हिवाळी भटकंती: सरसगड ( Sarasgad )

अष्टविनायकाची यात्रा तशी महाराष्ट्रात लोकप्रिय. यापैकी पालीचा बल्लालेश्वर हे महत्वाचे ठिकाण, कारण या ठिकाणी मुक्कामाची आणि खाण्यापिण्याची चांगली सोय असल्याने, बहुतेकजण पालीला मुक्काम करता येईल अश्या पध्दतीने या यात्रेचे नियोजन करतात. खोपोलीकडून पालीला निघाले, कि पाली येण्याच्या आधी एक सुळका आकाशाकडे झेपावलेला पहायला मिळतो, पाली गावाच्या मागे तर एखाद्या भिंतीसारखा तो उभा आहे. सर्वसामान्य पर्यटक आणि भाविक मोठ्या कुतुहलाने त्याचे हे रौद्र रुप पहातात आणि तिथूनच त्याचा निरोप घेतात. अर्थात दिसायला कठीण असणार्‍या या किल्ल्याला अवश्य भेट द्यायला हवी ती त्याच्या उंच पायर्‍या, कोरीव महाद्वार आणि पहारेकर्‍यांच्या कोठ्या आणि गुंफा पहाण्यासाठी. आपला प्राचीन वारसा घेउन, गडप्रेमींची वाट पहाणारा हा किल्ला आहे “सरसगड”.

( हवाई प्रकाशचित्र साभार श्री. गोपाळ बोधे )
इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले. शिवकालीन पत्र सार संग्रहाप्रमाणे ( खंड २ ) सरसगडाचा समावेश पुरंदर तहात मिर्झा राजे जयसिंहाला दिलेल्या तेवीस किल्ल्यात होतो. मोगलांनी सरसगडाचा ताबा सिद्द्दी संबुळकडे सोपविली होती. सिध्दी मोगलांचा चाकर बनल्यामुळे कदाचित हे झाले असावे. शिवाजी महाराजांनी १६७० च्या आसपास या परिसरातील किल्ले ताब्यात घेतले असताना देखील सिध्दी संबुळने हा गड एकाकी लढवला. टॉमस निक्लसन रायगडावरून पालीकडे निघाला असताना आपल्या रोजनिशीत २०-२२ मे १६७३ रोजी लिहीतो, ‘ सरसगड हा शिवाजीच्या प्रांतात असून सिध्दी संबुळ याने त्याच्याविरुध्द पुष्कळ दिवस लढवला. परंतु अखेरीस दंडा राजापुरीच्या सिध्दीकडून कुमक न मिळाल्याने त्यास तो सोडावा लागला’. मात्र मराठ्यांनी सरसगड सिध्दीच्या ताब्यातून कधी घेतला याची माहिती निक्लसनच्या रोजनिशीतून मिळत नाही. शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. शिवाजीच्या मृत्यूनंतर हा भाग रामचंद्रपंत अमात्याकडे होता. ह्या भागातील अकरा किल्ल्यांची जबाबदारी शंकरजी नारायणकडे दिली गेली होती. सरसगड त्यातील एक होता. नंतर हा किल्ला भोर संस्थानाकडे गेला. सरसगडाची देखभाल १९४८ साला पर्यंत भोर संस्थानाकडे होती. त्यानंतर संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली. किल्ल्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे सध्यातरी किल्ला निसर्गाच्या लहरीवर तग धरुन आहे.
सरसगडाच्या भौगोलिक रचनेमुळे याचा उपयोग कोकण प्रदेशावर आणि त्यातल्या सवाष्णी घाटावर देखरेखीसाठी होत असावा. सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाली हे गाव वसलेले आहे.  सह्याद्रीचा घाटमाथा आणि मुंबई-पणजी महामार्ग याच्यामधे पाली गाव आहे. आजूबाजूच्या महत्त्वांच्या गावांशी गाडीमार्गाने पाली जोडलेले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील खोपोली येथून पालीला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे येथूनही पालीला येता येते. पाली गावाला लगूनच असलेला सरसगड त्याच्या कातळमाथ्यामुळे अधिकच बेलाग झालेला आहे समुद्र सपाटीपासून ४४४ मीटर उंचीच्या सरसगडावर जाण्यासाठी उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूंनी मार्ग आहे. उत्तरेकडील वाट तलई या लहानशा गावातल्या रामआळीतून गडावर जाते. तर गणपती मंदिराजवळून म्हणजे देउळवाडय़ाकडुन जाणारी वाट चांगलीच रुळलेली आहे. एका वाटेने चढून दुसऱ्या वाटेने उतरणे ही सोयीचे आहे.

