अनवट किल्ले ३९ : सुतोंडा ,नायगावचा किल्ला (Sutonda, Naygaon Fort )

गड, किल्ले हि लष्करी ठाणी असल्याने, सहाजिकच इथे मोठ्या प्रमाणात शिबंदी असते. या सैनिकांना नित्यवापरासाठी पाणी असावे यासाठी पाण्याची टाकी, हौद बांधलेले असतात. साधारण किल्ल्याच्या आकारमानावर हा पाण्याचा साठा किती असावा ते ठरते. मात्र अतिशय छोटेखानी आकार असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असणारा अनोखा किल्ला म्हणजे, “सुतोंडा”. याच गडाला साईतेंडा, वाडीसुतोंडा किल्ला, नायगांव किल्ला, वाडी किल्ला अशी विविध नावे आहेत. आज त्याचीच ओळख करुन घेउया.
Sutonda 1
औरंगाबादच्या आमच्या रेंज ट्रेकमधे सकाळी जंजाळा आणि वेताळवाडीचे देखणे किल्ले बघून मुक्कामाला सुतोंड्याकडे निघालो. सोयगाव ते बनोटी हा तिडकामार्गे जाणारा रस्ता पृथ्वीवर आहे कि चंद्रावर असा प्रश्न पडावा ईतका कच्चा आहे. त्यापेक्षा पर्यायी रस्ता म्हणजे सोयगाव – शेंदुर्णी – वारखेडी- पाचोरा – खडकदेवळे – निमबोरा – बनोटी असा जवळपास ६०-७० किमी चा हा मार्ग. सुरूवातीला खराब रस्ता मध्ये जरा बरा परत खराब थोडक्यात दगडापेक्षा वीट मऊ असा हा रस्ता आहे.
Sutonda 2
स्वत:चे वहान असल्यास औरंगाबादहून ३ मार्गांनी सुतोंडा गडावर जाता येते :-
१) औरंगाबाद – चाळीसगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६३ किमी अंतरावर कन्नड गाव आहे. कन्नडहून एक रस्ता फर्दापूरला जातो .या रस्त्यावर कन्नड पासून ५० किमी वर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगाव ते बनोटी अंतर २५ किमी आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
३) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६५ किमी अंतरावर सिल्लोड गाव आहे.सिल्लोडहून एक रस्ता ३१ किमी वरील घाटनांद्रा गावाकडे जातो. घाटनांद्राहून १३ किमीवर तिडका नावच गाव आहे. हे गाव फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर आहे. तिडका गावातून ३ किमीवर बनोटी गाव आहे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
४ ) सोयगाव – शेंदुर्णी – वारखेडी- पाचोरा – खडकदेवळे – निमबोरा – बनोटी असा जवळपास ६०-७० किमीचा रस्ता थोडा लांबचा आहे. पण तुलनेने बर्‍या अवस्थेत आहे.
५ ) नाशिकहून येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी नाशिक -मालेगाव-चाळीसगाव-नागद-बेलखेडा-बनोटी हा मार्ग सोयीचा आहे.
स्वत:चे वहान नसल्यास / गडा खालील नायगावा पर्यंत पायी जाण्यासाठी :-
१) औरंगाबाद – चाळीसगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून ६३ किमी अंतरावर कन्नड गाव आहे. येथे जाण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे.. कन्नडहून एक रस्ता फर्दापूरला जातो .या रस्त्यावर कन्नड पासून ५० किमी वर बनोटी गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव मार्गावर धावणार्‍या एसटीने बनोटी गावात उतरावे. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
२) औरंगाबादहून अजिंठा लेण्याकडे जाणार्‍या औरंगाबाद – जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाव आहे. फर्दापूर – चाळीसगाव रस्त्यावर फर्दापूर पासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. येथे येण्यासाठी औरंगाबादहून थेट एसटी सेवा आहे. सोयगाव ते बनोटी अंतर २५ किमी आहे. बनोटी गावात जाण्यासाठी सोयगावहून एसटी उपलब्ध आहेत. बनोटी गावातून एक रस्ता ३ किमीवरील नायगाव गावात जातो. बनोटीवरून नायगावात कोठलेही वहान जात नसल्यामुळे चालत जावे लागते. साधरणपणे ३० मिनीटात आपण नायगावात पोहोचतो. नायगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.
रात्री अंधारात बनोटीमधे पोहचलो. नायगावकडे जाणारा विचारण्यासाठी एक-दोघे खाली उतरले. बरोबर आमची ग्रुपलिडरही उतरली, लगेच नाकाला हात लाउन परतली. त्या दोघांचे विमान चांगलेच हवेत तरंगत होते. त्यांनी आमच्याबरोबर येण्याची तयारी दाखवली तरी आमची त्यांच्याबरोबर जाण्याची तयारी नव्हती.
