सज्जनगडच्या परिसरात (Arround Sajjangad )

सृष्टिमध्ये  बहुलोक, परिभ्रमणे कळे कौतुक।

असे लिहीणार्‍या समर्थांचा सज्जनगड सगळ्यांनाच चिरपरीचीत आहे. समर्थांच्या समाधीचे दर्शन घ्यायला आणि पावसाळ्यातील उधाणलेला निसर्ग पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक सज्जनगडाला गर्दी करतात. पुर्वी परळीच्या वाटेने पायर्‍या चढण्याचे दिव्य आता करावे लागत नाही. निम्या उंचीपर्यंत

गाडी जाते. थोडक्या पायर्‍या चढून आपण गडमाथ्यावर पोहचतो. हल्लीच प्रसिध्दीस आलेले कास पठार आणि ठोसेघरचा धबधबा जवळच असल्याने एका दिवसात कास, ठोसेघर आणि सज्जनगड अशी घड्याळाची शर्यत करीत पाहिले जातात. पण एक दिवस जादाचा काढून सज्जनगड मुक्काम केला तर आजुबाजुला बरेच काही आहे. त्याचाही आनंद घेता येईल. तसेही सज्जनगडावर मुक्कामाची सोय असल्याने, थोड्या नियोजनाने ठोसेघरचा धबधबा, नव्याने झालेली समर्थ सॄष्टी, परळीचे प्राचीन शिवमंदिर, अजुन फारसा प्रसिध्द्द न झालेला चार टप्प्यात पडणारा सांडवली धबधबा आणि सर्वसामान्य पर्यटकांपासून दुर असणारी आणि साहसी तरूणाना साद घालणारी मोरघळ अश्या बर्‍याच गोष्टी पहाता येतील, तेच या धाग्याचे प्रयोजन.

सज्जनगड परिसराचा नकाशा

समर्थ सृष्टी 

सर्वप्रथम पाहुया”समर्थ सृष्टी”. सातार्‍याकडून सज्जनगडकडे जाताना गजवडी गावाजवळ सज्जनगड दिसु लागतो.

गजवडीमधुन घाट चढुन आपण सज्जन्गडकडे जाताना उजव्या हाताला “ज्ञानश्री ईन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी” या नव्याने झालेल्या शैक्षणिक संस्थेच्या आवारातच हि समर्थ सृष्टी उभारलेली आहे.

समर्थ वाड:मयाचे अभ्यासक अरुण गोड्बोले याांची हि संकल्पना.

समर्थांच्या आयुष्यातील दहा-पंधरा महत्त्वाचे प्रसंग निवडून ते साकार करणारा सहा हजार चौरस फूटांचा एक हॉल, समर्थस्थापित अकरा मारूतींच्या प्रतिकृतींचा तीन हजार चौरस फुटांचा दुसरा हॉल व लघुपट दाखवण्यासाठी दीडशे सीट्सचे मिनी थिएटर असे ‘थीम पार्क’चे स्वरूप आहे. त्याला जोडून बुक स्टॉल, उपहारगृह व चार-पाच दुकाने आणि प्रसाधनगृहे ही सारी योजना आहेच. बाबासाहेब पुरंदरे, मारूतीबुवा रामदासी, मोहनबुवा रामदासी, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे सहकार्य मिळत गेले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पर्यटन तज्ज्ञ राजीव जालनापूरकर यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्याचे एकूण बजेट दीड कोटींवर गेले. भाई वांगडे आणि त्यांचे सहकारी व पुण्याच्या ‘गार्डियन ग्रूप’चे सर्वेसर्वा मनीष साबडे या दोघांनी त्यासाठी आनंदाने सहकार्य देऊ केले आणि ‘समर्थ दर्शन टुरिझम व्हेंचर’ या नावाने प्रकल्पाची उभारणी केली गेली.

ऐतिहासिक भासावे म्हणून सर्व बांधकाम जांभा दगडात केले आहे. तो   कोकणातून आणण्यात आला. कोल्हापुरच्या विजय डाकवे यांनी सिव्हिल वर्क केले. कलादिग्दर्शक अभय एकवडेकर यांनी समर्थ जीवनातील प्रसंगांच्या उभारणीची धुरा सांभाळली. त्यासाठी फायबरचे पुतळे, अन्य साहित्य यांचे काम सुरू झाले. कट-आऊटसाठी वेशभूषा करून,  कलाकार निवडून फोटोग्राफी करण्यात आली. अकरा मारूतींच्या प्रतिकृतींचे काम बंगाली कलाकार चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. लायटिंगची जबाबदारी राहुल दीक्षितने तर फोटोग्राफी विजयेंद्र पाटील यांनी सांभाळली. पाटील यांनीच समर्थांच्या तीर्थस्थानांच्या लघुपटाचे शुटिंग जांब, टाकळी, चाफळ, शिवथरघळ आणि सज्जनगड येथे जाऊन केले.

