अनवट किल्ले ३४ : बिष्टा ( Bishta )

अनवट किल्ले मालिकेत मी आज सटाणा परिसरातील दुर्ग चौकडीविषयी लिहीणार आहे, अजमेरा, दुंधा, कर्‍हा आणि बिष्टा. तुम्ही म्हणाल, ‘आम्ही यांची नावेही कधी एकली नाहीत’. अगदी खरे आहे, महाराष्ट्रातील काही मोजके दुर्गभटके सोडले तर फार कोणी हे किल्ले पहाणे सोडा, एकले तरी असतील कि नाही याचीच शंका. अर्थात यावर असलेल्या मंदिरांमुळे आणि यात्रांमुळे परिसरातील गावकर्‍यांचा यावर अपवादात्मक वावर असतो, तो सोडला तर इथे फारसे कोणी फिरकतही नाही. अर्थात या उपेक्षित किल्ल्यांचे अंतरंग समजावेत म्हणूनच या मालिकेच्या लेखनाची यातायात. या चौकडीपैकी आज बिष्टा ची माहिती घेउ आणि पुढच्या भागात कर्‍हा, अजमेरा आणि दुंधा यांची सफर करुया.
नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग म्हणजे कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा हा परिसर म्हणजेच बागलाण. मुळच्या बागलाण या एकाच तालुक्याचे सटाणा व कळवण असे दोन तालुके झाले. या परिसरात सेलबारी, डोलबारी, हिंदळबारी, गाळणा, चणकापुर आणि दुंधेश्वर अशा डोंगररांगा आहेत. पैकी दुंधेश्वर डोंगररांगेत हे चार किल्ले आहेत. या किल्ल्यांचा उल्लेख अगदी जिल्हा गॅझेटियरमधेही मिळत नाही. नक्की ईतिहास माहिती नसला तरी या गडावर असलेल्या कातळकोरीव पायर्‍या आणि टाकी पहाता हे गड निश्वीतच प्राचीन असावेत. बागलाण परिसरावर ई.स. ७५ साली गौतमीपुत्र सातकर्णी याचे राज्य होते. पुढे ई.स. ४१६ मधे गवळी राजांनी चौल्हेरला राजधानी केले. इ.स. ७८५ ते ८१० या काळात राष्ट्रकुटांचे राज्य होते. इ.स. ८३० ते १०३६ या काळात कृष्णराज या कलचुरी चालुक्यांचे राज्य होते. पुढे १०८९ मधे सौराष्ट्रातील यादवपुत्र दृढप्रहार याने या प्रदेशाचा ताबा मिळवला. पुढे इ.स. १३०८ मधे कनोज येथील राठोड ( बागुल) यांची सत्ता आली. इ.स. १३०० ते १७०० या कालखंडात ५४ बागुल राजे होउन गेले. यापैकी मालुगी याने हुमायुनचा पराभव केला होता. याच राजावरुन या प्रदेशाला “बागलाण” म्हणतात. पुढे हा परिसर मोगल राजवटीच्या अंमलात आला. शिवाजी महाराजांनी जरी साल्हेर, मुल्हेरसारखे बलदंड गड ताब्यात घेतले असले तरी हे चार गड घेतले कि नाही याची नोंद नाही. बहुधा हे गड मोंगलांकडेच राहिले असावेत.
पुढे हे गड ईतिहासाच्या पानात हरवून गेले. ते कोठे आहेत याची कल्पनाही नव्हती. अखेरीस १९८५ साली इतिहास अभ्यासक श्री. गिरीश टकले यांनी वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण संस्थेच्या माध्यमातून प्रकाशात आणले, तर रांजणगड व दुंधा हे किल्ले गिर्यारोहकांच्या यादीत सामाविष्ट करण्याचे काम प्रसिद्ध गिर्यारोहक आनंद पाळंदे यांनी केले.
या गडांचा उल्लेख मला श्री. आनंद पाळंदे यांच्या ‘डोंगरयात्रा’ पुस्तकात सापडला आणि पुढे श्री. अमित बोरोले यांनी लिहीलेल्या “दुर्गभ्रमंती नाशिकची” या पुस्तकात आणखी माहिती होती. या परिसरातील बाकीचे गड-किल्ले पालथे घालून झाले तरी हि चौकडी पहाण्याची उत्सुकता होती. अखेरीस एके दिवशी ट्रेकक्षितीझ या संस्थेच्या वेबसाईटवर यांचा ट्रेक आयोजित केल्याची पोस्ट आली. ताबडतोब पैसे भरुन नाव नोंदणी करुन टाकली. डोंबिवलीस्थित या संस्थेने शिवकार्याला वाहून घेतलेले आहे. अल्प फि, मर्यादित सीट हे यांच्या ट्रेकचे वैशिष्ट्यच. ट्रेकलिडर म्हणून खुद्द अमित बोरोले येणार होता.