Sutonda 3
वास्तविक बनोटीमधे अमृतेश्वर मंदिर रात्रीच्या मुक्कामासाठी मस्त आहे, तसेच शिरसाठ यांच्या खाणावळीत जेवणाची सोय होउ शकते, पण एकंदरीत वेळेचे नियोजन विचारात घेता आम्हाला नायगावलाच मुक्कामाला जाणे भाग होते. बनोटीचे अमृतेश्वर मंदिर पुरात्न असून मंदिरात कार्तिकेयाची सुंदर मुर्ती आहे. बनोटीवरुन सुतोंड्याच्या पायथ्याचे नायगाव ५ कि.मी. आहे.
सुदैवाने आम्हाला नायगावचे पाटील भेटले, त्यांनी फोन फिरवून गावातील एका खोलीच्या शाळेत आमची व्यवस्था केली. खरतर या शाळेत वीज नव्ह्ती. पण ती व्यवस्था कशी केली गेली हे मी इथे लिहीणे योग्य नाही. 😉 असो. मिनीबस नायगावच्या दिशेने निघाली. हिवरा नदीतून जाताना बस आत्ता कलंडते कि नंतर असे वाटेपर्यंत पुढचा रस्ता, रस्ता कसला, त्याला अ‍ॅडेव्हेंचर स्पोर्टट्रॅक ईतकेच म्हणता येईल. आत्तापर्यंत संयमाने गाडी चालवणार्‍या आमच्या चक्रधराच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने गाडी थांबवली व बैठा सत्याग्रह सुरु केला. अखेर वाटाघाटीला यश आले आणि आम्ही सगळे खाली उतरुन दांडी यात्रा, आपले नायगाव पदयात्रा करु लागलो आणि रस्त्यावरच्या खड्यात डोलत गाडी पुढे गेली. दिवसभराच्या दगदगीनंतर गरमागरम खिचडी पोटात गेल्यानंतर डाराडूर झोप लागली ते भल्या पहाटे कोंबड्याने अगदी शेजारुन बांग दिल्यानंतरच जाग आली.
आता उजेडात गाव कसे आहे हे आम्हाला समजले. स्वच्छ भारत अभियान, गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अश्या काही चळवळी बाहेरच्या जगात चालु आहे हे बहुधा नायगावकरांपर्यंत अजून पोहचायचे होते. पुरा सह्याद्री फिरलो, असंख्य खेडी पाहिली, पण इतके कमालीचे घांणेरडे गाव मी दुसर्‍यांदा पाहिले. याच्याशी याबाबत स्पर्धा करु शकेल ते बहादुरपुर. अर्थात नंतर गावकर्‍यांशी गप्पा करताना त्यांची अडचण समजली, पण फारशी पटली नाही. सकाळी गावकर्‍यांशी गप्पा मारत आम्ही उभे होते, तितक्यात एका महाभागाने मिरींडाच्या प्लॅस्टीकच्या बाटलीत कच्ची दारु भरुन आणली. एकंदरीत कठीण होते. असो.
आमच्याबरोबर गावातील श्री. तानाजी तुकाराम गवळी ( 9881284682 ) हे वाटाड्या म्हणुन आले होते.
Sutonda 4
गडाकडे जाण्यापुर्वी गावातच एक आकर्षण आहे, ते म्हणजे झाडाखाली ठेवलेली विष्णुमुर्ती. या मुर्तीचा एक हात तुटलेला आहे. गावाच्या परिसरात उत्खनन करताना हि मुर्ती सापडली असे गावकरी सांगतात. एकंदरीत परिसराचे स्वरुप पहाता आणखी मुर्ती सापडतील असे वाटते.
Sutonda 5
हि मुर्ती पाहून अतिशय गलिच्छ रस्त्याने आम्ही गावाबाहेर असलेल्या हनुमान मंदिरासमोर आलो. पत्र्याच्या निवाऱ्यात उभारलेले एक हनुमान मंदिर असुन या मंदिरात अनेक भग्न प्राचीन मूर्त्या ठेवलेल्या आहेत. वास्तविक याच परिसरात पुर्वी सुतोंडा आणि वाडी अश्या दोन गावांचे अस्तित्व होते, पण कालौघात हि दोन्ही गावे नष्ट झाली. हा मारुती याच गावच्या वेशीचा असावा. यावरून तो परिसर वाडीसुतोंडा म्हणून ओळखतात.
