उन्हाळी ट्रेक, घ्यावयाची काळजी ( Summer Treks: Tips)

कॅलेंडरचे दुसरे पान उलटले जाते आणि मार्च महिना सुरु होतो. सुखद थंडी हळूहळू नाहीशी होते आणि उकडायला सुरु होते. उन्हाळ्याची चाहुल लागते आणि ट्रेक करायचे कि नाही हा प्रश्न पडू लागतो. खरंतर उन्हाळा हा ऋतु एकुणच ट्रेकींगसाठी प्रतिकुल म्हणायला हवा. एकतर भाजून काढणारे उन, कळाकळा तापलेली धरती, पटकन येणारा थकवा, शरीरात झपाट्याने कमी होणारे पाण्याचे प्रमाण, गडावर उपलब्ध पाण्याची परिस्थिती ह्या सर्व बाबीचा विचार केल्यास एकुणच उन्हाळी भटकंतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होते. पण सह्याद्रीने या ऋतुसाठीही काहीतरी स्पेशल ठेवले आहे.

 

 

 

 

 

 

अंगावर काट्याची बोचरी नक्षी वागवत, “जाळीमंदी पिकल्या करवंदाचा” आस्वाद घेता येतो, “जांभुळ पिकल्या झाडाखाली” पडलेला सडा वेचून जांभळाने जीभ निळी करण्याचा आनंद घेता येतो, दात आंबवून टाकणार्‍या, थेट झाडावरुन काढलेल्या कैर्‍यांची गंमत घेण्याचा हाच काळ आणि याचबरोबर ईतर रानमेवा खाण्यासाठी उन्हाळी भटकंती करायलाच पाहिजे.
शक्य झाल्यास आणि उपलब्ध होत असेल तर उसाचा रस, लस्सी याचेही सेवन शरीरात कमी झालेल्य्य क्षाराचे प्रमाण भरुन काढते.

आधीच बेसुमार वृक्षतोडीमुळे सह्याद्री बराचसा उघडाबोडका झालाय, त्यामुळे उन्हाळी ट्रेकसाठी गड निवडताना त्याला झाडीचे पुरेसे आच्छादन आहे याची खात्री करावी.

( मालवणजवळचा भरतगड. असे छोटे गड उन्हाळ्यात भटकण्यासाठी आदर्श ठिकाण.  )

या काळात जंगल ट्रेक एकदम मस्त पर्याय, वासोटा, जंगली जयगड, कमळगड, मधुमकरंदगड, कोयनेजवळचा भैरवगड, कर्नाळा हे उन्हाळी भटकंतीसाठी उत्तम ठिकाणे म्हणता येतील. यांच्याविषयी मी लिहीणार आहेच.
थोडी काळजी घेतली तर हि उन्हाळी भटकंतीसुध्दा आंनददायी ठरु शकते. याच काळात बौध्दपौर्णिमा येते, ज्यांना प्राणिनिरीक्षणाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हि पर्वणीच. उन्हाळ्यात जंगलातील झाडे विरळ झालेली असतात, पाणवठेही मोजकेच शिल्लक असतात, अश्या वेळी एखाद्या पाणवठ्यापासून योग्य अंतर राखून सुरक्षितपणे एखादी रात्र घालवल्यास अनेक प्राणी जे कदाचित ईतर ऋतुत पहायला मिळत नाहीत, त्याचे सहज दर्शन होउन जाते.
सह्याद्रीतल्या बहुतेक रुळवाटा या काळापर्यंत पुरेशा मोडलेल्या असतात, त्यामुळे वाटा चुकण्याचा फारसा प्रश्न येत नाही. पावसाळ्यात रेनकोटचे ओझे वागवावे लागते, तर हिवाळ्यात जे गरम कपडे रात्री अत्यावश्यक वाटतात ,तेच दिवसा असह्य ओझे बनतात. पण उन्हाळ्यात हा त्रास नसतो. शक्य तितके हलके कपडे घातले कि मस्त भटकंती करता येत.
याशिवायही उन्हाळी भटकंतीचे काही फायदे आहेतच. एकतर लवकर उजाडते आणि उशिरा संध्याकाळपर्यंत असणारा प्रकाश. सहाजिकच थोडी चाल लांबली तरी काळजी नसते आणि सकाळी लवकर ट्रेक सुरु करता येतो.

