अनवट किल्ले ३१: एश्वर्यसंपन्न गाळणा ( Galana )

बहुतेकदा महाराष्ट्रातील किल्ले म्हणले कि पर्यटकांचा नाराजीचा सुर असतो, कि खुप पडझड झाली आहे, बघण्यासारखे काही शिल्लक नाही. वास्तविक या गडकोटांनी अखेरच्या सैनिकापर्यंत दिलेली झुंज हिच यांच्या लढाउपणाची पावती. पण तरीही एखादा सुस्थितीतील तटबंदी असणारा, बुलंद, भक्कम बुरुजांचे कवच बाळगणारा, फारसी, देवनागरी आणि चक्क ईंग्लिश शिलालेख असणारा, तुलनेने चढायला सोपा असणारा असा गड पहायचा असेल तर नाशिक जिल्ह्यातील गाळणा हा किल्ला तुम्हाला पाहिलाच पाहिजे. इतिहासकाळात बागलाणचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गाळणा किल्ला अनेक भव्य दरवाजे, बुलंद बुरुज, दिमाखदार तटबंदी, देखण्या चर्या, अनेक दुर्गद्वार शिल्पे, सुंदर महिरपी कमान, अनेक कातळ कोरीव गुंफा, शिलालेख, अंबरखाना, देखणे जलसंकुल अशा नानाविध दुर्गअवशेषांनी ऐश्वर्यसंपन्न बनला आहे. त्यामुळे हा गड खानदेशातील सर्वोत्तम डोंगरीदुर्ग म्हणून ओळखला जातो. इथे जाण्याची एकच अडचण आहे, मुख्य मार्गापासून थोडा आडवळणी असला तरी, तिथे जाण्यासाठी घेतलेल्या धडपडीचे नक्कीच सार्थक होते.
Galana 1
गाळणा किल्ल्यावरील गुहा आणि टाक्यांची रचना पाहाता हा किल्ला प्राचीन काळा पासून अस्तित्वात असावा परंतु याचा लिखित इतिहास १३ व्या शतकापासून सापडतो. इतिहासकारांच्या मते बागलाणचे राठोडवंशीय बागुल यांनी १३ व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली असावी. मात्र हा किल्ला नक्की कोणी बांधला हे सांगता येत नाही. या किल्ल्याचा “केळणा” असा उल्लेख मध्ययुगीन कागदपत्रात दिसतो. या गडाला गाळणा नाव पडण्याचे कारण म्हणजे पुर्वी या किल्ल्यावर गाळणेश्वर महादेवाचे मंदिर होते. पण इ.स. १५२६ मध्ये अहमदनगरच्या बुर्‍हाण निजामशहाने किल्ल्यावर आक्रमण करुन मंदिर उध्वस्त केले आणि त्याठिकाणी मशिद बांधल्याचा उल्लेख “बुरहाण मासीन” या ग्रंथात येतो. बहामनी व निजामशाही यांनादेखील बागलाणवर वर्चस्व मिळविणे जमले नाही. पंधराव्या शतकाच्या शेवटी या किल्ल्यास महत्व प्राप्त होउ लागले. बहामनी राज्याची शकले उडाल्यावर मात्र गाळण्याचा हिंदु राजा निजामशाहीचा अंकित झाला. सन १४८७ मध्ये दौलताबादच्या मलिक वूजी आणि मलिक अश्रफ या बंधुनी गाळणा किल्ला मराठ्यांकडून जिंकला. बहामनी दरबारातील अंधाधूंदीचा फायदा घेउन गाळणा एका मराठा सरदाराने जिंकला, मात्र मलिक अश्रफने तो परत ताब्यात घेतला आणि दस्तुरखान नावाचा एक किल्लेदार तिथे नेमला, इतकेच नव्हे तर गाळणा परिसरात लुटालुट करण्यासाठी ज्या स्वार्‍या होत, त्याही बंद पाडल्या. या दोन्ही भावांचा कारभार चोख होता, अगदी दौलताबाद परिसरातील दरोडेखोरांना त्यांनी वठणीवर आणले. पुढे निजामाशी दोन हात करण्यांत मलिक वूजीचा खुन झाला. किल्ला निजामांनी स्थानिक मराठा सरदारांकडे, बहिर्जीकडे दिला व त्या बदल्यांत निजाम खंडणी घेऊ लागला. बहामनी सत्तेच्या अस्तानंतर गाळणा किल्ला निजामशाहीचा एक भाग म्हणुन ओळखला जाऊ लागला. इ.स.१५१० ते १५२६ दरम्यान गाळणा किल्ला निजामशाहाने जिंकला पण बागलाणचा राजा बहिर्जी याने इ.स.१५२६ मध्ये हा गड परत घेतला. याच दरम्यान खानदेशात फारुखी सुलतान आदिलखान गादीवर होता. १५०८-२० या दरम्यान त्याची आणि निजामशहाची लढाई जुंपली. गुजरातच्या सुलतानाने आदिलखानाच्या मदतीच मोठी फौज पाठवली. या काळात आदिलखानाने गाळण्याच्या हिंदु राजावर चाल करुन त्याच्याकडून मोठी खंडणी वसूल केली.
अहमदनगरच्या निजामशाही कालखंडात ( इ.स. १४९६ ते १६३६ ) सुमारे १४० वर्षात एकुण १२ निजामशाही सुलतान होउन गेले. बागलाणच्या राठोड (भैरवसेन पहिला ) याच्या कालखंडात गाळणा किल्ल्याचे प्रकरण उदभवले. बहामनी ‘शमसुध्दीन मुहमद ३ रा’याच्या मृत्युच्या सुमारास ( इ.स.स१४८२) बहामनी दरबारात अंदाधुंदी माजली. या अंदाधुंदीचा फायदा घेउन भैरवसेन याने गाळणा ताब्यात घेतला होता. त्याने लक्षघर या आपल्या मुलाची गाळण्याचा किल्लेदार म्हणून नेमणुक केली होती. यानंतर बराच काळ गाळणा बागुलवंशीय राठोडांच्या अधिपत्याखाली होता. पुढे इ.स. १५३० मध्ये अहमदनगरच्या बुर्हाण निजामशहाने गाळणा जिंकून घेण्यासाठी सैन्य रवाना केले. परंतु हे सैन्य गाळण्याजवळ येताच त्यांना बहिर्जीच्या शिबंदीने प्रखर प्रतिकार केला. अर्थात त्याला फार यश लाभले नाही, अखेरीस त्याने किल्ला निजामशाही फौजांना ताब्यात दिला. निजामशाही फौजांनी राठोडांनी बांधलेली मंदिरे व इमारती पाडून टाकल्या.