Sutonda 6
तेथे जे मोठे धरण बांधले गेले आहे त्या धरणाच्या पूर्वेला नायगांव हे परिसरात परिचित असणारे गाव. तर या धरणाच्या पश्चिमेला धारकुंड धबधबा, महादेव व लेणी असलेले ठिकाण. या दोनही ठिकाणी जाण्यासाठी बनोटी या गावाहून रस्ता आहे.
Sutonda 7
याशिवाय किल्ल्याकडे जातांना शेतात एक डोक तुटलेल्या नंदीची मूर्ती ठेवलेली आहे. किल्ल्याकडे जाणारी वाट मळलेली असुन समोरच्या टेकाडाला वळसा घालत हि वाट किल्ल्याखालील पठारावर येते.पठारावर दूरवर पसरलेले दगड व चौथरे येथे कधीकाळी मोठी वस्ती असल्याची जाणीव करून देतात.या परिसरात हत्ती व घोडे खरेदीसाठी मोठा बाजार भरत असे अशी आख्यायिका आहे.
Sutonda 8
इथे रक्ताई देवीच्या डोंगराच्या पार्श्वभुमीवर टेकडीसारखा दिसणारा सुतोंडा किल्ला दर्शन देतो. समुद्रसपाटीपासून ४३५ मीटरची उंची लाभलेला हा गड पायथ्यापासून मात्र जेमतेम २०० मीटर आहे.
Sutonda 9
पुढे आईमाईच्या टेकाडाला वळसा घालून आपण किल्ल्याकडे जातो. या टेकाडावर आईमाईची घुमटी आहे. त्याच्या समोर बळी दिले जातात. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर वरच्या बाजूला चोर दरवाजा दिसतो. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत. पहिल्या मार्गाने आपण चोर दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतो. हा मार्ग खड्या चढणीचा आहे. दुसरा मार्ग किल्ल्याला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूस जातो. मागच्या बाजुला रक्ताईचा डोंगर हा अजिंठा रांगेत असून एका सोंडेने तो सुतोंडा किल्ल्याशी जोडलेला आहे. या डोंगरावर एक देवीचे स्थान असून तिच्यासमोर गुरांचा बळी दिला जातो म्हणून ती रक्ताई. इथे एक वाट रक्ताई डोंगराकडे चढते तर एक वाट सुतोंड्याच्या खिंडीकडे चढते. आधी हा खिंडीचा मार्ग बघून गडावर जाणे सोयीचे आहे.
Sutonda 10
हा मार्ग सोपा आहे. या मार्गाने आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारात पोहोचतो. हे प्रवेशव्दार मोठ्या खुबीने बनविलेले आहे. येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे ५० फूट लांब , २० फूट रूंद व २० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे १७०० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा.
Sutonda 11
शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) एका बाजुला उंचावर बुरुज व तटबंदी आहे दुसर्‍या बाजुला कोरलेला कडा, तर तिसर्‍या बाजूला खोल दरी. अरुंद पायर्‍यांवरुन शत्रु ह्या खिंडीत आल्यावर दोन्ही बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागिल बाजूस असलेल्या अरुंद पायर्‍यांमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत.
Sutonda 12
खिंडीच्या डोंगराकडील भागात कातळ कोरुन १२ फूट उंच पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार बनविलेले आहे.
Sutonda 13
तटबंदीत डाव्या बाजूला शरभ शिल्प कोरलेले आहे, तर उजव्या बाजूच्या कोपर्‍यात तोफेसाठी गोल छिद्र (झरोका) ठेवलेल असे म्हणतात. या परिसरातील जंजाळा, वेताळवाडी आणि सुतोंडा या तिन्ही किल्ल्यावर शरभ शिल्प पहायला मिळाले.
Sutonda 14

Sutonda 15
मला मात्र ते तोफेसाठी आहे असे अजिबात वाटले नाही, एकतर इतक्या छोट्या छिद्रातून फार मोठी तोफ वापरता येणार नाही, शिवाय त्या तोफेच्या मार्‍याचा कोन बदलायचा तर पुरेशी जागा नाही. महत्वाचे म्हणजे ती तोफ चालविणार्‍या गोंलदाजाला पहाण्यासाठी जागा नाही. प्रवेशव्दाराच्या आतील बाजूस दरवाजाच्या व अडसराच्या खाचा कोरलेल्या पहायला मिळतात.
Sutonda 16
आतमध्ये इंग्रजी “Z” सारख्या वळणावळणाच्या मार्गाने किल्ल्यात प्रवेशता येते. दरवाजातून आत गेल्यावर कातळात कोरलेला भूयारी मार्ग काटकोनात वळतो. येथे पहारेकर्‍यांसाठी कट्टे आहेत.
