अनवट किल्ले १५: तानाजी आणि शेलारमामांच्या मावळ्यांचा पारगड ( Paargad )

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमा जिथे मिळतात त्याठिकाणी एक छोटासा परंतु नितांत सुंदर असा एक गड कधीचा खडा आहे. एका बाजुला घनदाट जंगल, पायथ्याशी तिलारी धरणाचे पाणी आणि एका बाजुला गोव्याचे दिसणारे दिवे, महाराष्ट्रातील चंदगड आणी दोडामार्ग यांना जोडणारा अतिशय
अवघड आणि म्ह्णूनच कमी वर्दळीचा रामघाट, हा नजारा पहाण्यासाठी प्रत्येक दुर्ग आणि निसर्गप्रेमीनी ईथे आवर्जून भेट दिली पाहिजे.
अत्यंत रम्य आणि जाण्यास सोयीच्या या किल्ल्याचा ईतिहासही रंजक आहे. सन १६७६ मध्ये पोर्तुगीजावरील स्वारीवरुन परत येताना शिवरायांनी हया डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्व ओळखले आणि पोर्तुगीज, अदिलशहा व सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसविण्यासाठी हा किल्ला वसविला. सिंहगड किल्ला इ. स. १६७१ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकला पण त्यावेळी झालेल्या युद्धात तानाजींना दुर्दैवी मृत्यू पत्करावा लागला. पुढे गोव्याच्या पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन १६७६ साली या गडाची निर्मिती केली व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे
यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. गडाच्या वास्तूशांतीला दस्तूरखुद्द महाराज गडावर उपस्थित होते असे गडावरील लोक सांगतात. त्यावेळेस  काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला. हा किल्ला महाराजांना इतका आवडला कि त्यांनी किल्लेदार व उपस्थित मावळ्यांना आज्ञा केली “जोपर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत हा गड जागता ठेवा”. ही तर राजाज्ञाच होती. गडावरच्या मावळ्यांनी ती पाळली आणि आजतागायत पारगडावर वस्ती करून गड जागता ठेवला. स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव “पारगड” ठेवण्यात आले होते.
पुढे इसवी सन १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम व खवासखान याने पारगड घेण्यासाठी गडाशेजारच्या रामघाटात तळ ठोकला. पण गडावरील केवळ पाचशे सैनिकांनी मुघल सैन्यावर हल्ले करून त्यांना परतवून लावले. खवासखानने सावंतवाडीच्या खेमसावंताच्या मदतीने पुन्हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गडावरील सैन्याने त्यांनाही दाद दिली नाही. याच लढाईत गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी आजही गडावर आहे. पुढे पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. नंतर मराठा राज्य संपून इंग्रज अंमल गडावर चालू राहिला, तरीही गडावरील लोक गडावरच राहिले. इंग्रजांनी त्यांना मासिक तनखेवजा पगार सुरू केला. हा पगार बेळगाव मामलेदार कचेरीतून १९५४ पर्यंत त्यांना मिळत असे.  परंतु भारत सरकारने तो खंडीत केला व तेव्हापासून सर्व गडकरी गडावर कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही गडावर स्वाभिमानाने दिवस काढत आहेत.
अशा या शिवस्पर्श झालेल्या किल्ल्यावर यावयाचे तर दोन मार्ग आहेत.
१) कोल्हापूरहून थेट किंवा बेळगावमार्गे चंदगड गाठायचे. चंदगड वरून इसापूर अशी एसटी आहे. इसापूरहून थेट पारगडावर जाता येते. चंदगडवरून पारगड अशी एसटी सुद्धा आहे. ती आपल्याला थेट पारगडच्या पायथ्याशी आणून सोडते.
चंदगडहून ईसापुरला जाण्यासाठी सकाळी ८.०५, १२.१५ व ५.३०( मुक्कामी) अश्या गाड्या आहेत, तर पारगडावरून परत जाण्यासाठी सकाळी ६.००, १० व ईसापुरहून परत जाण्यासाठी ११.१५, ३.३० अश्या एस.टी. बसेस आहेत.
२) स्वत:चे वाहन असल्यास बेळगाव – शिनोळी – पाटणे फाट्यामार्गे मोटणवाडी गाठायची. मोटणवाडी -हेरे रस्त्यावर डाव्या हाताला ईसापुरकडे जाणारा फाटा आहे.  मोटणवाडी पासून पारगड साधारण पाऊण तास गाडीचं अंतर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी स्वत:चे वाहन ठेवण्याची सोय देखील आहे. किंवा थेट किल्ल्यावर गाडी नेता येते. हा रस्ता सन २००२ मध्ये विद्यमान गडकर्‍र्‍यांनी सरकार दरबारी केलेल्या अथक प्रयत्नाने थेट गडावर जाण्यासाठी   तयार करण्यात आला आहे.
३ ) ज्यांना पदभ्रमण करण्याची हौस आहे त्यांच्यासाठी अजुन एक मार्ग आहे. पारगडावर पोहोचण्यासाठी आंबोली-चौकुळ-ईसापूर-पारगड असा २६ कि. मी. रस्ता आहे. चौकूळ पर्यंत गाडीने जाउन प्रचंड जीव वैविध्य असलेल्या आंबोलीच्या जंगलातून वाटाड्यासंगे ईसापुर गाठणे हा एक अनुभव आहे. वाटेत बर्‍याचदा साप आडवे जातात, भेकर्,हरणे, काळवीट इत्यादी वन्यप्राणी दिसतात. एकूणच नेचर ट्रेलसाठी हि वाट आदर्श आहे.
४ ) गोवा-दोडामार्ग-तळकट-खडपडे-कुंभवडे-इसापूर-पारगड असा ५० कि. मी. असे इतर मार्ग देखील आहेत. मात्र खराब रस्त्यामुळे हा फार चांगला पर्याय नाही.
चंदगड परिसरातील बाकीचे किल्ले बघून झाले होते , पण पारगड आणि कलानिधीगड राहिले होते.अखेरीस खर्‍या अर्थाने एका टोकाशी असलेल्या ह्या किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन केला. चंदगडवरून १२.३० ची एस.टी. पकडून हेरेमार्गे दिड तासाभरात पारगडाच्या पायथ्याशी पोहचलोसुध्दा.