समर्थांचे घर, जन्म, बालपण, उपासना, विवाहमंडपातून पलायन, टाकळीतील वास्तव्य – तेथील तपस्या, गोमय मारुतीची स्थापना, मोगली अत्याचार, बद्रिनाथला हनुमंत स्थापना, महाराष्ट्रात आगमन, चाफळ, दासबोध लेखन व आनंद भुवन हे प्रसंग उत्कट रीत्या हुबेहूब साकार झाले आहेत. मारुती दर्शन हॉलमध्ये अकरा मारुतींच्या प्रतिकृती, त्याच्या पार्श्वभूमीवर तेथे जाण्याचा नकाशा व तेथील नवी मंदिरे असे दाखविले आहे. प्रत्येक मारुतीची माहिती देणारे फलकही आहेत. दीडशे क्षमतेचे चित्रपटगृह, प्रोजेक्टर, साऊंड व तेथे समर्थांवर डॉक्युमेंटरी दाखवीली जाते. भाई वांगडे यांच्या हस्ते शास्त्रोक्त उदकशांत करून प्रकल्प मार्च २०१२ मध्ये पूर्णत्वाला आला.

प्रवेश शुल्क मोठ्या व्यक्तीस चाळीस व मुलास तीस रूपये असे आहे.

ईथे प्रवेश करतानाच बजरंग बलीचा भव्य पुतळा आपले स्वागत करतो. अत्यल्प तिकीट काढून आपण आत प्रवेश करतो. डाव्या बाजुला संग्रहालयाची ईमारत आहे. 

आत प्रवेश केल्यानंतर समर्थांचा जन्म , बालपण, विवाह वेदीवरुन पलायन, तपस्या हे जीवनातील महत्वाचे ट्प्पे मुर्तींच्या माध्यमातुन दाखविले आहेत.

या शिवाय समर्थ स्थापित अकरा मारुतींच्या मुर्तींचे दर्शन घडविणरे वेगळे दालन आहे.

सुदैवाने ईथे फोटोग्राफीला बंदी नाही.समर्थांच्या जीवनावर एकूण पंधरा दालने आहेत. एका कुटीत समर्थांच्या हस्ताक्षरातील काही पत्रे आहेत, त्यात त्यांचे गद्य स्वरुपातील एकमेव पत्र आहे. या शिवाय समर्थांनी बालवयात टाकळी ईथे लिहीलेल्या वाल्मिकी रामायणातील काही कागद, त्यात रेखाटलेली चित्रे, समर्थांचे व कल्याणस्वामींचे अस्सल चित्र हे सर्व आपल्याला त्या काळात नेउन आणतात. हे सर्व मान जांभ्या दगडात केल्यामुळे एक वेगळे सौंदर्य आलेले आहे. उगाच जाउन मुर्तींच्या पाया पडण्यापेक्षा हे सर्व डोळसपणे पाहिले पाहिजे. हे प्रदर्शन पाहून आल्यानंतर डाव्या हाताला एक प्रेक्षागॄह आहे, जिथे समर्थांचा जीवनपट दाखविला जातो. ईथे छोटे उपहारगॄहही आहे जिथे चहा, नाष्ट्याची सोय होउ शकते.

 ठोसेघर धबधबा

 समर्थ सॄष्टी पाहिल्यानंतर पुढे सज्जनगडाकडे न वळता तसेच रस्त्याने गेल्यास बोरणे घाटातून आपण पोहचतो १० कि.मी. वरच्या ठोसेघर या गावी. ईथला तारळी नदीवरचा धबधबा अलिकडेच प्रसिध्दीला आला आहे. साधारण दिडशे मीटरवरुन कोसळणारा मुख्य धबधबा व त्याला साथ देणारे दोन उप धबधबे डोळ्याचे पारणे फेडतात.

 

जोराचा वारा असेल तर बाजुच्या धबधब्याचे पाणी जणु स्लो-मोशनमधे पडते आहे असे वाटते. पुर्वी ईथे फारश्या सोयी नव्हत्या. अलिकडे मात्र मोठ्या प्रमाणात हॉटेल झाली आहेत, त्यामुळे जेवणा खाण्याचा खास सातारी पाहुणचार होतो.

