उन्हाळी भटकंती: जंगली जयगड ( Jangli Jaigad )

महाबळेश्वर येथे उगम पावलेली कोयना नदी सुरवातीला पश्चिमवाहीनी होते, मात्र सह्याद्रीच्या रांगेमुळे ती सुरवातीला दक्षिणवाहिनी आणि नंतर पुर्वेकडे वळते. प्रतापगड, मधुमकरंदगड यांना सामावणारी सह्याद्रीची मुख्य रांग आणि वनकुसवडे पठार यांच्या मधल्या अनुकुल भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेउन १९६२ मधे कोयना धरणाची उभारणी झाली. कठीण बेसाल्टच दगडापासून बनलेल्या सह्याद्रीला आतून पोखरून वीजनिर्मितीसाठी टप्पा १ व २ उभारले गेले. या सगळ्या विकासकामाचा एक प्राचीन दुर्गराज साक्षी होता, तो म्हणजे “जंगली जयगड”.
Jangli Jaigad1
( कुंभार्ली घाटातून होणारे जंगली जयगडाचे दर्शन )
कोयना नदी म्हणजे सुजलाम, सुफलाम महाराष्ट्राच्या संपन्नतेत भर घालणारी एक भाग्यदायी नदी. महाबळेश्वरास उगम पावून कराडजवळ कृष्णेत समर्पित होणाऱ्या कोयना नदीने एक देखणे खोरे निर्माण केले आहे. या नदीवर जेव्हा हेळवाक जवळ कोयना धरण उभारले गेले तेव्हापासून कोयनानगर पर्यटनाच्या नकाशावर आले. या कोयनानगरजवळील रामघळ व भैरवगड तसे डोंगरयात्रींना परिचयाचे, पण समुद्रसपाटीपासून १०२९ मीटर (३१६४ फुट )उंचीवर उभा असणारा जंगली जयगड मात्र डोंगर भटक्यांना फारसा माहिती नाही.
Jangli Jaigad2
(जंगली जयगड परिसराचा नकाशा )
उन्हामुळे बरेच दिवस कुठे भटकंती न झाल्याने खुप मोठा उपवास घडला होता. आता एखादा कस पहाणारा ट्रेक करुनच समाधान मिळणार होते. कोयनेच्या आसपासचे बरेच काही पाहून झाले असले तरी जंगली जयगड अद्याप पाहिला नव्हता, त्यामुळे मे महिन्याचे रणरणीत उन विचारात घेउन जंगली जयगडावर एकमत झाले. एका भल्या पहाटे बाईकवरून मी व माझा मित्र प्रशांत निघालो. कोयनानगरला बटाटेवड्यांना पोटात ढकलून मुक्ती दिली आणि नेहरु गार्डन मागे टाकून नवजाच्या दिशेने निघालो. ओझर्डेचा तीन धारात कोसळणारा धबधबा आणि लेक टेपिंगच्या यशस्वी प्रयोगानंतर नवजा एकदम प्रकाशझोतात आले. कराडवरुन चिपळूणला जाण्यासाठी कोयनानगर-हेळवाकमार्गे कुंभार्ली घाट आहे तसेच दुसरा घाटमार्ग नवजामार्गे पंचधारा बोगद्यामार्गे वीजनिर्मितीच्या तिसर्‍या टप्प्याजवळून उतरतो. मात्र सुरक्षेच्या कारणाने हा घाटमार्ग सध्या खाजगी गाड्यांना बंद आहे. याच रस्त्यावर जंगली जयगडावर जाणारी वाट आहे एवढीच आम्हाला माहिती होती.
Jangli Jaigad3
मस्त वळणदार रस्त्याने उजव्या हाताला कोयनाधरणाचे निळेशार पाणी ठेवत आमचा प्रवास चालु होता.
मधेमधे डोंगराच्या नैसर्गिक रचनेमुळे धरणाच्या पाण्याच्या जीभा रस्त्याला येउन भिडत होत्या. अखेरीस नवजाला पोहचलो. इथे सरपंचांच्या घरी गाडी लावली आणि पायीच बोगद्याच्या दिशेने तंगड्या तोडू लागलो. पावसात एन भरात वहाणारा धबधबा कोरडा ठाक पडला होता.
Jangli Jaigad4
इथे पाचवा टप्पा करण्याची शासनाची योजना आहे म्हणे, कदाचित त्यानंतर हा धबधबा वर्षभर वहाता राहिलही. दिवस चढायला लागला तसे चालणे अवघड वाटु लागले. अखेरीस बोगद्याजवळ येउन पोहचलो, पण तिथे विचारावे कोणाला? थोड्यावेळात एक ट्रक धुळ उडवित आला, त्याला हात केला आणि गडाविषयी विचारले. त्याने रस्त्याजवळून चढणारी वाट दाखवली आणि एकदाची चढाई आम्ही सुरु केली. वाटेत झाडावर कोणीतरी बाण काढले होते, त्यामुळे चांगलीच मदत होत होती. मुळात भटक्यांची हौस सह्याद्री पुरी करतोच, पण ईथे तर जंगलसफारीचा बोनस मिळाला होता.
आम्ही जरी बाईकने आलो असलो तरी एरवी जंगली जयगडाला जाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोयनानगरपासून १० कि.मी. अंतरावर नवजा हे गाव लागते. या गावातूनच ५-६ कि.मी. किल्ल्यावर जाण्यास फाटा आहे. यासाठी कोयनानगरहून नवजाला जाण्यासाठी ८.००, ९.००, १०.१५, १२.१५, २.१५ ( दु), ४.१५, ५.३० अश्या बस आहेत तर नवजावरुन ८.३०, ९.३०, १०.४५, १२.४५, २.४५, ४.४५, ६.०० अश्या परतीच्या बस आहेत. याशिवाय कोयनानगरवरुन खाजगी जीपसुध्दा नवजाला जातात. मुळात जंगली जयगड आणि आसपासची गावे हा सर्व भाग कोयनाप्रकल्प आणि वनखात्याअंतर्गत संरक्षित करण्यात आलेला आहे. त्यामुळे येथे पर्यटकांना मुक्तपणे फिरता येत नाही. यासाठी आधीच कोयनानगरच्या वनखात्याकडून इथे येण्याची परवानगी काढावी.
कोयना वनखात्याच्या ऑफिसचा दुरध्वनी क्रमांक-(०2372) 284091,