पुढे १५३४ पर्यंत गाळणा निजामशहाच्या ताब्यात असल्याचे दिसते. इ.स. १५४३ च्या सुमारास बुर्‍हाण निजामशहाचा मित्र, रायचुरचा राजा, ‘रामदेव’ याला मदत करण्यास निजामशहा गेलेला असताना, बागलाणचा भैरवसेन २ रा याने, गाळणा ताब्यात मिळवला. या वेळी किल्ल्याच्या प्रवेशद्वारात भैरवसेन आणि निजामशहाच्या मधे तुंबळ युध्द झाले. सुमारे वर्षभर चालेल्या या युध्दात निजामशहाचा पराभव झाला आणि त्यानंतर गाळणा आणि परिसर बागलांच्या राठोडांच्या ताब्यात होता असे गाळण्यावरील शिलालेखातून दिसून येत.
इकडे अहमदनगरला बुर्‍हाण निजामशहानंतर हुसेन निजामशहा सत्तेत आला. त्यावेळी बागलाणात भैरवसेन २ रा याचा मुलगा राजपुत्र वीरमशहा राठोड हा सत्तेत आला. नंतर हुसेन निजामशहाने मोठी मोहिम काढुन रायचुर व अंतुर जिंकून घेतले आणि आपला मोहरा गाळण्याकडे वळवला. निजामशाहाची एकंदरीत तयारी पाहून वीरमशहाने आपला वकील निजामशहाकडे पाठवला, सर्व बोलणी झाल्यानंतर गाळणा तर निजामशहाला द्यावा लागलाच पण खंडणीही द्यावी लागली. हुसेन निजामशहाने आपला विश्वासू माणुस गडावर नेमला आणि तो अहमदनगरला परतला. १५६० साली मात्र खंडणी बंद होऊन गाळणा स्वतंत्र झाला. पुढे इ.स. १५९२ च्या सुमारास गृहकलह निर्माण झाल्यानंतर निजामशहाने बागलाणचा राजा नारायणशहाकडे मदत मागितली.
नंतर बुर्‍हाण निजामशहा, राजा अलिखान फारुखी आणि अहमदनगरचे सैन्य यांच्यात युध्द झाले. त्यात ईस्माईल शहाचा पराभव होउन, बुर्‍हाण निजामशहा पुन्हा सत्तेत आला. या धामधुमीत नारायणशहाने गाळणा आणि त्याच्या परिसरातील गावे लुटून गड जिंकून घेतला. अशा प्रकारे गाळण्याचा किल्ला आलटून पालटून कधी निजामशहाकडे तर बागलाणच्या राठोडांकडे असा हस्तातंरीत होत होता.
ई.स. १६०० च्या सुमारास निजामशहाची राजधानी अहमदनगर जिंकल्यानंतर निजामशाहीचे दोन बलाढय सरदार मिया राजु दक्कनी आणि मलिक अंबर ह्यांच्यात निजामशाहीची वाटणी होउन जुन्नर नजीकचा प्रदेश मलिक अंबरकडे आणि नाशिक परिसर मिया राजु दक्कनीकडे आला. अर्थातच गाळणा किल्लाही त्याच्या ताब्यात आला. मात्र मलिक अंबरने मोगलांशी हातमिळवणी करुन १३०३-०४ च्या सुमारास मोगल सुभेदार मिर्झा हुसेन अलिबेग याच्या मदतीने परांडा आणि नंतर लगेचच दौलताबाद परिसर जिंकून घेतला. नाशिक प्रांतावर मलिक अंबरचा अंमल सुरु झाला आणि गाळणा किल्ला त्याच्या अधिपत्याखाली आला. १६२३ मध्ये मलिक अंबरच्या मृत्युपर्यंत गाळणा त्याच्याच ताब्यात होता.
पुढे १६३१ मधे निजामशहाचा फत्तेखानाने खुन केल्यानंतर अंधाधुंदी माजली, यावेळी गाळण्याचा किल्लेदार महमुदखान होता. याच वेळेस दोन मोगल सेनापती वर्‍हाड आणि नाशिक भागात पाठवण्यात आले. पैकी वजीरखानाने शत्रु फौजांना वर्‍हाडा बाहेर घालवले आणि तो बुर्‍हाणपुराला गेला. त्याने बादशहाच्या आदेशावरुन आपल्या दुय्यम अधिकार्‍याला गाळणा आणि पातोरा या महालात लुटालुट करण्यासाठी पाठवले. या आक्रमणाला थांबविण्यासाठी दुसरा मुर्तजा निजामशहा याने महालदारखान व दादा पंडीत यांची रवानगी केली. परंतु मोगलांनी त्यांचा पराभव करुन संगमनेरपर्यंत पाठलाग केला. याच वेळी शहाजीरजे मोगलांचे सुभेदार होते. त्यांनी मोगलांच्या वतीने बोलणी करण्यासाठी गाळण्याला वकील पाठवला. गाळण्याचा किल्लेदार महमुदखान किल्ला ताब्यात देण्याच्या विचारात होता, पण याच वेळी खानदेशचा मोगली सुभेदार खानजमान याने लळींगच्या किल्लेदाराला मीर कासीमला पाठवून महमुदखानाला पुन्हा आपल्या बाजुला वळवून घेतले आणि महमुदखानाने शहाजी राजांच्या वकीलाला हाकलून दिले. यावर खुष होउन खानजमानने शहाजहानकडे महमुदखानाची शिफारस केली आणि त्याप्रमाणे चार हजार घोडदळ आणि चार हजार स्वारावर महमुदखानाची नेमणूक झाली. लगेचच गाळणा किल्ल्यावर जाफर बेग याची किल्लेदार म्हणून नेमणुक झाली.
पुढे १६३३ मधे शहाजी राजांनी दौलताबाद किल्ल्याला पडलेला वेढा उठविण्याचे खुप प्रयत्न केला. त्याची हकीगत बादशहानाम्यात अशी येते. गाळणा किल्ल्याशेजारी नबाती ( हा बहुधा कंक्राळा असावा ) नावाचा किल्ला आहे. तेथील किल्लेदार महालदारखान गाळण्याला आला व तेथून मोगल सरदार महाबतखानाला निरोप दिला कि ‘तुमच्या आज्ञेप्रमाणे कामगिरी बजावेन’. तेव्हा महाबतखानाने त्याला वैजापुरला जाउन शहाजी राजे व रणदुल्लाखान यांच्या तळावर हल्ला केला. या लुटालुटीत शहाजी राजांची बायको व मुलगी, ज्या नुकत्याच जुन्नरहून आल्या होत्या, त्या महालदारखानाच्या हाती सापडल्या. शहाजी राजांचे दिड लाख होन व चारशे घोडे आणि रणदुल्लाखानाचे बारा हजार होन लुटले गेले. महालदारखानाचे शहाजी राजांची बायको व मुलगीला १६३३ मधे गाळण्यावर कैदेत ठेवले. शहाजी राजांची बायको हि बहुधा मोहिते घराण्यातील तुकाबाई असावी. त्यांची सुटका मोगल सैन्यातील अमीरराव मोहिते यांच्या प्रयत्नाने झालेली दिसते. यावेळी गाळण्याचा किल्लेदार जाफरबेग होता.