Sutonda 17
भूयारातून बाहेर पडून फरसबंदी मार्गाने पुढे जाऊन डाव्या बाजूला वळून वर चढून गेल्यावर आपण खिंडीच्या वरच्या बाजूला येतो. येथून या मानव निर्मित खिंडीचा किल्ल्याच्या संरक्षणासाठी कसा उपयोग केलेला आहे याचा अंदाज येतो. सुतोंडा किल्ल्याच्या बांधणीचा परमोच्च बिंदू म्हणजे हे प्रवेशद्वार. सुतोंडय़ाचा हा दरवाजा म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यांच्या स्थापत्यापकी एक अभिनव आणि अविस्मरणीय अशी रचना म्हणावी लागेल. आवर्जून जाउन पहावे अशी हि रचना. वास्तविक धोडप, पिसोळ किंवा भामेरच्या किल्ल्याला अश्या नैसर्गिक खाचा आहेत, पण कृत्रिमरित्या खाच निर्माण करुन त्याचा नेमका उपयोग याच ठिकाणी केलेला दिसतो.
Sutonda 18
उत्तरेकडील सुतोंडा गावाच्या दिशेने बऱ्याच अंतरापर्यंतची नसíगक कडय़ांची तटबंदी तर आहेच, त्याशिवायही दगडांवर दगड रचून केलेली दगडांची तटबंदी अजूनही सुरक्षित आहे. या किल्ल्याला तीनही बाजूने नैसर्गिक उंच कडा आहेत, तर दक्षिणेकडून मुख्य डोंगररांगेची सलगता ही खोल खंदकाने तोडलेली आहे.
दरवाजातून आत आल्यावर पुढे जाऊन डाव्या बाजूला वळून वर चढून गेल्यावर आपण खिंडीच्या वरच्या बाजूला येतो. पायथ्यापासुन इथवर यायला एक तास लागतो.
Sutonda 19
इथुन थोडेसे वर आल्यावर किल्ल्याचा काही प्रमाणात तटबंदी शिल्लक असलेला दुसरा उध्वस्त पश्चिमाभिमुख दरवाजा लागतो. या दरवाजातून सरळ पुढे आल्यावर एक उध्वस्त झालेले लेणीवजा दोन खांब असलेले टाके दिसते.
Sutonda 20
या टाक्याच्या पुढे काही अंतरावर डोंगर उतारावर एक लांबलचक मोठे कोरडे टाके पहायला मिळते. या टाक्याच्या कोपऱ्यात एक खांब कोसळलेली मोठी गुहा असुन गुहेच्या भिंतीत एक कोरीव खिडकी दिसते. गुहेच्या आतील भागात पाणी साठले आहे. या गुहेपासून डोंगर उतारावरून तसेच पुढे आल्यावर अजुन दोन कोरडी टाकी पहायला मिळतात.
Sutonda 21
वाटेच्या पुढील भागात अजुन एक लेणीवजा खांबटाके असुन या टाक्याच्या आत विश्रांतीकक्ष कोरलेला आहे. या टाक्याच्या वरील भागात दोन उध्वस्त जोडटाकी पहायला मिळतात.
Sutonda 22
इथेच बाजुस २०-२२ टाक्यांचा समूह दिसुन येतो. या टाक्यांना “राख टाकी “म्हणतात. यातील ६-७ टाकी खडकाच्या पोटात खोदलेली असुन आतुन एकमेकास जोडली आहेत.
Sutonda 23
या टाक्यांच्या वरील बाजूस लहान तोंडे असुन उघडयावर असलेल्या या टाक्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये यासाठी हि योजना आहे. या सलग असलेल्या उघडय़ा हौदाप्रमाणे असलेल्या पाण्याच्या टाक्यांची विशिष्ट अशी रचना आहे. मोठमोठी हौदासारखी ही टाकी सलग एका रांगेत आहेत. त्या शेजारी दुसरी थोडय़ा आकाराने लहान असलेल्या हौदांची रांग आहे. तिला लागून तिसरी हौदांची रांग ही मोठय़ा तोंडाच्या रांजणाच्या आकाराच्या हौदांची आहे. म्हणजे या तिसऱ्या रांगेतून घोडयांनाही पाणी पिता येईल अशी दिसते किंवा तिसऱ्या टप्प्यातील ही रांग तिसऱ्यांदा पाणी गाळून पुढे सरकलेले असल्याने ते अधिक स्वच्छ आढळते.