सध्याच्या माहितीनुसार आता या परिसरात प्रवेश पुर्णपणे बंद केला आहे.

जर परवानगी मिळाली तर किल्ल्याच्या अलीकडेच असणा-या नवजा गावातूनच एखादा वाटाडय़ा घेतल्यास या गडावर जाण्याचा मार्ग स्थानिक माणसामुळे निर्धोक होऊ शकतो. रस्त्यावर या गडाची वाट दर्शवणारा एकही फलक अस्तित्वात नाही. त्यामुळे पहिल्यांदाच येणारा दुर्गप्रेमीसुद्धा वाट हमखास चुकतोच. सध्या किल्ल्यावर पाणी नसल्यामुळे गावातूनच आपल्याकडील बाटल्या भरून घ्यायच्या व टॉवर कॉलनीमार्गे पंचधारा बोगद्याकडे चालू लागायचे. या रस्त्यावर ५०० मीटरवर एक चौकी आहे, ती ओलांडल्यावर साधारणपणे ५०० मीटरवर डाव्या हाताला एक कच्चा रस्ता डोंगरात गेलेला दिसतो. येथेपर्यंत खाजगी वहानाने जाता येते. येथून डोंगर चढण्यास सुरुवात करावी.वाट मळलेली असून गर्द झाडीतून जाते.
Jangli Jaigad5
स्थानिक वाटाडय़ा बरोबर घेऊन रस्त्यापासून साधारण तासाभराचं अंतर हे घनदाट जंगलातून पार करावं लागतं. जंगली जयगडावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे, कोकणातून थेट कडा असल्याने त्याबाजुने गडावर जाता येत नाही. हा ट्रेक करताना गडावर रहाण्याची सोय नाही, तसेच कॅम्पिंगची परवानगी नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कोयनानगर गावात रहाण्याची सोय होईल किंवा नवजा गावतील शाळेत मुक्काम करता येईल. तसेच गडावर जेवणाची सोय नाही, कोयनानगर गावात हॉटेल्स आहेत .गडावर जातांना वाटेत असलेल्या झर्‍यात जानेवारी – फेब्रूवारी महिन्यापर्यंतच पाणी असते. नंतर नवजा गावातून पाणी घेउन जाणे योग्य. शक्यतो गडावर जाण्यासाठी नोव्हेंबर ते मे हा काळ उत्तम.
Jangli Jaigad6
खरेतर घनदाट जंगलामुळे आपण वाट चढतोय याची जाणीवसुध्दा होत नाही.
Jangli Jaigad7
फक्त थोडी माहिती आणि नजर असेल तर अस्वलाने नख्याने झाडावर काढलेली नक्षी, पायवाटेच्या बाजुला असणारे जनावरांच्या खुराच्या खुणा या सर्व जगंलाच्या जिवंतपणाची लक्षणे. आपण चालत असताना कदाचित अनेक डोळे सावधपणे आपल्याला न्याहाळताहेत याची जाणीव होते. पार्श्वभुमीला सतत पक्षांचा किलबिलाट एकू येत असतो, क्वचित कर्णकटू असे एखाद्या प्राण्याचे किंचाळणे एकु येते आणि अंगावर सर्ररकन काटा येतो. या ठिकाणी अनेक दुर्गभटक्यांना वन्यप्राण्यांचे दर्शन झालेले आहे, नशीबात असेल तर एखाद्या वन्यप्राण्याचे दर्शनसुध्दा होउ शकते. भर उन्हाळ्यात सूर्याचा किरणही जमिनीला स्पर्शू न देणारं हे जंगल म्हणजे या किल्ल्याची खरीखुरी संपत्ती आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरेच ज्याने कोणी जंगली जयगड हे नाव ठेवले, ते अगदी यथार्थ आहे.