पुढे इ.स. १६७६ मधे लष्करी बेग हा गाळण्याचा किल्लेदार होता. औरंगजेबाची परवानगी न घेताच तो थाळनेरच्या किल्लेदाराल भेटायला गेला आणि असा परवानगी न घेताच गड सोडणे हा गुन्हा असल्याने बादशहाने त्याची मनसब २० स्वारांनी कमी केली. लष्करी बेगनंतर महमद वारीस याची गाळण्याचा किल्लेदार म्हणुन नेमणुक झाली. पुढे त्याची बदली होउन अब्दुल कासीम याची नेमणुक झाली. पण किल्ला ताब्यात देण्यास मंहमद वारीसने नकार दिला म्हणून औरंगजेबाने त्याची मनसब १०० जात आणि ५० स्वाराने कमी केली. गाळण्याचे गालिचे प्रसिध्द असावेत असे वाटते, कारण लष्करी बेग याने काही गालिचे औरंगजेबाला भेट म्हणून पाठविल्याची नोंद मिळते.
सन १६७९ मध्यें शिवाजीराजांनी हा किल्ला घेतला असे मानले जाते, पण समकालीन कोणतीच साधने याला दुजोरा देत नाहीत. १७०४ मध्ये स्वत: औरंगझेबाने गाळण्याला वेढा घातला तरी हा किल्ला जिंकण्यास त्याला वर्ष लागले. पुढे इ.स. १७०३ मधे अब्दुम कासीम मरण पावला तेव्हा गडाची किल्लेदारी दिलेर हिंमतला देण्यात आली.
इ.स.१७५२ मध्ये मल्हारराव होळकर व मराठी सैन्याने भालकीच्या युद्धात निजामाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला होळकर साम्राज्याच्या अंतर्गत आला. गाळण्याची जहागिरीची वाटणी थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत झाली. त्यानुसार मुलुखाची वाटणी मल्हारराव पवार व विठ्ठलराव पवार या भावामधे झाली. डिसेंबर १८०४ साली हा किल्ला इंग्रज कर्नल वॅलस याने होळकरांकडुन थोड्या प्रतिकारानंतर जिंकुन घेतला. त्यानंतर किल्ले गाळणा इंग्रजांच्या ताब्यात गेला. १८१८ नंतर काही वर्षे ह्या गांवी मामलेदार कचेरी होती. इंग्रजांनी खानदेश घेतल्यावर कांही दिवस गाळणा हें खानदेशांतील एक उत्तम हवेंचे ठिकाण म्हणून उपयोगांत येत होतें. हिंदू राजवट, निजामशहा, बागलाण राजवट, शिवाजीराजे, औरंगझेब, इंग्रज असे कित्येक शासक या दुर्गाने अनुभवले आहेत.
अश्या या ईतिहासाचा फार मोठा कालखंड पाहिलेल्या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत.
१) मालेगाव वरुन मालेगाव-धुळे व्हाया कुसुंबा या बसने डोंगराळे येथे उतरावे, तेथून साधारण पायी पाच कि.मी. चालून पायथ्याचे गाळणा गाव गाठता येते. या मार्गावर खाजगी जीपही धावतात. मालेगाव-गाळणा साधारण ३२ कि.मी. अंतर आहे.
२ ) धुळ्यावरून कुसुंबा मार्गे मालेगाव अशा बस आहेत. आता तर थेट धुळे-गाळणा अशी बसही आहे. गाळणा किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या नाथपंथियांचा आश्रमात गुरुवारी विशेष गर्दी असते. त्या दिवशी गेल्यास वाहनाची सोय झाल्याने थेट गाळणा गावात पोहचता येईल.
Galana 2
( गाळणा किल्ल्याचा नकाशा )
अर्थात स्वताची गाडी असल्यास उत्तम. या परिसरातील गाळणा, कंक्राळा, डेरमाळ, पिसोळ, मालेगावचा भुईकोट, लळींग असे बरेच किल्ले दोन-तीन दिवसाची सवड काढून पहाता येतील.
Galana 3
डोंगराळे गावातून गाळण्याकडे निघाले कि समोरच गाळणा आणि त्याच्या शेजारी त्याचा उपदुर्ग दिसतो.
Galana 4
गाळणा गावात पोहचले कि उध्वस्त तटबंदी आपले स्वागत करते. याचा अर्थ पुर्वी गाळणा गावसुध्दा गडाच्या परकोटात असणार.
Galana 5
एका झाडाखाली मला हे दोन मोठे तोफगोळे दिसले पण हे डागण्यासाठी आवश्यक असणारी एकही तोफ गडावर दिसत नाही. पुर्वी या गडावर अनेक तोफा असल्याचे उल्लेख नाशिक गॅझेटिअरमधे आहेत, पण आता मात्र गडावर एकही तोफ नाही.
Galana 6
गाळणा गावाजवळ जस जसे आपण पोहोचतो तसतशी किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि किल्ल्यावरील वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रम आहे. या आश्रमापर्यंत गाडीने जाता येते. हे नाथपंथीय गोरखनाथ शिवपंचायतन मंदिर आहे. इथे आपली जेवणाची व रहाण्याची व्यवस्था होऊ शकते.
Galana 7
आश्रमाच्या बाजूने पायर्‍यांचा मार्ग किल्ल्यावर जातो.
Galana 8
गाळणा किल्ल्याची उंची समुद्र्सपाटीपासून जरी २३१६ फूट असली तरी पायथ्यापासून अंदाजे फक्त ६०० फुट असल्याने अर्धा-पाउण तासात किल्ला चढून होतो. त्यामुळे अगदी आबालवृध्द या गडावर जाउ शकतात. याच्या थोटल्या उंचीमुळे गावातून किल्ल्यावरच्या वास्तु स्पष्ट दिसतात.
Galana 9
आश्रम पाहून मी रुळलेल्या रस्त्याने गडाकडे निघालो.
Galana 10
वाटेत काही वास्तुंचे उध्वस्त अवशेष दिसले, बहुधा परकोट असावा.
Galana 11
पूरातत्व खात्याने २०१७-१८ मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे हा किल्ला परत जून्या दिमाखात उभा राहिलेला आहे.
Galana 12