इसापुरहून होणारे पारगडाचे दर्शन.
वाटेतील प्रवास नितांत सुंदर होता. हा परिसर कोल्हापुर जिल्ह्यात येतो. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या देश असला तरी वातावरण आणि परिसर मात्र कोकण वाट्ते. तांबडी माती, आंब्याची झाडे आणि लोकांचा बोलण्याचा टोनही टिपीकल कोकणी. पण गर्द वनराई आणि पारगडाची समुद्रसपाटीपासून ७३८ मी. उंची यामुळे उकडत मात्र नाही. एकुणच मस्त काँबिनेशन.

इसापुरकडून पारगडाकडे जाताना लांबवर हा तिलारी धरणाचा जलाशय दिसला.

गडनिवासी लोकांनी हि स्वागत कमान उभारली आहे.

सुरवातीच्या काही नवीन बांधलेल्या पायर्‍या सोडल्या तर बाकीच्या पायर्‍या शिवकालीन आहेत. याच पायर्‍यावरून आपल्यासारखेच शिवाजी महाराजही गेले असतील हि कल्पनाच थरारुन टाकते .या साधारण दोन-अडीचशे पायर्‍या चढून आपण गडावर पोहचतो.

पुढे आले की तिरंगा झेंड्याच्या खाली जुन्या तोफा ठेवल्या आहेत. पण या एखाद्या बंदिस्त जागी ठेवणे आवश्यक आहे नाहीतर गंजण्याचा धोका आहे.

यानंतर हे मारुतीराय सामोरे आले. मी गेलेलो होतो तेव्हा मंदिराचे बांधकाम सुरु होते.मंदिराच्या गाभाऱ्यात असणारी सव्वा मीटर उंचीची चपेटदान मुद्रेत असणारी हनुमंताची मूर्ती वैशिष्ठ्यपूर्ण आहे. या बलभीमाने आपल्या डाव्या पायाखाली एका राक्षसाला तुडवलेले आहे. चपेटदान मुद्रा म्हणजे हात उंचावलेला, चापट मारण्याच्या आवेशात असणारा मारूती ज्याच्या पायाखाली “पनवती” नामक राक्षसीण आहे असे मानले जाते.
या शिवाय या बजरंगबलींच्या कानात असलेल्या भिकबाळ्याही लक्षवेधी.

