पावनखिंडीचा रणसंग्राम

मौजे केर्ले-मार्गशीर्ष महिन्यातील एक निवांत दुपार. रब्बीची पेरणी होउन गाव तस निवांत झाले होते.गावकर्‍यांशी हवापाण्याच्या गप्पागोष्टी उरकून गावचा पाटील पारावर निवांत पसरला होता. डोक्याशी कुर्‍हाड ठेवून तो निवांत पारावर पसरला होता. भल्या पहाटे थंडीचे श्रम केल्याने त्याचा डोळा लागला इतक्यात गावच्या वेशीतून पोरेटोरे गलका करत चावडीकडे पळत आली. पोरांच्या दंग्याने जागा झालेला पाटील खेकसलाच,”काय कालवा लावला रे?”. पोरं घाईघाईने बोलु लागली.पळाल्यामुळे धापा टाकता टाकता त्यांनी सांगितले कि उगवतीकडून एक फौज येत आहे.
   फौज ?
  पाटलाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आत्ता तर खरीपाची वसुली करुन बादशाही अंमलदार गेले होते.मग हि पातशाही भुतावळ पुन्हा गावाकडे कशासाठी आली असेल ? बर काही गुन्हा,तंटाही झाला नव्हता. आणि झाला असता तरी त्यासाठी इतकी फौज यायचे कारण नव्हते.
    विचार करायला फार वेळ नव्हता,पाटलाने घाईघाईने कुर्‍हाड उचलली, पोरांना दरडावून घरात लपायला सांगितले आणि गावाच्या वेशीकडे तो निघाला. वेशीबाहेरच्या झाडाखाली डोळ्यावर हात धरुन पाटील निरखून बघत होता.धुळ उडत होती, घोड्यांचा टापा एकु येत होत्या.नक्कीच फौज होती. आता हि साडेसाती परत का आली? पुढ्च्या आक्रिताच्या कल्पनेने पाटलाच्या पोटात गोळा उठला.तरीही धीर धरुन तो नेटाने तिथेच उभा राहीला. फौजा जवळ आल्या, तसे धुळीतून सैनिक दिसायला लागले. आणि पाट्लाला एक महत्वाची गोष्ट दिसली.
   भगवे निशाण !!
पातशाही फौजेत भगवे निशाण ? आँ ? अचानक त्याच्या डोक्यात उजेड पडला. हि आदिलशहाची भुतावळ नव्ह्ती.हे तर आपलच राजं ! शिवाजी राजे !! केर्ले गाव गेली कित्येक वर्ष करवीर परगण्यात आदिलशाहीच्या वरवंट्यात भरडत होतं.पण लांब तिकडे कर्यात मावळात्,पुण्याकडल्या अंगाला शहाजीच्या ल्येकाने स्वराज्याचा डाव मांडल्याच्या खबरा येत होत्या. जेजुरीला जाणारे भाविक,वारीला जाणारे वारकरी आणि व्यापार्‍यांकडून बातम्या मिळायच्या. आपला ह्यो मुलुख कधी या जाचातनं सुटायचा ? पाटलाला खंत वाटायची. शिवाजी राजाची नजर इकडे कवा वळायची तवाच सुटका व्हायची. पण त्यो क्षण आलाच जणु. आठवड्यामागं जावळीच्या रानात प्रतापगडाच्या पायथ्याला विजापुरच्या अफझुलखानाला मारल्याच्या बातम्या आल्या होत्या. आज दस्तुरखुद्द राजाची फौज गावात आली होती. हरखलेल्या पाटलानं कुर्‍हाड बाजुला टाकली आणि तो पुढ झाला.
   इतक्यात फौज जवळ आली. खिंकाळणारी, फुरफुरणारी घोडी जवळ आली, निशाणाचा घोडा तर उधळत होता. बघता बघता मराठे सैन्य पाटलाच्या पुढ्यात आले सुध्दा. खुद्द शिवाजीराजेच पुढ होते. पाटलाने राजांना आधी बघितले नव्हते, पण त्या तेजपुंज घोडेस्वाराला बघून पाटील उमगून गेला, ‘ह्येच शिवबा राजं’. पातशाही अमंलदारासमोर नाईलाजाने कंबर वाकवायची सवय लागलेल्या पाटील नकळत अदबीने झुकला आणि त्रिवार मुजरा केला. हात जोडून तो उभारला.
    राजे घाईत होते. पन्हाळयाचा बुरुज आता उत्तर आस्मानात दिसत होता आणि त्यावर उन्मत्तपणे फडकणारे ते आदिलशाही निशाण आता उडवायचे होते. वेळ नव्हताच. पाटलाची वास्तपुस्त करुन आणि त्याला धीर देउन राजांनी घोडा फेकला आणि मागोमाग फौजा उधळल्या. पाटलाला भरुन आले. लई हाल सोसले, आयाबहीणी लुटताना पाहील्या, टोळधाड परवडली अशी बादशाही फौजांनी केलेली लांडगेतोड निमुटपणे सोसली. आता सुटका होणार ,सुखाचे दिस येणार, कधी नव्हे ती निवांत झोप लागणार. पाटलाने वाडी रत्नागिरीच्या डोंगराला हात जोडले,’देवा जोतिराया ! राजाला यश दे ! ह्यो मुलुख त्या पातशाही दैत्याच्या तावडीतून सोडव”.
राजांची फौज गेल्या काही दिवसात विजयाची भुकेली होती. हात घालावं त्या मुलुखात यशच मिळत होत. आता समोर होता प्राचीन थेट शिलाहारांशी नाते सांगणारा पन्हाळागड, पर्णालक दुर्ग. आता हा गड घ्यायचाच. ताबडतोब फौजा पांगल्या एक तुकडी मावळतीकडे तीन दरवाज्याचा मोहरा घेउन पांगली. एक तुकडी उत्तर अंगाशी भिडली, तर खुद्द राजे उगवतीला उभे होते, त्यांच्या बाजूने चार दरवाज्याला मराठे गुळाला मुंग्या चिकटाव्यात तसे चिकटले. गडावरचा आदिलशाही किल्लेदार बावचळलाच. गड म्हणावा तसा चोख नव्हता. गरजच काय ? भोवताली एसैपैस आदिलशाही मुलुख पसरलेला. मोगलांचा थोडा धोका होता, पण औरंगजेब दक्षीणेतून उठून दिल्लीला गेला, पातशहा झाला आणि तो दाब गेला. नाही म्हणायला शहाजीचा मुलगा सिवाने तिकडे मावळात धुमाकुळ घातलेला होता, पण तो ईकडे लांब पन्हाळ्यावर कशाला येतोय. शिवाय पातशाहांनी अफझलखानाला नुकताच तिकडे पाठविला होता. तो त्या शिवाला संपवणार नाही तर पकडून विजापुरला नेणार.शहाजीला या अफझलखानाने असाच पकडून नेले नव्हते का ? आदिलशाही किल्लेदार का निवांत नसावा ?
   पण पाच दिवसापुर्वीच गडावर खबर आली होती. अफझलखान बिन महमदशाहीला त्या शिवाने प्रतापगडावर फाडला होता. या खुदा ! किल्लेदार सुन्नच झाला. त्याचा कानावर विश्वास बसत नव्हता. पुन्हा पुन्हा त्याने जासुसाला खोदून विचारले, जवाब एकच, ‘होय ! खानाला मारले’. किल्लेदाराचे हातपायच गळाले. हबकलाच तो. अचानक झट़का आल्यासारखा उठला आणि गंगा,जमुना कोठीकडे पळाला.कोठीजवळच्या पहारेकर्‍याला समजेना ,किल्लेदाराला काय झाले.कोठी उघडायचा हुकुम झाला.धान्याची पोती पुरेशी आहेत याची किल्लेदाराने स्वताच्या डोळ्यांनी खात्री केली. आता वेळ होती दारु कोठार बघायची. तीन दरवाज्याकडे किल्लेदार धावत निघाला. तिन्ही दरवाजे आणि बुरुजांची पहाणी करुनही त्याचे समाधान झाले नाही. जो सिवा अफझलखानासारख्या नामांकित सरदाराला सैन्यासह गिळतो, त्याच्याशी हा किल्ला किती दिवस मुकाबला करेल ? कसलीच खात्री नव्हती. पण आता आदिलशाही चांद तार्‍यासाठी, धर्मासाठी, इस्लामसाठी झुंजायचे होते. घाइघाईने त्याने गडावरचा जासूस बोलावला आणि रसद, दारुगोळ्यासाठी विजापुरला पत्र लिहीले.जासूस रवाना झाला. आता जरा किल्लेदाराचे मनाचे समाधान झाले.पण ….. अचानक दुपारी गडावर जासूस मनहुस खबर घेउन आला. सिवाने कोल्हापुर घेतले. सिवा कोल्हापुरात आला, म्हणजे तो आता पन्हाळ्यावर येणार हे नक्की! या खुदा ! गड अजून होशियार नाही आणि या सैतानाला तोंड द्यायचे कसे ?
     आले,आले म्हणेपर्यंत ते मनहुस मराठे मुंगळ्यासारखे गडाच्या चोहोबाजूने पसरलेले दिसू लागले.गडाला चिकटून वर यायला लागले.घर फिरले कि वासे फिरतात, याचा प्रत्यय किल्लेदाराला आलाच. गडाच्या घेर्‍यातील गावे या सिवाच्या मराठ्यांच्या मदतीला धावली. दगाबाज ! पण आता वेळच नव्हता. वेड्यासारखा सैरावरा किल्लेदार तटावरुन पळायला लागला. आदिलशाही सैनिक बाण चालवायला लागले, गोफणगुंडे सुटले.तोफा फुटायला लागल्या.पण काही उपयोग होत नव्हता.एकीकडून या मराठ्यांना आवरावे तो दुसरीकडून चढून येत होते.बर गड औरसचौरस पसरलेला. आवरायचे तरी कसे ?नतीजा ?
     आता सुर्य मावळून अंधार पडला होता. अंधार तर या मावळ्यांचा कित्येक वर्षाचा सखा. रात्र झाली कि सह्याद्रीच्या भुताना दुप्पट अवसान चढायचे, ते बादशाही फौजेला एकायचे होय. एखादा मावळा आत आला कि तो तोफा उडवणार्‍याला गारद करायचा.अखेर गडाला माळा लागल्या. भराभर मावळे चढून येउ लागले. ईकडे चार दरवाज्याच्या चोर दिंडीतून मराठे आत घुसले, दरवाजा करकरत उघडला आणि बघता बघता मावळी भुते आत घुसली.शाही किल्लेदार शर्त करत होता.’मारो ! काटो ! शिकस्त करो !’ आरडाओरडा, थयथयाट सुरु होता, पण विजापुर सैन्याचा धीर सुटला.एवड्यात अंधारातून एक वार खाशा किल्लेदाराच्या मानेवर झाला, त्याचे मुंडकेच तुटून जमीनीवर पडले आणि शाही फौजेचा प्रतिकार संपला.
                   संबंध गडावर एकच आरोळी उठली. “हर हर महादेव !”.
        त्या अर्धवट प्रकाशात विजयी आनंदात काही मावळे गडाच्या खाली मशाली घेउन धावत सुटले. राजांना या आणखी एका नव्या विजयाची वार्ता द्यायची होती. अर्थात त्यात नवीन काय होते, कारण गेले पंधरा दिवस उगवणारा नवा सुर्य फक्त विजयाच्या वार्ता घेउन येत नव्हता का ? गडाखालच्या गावात राजे पुढचा मनसुबा रचत आणि गावकर्‍यांशी बोलत बसले होते. राजांना मुजरा घालून आनंदाची बातमी दिली गेली.” राजे ! गड फत्ते, पन्हाळा काबीज झाला”.सगळीकडे एकच खुशीची लहर उठली. राजांबरोबर असलेले बाजी, फुलाजी साखरा वाटु लागले.ईतक्यात राजे उत्तरले, “बाजी आम्ही गडावर जाणार”
   बाजी थक्क झाले “इतक्या रात्री ? राजे गड आता आपल्याच ताब्यात आहे.उद्या सकाळी सगळेच गडावर गेलो तर?”.