Bishta 1
( बिष्टा गडाचा नकाशा )

रात्री नाशिकच्या द्वारका चौकात डासांचे चावे सहन करत, पोलिसांच्या गंमतीजंमती पहात, चहाचे घुटके घेत आणि मित्रांबरोबर शिळोप्याच्या गप्पा मारत कसाबसा वेळ काढला आणि अखेरीस गाडी आली. त्यात मस्तपैकी ताणून दिली, ती थेट कोटबेल हे गाव येईपर्यंत.
Bishta 2
( बिष्टा परिसराचा नकाशा )
या गडावर जायचे तर दोन पर्याय आहेत.
१ ) सटाणा-नामपुर रस्त्यावरुन खिरमाणी नावाचे गाव आहे. या गावाजवळून कोटबेल या गावाला जाण्यासाठी फाटा आहे. एकतर या खिरमाणीला उतरुन कोटबेलपर्यंत सहा आसनी रिक्षाने जायचे किंवा थेट कोटबेलसाठी सटाण्यावरुन बससेवा आहे. सटाणाहून दिवसातून ५ एसटी बसेस कोडबेलला जातात. सकाळी ७.३० सटाणा-भिलपुरी, सटाणा-चिंचवा दुपारी ११.३०, संध्याकाळी ५.०० वाजता सटाणा-चिंचवा. साक्री-सटाणा सकाळी ७. ०० वाजता गावात येते. तसेच गावातून ६ आसनी रिक्षा नामापूरला जातात . अर्थात स्वताची गाडी असेल तर हि यातायाय वाचते. अर्थात कोटबेल गावापासून बिष्टा जवळपास तीन-साडेतीन कि.मी. वर आहे. म्हणजे तासा-दीड तासाच्या चालीनंतर आपण गडमाथ्यावर पोहचू शकतो.
२) दुसरा मार्ग त्यामानाने सोयीचा नाही. सटाणा-ताहराबाद-पिंपळनेरकडे जाणार्‍या एस.टी.ने ढोलबारीच्या पुढे करंजाडला उतरायचे. तिथून दक्षिणेची वाट पकडून पारनेरमार्गे बिजोटे या गावात जायचे. करंजाड ते बिजोटे हे अंतर साधारण दिड तासाचे आहे. बिष्ट्याचा अगदी पायथ्याशी पवारवस्ती नावाची घरे आहेत. तिथेपर्यंत बिजोटे गावातून रस्ता आहे. पवार वस्तीच्या पश्चिमेला एक बारी म्हणजेच डोंगरवाट आहे, ती थेट बिष्टा किल्ल्यावर जाते. मात्र या वाटेवर बाभुळ मोठ्या प्रमाणात फोफावल्याने या वाटेने न जाणेच चांगले.
Bishta 3
अंधारात चाचपडतच आम्ही कोटबेल गावात उतरलो. थोड्यावेळात फटफटले आणि गावाच्या पश्चिमेला असलेला बिष्टा नजरेत भरला. चंद्र आपली ड्युटी संपवून बिष्ट्याच्या मागे मावळायच्या तयारीत होता. गावामधे इतक्या पहाटे उघडलेल्या श्री. अविनाश खैरनार यांच्या किराणा दुकानात सर्वांनी चहा घेतला आणि जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीत नरडी शेकल्याने थोडा दिलासा मिळाला. रस्ता नक्की सापडणे अवघड असल्याने गावातील श्री. पोपट अहिरे हे गाईड म्हणून आले. अर्थात त्यांच्या कडे मोबाईल नसल्याने श्री. अविनाश खैरनार ( 9767573191 ) यांना संपर्क करुन गाईड ठरवता येईल. एकूणच परिसरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता बिष्टा किंवा या परिसरातील ईतर गडावर ऑगस्ट ते फेब्रुवारी या काळात भटकंती करणे योग्य होइल.
जसे सुर्यराव वर चढले तसे आजुबाजुचा नजारा दिसू लागला. गाव डोंगरांच्या गाभ्यात वसलेले आहे.
Bishta 4
गावाच्या उत्तरेला “फोफिरा” नावाचा डोंगर आहे. त्याच्या उंचीमुळे आणि टोपी घातल्यासारख्या आकारामुळे तो बिष्टा आणि कर्‍हा किल्ल्यावरुन स्पष्ट दिसतो. या डोंगरावर जाता येते. त्यावर फोफेश्वराचे मंदिर आहे. वर जाण्यासाठी काही ठिकाणी कोरीव पायर्‍या आहेत. हा देखील किल्ला आहे का, असा मला प्रश्न पडला.