सरसगडाचा नकाशा
वास्तविक पालीपरसरातील किल्ले पहातानाच दरवेळी हा सरसगड खुणावायचा, मात्र या ना त्या कारणाने जाणे राहून गेले होते. एकदा सुधागडाची भेट संपवून परत येताना, तुफान पाउस सुरु झाला, जाउनही काही फायदा झाला नसता म्हणून गुमान माघारी निघालो. एकदा मृगगड उर्फ भेलीवचा किल्ला पाहून बरोबरच सरसगडही करायचा असे ठरवले होते, मात्र छोट्याश्या वाटणार्‍या मृगगडाने चांगलाच घाम काढला आणि कसाबसा सरसगडाच्या पहिल्या सपाटीवर जाउन पोहचलो, मात्र प्रंचड थकवा आणि कोकणातल्या हवेच्या घामट्याने जीव काढला आणि पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेला घास माघारी गेला. अर्थात घेतलेला निर्णय योग्यच होता हे घरी गेल्यानंतर आजारी पडून घेतल्यानंतर कळले. अखेरीस फक्त सरसगडच बघायचा
असे ठरवून मामेभावाला मेसेज केला आणि १९ फेब्रुवारीची शिवजयंतीची सुट्टी कारणी लावण्याचे ठरले. पहाटेच खोपोलीला एकत्र भेटलो आणि मी, माझा मामेभाउ संकेत आणि त्याचा मित्र तुषार असे त्रिकूट त्याच्या कारमधून पालीकडे निघाले.

थोड्यावेळात तेलबैल्याच्या जुळ्या सुळक्यांच्या मागे सुर्योद्य झाला आणि सरसगड नजरेस पडला.

पाली जवळ आल्याची हि खुण, मात्र जवळपास १८० अंशात वळून पाली गाव गाठले.

गावात गाडी पार्क करुन आवराआवर केली आणि बल्लाळेश्वराच्या दर्शनाला निघालो.

मंदिरातील हि पोर्तुगीजांनी ओतवलेली घंटा पाहिली, हि चिमाजी अप्पांनी बल्लाळेश्वराला वाहिल्याचे मानले जाते.
जाताना दक्षिण दरवाज्याने जाउ तर उतरताना उत्तर दरवाज्याने उतरुया म्हणजे पुर्ण गड आणि त्याच्या दोन्ही वाटा पहाण्यास मिळतील असे ठरले. आधी नागोठणे रस्त्याने चालायला सुरवात केली.

या बाजुने सरसगड एखाद्या पुणेरी पगडीसारखा दिसत होता. यावरूनच त्याला “पगडीचा किल्ला” असे नाव पडले असावे.

देउळवाडा वाटेने चढाईला सुरवात केल्यावर डावीकडे पाली गावाचा परिसर पहायला मिळतो तर उजवीकडे असलेले कावडीचा डोंगर हे तीन सुळके आपले लक्ष वेधून घेतात.

 

गडावर जाण्यासाठी आजमात्र ‘दिंडी’ दरवाजाची ही एकच वाट वापरात आहे.

 

 

 

ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते. या पाय-या चढण्यापूर्वी डाव्या बाजूला एक भुयार दिसतं. हे भुयार प्रबळगडाच्या भुयाराशी साधर्म्य दाखवत. या भुयारावरून या गडाची निर्मिती हजारो वर्षापूर्वी झाल्याचा अंदाज लावता येतो.

 


ही पायवाट सरसगडाला असलेले एका घळीतून वर जाते. या वाटेवर कातळात केलेल्या पायऱ्या आहेत. या ९६ पायऱ्या चांगल्या गुढगाभर उंचीच्या असुन चढाईचा चांगलाच कस काढणाऱ्या आहेत. या पायऱ्यामुळे आपण धापा टाकीतच वर मुख्य दरवाजावर पोहोचतो.
 

या दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. हे महाद्वार पुर्णपणे कातळकोरीव असून त्याच्यावर कमलदल दाखविले आहे. इथून आपण चढून आलो तो कातळकोरीव पायर्‍यांचा जिना दिसत असतो. इथे बांधीव तटबंदीने तिनही बाजुने घेरले आहे. उंच पायर्‍या चढून आलेल्या शत्रुला इथेच कंठस्नान घालण्याची योजना केलेली आहे.