हा धबधबा पाहणे पुर्वी थोडे अवघड होते, अलिकडे सिंमेटची गॅलरी बसविल्याने अगदी जवळून धबधब्याचा आनंद घेता येतो. वनखात्याने या परिसरात दिसणार्‍या प्राणी आणि वनस्पतींच्या प्रकाशचित्राचे एक कायमस्वरुपी संग्रहालय उभारले आहे.

पावसाळ्यात हा धबधबा लांबुन बघणेच सुरक्षित असले तरी पाउस संपता संपता, ऑक्टोबरच्या काळात गेल्यास थेट पात्रात उतरून धबधबा खालून पहाता येतो, मात्र थेट धबधब्याच्या खाली मोठा डोह असल्याने स्थानिक व्यक्ती बरोबर असावी.

मुख्य धबधब्याच्या मागे छोटा धबधबा आहे.इथे पर्यटक पुढे जाउ नये म्हणुन शासनाने रेलिंग लावलेले आहे. तरी सुध्दा पाण्यात उतरण्याचे वेडे धाडस काही महाभाग करतात. धारेत वाहून जाउन जीव गमावल्याच्या बर्‍याच घटना ईथे झाल्या आहेत, तरी लोक त्यापासून धडा घेत नाहीत हे दुर्दैव. शिवाय घाटात दारु पिउन धुडगुस घालण्याने सर्वसामान्य पर्यटकांना त्याचा त्रास होतो ते वेगळेच. आता सुट्टीच्या दिवशी येथे पोलिस बंदोबस्त असतो.

  बहुतेक जण ठोसेघर धबधबा पाहून परत फिरतात, मात्र आणखी थोडे अंतर पुढे गेल्यास आपण चाळकेवाडी पठारावर पोहचतो. असंख्य पवनचक्क्या ईथे उभारल्या आहेत. एन पावसाळ्यात गेल्यास ईतका जोराचा वारा असतो कि आपण चंद्रावर चालतोय कि काय असे वाटते. हाच रस्ता पुढे पाटणला गेलेला आहे. मात्र पावसाळ्यात हा परिसर धुक्यात वेढलेला असतो आणि रस्त्याना बरेच फाटे फुटलेले असल्याने शक्यतो माहितगार नसेल तर पुढे जाउ नये.

 हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात या पठारावर आल्यास अनेक प्रकारचे साप, गळ्याला निळा पडदा असणारा सरडा असे अनेक वन्य जीव पहाण्यास मिळू शकतात.

रामघळ

हि भटकंती उरकून आता निघुया समर्थांनी जिथे तप केले होते त्या ठिकाणी, म्हणजे “रामघळी” कडे. मात्र रस्त्याची अवस्था विचारात घेता या परिसरात पावसाळ्यात न येणच योग्य ठरेल. ईथे रस्ते खचण्याचे प्रमाणही जास्त आहे, त्यामुळे दिवाळी ते मे महिना हाच ईथे येण्याचा योग्य कालावधी. आपण सज्जनगडाकडून ठोसेघरकडे येताना उजव्या हाताला एक डांबरी सडक पांगारे गावाकडे जाते. डांबरी रस्ता पांगारे गावापर्यंतच आहे. पुढे कच्चा रस्ता पळसवडे गावाकडे जातो. वाटेत पांगारे व पळसवडे अशी दोन छोटी धरणे पहायला मिळतात.

वाटेत डाव्या हाताला सज्जनगड व त्याच्या मागे अंजिक्यतारा दिसत असतो. पळसवडे गावाच्या अलिकडे एक कच्चा गाडीरस्ता डाव्या हाताला जातो. हा रस्ता मोरबाग या धनगरवस्तीकडे जातो. मात्र मोरबाग येण्याआधीच छोटी पायवाट डावीकडे जाते. हि वाट शेताच्या कडेकडेने चढून एका तीन मुखांच्या गुहेकडे पोहचते.

हिच आहे समर्थांनी तप केलेली “रामघळ”.गुहेच्या बाहेरच भगवा ध्वज फडकत असतो.

बाहेरुन एकच मुख दिसत असले तरी आतुन या गुहेचे तीन भाग पडलेले आहेत. पैकी मधल्या भागात थोडे वीट बांधकाम करुन काही देवांच्या मुर्त्या व नंदी ठेवले आहेत.