पायवाट थोडय़ा वेळेतच सपाटीवर घेऊन आली. येथून सरळ डोंगर चढाईच्या वाटेने चढल्यानंतर आपण घोडेतळ या निसर्गरम्य ठिकाणी येऊन पोहोचतो. या ठिकाणी पाण्याचा एक जिवंत झरा असून, विश्रांतीसाठी वन विभागाने एक दगडी कट्टासुद्धा बांधलेला आहे. गड पाहून परत आल्यावर पोटपूजा उरकण्यासाठी हे ठिकाण उत्तम! इंग्रजांच्या काळात जंगली जयगडला येणारे अधिकारी या ठिकाणी आपली घोडी उभी करून पुढे पायी गडाकडे जात असत. त्यामुळे या ठिकाणास घोडेतळ म्हटले जाते. नीट निरखुन पाहिल्यास या पाणवठ्यावर येणार्‍या प्राण्यांचे ठसे आपणाला दिसू शकतात. नवजा गाव सोडल्यानंतर इथपर्यंत येण्यास साधारण दीड ते दोन तास लागतात. येथून आपण सरळ दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने चालू लागायचे. अर्ध्या तासात मूळ पायवाटेला डावीकडे एक फाटा फुटतो. जंगली जयगडकडे जाणारी ही वाट सरळ डिचोली गावाकडे जाते. या डाव्या हाताच्या पायवाटेने निघालो की भोवतीचे जंगल घट्ट होते.सदाहरित प्रकारातील या जंगलात बांबूचे प्रमाण अधिक आहे. या शिवाय ऐन, अंजन, वेत, कुंभा, जांभूळ, आंबा अशी नाना प्रकारची वृक्षराजी येथे आहे. त्यामुळे पशू-पक्ष्यांचे अस्तित्व मोठे आहे. जंगलातून वर चढणाऱ्या पायवाटेने लता-वेलींचे अडथळे पार करत आपण दरी काठाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. दरीच्या या माथ्यावर छोटेखानी झेंडय़ाचा गोलाकार बुरूज असून, त्यावर चढण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. आपण जंगली जयगडसमीप आलो याची ही खूण. घोडेतळापासून इथपर्यंत येण्यास अर्धा तास लागतो. या दरीच्या माथ्यावरून खाली उतरणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यावर समोरच खोल दऱ्यांच्या मधोमध वसलेला जंगली जयगड दिसतो.
Jangli Jaigad8
हा गड सह्य़ाद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या डोंगरावर उभा असून, त्याची एक चिंचोळी धार सह्य़ाद्रीशी जोडली गेली आहे.
Jangli Jaigad9
हा आकार पाहून लोहगडाच्या विंचुकाटा माचीची आठवण होते. येथेच गडाचे उध्वस्त प्रवेशव्दार आहे. झाडीत विखुरलेल्या घडीव दगडांवरून ते ओळखता येते.
Jangli Jaigad10
दाट झाडीतून खाली उतरणाऱ्या पायवाटेने उघडय़ा-बोडक्या गडाकडे नेणाऱ्या चिंचोळ्या धारेवर काळजीपूर्वक उतरायचे.
Jangli Jaigad11