  राजे आतूरतेने म्हणाले,”नाही बाजी ,आम्हाला हा पन्हाळा आत्ताच बघायचा आहे.अहो फार प्राचीन गड आहे हा. शिलाहारांनी वसवलेली हि राजधानी या पातशाही जुलुमाने बाटली होती.गडावरची दैवत जुलुम सहन करत निमुटपणे चोरून रहात होती.आता या गडावर भगवे निशाण लावले आहे.तीनशे वर्षानंतर आज कोठे गड मोकळा श्वास घेतो आहे. आज आमचे देवदेवता भरभरुन आशिर्वाद देत आहेत, आज या गडावर स्वराज्याचा मोकळा वारा वाहतो आहे.गड आम्हाला आजच बघायचा आहे.रात्र झाली, अंधार झाला म्हणून काय झाले? मशालीच्या उजेडात आपण हा महादुर्ग बघुया”.
       घोड्याला टाचा मारल्या गेल्या आणि अंधारात मार्गशीर्षाच्या थंडीची पर्वा न करता महाराज आणि साथीदार पन्हाळ्यात पायउतार झाले. मावळे दिवट्या घेउन धावले आणि त्यांच्या सोबत महाराज गड निरखू लागले. हा सज्जाकोठी, हा गरजणारा वाघ दरवाजा, उत्तरेला रोख धरलेला दुतोंडी बुरुज, पिछाडी सांभाळणारा पुसाटी बुरुज, शिलाहारांचे स्थापत्य सांगणारा तीन दरवाजा आणि शेजारचा जलमहाल असणारी श्रीनगर उर्फ अंधारबाव, पराशर ऋषींच्या तपश्चर्येची साक्षीदार असणारी लगुडबंद, दौलती बुरुज, कलावंतीणिचा सज्जा, सादोबा,सोमेश्वर तलाव हे गडाची तहान भागवायला समर्थ होते, तर पोटात अनेक धान्याची पोती साठवणार्‍या त्या गंगा,जमना कोठ्या.सारे सारे पाहून महाराज प्रसन्न झाले.
 राजांना गड ताब्यात असण्याचे महत्व ठाउक होते. नवीन गड बांधाण्याची हौस होती.यामुळे प्रचंड खर्च व्हायचा. नवीन गड उभारण्यासाठी पैशाची तरतुद करायची वेळ यायची, तेव्हा कारभारी म्हणाले,”महाराज, हे गड उभारायचे म्हणजे फार खर्च येतो. हा खर्च करायलाच पाहिजे का ?”
    “गड नसता राज्य देश मोकळा रहातो.परचक्र येता प्रजा निराश्रय होते. आमचा पुणे परगणा कसा उध्वस्त झाला पाहिला कि नाही ? त्याचवेळी गडाचे महत्व आमच्यावर ठसले. आता आम्हाला स्वराज्य उभारायचे असेल तर बळकट किल्ले तय्यार ठेवायला हवेत.तरच या पातशाह्यांशी आम्ही टक्कर घेउ शकतो”.
  गड ताब्यात येउन चार दिवस उलटले. महाराज सदरेवर बसून गडाची व्यवस्था तपासत होते.गडाखालची गावे.महसुल, खुद्द गडाची तब्येत सांगणारी कागदपत्रे राजे जातीने तपासत होते. तोच हुजर्‍या आत आला आणि मुजरा करून वर्दी दिली,”महाराज गडावर सरनौबत येत आहेत”. सरनौबत म्हणजे नेतोजी काका. नेतोजीना महाराजांनी अफझलखानाला मारल्यावर आदिलशाही मुलुखावर सोडले होते. सरनौबतांनी मोठाच पराक्रम गाजवला होता. कवठे,बोरगाव्,मालगाव्,कुंडल,घोडगाव्,सत्तीकीर,दोदवाड, सांगली, गोकाक,मुरवाड, कागल,कुरुंदवाड्,किणी,आरग, अथणी,तिकोटे मोठा प्रदेश ताब्यात घेउन नेतोजी पन्हाळगडावर दाखल झाले. महाराज जातीने सदरेबाहेर आले, तोच नेतोजी आलेच. गळाभेट घेउन क्षेमकुशल झाले. नेतोजींनी सारी मुलुखगिरी सांगितली. महाराजांना परमसंतोष झाला. नेतोजीनी पुढची कामगिरी विचारली. महाराजांनी आज्ञा केली, “काका ! पन्हाळ्यासारखा बळकट किल्ला आताच स्वराज्यात दाखल झाला आहे.आता या मुलुखाचा चोख बंदोबस्त व्हायला हवा आहे. अजून काही आदिलशाही ठाणी आपल्या ताब्यात आलेली नाहीत. मिरजेचा भुईकोट असो किंवा मावळतीकडचा खेळणा असो, हि ठिकाणे नसतील तर पाचरीसारखी आपल्याला रोखत रहातील. तुम्ही एक तुकडी खेळण्याला पाठवा आणि तुम्ही स्वत: मिरज्,रायबागकडे कुच करा,अजून आदिलशहाचा दरबार भेदरलाय, त्यानाच आजून एक मावळी हिसका दाखवुया.”.
    लगोलग नेतोजी बाहेर पडलेच.यंदाचे सीमोल्लंघन जणु दसर्‍याला न होता मार्गशीर्षात झाले होते. लगोलग चार पाच दिवसात खेळणा घेतल्याची बातमी गडावर आली देखील. राजे लागलीच खेळण्यावर रवाना झाले. नवा मुलुख घेतल्याच्या बातम्या तर रोजच्याच झाल्या होत्या.
      गजापुरच्या घनदाट झाडीतून राजे अखेरीस खेळण्याच्या पायथ्याशी आले. पाताळाशी स्पर्धा करणार्‍या त्या दर्‍या, फक्त वार्‍याला फिरकू देणारे सह्यकडे आणि आडवातिडवा पसरलेला तो खेळणा महाराजांना विलक्षण आवडला. गडाच्या उगवतीची वाट विलक्षण अरुंद, बर तिथून चढायचे म्हणजे अवघड पायर्‍या आणि वर लक्ष ठेवणारा तो मुंडा दरवाजा. मावळतीकडची वाट तर थेट घसरगुंडीच जणु. हा गड ताब्यात आला म्हणजे तळकोकणाचे नाकच हातात आल्यासारखे होते. ईथून आता मराठी फौजा आता आचर्‍यापासून कुडाळपर्यंत जायला मोकळया झाल्या.
  एकदा महाराज आणि सर्व साथीदार फिरत फिरत कुवारखांबी कड्यापाशी आले. गडाचा वक्राकार कडा आणि त्याचे एका बाजुला असलेले सुळके मोठे भेदक दिसत होते. गडाच्या पुर्वेला सुर्याचे किरण जमीनीवर उतरणार नाहीत अशी घनदाट झाडी दिसत होती.महाराज हा नजारा बघत हरवून गेले.
    नेतोजीच्या उदगारांनी महाराजांची तंद्री भंग झाली, “इतके काय निरखून बघताय महाराज ?”.
  “काका ! हि घनदाट झाडी बघता आहात. याच जंगलाने , सह्याद्रीने आणि या खेळण्याने एका शत्रुला आस्मान दाखवले होते” राजे उत्तरले.
  “हि काय गोष्ट आहे?” सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली. महाराज सांगू लागले, “या गडावर एक  निकराची लढाई दोनशे वर्षापुर्वी झाली होती. या भागात बहामनी सुलतानाचे राज्य होते. अल्लाउद्दीन अहमदशहा राजधानी बिदर मधून राज्यकारभार पहात होता.पुर्ण हिंदुस्थानात मुसलमानी राजवट पसरत चालली होती. पण आपल्या या मराठी मुलुखात अनेक मराठा सरदार होते जे स्वतःच स्वतंत्र अस्तित्व राखून होते. अनेकदा हज यात्रेसाठी जलमार्गाने निघालेल्या यात्रेकरूंची कोकणात लूट केली जाई. या सगळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी अहमदशहाने आपला सर्वात पराक्रमी सरदार खलफ हसन मलीक उत तुज्जार याला कोकण मोहिमेवर पाठवले. मलिक उत तुज्जार सात हजाराची बहामनी सेना घेऊन निघाला. चाकणला त्याने आपली छावणी उभा केली आणि मावळातून तो कोकणात उतरला. रायरी वगैरे किल्ले ताब्यात घेतले. तिथल्या शिर्के नावाच्या मराठा सरदाराला त्याने आपल्या ताब्यात घेतले. या शिर्केना मलिक तुज्जारने मुसलमान होण्याची अट घातली. शिर्के म्हणाले, ‘मी धर्मांतर करण्यास तयार आहे मात्र शेजारच्या खेळणा गडावरील माझा शत्रू शंकरराय मोरे याचे देखील धर्मांतर करावे.’ शिर्केच मत होतं की फक्त मी जर धर्मांतर केले तर मोरे माझी अवहेलना करेल आणि माझी माझ्या बिरादरीत पत कमी होईल आणि प्रजेचं बंड होऊन माझ माझ्या वाडवडिलांपासुन ताब्यात असलेला प्रदेश माझ्या हातातुन जाईल. म्हणुन माझा प्रतीस्पर्धी शंकरराय याला प्रथम वठणीवर आणा आणि त्याच्या ताब्यातील प्रदेश माझ्या अधिका-यांच्या स्वाधीन करा. त्याचे देखील धर्मांतर झाले तर मला त्रास होणार नाही. अशी विनंती शिर्केनी मलिक उत तज्जारकडे केली.  मलिक तज्जारला ठाऊक होते की खेळणा हा अजिंक्य आहे. तिकडे जाण्याचा रस्ता हा बिकट आहे. पण शिर्क्यांनी खेळण्यापर्यंत पोहचवण्याचे त्याला वचन दिले. खेळण्याचा मोह मलिक तज्जारला आवरला नाही. अख्खी कोकणपट्ट्यावर आपलं वर्चस्व निर्माण होईल सुलतानाची शाबासकी मिळेल म्हणून मलिक तज्जार आपली सेना घेऊन शिर्क्यांच्या पाठोपाठ विशाळगडाच्या दिशेने निघाला. शिर्क्यांच्या गोड बोलण्याला मलिक तज्जार भूलला.त्यांनी त्याला सह्याद्रीच्या उंच कड्यावर आणून अडकवले.एकीकडे हे आपण पहातो आहोत ते घनदाट जंगल तर दुसरीकडे हि भयानक दरीकपारी. वाटा वाकड्या तिकड्या. एवढ्या प्रचंड सेनेला धड चालता देखील येत नव्हते. विसाव्याला जागा नव्हती. त्यातच मलिक उतज्जारला रक्ताच्या हगवणीचा त्रास सुरू झाला. त्याची सेना त्या जंगलात बेजार झाली होती.  अशातच बेसावध क्षणी शिर्के तिथून सुटले आणि विशाळगडावरच्या शंकरराय मोरेंना जाऊन मिळाले. दोघांनी मिळून ते हजारोंच बहामनी सैन्य सहज कापून काढलं. खुद्द मलिक उत तुज्जार या युद्धात मारला गेला. काका ! सह्याद्रीने हि केलेली मदत आपले लोक पुढे विसरले आणि आपल्या वाडवडीलांना या पातशाही गुलामगिरीला तोंड द्यावे लागले. फक्त आमच्या आबासाहेबांनी प्रयत्नाची शर्थ केली. अगदी हा खेळणा स्वकीयांच्या फितुरीमुळे तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला.”
    राजे बोलता बोलता स्तब्ध झाले. सगळेच जण निशब्द झाले.
आडवातिडवा प्रशस्त पसरलेला , शंकरराव मोर्‍याचा पराक्रम आणि मलिक रेहानची फजितीची कथा सांगणारा हा खेळणा महाराजांना आवडला, त्यांनी त्याचे नामकरण केले “विशाळगड”.
     विशाळगडावर महाराज काही दिवस राहिले आणि पन्हाळ्याला परत आले.
