अनवट किल्ले २६: खानदेशाचे वैभव, भामेर, रायकोट ( Bhamer, Raikot )

धुळे जिल्ह्यात असणाऱ्या पाच डोंगरी किल्ल्यांमध्ये सर्वात सुंदर डोंगरी किल्ला म्हणजे भामगिरी अथवा भामेरगड. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धुळे – सुरत महामार्गावर धुळ्यापासून ५० किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाची उंची समुद्रसपाटीपासून २५०० फुट आहे. एकेकाळी अहीर राजांनी राजधानी असलेला हा किल्ला भामेर गावाभोवती नालेच्या आकारात पसरलेला असुन या किल्ल्याने व शेजारच्या डोंगराने गावाला ३ बाजूंनी कवेत घेतल्यामुळे गावाला नैसर्गिक संरक्षण लाभलेल आहे. उरलेल्या चौथ्या बाजूला दुहेरी तटबंदी व प्रवेशद्वार बांधून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गावाला व किल्ल्याला संरक्षित केले होते. असा हा सुंदर किल्ला आणि गाव दुर्गप्रेमीने एकदा तरी पहायलाच हवा.
Bhamer1
धुळे – सुरत महामार्गावर धुळ्यापासून ४८ किमी अंतरावर व साक्रीच्या अलिकडे ३ किमी अंतरावर नंदूरबारला जाणारा फाटा लागतो. या फाट्यावरुन ७ किमी अंतरावर भामेर गाव आहे. खानदेशात असीरगड, थाळनेर आणि भामेर हे तीन किल्ले आभीरकालीन मानले जातात.
Bhamer2
भामेर गडाचा नकाशा

असा हा देखणा किल्ला पहाण्यासाठी मी धुळ्याहून साक्रीला उतरलो आणि तिथून निजामपुरला जाणारी बस पकडली. मात्र रायपुर गावानंतर लगेचच डाव्या हाताला भामेर गावाकडे जाणारा फाटा होता. मात्र उजव्या हाताला राव्या-जाव्याचे जुळे सुळके पहाण्याच्या आणि फोटो काढण्याच्या नादात माझा हा फाटा चुकला आणि निजामपुर गावात पोहचल्यानंतर माझ्या लक्षात हा घोळ आला. मग भामेरला जाणार्‍या खाजगी जीपमधे बसलो. ड्रायव्हर आणि गाडीत बसलेला महिला वर्ग यांचे चाललेले संभाषण अक्षरशः काहीही कळत नव्ह्ते. विलक्षण कच्च्या रस्त्यावरुन जीप भामेर गावात पोहचली.
Bhamer3
धुळे -सुरत रस्त्यावरुन भामेरकडे येताना आपल्याला भामेर किल्ल्याच्या ३ डोंगरापैकी मधील डोंगरावर एका ठराविक उंचीवर कोरलेली लेणी दिसायला लागतात. लांबून दिसणारा कातळमाथा व अर्धवर्तुळाकार पसरलेली डोंगररांग ह्यामुळे दुरुनच हा किल्ला चटकन लक्षात येतो. या डोंगरांना वळसा घालून आपण भामेर गावात प्रवेश करतो.
Bhamer4

Bhamer5
प्राचीन काळी सुरत-बुऱ्हाणणपूर मार्गावरील वैभवशाली व संपन्न शहर म्हणून भामेर ओळखले जाई. नाशिकला जाणारा व्यापारी मार्गही या शहरावरुन जात असे. अहिर घराण्याच्या ताब्यात हा किल्ला असताना किल्ल्यावरील पन्नासपेक्षा अधिक गुंफा याच काळात खोदल्या गेल्या. आजही स्थानिक लोक या गुफांना अहिर राजाची घरे म्हणून ओळखतात.
Bhamer6

Bhamer7

Bhamer8

Bhamer9

Bhamer10

Bhamer11

Bhamer12

Bhamer13

Bhamer14

Bhamer15

Bhamer16
भामेर या गावालाही कधीकाळी उत्तम तटबंदी होती पण आजमितीला तटबंदी ढासळलेली आहे. भामेर गांवात शिरताना २० फूट उंच प्रवेशद्वार व गतवैभव दाखवणारी प्रवेशद्वाराची कमान लक्ष वेधून घेते. प्रवेशद्वाराच्या खांबावर नक्षी कोरलेली आहे तसेच या कमानीच्या बाजूला प्राचीन बारव असुन बाजूलाच आजही वापरात असलेल्या भल्या मोठया दगडी डोणी आहेत. या विहीरीचे पाणी पंपाने काढून चरांमधून हौदात खेळवलेले आहे. त्याकाळी या हौदातील पाण्याचा उपयोग वाटसरुंची तहान भागवण्याकरीता होत असावा. आजही ही व्यवस्था सुरू असुन हे हे पाणी गावातील गुरे पिण्यासाठी वापरतात.
Bhamer17
डाव्या बाजूला भली-मोठी प्राचीन विहीर साऱ्या गावाला पाणी पुरवते. उन्हाळ्याचे चार पाच महिने भामेर गावात पाण्याचे हाल असतात त्यात सरतेशेवटी या एकाच विहीरीत पाणी शिल्लक असते.
Bhamer18