आता नवीन मंदिर असे दिसते. ( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार)

समोरच हे वृंदावन आहे. हि घडीव दगडी समाधी कोण्या अनामवीराची असावी. इथे जवळच एक छोटे हॉटेल आहे. इथे आधी सांगितले तर जेवण, नाष्टा याची व्यवस्था होउ शकते.  या सर्व परिसरातच गडाचा दरवाजा असणार. मात्र आश्चर्य म्हणजे बाकी सर्व तटबंदी शाबुत असून दरवाजा मात्र नष्ट झालाय. इथून चालायला सुरुवात केली कि डाव्या हाताला गडावरवी शाळा दिसते.

याच आवारात हा हाती  तलवार धारण केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. कोल्हापुरचे सुप्रसिध्द शिल्पकार कै. रवींद्र मेस्त्री यांनी ब्राँझमधे बनविलेला हा पुतळा म्हणजे कोल्हापुरातील शिवाजी चौकातील पुतळ्याची प्रतिकृतीच.  याच पुतळ्याच्या जागी शिवकाळात गडाची सदर होती.

या नंतर आपण गडाच्या साधारण मध्यभागी येतो. इथे नव्याने बांधलेले भवानी मंदिर दिसते. बहुतेकदा पुनर्बांधणी करताना जुन्या वास्तुचे महत्व न कळल्याने त्या पाडून नवीन उभारल्या जातात. मात्र इथल्या रहिवाश्यांनी असे न करता आत जुने मंदिर तसेच ठेवून बाहेरून नवीन मंदिर बांधलेले आहे. यासाठी त्यांचे कौतुकच करायला हवे.

या मंदिरातील भवानी मातेची मूर्ती नेपाळच्या गंडकी शिळेपासून तयार केली असून, ती प्रतापगडावरील भवानी मातेची आठवण करुन देते.( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार)
मंदिरात सुंदर रंगसंगतीचा वापर करून नक्षीदार कोरीवकाम केलेले आहे.

मंदिराच्या आतील बाजूस सभामंडपाच्या भिंतींवर शिवाजी महाराजांचा जीवनपट रेखाटणारी तैलचित्रे लावण्यात आली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, दादाजी कोंडदेव, तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, नेताजी पालकर, बाजी प्रभू देशपांडे अश्या अनेक थोरांचे तर संत तुकाराम महाराज, संत रामदास, संत ज्ञानेश्वर अश्या संतांचे अर्धपुतळे मंदिराच्या छोट्या छोट्या कोनाड्यात ठेवलेले आहेत. प्रत्येक अर्धपुतळ्यांखाली त्याव्यक्ती संदर्भातील प्रेरणादायी ओळी कोरण्यात आल्या आहेत. मूळ शिवकालीन मंदिराच्या गाभार्‍यात काळ्या पाषाणातील भवानी मातेची शस्त्रसज्ज अशी मनमोहक मूर्ती ठेवलेली आहे. मंदिर इतके आकर्षक व स्वच्छ ठेवलेले आहे की या मंदिरातून आपला पाय लवकर निघतच नाही.

भवानी मंदिरापलिकडे प्राचिन गणेश मंदिर आहे.या मंदिराच्या समोरच गणेश तलाव आहे.

मंदिराजवळच हे माहिती फलक लावले आहेत.

मंदिराच्या आवारात हे वीरगळ पहाण्यास मिळतात. भवानी मंदिराजवळ पुजार्‍याचे निवासस्थान आहे. शेजारीच भक्त निवास आहे. शिवाय गडावर मोठ्या संख्येने आल्यास भवानी मंदिरात रहाण्याची सोय होउ शकते.

या शिवाय असे पर्यटक निवासही बांधलेत, मात्र ते कसे उपलब्ध होतात हे मला कोणी सांगु शकले नाही.

