सकाळी १०, १.३० व ४.३० अशा बस आहेत, तर दुकानवाडीला जाण्यासाठी सकाळी ८.३० ला बस आहे. या एस.टी. च्या वेळांची खात्री करण्यासाठी कुडाळ स्टँडच्या या फोनवर
संपर्क करू शकता. (02362) 222560,222604,222422
rg1
रांगणा परिसराचा नकाशा
एके रात्री सावंतवाडी गाडी पकडुन कुडाळ स्टँड गाठले. पहाटे पाच वाजता पोहचल्यानंतर पहिली एस.टी. नऊ वाजता आहे असे कळले. खाजगी जीपसेवाही त्याभागात नव्हती. अखेरीस टाईमपास करणे आले. तेवढ्यात कुडाळ स्टँडसमोर कुडाळचा भुईकोट होता हे मला आठवले. तो पहाण्यासाठी गेलो, तर आता तिथे काहिही शिल्लक नाही. फक्त “घोडेबाव” नावाची विहीर बघायला मिळते.
rg2
वरच्या फोटोत दिसणारी विहीर कुडाळची घोडेबाव नाही, फक्त या प्रकारच्या विहीरी असतात कश्या, हे लक्षात यावे यासाठी हा फोटो टाकला आहे. मोठ्या पायर्‍या आणि एखादा घोडेस्वार थेट पाण्यापर्यंत पोहचेल असे प्रवेशद्वार हे याचे वैशिष्ठ्य. जमल्यास कुडाळ स्टँडसमोरची हि घोडेबाव जातायेता जरूर पहावी.
अखेरीस नउ वाजता नारूरची बस फलाटाला लागली आणि हिर्लोकमार्गे पाउण तासात मी नारुर गावात दाखल झालो.
rg3
गावातच कोकणी पध्दतीचे समोर दिपमाळ असणारे भवानी मंदिर आहे. ईथे रांगण्यावरुन आणलेली तोफ ठेवलेली आहे. हा एतिहासिक एवज पाहून वाटाड्याची चौकशी केली. पण कोणीही तयार न झाल्याने गावातून लांबून वळसा घेउन जाणारी प्रशस्त वाट पकडून ( वाट क्र. ३) रांगण्याच्या दिशेने निघालो. दाट जंगलातून जाणारी वाट असल्याने फारशी दमछाक होत नाही. वाटेत देवगडहून मुक्कामी राहिलेल्या मुलांचा ग्रुप भेटला. त्यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारून मार्गस्थ झालो. साधारण बारा वाजेपर्यंत रांगण्याच्या सोंडेपर्यंत पोहचलो.
rg6
इथून एका वेगळ्याच कोनातून गड दर्शन होते. बहुतेकदा आपल्याला गड चढावा लागतो, पण आपण चिकेवाडीच्या वाटेने आलो तर गड उतरावा लागतो. डाव्या बाजुने चिकेवाडी कडून येणारी वाट ईथे मिळते.
rg4
गडाच्या दिशेने निघालो कि समोर असणारा नैसर्गिक कातळ तासून , त्यावर दगडी चिर्‍यांचे बांधकाम करून बुरुज उभारलेला आहे. या बुरुजाच्या डाव्या बाजुने कातळ फोडून वाट बनवली आहे.
rg9
या वाटेने पुढे गेल्यानंतर गडाचा पहिला दरवाजा लागतो, “गणेश दरवाजा”. ह्या दरवाजाची कमान पडली आहे.
rg7
ह्या सर्व रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रु सैन्य या वाटेने आले तरी या अरूंद वाटेने बंद दरवाजापाशी आले तर बुरुजावरुन केवळ दगडाचा मारा केला तरी कोणताही प्रतिकार न होता, दरीत पडून किल्ल्याचे सरंक्षण कोणतीही जिवीत हानी न होता करता येईल. या रचनेला “रणमंडळ” म्हणतात. रांगणा भेटीत हि रचना आवर्जुन निरखा. असे रणमंडळ चाकण, नलदुर्ग, विशाळगड या किल्ल्यावरही पहायला मिळते.