——————————————————————————————————————–
  “बा अदब बा मुजा ! होशियार ! सल्तनते आदिलशाही अली बादशहा पधार रहे है ! खडी ताजीम हो” भालदार,चोपदाराने ललकारी दिली, आणि विजापुर दरबार सुरु झाला. अवघा अठरा वर्षाचा अलि आदिलशहा तख्तावर येउन बसला. गेले महिनाभर दरबार भरायचा, पण कामकाज चालायचे ते जान नसल्यासारखे. जय्,पराजय दरबाराला नवीन नव्हते. पण त्या बंडखोर शहाजीच्या सिवाने अफझलखानाला मारल्यानंतर एक उदासी वातावरणात आली होती. त्यात वाई,मिरज,कोल्हापुरचा बराच मुलुख सिवाने बळकावला होता.आला दिवस काही तरी मनहुस खबर घेउनच यायचा. नुसत्या खबर नाही, तर आठवड्यापुर्वी अफझलचा बेटा फाजलखान विजापुरात आला होता,पण तो अजून घराबाहेरही पडला नव्हता. आज फाजल दरबारात हजर होता.मान खाली असली तर सारखा अस्वस्थपणे हाताचा चाळा करणारा आणि अंग विलक्षण ताठलेला फाझल आज दरबाराने पाहीला होता. ईतक्यात चिकाच्या पडद्यामागे हालचाल झाली आणि समस्त दरबाराने त्या दिशेने मुजरा घातला, बडी बेगम आज जातीने हजर होती. फाझलने ताबडतोब एक अर्जी शिपायाला दिली आणि बडी बेगमकडे सुपुर्द करण्यासाठी दिली आणि मान खाली घालून तो हुकुमाची वाट बघत उभा राहिला.
     “तो तुम सिवापर फिर एक बार जाना चाहते हो ?” अर्जी वाचल्यानंतर बडी बेगमचा तीक्ष्ण स्वर दरबारात घुमला.
“हां, बेगमसाहीबा” खाल मानेने पण निश्चयाने फाजल उत्तरला.
“हम तुम्हे जरुर ईजाजत देते  है|लेकीन ये मुहीम आसान नही, पता है ना?” पुन्हा एकदा बडी बेगमेने खडया स्वरात विचारले.
“जानता हुं साहिबा, लेकीन पिछ्ले सात दिन सो नही पाया | सोता हुं तो वो शैतान मराठे, जावलीका वो पहाडी और घने झाडीभरा मुल्क और वो चुहा सिवाही सामने आते है | अब्बुजान को तो एक पलभी भुलना मुमकीन नही | उन्हे कोई ईस तरहसे मार सकता है, अभी भी यकीन नही आता | वो तो प्रतापराव मोरे साथ जो उस घने झाडीसे वापस तो आ गये और अल्ला का लाख शुक्र है, हमारा जनाना बच गया|लेकीन अब सोचता हुं, फिर एकबार सिवा पे जा के अब्बाजान कि मौत का इंतकाम लुं, अगर आपकी इजाजत हो तो” फाझलचा स्वर दीन पण निश्चयी होता. त्याला काहीही करुन सिवाला संपवायचे होते. सिवासारख्या दुष्मनाचा काटा निघत असेल असेल तर दरबाराला हवेच होते.अफझल मेल्याने दरबारात जी उदासी पसरली होती, ती फाझलच्या या अर्जीने उडाली आणि पुन्हा एकदा चैतन्य पसरले.बडी बेगमने अर्जी मंजुर केली आणि फौज गोळा करायचा हुकुम केला.
 ईतक्यात रुस्तमेजमा पुढे आला आणि मुजरा घालून म्हणाला “बडी बेगम साहीबा, आपली ईजाजत असेल तर या मोहीमेत मलाही सोबत जाण्याची परवानगी द्यावी. त्या नेतोजी आणि सिवाजीने माझ्या मुलुखाला काबीज केले आहे.कोल्हापुर ते रत्नागिरी माझाच मुलुख आहे.मी ही बरोबर जातो आणि त्या सिवाला पन्हाळ्यावरुन हुसकावून शाही चाकरी बजावतो”.
    रुस्तमेजमा ???
  तो पुढे आलेला बघून बडी बेगमेच्या कपाळावर नकळत आठी चढली. सिवा याच्याच मुलुखात घुसतो आणि बरोबर तीन हजार स्वार आणि पायदळ होते.तरी याने त्या भोसल्याला रोखले नाही. हा आणि याचा वालीद पहिल्यापासून शहाजी भोसल्याच्या नजदीकीचे.याचा विश्वास धरावा का?
   पण फार विचार करायला वेळ नव्हता. आज सिवाने पन्हाळा घेतला.उद्या तो विजापुरवर आला म्हणजे पळायची वेळ येणार होती. काहीही करुन सिवाचा काटा दुर होत असेल तर बेगमेला ते हवेच होते. तीने ताबडतोब अर्जाला मंजुरी दिली.
————————————————————————————————————–
   पन्हाळ्याच्या सदरेवर नेतोजी,बाजी,फुलाजी, पन्हाळगडाचे किल्लेदार त्रिंबक भास्कर सगळे जमले होते. गडाच्या आणि ताब्यात घेतलेल्या मुलुखाच्या बंदोबस्ताची चर्चा सुरु होती. आदिलशाही प्रदेशावर कोठे मारा करायचा आणि काय ताब्यात घ्यायचे, याचे बेत आखले जात होते. ईतक्यात हुजर्‍या आत आला आणि मुजरा करुन म्हणाला, “महाराज ! जासुस आला आहे, विजापुरची काही तरी खबर आहे”.
“पाठव त्याला आत” राजांनी परवानगी दिली.
      जासुस आत आला मुजरा घालून म्हणाला, “महाराज विजापुर दरबारात पुन्हा हालचाली चालु झाल्यात. फाजलखान आणि रुस्तमेजमा फिरुन स्वराज्यावर यायला निघालेत.फौजा जमा केल्यात आणि मिरजेकडे निघालेत. ह्या दोघां सरदारांसमवेत दहा हजार फौज दिली आहे. तसेच हत्ती, तोफा, उंट वगैरे सारा थाट केला आहे.बरोबर मलिक इतबार, सादातखान, फत्तेखान, बाजी घोरपडे, सजेराव घाटगे आदी सरदार आहेत.”
    “फाजलला पुन्हा मावळच्या मिरच्याच्या ठेच्याची आठवण झालेली दिसते आहे.यावेळी बादशहाने बराच नजराणाही सोबत पाठवलेला दिसतोय” महाराजांच्या मुखावर स्मित होते. सदरेवर एकच हास्य उमटले.
“महाराज, येउ दे फाजलला. वाईत छापा घातला तेव्हा हा फाझल जनान्याबरोबर थोडक्यात निसटला.तेव्हाच तलवारी खाली यायचा, पण नशीब बलवत्तर म्हणून अंधारातून  पळाला. आता ह्यो मौका न्हाई सोडायचा.येउ देतच फाझलला”.नेतोजी खुशीत म्हणाले.
   “होय काका ! सोबत आमचा जुना सखा रुस्तमेजमा आहेच. रुस्तम आमच्या आबासाहेब शहाजी राजांच्या मित्राचा, रणदुल्लाखानाचा मुलगा. विजापुर दरबारात असला तरी आमचा आतून स्नेह आहे बरं का.तो बरोबर आहे म्हणल्यावर फाझल अलगद आमच्या तावडीत येतो कि नाही बघा” राजे उत्तरले.
   सगळेजण या नव्या मोहीमेचा व्युह रचायची तयारी करु लागले.
चारच दिवसांनी नजरबाजांनी खबर आणली, फाझल आणि रुस्तमेजमा कोल्हापुरला आले आणि पन्हाळ्याजवळ सरकायला लागलेत. सदरेवर ठरल्याप्रमाणे हुकुम सुटले. यावेळी गनीमीकावा वापरायची गरज नव्हती. मोकळा मुलुखात शाही फौजेला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा दिला कि पुन्हा विजापुरकर स्वराज्यावर आले नसते. घोड्यावर खोगीरा चढल्या,नाल मारले गेले,खरारे करुन घोडे सज्ज झाले.मावळे तर मनाने लढाईला आधीच तयार होते. पन्हाळ्यावर त्रिंबक भास्करांबरोबर बंदोबस्तासाठी बाजी, फुलाजी थांबणार होते. तर दहा हजार शाही फौजेला तोंड द्यायला पाच हजार मराठी वाघ निघाले. गोदाजी जगताप, वाघोजी तुपे,हिरोजी इंगळे, भिमाजी वाघ, सिधोजी पवार, महाडिक, जाधव, पांढरे, खराटे व सिद्दी हिलाल हे महाराजांचे साथीदार व अर्थातच सरनौबत नेतोजी होतेच. सोमेश्वराचे आशीर्वाद घेउन वेगाने सैन्य कोल्हापुरच्या दिशेने निघाले. थोड्या वेळात त्यांना आदिलशाही चाँदतार्‍याबरोबर असलेल्या फौजा दिसु लागल्या. फाझलला बहुधा शिवाजी ईतक्या लवकर आपल्या समोर असा उघड्या मैदानात येईल, याची अपेक्षा नसावी. पन्हाळ्यावर हल्ला करायची योजना तो तयार करत होताच, तो हि सगळी झुंड त्याच्यासमोर होती. धीर धरुन रुस्तमेजमान फौजेला तयार करु लागला.रुस्तम स्वतः मध्यभागी, रुस्तमच्या डाव्या अंगाला फाझलखान, उजव्या अंगाला मलिक ईतबार्,पिछाडीला अजिजखानचा मुलगा फतहखान, बाकी मुल्ला.बाजी घोरपडे, सर्जेराव घाटगे होतेच.
    हे सगळे थोड्या अंतरावरुन मराठी फौज बघत होती.
   नेतोजीने तातडीने आपल्या सैन्याला आदेश दिला आणि रचना केली.उजव्या अंगाला पांढरे,खराटे, डाव्या बाजु सिद्दी हिलाल,जाधवरावांवर सोपवली, सोबत हिरोजी ईंगळे,भिमाजी वाघ, गोदाजी जगताप, सिदोजी पवार्,परशुराम महाडीक होतेच. दोन्ही फौजा चढाईला सज्ज झाल्या. महाराज आपल्या फौजेला म्हणाले, “हिरोजी तु मलिक ईतबारला टिपायचे, महाडीक तुम्ही फत्तेखानाला धरा, सिदोजीची गाठ सादतखानाशी, गोदाजी तु सर्जेराव घाटगे आणि घोरपड्याला घेरायचे, नाईकजी राजे आणि खराटे राजे यांनी फौजेच्या उजव्या अंगाला कापायचे, जाधवराव आणि सिद्दी हिलाल डावी बाजु मारतील. रुस्तमेजमाशी आमचा स्नेह आहेच ,आम्ही जातीने त्याच्यावर यल्गार करतो.चला, उठा,झोडपा हि शाही फौज ! कळू देत विजापुर दरबाराला मराठी मुलुखात आल्याचा नतीजा”.
   राजाच्या शब्दांनी मावळ्यांना दहा हत्तीचे बळ आले, समोरच्या फौजेत हत्ती असले तरी आता मराठी वाघ त्यांना झोंबायला सज्ज झाले, भगवे झेंडे नाचु लागले, शिंग फुंकली, कर्ण्यांनी एकच गिलका केला. आपल्याला नेमून दिलेल्या सावजाच्या दिशेने पाण्याचा लोंढा फुटावा तसे मराठे आदिलशाही फौजेवर तुटून पडले.