Jangli Jaigad12
पुढे एक-दोन टेकडय़ांना बाजूला ठेवत गडाच्या मुख्य डोंगरासमोर आपण येऊन पोहोचतो.
Jangli Jaigad13
गडाच्या टोकाकडे जातांना आपल्याला दोन छोट्या कातळ सुळक्यांना वळसा घालून जावे लागते, या सुळक्यांना स्थानिक लोक “दिपमाळ” या नावाने ओळखतात. इथे जांभ्या दगडातील तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. गडाचे प्रवेशद्वार भूकंपात ढासळलेले आहे. पुढे काही इमारतींच्या जोत्यांमधून आपण आत प्रवेश करतो. जयगडाच्या मुख्य सपाटीवर पोहोचताच किल्ल्याचा चिंचोळा आकार पटकन आपल्या नजरेत भरतो. तसेच किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी सरळ दरी असल्यामुळे जंगली जयगडाच्या निर्मात्यास याच्या रक्षणासाठी तटबंदी बांधण्याची फारशी गरज उरलेली नाही. इथेच एक दगडी चौथरा दिसतो.
Jangli Jaigad14
तो पाहून पुढे जाताच भग्न मंदिर दिसते.
Jangli Jaigad15
हे छोटेखानी मंदिर, त्याच्यासमोर भूकंपाचा धक्का पचवून ताठ मानेने उभी असलेली दगडी दीपमाळ व तेथे असणारे एक दगडी भांडे आदी दुर्गअवशेष गडाचे वातावरण जिवंत करतात.
Jangli Jaigad16
हे ठिकाण म्हणजे गडदेवता ठाणाईचे मूळ ठिकाण असून, सध्या मात्र येथील छोटी घुमटी मूर्तीविरहित आहे.
यापुढे पुन्हा एका उंच टप्प्यावर चढायचे. इथे चौकोनी दगडी बांधकाम असलेला एक बुरुज असून, त्याचा उपयोग इतिहासात टेहळणीसाठी होत असे. त्या चौथऱ्यासमोरच आपणास किल्लेदाराच्या वाडय़ाचा चौथरा पाहायला मिळतो. वाडय़ाच्या मागे डाव्या हातास दरीच्या माथ्यावर मातीने भरलेली जांभ्या दगडातील एक बांधिव विहीर पूर्णपणे मातीने भरून गेलेली आहे.
Jangli Jaigad17
ही विहीर पाहून आपण गडाच्या पिछाडीच्या पश्चिम टोकावर यायचे.
Jangli Jaigad18