 

 

 

दरवा़याच्या आत कातळ कोरीव पहारेकर्याच्या कोठ्या आहेत. सरसगडावर मुक्काम करण्याची वेळ आल्यास या कोठ्या उत्तम आहेत.  इथून पुढे १५ पायऱ्यावर चढाव्यात म्हनजे तटबंदी दिसते. दरवाज्यतून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठे पाण्याचे टाके लागते. पुढे एक भुयारी मार्ग लागतो. सध्या हा मार्ग मातीने पुर्णपणे भरून गेल्याने अस्तित्वात नाही. पुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. जर आपण उजवीकडे गेलो तर १५ पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याचा पायथा लागतो.

 

 

 

 

बालेकिल्ल्याचा पायथा समोरच एक मोठे पाण्याचे टाके आहे. येथे बारामाही पाणी असते.

 

 

 

हौदाच्या डाव्या बाजूस एक थडगे आहे. त्याच्या जवळूनच पुन्हा पाण्याची तळी आहेत. जवळच कपारीत शंकराची एक पिंड आहे. या कपारीत आपणास रहाता येते.

हौदाच्या उजव्या बाजूला काही धान्यकोठारे, शस्त्रागरे आहेत. तसेच निवासस्थाने, आखाडा व कैदखाना देखील आहे. पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग लागतो. बालेकिल्ल्याच्या वाटोळ्या सुळक्याभोवती आपल्याला चक्कर मारता येते. आपण बालेकिल्ल्याकडे निघाल्यावर त्याच्या तळाला अनेक ठिकाणी कोरुन काढलेला भाग दिसतो.

या कोरलेल्या भागात पाण्याची टाकी, गुहा, काही कोठ्या आहेत तसेच तालीमखानाही आहे. या तालिमखान्यात अमावस्येच्या रात्री भुतांची कुस्ती चालते अश्या कथा सांगितल्या जातात. महाभारतकालात या गुहांमधे पांडवानी केला होता अशा काही कथा या गुहाबाबत सांगितल्या जातात. जेव्हा एखादया किल्ल्याचा संबध असा पुराणातील कथाशी जोडला जातो तेवा समजावे कि ही वास्तु प्राचीन आहे. या गुहांबरोबर दोन-तीन पाण्याची टाकी सुद्धा आढळतात.
काही टाक्यांमध्ये निरखून पहिले असता आत मध्ये खांब असल्याचे जाणवतात. एक गुहा अतिशय मोठी असून तिचे प्रयोजन नक्की काय असावे असा प्रश्न पडतो. या गुहेचे आतून तीन भाग पाडले आहेत.

 

याच बाजुने पुर्वक्षितीजावर विस्तृत माथ्याचा पसरलेला सुधागड, त्याच्या मागे घनगड, तेलबैल्या आणि एका बाजुला कोराईगड स्पष्ट दिसतात.

 

 

अचानक मला हि नागाची कात दिसली. अखंड कात बघायला मिळणे हा वेगळाच अनुभव होता.  गडमाथ्यावर क्वचित येणारे ट्रेकर्स सोडले तर फारचा मानवी वावर नाही. त्यामुळे सरसगडावर मुक्काम न करणेच योग्य, पण तरिही मुक्काम करायची वेळ आली तर पहारेकर्यांची कोठी हा चांगला पर्याय अथवा धान्यकोठारे, कैदखाना येथे रहाता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करणे योग्य आहे. गडावर पाण्याची भरपूर टाकी आहेत पण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी शहापीराच्या उजव्या बाजूस असणारा हौद पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. तसेही थेट पायथ्याशी पाली  असल्याने पालीलाच मुक्काम सोयीचा पडतो.

 

या संपुर्ण पुर्वबाजुला आणखी एक तटबंदी केली आहे. बहुधा या कावडीचे डोंगर असल्याने हि जादाची सुरक्षाव्यवस्था असावी. काही पहायला मिळेल म्हणून आम्ही पानांचा खच पडलेल्या वाटेने शेवटपर्यत गेलो, मात्र पुढे तटबंदी संपली.

 

या बाजूने अजून थोडे पुढे गेल्यावर गडाची उत्तरेची बाजू येते. येथे एक चोर दरवाजा असून तो अर्धवट बुजलेल्या अवस्थेत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

थोडे बाजूलाच गडाचा उत्तर दरवाजा आहे. अखंड कातळात खोदलेल्या या दरवाज्याच्या कमानीवर त्रिशूळ कोरलेले दिसते. गडावर येण्याची दुसरी वाट या दरवाज्याने येते. दरवाज्यासमोरच एका मोठ्या जोत्याचे अवशेष असून येथे पूर्वी सदरेची इमारत असावी. या जोत्याशेजारून डावीकडे जाणारी वाट आपल्याला बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. तर उजवीकडे जाणारी वाट बुरुजावर घेऊन जाते.

