अनवट किल्ले ३०:चुन्याचा टिळा, कंक्राळा ( Kankrala )

नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला साल्हेरजवळच्या सेलबारी-डोलबारीच्या उत्तुंग रांगा पुर्वेकडे पसरत जातात अन् मालेगावच्या उत्तरेला तुरळक पसरलेल्या गाळणा टेकड्यांच्या रुपाने भेटतात. अशाच एका विखुरलेल्या टेकडीवर कंक्राळे किल्ला उभा आहे. गाळणा गडाचा सोबती म्हणून ओळखला जाणारा कंक्राळा किल्ला नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात आहे. मालेगावहुन २० कि.मी. अंतरावर कंक्राळा गाव आहे. अवशेष संपन्न गाळणा ईतिहास राखून आहे, मात्र काहीसा दुर्लक्षित कंक्राळ्याला फारसे दुर्गप्रेमी भेट देत नाहीत. मला मात्र हा गड पहाण्याची उत्सुकता होती.
Kankrala 1

Kankrala 2
( कंक्राळा गडाचा नकाशा )
एका प्रसन्न सकाळी मालेगाववरुन बाईकने कंक्राळ्याच्या दिशेने निघालो. मालेगाव- करंजगव्हाण- डोंगराळे- कुसुम्बा रस्ता पकडला. कंक्राळ्याला जाण्यासाठी करंजगव्हाणवरुन फाटा आहे. मालेगावहुन तेथे जाण्यास एस.टी. तसेच खाजगी गाडीची सोय आहे. थेट कंक्राळ्याला केवळ तीनच बस आहेत किंवा लुल्ला या गावी जाणारी बस पकडली तरी चालते. या बसने गरबड या वस्तीवर उतरुन कंक्राळ्याला जाता येईल. लुल्ला या गावी जाण्यासाठी मालेगाववरुन ८,१०.१५ आणि संध्याकाळी ५.४५ ची मुक्कामी बस येते. मात्र स्वतःच्या खाजगी वाहनाने प्रवास करून गाळणा व कंक्राळा हे दोन्ही किल्ले एका दिवसात नीटपणे पाहुन होतात. मात्र एकंदरीत रस्त्यांचे खराब स्वरुप पहाता, येथे साधारण ऑगस्टनंतर येणेच योग्य होइल.
Kankrala 3
( गरबड वस्तीवरुन दिसणारा कंक्राळा )
गाळणा किल्ला आधी पाहून मग कंक्राळा किंवा उलट क्रम करायचा असेल तर थेट गाळणा- लुल्ला-गरबड- कंक्राळा असा मधला रस्ता आहे. मात्र हा रस्ता कच्चा आहे हे लक्षात ठेवायचे. कंरंजगव्हाणकडून कंक्राळ्याला जाण्यासाठीसुध्दा खाजगी जीप आहेत, मात्र पुरेसे प्रवासी असले तरच हि सेवा मिळू शकते. करंजगव्हाण मुख्य रस्त्यावर असल्याने कुसुंबा, डोंगराळेकडे जाणारी गाडी पकडून येथे जाता येईल. इथून कंक्राळा सहा कि.मी. आहे.
Kankrala 4
गाळणा ते कंक्राळा हे अंतर करंजगव्हाण मार्गे साधारणपणे ३० कि.मी.आहे. करंजगव्हाण गावापासून १० कि.मी अंतरावर कंक्राळा हे गडपायथ्याचे गाव आहे.
Kankrala 5
कंक्राळा गावातून किल्ल्याचे सुंदर दर्शन होते. हा किल्ला समुद्रसपाटीपासून २१०० फुट व पायथ्यापासून साधारण ५०० फुट उंचीवर वसलेला आहे. स्वतःचे खाजगी वाहन असेल तर गडाच्या अगदी पायथ्या पर्यंत कच्या रस्त्याने गाडी नेता येते व ४ कि.मी.चालायचे श्रम वाचतात. पायथ्याला पाच-सहा घरांची आदिवासी वस्ती आहे. बाईक घेउन आल्याने मी इथेपर्यंत आरामात पोहचलो. बाईक एका घराजवळ पार्क करुन गडाकडे निघालो.
Kankrala 6
कंक्राळ्याची उंची समुद्रसपाटीपासून ७५५ मीटर असली तरी पायथ्यापासून ती जेमतेम दिडशे मीटरच असेल. त्यामुळे अर्ध्या तासात आपण गडावर पोहचु शकतो.
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. १ ) कंकराळे गावाकडून जाताना गडाच्या पश्चिम घळीतुन वर जायची सोपी वाट आहे.
२ ) दुसरी वाट उत्तरेकडून गरबड गावातुन थोडीशी अडचणीची आहे. या वाटेने फारसे कोणी जात नाही.