Galana 13
गडाच्या पायथ्याशी गाळण्याचा ईतिहास व माहिती लावलेली आहे. तसेच येणार्‍या पर्यटकांसाठी निवासस्थान बांधायचे काम सुरु होते. गड भटक्यांना या निवासस्थानात जागा मिळाली नाही तरी गडावरच्या दर्ग्यात मुक्काम करता येईल किंवा पायथ्याच्या आश्रमात रहाण्याची सोय होउ शकेल.
अर्थात सध्या गडावर पिण्याजोगे पाणी नाही हे लक्षात घेउन किल्ला फिरताना पाण्याचा पुरेसा साठा बाळगावा.
काही पायर्‍या चढल्यावर डाव्या बाजूला कातळात कोरलेली दोन मोठी टाकी दिसतात.
महाराष्ट्रातील देवगिरी किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यास एकच मार्ग असून परकोट दरवाजा, लोखंडी दरवाजा, कोतवाल पीर दरवाजा व लाखा दरवाजा अशी अजस्त्र दरवाज्यांची मालिकाच या मार्गावर उभारण्यात आली आहे.
या प्रवेशद्वारांच्या एका पाठोपाठ एक मालिकेमुळे एका दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यापर्यंत येणारा मार्ग पूर्णपणे तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात येतो. त्यामुळे हा गड त्याकाळी अभेद्य मानला जात असे.
Galana 14
या वाटेने आपण अवघ्या १० मिनीटांतच किल्ल्याच्या पहिल्या पुर्वाभिमुख परकोट दरवाज्यात पोहोचतो. हा जिबिचा दरवाजा म्हणजे चौकशी दरवाजा. दरवाजाच्या दोनही बाजुंना देवड्या अनं कोरीवकाम असुन कमानीच्या दोनही बाजूंवर माथ्याकडे कमळपुष्पे कोरली आहेत.
Galana 15
गडाकडे जातांना प्रचंड लांबीचा कातळ व त्यावर गाळणा किल्ल्याची आकर्षक आणि भव्य तटबंदी लक्ष वेधून घेते.
Galana 16
इथे मागे वळून पाहिल्यास खाली नव्याने बांधलेली पर्यटक विश्रामगृह दिसत होते.गाळण्याच्या पायर्‍या ईतक्या प्रशस्त आणि सोप्या आहेत कि त्यावरुन हत्तीसुध्दा सहज जाउ शकेल.
पुढे डाव्या बाजुला कातळात कोरलेल्या टाक्या आहेत तर थोडयाच चढाईनंतर दोन बुरुजांच्या आधाराने भरभक्कम व सुस्थितीत असणारा पश्चिमाभिमुख लोखंडी दरवाज़ा आहे.
Galana 17
लोखंडी दरवाज्याला लोखंडाच्या पत्र्याचे आच्छादन होते म्हणून तो लोखंडी दरवाजा.
Galana 18

