अनवट किल्ले ३८ : वेताळवाडी गड (Vetalwadi gad)

वास्तविक गड-किल्ले म्हणजे संरक्षणासाठी उभारलेली लष्करी ठाणी. सहाजिकच सैन्याला उपयोगी पडेल आणि संरक्षणाचे काम चोख होईल हि काळजी घेणे याची प्रार्थमिकता असते. भक्कम तटबंदी, त्यातून पुढे आलेले बुरुज, चर्या, फांजी, खणखणीत महाद्वार, शेवटचा पर्याय म्हणून असलेला चोरदरवाजा. मात्र काही गडांच्या भाळी यापेक्षा जास्त भाग्य येते. त्यांचा निर्माता फक्त कोरड्या सैनिकी दृष्टीकोनाचा नसतो, तर हळव्या मनाचा कलांवंत असतो. तो गडाची रचना करताना एखादी बारादरी उभारतो, तटबंदीलाही कलात्मक रुप देतो, तटबंदीतील सज्जालाही एखादी महिरप ठेवतो. हे सर्व भाग्य लाभलेला, पण आज दुर्लक्षाच्या गर्तेते सापडलेला किल्ला म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यातील “वेताळवाडी” उर्फ “वाडीगड”. आजच्या धाग्यात आपण त्याचीच सैर करुया.
Vetalwadi 1
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील अनेक लहान-मोठय़ा डोंगरमाथ्यांना विविध राजसत्तांच्या कालखंडात गड-किल्ल्यांचे साज चढले. यापैकीच एक किल्ला म्हणजे वेताळवाडी उर्फ वसईचा किल्ला. किल्ल्याची भव्य तटबंदी, बुरुज व यावरील इमारती आजही शिल्लक असल्याने अवशेषांनी संपन्न असा हा किल्ला गडप्रेमींचे आवडते ठिकाण आहे.
Vetalwadi 2
जंजाळ्याचा औरस चौरस गड पाहून आम्ही आमच्या पुढच्या लक्ष्याकडे निघालो, तो म्हणजे वेताळवाडीचा किल्ला. अंभईमार्गे आधी उंडणगावला पोहचलो, तेथून हळदामार्गे सोयगाव रस्त्यावर असलेल्या हळदा घाटाकडे निघालो. मात्र हा गड या परिसरात वेताळवाडीच्या एवजी “वाडीगड” या नावाने परिचित आहे, त्याचे कारण आम्हाला पुढे समजले. अर्थात या गडावर येण्यासाठी बरेच पर्याय आहेत.
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून २ मार्गांनी वेताळवाडी गडावर जाता येते.
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडच्या पुढे १४ किमीवर गोळेगाव आहे. गोळेगावच्या अलिकडे डाव्याबाजूस उंडणगावाकडे जाणारा फाटा फूटतो. येथून उंडणगाव ५ किमीवर आहे. उंडणगावहुन १२ किमीवर हळदा गाव आहे. हळदा गावापुढे घाट सुरु होतो. या घाटातच हळद्यापासून ३ किमी अंतरावर वेताळवाडी किल्ला आहे. घाट चढल्या पासूनच वेताळवाडी किल्ला दिसू लागतो. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ न उतरता किल्ला सुरु होतो तेथे उतरावे. इथून पायवाट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाते.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावातून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात.
स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील जरंडी व वेताळवाडी गावातून पायी गड चढण्यासाठी
१) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव – वेताळवाडी अंतर ४ किमी आहे. वेताळवाडी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.
२ ) जंजाळा किल्ला पाहून वेताळवाडी दरवाज्यामार्गे उतरुन थेट चालत वेताळवाडीचा किल्ला गाठता येईल.अर्थात हि वाट खास दुर्गभटक्यांसाठीच ठिक.
Vetalwadi 3
निम्मा हळदा घाट उतरुन आल्यानंतर वेताळवाडी गावाजवळ येताच समोरच्या डोंगरावरचे तटबुरूजांचे अवशेष आणि गडावरच्या वास्तू स्पष्ट दिसू लागतात. गडाच्या डोंगराला वळसा घालून हळद्या घाटानं किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी जाता येते. वेताळवाडी किल्ल्याचे इथून एक सुरेख दर्शन घडते.