Sutonda 24
या टाकी समुहाच्या मध्यभागी दर्शनी दोन खांब असलेली अर्धवट कोरलेली लेणी असुन लेण्याच्या वरील बाजूस अजुन एक चारखांबी अर्धवट कोरलेले लेणे आहे.याला “सिता न्हाणी” असे नाव आहे. या दोन्ही लेण्यात पाणी साठलेले असुन लेण्यांच्या खांबावर काही प्रमाणात मुर्ती व नक्षीकाम पहायला मिळते. दुसऱ्या लेण्यापासून वर चढुन आल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर पोहोचतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १७४० फुट असुन त्रिकोणी आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर साधारण १५ एकर परिसरावर पसरलेला आहे.किल्ल्याच्या माथ्यावर आपल्याला बालेकिल्ल्याची तटबंदी आणि भुईसपाट झालेल्या वाडय़ाच्या अवशेषाबरोबर काही कोरीवकाम केलेले दगड देखील पहायला मिळतात. हे पाहुन नायगावच्या दिशेने थोडे खाली आल्यावर उजव्या हाताला वळुन आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावरील बुरुजावर पोहोचतो.
Sutonda 25
या बुरुजावरून परत उजवीकडे वळल्यावर आपल्याला अजुन दोन पाण्याची मोठी टाकी पहायला मिळतात.
Sutonda 26
यात एक लेणीवजा टाके असुन त्यात ८ खांब पहायला मिळतात. किल्ल्यावर असलेल्या तीन लेणीवजा टाक्यांची एकुण रचना पहाता हि पाण्याची टाकी मुळची लेणी अथवा कोठारे असुन त्यात पाणी पाझरल्याने कालांतराने त्यांचे रुपांतर पाण्याच्या टाक्यात झाले असावे.
Sutonda 27
उत्तरेकडील पाण्याची टाकी लहान दगड रचून तयार केलेल्या या दरवाजाच्या बाहेर त्या अवघड अशा डोंगरकडांवर तीन-चार मोठे पाण्याची टाकी आहेत. काही टाकी मातीखाली दबून झाकली गेलेली आहेत. त्या टाक्यांमध्ये लेण्या कोरण्याचाही प्रयत्न झालेला आहे. या टाक्यांच्या भिंतीत मूर्ती कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या डोक्यावर काही चित्रेही कोरलेली आहेत. या टाक्यांना दगडाचे कोरीव प्रवेशव्दार असून त्या दगडांच्या चौकटीवरही नक्षीकाम कोरलेले आहे. या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. या लेण्यांच्या वा लेणीवजा असणाऱ्या पाण्याच्या टाक्यांतील सगळे खांब हेसुद्धा नक्षीकाम केलेले आहेत. बहुतांश मोठमोठय़ा पाण्याच्या टाक्यांची रचना ही कोरलेल्या लेण्याप्रमाणेच आहेत.
दक्षिण दिशेची पाण्याची टाकी त्यापकी किल्ल्याच्या दक्षिण भागात असलेल्या दगडी टाक्यांचे तीन मजले आढळतात. यांची संख्या ही १० ते १५ असेल. प्रत्येक पाण्याच्या या लेणीचे (टाक्याच्या) छतावरून पुढे गेले तर आपण दुसऱ्या पाण्याच्या टाक्याच्या लेणीत घुसतो, तसेच वर चढून पुन्हा तिसऱ्या पाण्याच्या टाक्याच्या लेणीत शिरतो. अशी ही पिण्याच्या पाण्यांच्या टाक्यांची तीनस्तरीय रचना किल्ल्याच्या दक्षिण भागात दिसते. या पाण्याच्या लेणीवजा टाक्यांत मोठमोठय़ा कोरीव खांबांच्या १५ ते २० फुटांवरील अशा तीन तीन रांगाही आढळतात. या एका रांगेतील खांबांची संख्या ही एक, दोनपासून ते ती आठ, दहापर्यंत लेणीनिहाय आहे. दोन दगडी खांबांमधील अंतर हे लेणींच्या आकारानुसार पाच फुटापासून ते २० फुटांपर्यंत आढळते. मोठय़ा पाण्याच्या टाक्यांना बाहेरच्या कडांना लागून पायऱ्याही आहेत. त्या पायऱ्यांनी पाण्यापर्यंत जाऊन पाणी घेता येते. खूप मोठा परिसर व्यापणाऱ्या काही टाक्यांना दगडांच्या कडांवर खिडक्याही कोरलेल्या आहेत. ही मोठी टाकी खोलीला कमी (पाच पासून २० फूट) असली तरी ती लांबीला व रुंदीला (२०० ते ४०० फूट) ती भरपूर मोठी आहेत. दक्षिणेकडील या पाण्याच्या टाक्यांचे पाणी अतिशय थंड व चांगल्या गोड चवीचे आहे. या टाक्यांचे पाणी साधारणत: चार ते पाच ठिकाणी गाळून आलेले असते.
