अनवट किल्ले ३७ : जंजाळा उर्फ वैशागड ( Janjala / Vaishagad )

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. या पर्यटन राजधानीच्या जिल्ह्यातच जंजाळा किल्ला वसला असुन हि तो फारसा कोणाला माहिती नाही. याच गडाला वैशागड किंवा तलतमचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो. स्थानिक लोक त्याला “सोनकिल्ला” किंवा “लालकिल्ला” या नावानेही ओळखतात. हा किल्ला कधी आणि कुणी बांधला या बाबत इतिहासकारांत मतभेद आहेत. इ.स. पाचव्या शतकातील वाकाटक काळापासून शेकडो वर्षांचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे. जंजाळा गावाचे पूरातन नाव जिंजाला होते. घटोत्कच लेण्यातील शिलालेखात अश्मकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.स. ५ व्या शतकात खोदल्याची माहिती आहे. इ.स.१५५३मध्ये अहमदनगरच्या बुऱ्हाण निजामशहाने हा गड जिंकून घेतला. त्यानंतर इ.स.१६३१ मध्ये शहाजहानने हा किल्ला जिंकला. इतिहासाचा इतका पुसटसा उल्लेख सोडला तरी पुढचा ईतिहासाबध्दल आज तरी हा गड मुग्ध आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या या परिसरातील गडांविषयी थोडेफार वाचले होते, मात्र या परिसरात जाण्याचा योग येत नव्हता. एकदा सहज ट्रेकक्षितिझची वेबसाईट बघताना आगामी ट्रेकचे वेळापत्रक पाहिले आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला असलेल्या आणि इतर किल्यांच्या तीन दिवसाचा रेंज ट्रेकचा प्लॅन दिलेला होता. बर्‍याच दिवस बकेट लिस्टमधे असलेली हि संधी मी सोडणे शक्यच नव्हते. तातडीने पैसे भरुन टाकले, कारण ट्रेकक्षितिझ हि संस्था खुप सेवाभावी पध्दतीने ट्रेक आयोजित करते. एकतर ट्रेकच्या फि खुप कमी असतात आणि फक्त पंचवीस जणांची एकच बॅच नेली जाते. खुप एन्क्वायरी आल्या म्हणून अजून एक बॅच केली जात नाही. ट्रेकच्या रात्री मी आणि मुळचा सोलापुरचा आणि आता पुण्यात नोकरीला असलेला ट्रेक क्षितिझचा सदस्य जुना असलेला श्रेयस पेठे, असे दोघे निघालो. पहाटे औरंगाबादला मराठवाड्याची थंडी अनुभवत पोहचलो. बस अजून पोहचायला दोन-अडीच तास लागणार होते, सहाजिकच एक लॉजमधे विश्रांती घेउन पहाटे सहा वाजता बाहेर आलो तो मिनी बस आलीच. आदल्या दिवशी भांगसाई, देवगिरी आणि लहुगडचा अप्रतिम मुक्काम अनुभवून ( या सगळ्याविषयी लिहीणारच आहे) दुसर्‍या दिवशी सकाळी उल्हासित वातावरणात अजिंठा रोडला लागून सिल्लोड गाठले. इथून डाव्या बाजुच्या फाट्याने उंडणगाव मार्गे अंभईला पोहचलो. रस्ता अपेक्षेप्रमाणे फारसा चांगला नव्ह्ता. मात्र हा रस्ता सुपरहायवे म्हणावा असा अंभई-जंजाळा हा रस्ता निघाला.
Janjala 1
( जंजाळा आणि घटोत्कच लेण्याचा परिसर )