Vetalwadi 4
डोंगर उताराला बांधलेली लांबलचक तटबंदी आणि बुरुज, समोर दोन बलदंड बुरुजात दडविलेला दरवाजा आणि उजवीकडे वर चढत जाणारी भक्कम तटबंदी आपले लक्ष वेधून घेते
Vetalwadi 5
गडाच्या दरवाजाकडे जाताना दोन भव्य बुरुज आपले स्वागत करतात. या दोन बुरूजामागे नक्षीदार सज्जा असणारे त्यांच्यापेक्षा उंच व मोठे बुरुज आहे. दरवाजापर्यंत पोहचलेल्या शत्रूवर थेट हल्ला करण्यासाठी या बुरुजांची रचना केलेली आहे. वेताळवाडी किल्ल्याच्या दरवाजाची रचना थोडी वेगळी आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाबाहेर बुरुजांच्या पुढे जिभी बांधण्यात आली आहे. जिभी म्हणजे मुख्य दरवाजापुढे उभारलेली एक भिंत. जेणेकरून शत्रुचा हल्ला झाल्यास थेट दरवाजावर हल्ला करता येऊ नये अशी रचना.अशीच जिभी मला पुढे नांदेड जिल्ह्यातील कंधार किल्ल्यावर पहायला मिळाली.
Vetalwadi 6
या दोन बुरुजामधून फरसबंदी केलेली वाट काटकोनात वळून उत्तराभिमुख दरवाजाकडे जाते.
Vetalwadi 7
डावीकडच्या बुरुजाच्या तळात एक लहान दरवाजासारखे बंद बांधकाम दिसते पण त्याचा उपयोग लक्षात येत नाही. हा दरवाजा जंजाळा किल्ल्याच्या दिशेने असल्याने जंजाळा दरवाजा म्हणुन ओळखला जातो.
Vetalwadi 8
दरवाजाची उंची २० फुट असून त्याच्या दोन्ही बाजूस शरभशिल्पे कोरलेली आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या प्रशस्त देवड्या आहेत. दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजुला दरवाजाच्या बुरुजावर जाण्यासाठी पाय-या आहेत
Vetalwadi 9
बुरुजाच्या वरील बाजुस आत उतरणारा एक लहान जिना असुन हा जिना आपल्याला बुरुजातील कोठारात घेऊन जातो.
Vetalwadi 10
दरवाजावर उभे राहिल्यावर आपल्याला लांबवर पसरलेली तटबंदी,गडाखालचा हळदा घाट व सर्वात खाली वेताळवाडी धरण पहायला मिळते. वेताळवाडी धरणाच्या मागे प्रचंड विस्ताराचा वैशागड उर्फ जंजाळयाचा किल्ला दिसतो.
Vetalwadi 11
हा दरवाजा पार करून आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. किल्ल्याची संपुर्ण माची अंदाजे २०-३० फूट उंचीच्या तटबंदीने संरक्षित केली आहे. शत्रूवर मारा करण्यासाठी प्रत्येक तट-बुरुजात जंग्या ठेवलेल्या आहेत. इथून वरील बाजुस वेताळवाडी किल्ल्याचा बालेकिल्ला व त्याची तटबंदी दिसते.
Vetalwadi 12
दरवाजावरून खाली उतरून उजव्या बाजूला थोडेसे वर चढल्यावर एक प्रचंड मोठे खांबटाकं आहे. वास्तविक या टाक्याचे पाणी आधी पिण्यायोग्य होते, मात्र आता आतमधे वटवाघळांनी मोठ्या प्रमाणात वसाहत केल्याने पाणी खराब झाले आहे. ते पाहून पुन्हा दरवाजापाशी येऊन गडाला फेरी मारण्यासाठी उजवीकडे वळायचं. ह्या वाटेच्या सुरुवातीलाच उजवीकडे बुरुजात एक छोटा दरवाजा दिसतो.
Vetalwadi 13
दरवाजाच्या पाय-या उतरून खालच्या भागात गेल्यवर किल्ल्याच्या बुरुजामध्ये हवामहल सारखी सुंदर खोली बांधून काढलेली दिसते. इथेच बाजुला दारुगोळा ठेवण्यासाठी असलेली कोठडीसुध्दा दिसते. एकंदरीत पहारेकर्‍यांना पहारा कसा सुसह्य होईल हे पाहिले आहे.
Vetalwadi 14
गडाबाहेरून नक्षीदार सज्जा दिसणारा बुरुज हाच बुरुज आहे. अतिशय कल्पक अशी ही रचना दुर्ग निर्मात्याच्या रसिकपणाची दाद देते.