Bishta 5
पहिलाच दिवस आणि पहिलाच किल्ला असल्याने ओळख परेड झाली. आणि अहिरे यांच्या मागून निघालो. गावाची वेस ओलांडली आणि सभोवार नाशिक जिल्ह्याची ओळख कांद्याची शेती दिसू लागली.
Bishta 6
कांद्याच्या शेताच्या पाश्वर्भुमीवर बिष्टा मोठा देखणा दिसत होता. याशिवाय उस, साग, डाळींब याचीही लागवड केलेली होती. कोटबेल गावातील बस स्थानकाच्या चौकातून बिष्टा किल्ल्याकडे जाताना चौकातच डावीकडे ४ वीरगळी आणि १ वीर-सतीगळ आहे.
Bishta 7
रस्ता म्हणजे अर्थातच बांधावरुन जाणारी पाउलवाट होती. या रस्त्यावर डाव्या बाजूला सागाचे वन आणि बंगला आहे. येथून आडवे चालत गेल्यावर २ घरांची वस्ती आहे.
Bishta 8
येथे शेताच्या बांधावर एक वीरगळ आहे. स्थानिक लोक तीला चिरा म्हणतात. वीरगळ पाहून पुढे गेल्यावर ओढा आडवा येतो. सुकलेला ओढा ओलांडल्यावर समोर एक डोंगर येतो तो चढून गेल्यावर दोन घरांची वस्ती आहे . तेथून डाव्या बाजूला ओढ्याच्या पात्रात बांधलेले धरण दिसले. धरणाच्या भिंतीवरुन पलीकडे जाउन शेतातून पुढे चालत गेल्यावर एक घर लागते.
Bishta 9
त्या घराजवळ नदीपात्रात उतरुन ५ मिनिटे चालल्यावर बिष्टा किल्ल्या समोरचा एक डोंगर आडवा येतो. तो चढून गेल्यावर आपण बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो.
Bishta 10
सकाळच्या कोवळ्या उन्हात बिष्ट्याचा खडा पहाडही मउ दिसत होता.
Bishta 11
वाट बिष्ट्याच्या डावीकडून वर चढते आणि वळसा घालून खिंडीतून माथ्याकडे जाते. या वाटेवरून आम्ही चढत असताना एक घटना घडली, ज्याने आयुष्यभर लक्षात राहिल असा एक धडा मला मिळाला. सगळ्यात पुढे वाटाड्या, त्याच्या मागोमाग मी व अमित आणि बाकीचे थोडे मागे होते. आम्ही चढत असताना अचानक वाटाड्या थांबला आणि कानोसा घेउ लागला, आम्हाला तो का थांबला ते कळेना. आम्हाला गप्प रहाण्याचा ईशारा करुन तो एकटाच पुढे गेला. थोड्या वेळाने परत आला आणि आम्हाला चालण्याचा ईशारा केला. थांबण्याचे कारण विचारले, त्यावर त्याने सांगितले कि त्याला बिबट्याची डरकाळी एकु आली. वास्तविक त्याच्याच बरोबर आम्ही असूनसुध्दा आम्हाला कोणताही आवाज एकु आला नव्हता. शहरात राहून शहरातील गोंगाटाने आपला सिक्स्थ सेन्स कसा नाहीसा झालाय याचे हे उदाहरण. यातून मी एकच निष्कर्श काढला, कि सोलो ट्रेकिंग किती धोकादायक असु शकते.
Bishta 12
बिष्ट्याला पुर्ण वळसा घालून वाट खड्या नाळेतून वर चढू लागली. या नाळेत खुरटी झाडे आहेत.
Bishta 13
घळीतून चढतांना उजव्या बाजूला किल्ल्याच्या पाउण उंचीवर गुहा दिसतात.
Bishta 14
तेथे जाण्याचा मार्ग मात्र थोडा कठीण आहे. प्रस्तरारोहणाचे तंत्र वापरुन या गुहा पाहाता येतात. या ठिकाणी दोन मोठी पाण्याची टाक आणि गुहा आहेत.