या परिसरात भटकंती करायची असेल तर हि तयारी ठेवायलाच हवी. जंजाळा हे गाव मुस्लिम बहुसंख्य आहे, अर्थात अतिशय गलिच्छ आणि मुक्कामाला अयोग्य. अजिंठा डोंगररांगेतून एक हातोडीच्या आकाराची सोंड बाहेर आलेली आहे, त्याच्या टोकाशी जंजाळा हा गड वसवला आहे आणि त्याच्या अलिकडे जंजाळा हे गाव वसले आहे. गाव ते गड दरम्यान माळ आहे, ज्यावर गावकर्‍यांनी बाजरीची व मक्याची शेती केली आहे.
Janjala 2
वाटेत पठारावर काही घर आहेत, जोडीला भरपूर गाई गुरांचा ,शेळ्या मेंढ्याचा वावर. अर्थात वाटेवर फारशी झाडी नसल्याने वैराण उन्हात जवळपास दोन कि.मी. ची पायपीट केल्यानंतर जंजाळ्याची तटबंदी दिसु लागली. डाव्या हाताला खोल दरी आणि त्यात झिंगापुर धरणाचा पाझर तलाव दिसत होता. पश्चिमेला लांबवर अंजिठा रांग धावत गेली होती. जंजाळ्यावर आम्ही सगळेच पहिल्यांदाच येत असल्यामुळे गावातून वाटाड्या म्हणून अकिल शेख ( मो- 7218514681 ) यांना बरोबर घेतले होते. स्थानिक लोक बरोबर असले कि बरीच बारिकसारीक माहिती तर मिळतेच, पण काही लोककथा , काही स्थानिक प्रथा, समज-गैरसमज यांची चांगली ओळख होते.
आम्ही जरी स्वतःच्या वहानाने जंजाळा गावापर्यंत आरामात गेलो असलो तरी या गडावर जायचे विविध पर्याय आहेत.
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून जंजाळा गडावर जाण्यासाठी.
औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन दोन रस्ते फूटतात. एक हळदा मार्गे वेताळवाडीगड – वेताळवाडी – सोयगाव असा जातो. तर दुसरा रस्ता १२ किमी वरील अंभई गावात जातो. अंभईहून १० किमीवर जंजाळा गाव आहे. गावाच्या मागे ३ किमीवर जंजाळा किल्ला आहे.
स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे.
अ) सोयगाव – जरंडी अंतर ९ किमी आहे. जरंडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.जरंडी गावाच्या पूर्वेला जंजाळा किल्ल्याची एक डोंगरसोंड उतरलेली आहे. त्यावरून २ तासात गडावर जाता येते.
ब) सोयगाव – वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी ते धरण अंतर २ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत. वेताळवाडी धरणच्या पश्चिमेला जंजाळा किल्ल्याची एक डोंगरसोंड उतरलेली आहे. त्यावरून २ तासात गडावर जाता येते.
वरील दोन्ही मार्गांसाठी गावातून वाटाडा घ्यावा.
Janjala 3
( जंजाळा गडाचा नकाशा )