Vetalwadi 15
उजवीकडे वर तिरपी चढत गेलेली तटबंदी आणि शेवटाला एक बुरुज व त्यावर असलेले झाड नजरेस पडते. तटबंदीतील पूर्व टोकाचा हा बुरुज तटबंदीपासुन थोडासा सुटावलेला आहे.
Vetalwadi 16
या बुरुजावर जाण्यासाठी आठ-दहा पायऱ्या आहेत. इथून अजिंठा डोंगररंग व डावीकडच्या डोंगररांगेत रुद्रेश्वर लेणी दिसुन येतात.अंजिठा रांगेत असलेल्या या गडाची उंची समुद्रसपाटीपासून १९०० फुट ( ६२५ मीटर ) आहे.
Vetalwadi 17
या बुरुजावरून दरी उजव्या हाताला ठेऊन चढत गेल्यावर दहा मिनिटात बालेकिल्ल्याच्या बुरुजाला वळसा घालून आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो.
Vetalwadi 18
दुर्दैवाने झालेल्या दुर्लक्षामुळे या देखण्या बुरुजाची पडझड झाली आहे. मात्र तरीही त्याचे सौंदर्य उणावलेले नाही.
Vetalwadi 19
तोफेसाठी ठेवलेल्या खिडकीतून हळदा घाटाची वळणे आणि त्यावरुन प्रवास करणारी लाल बस मोठी झक्क दिसत होती. बालेकिल्ला दक्षिणोत्तर लंबवर्तुळाकार पसरलेला असुन येथून तटबंदीवर चढून मधल्या बुरुजापर्यंत चालत जावे.
Vetalwadi 20
बालेकिल्ल्याच्या पूर्व बुरुजाजवळ सुंदर नक्षीकाम व छ्ताला झरोका असणारी हमामखान्याची घुमटाकार वास्तू आहे. हा हमामखाना भिंतीतील खापराच्या नळ्यावरून लक्षात येतो.
Vetalwadi 21
मधल्या बुरुजावरून खाली उतरून सरळ चालत गेल्यावर आपल्याला जमिनीत बांधलेले तेलतुपाचे गोलाकार रांजणटाके पहायला मिळतात. इथे झाडीझुडुपातून वाट काढत आपण समोरच्या एका इमारतीपाशी पोहोचतो.
Vetalwadi 22
हि इमारत म्हणजे गडावरील अंबरखाना म्हणजेच धान्यकोठार आहे. या इमारतीच्या समोर एक भग्न इमारतीचे वाड्याचे अवशेष आहेत.
Vetalwadi 23
वास्तविक गड पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत आहे. मात्र दम देणार्‍या निळ्या-लाल फलकाशिवाय इथे कोणतेही काम पुरातत्व खात्याने केलेले दिसत नाही. गडावर पहारेकरी नेमला आहे, असे समजले पण हा कधीही दिसत नाही.
Vetalwadi 24
पुढे गेल्यावर नमाजगीर नावाची सुंदर नक्षीकामाने व कमानीने सजलेली इमारत (मस्जिद) आहे.
Vetalwadi 25

Vetalwadi 26
त्याच्या भिंतीवरचे निजामाचे चिन्ह आपल्याला गतकाळातील निजामशाहीच्या वर्चस्वाची जाणीव करून देते.
Vetalwadi 27
नमाजगीरच्या उजव्या बाजूला कोरीव दगड बसवलेली कबर असुन समोर एक प्रचंड मोठा बांधीव शेवाळलेला तलाव आहे.
Vetalwadi 28
सध्या किल्ल्यावरचा हा एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे.अर्थात या तलावातील पाणीसुध्दा पिण्यायोग्य नाही. एकंदरीत पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसल्याने या गडावर मुक्काम करणे शक्य नाही.
Vetalwadi 29
पुढे पश्चिमेकडे किल्ल्याची निमुळती होत जाणारी माची असून किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील या उत्तर टोकावर बारदरी उर्फ हवामहल नावाची सुंदर बांधकाम केलेली २ कमान असलेली इमारत आहे.