Bhamer19
प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला ४ फूट उंच दगडी जोत्यावर अखंड दगडात घडवलेले ८-९ फूट उंच नक्षी कोरलेले १२ देखणे गोल खांब उभे असलेले दिसतात.
Bhamer23
पेशवेकाळात या ठिकाणी त्यांचे कार्यालय होते. कमानी समोर एका चौथऱ्यावर दोन विरगळ नजरेस पडतात. जवळच एका जुन्या मशिदीचेही पडके अवशेष दिसतात.
Bhamer21

Bhamer22
गावातून फिरताना गावातली घरेही पुरातन धाटणीची वाटतात.
Bhamer20

Bhamer24
ठिकठिकाणी, घरांच्या पायात , भिंतीत पुरातन कलाकुसर केलेल्या दगडी खांबांचे अवशेष, यक्ष व गंधर्वमुर्ती दृष्टीस पडतात.
Bhamer25
गावातील एका गल्लीत २.५ फुट उंचीची नंदीची तुकतुकीत दगडाची मुर्ती रस्त्यावर पडलेली आहे.
Bhamer26
त्यांच्या जवळ दोन ६ फूटी कोरीव काम केलेले खांब व काही मुर्त्या पडल्या आहेत. या खांबांचा जाता येता त्रास होतो म्हणून गावकऱ्यानी हे खांब मातीची भर घालून पुरले आहेत. नंदीला सुध्दा हटवण्याचा त्यांचा विचार होता पण मुर्ती जड असल्याने ते शक्य झालेले नाही.
Bhamer27
पूर्वी इथे मंदिर असावं. गाव पार केल्यावर आपण शंकराच्या मंदिरापाशी येतो.
येथून समोरच एकूण तीन डोंगरांवर वसलेला भामेरगड उर्फ भामगिरी किल्ला नजरेस पडतो. गावातले अवशेष पाहून मी किल्ल्याच्या दिशेने निघालो.
Bhamer28
वाटेत एक छोटे शिवमंदिर लागले. मंदिराची बांधणी नवीनच होती.
Bhamer29