Kankrala 7
कंक्राळ्याच्या डोंगरांमुळे किल्ल्याच्या मध्ये एक खिंड झाली आहे. डोंगरमाथ्याकडे उभ्या कातळावर पांढरा चुना फासलेला दिसतो त्या दिशेने किल्ल्याकडे मोर्चा वळवायचा. गडापर्यंतचा रस्ता ठळक नसला तरी चुकत नाही. या उजाड मैदानातून कंक्राळा गडाच्या पायथ्याशी आपण पोहोचतो.
Kankrala 8
वाटेने चढण्यास सुरवात केल्यावर डावीकडे तटबंदीने दर्शन दिले आणि गड चढण्याचा उत्साह वाढला. दहा मिनिटे डोंगर चढल्यावर मध्ये मध्ये दगड व्यवस्थित लावून बनवलेली प्राचीन वाट दिसते. वस्तीपासून खिंड गाठण्यास अर्धा तास लागतो.
Kankrala 9
खिंडीत पोहोचताच एक दगडी तटबंदी असलेली भिंत आपल्या समोर येते.
Kankrala 10
ही तटबंदी डावीकडच्या टेकडीवर सलग जाऊन त्याबाजूला एक गोलाकार मोठा बुरूजही दिसतो. माथ्यावर असलेल्या दोन टेकड्यांमधून खाली उतरलेली एक घळ दिसते. या घळीतून किल्ल्यावर चढायचा मार्ग आहे. या घळीतून पडलेल्या दगडांमधून नागमोडी वळणं घेत वर चढायचं. गडाचा बराचसा उतार कातळाचा असून चढाई मार्गात सिताफळ, डाळिंब आणि बरीच काटेरी झाडे आहेत.
Kankrala 11
उजवीकडच्या उभ्या कातळकड्यात काही गुंफा कोरलेल्या दिसून येतात.
Kankrala 12
हे पाण्याची टाकी असून त्यात बारमाही पाणी आढळतं. या टाक्यांपर्यंत जाण्यासाठी कातळातच मार्ग खोदलेला आहे.
Kankrala 13
इथंच एक खुरटं असं चिंचेचं झाड दिसतं. झाडावर एक भगवा ध्वज देखील फडकत असतो.
Kankrala 14
जवळच कातळाला पांढरा रंग फासलेला आहे. या ठिकाणी पीरबाबाचं ठिकाण असल्याचं गावकरी मानतात. हा पांढरा रंग दुरवरुनही नजरेस पडतो. एखाद्या वीराच्या कपाळावर लाल टिळा असावा तसा हा चुन्याचा पांढरा पट्टा गडाच्या भाळी ओढला आहे.
Kankrala 15
हा अगदी नामपुर- ताहराबाद रस्त्यावरुनही दिसतो. मात्र हा पट्टा का ओढला आहे, त्याचे कारण समजत नाही. वर्षानुवर्षे पडणार्‍या पावसामुळेही पट्टा फिकट झालेला नाही हे विशेष. एकुण हा पट्टा हेच गडाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. या पिरामुळे येथे लोकांचे येणे जाणे वाढले असावे. कारण टाक्यात अगरबत्तीची पाकीटे आणि प्लास्टीक तरंगताना दिसत होते. या टाक्यातील पाणी अजून तरी पिण्यायोग्य आहे. बहुतेकदा गडाच्या आतमधे पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते, इथे मात्र चक्क गडाच्या तटबंदीबाहेर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. अर्थात इथे येण्याची वाट वरच्या तटबंदीतून मार्‍याच्या टप्प्यात असल्याने शत्रुच्या आक्रमणापासून टाकी सुरक्षित रहात असावीत. सध्या तरी कंक्राळ्यावर पिण्यायोग्य पाण्याचे हे एकमेव ठिकाण आहे. एकुण पाण्याची व्यवस्था बघता इथे ऑगस्ट ते फेब्रुवारी या काळातच जाणे योग्य ठरेल.
Kankrala 16
याशिवाय या ठिकाणी बाजूबाजूला दोन पाण्याची टाकी आहेत. त्यांच्या खालच्या बाजूस अजून दोन पाण्याची टाकी आहेत. यातील एका टाक्यात पाईपने पाणी खालच्या वस्तीवर नेलेले दिसले. मी गेलो होतो, तेव्हा बरीच काळतोंडे लंगुर, टोळीने या टाक्यापाशी पाणी पित बसले होते. एकटाच असल्याने थोडा भीतभीतच टाक्यांपाशी गेलो, मात्र आपले पुर्वज मला बघून घाबरले आणि तटबंदीवर उड्या मारत दिसेनासे झाले. हे सर्व पाहून परत पायवाटेवर यायचे. पायवाटेने ५ मिनिटे चढून गेल्यावर डाव्या बाजूस बुरुज आणि तटबंदी दिसते,
Kankrala 17
तर उजव्या बाजूस वळल्यावर उध्वस्त प्रवेशव्दार दिसते.
Kankrala 18
या प्रवेशव्दाराची डाव्या बाजूची भिंत अजूनही तग धरुन उभी आहे. त्यावर कोरीवकाम केलेली दगडाची पट्टी आहे. किल्ल्याच्या उजवीकडील व डावीकडील भाग थोडा उंचावलेला असल्यानं त्यामध्ये खोलगट भाग तयार झालेला आहे.