जंजाळा गावातून पायवाटेने गडावर जाण्यास ३० मिनीटे लागतात. हा किल्ला जंजाळे गावाच्या परिसरात असल्याने गावाचे नावाने जंजाळा म्हणुन ओळखला जातो. समुद्रसपाटीपासून साधारण ३००० फुट उंच व विस्ताराने प्रचंड असलेला हा किल्ला एकशे दहा एकरवर पसरलेला असुन गडावर अवशेषांची लयलूट आहे. जंजाळा किल्ला गावाच्या दिशेने भूदुर्ग तर इतर तीन बाजूने डोंगरी किल्ला आहे.
Janjala 4
जंजाळा गावातून बैलगाडीच्या रस्त्याने अर्ध्या तासात गडाच्या दक्षिणेकडील तटबंदीपाशी पोहोचतो.
Janjala 5
गड जसा जवळ आला तशी भक्कम तटबंदी दिसु लागली.
Janjala 6
सुरवातीलाच प्रचंड मोठा दुहेरी बुरुज आहे. असाच बुरुज याच परिसरातील अंतुर किल्ल्याला आहे.
Janjala 7
तटबंदीसमोरचा दगड बांधकामाला वापरुन तेथे खंदकासारखा परिसर तयार केला आहे. अर्थात फार खोल नाही, पण एकुण जमीन उंचसखल असल्याने इकडून येणे अडचणीचे होत असणार .
Janjala 8
सध्या तटबंदी फोडून किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. वास्तविक जंजाळा किल्ल्याला एकुण तीन दरवाजे असून पूर्वेकडे वेताळवाडी धरणा जवळून येणारा वेताळवाडी दरवाजा, दक्षिणेस जंजाळे गावाच्या दिशेने असणारा जंजाळा दरवाजा तर पश्चिमेस जरंडी या पायथ्याच्या गावाकडून येणारा जरंडी दरवाजा असे तीनच दरवाजे आहेत, पण काही ठिकाणी गैरसमजाने यालाही दरवाजा मानले आहे. खरे तर बाकीच्या दरवाजाजवळ पहारेकर्‍यांसाठी अलंगा, दारुकोठार अशी व्यवस्थित बांधणी केली आहे. इथे मात्र असे काहीच दिसत नाही, कारण इथे कोणताही दरवाजा नव्ह्ता. गावकर्‍यांनी त्यांच्या वावराच्या सोयीसाठी हि तटबंदी फोडली आहे.
Janjala 9
बऱ्याच लेखात या तटबंदीबाहेर शेतात एक ८ फुटी तोफ असल्याचे वाचनात येते पण अंतुर किल्ल्यावरील तोफ चोरीस गेल्यावर पुरातत्त्व खात्याने येथील तोफ उचलुन औरंगाबादला सिध्दार्थ उद्यानात नेल्याचे वाटाड्याने सांगितले. वास्तविक ईतक्या बलाढ्य किल्ल्यात नक्कीच भरपुर तोफा असणार, पण आज गडावर एकही तोफ दिसत नाही. बहुधा परिसरातील लोकांनी या तोफा पळवून त्याचा काही उपयोग केला असावा. अर्थात आज खंत व्यक्त करण्याशिवाय आपण काहीच करु शकत नाही.
Janjala 10
इथून आपण गड प्रवेश करतो.गडाचे पठार प्रशस्त असुन सर्वत्र झाडी माजली आहे.
Janjala 11
इथून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला तटबंदीत एक कमानवजा खिडकी व दूरवर वेताळवाडी किल्ला व धरण दिसते.
Janjala 12
हि खिडकी म्हणजे बहुधा चोरदरवाजा असावी अन्यथा तिचा उद्देश ध्यानी येत नाही. गडाची तटबंदी आजही शाबूत आहे.
Janjala 13
पुढे गेल्यावर उजव्या बाजूला द्क्षिणाभिमुख दरवाजा आहे. जंजाळा गावाकडून येणारी मुळ पायवाट या दरवाज्यातून गडात शिरते, त्यामुळे याला “जंजाळा दरवाजा” म्हणतात.
Janjala 14
दरवाजा २० फूट उंच असून त्याची कमान शाबूत आहे.
Janjala 15

Janjala 16
दरवाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. देवड्यांपासून ते दरवाजाच्या बाहेरपर्यंत फरसबंदी केलेली आहे. दरवाजाच्या बाहेर काही कोरीव काम , नक्षीकाम केलेले दगड पडलेले आहेत.
Janjala 17
या शिवाय दरवाज्याशेजारी हि बहुधा दारुकोठाराची ईमारत असावी.
Janjala 18
हा दरवाजा पाहून पुन्हा मुळ पायवाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर एक बांधीव तलाव पहायला मिळतो. आज तलावाचा बंधारा अनेक ठिकाणी कोसळल्यामुळे त्यात पाणी कमी प्रमाणात साठते. अर्थात हे पाणी पिण्यायोग्य नाही. गडावर चरायला येणारी गुरे याचा उपयोग करतात.
Janjala 19
तलाव ओलांडून पुढे गेल्यावर डाव्या बाजूस उत्तरांभिमुख जरंडी दरवाजा आहे.
Janjala 20
गडाच्या पश्चिमेस असणाऱ्या जरंडी गावातून येणारी वाट या दरवाजातून गडावर येते.
Janjala 21
येथेही दोन दरवाजे असुन या दोन्ही दरवाजाच्या मध्ये देवड्या आहेत. गडाचा हा दरवाजा बाहेरील बाजुने वेगळा नसुन एका बुरुजात बांधलेला आहे.
Janjala 22