Sutonda 28
या सगळ्य़ा पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी पाझरून आत आणणाऱ्या काही हिरवट रंगांच्या ढिसूळ अशा नहरवजा खडकांच्या रेषा उपयुक्त ठरतात असे काही ठिकाणी आढळते. खडकांत असलेल्या या हिरव्या खडकांच्या रंगीत रेषा पावसाच्या पाण्यामुळे अधिक ढिसूळ बनून तेवढा हिरव्या दगडाचा भाग बाजूला गळून जाऊन तो नहराचे वा पाण्याच्या चारीचे काम करतो असेही आढळते.
Sutonda 29
मुख्य प्रवेशद्वार व मागचे लहान दार याशिवाय तटबंदीला लागून इतर दरवाजे नाहीत.
सुतोंडा किल्ल्याच्या पूर्वे दिशेला काही मोठी लेणीवजा टाकी आहेत. काही ठिकाणी दोन तीन टाकी- लेणी- या सलग असल्या तरी एकातून दुसऱ्या टाक्यात ठरावीक उंचीवरून पाणी जावे असे दगडाला मोठे नक्षीदार छिद्र कोरलेले आढळते. दोन टाक्यांमध्ये अखंड दगडाची (टाकी कोरतानाच) भिंत तयार केलेली दिसते. अशा भिंतीची सहा ते १२ इंचाची जाडी ठेवलेली दिसते. दक्षिण-पूर्व दिशेला असलेल्या एका मोठ्य़ा टाक्यात पाच ते सात खांबांची आडवी रांग (पसरट) व चार खांबांची उभी (आत खोल होत जाणारी ) रांग आहे. तिसऱ्या खांबापर्यंत दोन ते तीन फूट पाण्यातून चालत गेले तर तेथे दक्षिणेकडील दगडाच्या भिंतीत अंधारात पाण्यातून किंचित वर असलेली गुप्त खोली आहे. ती कोरडी राहते, पाण्याचा अंशही तेथे नसतो. शत्रूपासून लपून बसणे किंवा धनदौलत लपवून ठेवणे या कामांसाठी ती वापरली जात असावी.
Sutonda 30
ही टाकी कोरताना दगडांचे जे उभे चिरे काढले आहेत, ते सगळे चिरे एकावर एक रचून तटबंदीच्या भिंती तयार केलेल्या आहेत. उत्तरेकडील लहान दरवाजाही तसल्याच चिऱ्यांचा आहे. समोरच्या कडय़ात कोरलेल्या मुख्य प्रवेशव्दारावरही वरच्या उंच िभतीच्या उभारणीसाठीही असलेच दगडाचे मोठमोठे चिरे वापरलेले आहेत. (असली टाकी कोरून बनविलेल्या तलावाच्या चौफेरच्या भिंती व पायऱ्यांसाठी असा चिऱ्यांचा वापर याच डोंगरातील गौताळा तलावावर केलेला आढळतो.) तसेच कन्नडपासून दहा किलोमीटर अंतरावरील किल्ले अंतूरच्या तलावाजवळील दर्गाच्या वरचा समोरील किंवा किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशव्दाराजवळची खोली समोरील दर्शनी भाग यावर फसविलेल्या तिरकस अशा चापट दगडांच्या तिरकस ठेवलेल्या तळ्य़ा (पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून ठेवलेल्या दारावरील तिरप्या पत्रांप्रमाणे) यांची रचना पाहता त्या रचनेशी जुळणारी रचना या सुतोंडा किल्ल्याच्या भव्य पडक्या कमानीच्या वर लावलेल्या दगडांच्या रचनेशी जुळताना दिसते. ते काम व तटबंदीच्या काही भागांचे काम हे जर सोळाव्या शतकातले असेल तर उत्तरेकडील मूर्ती असलेल्या लेणीवजा कोरलेल्या पाण्याच्या टाक्यांचा काळ हा चौथ्या पाचव्या शतकात घेऊन जाईल असे दिसते.