गडाच्या दक्षीण टोकाकडे निघालो तेव्हा डोंगर पोखरून हा रस्ता वर आलेला दिसला. हा थेट भवानी मंदिरापर्यंत गेला आहे.

या बाजुला ताशीव कडा असल्याने तटबंदी उभारलेली नाही. पण पर्यंटकांच्या सोयीसाठी भिंत बांधलेली आहे.या परिसरला सतीचा माळ म्हणतात.

या शिवाय बसण्यासाठी असे सज्जे केलेले आहेत. इथे बसून सुर्यास्त पहाणे हा अविस्मरणीय अनुभव आहे. खाली दरीत तिलारी धरणाचा जलाशय, लांब नैऋत्येला दिसणारे गोव्यातले दिवे आणि सांजावणारी किरणे ल्यालेला सह्याद्रीच्या रांगा. याचा एकदा अनुभव घ्याच.

गडाच्या याच बाजुला हा “गुणजल तलाव” दिसतो.

इथून गडाच्या उत्तर टोकाशी एन वस्तीतून वाट आहे. विशेष म्हणजे गडावरच्या प्रत्येक घरावर अशी शिवप्रतिमा दिसते. घरापुढे तुळशी वृंदावन, रांगोळी, जाई,जुई, मोगरा, ज्वासंदी अशी फुलझाडे आणि विनम्रशील लोक ह्याने छान वातावरणात आपली गड फेरी सुरु असते.

गडावर मधेच असे जुन्या घरांचे चौथरे दिसतात.

गडाच्या पुर्व्,पश्चिम व दक्षीण अश्या सर्व बाजुनी कातळकडे असल्याने तसेच  खोल दरी व जंगल असल्याने नैसर्गिक संरक्षण लाभले आहे.

मात्र वर्दळीची वाट उत्तर बाजुला असल्याने येणार्‍या जाणार्‍यावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी याच बाजुला तटबंदी उभारली आहे.

तसेच भालेकर, फडणीस व महादेव असे ३ डौलदार बुरुज दिसतात. याशिवाय माळवे, भांडे, झेंडे बुरुज अशी नावे असलेले आणखी बुरुजही गडास आहेत.

या उत्तर बाजुकडे जाताना आपल्याला काही मुर्त्या दिसतात.

तसेच हे मुर्ती नसलेले देउळ दिसले.

या उत्तर टोकाकडे जाताना वाटेत हा चोरदरवाजा दिसला. गड शिवाजी महाराजांनी उभारला असल्याने सहाजिकच गडाला दोन दरवाजे आहेत. आज मात्र हि वाट बंद झालेली आहे.

या शिवाय हे आणखी एक भुयारासारखे काही तरी दिसले, बहुधा दारुगोळ्याचे कोठार असावे.

तटबंदीत लपविलेले असे शौचकुप पहाण्यास मिळतात.

या शिवाय भालकर बुरुजावर असलेला हा एक कोरीव पाषाण पहाण्यास मिळाला. मात्र याच्यावर नेमके काय कोरले होते याचा पत्ता लागत नाही. शिलालेख कि एखादी मुर्ती?

या शिवाय हे जीर्णोध्दार केलेले शिवमंदिर दिसले.