आपली जुनी हुकलेली शिकार फाझलखानाच्या दिशेने नेतोजी मोठ्या तडफेने निघाला. राजांनी थेट रुस्तमेजमानचा वेध घेतला. शाही फौजेत हत्ती होते,त्यामुळे सरदारांना चपळपणे हालचाल करता येईना.बघता बघता मराठी फौजांनी विजापुरी फौजेला चारही बाजूनी घेरुन टाकले. राजांच्या जोरदार हल्ल्यामुळे रुस्तमेजम्याची फौज कापली जाउ लागली, तर नेतोजीचा आवेश फाझलखानाला आवरेना. विजापुरच्या सरदाराना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आणि अशावेळी काय करायचे ते त्यांना आता माहिती झाले होते. अगदी पुरंदरवर हल्ला केल्यानंतर फत्तेखानाच्या फौजेने तेच केले होते, अफझलखानाला फाडल्यानंतर त्याच्या फौजेने तेच केले होते.आताही काही वेगळे करायची गरज नव्हती. एकच गोष्ट म्हणजे “जीव वाचवून पळुन जाणे”.प्रश्न ईतकाच कि आधी कोण पळून जाणार ? अर्थात नुकताच याचा अनुभव असलेल्या फाझलखानाशिवाय हे धाडस कोण दाखवणार. आणि फाझल मोहरा वळवून पळत सुटलाच. हत्तीवरुन उडी मारुन घोड्यावर मांड टाकून गडी विजापुरच्या दिशेने पळत सुटला. एकदा सेनापतीने पळायचे धाडस दाखवल्यावर फौजेला त्याच्या मागोमाग जायला अडचण नव्हती. रुस्तमेजमाही मागेमागे हटून एका क्षणी गर्रकन वळाला आणि पळत सुटला. याचीच वाट बघत असलेले बाकीचे सरदारही बेभानपणे विजापुरकडे दौडू लागले. रणभुमीत फक्त बेवारस हत्ती आणि घोडेच काय ते शिल्लक राहीले. शाही फौजेची पाठ बघणार्‍या मावळ्यांनी हसत हसत बारा हत्ती आणि दोन हजार घोडी ताब्यात घेतली आणि पन्हाळ्याचा चढ चढू लागले. अजून एक दैदीप्यमान विजय मिळवून राजे प्रसन्न मुद्रेने गडात प्रवेश करते झाले.
    काय कमाल होती ना ? अवघ्या वीस वर्षापुर्वी हेच मावळे आदिलशाही नाही तर मोघली चाकरीत धन्यता मानायचे.आपण कधी जिंकु हा आत्मविश्वासच यांना नव्हता. बादशहासाठी प्रसंगी आपल्याच सग्यासोयर्‍यांचे खुन पाडयलाही यांनी कधी मागेपुढे पाहीले नव्हते. तेच मावळे आज पातशाही फौजेला सळो कि पळो करुन सोडत होते. सह्यशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्या कि काय चमत्कार होतो याचा अनुभव मराठी मुलुख घेत होता.
     दुसर्‍या दिवशी सदरेवर सगळे मानकरी एकत्र जमले. एकुण पन्हाळा मराठी फौजेला शुभशकुनी ठरला होता. नेतोजी, गोदाजी कालच्या युध्दातील गंमतीजमती सगळ्यांना सांगत होते. सदरेवर हास्यकल्लोळ उठत होते.ईतक्यात महाराज येत असल्याची ललकारी आली.सगळे सावरुन बसले.
   “महाराज, कालचे युध्द लाभदायक ठरले म्हणायचे. हत्ती,घोडे तर मिळालेच्,पण आदिलशाही फौजेला बसलेला हबका बघता आता तिकडून ईतक्यात कोणी पुन्हा स्वराज्यावर चालून येणार नाही असे वाटते” त्रिंबक भास्कर मुजरा घालून महाराजांना म्हणाले.
  “खर आहे पंत ! मार मोठा जोरदार खाल्लाय. शाही फौजेला पराभव नवीन नव्हता. औरंगजेब द्क्षीणेत होता, तेव्हा विजापुर दरबार दबकून होता. ईकडे आम्ही त्यांचा मुलुख मारीत होतो, तिकडे आलमगीर किल्ले बळकावत होता. औरंगजेबाचा इरादा आदिलशाही बुडवावी असाच होता.नंतर त्याला आमच्याकडे लक्ष देता आले असते. पण नेमक्या वेळेला शहाजहान आजारी पडला आणि आम्हा दोन्ही दख्खनी शाह्यांचा हा मोघली दाब गेला. ह्याच संधीचा आता फायदा घ्यायचा आहे. विजापुर दरबार आता गलितगात्र झाला आहे. मोघलांचा कोणी नामी सरदार लगेच स्वराज्यावर येईल ईतका जवळ नाही. आपल्याला पुढची चाल लगेच खेळायला हवी. काका, तुम्ही आजच फौजा घेउन निघा. मिरज्,विजापुर परिसरात दौड मारा आणि शक्य तितका मुलुख मारा. आम्ही दोरोजीला कोकण ताब्यात घ्यायला दाभोळ, राजापुरकडे पाठविले आहे, त्याचीही काही खबर यायला हवी” राजे विचारात व्यग्र होते.
   नेतोजी मुजरा घालून मोहीमेच्या तयारीसाठी निघाले.
     पुढे चारच दिवसांनी सदरेत नेतोजीनी मिरजेच्या भुईकोटाला वेढा घातला आहे. आजुबाजुच्या गावातील जमीनीचे तंटे गडावर आले होते.कारभार्‍यांबरोबर बसून त्याचे निवारण सुरु असताना एक बातमीदार राजापुरकडून आला. मुजरा घालून त्याने खलिता पुढे केला आणि परामर्श सांगितला.
   “महाराज, दोरोजीने दाभोळ बंदरावर झडप घातली,पण बातमी लागताच दाभोळचा सुभेदार महमुद शरीफ तीन गलबत घेउन राजापुरला पळाला आणि अंग्रेजांच्या आसर्‍याला गेला. पण आंग्रेजांना हे झेपणारे वाटले नाही, त्यांनी एक गलबत राखतो म्हणून सांगितले.आपला दोरोजी गप्प बसतोय होय.तो तातडीने राजापुरवर गेला. हि खबर लागल्याबरोबर शरीफ एका भाड्याच्या गलबतात बसुन वेंगुर्ल्याकडे पळाला. त्याची तिन्ही गलबत राजापुर बंदरातच उभी असल्याची पक्की खबर दोरोजीला मिळाली होती. गोर्‍यांनी युक्ती मोठी नामी केली होती, शरीफच्या गलबतावर त्यांनी आपली निशाणं लावली होती,पण दोरोजीला संशय आलाच्,त्यांनी गलबत तर ताब्यात घेतलीच पण फिलीप गिफर्ड म्हणुन एक गोरा अधिकारी पकडला आणि त्याला आपल्या खारेपाटणच्या भुईकोटात बंद करुन ठेवले आहे. त्याच्याबरोबर वाटाघाटी करुन काही कलम कबुल करुन मंजुरीला दोरोजीनं खलिता घाडला आहे”.
     जासुसाने बयाजवार सगळा मामला सांगितला. सगळ्या सदरेला वाटले, आता महाराज त्या गोर्‍याला सोडत नाहीत. पण महाराजांनी शांतपणे खलीता वाचला आणि लगेच मंजुरी दिली. सगळ्यांनाच या मसलतीचा धक्का बसला. न राहून त्रिंबकपंतानी विचारलेच,”महाराज टोपीकर तसे आपले शत्रुच आहेत. आपणही त्यांच्यावर नजर ठेवता.मग आयता आलेला हा गोरा का सोडायचा ?”
  “पंत ! हे राजकारण आहे.ईथे दुरचा विचार करावा लागतो. साता समुद्रापलीकडून हे टोपीकर व्यापारी म्हणून येतात्,अलगद तागडी बाजूला करुन तलवार हाती घेतात.ईथल्या राजकारणात नाक खुपसतात.हे सगळे आम्हाला दिसते. पण त्याहून जास्त आम्हाला काय सलत असेल तर तो जंजिरा ! पाण्यात जैसा उंदीर असल्याप्रमाणे जंजिर्‍यात बसलेला सिद्दी. त्याच्या जीवावर तो आमच्या रयतेला उपद्रव देतो, मुलुख उध्वस्त करतो.त्याला मारायचे तर आरमार हवे,दारुगोळा हवा. या टोपीकरांनी मदत केली तर जंजिरा मोहीम अशक्य नाही. दोरोजीने नेमके हेच राजकारण आमच्या पुढे आणले आणि म्हणूनच आम्ही त्याला मंजुरी दिली. पंत काट्याने काटा काढलेला चांगला. अंग्रेजांची मदत घेउन सिद्दी बुडवला तर एक शत्रु कमी होईल आणि रायगडही सुरक्षित होईल. आमची नजर या पुढ्च्या चालीवर आहे. बघुया, टोपीकर कशी मदत करतात ते.नाही तर राजापुर आता आपल्याला फार लांब नाही.”
    सगळ्यांनीच या मसलतीला माना डोलावल्या आणि सदर पांगली.
   राजे गडाच्या गडाच्या फेरीसाठी पुसाटी बुरुजाच्या बाजूला गेले होते. थंड वार्‍याच्या प्रसन्न झुळका मनाला सुखावीत होत्या. बरोबर असलेल्या सोबत्यांशी पुढचे बेत ठरविले जात होते. ईतक्यात हुजर्‍या जवळ आला आणि मुजरा घालून म्हणाला “महाराज, सदरेवर जासूस येउन थांबला आहे. मिरजेकडची खबर आली आहे”.
    मिरज ! म्हणजे नेतोजी काकांनी किल्ला घेतला कि काय ? सगळेजण लगबगीने सदरेकडे निघाले. नजरबाजाने खलिता पुढे केला, राजे उत्सुकतेने वाचू लागले. खलिता पुर्ण वाचून झाल्यावर त्यांनी बाजुला ठेवला. त्यांची मुद्रा काहिशी चिंताक्रांत दिसत होती.
    “मिरज अडून बसले आहे तर ! काका मिरजेच्या कोटाबरोबर भांडत बसलेत्,पण मिरजेचा भुईकोट म्हणजे मातीचा. तोफा डागून उपयोग नाही.भोवती खंदकही आहे. आदिलशाही अंमलदारही हुशार दिसतो.काकांचा वेळ ईथे वाया जाता कामा नये. त्यांना मोठा आदिलशाही मुलुख मारायची आत्ताच नामी संधी आहे.असे एका ठिकाणी नेतोजी काका ठाणबंद होता कामा नयेत. दस्तुरखुद्द आम्ही उद्याच निघतो. काकांना मोकळे करणे गरजेचे आहे. गोदाजी,पंत,हिरोजी फौजेला तयार रहायचा हुकुम द्या.उद्या सुर्य उगवल्यावर आम्ही गडाबाहेर पडणार आहोत”.
    राजांनी एकाच मुक्कामानंतर मिरज गाठले. ईतक्या तातडीने राजे आलेले बघून नेतोजी घाईघाईने पुढे झाले आणि मुजरा घालून म्हणाले,”महाराज, वार्याच्या वेगाने आलात जणू. या कोटाला वेढा घातला, पण तोफा चालेनात, काही भेद दिसेना आणि किल्लेदार बी चिवट आहे. पण अजून मी हिंमत हरलो नाही.ह्यो चाँदतारा उखडून फेकणारच”.
   “काका ! तुम्ही पराक्रमाची शर्थ करीत आहात.पण या अश्या एका ठाण्याला वेळ घालवून उपयोगाचे नाही.अद्याप विजापुर दरबारातून काही हालचाल झालेली नाही. वेळ आहे तोपर्यंत त्यांच्या मुलुखात खोल शिरा.मिरजेच्या ठाण्याची आघाडी आम्ही सांभाळतो”
    दुसर्या दिवशी सकाळी नेतोजी फौज घेउन आदिलशाही मुलुखात उगवतीकडे निघून गेले. महाराजांनी मिरजेच्या कोटाभोवती तातडीने वेढा आवळला. पण किल्लेदारावर त्याचा काही परिणाम झाला नाही, तो तितक्याच चिवटपणे पुन्हा उभा राहिला.