यानंतर पुढे तटबंदी लागते. हि तटबंदी थोडी काळ्या कातळात तर थोडी जांभ्या दगडात आहे. बहुधा जांभ्या दगडातले काम गड शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता तेव्हाचे असावे.
rg8
यानंतर थोडे अंतर चालून गेले कि सामोरा येतो दुसरा दरवाजा “हनुमंत दरवाजा”. येथे दोन्ही बाजुनी पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत, मात्र त्या झाडीत लपून गेल्या आहेत. हा दरवाजा बुरुजामधे लपविलेला आहे , त्यावर कमळे कोरलेली दिसतात, मात्र गणेश पट्टी दिसत नाही. दरवाज्यातून आत गेल्यास डाव्या हाताला पाण्याचे कोरडे पडलेले टाके दिसते. इथे दोन वाटा फुटतात, पैकी उजव्या वाटेने गेल्यास एक कोरडा तलाव व भव्य असा जांभ्या दगडात बांधलेला वाड्याचा चौथरा दिसतो.
rg8
या बाजुच्या तट्बंदीवर चढण्यास जिने आहेत. या तटबंदीवरुन पुढे गेल्यास भव्य बुरुजापाशी येतो, जो आपण बाहेरुन बघितला होता.
rg9
यावर भगवा ध्वज डौलाने फडफडत असतो.
rg10
इथे चोर दरवाजा आहे, मात्र पुढे तो बंद केला आहे,
rg11
तसेच त्याच्या माथ्यावर हनुमानाचे शिल्प आहे. सध्या या ठिकाणी तोफा दिसत नाहीत पण किल्ला जागता असताना रणमंडळाचे संरक्षण म्हणून त्या नक्कीच असणर.
या नंतर पुन्हा हणमंत दरवाज्यापाशी जाउया. सरळ वाटेने चालल्यास उजव्या हाताला वाड्याची भिंत दिसते.
rg12
ह्यातून आत गेल्यास एक चौकोनी, पायर्‍यांची विहीर दिसते, हिला “निंबाळकर बावडी” म्हणतात. या बावडीचे पाणी खराब आहे. या विहीरी शेजारी फारसी शिलालेख ठेवला आहे, तो खुपच झिजलेला आहे , त्यामुळे वाचन शक्य होत नाही. वाड्याच्या
rg13
आतल्या बाजुला अजुन एक वास्तु दिसते मात्र झाडीच्या गचपणामुळे आत जाउन पहाता येत नाही.
rg14
या नंतर बाहेर येउन चालायला सुरवात केली कि दरवाज्याची दुक्कल दिसते. अत्यंत देखण्या कमानी असणारा हा दरवाजा जांभ्याचे चिरे वापरून केला आहे. एकंदर गडावरच्या वास्तु ह्या दोन वेगवेगळ्या काळात उभारल्या असल्याने बहुधा असे असावे. जांभ्या दगडातले काम हे शिवकालीन असावे असा माझा अंदाज.
या दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर दोन वाटा फुटतात, पैकी डावी वाट माची कडे गेली असल्याने ती सोडून देउया.
rg15
उजवी वाट पकडूण पुढे गेल्यानंतर प्रंचड मोठा खोदीव तलाव दिसतो. हा बारमाही पाण्याने भरलेला तलाव सध्यातरी गडावरचा पाण्याने भरलेला एकमेव स्त्रोत आहे, तरी त्यात अंघोळ करून, भांडी घासून किंवा अन्य मार्गे पाणी खराब करू नये ईतके प्रत्येक दुर्गारोहीनी लक्षात ठेवले पाहिजे. दुर्दैवाने या तळ्याच्या काठावरही कोंबडीची पिसे, बियरच्या बाटल्या, प्लॅस्टिकचा कचरा पडलेला दिसला.
rg16
तलावाच्या उजव्या हाताला जाणार्‍या पायवाटेने पुढे गेल्यानंतर काही समाध्या
rg17
व एका कोपर्‍याय असलेले भग्न शिवमंदिर दिसते. मंदिराच्या फक्त भिंती शाबूत आहेत.छ्प्पर गायब आहे.
rg18
चार कोपर्‍यात कोरीव खांब व बाहेर दोन नंदी आहेत. याचे कोरीव खांब पहाता हे मंदिर गड जागता होता तेव्हा किती देखणे असेल याची फक्त आज केवळ कल्पनाच करु शकतो.