Bhamer30
आतमधे एक ग्रामस्थ बसलेले होते. त्यांनी बरीच ईतर माहिती पुरवली. त्यांचा निरोप घेउन किल्ल्याकडे निघालो.
Bhamer31
यातील उजव्या हाताच्या डोंगरावर एक छोटा दर्गा असुन समोरील डोंगरावर कोरीव लेणी आहेत तर डाव्या हाताच्या डोंगरावर भामेरगडचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या खाली डोंगरात एक मोठी खाच मारून बालेकिल्ला व मधला डोंगर एकमेकापासुन वेगळे केलेले आहेत.
Bhamer32
बालेकिल्ल्याचा डोंगर ते दर्ग्याचा डोंगर यांना समांतर अशी तटबंदी पायथ्याशी बांधलेली असुन आजही ही तटबंदी व त्यातील पाच बुरुज बऱ्यापैकी शिल्लक आहेत.
Bhamer33
यातील एका बुरुजाच्या बाहेरील बाजुस मोठा बांधीव हौद आहे तर एका बुरुजावर भग्न झालेली विष्णुमुर्ती आहे. ह्या तटाचा बराचसा भाग झाडांनी लपलेला आहे पण बुरुज मोठे असल्याने लांबूनही चटकन दिसतात. ह्या तटाची व बुरुजाची मांडणी गडमाथ्यावरुन उठून दिसते. गावामागून उजव्या हाताला असलेल्या एका मळलेल्या पायवाटेने सुरूवातीच्या वाटेवर नाक दाबून १० मिनीटात आपण भग्न प्रवेशद्वारापाशी पोहचलो.
Bhamer34
दरवाजाकडे येताना डाव्या बाजुला कातळात कोरलेल्या गुफा आपले लक्ष वेधतात तर काही ठिकाणी घसारा लागतो. येथे काटकोनात दोन प्रवेशद्वारे असून या बाजूचा बुरुज कसाबसा तग धरुन उभा आहे. येथील प्रवेशद्वार ढासळलेलं असलं तरी दुतर्फा उभे असलेले उंच दगडी खांब व बुरुज गतवैभवाची साक्ष देतात.
Bhamer35
या किल्ल्यात प्रवेशद्वार अशा ठिकाणी बांधले आहे की, प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रू बालेकिल्ल्यातून व उजव्या बाजूच्या डोंगरावरुन सहज टप्प्यात येइल. त्याला कुठलाही आडोसा मिळणार नाही. प्रवेशद्वारातून आत आल्यावर उजव्या हाताला दर्ग्याचा डोंगर, समोर गुंफांचा डोंगर व डाव्या हाताला बालेकिल्ल्याचा डोंगर दिसतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार अशा ठिकाणी बांधले आहे की, प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रू मधल्या डोंगरावरून व उजव्या बाजूच्या डोंगरावरुन सहज टप्प्यात येइल.
Bhamer41
उजव्या हाताच्या डोंगरावरचा छोटासा दगडी टप्पा व कातळातल्या पायऱ्या चढून आपण दर्ग्यापाशी पोहचतो.
Bhamer36
या पीराला पांढऱ्या कापडाचे बैल वाहिलेले दिसतात. तिथून खाली उतरुन परत प्रवेशद्वारापाशी येऊन छोटेसा माळ पार करुन आपण लेण्यांच्या डोंगरापाशी येतो.
Bhamer37
या सपाटीवरुन एक वाट पलीकडच्या उतारावर खाली उतरते. या वाटेने खाली एक कोरीव गुंफा दिसली म्हणून उत्सुकतेने खाली उतरलो तर भलतेच दृष्य दिसले.
Bhamer38
चक्क देशी दारु गाळाण्याची ती भट्टी होती. कामगार कोणीच नव्हते, मात्र रसायनाचा उग्र वास आसमंतात भरुन राहिला होता.
Bhamer39
किल्ल्याच्या प्राचीन अवशेषाचा हा असा दुरुपयोग बधून चीड आली . हि अशी तयार केलेली गावठी दारु अनेकांचा बळी घेते.
Bhamer40

Bhamer42

Bhamer43

Bhamer44

Bhamer45
वर चढून पुन्हा सपाटीवर पोहचलो तो गावातील चार मुले गडावर गुरे राखायला आली होती, त्यांची भेट झाली. त्यांच्याबरोबरच किल्ला पहाणे सोपे झाले.
Bhamer45