ईथे मागे गेल्यास आणखी चिंचोळी झालेली गुहा दिसते. याच्या आत सरपटत जाण्याचा मी प्रयत्न केला, तेव्हा पुढे बर्‍याच गुहाचे जाळे आहे असे लक्षात आले. मात्र साप, विंचवासारख्या प्राण्यांचे भीती आणि पुरेशी तयारी नसल्याने ईथेच थांबलो.

उजवीकडे असलेली गुहा चिंचोळी झाल्यामुळे फार पुढे जाता येत नाही.

 डाव्या बाजुला छोटी गुहा असुन आतमधे वटवाघळे आहेत. आमची चाहुल लागताच त्यांनी बाहेर पोबारा केला. बहुतेक आम्हीच त्यांना वामकुक्षीतून ऊठविले असेल. एकुण रामघळ पहाणे एक थरारक अनुभव आहे. सर्वांनाच कदाचित शक्य होणार नाही, पण साहसी मंड्ळीनी त्याची जरुर अनुभुती घ्यावी.

   रामघळीच्या बाजुनेच एक रस्ता वर पठारावर चढतो. हे चाळकेवाडीचेच पठार आहे.प्रंचड पसरलेल हे खडकाळ पठार प्रत्येक ऋतुत वेगळे सौंदर्य दाखविते. या पठारावर भटकून पुन्हा खाली आलो तेव्हा त्या शेताडीच्या टोकाशी एकुलते एक घर दिसले. शहरी सुखसोयीला चटावलेल्या आपणाला अश्या परिस्थितीत रहायची कल्पनाच करवत नाही. मोरबाग या गावातुन पुढे सांडवली या गावी कच्चा रस्ता जातो, व सांडवलीतुन आपण आणखी एक धबधबा पाहु शकतो, पण ईतकी गैरसोय सहन करुन जाण्यापेक्षा केळवलीकडून हा धबधबा पहाणे सोयीचे.

परळीचे शिवमंदिरे

सातारा शहराच्या नैऋत्येस ९ किमी. सज्जनगड च्या पायथ्याशी ‘ परळी ‘ हे प्राचीन गाव आहे. या गावाच्या बाहेर काही अंतरावर हेमाडपंथी बांधणीची दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत अभ्यासकांच्या मते त्याची बांधणी यादव काळात १३ व्या शतकात झाली असावी .

शेजाशेजारी असणाऱ्या या दोन शिवमंदिरांपैकी दक्षिणेस असणाऱ्या मंदिराची पूर्णपणे पडझड झालेली आहे. त्यातील फक्त गर्भगृहाचा भाग शिल्लक आहे .याला विरुपाक्ष मंदिर म्हणतात.

 त्याच्या शेजारी असणारे मुख्य मंदिर मात्र बऱ्यापैकी स्थितीत आहे. त्याची रचना सभामंडप , अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे . याला केदारेश्वर मंदिर म्हणतात.

 

सभामंडपात अत्यंत सुंदर आणि रेखीव नंदी आहे.

पैकी दक्षिणेकडचे मंदिर बहुधा आधी बांधलेले असावे. आता याची खुप पडझड झाली आहे. कदाचित याची मोडतोड विजापुरच्या किंवा मोघलांच्या आक्रमणात झाली असावी.

मंदिराच्या खांबांवर सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. त्यामधील काही आभासी शिल्पे आहे..

 

मंदिराच्या दर्शनी भागावर डाव्या आणि उजव्या बाजूस ‘ मिथुनशिल्पे ‘ ( कामशिल्पे ) कोरलेली आहेत.

मंदिरासमोर एक कोरीव मानस्तंभ आहे. त्याचा तुटलेला अर्धा भाग समोरच ठेवलेला आहे. त्याच्या शेजारी एक पंचमुखी शिवलिंग आहे. हे सदाशिवाचे अव्यक्त रूप आहे , सदाशिव म्हणजे सद्योजत , वामदेव , अघोर, तात्पुरुष आणि ईशान या शिवाच्या पाच अवस्था दाखवणारी ही प्रतिमा आहे . या पंचावस्थिती म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू, व आकाश.

शिवाच्या सदाशिव रूपातील अनेक मूर्ती उपलब्ध आहेत, त्या व्यक्त स्वरूपातील आहेत . येथे ही अव्यक्त रूपातील आहे.

मंदिराच्या समोरील परिसरात एक मान तुटलेला नंदी आहे.

एका चौथर्‍यावर शिवलिंग व शेजारी गणेशाची मुर्ती आहे. आम्ही गेलो होतो तो दिवस मंगळवार असल्याने कोणीतरी गजाननाला जास्वंदी वाहिली होती.