हे पाहून एक ओढ्यासारखा भाग ओलांडून आपण एका सपाटीवर पोहचतो.
rg19
ईथे आहे रांगणाई देवीचे मंदिर. जुने मंदिर भग्न झाल्याने, नवीन जीर्णोध्दार केलेले मंदिर दिसते. मंदिरासमोर सध्या पत्र्याची शेड उभी केली आहे. मंदिरासमोर चौथर्‍यावर उभी असलेली दिपमाळ दिसते. या मंदिरचा जीर्णोध्दार छ. शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी केला आहे. रांगणाई देवी गारगोटीजवळील
शिंदेवाडी व खानापुर या गावातील ग्रामस्थांचे मुख्य दैवत आहे. या मंदिराची डागडुजीही खानापुरच्या लोकांनी केली आहे. खानापुर, नारूरचे गडकरी व चिकेवाडीचे लोक असे वर्षातून एकदा देवीची यात्रा करतात.
rg36
मंदिरात रांगणा किल्ल्याची माहिती सांगणारा फलक लावला आहे.
rg20
मंदिराच्या आत चौथर्‍यावर रांगणाई देवीची ढाल, तलवार व त्रिशुळ घेतलेली शस्त्रशज्ज पाषाणातील मुर्ती आहे. मुर्तीच्या खालच्या पट्टीवर शके १८५६ असे काही कोरलेले दिसते. मुर्तीच्या उजव्या हाताला शंखचक्र, गदाधारी विष्णुची तर डाव्या हाताला भैरवाची मुर्ती आहे.
rg19
शेजारी गोल आकाराचा फारसी शिलालेख आहे.
rg21
मंदिराच्या शेजारी छोटे हनुमानाचे मंदिर आहे.
rg22
यात एक छोटी व एक मोठी मुर्ती आहे.
या रांगणाई देवीसंदर्भात एक कथा प्रचलित आहे, कोण्या एके काळी हि मुर्ती सोन्याची होती, ती ईंग्रजानी चोरून नेली व त्याजागी ह्या पाषाण मुर्तीची स्थापना केली. सावंतवाडीच्य लोकांनी ती उचलून गडाखाली नेली, पण ग्रामसंकटाच्या भयाने ती पुन्हा येथे आणून स्थापन केली. रांगणाई देवीच्या मंदिराचा उजव्या बाजुला जांभ्या दगडाची फरशी घालून सपाटी केली आहे. देवळाजवळच औदुंबरच्या झाडाखालून झरा वाहतो, मात्र उन्हाळ्यात हा आटतो. गडावर मुक्काम करायचा झाल्यास हेच एकमेव योग्य ठिकाण.
मी गेलेलो असताना कागल जवलच्या मुरगुड गावातील एक कुटूंब रांगणाई देवीच्या दर्शनासाठी आलेले होते. रांगणाई हि त्यांची कुलदेवता होती.
rg25
रांगणाई देवी मंदिराच्या मागच्या बाजुला पंधरा मिनीटावर आणखी एक दरवाजा आहे, हा आहे “कोकण दरवाजा”. नारुर गावातून चढणारी वाट ईथे येते. ( वाट क्रं- २ ) कोकण दरवाज्यावर गोल बुरुज बांधला असून त्यावरुन येणार्‍या जाणार्‍यावर पहारेकरी कशी नजर ठेवत असतील याची आपण कल्पना करायची.
rg23
दरवाज्याच्या आतल्या बाजुस जमीनी लगत असणार्‍या दगडावर व्यालाचे सुबक शिल्प व दोन खांब कोरलेले आहेत. तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मोरी बांधली आहे.
rg26
हा दरवाजा पश्चिमेला असल्याने आपला गडावर मुक्काम असल्यास सुर्यास्त पहाण्याचा आनंद ईथून घ्यायचा.
rg29
सिंधुसागरात डुबकी घेणारा भास्कर आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून खेळत येणारा पश्चिमवारा हि संध्याकाळ संस्मरणीय करतो.
rg28
बहुतेक देवीचे भक्त आणी पर्यटक गडाचा ईतकाच भाग बघून परत जातात, मात्र खरा प्रेक्षणीय परिसर याच्या पुढे आहे. मंदिराच्या मागून दक्षीणेकडे जाणारी पायवाट पकडावी आणि निघावे. अर्थात आधी पाण्याच्या बाटल्या भरण्यास विसरू नये, कारण मंदिरापाशी परत येईपर्यंत गडावर कुठेही पाणी नाही. तटबंदी उजव्या हाताला आणि दाट झाडी असलेली टेकडी डाव्या हाताला असा आपला प्रवास सुरु होतो. झाडीतून सतत प्राण्यांचे आवाज येत असतात. फारसा वावर नसल्याने अधून मधून वाट काढावी लागते.