Bhamer46

Bhamer47
समोरच्या डोंगराला सर्व बाजूंनी एकाला एक लागुन जवळपास चाळीस लेणी खोदलेली असुन यातील २४ लेणी आपल्याला पाहता येतात. १० x १० फूट ते २५ x १० फूट अशी लांबी रुंदी असलेली ही लेणी पाण्याच्या टाक्या आहेत. काही कोरडी टाकी तर काही स्वच्छ पाण्याने भरलेली आहेत. प्रत्येक टाके हे पहिल्या टाक्याच्या खालच्या पातळीत कोरलेले असुन टाक्याच्या तळाशी असलेल्या छीद्रातुन एका टाक्यातील पाणी दुसऱ्या टाक्यात जाण्याची सोय आहे. या किल्ल्यातील हे पाण्याचे नियोजन अभ्यासण्यासारखे आहे. २४ लेण्यांपुढे जाण्याचा मार्ग धोकादायक असुन दोरीशिवाय पुढील लेणी पाहता येत नाही. गव्हर्नमेंट गॅझिटीयर प्रमाणे डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या लेण्यांमध्ये जैन मुर्त्या आहेत लेण्यांमध्ये पाणी व गाळ साठलेला आहे.लेण्या पाहून झाल्यावर परत मागे येऊन खडकात खोदलेल्या पायऱ्यानी डाव्या हाताच्या बालेकिल्ल्याकडे निघायचे. एकूण ६० पायऱ्या चढून गेल्यानंतर किल्ल्याचा खरा आवाका लक्षात येतो.
Bhamer48
जाताना वाटेत भग्न झालेल्या दगडी कमानीत कोरलेला एक पर्शियन शिलालेख दिसतो. या चढाई दरम्यान किल्ल्याचे प्रवेशद्वार सतत आपल्या नजरेच्या टप्प्यात असते. पायऱ्या संपल्यावर पहिल्या टप्प्यावर परत सहा गुंफा आहेत. तिथून थोडे वर आल्यावर ३ कोरीव गुंफा लागतात. या गुंफांच्या दाराच्या पट्टीवर नक्षी काढलेली असुन मधोमध गणपतीची मुर्ती कोरलेली आहे. गुफांच्या दारावर भालदार चोपदार स्त्री पुरुषांच्या मुर्ती व पक्षांच्या जोडी कोरलेल्या आहेत. प्रत्येक गुफां साधारण ३० x ३० फुट असून बारा दगडी खांबांवर त्याचे छत तोललेले आहे. गुंफांना दगडात कोरलेल्या खिडक्या आहेत. शेवटच्या गुंफेच्या पलिकडे २० × २० फुट व साधारण ३० फूट खोल गुंफा आहे. याचे तोंड कोरीव गुंफांच्या वरच्या बाजूला आहे. या कोरीव गुंफांचा वापर कचेरीसाठी केला जात असावा. गुंफांपासून वर चढत गेल्यावर आपल्याला समोर बालेकिल्ल्याचा बुरुज व त्यामागे किल्ल्याचे सर्वोच्च टोक दिसते तर उजव्या हाताला दगडात खोदलेली खाच दिसते. या खाचेने बालेकिल्ला व शेजारील टेकडी एकमेकापासुन वेगळी करण्यात आली आहे. ही खाच बनविण्याचे काम अर्धवट राहिलेले दिसते. १५ फूट × ३० फूट खाचेच्या दोन्हीं बाजूंना उंचावर बुरुज आहेत तर समोरच्या बाजूला व मागील बाजुस खोल दरी आहे.
Bhamer49
शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच दगडात बनविण्यात आली आहे. ही खाच किल्ल्याच्या पायथ्यापासून दिसत असल्यामुळे तिथेच बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आहे असा शत्रूचा गैरसमज होत असे, अरुंद पायर्यांवरुन शत्रु ह्या खाचेत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्यांमुळे शत्रुची कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असे. तसेच शत्रुने बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यास बुरुजावरुन दोर टाकून या खाचेत उतरुन पोबारा करणे सहज शक्य होते
Bhamer50
ह्या खाचेतुन दगडाचा थोडासा टप्पा चढून गेल्यावर आपण खाचेच्या बाजूवरील डोंगरात पोहचतो इथून आजूबाजूच्या प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते.
Bhamer51
खाचेतून उतरुन बालेकिल्ल्याकडे चढत गेल्यावर १५ पायऱ्यांनंतर दुसरे प्रवेशद्वार लागते. येथे आपल्याला बुरुज व तटबंदीचे अवशेष दिसतात. तिथून पुढे गेल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाक लागते.
Bhamer52