Bishta 16
किल्ल्यावर येणार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी ही उत्तम जागा आहे. उभ्या कड्यात नेमक्या याच ठिकाणी पाणी सापडेल असा आडाखा या दुर्गस्थपतींना कसा येत असेल ? हे मला पडलेले कोडे आहे. कातळात अमुक ठिकाणी पाणी आहे, याचा अंदाज काढण्याचे कोणते तंत्र आपले पुर्वज वापरत होते, याची उत्सुकता आहे
Bishta 15
बिष्ट्याचा पहाड आणि शेजारची छोटी टेकडी यांच्यामधील खिंडीत येउन वाट उजवीकडे वळते
Bishta 17
मी या खिंडीत येउन उभा राहिले. सकाळच्या कोवळ्या उन्हात रब्बी पिकांनी पिकून पिवळी पडलेली शेते, मधे मधे असलेले द्राक्षाचे मळे आणि निलमण्याप्रमाणे दिसणारी शेततळी हे सगळे एखाद्या विणलेल्या वाकळीसारखे रंगबिरंगी दिसत होते. याच बाजुच्या नाळेतून पवारवस्तीकडून येणारी वाट चढते.
या बाजुलाच बिजोटे हे गाव आहे. बिष्टा या गडाला “बिजोटा” हे आणखी एक नाव आहे. गडावरुन गावाला कि गावावरुन गडाला नाव पडले हे कोडे मनात घेउनच मी माथ्याकडे निघालो.
Bishta 18
वाट फारशी कोरीव नाही.काहीशी ओबडधोबडच आहे. डोंगराच्या नैसर्गिक पोताचा उपयोग करुन दुर्ग उभारणी केलेली जाणवते.
Bishta 19
गडमाथ्याच्या अगदी कडेला पाण्याचे एक भलेमोठे कातळकोरीव टाके आहे. कड्यातील टाके असो किंवा हे टाके, हे पहाता गडाचे वय नक्कीच १३०० किंवा जास्ती असावे. अर्थात आज तरी ईतिहास ज्ञात नाही.
Bishta 20
गडमाथा लांबवर पसरलेला आहे. माथ्यावर माझ्याशिवाय कोणीही येण्यात रस दाखविला नाही. माथ्यावर ६ उध्वस्त वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. लांबवर कोटबेल गाव व फोफीरा डोंगर दिसत होता. एकुणच एक निरीक्षणाची चौकी ईतकाच या गडाचा उपयोग. सध्या गावकरी या गडावर उगवलेले गवत गुरांसाठी राखून ठेवतात. त्या काळातच काय तो गडावर वावर असतो. माथ्यावर कोणत्याही देवतेचे मंदिर नाही, त्यामुळे ईथे जत्रा, यात्रा होण्याचाही प्रश्न नाही. सहाजिकच गडाकडे येणारी वाट फारशी रुळलेली नाही. गड सभोवताली असलेल्या डोंगरांनी वेढलेला आहे. गडाची उंची ३३७९ फुट असल्याने बराच मोठा मुलुख नजरेच्या टप्प्यात आहे. ईशान्येला महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच असलेला साल्हेर किल्ला आहे. याशिवाय हवा स्वच्छ असेल तर साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, डेरमाळ, पिसोळ हे गड दिसू शकतात. आग्नेयेला कर्‍हा स्पष्ट दिसतो. वास्तविक शिवाजी महाराजांनी साल्हेर, मुल्हेरसारखे बलदंड किल्ले ताब्यात घेतले असताना त्यांच्याच जवळचे हे खड्यासारखे बारकुले गड कसे काय घेतले नाहीत, याचे आश्वर्य वाटले, पण शिवाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या गडांच्या यादीत निदान मी तरी या किल्ल्यांची नावे वाचली नाहीत.
Bishta 21
पुन्हा एकदा पायपीट करुन गावाकडे निघालो. कोटबेल गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यास एक ते दिड तास लागतो. किल्ला चढण्यास अर्धा ते पाऊण तास आणि किल्ला पाहाण्यास अर्धा तास लागतो. अशाप्रकारे कोडबेल गावातून किल्ला पाहून परत येण्यास अडीच ते तीन तास लागतात.
गावात जिथे आमची बस उभी होती, तिथे जवळच ह्या ग्रामदेवतेला नैवेद्य दाखविण्याचे चालु होते. आमच्यासाठी हे थोडे अनोखे दृष्य असल्याने, सगळे तिथेच गोळा होउन पहात बसलो.
Bishta 22
निघताना अचानक माझी नजर या झाडावर पडली. इथे कडूनिंबाच्या झाडातूनच पिंपळाचे झाड उगवलेले दिसले. बहुधा पक्ष्यांच्या विष्ठेतून बिया गेल्याने हा निसर्ग चमत्कार झाला असावा. एकमेका सहाय्य करु, अवघे धरु सुपंथ याचे हे उत्तम उदाहरण.

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-

१) नाशिक जिल्हा गॅझेटिअर
२ ) दुर्गभ्रमंती नाशिकची:- अमित बोरोले
३ )शोध शिवछत्रपतिच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
४ ) डोंगरयात्रा – आनंद पाळंदे
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s