rg29
मी थोड्या तंद्रीत चालत असताना अचानक वुक्क, वुक्क असा वाफेच्या ईंजिनासारखा आवाज आला आणि झाडीतून तीन मलबार धनेश अर्थात हॉर्नबील पक्षी डोक्यावरून वळसा घालून परत झाडीत दिसेनासे झाले. ह्या दृष्याने मी ईतका स्तब्ध झालो कि फोटो काढायचेही सुचले नाही. काही दॄष्येही मनाच्या कॅमेर्‍यावरच साठवावी, नाही का? असो.
या थक्क करणार्‍या अनुभवानंतर मी तसाच पुढे निघालो. साधारण अर्ध्या-पाउण तासात एका सपाटीवर पोहचलो.
rg31
ईथे तटबंदीत खाली गोमुखी बांधणीचा उत्तराभिमुख दरवाजा आहे. यातून उतरणारी वाट केरवडे गावी जाते( वाट क्र. ४) . या नंतर आपण येतो गडाच्या एका मह्त्वाच्या दुर्ग स्थापत्याकडे, ती म्हणजे हत्ती सोंड.
rd32
एखादा हत्ती सोंड पुढे ताणून उभा असावा अशी रचना असल्याने हि हत्ती सोंड. या माची कडे जाताना एक दगडी दरवाज्याची चौकट आपल्याला लागते. माचीला भक्कम तट असून उताराच्या दिशेला पायर्‍या बांधल्या आहेत.
rg35
थोडे पुढे गेल्यानंतर दगडी देवळी दिसते, पुढे दाट कारवीतून पुढे गेल्यानंतर दुहेरी तटबंदी दिसते.
rg34
माचीच्या तळापासून वीस-पंचवीस फुट उभी तटबंदी ह्या अडचणीच्या जागी बांधली कशी हा प्रश्न पडतो.
rg32
यानंतर तटाच्या उजव्या बाजुला एक चिलखती बुरुज दिसतो, थोडी कसरत करून आपण तिथे उतरु शकतो. या बुरुजाच्या पुढे सहा सात फुटावर अर्धगोल तटबंदी बांधून काढली आहे,
rg31
तिथपर्यंत जायला चोर दरवाजाही आहे. सध्या हा दरवाजा दगड गोट्यानी भरलेला असला तरी थोडी कसरत करुन बाहेर गेल्यास सहा फुट उंचीची आणि तीन फुट जाडीची तटबंदी लागते. इथे तोफा ठेवण्यासाठी देवळ्या केलेल्या आहेत तर बंदुका रोखण्यासाठी जंग्याही आहेत.
rg41
हा बुरुज पाहून माचीच्या टोकाकडे निघायचे. टोकाशी खाली उतरायला बारा कमानी असणारा चोर दरवाजा दिसतो. मात्र याच्या पुढचा भाग दरीत कोसळेला असल्याने इथून जपून उतरायचे. अर्थात माचीच्या पुढचा भाग दरीत कोसळला असल्याने पुढे असणार्‍या चिलखती बुरुजावर जाता येत नाही.
rg46
माचीचा तट, बुरुजांचे ईतके संरक्षण देण्याचे कारण म्हणजे या भागात केरवडे, नेरुर कडून येणारी डोंगरधार हळुहळु वर चढत असल्याने ईथून शत्रुसैन्य सहज वर येउन तटबंदीशी लगट करु शकेल, यासाठी या भागाचा पहारा भक्कम व्हावा म्हणून हि सगळी योजना. निवांत अर्धा पाउण तासाचा वेळ काढून पहावी अशीच आहे.