Bhamer53

Bhamer54

Bhamer55

Bhamer56

Bhamer57

Bhamer 58

Bhamer 59

Bhamer 60
भामेर किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाण्यासाठी पुन्हा एक दगडी टप्पा चढावा लागतो. वर ३० फूट रुंद व लांबवर पसरलेले पठार आहे.
Bhamer 61
या पठारावर सती मातेचं छोटे मंदिर गावातील लोकांनी नव्याने बांधून काढले आहे.
Bhamer 62
व त्याच्या बाजूला २० × २० फूटी पिण्याच्या पाण्याचे टाक व इतर उध्वस्त अवशेष नजरेस पडतात. बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी गडावर यात्रा भरते. थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या दुसऱ्या टोकाचा बुरुज नजरेस पडतो.
Bhamer 63
येथुन खाली उतरल्यावर डोंगर उतारावर असणारी पाण्याची तीन टाकी व समोर देऊरचा डोंगर व त्यावरील लेणी दिसतात.
Bhamer 64
इथून खाली गांवाकडे पाहिल्यावर किल्ला व गावांच्या मध्ये असलेली खंदकरेषा स्पष्ट दिसते. तेथुन ढासळलेला तट चढुन परत बालेकिल्ल्यावर यावे लागते. या ठिकाणी आल्यावर आपला संपूर्ण किल्ला पाहून होतो. भामेर गडावरुन दक्षिणेकडे गाळणा, डेरमाळ, पिसोळ, मांगी, तुंगी, रतनगड उर्फ न्हावी किल्ला आणि तांबोळ्या हे शिखर स्वच्छ हवेत दिसते, मात्र या गडांची आधी ओळख पाहिजे. तर वायव्येला राव्या-जाव्या नावाची दोन जोड शिखरे दिसतात. गड चढण्यासाठी एक तास तर फिरण्यासाठी तीन तास लागतात. गावातील महत्त्वाची ठिकाणे पहाण्यासाठी १ पुरेसा होतो. गड पश्चिमाभिमुख असल्यामुळे सकाळी लवकर गड चढण्यास सुरुवात करावी म्हणजे गड चढताना ऊन लागत नाही. गड पाहून झाल्यावर गावातील प्रेक्षणीय ठिकाणे पहावीत.
भामेर गावाचा इतिहास अतिप्राचीन आहे. प्राचिन काळी येथे भद्रावती नगर होते. त्या काळांत इथे युवनाश्व राजा राज्य करीत होता. सध्याचा संपुर्ण धुळे जिल्हा युवानाश्वाच्या राज्याचा भाग होता. त्याची राजधानी होती सातपुडा पर्वत राजीतले तोरणमाळ हे ठिकाण. मात्र पावसाळ्यात पडणार्‍या धुंवाधार वृष्टीने युवानाश्व वर्षाकाळात भामेरला येउन रहात असावा. पांडवांनी सोडलेला यज्ञाचा घोडा या राजाने अडवला. पांडवांनी युद्ध करून तो घोडा परत नेला. महाभारत युद्धावेळी हा राजा पांडवांच्या बाजूने लढला. त्याची मुलगी भद्रावती हिच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे ‘‘भामेर’’ होय अशी दंतकथा आहे. दंतकथेप्रमाणे तोरणमाळचा महाभारत कालीन राजा युवनाश्न हा त्याची उपराजधानी भामेर येथे पावसाळ्यात वास्तव्य करून राहत होता. भामेर (भंभगिरी) १००० ते १५०० वर्षांपासून आपला ऐतिहासिक समृद्ध वारसा आजही टिकवून आहे. गडावरील लेणीवरून हा किल्ला सातवाहन काळात अस्तित्वात असावा. मध्ययुगात हा किल्ला व्यापारी दळणवळणाच्या मार्गावरील प्रमुख केंद्रस्थानी होता. खानदेश-बऱ्हाणपूर-सुरत मार्गाच्या प्रदेशावर वर्चस्वासाठी भामेरसारखा मजबूत किल्ला ताब्यात असणं त्यावेळच्या राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं समजलं जाई. नाशिक-धुळे-सुरत या तीनही शहरांकडे जाणारे मार्ग याच भामेरच्या परिसरातून जातात. प्राचीन काळात लेण्या या व्यापारी मार्गावरच कोरल्या गेल्यात. येथील जैन लेण्या आजही प्राचीन कलेचा वारसा टिकवून आहेत. १२व्या शतकांत अहिर कुळांतील लक्ष्मीदेव हा राजा भामेरला राज्य करीत होता. तसा शिलालेख आजही येथे आहे. देवगिरीच्या यादव कुळातील जैतुगीचा मुलगा दुसरा सिंधण (१२१०-४६) गादीवर आला. याने खानदेशमधील पिंपळगाव तालुक्यातील भंभागिरीच्या (भामेर) लक्ष्मीदेवाला जिंकले अशी नोंद आढळते. सिंधण यादवाच्या सेनापतीने लक्ष्मीदेवाचा पराभव केला. खानदेशात यादव राजांना गवळी राजेही म्हटले जाते. भामेर बहामनीं काळापासून १८ व्या शतकापर्यंत इस्लामी सत्तेच्या वर्चस्वाखाली होते. १८ व्या शतकाच्या सुरूवातीला दाभाडे घराण्याकडे भामेर प्रांताची व्यवस्था आली पण भामेर किल्ला मराठ्यांच्या ताब्यात सन १७५२ मध्ये आला. त्यानंतर भामेर मुलुखाचा सरंजाम विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांच्या नातवाकडे देण्यात आला होता. इंग्रजांनी सन १८१८ मध्ये सगळे किल्ले ताब्यात घेतल्यानंतरही सन १८२० मध्ये कालेखान या पेंढाऱ्याच्या सरदाराने बंड करून भामेर ताब्यात घेतला पण कॅ. ब्रिग्जने हे बंड मोडून काढतांना इथल्या इमारती व तट नष्ट केले.
Bhamer65
भामेर किल्ल्याची साधारण तीन-चार तासांची भटकंती आटोपती घेतली आणि लगोलग रव्या-जाव्याकडे निघालो. रव्या-जाव्या हे दोन भाऊ.. आणि याच्यावरून या डोंगरांना हि नावं पडली असं स्थानिक सांगतात.. भामेर गावातून बाहेर पडताच डाव्या गाडी रस्त्याने.. पुढे निघायचं.. मग पुढे छेदरस्ता आल्यानंतर थोडं डावीकडे जावून मग उजवीकडच्या कच्च्या रस्त्याने रव्या-जाव्या च्या पायथ्याशी पोहोचायचं. इथं सुरवातीलाच एक मंदिर आहे आणि लाकडात कोरलेली आधुनिक हनुमानाची मूर्ती.. दर्शन घेवून रव्या-जाव्याच्या खिंडीकडे जाणाऱ्या नाकाडावर चढायचं.
Bhamer 66
खिंडीकडे जायच्या वाटेत.. नैसर्गिक दगडाच्या लाद्यापासून तयार झालेला जीना आहे.डाइक रचनेच्या दगडांची हि वाट आहे.
Bhamer 67
या वाटेने खिंडीजवळ पोहोचताच डावीकडच्या डोंगरावर चढायचं आणि मग घसाऱ्या (Traverse) वाटेने आडवं जात खिंडीत पोहोचायचं. खिंडीत कातळ पायर्‍यांची वाट चढून माथा गाठायचा.
Bhamer 68
एखाद्या भिंतीसारखा पसरलेला भामेर सामोरा येतो.