( स्वच्छ हवेमुळे सह्याद्रीचे अनोखे रुप पहायला मिळते )

याशिवाय हवा स्वच्छ असल्याने वर्षातील ईतर वेळी दिसतो त्यापेक्षा जास्त लांबचा परिसर दिसु शकतो. मुख्य म्हणजे मुक्कामाच्या वेळी सरपणाचा प्रश्न जो इतर ऋतुत येतो, तो उन्हाळ्यात येत नाही. मुबलकप्रमाणात वाळलेली झाडे आणि गवत उपलब्ध असते. तसेच झाडी बरीच कमी झाल्याने गडावरचे अवशेष जे एरवी लपून गेलेले असतात ते सहजासहजी नजरेला पडतात.
बघुया उन्हाळी ट्रेकमधे कोणती काळजी घ्यायची.
१ ) उन्हाळी ट्रेकमधील सगळ्यात त्रासदायक बाब कोणती असेल तर ती कडाक्याचे उन. यापासून शक्य तितके जपले पाहिजे. मानवाने निसर्गात केलेल्या चुकीच्या ढवळाढवळीचे परिणाम म्हणुन दिवसेंदिवस उन्हाचा त्रास वाढतोच आहे. अलिकडच्या काळात तर, “गरज नसेल तर बाहेर पडू नका” असे सरकारच आवाहन करीत आहे, यावरुन याचे गांभिर्य समजावे.
यासाठी या काळात शक्य तर सुती कपडे घालावेत. शक्यतो टि-शर्ट फुल असावा. वजनाने हलकी कार्गो पँट मिळते, ति सुध्दा उत्तम. कपडे फिकट रंगाचे असावेत. थ्री-फोर्थ वगैरे फॅशन या काळात न करणेच चांगले, कारण उघड्या त्वचेवर उन्हाचा मारा होउन सनबर्न होण्याची व त्वचा जळण्याची शक्यता असते. मी स्वतः हा अनुभव घेतला आहे.
टोपीचा विचार केला तर बॉल कॅप एवजी क्रिकेट खेळाडू घालतात तसली सगळ्याबाजुने गोल कडा असलेली टोपी या काळासाठी सर्वोत्तम. कोणत्याही परिस्थितीत मानेला उन लागु देता कामा नये, विशेषतः उतरते उन, यासाठी एक तर रुमाल गळ्याभोवती बांधावा किंवा ओला केलेला नॅपकिन डोक्यावर ठेवून मग टोपी घालावी. अजिबात उन्हाचा त्रास होत नाही.
२ ) बरेच जण उन्हाचा त्रास होतो म्हणून ट्रेकिंग शुजच्या एवजी चपला किंवा स्लिपर घालतात. पण हे टाळावे. ट्रेकिंग शुजने जि सुरक्षा मिळते ती या उघड्या चपलांनी नाही. त्यामुळे सॉक्सचे दोन जोड न्यावेत पण शुजच वापरावेत. वाटल्यास मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षित असल्यास स्लिपर वापरायला हरकत नाही, पण गवतातून चालताना शुज अत्यावश्यक आहेत.
३ ) या काळात घामाचा खुप त्रास होत असल्याने शक्य झाल्यास कपड्याचे दोन सेट बरोबर ठेवावेत, म्हणजे दुर्गंधीचा त्रास होत नाही.

( उपलब्ध टाक्यात पाणी नसल्यास पंचाईत होउ शकते. )

४ ) पाण्याची कमतरता हा या काळातील मोठा प्रॉब्लेम. पुरेसे पाणी जवळ बाळगण्यात हयगय करु नये. प्रसंगी यातला गलथानपणा म्हणजे प्राणाशी गाठ. तेव्हा ओझे होते या सबबीवर पाणी कमी नेउ नये. गडावर पुरेसे पाणी नसेल हे गृहित धरुन नियोजन करणे सर्वोत्तम. शक्य झाल्यास गाडीत जशी रिझर्व इंधनाची सोय असते तसेच पाण्याची एक छोटी बाटली रिझर्व्ह म्हणून न्यावी. इमर्जन्सीला ती उपयोगी पडते. मेडीक्लोरसारखे पाणी शुध्द करणारी ओषधे सोबत असावीत. बर्‍याचदा टाक्यातील पाण्याचे तळ गाठलेला असतो, त्यामुळे पाण्यात जंतु असण्याची शक्यता असते. अश्यावेळी मेडिक्लोर उपयोगी पडते.
५ ) बर्‍याचदा ट्रेकच्या आरंभस्थानावर लवकर पोहचण्याच्या हेतुने रात्रीचा प्रवास केला जातो. ईतर ऋतुत याचा फार त्रास होत नसला तरी उन्हाळ्यात शरीरातील पित्तदोष वाढत असल्याने पित्ताचा त्रास होउ शकतो. यासाठी जेल्युसिलच्या गोळ्या, आवळाकँडी, आवळा सुपारी उपयोगी पडतात. या शिवाय आपल्या प्रकृतीनुसार डोक्टरच्या सल्ल्याने योग्य ती औषधे घेता येतील.
६ ) ईलेक्ट्रॉल पावडर सोबत असणे आवश्यकच आहे. कारण सतत घाम येत असल्याने शरीरातील क्षारांचे प्रमाण झपाट्याने कमी होते. ईलेक्ट्रॉल पावडरने हा तुटवडा लगेच भरुन निघतो. या शिवाय जेवण्यात कांदा मुबलक वापरावा. लिंबु सोबत बाळगल्यास सरबत करने शक्य होईल. गुळाची चिक्की हि पाणी पिण्याआधी खावी, त्याचाही फायदा होईल.
७ ) ट्रेकमधे बर्‍याचदा कमी पडू नये या कारणासाठी भरपुर अन्न शिजवले जाते आणि संपले नाही तर दुसर्‍या दिवशीही खाल्ले जाते. मात्र उन्हाळयात अन्न सुस्थितीत आहे याची खात्री करुनच खाल्लेल चांगले.
८ ) या काळात गवतातून वावरताना आणि मुक्कामाच्या वेळी काही जीवांपासून सावध राहिले पाहिजे. उन्हाच्या काहिलीने बर्‍याचदा साप बिळाबाहेर पडतात आणि त्यांचा आपल्याशी सामना होउ शकतो. यासाठी गडावर वावरताना हातात काठी असणे उत्तम. जमीनीवर काठी आपटत चालल्याने साप लांबुनच निघून जातो.