———————————————————————————————————————–
      माघाची कडाक्याची थंडी पडली होती. विजापुरावर रात्र पसरली होती. बहुतेक घरातील दिवे, महालातील हंडयातील दिवे विझले होते. नाही म्हणायला रस्त्यावरच्या मशाली अजून जळत होत्या. शहराच्या तटबंदीवर मात्र पहारेकर्यांची गजबज जाणवत होती. फांजीवर फिरता फिरता त्यांचे “होशिय्यार”च्या आरोळ्या सुरु होत्या. सगळे शहर निद्रेच्या अधीन झाले तरी राजवाड्यातील एका दालनात अजून जाग दिसत होती. बडी बेगम अवस्थपणे आपल्या पलंगावर कुस बदलत होती. ‘सिवाचे काय करायचे?’ हाच तीच्या अस्वस्थपणाचे कारण होते. गेले दहा वर्ष विजापुर दरबाराने सैन्य,सरदार त्या शहाजीच्या बेट्यावर पाठवायचे आणि फौज मार खाउन परत यायची हा शिरस्ताच झाला होता. शहाजीला कैद करुन पाहीले, नतीजा! त्याला सोडावे लागले. फत्तेखान्,फाझलखान्,रुस्तमेजमा हि किमान जिंदा परत आले तरी, मुसेखान आणि अफझलसारख्या बड्या सरदाराला त्या मावळाच्या मुलुखाने गिळून टाकले. गेले दहा वर्ष मुहमदशहा आजारी, त्यात दरबारात दख्खनी विरुध्द पठाण अशी सरदारात दुफळी. तरी आपण हि आदिलशाही धुरा सांभाळली.चार साल मागे  मुहमद बादशहा अल्लाला प्यारे झाले आणि अलिवरुन दरबारात फिर एक बार नाराजी झाली, पण कशीबशी ती मिटवली,  पण त्या सिवाची बंडखोरी अशीच चालु राहिली, तर मुष्कील आहे.नेतोजी आपल्या मुलुखात धुमाकुळ घालतो आहे,त्याला रोखायला सरदार नाही. काय करावे ?
     अखेरीस पलंगावरुन उठून बडी बेगम येरझार्या घालू लागली. तीचे विचारचक्र सुरुच होते,’आता दरबारातील कोणा सरदाराला सिवावर पाठवण्यात अर्थ नाही. एकतर सगळेच मनातून घाबरलेत. डरा हुआ सिपाही पहलेही हारा होता है. आता अशी सोंगटी हलवायला पाहीजे, जी या सगळ्या पटापासून लांब असेल.’
    अचानक तीला पाच दिवसापुर्वी आलेल्या खलित्याची आठवण झाली. कर्नुल जहागिरीतून पत्र आले, म्हणल्यावर तीच्या कपाळावर आठी उमटली. कर्नुल म्हणजे तो बगावतखोर सिद्दी जोहर ! खलिता उघडून तीने जेमतेम नजर फिरवली. काही वेगळे नव्हते, मुआफीनामा होता. आधीही तीन-चार वेळा मसुदने असाच मुआफीनामा पाठवला होता.तीने खलिता कारकुनाच्या हवाली केला आणि बस्त्यात गुंडाळून ठेवायला सांगितला.
      एकदम बडी बेगमला कल्पना सुचली,’ हा जोहर त्या मराठी मुलुखावर कधी गेला नाही.लांब तिकडे कर्नुलला कुतुबशाही मुलुखावर राहीला, त्यालाच पाठविले तर ?’ पेच थोडा तरी सुटल्याचे समाधान बेगमेच्या चेहर्यावर दिसु लागले. पण एवढ्याने तो सिवा संपणार नव्हता. यापुर्वी महमंद बादशहा आणि शहाजहान यांनी शहाजीच्या खिलाफ वापरलेली युगत वापरायला हवी. औरंगजेबाला खलिता पाठवून त्याचा एखादा सरदार सिवाच्या मुलुखावर पाठवायला सांगायचा आणि विजापुर दरबार सिद्दीला पाठवेल. बस्स !’
  आता कोठे बेगम शांतपणे पलंगावर आडवी झाली आणि दुसर्या दिवशी हे दोन्ही खलिते रवाना करायचे हे नक्की करुन शांतपणे झोपण्यासाठी तीने डोळे मिटले.
————————————————————————————————————————
किल्ले कर्नुल ! आपल्या दालनात जोहर अस्वस्थपणे बसला होता. तो कोणाची तरी वाट बघत होता.इतक्यात पहारेकर्‍याने वर्दी दिली, “मसउद बाहेर आला आहे”.त्याला ताबडतोब आत पाठवण्याची आज्ञा जोहरने केली. अदबीने मसुद आत आला, मुजरा करुन अदबीने समोर बसला. “अब्बाजान ! आप काफी फिकरमंद लग रहे हो ! क्या बात है ?”
   “काय सांगु बेटा, विजापुर दरबार आमच्यावर सक्त खफा आहे, तीन मुआफीनामे आम्ही पाठवले, पण एकाचाही जवाब नाही. काय करावे समजत नाही?”
“पण अशी काय गलती झाली तुमच्याकडून ?” मसुदने विचारले.
“काय सांगणार बेटा ? तसे आपण सिद्दी या मुलुखाला परायेच ! आपल्या पुरखांचा देश अफ्रीकेतील हबसान. अरब व्यापार्‍यांना हिंदुस्थानात येताना गलबतावर स्वस्तात गुलाम लागायचे. हबसानातील आपले सिद्दी लोक स्वस्तात विकत घ्यायचे आणि त्यांना बरोबर घेउन या हिंदुस्थानात यायचे हा अरबांचा शिरस्ता. आज आपले जातभाई मराठ्यांच्या देशापासून , कर्नाटक, केरळ सगळीकडे गेले. मलिक अंबर्,जंजिर्‍याचा सिद्दी हे आपले लोग तर अधिकारी झाले.मी ईथे मलिक रेहमानचा चाकर म्हणून लागलो. मालकासाठी रात दिन देखी नही.बस मालिक हुकुम करणार, हा चाकर ती पाळणार.पण मलिक गेला आणि त्याचा बेटा निकम्मा असून हुकुम चालवायला लागला, त्याला बाजुला करुन मी या कर्नुलची जहागिरी घेतली, म्हणून सल्तनते आदिलशाही मुझपे खफा है”. जोहरने त्याच्या मनाची व्यथा सांगितली.
       “मसुद या आधी मी दरबारात तीन वेळा माफीनामा सादर केला,पण दरबाराकडून काहीच जवाब येत नाही”.खुप वेळ जोहर व मसुद बोलत बसले.
      एक आठवड्यानंतर जोहर रपेटीला बाहेर पडला, तोच हुजर्‍या धावतधावत आला आणि घाईत म्हणाला,”हुजुर जल्दी चलिये, बिजापुरसे कोई संदेशा आया है”.
 बिजापुर !!! तातडीने घोड्यावरुन उतरुन जोहर सदरेवर आला. सदरेवर विजापुर दरबाराचा खिदमदगार काशी तिमाजी वाटच बघत होता.जोहर आल्यावर त्याने खलिता पुढे केला आणि म्हणाला, “सरदार ! विजापुर दरबार आणि माबदौलतने आपल्याला याद फर्मावली आहे.आपको यहांसे लेके जाने के लिये मै आया हुं”
  “खानसाहेब हा खलिता घ्या आणि वाचा” तिमाजीने खलिता पुढे केला आणि जोहर तो उघडून घाईने वाचू लागला, “आमच्या निसबतीस असे दुसरे पुष्कळ लोक आहेत की, जे आजच्यासारखे (शिवाजीला नेस्तनाबूत करण्याचे) काम करण्याची इच्छा करीत आहेत. एवढेच नाही, तर ते करुनही दाखवतील, पण तुम्ही स्वतः होऊन या चाकरीसाठी अर्ज केलात, म्हणून तुम्हास हुकूम करण्यात येत आहे की, हे काम तुम्ही करुन दाखवावे आणि बादशाही मेहरबानीस उमेदवार व्हावे”.
      विजापुर दरबाराला शेवटी आपली आठवण झाली तर ! आनंदाने तिमाजीचे हात हातात घेउन जोहर म्हणाला,”शुक्रीया काशिजी ! आपने मेरे इस अंधेरेभरे जीवन मे आशा का नया दीया जलाया. मै हमेशा आपका मेहेरबान रहुंगा. आप थोडा आराम फर्माईये. मै बिजापुर जाने कि तयारी करता हुं. हम कल सुबह ही रवाना होंगे”
———————————————————————————————————————
       विजापुर दरबाराचे नेहमीचे कामकाज चालु होते, इतक्यात दरबाराच्या हुजर्‍याने वर्दी दिली, कर्नुलचे सुभेदार जोहर आणि काशि तिमाजी पधार रहे है. बडी बेगमेच्या चेहर्‍यावर स्मित उमटले,मात्र चिकाच्या पडद्याआड असूनही तीने लगेच भाव बदलले आणि जोहर आल्याची दाद न घेता, तीने अलिला दरबाराचे पुढचे काम सुरु ठेवायची आज्ञा दिली. जोहर आणि तिमाजी आदबीने आले, मुजरा करुन एका बाजुला उभे राहिले.बराच वेळ दरबाराने त्या दोघांची दखल न घेता काम चालु राहिले. शेवटी एकदाचे जोहरला पुढे बोलवण्यात आले आणि बेगम कणीदार आवाजात म्हणाली, “जोहर, वैसे तुम्हारी बगावतखोरी के वजहसे माबदौलत तुम पे खफा है, लेकीन तुमने सच्चे दिलसे इस दरबार को माफीनामा पेश किया ऐसा मान कर हम तुम को मुआफी बक्षते है. लेकीन तुला इनामदारी दाखवावी लागेल.या दरबाराशी तु एकनिष्ठ आहेस हे सिध्द करावे लागेल”.
    बडी बेगमचे हे बोल एकून जोहरला दिलासा मिळाला.निदान या दरबाराने आपल्याला स्विकारले तरी ! आता जी काही कामगिरी मिळेल ती जी जान से पार पाडू आणि पुन्हा गेलेली पत मिळवू असा विचार करुन जोहर नम्रपणे म्हणाला,”जी माबदौलत ! जीस मोहिमपे आप हमे तैनात करेंगे हम वहां जाने के लिये तैय्यार है”.
    त्याचे हे बोल एकून आलि आणि बडी बेगम विलक्षण खुश झाले.मुख्य म्हणजे दरबारातील सरदारांना हायसे वाटले.पुन्हा सिवावर जायचे या कल्पनेनेच अनेकांना घाम फुटायचा. हि बला जोहरच्या गळ्यात पडलेली बघुन बहुतेक सरदारांना सुटल्यासारखे वाटले.
  बेगमने त्याला कामगिरी सोपवली, “जोहर, शहाजीका बेटा सिवा मावल परगणे मे बगावत फर्मा रहा है. तसे तर या दरबारात त्याला मारायला बर्‍याच सरदारांचे हात शिवशिवत आहेत.पण तुझा अर्ज आला आहे, म्हणून हा मोका आम्ही तुला देत आहोत.इस दरबार को यकीन है, तु तुझा पराक्रम दाखवशील. तुला किती फौज्,घोडे,हाती पाहिजेत ते वजीराला सांग.पातशाही खजान्यातून तुला हवी तितकी रकम मिळेल.लेकीन हमे फतेह चाहीये. सिवा को पुरी तरह बरबाद करना है. तुम इस मोहिम के लिये तय्यार होकर माबदौलत कि हुकुम को सर आँखोपर रखा.इस लिये ये दरबार तुम्हे “सलाबतखान” ( म्हणजे कबुलीचा अधिपती ) इस खिताबसे नवाजता है और काशि तिमाजी को “दियानतराव” ये खिताब देता है”
  “वाह्हवा !!” दरबारातून एकच आवाज उमटला.
    जोहरला हि अंगात बारा हत्तीचे बळ संचारल्यासारखे वाटले. ईतक्यात सरदाराच्या गर्दीतून फाझलखान आणि रुस्तमेजमा पुढे आले, मुजरे घालून म्हणाले,”जर हुजुरांची परवानगी असेल तर या मोहीमेत जोहरबरोबर हमे भी शामील होनेकी ख्वाईश है”
    बेगमेला काहीसे आश्चर्य वाटले. दोनदा शिकस्त खाउन आलेला फाझल पुन्हा सिवावर जाउ इच्छीतो. त्याच्या जिद्दीचे तीला आणि अलिला कौतुक वाटल्याशिवाय रहावले नाही. दोघांना या मोहिमेत सामील होण्याची परवानगी मिळाली. या एकुण नव्या मोहीमेने वारंवार मार खाल्लेल्या विजापुर दरबाराला नवसंजीवनी मिळाली.एक चैतन्य सगळीकडे पसरले. घोड्यांना खरारा सुरु झाला, नवे नाल ठोकले जाउ लागले, हत्तीना रपेट सुरु झाली.धान्य भरुन बैलगाड्या विजापुरच्या वेशीबाहेर उभ्या ठाकत होत्या, गवत भरुन छ्कडे माळावर पसरले होते,तोफांच्या गाड्यांना तेलपाणी सुरु झाले. मोहीमेची तयारी झाल्यानंतर एके दिवशी १५ ते २० हजार घोडेस्वार, ३० ते ४० हजार पायदळ आणि सोबत सरदार होते रुस्तमजमान, फाझलखान, सादतखान, बाजीराव घोरपडे, पिउ नाईक, भाईखान, सिद्दी मसुद आणि अर्थात सलाबतखान सिद्दी जोहर. एके दिवशी मावळतीच्या वेशीतून हा सेनासागर बाहेर पडून निघाला. कोठे ? काफीर सिवा भोसल्याचा नायनाट करायला.