भामेर भेटीमधे आपण अजून काही ठिकाणे पाहू शकतो. यामधे बलसाणे लेणी ही जैन लेणी साक्री – नंदूरबार रस्त्यावर भामेरपासून २० किमीवर आहेत. भामेर व रायकोट हे किल्ले एका दिवसात पाहून होतात. भामेर गावात रहाण्याची जेवण्याची काही व्यवस्था होईल असे वाटत नाही. उत्तम म्हणजे साक्रीला मुक्कामाचे नियोजन करावे आणि भामेर, बलसाना, रायकोट यांना भेट देता येईल.
साक्री- नंदुरबार मार्गावर बलसाण्याचा फाटा लागतो. फाट्यापासून ३-४ किमी. आत गांव आहे. मंदिराची चौकशी केल्यावर सगळे जैन मंदिराची माहिती सांगतात, त्यांवरून जैन मंदिराचे या गांवात बर्‍यापैकी प्रस्थ असल्याचे जाणवत होते. मात्र शंकराच्या मंदिराची माहिती विचारल्यावर ‘पुराना मंदिर….’म्हणून ओळखलं जाणारं मंदिर जरा उपेक्षितच असल्याचं लक्षात आलं.गांवातील मुख्य जैन मंदिराजवळून पुढे गेल्यावर गांवाबाहेर एका कुंपण घातलेल्या शेतात हा मंदिरसमुह आहे. गेट उघडंच होतं, त्यांतून आंत शिरून शेताच्या बांधावरुन या समुहापाशी आलो.
Bhamer 69
मुख्य मंदिराच्या डावीकडील २ मंदिरे अत्यंत भग्नावस्थेत आहेत. हा जर पंचायतन समूह असेल तर उजवीकडील २ मंदिरांचा मागमूसही दिसत नाही. आवारातील १ ल्या मंदिराचं छप्पर व गाभारा साफ ढासळलेला आहे. मात्र शाबूत असलेल्या खांबांवरील व तुळईवरील कोरीव काम गतवैभवाची साक्ष देतात.
Bhamer70
हे बहुधा पंचायतनातील गणपतीचं मंदिर असावं, कारण मंदिराबाहेरच पोटावरील भाग गायब असलेली गणरायाची भग्न मूर्ती पहायला मिळते, पण अशाही स्थितीतील मूर्तीच्या डाव्या हाताची बोटे, पाय व उंदीर यांच्या घडणीतली सुबकता लक्षात येते.
Bhamer71
२ रं मंदिरही छप्पर उडालेल्या स्थितीत आहे. गाभार्‍यामध्ये देवीची छातीपासून खालचा भाग नाहीशा अवस्थेतील मूर्ती आहे, पण प्रभावळीच्या रचनेवरुन मूळ स्वरुपातील रेखीव मूर्तीची कल्पना येऊ शकते.
Bhamer72
गाभार्‍यातील वरच्या कोपर्‍यांत किर्तीमुखं कोरलेली आहेत.
Bhamer73
संपूर्ण मंदिराचं छप्पर नाहीशा स्थितीत असलं तरी कोरीव खांब, तुळया व एकूण प्रमाणबद्धतेची कल्पना येते.
बाकी २ मंदिरांपेक्षा मुख्य मंदिर बर्‍यापैकी अवस्थेत आहे. भूमीज शैलीचं शिखर असलेलं हे मंदिर ११ व्या शतकांतलं असावं. भूमीज शिखर स्थापत्त्यशैलीमध्ये, शिखर सुरु होते तिथल्या कोनाड्यापासून ते कळसाच्या भागापर्यंत मध्यभागी चटईसारख्या नक्षीची पट्टी असते व पट्ट्यांमधील जागेत छोट्या शिखरप्रतिकृतींचे थर असतात.
Bhamer 74
मंदिराच्या बाह्यांगावर सूरसुंदरींची शिल्पे आहेत. ही शिल्पे झिजलेल्या अवस्थेत असली तरी खिळवून ठेवतात.