Galana 19
दरवाजा पाहूनच आपल्याला त्याच्या मजबूतीची कल्पना येते. दरवाजातून मागे पाहता लांबच्या लांब पसरलेली तटबंदी दिसते.
Galana 20

Galana 21
दरवाजावरील पर्शियन भाषेतला शिलालेख,एैसपैस देवड्या, वरच्या भागातील महिरीपी व दरवाजाची बांधणी हे सर्व आवर्जुन पहाण्यासारखे आहे. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूने कमानीवर जाण्यासाठी जीना आहे.
या शिलालेखाचे वाचन असे आहे, “अफलातुनखानाने या गाळणा किल्ल्याची तटबंदी बांधली, यात त्याने दगडी बुरुज बांधले ते असे कि बाहेरच्या जगाला ते दिसु शकणार नाहीत, तो ( किल्ला ) आकाशातील गोलापेक्षा मोठा आहे, म्हणूनच त्यापेक्षा पुरातन आहे, हिजरी वर्ष ९७४ ( इ.स. १५६६-६७ ) यासाली काम सुरु झाले, हे रचनाकार आणि लिहीणारा ‘हुशी शिराजी'”. अर्थात अफलातुनखान आणि हुशी शिराजी कोण ? याचा पत्ता लागत नाही.
Galana 22
हे सर्व जीर्ण झालेले बांधकाम पुरातत्वखात्याने दुर्गसंवर्धनांतर्गत नव्याने बांधले आहे.
Galana 23
खालच्या बाजुला आश्रम आणि गाळणा गावाचा परिसर स्पष्ट दिसत होता.
Galana 24
या दरवाजातून थोडे पूढे गेल्यावर दोन वाटा फुटतात,
Galana 25
यातील पायर्‍यांची वाट तिसर्‍या दरवाजाकडे जाते, तर डाव्या बाजूची वाट दिंडी दरवाजाकडे जाते.
Galana 26
या वाटेवर उजव्या बाजूला तटबंदीत एक शरभ शिल्प बसवलेले आहे. खरतर याठिकाणी हे शिल्प असण्याची कोणतीही शक्यता नाही. किल्ल्याची दुरुस्ती करतांना शरभ शिल्प याठिकाणी लावले गेले असावे. शिल्प पाहून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक बुरुज आहे.
Galana 27
बुरुजाच्या भिंतीवर एक मोठा फ़ारसी शिलालेख आहे.
या शिलालेखाचा अर्थ, ” या अल्लाह , मुराद बुरुज संरक्षणासाठी व प्रतिष्ठेसाठी बांधण्यात आला , जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला विजयाचा व समृध्दीचा आशिर्वाद द्या, गाळणा किल्ल्यावर मुराद नावाचा राजवाडा देखील बांधावा, लोक या मंगलदायक राजवाड्यातून मदत देखील घेउ शकतात, आधी जो बुरुज बांधला तो मजबुत नव्हता, म्हणून तो बुरुज पुन्हा दगडाने बांधून मजबुत केला, किल्ल्यावर बांधलेला राजवाडा खुप प्रसिध्द झाला, तो फक्त विजयी राजासाठी पुर्ण केला, म्हणून हा सुंदर बुरुज बांधला, तो असाच प्रसिध्द राहिल, हा हबितखान याने बांधला, सय्यद माना हुसेन याचा मुलगा सैय्यद ईस्माईल याने हा लेख लिहीला, रबी महिन्याच्या पहिल्या तारखेला, आ.: ९८७ ( इ.स. १५८९)
ह्या शिलालेखाच्या मजकुरापेक्षा दगड बराच मोठा आहे, याचा अर्थ कदाचित आणखी ओळी लिहायच्या असणार. या शिलालेखात उल्लेख असणारा हबितखान हा अफलतूनखान नंतर गाळण्याचा किल्लेदार झालेला असणार. मात्र शिलालेखात उल्लेख असणारा सय्यद ईस्माईल कोण याचा पत्ता लागत नाही. गाळण्यावरच्या आणखी दोन शिलालेखात याचा उल्लेख आहे.
Galana 28
इथेच एक तटात लपविलेला शौचकुप दिसतात.
Galana 29
पुढे गेल्यावर छोटा दिंडी दरवाजा आहे. येथून एक वाट खाली गावात उतरते, पण ही वाट बरीच गैरसोयीची आहे. परकोटात येण्यासाठी या दरवाजाची निर्मिती करण्यात आली असावी.
Galana 30
आणखी पुढे गेल्यास एक कातळ कोरीव पाण्याचे टाके लागते. मी गेलो होतो ते दिवस जानेवारीचे होते. त्या दुपारच्या वेळी एक काळ तोंड्या लंगुर पाणी पिण्यासाठी आला होता. त्याला माझा व्यत्यय आवडला नाही. “हुप्प” अशी निषेधाची गर्जना करत तो तटबंदीवर उड्या मारत दिसेनासा झाला.
Galana 31
दिंडी दरवाजा पाहून आल्या वाटेने परत पायर्‍यांपाशी यावे. मागे येऊन पुन्हा २५ पाय-या चढून चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या तिसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो.याला ” कोतवाल पीर ” या नावाने ओळखतात. तिसर्‍या दरवाज्यातून आत शिरल्यावर पुढची वाट काटकोनात वळते. या ठिकाणी एका बाजूला कातळभिंत तर दुसर्‍या बाजुला किल्ल्याची तटबंदी यामधील चिंचोळ्या भागातून आपण पुढे जातो.
Galana 32
नंतर २० पाय-या चढून गेल्यानंतर काही अंतरावरचा चौथा लाखा दरवाज़ा आहे. या दरवाज्याच्या उजव्या हाताला असणाऱ्या तटातील महिरपी कमान आपल्याला राजस्थानातील किल्ल्यांची आठवण करून देते. हा नक्षीदार दरवाजा आज पुर्णपणे ढासळत्या अवस्थेत आहे. कमानीच्या माथ्यावर दोन सुंदर दगडी कमळे कोरलेली असून पहारेकऱ्यांच्या देवडय़ा मात्र ढासळलेल्या आहेत.
Galana 33
या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर तीन वाटा लागतात. समोर जाणारी पायर्‍यांची वाट ही किल्ल्याच्या माथ्यावर जाते. डावीकडे जाणारी वाट किल्ल्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या चार दरवाजापाशी जाते. आपण आधी डावीकडची वाट पकडायची.
Galana 34
याच बाजुला असणार्‍या सपाटीचा फायदा घेउन वनखत्याने पर्यटकांसाठी बसण्यासाठी सज्जा उभारला आहे. हे काम उत्तम केलेले आहे, फक्त थेट पत्र्याएवजी लाकडी छत आतून बसवल्यास उन्हाचा त्रास होणार नाही.
थोड्याच अंतरावर उजव्या बाजूला कातळात कोरलेले मोठे टाके आहे. पुढे तटबंदीवर जाणार्‍या जीन्याने फ़ांजीवर पोहोचावे.
Galana 35
फ़ांजीवरुन चालत असतांना गाळण्याची तटबंदी किती मजबूत आहे, याची कल्पना येते. पुढे गेल्यावर एक भव्य बुरुज आहे. या बुरुजावर मधोमध तोफ़ ठेवण्यासाठी आणि ती फ़िरवण्यासाठी बसवलेला लोखंडाचा मोठा रुळ (रॉड) दिसतो.
Galana 36
या ठिकाणी खालच्या बाजूला गाळणा किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यामधली खिंड आहे.
Galana 37
या खिंडीचे संरक्षण करण्यासाठी हा भव्य बुरुज आणि त्यावर सर्व दिशांना फ़िरवता येणारी तोफ़ बसवलेली होती. आज य ठिकाणी तोफ़ नाही.
समोरच्या टेकडीवरही थोडीफार तटबंदी दिसते. गैरसमजाने त्याला नबतीचा किल्ला म्हणतात, मात्र ते चुकीचे आहे, फार तर त्याला गाळण्याचा उपदुर्ग म्हणता येइल.
Galana 38
या बुरुजा वरुन किल्ल्याचा डोंगर आणि बाजूचा डोंगर यातील खिंड दिसते. हि खिंड तटबंदी आणि बुरुजाने संरक्षित केलेली आहे. बुरुजावरून किल्ल्याच्या दिशेला पाहीले असता, समोर वरच्या बाजूला कातळात कोरलेली टाकी पाहायला मिळतात.
Galana 39
टाक्यांच्या डाव्या बाजूला एक आणि वरच्या तटबंदीत एक असे दोन दरवाजे दिसतात. हे तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकाचे दरवाजे असून पहिल्या आणि दुसर्‍या क्रमांकाचे दरवाजे पाहाण्यासाठी बुरुजावरून खाली उतरुन पुढे जावे लागते. दुसरा दरवाजा उध्वस्त झालेला आहे. या दरवाजाच्या काटकोनात बाहेरच्या तटबंदीत पहिला दरवाजा आहे. या दरवाजातून खिंडीत उतरण्यासाठी वाट होती पण, आता ती मोडली आहे. गाळणा गावाच्या विरुध्द दिशेने किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी या प्रवेशव्दारांची निर्मिती करण्यात आली होती. पहिला दरवाजा पाहून पुढे गेल्यावर एक मोठे पाण्याचे टाके आहे. या टाक्याच्या दोन बाजूने तटबंदी आणि तिसर्‍या बाजूने कातळकडा आहे.
तटबंदीत एक मोठी खिडकी आहे. मोक्याच्या जागी टेहळणीसाठी ही खिडकी बनवण्यात आली आहे.
Galana 40
हे सर्व पाहून आल्या वाटेने परत चौथ्या दरवाज्यापाशी परतायचे.
Galana 41
आता उजवीकडची वाट धरायची, या ठिकाणी तटबंदीवर एक नक्षीदार कमान आहे. कमान ढासळलेली आहे.
Galana 42
दोन माणसे उभा राहु शकतील अशी ईथे जागा आहे.
Galana 44
दुर्दैवाने कमानीचे मागचे बांधकाम पडून गेले आहे, त्यामुळे ते कसे असेल याचा फक्त आपण अंदाज करायचा. ईतिहासाचा मोठा कालखंड पाहिलेल्या या गडावर अनेक स्त्रिया इथे उभे राहून सुर्योदय, सुर्यास्ताचा आनंद घेत असतील याची फक्त कल्पनाच करु शकतो.
Galana 43
पण तिचे सौंदर्य आजही कमी झालेले नाही. तटबंदी वरून थोडे पुढे गेल्यावर आपण सज्जापाशी येऊन पोहचतो.
Galana 44
हाच तो सज्जा जो खालून आपले लक्ष वेधून घेत असतो.
Galana 45