Jangli Jaigad19

Jangli Jaigad20
येथून खाली दरीत पोफळी लाईट हाऊस, समोर सर्ज वेल,
Jangli Jaigad21
तर उजव्या हातास कोळकेवाडी जलाशय, त्याच्या काठावरचा अपरिचित कोळकेवाडी दुर्ग आणि या सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी केलेला नागमोडी पोफळी घाटही व्यवस्थित न्याहाळता येतो.
Jangli Jaigad22

( सर्ज वेल अर्थात उल्लोळक विहीरीजवळून जंगली जयगडाचा मी घेतलेला फोटो )
Jangli Jaigad23
सभोवार तळकोकणचे रम्य दृश्य दिसते. उत्तरेस नजर फेकताच वासोटा ऊर्फ व्याघ्रगड, महिमंडणगड व मकरंदगड तर त्याच्या डावीकडे रसाळ, सुमार व महिपत ही इतिहासप्रसिद्ध दुर्गत्रयी आपणास साद घालतात.
Jangli Jaigad24
दक्षिणेला कुंभार्ली घाट आणि त्यातून ये-जा करणार्‍या वहानांचे स्पष्ट आवाज येत असतो. त्याच्यापलीकडे भैरवगड, तर तळात पार वशिष्ठीच्या काठावर निवांत पहुडलेले चिपळूण शहर आपले लक्ष वेधून घेते.खाली कोकणात उतरलेल्या सह्याद्रीच्या रांगा विलोभनीय दिसतात.
कुंभार्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी इतिहास काळात जंगली जयगडची निर्मिती करण्यात आली. शिवकाळात हा गड शिवाजी महाराजांच्या अमलाखाली होता.याच्या शेजारील हेळवाक हे गाव बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे जंगली जयगडचा समावेश हेळवाक महालात होत असे. पुढे १७५८-५९ मध्ये पंतप्रतिनिधींकडील हा किल्ला पेशव्यांचे सरदार खंडोजी मानकर यांनी घेतला, पण पेशव्यांनी याचा ताबा परत पंतप्रतिनिधींकडे देण्यास सांगितले. पुढे १८१० मध्ये प्रतिनिधींची आश्रित ताई तेलीण हिच्या ताब्यातून पेशव्यांचा सेनापती बापू गोखले यांनी हा किल्ला जिंकून घेतला. शेवटी १८१८ च्या इंग्रज-मराठे युद्धात कर्नल हिवेट याच्या नेतृत्वाखालील फौजेने हा किल्ला जिंकून घेतला.
असा हा किल्ला त्याच्या पर्यंत पोहोचेपर्यंत पार कराव्या लागणाऱ्या जंगलच्या तटबंदीमुळे जंगली जयगड हे नाव सार्थ करतो. प्रसिद्धीच्या फारसा झोतात नसलेला आणि संरक्षित जागेमुळे विस्मृतीत गेलेल्या या किल्ल्यास फारच कमी दुर्गयात्री भेट देतात. म्हणूनच या गडाकडे येणारी पावले ही अस्सल दुर्गवेडय़ांचीच असतात हे वेगळे सांगायला नको. माणसांच्या आणि सिमेंटच्या जंगलातून बाहेर पडून या अनोख्या जंगली जयगडाचा अनुभव हा अविस्मरणीय ठरतो.

( टिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार)

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटियर
२ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३ ) लोकसत्ताच्या लोकभ्रमंती पुरवणीतील श्री. भगवान चिले यांचा लेख
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) http://destinationsahyadri.blogspot.in/ हा ब्लॉग

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s