याशिवाय विंचु हा सुध्दा सह्याद्रीच्या भटकंतीत बर्याचदा दिसतो. गड चढताना किंवा उतरताना ज्या दगडावर आपण बसतोय त्याठिकाणी विंचु असण्याची शक्यता जास्ती असते. अश्या वेळी योग्य खबरदारी घेणे चांगले. साप किंवा विंचु चावल्यास जवळचा सरकारी दवाखाना गाठणे हाच सगळ्यात योग्य मार्ग. बर्‍याचदा मुक्काम केल्यास ट्रेकींग शुज काढून ठेवले जातात. सकाळी शुज पुन्हा घालताना न विसरता आपटून घ्यावेत, बर्‍याचदा बुटांच्या गारव्याला विंचु किंवा ईतर किटक आत जाउन बसतात. हि शिस्त अंगी बाणवून घ्यावीच.
पण याचा अर्थ असा नव्हे कि ट्रेक म्हणले कि लगेच साप किंवा विंचु यांच्याशी गाठ. मुळात ह्या जीवांच्या कितीतरी पट आपण मोठे असतो. सहाजिकच नुसत्या आपल्या जवळ येण्याने यांचा पळण्याचा प्रयत्न असतो. अगदीच नाईलाज झाला तरच ते हल्ला करतात. मला स्वतःला अनेकदा साप दिसलेत, पण बहुतेकदा ते लांबुनच पळून जातात असा अनुभव आहे.

याखेरीज धामणीसारख्या सापांचा याच काळात प्रजननकाळ असतो. त्यांचा प्रणय हा निसर्गाचा अविष्कारही बर्याचदा  दिसतो.
याशिवाय याच काळात उन्हाने बाहेर पडलेल्या मधमाश्या प्रसंगी आक्रमक होतात. तेव्हा शक्यतो ज्या झाडाखाली बसतोय किंवा जेवण करतोय, तेथे मधमाश्याचे पोळे नाही याची खात्री करा. उग्रवासाचे सेंट आणि डि.ओ., लसणाच्या चटणीसारखे पदार्थ तसेच मोठ्याने बोलणे यामुळे मधमाश्या त्रास देउ शकतात.
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात फिरताना ( कोयना, चांदोली, राधानगरी अभयारण्ये ) अस्वल व गवे यांच्यापासून सावध रहाणे आवश्यक आहे.
अर्थात सदैव सावधानी हा एकच मंत्र लक्षात ठेवला तर कोणत्याही ऋतुत केलेली भटकंती निश्चित सुखदायी ठरते.
९ ) या काळात ट्रेकचे नियोजन करताना घ्यायची काळजी म्हणजे शक्यतो एक दिवसाचे किंवा फारतर एक रात्रीच्या मुक्कामाचे ट्रेक असावेत.फार मोठ्या ट्रेकमधे दमल्यानंतर पुढे काही बघायचा उत्साह रहात नाही. नुसतेच भटकणे होते. डोळस भटकंती होत नाही.