रायकोटः-

सुरत-बु-हाणपूर या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी धुळय़ाच्या कोंडाईबारी घाटात रायकोट हा छोटेखानी किल्ला अहिर राजांनी बांधला. तीन बाजूंनी तासलेले कडे व रायकोट गावाच्या बाजूने असलेला नैसर्गिक खंदक यामुळे रायकोटचा किल्ला नैसर्गिकरित्याच बळकट व अभेद्य आहे.
रायकोट हा छोटेखानी किल्ला मुख्यत: व्यापारी मार्गावर टेहाळणी करण्यासाठी बांधण्यात आला होता. या किल्ल्याचा आकार व घेर पाहाता यावर फारशी शिबंदी नसावी. या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही. नाही म्हणायला एक उल्लेख आहे. पांडेचेरीचा फ्रेंच वखार प्रमुख प्रांसोक्षा मार्टिन याने १२ ऑगस्ट १६८१ च्या पत्रात असा उल्लेख केला आहे, “नवापुरपासून तीन तासाच्या अंतरावर एका लहान किल्ल्यापाशी संभाजीच्या सैनिकांनी तळ दिला आहे. तेथून ते बाहेर पडून चहुकडे आक्रमण करतात”. सध्या नवापुरपासून तीन तासाच्या अंतरावर म्हणजे हा किल्ला बहुधा रायकोटच असावा.
रायकोट किल्ला धुळ्यापासून ८६ कि.मी.अंतरावर असुन हा किल्ला घाटमाथ्याचा पठाराला बिलगूनच आहे. त्रिकोणी आकाराच्या या किल्ल्याचे क्षेत्रफळ १२ एकर असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची १६५० फुट आहे. नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या रांगा पुर्वेकडे आणि सह्याद्रीची रांग दक्षिणेकडे धावु लागते. गडकोटांचे आगार असलेल्या सह्याद्रीतील रायकोट हा सगळ्यात पहिला किल्ला.
आदल्या दिवशी भामेर पाहून मी रायकोट पहाण्यास निघालो. डोंगरयात्रामधे सह्याद्रीतला रायकोट हा पहिला किल्ला हे वाचल्यामुळे खुप उत्सुकता होती. साक्री, पिंपळनेर मार्गे कोंडाईबारी या गावात उतरलो. धुळ्याहून सूरतला जाताना धुळ्यापासून ७० किमी अंतरावर घाटाच्या सुरुवातीला कोंडाईबारी गाव लागते, तर घाटाच्या शेवटी मोरकरंज गाव लागते. या दोन्ही गावातून रायकोटला जाता येते. कोंडाईबारी या गावातून नंदूरबारला जाणार्या रस्त्याने ३ किमी गेल्यावर डाव्या हाताला रायकोटला जाणारा फाटा लागतो. तेथून (४ किमी) – नवागाव (२ किमी) – लगडवाड (२ किमी) – रायकोट या मार्गे आपण रायकोट गावात पोहोचतो. कोंडाईबारीमधे चौकशी केल्यानंतर रायकोटला फक्त एकच मुक्कामी बस पिंपळनेरवरुन आहे हे समजले. अखेरीक्स एका सहा आसनी रिक्षावाले, श्री. विनोद सोनावणे ( सं- 9921995418 ) हे तयार झाले. विलक्षण कच्च्या आणि छोट्या रस्त्यावरुन आमचा प्रवास तासाभरात रायकोटला पोहचल्यानंतर थांबला.
Raykot 1
रायकोट गाव किल्ल्याच्या पठारावर असल्याने या वाटेने आपण थेट गडाच्या उंचीवर पोहोचतो. रायकोट गावात प्रवेश करण्यापुर्वी मारुतीचे मंदिर लागते या मंदीराच्या बाजूने एक कच्चा रस्ता जाताना दिसतो.
या रस्त्याने जीप सारखे वहान जाऊ शकते.
Raykot 2
रस्त्याच्या दुतर्फा बाजरीची शेती दिसते. शेती संपल्यानंतर माळ लागतो.
Raykot 3
पावसाळ्यानंतर लगेच आल्यास रायकोट गावाच्या माळावर व किल्ल्यात असंख्य फुलपाखरे पहायला मिळतात. तसेच अनेक प्रकारची फुले पहाण्यास मिळतात.
Raykot 4