या किल्ल्यात कोठारे, घरे, तोफा, भुयारे असे काहीही आढळत नाही. मात्र कोणत्याही किल्ल्यात नसतील एवढी पाण्याची टाकी येथे खोदलेली आहेत. तीही अनेक मजली. ही लेणीवजा पाण्याचीच टाकी म्हणून कोरली की लेणी खोदलेल्या होत्या व त्यात पाणी पाझरल्याने कालांतराने पुढे किल्ला बनून ती पाण्याची टाकी म्हणून वापरली गेलीत हा प्रश्नच आहे. किल्ल्याची पाण्याची टाकी म्हणूनच ती कोरली गेली असतील तर जलनियोजनाचा, जलव्यवस्थापनाचा महाराष्ट्रातील तो एक उत्कृष्ट नमुनाच आहे. शे-पन्नास पाण्याची टाकी, तीनचार वेळा फिल्टर होऊन येणारे पाणी. दुष्काळातही टिकणारे पाणी. प्रश्न पडतो की हा किल्ला भव्यही नाही. मात्र एवढी पाण्याची टाकी का कोरलीत? कोणत्याही मोठय़ा किल्ल्यावर एवढी पाण्याची टाकी नाहीत. पाण्याची इतकी गरज कुठेही आढळलेली नाही. मग येथे एवढे पाणी का साठविले? अशी आख्यायिका आहे की, या किल्ल्याच्या एका हौदात टाकलेला लिंबु पाण्यावर तरंगत वाहात जाऊन तो आठ ते दहा किमी असलेल्या बनोटीच्या नदीकाठावरील महादेव मंदिराजवळील गो मुखातून बाहेर पडतो. अर्थात या अख्यायिकेत काडीचाही अर्थ नाही.
येथुन पुढे जाणारी पायवाट मोडलेली असल्याने परत फिरून नायगावच्या दिशेने असलेल्या तटबंदीवरून फेरी मारत इदगाहच्या खालील बाजूस यावे.
Sutonda 31

Sutonda 32
इथे एक मध्यभागी मोठी कमान व शेजारी दोन लहान कमानी तसेच टोकावर लहान मनोरे असे बांधकाम असलेली इदगाहसारखी वास्तु दिसते. या वास्तुच्या डाव्या बाजूस दोन कबरी असुनकिल्ल्याची या भागात असलेली तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहे. या तटबंदीत आपल्याला एकुण ४ बुरुज पहायला मिळतात. यातील नायगावाच्या दिशेने असलेल्या टोकावरील बुरुजावर आपण किल्ल्यावर येताना खालील पठारावरून पाहिलेला दरवाजा आहे.
Sutonda 33
कोणत्याही प्रकारचे मिश्रण न वापरता हा ५ फुट उंचीचा दरवाजा केवळ घडीव दगड एकावर एक रचून बांधलेला आहे. या दरवाजातून घसरड्या वाटेने १५ मिनीटात आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो.
या आधी एक वाट उजव्या हाताला फुटते. काहीशी दाट गचपणातून जाणारी हि वाट जाते, किल्ल्याच्या पोटात असलेल्या जैन लेण्याकडे,”जोगवा मागणारीच लेण”. चोर दरवाजातून किल्ला उतरायला सुरुवात करावी साधारणपणे अर्धा किल्ला उतरल्यावर उजव्या बाजूची पायवाट पकडावी व तटबंदीला समांतर चालत रहावे.
Sutonda 34
चोर दरवाजापासून दुसर्‍या बुरुजाखाली कातळात खोदलेली दोन लेणी पहायला मिळतात. स्थानिक लोक याला जोगवा मागणारीच लेण किंवा जोगणा मांगीणीच घर या नावाने ओळखतात. यातील पहील्या लेण्याचे ओसरी व सभामंडप असे दोन भाग असुन ओसरीला दोन खांब कोरले आहेत.
Sutonda 35
दालनाच्या ललाटबिंबावर तीर्थंकराची प्रतिमा कोरलेली आहे.
Sutonda 36
या दालनात उजव्या बाजुला २.५ फूट उंच मांडीवर मूल घेतलेली अंबिका यक्षीची मुर्ती असुन वरच्या बाजूला भिंतीत महावीरांची प्रतिमा कोरलेली आहे. डाव्या बाजूच्या दालनात २ फूट उंच सर्वानुभूती या यक्षाची प्रतिमा भिंतीत कोरलेली आहे. आतील दालन चौकोनी असुन धुळीने भरलेल्या या दालनात कोणतेही कोरीव काम नाही. लेण्याच्या पुढील भागात कातळात खोदलेल्या काही पायऱ्या असुन या पायऱ्यानी वर गेल्यावर दोन खांब असलेले दुसर लेण पहायला मिळत.आत बसण्यासाठी भिंती लगत दगडी बाक कोरलेले आहेत.
Sutonda 37
लेण्याबाहेर पाण्याचे टाके असुन या लेण्यात मोठया प्रमाणात गाळ भरला आहे. हे लेण पाहून मुळ पायवाटेवर आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. या लेण्याकडे जाणारी पायवाट मळलेली नाही, तसेच बर्‍याच स्थानिक लोकांनाही या लेण्याचा नक्की ठाव ठिकाणा माहीत नाही . गावातून माहीतगार वाटाड्या घेतल्यासच हे लेण सापडू शकेल.