Vetalwadi 30
राजघराण्यातील स्त्रियांना वारा खाण्यासाठी खास तयार केली गेलेली ही वास्तू आहे. ह्या वास्तूच्या आत कोणतही बांधकाम नाही. खरेतर वेताळवाडी गडाच्या सौंदर्याचा सर्वोच्च अविष्कार म्हणजे हि वास्तु. गडाचा ईतिहास आज फारसा ज्ञात नसला तरी गडावर कदाचित एखादे राजघराणे मुक्कामाला असावे असे एकंदरीत इथल्या वास्तुंची बांधणी बघता अंदाज करता येतो. कदाचित संध्याकाळच्या निवांत वेळी गडावरील राणी किंवा ईतर राजस्त्रिया इथे बसून आजुबाजुच्या मुलुखाची शोभा पहात असतील, पश्चिमवारा अंगावर घेत जंजाळ्याच्या गडामागे बुडणारा सुर्यास्त निरखत असतील. आज फक्त अंदाज बांधणे आपल्या हाती उरले आहे. पण निदान या बारादरीसाठी तरी ह्या गडाला भेट द्यायला हवीच. हि वास्तु राबता असताना कदाचीत वरुन लाकडाच्या छताने बंदिस्त असावी, आज मात्र छप्पर उरलेले नाही.
Vetalwadi 31
या इमारतीकडे जाताना डाव्या बाजूला सदरेची एक इमारत आहे.
Vetalwadi 32
बारादरीतून खालच्या बाजूस किल्ल्याच्या भक्कम बुरुज असणारा मुख्य दरवाजा व त्याखालील वेताळवाडी गाव दिसते.वास्तविक हि जागा मुक्कामासाठी आदर्श आहे, पण गडावर पिण्याच्या पाण्याच्या ठणठणाटाने हे अवघड वाटते. तरीही पुरेशी तयारी करुन गेल्यास हा अनुभव घ्यावा.
Vetalwadi 33
किल्ल्याच्या मुख्य दरवायाकडे जाण्यासाठी बारदरी पासून थोडे मागे येऊन खाली उतरावे लागते.
Vetalwadi 34
खाली उतरून सपाटीवर आल्यानंतर समोर तटबंदीच्या चर्या दिसतात.
Vetalwadi 35
येथे एक कातळ कोरीव बुजलेले टाके आहे. अर्थात आज त्यात पाण्याचा टिपुसही नाही. पण एकंदरीत शिबंदीचा विचार करुन पाण्याची चोख व्यवस्था केली आहे.
या टाक्याच्या बाजूला ६ फुट १० इंच लांबीची खणखणीत तोफ पडली आहे. वास्तविक गडावर असणारे बुरुज आणि त्याला असणार्‍या जंग्या पहाता, या गडावर मोठ्या प्रमाणात तोफा असणार हे नक्की. पण आज हि एकमेव तोफ गडावर दिसते. बाकीच्या तोफा कोठे गेल्या, कि स्थानिकांनी त्या पळवल्या ? याचे उत्तर सापडत नाही. पण निदान हि तोफ तरी जपली पाहिजे.
Vetalwadi 36
इथे समोरच उजव्या बाजूच्या तटबंदीतील पाय-या उतरल्यावर वेताळवाडी किल्ल्याचा चोर दरवाजा लागतो.
Vetalwadi 37
दरवाजातून आतमध्ये गेल्यावर वरील बाजुस बुरुज असून खाली बांधीव खंदक आहे. चोर दरवाजा बघून किल्ल्याच्या वेताळवाडी दरवाजाकडे निघावे.
Vetalwadi 38
दोन दरवाजांच्या समूहातील पहिला दरवाजा साध्या बांधणीचा आहे. त्याच्याच पुढे मुख्य वेताळवाडी दरवाजाला जाणारी वाट असून हा पश्चिमाभिमुख दरवाजा दोन्ही बाजूंनी अजस्त्र तट व बुरुजांनी संरक्षित केलेला आहे.
Vetalwadi 39
दोन दरवाजाच्या मधील भागात देवड्या आहेत. दरवाजाच्या पाय-या उतरून बाहेर पडुन पाहिल्यावर दरवाजाची भव्यता दिसुन येते.
Vetalwadi 40
जवळपास गडफेरी पुर्ण झाली. मध्यम आकाराचा हा गड फिरण्यास साधारण दीड तासाचा अवधी लागतो. ईतिहासामधे या गडाचा फार उल्लेख नाही. बहुधा जवळ असलेला जंजाळा आणि हा गड एकाच कालखंडातील असावेत. कागदपत्रांमध्ये वेताळवाडी किल्ल्याचा उल्लेख “बैतुलवाडी” असा येतो. वेताळवाडी गावच्या लोकांना वेताळवाडी किल्ल्याच्या नावातला “वेताळ” हा शब्द आवडत नसल्याने ते ह्या किल्ल्याला वाडीचा किल्ला म्हणुन संबोधतात.