rg42
रांगण्यांची उंची समुद्रसपाटीपासून ६७९ मी. आहे जी माचीवर जाणवते. या माचीच्या टोकावरुन प्रचंड मोठा परिसर दृष्टिपथात येतो. आग्नेयेला मनोहर-मनसंतोषगडाची जोडीगोळी, तर नारायणगड व अंबोलीचा महादेवगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेत मिसळून गेल्याने दिसत नाहीत. द्क्षिणेला सावंतवाडी, बांदा परिसर दिसतो, तर नैॠत्येला वेंगुर्ला परिसर आणि पश्चिमेला कुडाळ व मागे मालवण भागातले डोंगर दिसतात. एप्रिल-मे या कालावधीत हवा स्वच्छ हवा असेल तर कदाचित समुद्राची निळी रेघही ईथून दिसू शकेल. मागे वायव्येला कणकवली व मागे देवगड तालुक्याचा परिसर पाहू शकतो. थोडक्यात पुर्ण तळकोकणावर नजर ठेवण्यास हे उत्तम ठिकाण आहे. पुर्वेकडे असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतुन एक घाटवाट खाली कोकणात उतरते, “हणमंत्या घाट”, हि वाट देशावरच्या हणमंतेवाडीतुन खाली नेरुरला येते. हणमंतेवाडीत हनुमानाचे प्रसिध्द मंदिर आहे. सध्या कोल्हापुर जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरायला, फोंडा घाट व आंबोली घाट याच्या मधे आणखी गाडीवाट नसल्याने, हा हणमंते घाटालाच डांबरी सडकेचे रुप देउन आणखी एक घाट निर्माण करायचे विचाराधीन होते. त्याचे पुढे काय झाले कोणास ठावूक, पण असे झाले तर हि सर्व दुर्गम गावे दळण वळणाच्या मुख्य प्रवाहात येतील.
rg42
माचीचा परिसर पाहून परत गडाच्या दुसर्‍या वाटेने म्हणजे पुर्वेकडच्या बाजुने निघायचे.
rg43
पंधरा मिनीटातच आपण एका पायर्‍यांच्या वाटेपाशी येतो. पायर्या उतरून खाली गेल्यावर आणखी एका दरवाज्यापाशी येतो. उत्तराभिमुख असलेल्या या दरवाज्याची वाट नारूर गावात उतरते. (वाट क्रं. ५) रांगण्यावर येण्यासाठी हि सर्वात लांबची वाट.
rg44
या दरवाज्याच्या पुढे डाव्या बाजुच्या तटबंदीत एका कमानीखाली एक साधारण दोन फुट व्यासाचे बांधीव कुंड दिसते, हि विहीर आहे. थेट दरवाज्यापाशीच पाण्याची हि व्यवस्था अनोखी आहे. दरवाजा पाहून पुन्हा वर येऊन गडाच्या उत्तर टोकाशी निघुया.
rg45
पंधरा मिनीटे दाट झाडीतून चालल्यानंतर एक बांधीव तलाव लागतो
rg48
व काठावर दोन शिवपिंडी असणारे महादेवाचे मंदिर दिसते.
rg47
पिंडीच्या बाजुने सुबक नक्षी काढली आहे. तलाव मात्र गाळाने भरला आहे. एकंदर किल्ल्याच्या प्रचंड आकार ध्यानात घेउन पाण्याची व्यवस्था केली आहे.
rg48
यानंतर आणखी थोडी वाटचाल केल्यानंतर आपण एका छोटया गणेश मंदिरापशी येतो. मंदिर फक्त गणपतीची मुर्ती सामावून घेउ शकेल ईतके छोटे आहे.
rg49
याच्या नंतर जरा पुढे एक नुकतेच जीर्णोध्दार केलेले महादेव मंदिर पहाण्यास मिळते. कोल्हापूरच्या ‘निसर्गवेध परिवार’ चे अध्यक्ष भगवान चिले सर आणि सहकार्यांनी चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांतून या मंदिरचा जीर्णोद्धार केला आहे. सध्या हे नव्याने बांधलेले मंदिर त्याचे पावित्र्य राखले जावे व जनावरांनी घाण करू नये यासाठी कुलूपबंद असते. मात्र मंदिराच्या लोखंडी दरवाज्यातून महादेवाची पिंड उत्तमरित्या पाहता येते.
rg52
मंदिरासमोर नंदी असून त्याच्या मागे एक सुंदर नक्षीकाम केलेला चौथरा आहे. आता हे तुळशी वृंदावन आहे का कोणा थोराचे स्मारक हे सांगणे थोडे कठीण आहे. मात्र चौथऱ्याच्या चारी बाजूने सुंदर गजमुख कोरलेले असून वरील बाजूस सुद्धा नक्षीकाम केलेले दिसते.