Janjala 23
या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला दोन ओळींचे दोन फारसी लिपितील शिलालेख कोरलेले आहेत.
Janjala 24
जरंडी दरवाजा पाहून डाव्या बाजुने तटबंदिवरून फेरी मारण्यास सुरवात करावी. वाटेत एका ठिकाणी उतारावर तटबंदीच्या आधारे पाणी साठविण्यासाठी बांधलेला बंधारा दिसतो. येथुन पुढे गेल्यावर आपण जरंडी गावाच्या दिशेला असलेल्या टोकावरील बुरुजावर पोहोचतो. येथुन तटबंदीच्या कडेने पुढे जाताना एका ठिकाणी गडाखाली उतरणारी चोरवाट दिसते. गडाच्या या भागात फारसी तटबंदी नसुन प्रत्येक टोकाला मात्र गोलाकार बुरुज बांधल्याचे दिसुन येतात. येथुन पुढच्या बाजुस जाताना उजव्या बाजुला एक उंचवटा असुन त्यावर एका वास्तुचे अवशेष दिसुन येतात. तटबंदीवरून फेरी मारत आपण गडाच्या पुर्व बाजुस येऊन पोहोचतो. येथे गडाची निमुळती होत जाणारी माची असुन या माचीच्या तटबंदीत एक चोरदरवाजा पहायला मिळतो व येथुन आपल्या परतीच्या प्रवासास सुरवात होते. मागे वळल्यावर समोरच एक झाडीने भरलेले टेकाड व त्यावर तीन कमानींची मस्जिद दिसते.
Janjala 25
पण तिथे न जाता डावीकडे गेल्यास आपण दाट झाडीत लपलेल्या पूर्वाभिमुख वेताळवाडीगड दरवाजापाशी पोहोचतो.
Janjala 26
हा दरवाजा १५ फूट उंच असून त्याची कमान उध्वस्त झालेली आहे.
Janjala 27
दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या असुन देवड्यांपासून ते दरवाजा बाहेरपर्यंतची वाट दगडांनी बांधुन काढलेली आहे.
Janjala 28
दरवाजाच्या बाहेरील अंगास कोरीव काम केलेले आहे.
Janjala 29
या दरवाजाच्या एकंदरीत बांधणीवरून हा गडावरील सर्वात जुना दरवाजा असावा.
Janjala 30
या भागात झाडी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने येथील अवशेष नीटपणे पहाता येत नाही. दरवाजाच्या आतील बाजुस तटबंदीला लागुनच एक ढासळलेले कोठार आहे. या दरवाजातून उतरणारी वाट वेताळवाडी धरणा जवळून वेताळवाडी गावात जाते. दरवाजाच्या बाहेरून आपण आताच पाहिलेल्या उत्तरेकडील माचीला असलेली लांबलचक तटबंदी व या तटबंदीत असणारा चोर दरवाजा दिसतो.
Janjala 31
हा दरवाजा पाहुन गडाच्या उंचवट्याच्या दिशेने निघाल्यावर डाव्या बाजुला आपल्याला गडावरील दुसरा सर्वात मोठा तलाव दिसतो. या पायवाटेने उंचवट्यावर न चढता डाव्या बाजुने सरळ गेल्यावर दोन भग्न बुरुज दिसतात. यापैकी एका बुरुजाखाली विखरलेल्या दगडात दोन भागात तुटलेला शरभाच शिल्प असलेला दगड पहायला मिळतो. दगडाच्या एका तुकड्यावर शरभाच डोक व धड कोरलेले असून पाय व नख्या दुसऱ्या दगडावर दिसतात. या शरभ शिल्पाच्या समोर दुसरे शरभशिल्प पडलेले दिसते.
Janjala 32