Vetalwadi 41
आजही उत्तम स्थितीत असलेल्या या दरवाजाच्या संरक्षक बुरुजावर शरभशिल्प कोरलेली आहेत.
Vetalwadi 42
एकंदरीत खणखणीत तटबंदी, प्रचंड दरवाजे, उपदरवाजे, जिभीसारखे सहसा न पहायला मिळणारे दुर्गवैशिष्ट्य, कातळकोरीव टाकी, तलाव, अंबरखाना, हमामखाना, तोफा आणि बारादरीसारखी अनोखी वास्तु अशी गडाला आवश्यक असणारी सर्व वैशिष्ट्ये उराशी बाळगून हा वेताळवाडीचा गड उभा आहे. गड, किल्ले पहाण्यात रस असणार्‍यांनी या किल्ल्याला सवड काढून किमान एकदा तरी नक्की भेट द्यावी. मात्र मला एकाच गोष्टीची उणीव भासली, ती म्हणजे एखादा शिलालेख असता तर या गडाच्या ईतिहासावर प्रकाश पडला असता. बाकी एखादा महाराष्ट्रातील गड पहातोय कि राजस्थानमधील, ईतका देखणा हा किल्ला आहे.
Vetalwadi 43
इथून समोरच सकाळी भेट दिलेला जंजाळा किल्ला दिसत होता.
Vetalwadi 44
इथून गडाचा बालेकिल्ला आणि विशेषतः बारादरी लक्ष वेधून घेतात.
Vetalwadi 45
येथे आपली गड फेरी पूर्ण करुन वेताळवाडीगावाच्या दिशेन उतरु लागलो. गड उतरायला सुरवात केल्यावर माचीवरील वेताळवाडी गावाच्या दिशेला चर्या असणारी तटबंदी आणि काही भग्नावशेष दिसुन येतात.
Vetalwadi 46
पावले खाली उतरत होती मात्र मन अजून वेताळवाडीगडात गुंतून पडले. खाली उतरत असलो तरी, वारंवार गडाकडे नजर जात होती. वाटेत मला हे भुयार दिसले. हे मानवनिर्मित कि एखाद्या प्राण्याचे बीळ हे समजु शकले नाही.
Vetalwadi 47
सुर्य झपाट्याने उतरत होता. मावळतीच्या संधीप्रकाशात गडाकडे पुन्हा एकदा पाहून घेतले. कदाचित इथे येण्याचा योग परत येईल कि नाही हे माहीती नाही. केवळ २० मिनिटात आपण वेताळवाडी गावात पोहोचलो. आमची बस आधीच गावात येउन थांबली होती. पण बस उभी असलेल्या कालावधीत कोणीतरी मागचा ब्रेकलँप पळवून नेला होता. एक कटू अनुभव सोबत घेउनच आम्ही निघालो.
वास्तविक देशभरातील आणि आतंरराष्ट्रीय पर्यटक जिथे भेट द्यायला आवर्जुन येतात, त्या अजिंठ्या लेण्यापासून हा गड केवळ पन्नास कि.मी. वर असूनही उपेक्षित वाटतो. थोडी निगा ठेवली, स्थानिकांची गाईड म्हणून नेमणूक केली आणि पुरेशी प्रसिध्दी केली तर हे एक उत्तम पर्यटनस्थळ होईल यात शंका नाही.
रुद्रेश्वर लेणी :- वेताळवाडीगडा बरोबर जवळच्या डोंगरात असलेली रुद्रेश्वर लेणीही पहाता येतात. वेताळवाडीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरात रुद्रेश्वर लेणी आहेत. ही हिंदू (ब्राम्हणी) लेणी असून यात नरसिंह, गणेश, भैरव व सप्तमातृका यांची शिल्पे आहेत. याशिवाय लेण्यात शिवलिंग व नंदी आहे. वेताळवाडीतून रुद्रेश्वर लेण्यांपर्यंत जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. अर्थात वेळेअभावी आम्हाला काही हि लेणी पहाता आली नाहीत. स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून पहाटे निघून जंजाळा किल्ला , घटोत्कच लेणी, वेताळगड व रुद्रेश्वर लेणी एका दिवसात पहाता येतात.

( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) औरंगाबाद जिल्हा गॅझेटियर
२ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
३ ) मराठवाड्यातील किल्ले :- पांडुरंग पाटणकर
४ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
५ ) www.durgbharari.com हि वेबसाईट

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s