महादेव म्हणले कि नंदि आलाच. समोर हि नंदीची सुंदर मुर्ती.

 शेजारी पुष्कळ वीरगळ शिल्पे आहेत त्यातील अनेक वीरगळ वर नक्षीदार काम केलेले आहे.

याच परिसरात अनेक समाध्या आहेत माझ्या मते त्या लिगायत समाजातील असाव्यात. शेजारी एक सुंदरशी ‘ पुष्करणी’ आहे पण देखभाली अभावी सध्या ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

        हे प्राचीन मंदिर सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे . या मंदिराकडे सहसा कोणी येत नाही. एके काळी समृद्धीच्या परमोच्च शिखरावर असणारे हे मंदिर सध्या ‘ एकांतवास ‘ भोगत आहे. गावापासून दूरवर असणारे हे मंदिर सध्या रिकाम टेकडे, गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुलांचे विश्रांतीस्थान बनले आहे. काही वर्षांपूर्वी या मंदिराला स्थानिकांनी लोखंडी फाटक बनवून काहीसा संरक्षणात्मक उपाय अवलंबिला असला तरी आजही भरदिवसा येथे स्मशान शांतता अनुभवता येते. परिसरातील लोकांशिवाय इतरांना फारशी माहिती नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या अत्यंत कमी आहे. ही कोरीव शिल्पे सध्या अनेक पर्यटकांनी केलेल्या विकृत कृत्यांमुळे रंगहिन बनत आहेत. अनेकांनी आपल्या प्रेमीकांची नांवे कोरून यातील अभिजात शिल्पसौंदर्य बिघडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

 सांडवली धबधबा

    हे मंदिर पाहून या परिसरातील शेवटच्या आकर्षणाकडे जाउया, “सांडवली धबधबा”. ठोसेघर धबधबा खुप प्रसिध्द झाला असला तरी याच परिसरातील हा धबधबा मात्र फारसा कोणाला माहिती नव्हता. मात्र अलिकडेच तो हि प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. मात्र इथे जाणे काहीचे दुर्गम आहे. कुस, नित्रळ या गावांमार्गे आपण उरमोडी खोर्‍याच्या शेवट्च्या गावात पोहचतो, निगुडमाळ. इथे बस सेवा नाही. एस.टी. फक्त नित्रळपर्यंतच येते. त्यामुळे आपले वाहन असेल तर सोयीचे जाते. मात्र धबधबा गावातून दिसत नाही.

 गावातुन पश्चिम दिशेला चालण्यास सुरवात केली आणि थोडे अंतर गेल्यानंतर चार टप्प्यात पडणारा हा धबधबा दिसायला लागतो. शेतातुन चालत अखेरीस आपण धबधब्यामुळे तयार झालेल्या ओढ्यात पोहचतो. हा ओढा म्हणजेच उरमोडी नदीचा प्रवाह आहे. पुढील वाटचाल या ओढ्यातुनच करायची असते.

 कधी काठावरून तर कधी पात्रातुन वाटचाल करित आपण एका मोठ्या धबधब्यासमोर येतो. याच्याही वर अजुन एक धबधबा आहे. मात्र पावसाळ्यात वर चढणारी वाट घसरडी होते आणि वरचा धबधबा पाहता येत नाही. पण आपण जिथवर आलो तो ही प्रवास आनंद देउन जातो. हा धबधबा सांडवली गावाच्या हद्दीत येत असल्यामुळे याला सांडवली धबधबा म्हणत असले तरी सांडवली हे खुप दुर्गम गाव असल्याने तिथुन जाणे सोयीचे नाही. एकुणच धबधब्याचे स्वरुप पहाता सामान्य पर्यटकाना ईथे जाणे अडचणीचे वाटु शकेल, मात्र साहसी तरूणांना हा धबधबा नक्कीच साद घालतोय.

इथुन समोर दिसणारा डोंगर म्हणजे कास पठार. हल्ली फुलांच्या गालीच्यामुळे हे खुप प्रसिध्द झाले असले तरी त्या परिसरात कास धबधबा, वज्राई धबधबा, दत्तवाडी धबधबा, कास-पाचगणी रस्ता अशी आणखी काही आकर्षणे आहेत. त्याच्या विषयी परत कधी तरी.

संदर्भग्रंथ

१ ) सातारा जिल्हा गॅझेटियर

२) आडवाटेवरचा महाराष्ट्र- प्र.के.घाणेकर

३ ) सज्जनगड-सातारा- माधुरी नाईक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s