येथुन गावात जाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ल्यावर असलेल्या लेण्या व पाण्याची टाकी पहाता गडाची रचना प्राचीन काळात म्हणजे ४-५ व्या शतकात झाली असावी. भुयारी दरवाजाच्या वरील भागातील तटबंदीचे बांधकाम पहाता हि तटबंदी बहमनी काळात बांधली गेली असावी व सोळाव्या शतकात बहमनी राज्याचे तुकडे झाल्यावर येथील राज्यकर्ते बनलेल्या निझामशाहीच्या ताब्यात हा किल्ला आला. बादशाहनामा ह्या ग्रंथात मोगल बादशहा शहाजहान याच्या आज्ञेवरून मोगल सरदार सिपहंदरखान याने इ.स. १६३०-३१ मध्ये मोठ्या फौजेच्या सहाय्याने सितोंडा किल्ल्यावर स्वारी केली व तेथील किल्लेदार सिद्दी जमाल याने शरणागती पत्करल्याचा उल्लेख येतो. औरंगाबाद ब्रिटीश गॅझेटमध्ये या किल्ल्याचा साईतेंडा म्हणुन उल्लेख असून तो कन्नड पासून उत्तरपूर्व दिशेला २६ मैल अंतरावर असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर औरंगजेबने काही देशमुखांना या किल्ल्यासाठी सनद दिल्याचा उल्लेखहि या गॅझेटियरमध्ये आला आहे.
औरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या सातमाळ डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत पण दौलताबाद अंतुर यासारखे प्रसिद्ध किल्ले सोडले तर इतर किल्ले तसे अपरीचीत आहे. महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणे व त्यांना जोडणारे काही महामार्ग सोडले तर रस्त्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. त्यामुळे या किल्ल्यांकडे कोणी फिरकत नाही. या परिसरात पर्यटन क्षेत्र चांगल्या पद्धतीने विकसित होण्यासाठी सगळं काही आहे. मात्र गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची, लोकप्रतिनिधींना ती दृष्टी येण्याची. ही सगळी स्थानके कन्नड आणि सोयगांव या तालुक्यांच्या ठिकाणाहून खूपच जवळ आहेत. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही पर्यटनस्थळे असणारा हा संपूर्ण डोंगरपट्टा कोणत्याही एका तालुक्यात आणि कोणत्याही एका आमदाराच्या किंवा खासदाराच्या कार्यक्षेत्रात येत नाही.
तालुका सोयगांव पण मतदारसंघ कन्नड किंवा सिल्लोड. त्यामुळे या डोंगरपट्टय़ाच्या पर्यटन विकासासाठी चाळीसगांव, कन्नड, नांदगांव, सिल्लोड आणि सोयगांव या प्रशासनिक व्यवस्थेचे एकत्रित असे नियोजन व्हावे लागेल. पाटणादेवी, पितळखोरा लेणी, मदासीबाबा, केदाऱ्या धबधबा, धवलतीर्थ धबधबा, गौताळा अभयारण्य, गौतमऋषी, सितान्हाणी, गोल टाकं व लेणी, धारकुन्ड लेणी, घटोत्कच लेणी, अजिंठा लेणी, जोगेश्वरी, मुडेश्वरी, कालीमठ, अन्वाचे मंदिर, पिशोरचे मंदिर, वाकी, पेडक्या किल्ला, चिंध्या देव, किले अंतूर, नायगांवचा वाडीसुतोंडा किल्ला, वेताळवाडी किल्ला, हळद्या किल्ला, खालच्या व वरच्या पट्टय़ातली शेकडो जुनी हेमाडपंथी मंदिरे, शेकडोवर असलेली पिण्याच्या पाण्याची कोरीव टाकी या पर्यटनासाठी जोडली जाणार होती. पंण ते होऊ शकले नाही. आजही ही सगळी तीर्थक्षेत्रांचा दर्जा प्राप्त झालेली स्थळे रस्त्यांच्या जोडणीअभावी व पर्यटकांच्या सोयीअभावी ओस पडलेली आहेत. फक्त ईच्छाशक्ती दाखविल्यास अनेक पर्यटकांची पावले ईकडे वळू शकतील. बघुया हे होते का?

( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

या धाग्यासाठी श्री. ओंकार ओक, पुणे यांनी त्यांच्या ब्लॉगवरची प्रकाशचित्रे वापरण्यासाठी परवानगी दिली, याबध्दल त्यांचे विशेष आभार.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s