Galana 46
किल्ल्यावर येणार्‍या पुर्ण वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी हा सज्जा अतिशय उत्तम जागा आहे.
Galana 47

Galana 48

Galana 49

Galana 50

Galana 51
इथून किल्ल्याचे चारही दरवाजे आणि दूरवरचा प्रदेश व्यवस्थित दिसतो.
Galana 52
इथून पुढे गेल्यावर डावीकडच्या कातळात एकामागोमाग एक खोदलेल्या पाच गुहा आपणास दिसतात.
Galana 53
यातील काही खोलगट गुहा पाण्याने भरलेल्या तर काही कोरडय़ाच आहेत
Galana 54
यापैकी कातळ कोरून केलेले एक गुहामंदिर आहे त्या गुहेत महादेवाची पिंड आहे. या पिंडीशेजारी मारुती कोरलाय तर पिंडीमागे गणपतींची मुर्ती आहे.या शिवलिंगाला गाळणेश्वर महादेव म्हणतात. बहुधा हिच शिवपिंड किल्ल्याचा माथ्यावर असणार्‍या मंदिरात असणार. आज मात्र एका गुहेत चोरुन रहाण्याची वेळ आली आहे.
Galana 55
गुहेच्या वरच्या बाजूला कातळावर कळसा सारखे कोरीवकाम केलेले आहे
Galana 56
या गुहां समोरील तटबंदीत एक फ़ारसी शिलालेख आणि त्याच्या बाजूला दोन शरभ शिल्प आहेत.
Galana 57
या शिलालेखाचा अर्थ असा आहे, “तो आहे, गाळणा किल्ल्यावरील भरभक्कम बुरुजाचा पाया फौलादखान काझी याने घातला आहे, शहा-ई-मर्दान ( अली) याच्या मर्जीने हा पुर्ण केला, कदाचित कायमस्वरुपी आणि वापरण्यास योग्य, हा लिहीणारा गरीब व्यक्ती ‘झहीर मुंहमद’ इहिदे तिसैन तिसमय्या ( रबी आ- ९९१ = मार्च १५८३ )
या शिलालेखात रबी शुहूर आणि शक असा घोळ घातला आहे. कालगणनेनुसार शुहुर सन ९९१ आणि शक १५०५ एकत्र येउ शकत नाहीत, पण हिजरी ९९१ आणि शक १५१२ बरोबर जुळते. याचा अर्थ ९९१ हे हिजरी सन असावे.
या फ़ांजीवरून पुढे चालत गेल्यावर तुटलेला बुरुज आहे. या बुरुजाच्या तळात चोर दरवाजा आहे. बुरुज ढासळल्यामुळे वरूनच चोर दरवाजा पाहावा लागतो. याठिकाणी खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दिसते.
Galana 58