Janjala 33

Janjala 34
या दोन भग्न बुरुजांच्या मध्ये पीराची कबर असुन या कबरीसमोर तीन ओळींचे फारसी लिपितील दोन शिलालेख कोरलेले दगड दिसतात.
Janjala 35
या दर्ग्यामागे शेवाळाने भरलेला गडावरील तिसरा तलाव असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. दर्गा पाहून झाल्यावर त्याला वळसा घालून उजवीकडे जावे.
Janjala 36
या वाटेने पुढे गेल्यावर एक कमान लागते. हि कमान व आधीचे दोन उध्वस्त बुरुज व त्यावरील शरभशिल्पे पहाता गडाचे हे टेकाड म्हणजे बालेकिल्ला असावा व या बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या आत राजपरिवाराच्या इमारती असाव्यात असे वाटते. टेकाडाला वळसा घालत ही पायवाट दर्ग्यामागे दिसणाऱ्या इमारतींकडे जाते.
Janjala 37
या भागात प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली असुन या झाडीतील अवशेष शोधणे व पाहणे मोठे जिकरीचे आहे. सर्वप्रथम एक खिडकी व घुमट असलेली इमारत दिसते. झाडीमुळे या इमारतीच्या समोरील बाजुस जाणे शक्य नसल्याने खिडकीतून वास्तूत प्रवेश करून हि वास्तू पहावी.
Janjala 38
या वास्तुच्या आतून डाव्या बाजुने पुढे गेल्यावर एक नक्षीदार सज्जा असलेला बुरुज पहायला मिळतो.
Janjala 39
या बुरुजावर एक अनोखे शरभाशिल्प कोरलेले आहे पण ते बुरुजाच्या बाहेरील बाजुने पाहायला मिळते. ह्या शरभाला शिंगे असून तीन पायांना धारदार नखं कोरलेली आहेत.
Janjala 40
ह्या शरभाने सर्वात पुढच्या पायात हत्ती पकडला असून शरभाच्या गळ्यात घुंगरू व पाठीवर बैलाप्रमाणे झूल घातलेली असून झुपकेदार शेपूट आहे.
Janjala 41
उजव्या बाजूस काही अंतर दाट झाडीतून चालत गेल्यावर अनेक कमानी असलेला अंबरखाना अथवा राणी महाल पहायला मिळतो. याची वरील बाजु कोसळलेली असुन झाडीमुळे अवशेष नीटपणे ओळखु येत नाहीत.
Janjala 42
त्याच्या समोर अजुन २ इमारतींचे अवशेष दिसतात.
Janjala 43
राणी महालाच्या पुढील उंचवट्यावर एक नमाजगीर असुन हा गडावरील सर्वात उंच भाग असल्याने येथुन गडाचा व इतर बराचसा परिसर नजरेत येतो. नमाजगीराच्या उंचवट्यावरून खाली उतरून १० मिनिटात तलावांच्या मधल्या वाटेने जंजाळा गावाकडे जाता येते. येथे आपली गड फेरी पूर्ण होते. या किल्ल्याचा विस्तार, त्यावरील अवशेष व ३ तलाव पहाता या किल्ल्यावर मोठया प्रमाणावर राबता असावा. संपुर्ण जंजाळा किल्ला पहाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. तेथून घटोत्कच लेणी पाऊण तासांवर असुन लेणी पहाण्यास अर्धा तास व लेणी पाहून जंजाळा गावात जाण्यास पाऊण तास लागतो. गड वनखात्याच्या ताब्यात असल्याने झाडे तोडण्यास बंदी आहे त्यामुळे गडावर प्रचंड प्रमाणात झाडी वाढत चालली आहे व या झाडीनेच किल्ल्यांच्या अवशेषांचा घास घेतला आहे.
खरे तर अनावश्यक माजलेली झाडी स्वच्छ करुन पायवाटा आखून माहिती देणार्‍या पाट्या लावल्या तर मराठवाड्यातील अत्यंत उत्कृष्ट किल्ल्याची दुर्गभ्रमंती करणार्‍यांना ओळख होईल, पण पुरातत्वखात्याने नेमलेला रखवालदारही जिथे धडपणे दिसत नाही, तिथे या अपेक्षा म्हणजे अरण्यरुदन म्हणायला हवे. असो.
Janjala 44
चढत्या रणरणत्या उन्हात किल्ला बघून आमचे घसे कोरडे पडले होते. बरोबर असलेल्या वाट्याड्याने एका नैसर्गिक झर्‍याची जागा दाखवली, मात्र तिथे त्यावेळी तरी पाणी नव्हते. अखेरीस शेतातील एका विहीरीवर पाणी घेउन, उघड्यावर उभ्या असल्यामुळे तापत्या उन्हात भट्टी बनलेल्या बसमधे जाउन बसलो आणि आमचा प्रवास पुढच्या गंतव्य स्थानाकडे म्हणजे वेताळवाडी किल्ल्याकडे सुरु झाला.

( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) औरंगाबाद जिल्हा गॅझेटियर
२ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
३ ) मराठवाड्यातील किल्ले :- पांडुरंग पाटणकर
४ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा – सतिश अक्कलकोट
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) www.durgbharari.com हि वेबसाईट

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s