याच्या पुढे अनेक वाड्याचे अवशेष व कोरड्या पडलेल्या विहीरी दिसत रहातात. शेवटी हि वाट गडाच्या तिसर्‍या म्हणजे यशवंत दरवाज्यापाशी येउन मिळते. ह्या गडप्रदक्षिणेला साधारण तीन तास तरी लागतात. हे लक्षात घेता रांगण्यावर एका रात्री मुक्कामाची तयारी करून आलो तरच गड व्यवस्थित पहाता येईल.
गड शिलाहारकालीन असला तरी कोठेही चुन्याचा घाणा दिसला नाही. तसेच कोणत्याही दरवाज्यावर गणेशपट्टीही दिसत नाही.
अखेरीस गड पाहून परत निघालो. यावेळी चिकेवाडी-पाटगाव असे जायचे ठरविले. गडापासून चिकेवाडीच्या दिशेने थोडे अंतर चालल्यानंतर सपाटी ओलांडल्या नंतर झाडीतून रस्ता जातो.
rg54
ईथे डाव्या हाताला झाडीमधे थोडे आत एक मंदिर दिसले. स्थानिक लोक याला “बांदेश्वराचे मंदिर” म्हणतात. आतमधे श्रीगणेश, विष्णू आणि देवी यांच्या छोट्या कोरीव मूर्त्या दिसतात.
rg52
मंदिरासमोर असणारे दगडी तुळशी वृंदावन आजूबाजूची झाडी आणि गवत यामधे पार झाकोळून गेलेले आहे
हे पाहून परत चिकेवाडीच्या दिशेने निघालो. या वाटेच्या आधी पहार्‍याची चौकी होती आता तीचे फक्त अवशेष उरलेत.
rg53
थोड्या वेळात एक ओढा ओलंडून चंद्रमोळी घरे असणार्‍या चिकेवाडीत दाखल झालो. जेमतेम दहा-पंधरा घरे असणार्‍या या गावकर्‍यांचे जंगल हेच सर्वस्व. गवे, रानडुकराच्या तावडीतून वाचली तर पिके , अन्यथा जंगलातून मिळणार्‍या औषधी वनस्पती, रानमेवा व मध विक्री हेच जगण्याचे साधन. एका आजोबांकडे पाणी प्यालो. अर्ध्या तासात भटवाडीतून येणरी एस.टी. मिळेले हे त्यांनी सांगितल्यावर मातीच्या प्रशस्त रस्त्यावरुन भटवाडीकदे कदम ताल सुरु केला.
rg57
पंधरा-वीस मिनीटे चालतोय, तोपर्यंत मुरगुडचे ते कुटूंब जीपने मागून आलेच. त्यांनी आतमधे बसण्यास जागा करुन दिली. आणि थेट पाटगावला सोडले.
भटवाडीपाशी एक प्रेक्षणीय ठिकाण आहे म्हणजे “सिध्दाचा डोंगर”. या परिसरातील सर्वात उंच जागा असून दाट झाडीने हा डोंगर वेढला आहे. तमालपत्र,
बेहडा, हिरडा अशा औषधी वनस्पती त्यावर आहेत. डोंगरावर एक गुहा असून त्यामधे शिवलिंग आहे. या गुहेला बरेच फाटे आहेत. मात्र ईथे असणारा साळिंदर, साप, विंचु ह्यांचा वावर लक्षात घेता, तयारीनिशी इथे जायला हवे. या गुहेला पुढे बरेच फाटे फुटलेले दिसतात. सिध्दाच्या डोंगरावरून सोनगड, भैरवगड, रांगणा, भुदरगड असे बरेच किल्ले दिसतात. रांगणा भेटीत कोल्हापुरच्या बाजुने आल्यास हे ठिकाण जरुर पहावे. भटवाडीत प्रशस्त मंदिर असून तेथे रहाण्याची व्यवस्था होउ शकेल. पाटगाव धरणामुळे मुळ भटवाडी विस्थापित होउन या ठिकाणी वसवली गेली.