Galana 59

Galana 60
या टाक्यापासून पुढे गेल्यावर एक वाट कातळातून खाली उतरत जाऊन किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाजाला येऊन मिळते. पण ही वाट मोडल्यामुळे सध्या जाता येत नाही.
या चोर दरवाजा समोर कातळात कोरलेले पण्याचे मोठे टाके आहे. हे सर्व पाहून माघारी फिरुन चौथ्या दरवाज्यापाशी यायचे आणि माथ्याकडची वाट धरायची.
Galana 61
माथ्यावर पोहचल्यावर आपण एका मशिदीसमोर येऊन पोहोचतो. या मशिदीच्या जागी १५ व्या शतकात गाळणेश्वर महादेवाचे मंदिर होते. या नावावरूनच हा गड गाळणा नावाने ओळखला जातो. पण इ.स. १५२६ मध्ये अहमदनगरचा बादशाहा बुरहान निजामशहाने या किल्ल्यावर आक्रमण करून हे मंदिर जमीनदोस्त केले व या ठिकाणी सध्याची मशीद उभी केली. हा महत्त्वपूर्ण उल्लेख ‘बुरहाने मासीन’ या ग्रंथात आपणास वाचावयास मिळतो.
Galana 62
या मशिदीच्या खांबावर कुराणातील आयते कोरलेले असून मशिदीच्या माथ्यावर सुंदर मिनार आहेत. मशीदीच्या मागच्या बाजुला एक पाण्याचे टाके होते, पण सध्या त्यातील पाणीही पिण्यायोग्य राहिलेले नाही.
त्यातले खांब व आतील कोरीव काम मात्र मंदिराची आठवण करून देते.
Galana 63
मशिदीच्या डाव्या हाताला आपणास २० फूट खोलीचा एक बांधीव हौद पाहायला मिळतो.या सुकलेल्या टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. मशिदी समोर वजू करण्यासाठी बांधलेले दोन हौद आहेत. मशिदीच्या बाजूचा जिना चढून गच्चीवर जाता येते. गच्चीवरुन कंक्राळा किल्ला, धुळ्याचा लळींग, भामेर याचे सुंदर दर्शन होते.
Galana 64
मशिदीच्या समोरच्या रस्त्याने गेल्यास एक बर्‍यापैकी अबस्थेतील वास्तु समोर दिसते. हा बहुधा अंबरखाना किंवा दारु कोठार असावे.
Galana 65
याच वाटेने पुढे गेल्यास गेल्यास गवताळ सपाटीवर आणखी एक पर्यटकांच्या विश्रांतीसाठी छत्री उभारलेली दिसते. हवे असल्यास ईथेच डबे सोडायचे.
Galana 66
हा परिसर पाहून पुन्हा मशिदीजवळ येउन मशीदीच्या मागच्या रस्त्याने गेल्यास रंग महाल हि वास्तु आहे. या महाला समोर कारंजासाठी बनवलेला नक्षीदार हौद आहे. रंगमहालाच्या भिंतीवर महिरपी असलेले कोनाडे आहेत. या रंगमहालाच्या बाजूला कातळात कोरलेले भव्य टाके आहे. या टाक्याच्या मागे कमानी बांधलेल्या आहेत.
Galana 67
यातील डाव्या बाजूच्या वाटेने पुढे गेल्यावर आपण अंबरखान्याच्या भग्न वास्तूजवळ येऊन पोहोचतो. या वास्तूपलीकडेच गडाची सदर आपणास दिसते.
Galana 68
या कुंडाला “लिंबु टाके” असेही म्हणतात. यातून बाराही महिने पाणी वहात असते व ते पिण्याला गोड आहे. याला लिंबु टाके म्हणण्याचे कारण म्हणजे या टाक्यात लिंबु टाकल्यास ज्या दिशेने ते टाकले, त्या दिशेला तो लिंबु जातो. उदा. लळींगच्या दिशेने टाकल्यास लिंबु लळींगला जाईल किंवा मालेगावच्या दिशेने टाकल्यास लिंबु मालेगावला जाईल. जेव्हा किल्ल्याला शत्रुचा वेढा पडेल तेव्हा या टाक्यात चामड्याच्या पिशवीत संदेश लिहून या टाक्यात टाकायचा, म्हणजे तो पोहचून रसद मिळेल. अर्थातच या कल्पनेत काहीही अर्थ नाही.
Galana 69
इतिहास काळात नानाप्रकारची खलबते अनुभवलेली ही सदरेची वास्तू सध्या मात्र कशीबशी उभी असून तिच्या भग्न भिंतीतील देवळ्या मात्र आजही शाबूत आहेत. याच्या पुढे आपल्याला ढासळत असलेली हमामखान्याची इमारत दिसून येते. ही वास्तू आपण डोळसपणे पहावी म्हणून तिचे वर्णन देत नाही.
Galana 70
पण येथील पाणी गरम करण्याचा चुल्हाणा,खापरी नळ,आंघोळीचे टाके,गरम वाफ बाहेर जाऊ नये यासाठी केलेली रचना सारे काही पहाण्यासारखे आहे. येथून गडाच्या डाव्या टोकावरील बुरुजावर जायचे.
Galana 71
या बुरुजाच्या भिंतीत एक पर्शियन शिलालेख व त्याच्या डाव्या-उजव्या बाजूस दोन व्यालांची शिल्पे आहेत.
Galana 72
या बुरुजाच्या माथ्यावरून खाली पाहिल्यावर गडाचा पूर्व बाजूचा तिहेरी कोट व त्याच्यामध्ये एकाखाली एक या पद्धतीने खोदलेली पाण्याची टाकी आपणास पाहायला मिळतात. या बाजूच्या तटाची उंची तब्बल ३५ ते ४० फूट आहे.
इथे पाण्याची टाकी आणी डावीकडे एक इमारत दिसते. हा महाल असावा. या ठिकाणी तीन कमानींनी तोललेली दगडी वास्तू असून तिच्या आतमध्ये बाराही महिने थंडगार पाणी वाहणारा झरा आहे.
Galana 73
या झऱ्याचे पाणी साठविण्यासाठी आतमध्ये दगडी कुंड असून या झऱ्याचे पाणी जिवंत राहण्यासाठी या वास्तूच्या माथ्यावर छप्पर बांधलेले नाही. इथे दोन हौद आहेत. लहान हौदातून मोठ्या हौदात पाणी जायची केलेली रचना वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. महालाच्या भिंतीवर पर्शियन भाषेतील शिलालेख असुन त्यावर काही करंट्यांनी नावे कोरली आहेत. मशिदी समोरुन एक वाट किल्ल्याच्या पूर्व टोकाला जाते. येथे काही वाड्यांचे अवशेष आहेत.
Galana 74
गडाच्या उत्तरेकडील एका बुरूजांवर शके १५८०चा देवनागरी शिलालेख असून त्याखाली इ.स.१५८३ चा दुसरा शिलालेख तो बुरूज बांधणारा महंमद अलीखान याच्या नांवाचा आहे. तिस-या एका बुरूजावर १५८७ चा पर्शियन शिलालेख आहे.
Galana 75
रंगमहालाच्या भिंतीवर महिरपी असलेले कोनाडे आहेत. या रंगमहालाच्या बाजूला कातळात कोरलेले भव्य टाके आहे. या टाक्याच्या मागे कमानी बांधलेल्या आहेत.
Galana 76
हे सर्व पाहून पुन्हा मशिदीपाशी यावे. मशीदी समोर एक कोठार आहे. त्यात काही कमानी आहेत.
Galana 77
त्याच्या मागे एक उध्वस्त वास्तू आहे.
Galana 78
पुढे गेल्यावर एका उध्वस्त वाड्याचा चौथरा आहे. या चौथर्‍यावर दोन कमळ शिल्प कोरलेली आहेत.
Galana 79