Kankrala 19
इथं उजव्या रांगेत दोन पाण्याचे टाकी आढळतात.
Kankrala 20
त्यातील पहिल्या टाक्याच्या आत एक टाके खोदलेल आहे. काही कोरडी तर काही मातीने भरलेली.
Kankrala 21
त्यानंतर एक घराचं जोतं आणि त्याच्या वरच्या बाजूला म्हणजे उजवीकडील उंचवट्यावर वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याचे अवशेष पाहून गडाच्या पुर्व बाजूने निघत गोल फिरायचं.
Kankrala 22
उजव्या बाजूला वर गेल्यावर महादेवाची पिंड, सोबत नंदी आणि शेंदूर फासलेली हनुमान मुर्ती दिसून येते.
Kankrala 23
महादेवाची पिंड आणि नंदी सुबक आहेत. किल्ल्यावर बहुधा शंकराचे मंदिर असावे. पुर्व बाजूकडे खाली उतरून दरीच्या काठावर जाताच समोर भल्यामोठ्या पिण्याच्या पाण्याच्या ५ टाक्या खोदलेल्या दिसुन येतात पण टाक्यांतलं पाणी पिण्यायोग्य नाही.
Kankrala 24
डाव्या बाजूस गेल्यावर किल्ल्याची पडलेली तटबंदी दिसून येते.
Kankrala 25
उजवा उंचवटा तुलनेने उंच असल्याने इथून गाळणा टेकड्यांचा परिसर नयनरम्य दिसतो.
Kankrala 26
एरवी हा परिसर रुक्ष असला तरी पावसाळ्यात इथले सौंदर्य पहाण्यासारकेह असते. थेट नामपुर, जायखेडापर्यंतचा परिसर नजरेत भरतो.
Kankrala 27
या बाजुला पलीकडे कंक्राळा व शेजारची टेकडी यातील खिंड दिसली. इथूनच दुसरी वाट गडावर येते.खिंडीत काही गुरे घेउन एक गुराखी आला होता, त्याचे विशिष्ट आवाज काढून गुरांना परत बोलावणे चालु होते, जणू त्यामुळे आधी निशब्द असणारे निसर्गचित्र, बोलके झाल्यासारखे वाटले. एकुण गडमाथा बघता गडावर रहाणे सोयीचे नाही. कंक्राळा गावातही काही व्यवस्था होइल असे वाटत नाही. जर मुक्कम करुन हा परिसर पहायचा असेल तर गाळण्याला मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी कंक्राळा पहाणे सोयीचे पडेल. अगदीच मुक्कामाची वेळ आली तर कंक्राळा गावा बाहेरील हिंगलजा माता मंदिरात ३० जणांची राहाण्याची सोय होते.
Kankrala 28
गडफेरी तशीच चालू ठेवत पुन्हा खोलगट भागाकडे म्हणजे खिंडीत परतायचं. आता डावीकडील उंचवट्याच्या भोवतालची तटबंदी बघत प्रदक्षिणा मारायची. याच्या वरच्या भागात काही जोती आढळतात. या गडावरची तटबंदी, बुरूज, पाण्याच्या टाक्यांची रांग, घरांचे अवशेष, विखुरलेली जोती असा सर्व पसारा बघून इथं पुर्वी नक्कीच चांगला राबता असणार यात शंका नाही. गडाच्या दक्षिणेला मोसम नदी व उत्तरेकडून बोरी नदी वाहताना दिसते. उत्तरेला बोरी नदीच्या पलिकडे काही अंतरावर असलेला गाळणा किल्लाही दिसतो. सर्व किल्ल्याचा फेरफटका मारण्यास एक तास पुरतो. इतिहासात कंक्राळ्याची पानं फारशी सापडत नाहीत. मोगलांनी हा गड निजामशाहीकडून नोव्हेंबर १६३१ ते सप्टेंबर १३३२ मधे घेतला. शिवशाहीत हा गड मोगंलांच्या ताब्यात होता. पुढे इ.स. १८५८ साली जनरल पेनीनें आपणांवर हल्ला करण्याकरतां दबा धरून बसलेल्या माथेफिरू मुसलमानांचा येथें पराजय केला अशी नोंद आढळते तसेच १८६२ मध्यें हा किल्ला बहुतेक पडून गेल्याचा दाखला आहे.
एकुणच एखाद्या प्राचीन कथेतील राक्षसाच्या नावाशी साम्य असणार्‍या व गाळणा टेकड्यातला एक छोटा पण वैशिष्ट्यपुर्ण किल्ला बघितल्याचे समाधान घेउन मी परत निघालो.

( तळटिपः– काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) नाशिक जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) दुर्गभ्रमंती नाशिकची- अमित बोरोले
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा – सतिश अक्कलकोट
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) www.durgbharari.com हि वेबसाईट

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s