भटवाडी ते पाटगाव हा दहा कि.मी.चा रस्ता कोकणच्या निर्सगाचा आनंद देणारा आहे. थोड्यावेळात उजव्या हाताला पाटगावचे धरण दिसले. पाटगावमधे
पोहचल्यानंतर पुरेसा वेळ असल्याने मी मौनी महाराजांची समाधी पहाण्याचे ठरविले.
rg100
मठाचे भव्य दगडी प्रवेशद्वार व त्यावर नगारखाना आहे. यापुढे भव्य सभामंडप आहे. मुळ मंदिराच्यापुढे तुरतगिरी महाराजांनी हा मंडप बांधला. सभामंडपातून आत गेल्यानंतर मुळ मंदिराच्या गाभार्‍यात मौनी महाराजांची समाधी दिसते.
rg101
अतिशय वेगळ्या धाटणीची काळ्या पाषाणातील समाधीवर शिवलिंग असून येथे मौनी महाराजांच्या पादुका आहेत. मौनी महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. अतिशय प्रसन्न वातावरणात परिसर फिरायला बाहेर पडलो.
rg104
मठाच्या पुर्वेला तुरतगिरी महाराजांची समाधी आहेत तर पश्चिम बाजुला दर्शनस्थळ नावाचे ठिकाण आहे. स.अ. १६७६ साली शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते, त्यावेळी त्यांनी मौनी महाराजांचे ईथे येउन दर्शन घेतले. दिग्विजय मिळवून परतताना महाराज पुन्हा मौनी महाराजांच्या भेटीला आले, म्हणून हे दर्शनस्थळ. हि नोंद ९१ कलमी बखरीत आढळते. आज याठिकाणी महाराजांची उत्सव मुर्ती व शिवाजी महाराज व मौनी महाराज यांच्या भेटीचे शिल्प दिसते. या देवस्थानाला शिवाजी महाराज,संभाजी महाराज, राजाराम महाराज व ताराबाई यांनी मठाला उत्पन्न दिल्याच्या नोंदी आहेत.
पुढे वेदोक्त प्रकरणात झालेल्या वादाने, या पीठाचा ईतिहास अनुकुल वाटल्याने छ. शाहू महाराजांनी श्री. सदाशिव पाटील या पदवीधर तरूणाला या पीठावर विराजमान करुन “क्षात्र जगतगुरु” या नावाने शंकराचार्यांचे स्वतंत्र पीठ निर्माण केले. करवीर गादीवरच्या सर्वच छत्रपतीनी या गादीला मान दिला. पाटगावच्या जगतगुरुंचे वंशज बेनाडीकर सरकार आजही या मठाची उत्तम प्रकारे देखभाल करतात.
स्वच्छ आणि टापटीप राखलेला हा मठ पाहून मागील पायवाटेने पुढे जायचे.
rg103
येथे यादवकालीन भद्रकालीन मंदिर लागते. या मंदिराचे जुने प्रवेशद्वार ,
rg105
सभोवतालच्या विस ओवर्‍या याने हा परिसर रम्य वाटतो. रांगणा कोल्हापुर बाजुने बघायचा असेल तर आधी पाटगावचा मठ, मंदिर , त्यानंतर सिध्दाचा डोंगर आणि मग रांगणा पहावा म्हणजे एका फेरीत बरीच ठिकाणे पाहून होतील.
मठ पाहून मी बाहेर आलो, पाचच मिनीटात पाटगाव-मुंबई एस. टी आली आणि तुफान गर्दीत कसेबसे चढून मी जागा पटकावली आणि डोळे मिटून रांगण्याची मनातल्या मनात पुन्हा सफर सुरु केली.
(टीपः- हा ट्रेक मी खुप पुर्वी केल्याने, त्यावेळी माझ्याकडे रोल कॅमेरा होता, साहजिकच खुप कमी फोटो काढता आले. ते ईथे पोस्ट करण्यापेक्षा लेटेस्ट फोटो असावेत यासाठी पुण्याचे श्री. विनीत दाते यांना त्यांचे फोटो या धाग्यासाठी वापरू देण्याची विनंती केली, त्यांनीही ती उदार अंतकरणाने मान्य केली, याबध्दल त्यांचा मी ऋणी राहीन. या लेखात असलेले उत्कॄष्ट फोटो त्यांचे आहेत, तसेच काही आंतरजालावरून घेतेले आहेत)
rg106
रांगण्याचा नकाशा
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध -सतीश अक्कलकोट
३ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
५ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
६ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! – प्र. के. घाणेकर
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८ ) सांगाती सह्याद्रीचा – यंग झिंगारो ट्रेकर्स

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s