येथेच एक अस्पष्ट शिलालेख दिसतो. उनपावसाचा मारा खाऊन झिजलेल्या या शिलालेखावरची “जयम” एवढीच अक्षरे जाणवू शकतात. नक्की कोणत्या काळातील हा शिलालेख असावा याची कल्पना मात्र येत नाही.

 

बुरूजावर जाउन उभारल्यानंतर खाली पाली गाव दिसले. गावाशेजारचे प्रंचड मैदान, त्यावर क्रिकेट खेळणारी मुले आणि त्यांचा कोलाहल स्पष्ट एकू येत होता.

डाव्या वाटेने वर गेल्यावर एक टाके लागते. या टाक्याशेजारून माथ्यावर जाण्यास पायऱ्या आहेत. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर खास बघण्यासारखे काही नाही. माथ्याचा विस्तार फार नसून आकाराने चिंचोळा आहे.
  माथ्यावर एक शाहपीराचे थडगे आहे. वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापीराचा उरूस भरतो.

 

 

 

 

 

 

पूर्वेला गेल्यास एक भलामोठा तलाव दिसतो. तलावातले पाणी खराब आहे. टेहळणीसाठी दोन बुरूज आहेत. या तलावाशेजारीच केदारेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराची सध्याची अवस्था फारशी चांगली नसली तरी मंदिराचे गतवैभव आसपास पडलेल्या कोरीव दगडावरून जाणवते. महाशिवरात्रीला केदारेश्वराला भाविकांची गर्दी असते. या मंदिरातच शंकराच्या पिंडीबरोबर मुलाच्या मुर्तीची म्हणजे बल्लाळेश्वराच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे.

 

 

 

माथ्यावरून सभोवतालचा प्रदेश फारच सुंदर दिसतो. हवा स्वच्छ असल्यास पूर्वेला सुधागड, तेलबैला, घनगड, कोरीगड तर पश्चिमेला अंबा नदीच्या खोऱ्यातील पालीगाव, अंबानदी, उन्हेरीची गरम पाण्याची कुंडे, जांभूळपाडा ईशान्येकडे नागफणी उर्फ ड्युक्स नोजचा सुळका, तर वायव्येकडे माणिकगड आणि कर्नाळ्याचा सुळका असा मोठा परिसर दिसतो. पायथ्याच्या पाली गावातून इथे येऊन ३-४ तासांत किल्ला फिरून होतो.

उत्तर दरवाज्यातून उतरण्यास सुरवात केली तर याबाजुलाही कातळकोरीव गुहा पहायला मिळाली.

बरेच खाली उतरल्यानंतर सपाटी लागली. उजवीकडे तलई गावाकडे जाणारी वाट तर डावीकडे उतरणारी वाट उंबरवाडीची होती, त्याने गावात उतरुन आलो. मात्र इथून पाली दोन कि.मी. होते. ईतके चालणेही जिवावर आले होते. सुदैवाने एक सहाआसनीवाला पालीला चालला होत्या, त्याने अगदी अगत्याने एकही पैसा न घेता गावात सोडले. थोडी खरेदी केली. खुप उशीर झाल्याने आणि थकवा आल्याने उन्हेरेच्या कुंडात आंघोळीचा बेत रद्द केला , त्याएवजी अंबा नदीच्या पात्रात यथेच्छ डुंबून घेतले आणि परतीची वाट पकडली. खुप दिवस हुलकावनी देणार्‍या किल्ल्याच्या माथ्यावर पाउल ठेवल्याचे समाधान बाळगत गाडीतूनच सुर्यास्त न्याहाळू लागलो.

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची
संदर्भ ग्रंथः-
१ ) शोध शिवछत्रपतीच्या किल्ल्यांचा:- सतिश अक्कलकोट
२ ) डोंगरयात्रा- आनंद पांंळदे
३ ) रायगड जिल्हा गॅझेटियर
४ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के. घाणेकर
५ ) http://www.durgbharari.com हि वेबसाईट.
६ ) सांगाती सह्याद्रिचा- यंग झिंगारो ट्रेकर्स

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s