( दाट जंगलातून केलेली भ्रमंती वन्यप्राणी दर्शन , पक्षीनिरिक्षण, निरनिराळ्या वृक्षांची ओळख असे अनेक आनंद देउन जाते )

याशिवाय जंगल भटकंती करताना जर तो परिसर वनखात्याच्या अखत्यारीत असेल तर त्यांची परवानगी घेणे योग्य राहिल. अन्यथा तो कायदेशीर गुन्हा ठरून दंड अथवा तुरुंगवासाची पाळी येउ शकते. विशेषतः वासोटा, जंगली जयगड, कोयनेजवळचा भैरवगड, कर्नाळा या ठिकाणी हि काळजी घ्यावी.
१० ) तसेच खुप मोठा चढ असणारे किंवा कातळारोहण असलेले ट्रेकही टाळावेत.

( माळशेज घाटातील भैरवगड, हे असे ट्रेक उन्हाळ्यात टाळणेच चांगले )

उदा- नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड किंवा अलंग, मदन सारखे ट्रेक.
११ ) या काळात पानगळ होत असल्यने जंगलवाटावर बराचदा पानांचा ढिग साठलेला असतो. त्या वाटेने जाताना काळजी घेणे आवश्यक आहे. या पानांच्या आड फुरसे, तस्कर तसेच घोणस सारखे साप लपतात.
१२ ) सरत्या उन्हाळ्यात म्हणजे विशेषतः मे महिन्यात बर्‍याचदा वीजा कडाडून वळवाचा पाउस पडतो. उत्तम म्हणजे या काळात ट्रेक टाळता आले तर बरे. त्यातही ट्रेक करायचा असेल तर तो शक्यतो सकाळी लवकर संपवून दुपारच्या आत पायथ्याला परत यावे. बहुतेकदा जमीन तापल्यानंतर म्हणजे दुपारी ढग जमून वळवाच्या पावसाला सुरवात होते. तुफान वेगाने वहाणारे वारे, प्रचंडप्रमाणात उडणारी धुळ, कडकडणार्‍या वीजा आणि लवकर अंधारुन येणे यामुळे हा पाउस प्रसंगी जीवघेणा ठरु शकतो. बर्‍याचदा वाटेत असणारे ओढे आणि नद्या या अचानक झालेल्या पावसाने दुथडी भरुन वाहू लागतात आणि त्या ओलांडणे अवघड होते. अश्यावेळी स्थानिक माहितगार माणुस सोबत असलेला चांगला. मोठ्याप्रमाणात होणार्‍या पावसाने वाटा निसरड्या होतात आणि धोकादायक बनतात. तसेच बरोबर रेनकोट वगैरे नसल्यास कपडे भिजणे हे त्रासदायक असते.

( वळवाच्या पावसात सापडणार नाही याची दक्षता घेणे महत्वाचे )

मात्र सर्वात मोठा धोका हा वीजेपासून असतो. मानवी शरीरातील पाण्यामुळे वीज चटकन शरीराकडे आकर्षली जाते. त्यामुळे वीजा चमकत असतील तर एखाद्या मंदिराचा किंवा आडोश्याचा आश्रय घेणेच चांगले, मात्र कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली उभे राहु नये. निसर्गाचा हा “साउंड आणि लाईट” शो मी तरी घरी बसून बघणे पसंद करतो.
१३ ) कोणताही ट्रेक सुरु करण्यापुर्वी पायथ्याच्या गावतील गावकर्‍याशी बोलून घ्यावे. गडावर पुरेसे पाणी आहे कि नाही किंवा ईतर काही धोका असेल तर त्याची माहिती फक्त त्यांच्याकडेच असू शकते. तेव्हा गावकर्‍यांशी गप्पा मारण्याचे दोन फायदे, एकेतर ताजी माहिती मिळते, तसेच आपण गडावर गेलोय याची नोंद रहाते. शक्यतो एक दोन गावकर्‍यांचा मोबाईल नंबर वहीत टिपून ठेवावा , अडीअडचणीला त्वरीत मदत मिळेल.
१४ ) स्वसंरक्षासाठी मोठा चाकू सोबत बाळगणे आवश्यक झालयं. एकेकाळी सह्याद्रीत निवांत फिरता यायचे. मात्र वाढत्या मानवी हस्तक्षेपाने बर्‍याचदा वन्यप्राण्यांशी, विशेषतः बिबट्याशी गाठ पडण्याचे प्रसंग वाढलेत. तसेच वाटमारीच्या काही घटनाही अधुन मधून एकायला मिळतात. उत्तम म्हणजे एखादा मोठा चाकु सोबत असल्यास तो संरक्षणाबरोबरच प्रसंगी झाडांच्या फांद्या, आडव्या येणार्‍या वेली तोडायला उपयोगी पडतो.
याशिवाय आणखी चांगल्या सुचनांची यात भर घालुया.
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
२ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
३ ) ईंटरनेटवरचे विवीध ब्लॉग.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s