   राजे इकडे मिरज उर्फ मुर्तिजाबाद किल्ल्याशी अजून झुंजतच होते. आत्तापर्यंत बहुतेक आदिलशाही ठाणी मराठी फौजेसमोर लोळागोळा होत असताना, हे एकच ठाणे झुकायला तयार नव्हते. वेढा चालु असताना खबरा येत होत्या, नेतोजींनी घातलेला आदिलशाही मुलुखातला धुमाकुळ समजत होता. एके दिवशी मात्र काळजीत पाडणारी खबर आली. विजापुरातून सिद्दी जोहर नावाचा सरदार भलीमोठी फौज घेउन मिरजेच्या रोखाने निघाला होता. आता वेढा चालविण्यात अर्थ नव्हता. उघड्या माळावर मोठ्या फौजेशी मुकाबला शक्यच नव्हता.
 “राजे आता आपल्याला हालचाल करायला पाहीजे.पुन्हा प्रतापगड गाठायचा का? ईतक्या मोठी फौजेला मार द्यायचा म्हणजे तशीच अडचणीची जागा पाहीजे.” खलबतासाठी बोलावलेल्या बैठकीत सुर उमटला.
   “हुं! प्रतापगड सुरक्षित जागा खरी, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, हा कोल्हापुर ते वाई सगळा मुलुख नव्याने आमच्या स्वराज्यात सामील झाला आहे. आम्ही प्रतापगडी गेलो तर जोहर आमच्या मागोमाग येणार आणि हा सगळा मुलुख उजाड करत जाणार. हि आता आमची रयत आहे, त्यांना तोशिष न लागू देणे आमची जबाबदारी आहे. अफझलच्या स्वारीच्या वेळी तर आमच्या देवदेवतांनाही उपद्रव झाला होता.स्वराज्य हे यासाठी आहे का? तेव्हा आपल्या मुलुखात शत्रुला खोल घुसायची संधी न देता, त्याला सीमेवरच रोखूया. स्वराज्यात नव्याने सामील झालेला पन्हाळा मोठा बळकट दुर्ग आहे. धान्य, दारुगोळा पुरेसा आहे.तेव्हा पन्हाळगडी बैसून सिद्दीशी मुकाबला करावा हे उत्तम ! शिवाय नेतोजी काका विजापुर मुलुखात आहेतच.गरज पडल्यास ते विजापुरवर गेले तर सिद्दीवर दाब आणता येईल.”
    सगळ्यांनाच हि मसलत पटली.एके दिवशी राजे सर्व सैन्य गोळा करुन मिरजेचा वेढा उठवून पन्हाळ्याच्या दिशेने निघून गेले. बडे बडे सरदार ज्याचे नाव एकले तरी कापतात, त्या सिवाची आपण डाळ शिजू दिली नाही म्हणून किल्लेदार बुरुजावर उभा राहून पाठमोर्‍या फौजेकडे पाहून छद्मी हसत होता.
————————————————————————————————————————-
    पन्हाळ्यावर एकच लगबग सुरु होती. दारुगोळ्याच्या कोठ्याची तपासणी सुरु होती. कोल्हापुर परिसरातील बैलगाड्या धान्य भरुन रोज पन्हाळ्याचा चढ चढीत होत्या. गंगा,जमूना कोठीत छतापर्यंत धान्याच्या पोत्यांची रास लागलेली. गडाचा चोख बंदोबस्त झालेला होता. आणि एके दिवशी लांब पुर्वेकडून मोठी धुळ उडू लागली.गर्जना एकू येउ लागल्या, हिरवा चांदतारा फडकताना दिसत होता. जोहर पन्हाळ्याच्या रोखाने येत होता. पन्हाळ्याचा औरसचौरस आकार लांबूनच नजरेस येत होता. फक्त दहा कोसावर विजापुर फौजेची छावणी पडली होती. रात्री सगळे बैठकीत जमले होते. पन्हाळ्यावर कसा हमला करायचा याचा खल सुरु होता. बरोबर भरपुर सैन्य होते, त्यामुळे फाझल उतावीळपणे म्हणाला, “हम कल ही पन्हालेपे हमला बोल देंगे , इतनी बडी फौज के सामने ये किला टिक नही पायेगा.एक ही दिन मे हम कब्जा कर देंगे और फिर उस सिवा को कैद करके विजापुर ले जायेंगे”
   “दिन मे सपना देखना छोड दो फाझल. मत भुलो ईस सिवा के हात तुम दो बार शिकस्त खा चुके हो” जोहर शांतपणे फाझलला म्हणाला.
“तो फिर क्या करेंगे ?” रुस्तमने विचारले.
“आपल्यापाशी फौज मोठी आहे,पण पन्हाळा आडवा तिडवा पसरला आहे, हे विसरू नका. एकदम हल्ला केला तरी दुष्मन उंचावर आहे,त्याला उंचीचा फायदा मिळणार. मत भुलो वो पुरंदरकी दास्तान. पथ्थरो कि बौछार से फत्तेखान जैसे सुरमा को मात दि थी. आपलेही तेच हाल होतील.मला वाटते आपण गडाला वेढा घातलेला चांगला. एकतर आपल्याकडे पुरेशी रसद आणि फौज आहे. एकदा वेढा आवळला कि ना तो कोई अंदर जा सकेगा ना ही कोई बाहर आ सकेगा. फिर कितने दिन सिवा किले पे रहेगा ? उसे बाहर तो आनाही पडेगा. यामध्ये आपल्या फौजेला लढाई करावी लागणार नाही.बस सिर्फ ईंतजार करना है”
        सगळ्या सरदारांना पटले. त्यांनी संमतीदर्शक माना हलवल्या. ठरले पन्हाळ्याला वेढा घालायचा. दुसर्‍या दिवशी फौजा विखुरल्या आणि जोहार,फाझल, रुस्तम,बडेखान यांच्या फौजा वाडी रत्नागिरी डोंगराच्या बाजूने पन्हाळ्याकडे गेल्या आणि त्यांनी गडाची पुर्व बाजु रोखून धरली. मसुदच्या नेतृत्वाखाली दुसरी तुकडी गडाच्या मावळतीकडे गेल्या, यामध्ये सादातखान्,घोरपडे, भाईखान गेले आणि त्यांनी त्या बाजुने सैन्य पसरवले. दोन्ही बाजुने फौजा पसरत गेल्या आणि त्यांनी उत्तरेकडची बाजू अडवली. गडाला आता पुर्ण फास पडला.
    चैत्राच्या उन तावत होते, गडाखाली आदिलशाही राहुट्यांची गर्दी उभारली गेली. तटबंदीवर उभारुन महाराज ही हालचाल न्याहाळत होते. सोबत बाजी, गोदाजी, त्रिंबक पंत होते. गोदाजी म्हणाला, “महाराज, मला वाटल ह्यो सिद्दी चढाई करेल.मावळी हिसका दाखवायला हात शिवशिवत होते.पण ह्यो तर गड वेढायला निघालाय”.
“हं ! सिद्दी हुशार दिसतोय गोदाजी. आधीच्या विजापुरी सरदारांनी ज्या चुका केल्या त्याचा अभ्यास करुन जोहर आलेला दिसतो आहे.थेट हल्ला केला तर गडावरुन तिखट प्रतिकार होणार, त्यात बरीच फौज कामी येणार. आधीच याच फौजेने प्रतापगडाखाली आणि कोल्हापुरात मात खाल्ली आहे. मनातून धास्तवलेले हे सैन्य असा एखादा तडाखा खाल्ला कि कोसळणार. मग धीर सुटून सैन्य पळायला वेळ लागत नाही. जोहरने हे ओळखले म्हणून थेट लढाईला तोंड न फोडता, वेढा आवळला म्हणजे थेट युध्द न करता हवे ते साध्य करता येईल हि त्याची योजना आहे. एखादा हुशार सेनानीच हे करु शकतो.” राजे शांतपणे म्हणाले.
    “राजे तुम्ही या सिद्दीचे कौतुक करताय ?” त्रिंबकपंत आश्चर्याने म्हणाले.
“पंत ! शत्रु असला तरी त्याचे गुण महत्वाचे. आता हे नुसते युध्द असणार नाही, हा बुध्दीबळाचा डाव असणार आहे. विचारपुर्वक चाली कराव्या लागणार. अर्थात नेतोजी, सिद्दी हिलाल अजून विजापुर मुलुखात धुमाकुळ घालत आहेत्,ते बाहेरुन येउन जोहरच्या वेढ्यावर हल्ला करतील, त्याचवेळी गडावरुन सैन्य सोडता येईल. दोन्हीकडून मारा झाला तर वेढा टिकेल असे वाटत नाही”.
     एका दिवसात वेढा आवळून झाल्यावर दुसर्‍या दिवशी सिद्दीने तोफा तैनात करायचा हुकूम दिला. जमीन दाबत वजनदार तोफा पुढे आल्या. तोफा पुढे आणि मागून शाही फौज गडाला जवळ करु लागल्या.वर फांजीवरुन मावळे शांतपणे हि चाल बघत होते. तोफा आणि विजापुर फौज टप्प्यात आल्यावर गडावर एकच आरोळी उठली “हर हर महादेव” आणि अचानक गडावर तैनात केलेल्या तोफांनी एकच कडकडाट केला. धडाम ! धुडूम !! तोफांनी आग ओकली आणि सटकन सुटलेले गोळे तुफानी वेगाने खालच्या दिशेने आदिलशाही फौजेच्या दिशेने सुटले. प्रचंड वेगाने अनपेक्षित प्रतिकार झाल्याने शाही फौज बिचकली. तोफगोळे लागून काही सैनिक मेले तर काही जखमी झाले. या धडाक्याने फौज मागे सरुन पळत सुटली आणि डेर्‍याजवळ येउन थांबल्या. आपल्या तंबुच्या कनातीजवळ उभा राहून हे आक्रमण बघणार्‍या जोहरची भिवई चढली. पहिली चाल नाकामयाब ठरली होती. गड चांगलाच भांडणार हे नक्की होत. शिवाजी,शिवाजी म्हणत होते, ती काय चीज आहे, हे त्याला पहिल्याच झणझणीत मार्‍यात समजले.तोफा फार पुढे नेणे म्हणजे मार खाणे ठरलेले हे स्पष्ट झाले.ईतक्यात फाझल जवळ आला,”खानसाहेब, रात को हमला बोल दे तो?”
    “ठिक है, कोशीश करते है. रात को दुबारा थोडी एतीहाद बक्षते है और फिर हमला बोल देंगे. आसान नही पनाला” सिद्दी थोडा विचारात पडला.
 रात्री फार काही वेगळे झाले नाही. गड बेसावध असेल अश्या कल्पनेने जोहरने एका बाजुने आणि मसुदने एकाचवेळी यल्गार केला. पण गडावरुन असा काही धमाका झाला कि शाही फौजांना पळता भुई थोडी झाली. पुन्हा एकदा आणखी थोडी सैन्याची हानी होण्यापलिकडे विजापुर फौजेच्या हाती काही लागले नाही. आहे ह्या तोफा पन्हाळ्यापुढे निकम्म्या आहेत, त्यांचे गोळे तटापर्यंत पोहचत नाहीत, तेव्हा मारा करुन काही फायदा नाही, हे सगळ्यांनाच समजले. गडावर हल्ला करायचा तर लांब पल्ल्याच्या तोफा पाहीजेत.विजापुरवरुन तोफा आणायच्या तर फार वेळ जाणार होता. काय करावे?