Raykot 5
गडाकडे जाताना डाव्या हाताला डोंगर दिसतो, त्यावर पवनचक्क्याचा प्रकल्प उभारला आहे.
Raykot 6
रस्ता जिथे संपतो, तिथे पायवाट सुरु होते. ही पायवाट आपल्याला दोन डोंगरांमध्ये असलेल्या नैसर्गिक खंदकात घेऊन जाते.
Raykot 7

Raykot 8
हा खंदक चढून गेल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो. या पूर्ण वाटचालीत आपण किल्ल्याच्याच उंचीवर असल्यामुळे, ट्रेक अतिशय सोपा आहे.
Raykot 9
किल्ल्यावर जाताना किल्ल्याच्या अलीकडील पठारावर एक तलाव व नैसर्गिक खंदकाच्या वरील बाजुस तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. सध्या गावकऱ्यांनी शेतीसाठी गडावर ट्रक्टर नेण्यासाठी या खंदकात वाट बनवली आहे. हा खंदक चढून गेल्यावर आपण किल्ल्यात प्रवेश करतो. इथेच पडीक तटबंदी तसेच पुढे डावीकडे गेल्यावर भग्न बुरूज दिसतो. बुरूजाकडून पुढे उजवीकडच्या बाजुला कड्याला बिलगुन पायऱ्या खोदलेल्या दिसतात. हि वाट खाली मोरकरंज गावात उतरते. किल्ल्यावर मोठय़ा प्रमाणात शेती केली जात असल्याने अनेक अवशेष नष्ट झालेले आहेत.
Raykot 10
आजमितीला गडावर ढासळलेली तटबंदी, एक बुरुज, उध्वस्त वास्तुचे अवशेष, बांधीव तळे, एक विहीर व एक साचपाण्याचा तलाव इ.अवशेष पहायला मिळतात.
Raykot 11
या किल्ल्याचा आकार व घेर पाहाता यावर फारशी शिबंदी नसावी. स्थानिक लोकांना किल्ल्याबाबत फारच कमी माहिती आहे.
Raykot 12
तीन बाजूंनी तासलेले कडे व रायकोट गावाच्या बाजूने असलेला नैसर्गिक खंदक यामुळे रायकोटचा किल्ला नैसर्गिकरीत्याच बळकट व अभेद्य आहे.
Raykot 13
किल्ल्याच्या तीन बाजूंनी असलेली दरी ‘माकडदरी’ या नावाने ओळखली जाते.
Raykot 14
गडावरुन माकडदरीचे अप्रतिम दृश्य दिसते. सह्याद्रीच्या रांगेची हि सुरवात असल्याने उंची फार नाही, परंतु कातळकड्याचा रौद्रपणा जाणवतोच. जणु पुढे काय पहायला मिळणार याची चुणूक सह्यकडे दाखवितात.
Raykot 15
रायकोट गावातुन गडावर येणाऱ्या वाटेशिवाय अजुन एक वाट मोरकरंज गावातुन गडावर येते.
Raykot 16
या वाटेवर घसारा असुन दगडात खोदून काढलेल्या पायऱ्या आहेत पण वापरात नसल्याने त्या खूप मोठया प्रमाणावर ढासळून त्यांच्यावर माती जमा झाली आहे.
या पायऱ्याजवळ १०फूट x२० फूट आकाराची एक गुंफा आहे.
मोरकरंज मार्गे मोरकरंज गावातून माकडदरीमार्गे पायवाट व पुढे किल्ल्याच्या वरच्या बाजूस असलेल्या दगडातून खोदून काढलेल्या पायर्या चढून किल्ल्यावर प्रवेश करावा लागतो. या वाटचालीत आपण पायथ्यापासून किल्ला चढून जातो.मोरकरंज गावातून २ तास लागतात.
रायकोट गावातुन गडावर जाण्यास १ तास लागतात तर गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. अनवट वाटेवरला हा गड आज गावकऱ्यांच्या अज्ञानामुळे शेवटची घटका मोजतोय. किल्ल्याभोवती दाट जंगल असुन थंड हवेचं ठिकाण म्हणून हे ठिकाण विकसित होऊ शकतं.
रायकोटला भेट द्यायची तर गडावर पाण्याची सोय नाही, मुक्कामायोग्य जागा नाही. तसेच रायकोट गावातही काही व्यवस्था होउ शकेल असे वाटत नाही. पुरेसे पाणी सोबत बाळगावे हे उत्तम. तसाही किल्ला पहाणे व रायकोट गावापर्यंत येणे जाणे यासाठी जेमेतेम दोन अडीच तास पुरतात. एकतर धुळ्याला मुक्काम करुन भामेर, रायकोटला भेट द्यावी किंवा साक्रीला मुक्काम करता येईल.
Raykot 17
रायकोट परिसराचा नकाशा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s