Galana 80
या बुरुजावरुन खालच्या बाजूला तोफ़ फ़िरवण्याचा रॉड असलेला बुरुज आणि समोरचा डोंगर दिसतो. हे पाहून पुन्हा वाड्यापाशी येऊन वाड्याला वळसा घालून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाणार्‍या पायवाटेने सर्वोच्च माथा गाठायचा. किल्याच्या मध्यभागी बालेकिल्यासारखी टेकडी असुन त्यावर ब-यापैकि झाडी आहे.
Galana 81
या माथ्यावर काही कबरी आहेत. एक दोन वाड्यांचे अवशेष सुध्दा आहेत. येथून किल्ल्याचा पूर्ण घेरा नजरेस पडतो.
Galana 82

Galana 83
या माथ्यावर काही कबरी आहेत. येथील थडग्यांवरील बारीक नक्षीकामाची कलाकुसर पाहता ही थडगी राजपरिवारातील सदस्यांची असावी.
Galana 84
इथे आपल्याला एक वैशिष्ट्यपुर्ण कबर नजरेस पडते.
Galana 85
एका तरुण ईंग्रज अधिकार्‍याची कबर ईथे कशी याची एक कथा सांगितली जाते. एकदा हा तरुण ईंग्रज अधिकारी शिकारीसाठी गाळणा किल्ल्यावर आला होता, त्याला एका झाडामागे अस्वल असल्याचा भास झाला, म्हणुन त्याने गोळी झाडली, मात्र ती गोळी एका म्हातार्‍या बाईला लागून तीचा मृत्यु झाला. आपल्यावर ब्रिटीश कायद्याप्रमाणे खटला चालून शिक्षा होईल या भितीने त्याने आत्महत्या केली, त्याचीच हि कबर व त्यावरील ईंग्रजी शिलालेख आपण पाहु शकतो.
Galana 86
हे निजामशाहीचे अस्तित्व दाखविणारे चिन्ह आपण पाहू शकतो. याचा अर्थ हि कबर निजामशाहीकालीन अहे. या खेरीज माथ्यावर फिरल्यास अनेक कबरी पहाण्यास मिळतात.
किल्याची फेरी पुर्ण करतांना अनेक उध्वस्त बांधकामाच्या खुणा व भक्कम स्थितीतली तटबंदी नजरेस पडते.
Galana 87
या भटकंतीत आपल्याला तटबंदीत बांधलेले अनेक बुरुज, पहारेकर्‍यांना रहाण्यासाठी केलेली व्यवस्था, पाण्याची टाकी व चोरदरवाजे दिसतात.
Galana 88
गडाच्या दक्षिणेला पांजरा नदी खोरे आहे तर उत्तरेला दूरवर तापी खोरे व पलीकडे सातपुडा पर्वतरांगा दिसतात.
Galana 89
पुर्वेला खानदेश मुलूख व लळिंग किल्याचं टोक दिसतं तर पश्चिमेला सातमाळा रांगेतला धोडप, कंकराळा व इतर शिलेदार नजरेस पडतात. तसेच वायव्येला डेरमाळ, पिसोळ दिसतात. येथून किल्ल्याचा पूर्ण घेरा नजरेस पडतो. गाळणा किल्ल्याची भटकंती करायला ४ तास पुरे पण गड नीट पहायचा तर एक संपुर्ण दिवस हवा.
नुकताच गाळणा किल्ल्याचे ३डी मॅपिंग करण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतलाय. जतन व संवर्धनासाठी समस्त गड किल्ल्यांचे थ्री डी मॅपिंग करण्याचा निर्णय घेऊन सरकारने हा विषय अग्रक्रमात घेतला ही समाधानाची बाब आहे. आजपर्यंत गड-किल्ल्यांचे ढासळणे मूकपणे पाहण्याव्यतिरिक्त गडप्रेमीही काही करू शकत नव्हते. पुरातत्वच्या ताब्यात काही किल्ले असले तरी त्याच्या संवर्धनासाठी त्यांच्याकडेही निधीची चणचण असे. आता या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने किमान तेथील स्थिती कळू शकेल. त्याबरहुकूम कामही करता येईल. पण, केवळ मॅपिंग करून थांबले असे सरकारी काम होता कामा नये.
थ्री डी मॅपिंगमुळे किल्ल्याचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. ठराविक ठिकाणचा एखादा दगड निसटला तरी तो या माध्यमातून समजणार आहे. तसेच शैक्षणिक कामासाठी सुद्धा याचा चांगल्या प्रकारे वापर होणार आहे.
एकंदरीतच पायथ्याचा नाथपंथीय आश्रम, उत्तम बांधणीचे दरवाजे, देवनाग्री, फारसी आणि चक्क ईंग्लिश शिलालेख , जबरदस्त दरवाजे,तटबंदी आणि नक्षीदार सज्जे यांनी एश्वर्यसंपन्न असा गाळणा किल्ला महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटकाने पाहिलाच पाहिजे. चला तर मग, कधी निघताय गाळण्याला ?

( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) नाशिक जिल्हा गॅझेटिअर
२ ) दुर्गभ्रमंती नाशिकची:- अमित बोरोले
३ ) उपेक्षित दुर्गांचा ईतिहासः- प्रा. डॉ. जी.बी. शहा
४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५ ) आव्हान- आनंद पाळंदे
६ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
८ ) www.durgbharari.com हि वेबसाईट

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s