      ईतक्यात तिथे फाझल आला. “काय विचार करताय सरदार ?”
    “हमारी तोफ के गोले किले कि दिवारोतक पहूंच नही पा रहे है. क्या कर सकते है ? लांब पल्ल्याच्या तोफा विजापुरवरुन मागवायच्या तर वेळ जाणार” जोहरने चिंतेचे कारण सांगितले.
   “काळजीचे कारण नाही. ईथून राजापुर जवळ आहे. राजापुरचे अंग्रेज व्यापारी आहेत. अंग्रेजाकडून विजापुर दरबार तोफा आणि दारु खरेदी करतो. मी एकले आहे कि राजापुरमध्ये काही नवीन तोफा अंग्रेजांच्या मुल्कमधून आलेल्या आहेत. तोफा छोट्या आहेत, लेकीन बहोत दुर तक का हमला कारिगर कर सकते है. आपल्याला याच तोफा पाहिजेत” फाझलने तोड सुचवली.
   “हं. पण मी एकले आहे कि नुकतेच सिवाने या अंग्रेजांशी सला केलेला आहे.अंग्रेज उसे जंजिरे के सिद्दी के खिलाफ मदत करने को राजी हो गये है. मग हे अंग्रेज आम्हाला मदत करतील ?” सिद्दीला शंका वाटू लागली.
   “क्यों नही हुजुर ! आता हा सिवा संपलाच म्हणून समजा. या वेढ्यातून तो आता सुटत नाही. अंग्रेज समुंदरपर घुमनेवाले खलाशी लोक आहेत्,त्यांना वार्‍याची दिशा बरोबर समजते” फाझल आशावादी होता.
 “ठिक आहे.तु म्हणतोस तर आजच आपला खलिता राजापुरला पाठव” सिद्दी आता खुशीत आला.
लगेचच एक जासूस राजापुरला रवाना झाला.
       बरोबर पंधरा दिवसांनी चट्यापट्याचा तांबडा डगला घातलेला आणि उन्हामुळे लाल बुंद झालेला हेन्री रिव्हींग्टन जोहरच्या तंबुता आला.डोक्यावरची टोपी काढून कंबरेत झुकून तो म्हणाला, “खानसाब, आपल्या ईच्छेला मान देउन राजापुर वखारीतून मी नवीन तोफ आणली आहे. लांब पल्ल्याच्या या तोफेने आपण पन्हाळ्याला खिंडार पाडू शकतो. आपली आज्ञा असेल तर लगेच तोफ दक्षीण बाजुला तैनात करतो”
      “सुभानल्ला ! बहोत शुक्रीया जनाब. आम्ही आपलीच वाट पहात होतो.आपल्या येण्याच्या बातम्या मिळत होत्या. चला, अच्छे काम मे देरी नही चाहीये.आपण आजच तोफेची चाचणी करुया”.
———————————————————————————————————————
    “धड्डाम !” प्रचंड मोठा आवाज झाला आणि तीन दरवाजा व पुरा गड हादरला. सदरेवर बैठकीत महाराज आणि सवंगड्याना हा आवाज कशाचा समजेना. सगळेजण घाइघाईने उठले व आवाजाच्या रोखाने तीन दरवाज्याकडे गेले. तीन दरवाज्याच्या फांजीवर पोहचल्यावर घाईघाईने हवालदार पुढे झाला आणि मुजरा घालून राजांना म्हणाला,”महाराज ! दोन दिस झालं, खाली वेढ्यात हालचाल चालु होती. बहुतेक नवीन लांब पल्ल्याची तोफ सिद्दीने तैनात केलीया. आधीच्या तोफेचे गोळे गडापातुर पोहचत नव्हते, पण या तोफेचा दणका मोठा आहे. हिकड या , या कड्यावर बघा तोफगोळ्याने टवका उडवलाय” तोफेचा मारा बघून राजे चिंतेत पडले. सिद्दीने एकही मोठी तोफ आणल्याची खबर हेरांनी आधी आणली नव्हती.याचा अर्थ हि तोफ आत्ताच आली होती. राजांनी दुर्बिण मागवली आणि डोळ्याला लावली. थोडा वेळ बघीतल्यानंतर त्यांची आठी चढली आणि मुठी वळाल्या. बरोबर असलेल्या बाजी, सिदोजी,हिरोजी होते. त्यांना हा मामला समजेना. दुर्बिण डोळ्यावरुन बाजुला करुन राजे म्हणाले, “अखेरीस घात झाला तर ! घर फिरले कि वासे फिरतात”.
    “काय झाले राजे ?” बाजींनी विचारले.
“काय होणार ? अवघ्या दोन महिन्यापुर्वी या राजापुरच्या टोपीकरांना आम्ही जंजीर्‍याच्या सिद्दीविरुध्द मदत करण्याचे वचन घेउन त्या गिफर्डला सोडून दिले होते. हे आता या दुसर्‍या सिद्दीला मदत करायला आलेत.  दगलबाज अंग्रेज आज उलटलेच. यांचा विश्वास धरुन उपयोग नाही.आम्ही वेढ्यात अडकलो म्हणजे संपलो असा समज या टोपीकरांनी करुन घेतला आहे. स्वताचे निशाण फडकवत त्यांनी आणलेल्या तोफातून गोलंदाजी सुरु आहे. आज आमचा नाईलाज आहे, पण आम्ही या वेढ्यातून सुटल्यानंतर या टोपीकरांना आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवू.”
  “हवालदार ! तुम्ही मागे हटू नका. असा जोरदार तडाखा द्या कि हे ईंग्रज मागे पळाले पाहीजेत” राजांनी आज्ञा दिली आणि सर्वजण पुन्हा सदरेकडे निघाले.
—————————————————————————————————————–
         चैत्र उलटला आणि वैशाष वणवा सुरु झाला. अचानक एके दुपारी जोरदार वावटळ उठली. प्रचंड वार्‍याबरोबर तुफानी धुळ हवेत उडाली. विजांचे तांडव सुरु झाले आणि टिपरी वाजावी तशा सरी बरसू लागल्या. वळवाच्या त्या पहिल्याच तडाख्याने सिद्दीची छावणी सैरभैर झाली.कित्येक तंबु उडाले. हशमांना जागेवर थांबणे जमेना. पावसाचे ते रौद्र रुप बघून सिद्दीने फाझल व रुस्तमला बोलावणे धाडले,
“यहां पे ईतनी तुफानी बारिश रहती है क्या ? तुम लोग इस मुल्क के बारे मे जानते हो.रुस्तम, ये तो तुम्हारी जागीर है, बताओ” सिद्दीने विचारणा केली.
 “हाँ, खानसाहेब.इथे शेवाळाने दगड हिरवे होतात. धुके ईतके उतरते कि पाच-सहा हातावरचा माणुस दिसत नाही, पाउस असा कोसळतो कि जणु आभाळ फाटले कि काय असे वाटावे.चालताना पाय जागेवर ठरत नाही असा चिखल असतो” रुस्तमने माहिती पुरवली.
“हं” जोहर विचारात पड्ला. ह्या बरसातीच्या मोसमाची सिवा नक्कीच वाट पहात असणार. पावसापुढे मी टिकणार नाही आणि वेढा फोडून बाहेर पडू अशी त्याला आशा असेल.पण हा सिद्दी जोहर आहे. त्याने तातडीने फाझल आणि रुस्तमला छावणीबाहेर पडून आजुबाजुच्या गावातून बुरुड लोक पकडून आणण्यास सांगितले. त्यांना बांबू देउन तट्ट्या विणून तंबुला झडी लावण्याचा हुकुम केला.
————————————————————————————————————————–
     पन्हाळ्यावर संध्याकाळची वेळ झाली. राजे त्यांच्या महाली विचार करत पुढचा मनसुबा रचत होते. ईतक्यात वर्दी आली, कि रायबा म्हणून कोणी भेटू ईच्छीतो. “रायबा ! त्याला तातडीने आत पाठव आणि दरवाजा बंद करुन घे.कोणाला सोडू नको”.
    रायबा आला, म्हणजे काहीतरी खबर होती खास. आत आल्यावर रायबा मुजरा घालून म्हणाला, “राजे आजच विजापुरच्या मुलुखाकडून आलो.नेतोजीराव आणि सिद्दी हिलाल यांनी तिकडे दंगल उडवून दिली आहे. गदग, लक्ष्मेश्वरचा मुलुख नेतोजींनी पार उध्वस्त करुन टाकला आहे”
  “शाब्बास !” राजे खुष झाले. “काका आता आदिलशाहीला चांगलेच सळो कि पळो करुन सोडणार याची आम्हाला खात्री होतीच. नेतोजी काकांना आमचा निरोप पोहचवा. ईकडे सिद्दी जोहर अपेक्षेपेक्षा चिवट निघाला आहे.आमचा भरोसा या भागात पडणार्‍या पावसावर होता.पण जोहर चलाख निघाला, त्याने छावणीला झडी लावल्या आहेत.एकंदरीत वर्षाकाळातही वेढा कसून चालणार असे दिसते आहे.तेव्हा काकांना थेट विजापुरला धडक द्यायला सांगा. खुद्द राजधानीला शह बसला कि बादशहाला हा वेढा उठवून जोहरला माघारी बोलवावेच लागेल.”
   “जी ! जशी आज्ञा ” मुजरा घालून रायबा गेला.
  खुप दिवसांनी काही दिलासा देणारी बातमी आली होती. राजांनी जगदंबेला हात जोडले.
——————————————————————————————————————
 जोहर छावणीत अस्वस्थपणे बसला होता. चार महिने झाले अखंडपणे वेढा चालु होता, पण पुढे काही होते नव्हते. अंग्रेजांच्या तोफ्या मागवल्या, त्याचा गडावर मारा केला पण किरकोळ टवके उडण्याशिवाय गडावर ढीम्म परिणाम झाला नव्हता. तो खर्च वायाच गेला होता. शेवटी जोहरने पन्हाळ्याच्या पुर्व अंगाला असणार्‍या टेकडीवर तोफा तैनात करायचा प्रयत्न केला, पण तो ही मराठ्यांनी हाणुन पाडला. नाही म्हणायला एकच गोष्ट चांगली झाली होती. पालीचा सरदार सुर्यराव सुर्वे व शृंगारपुरचा सरदार जसवंतराव पालवणीकर हे दोघे जोहरला येउन मिळाले होते. त्यांना जोहरने थोडी वेगळीच कामगिरी दिली. त्यांना या भागाची असलेली माहिती लक्षात घेता, खेळणा ताब्यात घेण्यासाठी दोघांना रवाना केले.
      पुढच्याच आठवड्यात विजापुरवरुन जासूस आल्याचा निरोप सिद्दीला आला. त्याला शामियानात बोलावून निरोप विचारला. जासुसाने वृत्तांत सांगायला सुरवात केली,” सिद्दीने इकडे सिवाला वेढ्यात कैद केले असले तरी त्याचा सेनापती नेतोजी व हिलाल तिकडे आदिलशाही मुलुखात मन मानेल तसा धुडघूस घालत होते.गदगची संपन्न पेठ लुटल्यानंतर नेतोजीने थेट विजापुरजवळच्या शहापुरवर स्वारी करुन विजापुरला धोका निर्माण केला. बादशहा अली सिद्दीला विजापुरच्या रक्षणासाठी बोलावणार होते. पण एनवेळी नेतोजी आणि हिलालकडे फार फौज नाही हे समजल्यामुळे खवासखानाने पिटाळून लावले.पण सिवावरची मोहीम ईतके दिवस का चालु आहे? असा बादशहा हुजुरांचा सवाल आहे. वेढा अजून कारिगर का झाला नाही, सिवा का कैद होत नाही, हे सवाल बादशहा सलामत यांनी खानसाहेबांना विचारले आहेत.”