याच्या शेजारी असलेल्या तलावाला महादेव तलाव म्हणतात. याखेरीज याच बाजुला फाटक तलावही आहे. गडाच्या मध्यभागी गणेश तलाव आहे.गडावर शिवकालीन १७ विहिरी आहेत, पैकी ४ चांगल्या अवस्थेत आहेत बाकी बुजलेल्या अवस्थेत आहेत. एकुणच गड लढायच्या दॄष्टीने सज्ज ठेवला आहे.
मुलांच्या खेळण्याच्या पटांगणा पलिकडे तुळसाबाई माळवे यांची १६८० मधील समाधी आहे, तर गडाखालील मिरवेल या गावात घोडदळ पथकाचे प्रमुख खंडोजी झेंडे यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांचे स्मारक आहे.
पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडाजी शेलार, शिवकाळातील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे यांचे वंशज, कान्होबा माळवे,घोडदळाचे पथक प्रमुखांचे वंशज विनायक नांगरे व गडकर्‍यांचे वंशज शांताराम शिंदे  इत्यादी वास्तव्यास आहेत. बाळकृष्ण मालुसरे व्यावसायानिमित्त अनगोळ, बेळगावला असतात. त्यांच्याकडे तानाजी मालुसरे यांची तलवार व शिवरायांच्या गळयातील सामुद्री कवड्यांची माळ जतन केलेली आहे. अशा फक्त ५ माळा महाराष्ट्रात उपलब्ध असून, त्या सातारच्या राजवाडयात, प्रतापगडावरील भवानीच्या गळयात, कोल्हापूर महालक्ष्मीच्या गळयात व तुळजापूरच्या भवानीच्या गळयात आहेत. माघी महिन्यातील उत्सवात व दसर्याच्या उत्सवात गडावरील मावळे आपल्या पूर्वजांची शस्त्रास्त्रे प्रदर्शित करतात.
पारगडावरील खालील गडकर्‍र्‍यांशी संपर्क साधल्यास या किल्ल्याविषयी अधिक माहिती मिळू शकते.
१ श्री बाळकृष्ण मालुसरे, वास्तव्य अनगोळ, बेळगांव (०८३१) २४८१३७७,९८४१११४३४३
२ श्री कान्होजी माळवे, वास्तव्य मुंबई ९८२१२४२४३०
३ श्री दिनानाथ शिंदे
४ श्री अर्जुन तांबे
गडफेरी आटोपून मी पुन्हा सतीच्या माळावर उभारलेल्या सज्जापाशी सुर्यास्त पहाण्यासाठी येउन बसलो. खाली दरीत तिलारी धरणाच्या  भिंतीवरचे आणि परिसरातील घरांचे दिवे टिमटिमट होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या मिरवेल या गावातील माणसांच्या एकमेकांना दिलेल्या हाळ्यांचे आणि गाई गुरांचे आवाज स्पष्ट वर गडावर एकू येत होते. लांब नैऋत्येला शहाराचे लाईट दिसत होते. गडावरच्या रहिवाश्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते फोंडा या गोव्यातल्या शहराचे आहेत.

सुर्य क्षितीज्यावर विवीध रंगांची अक्षरशः उधळण करीत अस्ताला चालला होता. सुर्यास्त झाल्यावर पश्चिम क्षितीज्यावर काजळी पसरली आणि एक अविस्मरणीय सुर्यास्त मनाच्या कप्प्यात साठ्वून मी उठलो. निवांत चालत भवानी मंदिरापाशी आलो. तिथल्या गुरवाशी गडाविषयी गप्पा झाल्या. जेवण हॉटेलमधे सांगितलेलेच होते. खुप दिवसांनी थेट चुलीवरच्या भाकरी आणि कोल्हापुरी तिखटात न्हालेला बटाट्याचा रस्सा चापून तृप्त झालो.
शहरात गजराशिवाय जाग येत नाही,ईथे मात्र भल्यापहाटे कोंबड्याने सणसणीत बांग देउन उठ्वलेच. जणु “चला राजे, तुम्हाला दुसरा किल्लाही पहायचा आहे”, याची जाणीव करुन दिली. पटकन आवरून अंधारातच गड उतरलो, तो मुक्कामी आलेल्या एस.टी.चे ईंजिन रेस करुन ड्रायव्हर गाडीला तयार करित होता. पाटणे फाट्याचे तिकीट काढले आणि गाडी निघाली. वळणावर सुर्योद झाल्यामुळे जागे झालेल्या कोवळ्या उन्हात न्हालेल्या पारगडाचे दर्शन झाले. खुप आनंद दिलेल्या या किल्ल्याला पुन्हा एकदा पाहून घेतले आणि अपुरी राहिलेली झोप काढण्यासाठी सीट्वर मान टेकवून डोळे मिटले.

पारगडाचा नकाशा
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
३ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
४ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
५ ) http://www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) सांगाती सह्याद्रीचा – यंग झिंगारो ट्रेकर्स

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s