    खलित्यातील मजकुर एकून जोहरची डावी भिवई चढली. ‘या अश्या पावसात तसुभर न हलता मी बादशहा सलामतचे काम नेकीने करतो आहे, तरी अजून माझ्यावर शक आहेच. आता काहीही लवकरात लवकर पनाला काबीज केला पाहिजे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही.’ त्याच बरोबर त्याने फाझलखानाला तातडीने बोलावून घेतले आणि एक महत्वाची चाल खेळली,”फाझल, आताच मला विजापुरचा खलिता आला आहे. आता आपल्याला लवकरात लवकर या सिवाला शरण आणायचे आहे. नुकताच नेतोजीने विजापुरवर हल्ला केला, पण तो नाकामयाब झाला. आता तो नेतोजी आपल्या फौजेवर हल्ला करणार.तेव्हा आजपासून पाच हजाराचे घोडदळ घेउन सादतखानाला वेढ्याभोवती फिरते रहायचा निरोप दे. नेतोजीने हमला केला तरी तो वेढ्याच्या नजदीक येता कामा नये. त्याला बाहेरुनच पिटाळून लावा”.
  “जी ! जैसा हुक्म” ताबडतोब फाझल हुकुमाची ताबेदारी करायला निघून गेला.
——————————————————————————————————————
   आकाश काळ्या ढगांनी भरून गेले होते.हाच काळोख जणु पन्हाळगडावर उतरला होता. सुटकेचा अजून तरी काही मार्ग दिसत नव्हता. पावसात वेढा ढिल्ला होईल आणि काहीतरी करुन सुटका करु अशी आशा व्यर्थ झाली होती. संकट आली कि चार हि बाजूने येतात.याचा प्रत्यय राजांना येत होता. गेल्या दहा-पंधरा दिवसात गडावर आलेल्या खबरा फार आशादायक नव्हत्या. नेतोजींनी थेट विजापुरवर हल्ला करुन अजगराच्या शेपटीला हात तर घातला परंतु एनवेळी फौज कमी पडली, नाही तर सिद्दीला वेढा उठवून विजापुरच्या रक्षणासाठी जावे लागले असते. दुसरी खबर तर भयंकर होती. जुन्नर आणि अहमदनगरच्या लुटीने आधीच चिडलेल्या औरंगजेबाला आदिलशहाकडून खलिता मिळाला होता.आयता हा सिवा वेढ्यात सापडला आहे आणि एक दुश्मन कमी होतो आहे, हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या मामाला शास्ताखानाला स्वराज्यावर चालून जाण्यास सांगितले.हा शास्ताखान सासवडजवळ पोहचल्याची खबर आली होती. आता एकच मार्ग होता नेतोजींनी वेढ्यावर बाहेरुन हल्ला करायचा.
         मोठ्या निराश मनाने नेतोजी आणि सिद्दी हिलाला राजगडाच्या पायर्‍या चढत होते. पडलेल्या चेहर्‍याने आणि झुकलेल्या खांद्यानी ते दोघे राजगडाच्या सदरेवर पोहचले. आउसाहेब सदरेवर बसून हिशेब आणि आलेले महजर तपासत होत्या. या दोघांना बघून त्यांनी हातातील काम बाजूला ठेवले आणि विचारले, “नेतोजी काका, काय खबर ? राजे अद्याप वेढ्यात आहेत आणि तुम्ही दोघे त्यांना सोडावयचे सोडून ईथे राजगडावर काय करताय ? स्वराज्याचे सरनौबत असे हताश बघायचे का ?”
    या सरबत्तीने नेतोजीनी मान खाली घातली आवंढा गिळून ते म्हणाले, “आउसाहेब, आम्ही राजांनी सांगितलेल्या मसलतीनुसार विजापुरचा मुलुख मारला.खुद्द विजापुरच खस्ता व्हायचे, पण नेमकी खबर त्या खवासखानाला लागली. आमची फौज कमी आहे हे समजल्यावर तो आमच्यावर चालून आला. आम्हाला जराही पुढे सरकू देईना.शेवटी माघार घेण्याशिवाय मार्ग सापडेना. पुढे काय करायचे काहीच कळेना झाले आहे. शेवटी आपला सल्ला घ्यायला राजगडावर आलो”.
    हे एकल्यानंतर जिजाउ साहेब ताडकन जागेवरुन उठल्या आणि कडाडत्या आवाजात म्हणाल्या.”स्वराज्याचे सरनौबत इतके कचदिल आहे हे माहित नव्हते.तुमचा राजा तिकडे चार मास झाले वेढ्यात अडकला आहे आणि तुम्ही त्याला सोडवायचा प्रयत्न करायचा सोडून ईकडे मावळात येताय ? काय अर्थ काढायचा याचा ? पुरंदरवर पराक्रमाची शर्थ करणारे नेतोजी थकले, प्रतापगडाच्या पायथ्याशी शाही फौजांना मार देणारे नेतोजी गोंधळले कि अफझलला मारल्यावर मागोमाग विजापुरचा मुलुख घेणार्‍या सरनौबतांची तलवार दमली ? काय विश्वास धरावा ? काका, तुम्हाला शिवबाला सोडवणे जमत नसेल तर राहु दे. हिरवी काकणे घातलेली आमची मनगटे अजून तलवार घरण्याची धमक राखतात.आम्ही जातीने जातो आणि या मुलुखाच्या राजाला परत आणतो.ईथे गडाखाली फौज नाही तरी आम्ही स्वस्थ बसलो नाही. प्रतापगडाखालची फौज पाठवून वासोटा घेतला. शिवबा ईकडे पन्हाळ्यावर अडकलेत त्याच वेळी स्वराज्यावर मोघलांचे आक्रमण झाले आहे. औरंगजेबाचा मामा स्वराज्यावर आला आहे. शिरवळ जिंकून तो सासवडला जात असताना वारोडीच्या खिंडीत त्याला धडा दिला. काका आम्ही स्वराज्य स्थापन करण्याच्या हेतूने बेंगळुरुवरुन इथे कर्यात मावळात आलो, ते अशी प्राणांतिक संकटे येणार हे गृहित धरुन. रयतेचे राज्य उभा करायचे तर त्याला रुधिराचा अभिषेक लागतो. हार जीत होणारच, पण प्रयत्न सुरुच ठेवायला हवेत.”
     एरवी मासाहेब म्हणजे आईच्या प्रेमाचा सागर.गडावर येणार्‍या सर्वांशी जिव्हाळ्याने वागणार्या आणि प्रत्येक मावळ्याला आपल्या आईच्या जागी वाटणार्‍या आउसाहेबांचे हे रौद्र रुप नवे होते. एखादी वीज कोसळावी तसे ते बोल एकून नेतोजी व सिद्दीला काही सुचेना. घाईघाईने नेतोजी पुढे झाले आणि आउसाहेबांचे पाय पकडून म्हणाले, “चुकलो माँसाहेब ! आता एक पळ न दवडता लगोलग फौज पन्हाळ्यावर नेतो आणि त्या सिद्दीला चांगलाच हिसका दाखवतो. येतो मी”.
    तातडीने दोघे गड उतार झाले आणि फौज पुन्हा कोल्हापुरच्या बाजुला रवाना झाली.
——————————————————————————————————————
   बेभान पावसाच मारा सुरुच होता.गडाचा माथा पुर्ण धुक्याने भरुन गेला होता. संध्याकाळी सदरेवर बैठक भरली होती. सगळ्यांचेच चेहरे चिंताक्रांत होते. राजांनी चर्चेला तोंड फोडले, “गेले काही दिवस आपण या वेढ्यात अडकून पडलो आहोत. आपल्याला वाटले त्यापेक्षा हा जोहर हुशार निघाला. आमच्या आशा आधी पावसावर होत्या. या पावसाचा मारा विजापुर फौजेला सोसायचा नाही असे वाटले, पण जोहरने त्याच्यावरही मात केली. बाहेरुन नेतोजी काका वेढ्यावर हल्ला करतील आणि आपण ईकडे गडावरुन फौज उतरवायची. दोन्हीकडून झालेल्या कात्रीचा फायदा घेउन निसटायचे असा बेत केला. पण अफझल खानाला मारल्यापासून जवळपास सहा सात महिने नेतोजी पालकर व मावळे सततच्या घोडदौडीमुळे थकलेले दिसतात. नेतोजी काकांनी पन्हाळ्याचा वेढा फोडण्यासाठी पराक्रमाची शिकस्त केली. दमलेले सैन्य घेउन नेतोजींनी पराक्रमाची शर्थ केली पण जोहरची फौज नव्या दमाची. शिवाय वेढ्याबाहेर त्याने काकाना अडविले, या ताज्या दमाच्या फौजेपुढे नेतोजींचा टिकाव लागला नाही.या लढाइत सिद्दी हिलालचा मुलगा सिद्दी वाहवाह शत्रूच्या सैन्यात घुसून त्यांच्यावर तुटून पडला परंतु जोहरच्या सैन्याने वाहवाला घोड्याच्या अग्रभागावरून खाली पाडले व त्यात तो बेशुद्ध पडला. शरीर छिन्नविछिन्न झाले. शाही सैन्य हिलालच्या मुलाला वाहवाहला आपल्याकडे कैद करत सोबत घेवून गेले.  ईकडे वेढ्यातून बाहेर पडावे तर पहार्यातील एकही माणूस हालवला नाही.उलट आम्ही निसटू या विचाराने त्यान वेढा अजून बळकट केला.स्वत: तो मोर्चांवर लक्ष ठेऊन होता.
   त्यात पुण्याच्या बाजुने आलेली बातमी काळजी वाढवणारी आहे. शास्ताखान पुण्यात येउन बसला आहे.आमचा चाकणचा संग्रामदुर्ग त्याने वेढला आहे. फिरंगोजी काका भांडत आहेत, पण त्यांना बाहेरुन मदत नाही. मोघली फौजा रोज जाळपोळ करीत आहेत. आमच्या स्वराज्याच्या रयतेला हि अशी तोषीश लागणार असेल तर आम्ही स्वस्थ राहू शकत नाही. एकाच वेळी दोन आघाड्यावर लढावे ईतकी फौज आपल्याकडे नाही. शिवाय गेले नउ महिने सततच्या स्वार्‍यांनी मावळ्यांनी दम खाल्ला नाही. तेव्हा दोन शत्रु अंगावर घेण्यापेक्षा आदिलशहाशी सुला केलेला बरा. पण आधी आम्हाला गडावरुन स्वराज्यात परत जायला लागेल. त्रिबंकपंत गड आम्ही तुमच्या हवाली करतो. आम्ही गडावरुन सुटकेची योजना तयार करतो”.
      “पण राजे वेढा तर कडक आहे.मुंगीही ईकडची तिकडे जायची नाही असा डोळ्यात तेल घालून पहारा चालु आहे.जोहर अजगरासारखा गडाभोवती पसरला आहे.आपल्या काही माणसांनी वेढा ओलांडायचा प्रयत्न केला पण सगळे मारले गेले.कसे साध्य होणार हे ?” सोबत्यांनी काळजी व्यक्त केली.
    “हं ! निघेल काही तरी मार्ग. शिवशंभू पहिल्यापासून आमच्या पाठीशी आहे.आई भवानी या ही परिस्थित यश देईल असा विश्वास आहे” राजे ठामपणे म्हणाले तरी सदरेवरच्या कोणाच्याही चेहर्‍यावरच्या चिंतेच्या रेषा गेल्या नाहीत.
        रात्री राजे महाली एकटेच येरझार्‍या घालत होते. चेहर्‍यावर दृढनिश्चय होता आणि डोक्यात योजना पक्की झाली होती. इतक्यात निरोप मिळालेला शिवा काशिद आत आला आणि मुजरा घालून म्हणाला,”राजे ! काय हुकूम आहे ? आपली वर्दी सांजच्याला मिळाली तसा टाकोटाक नेवापुरातून लगेच गड जवळ केला”.
    “बर झालस शिवा लगेच आलास ते. तु या मुलुखाचा जाणकार आहेस. आज तुझ्यावर मोठी जबाबदारी द्यायची आहे. या उत्तर अंगाच्या बाजुला रुस्तमेजमानची छावणी आहे. रुप बदलून तुला रुस्तमची भेट घ्यायची आहे आणि आमचा निरोप त्याला द्यायचा आहे. अजून तरी गडावर आणि खाली सगळ्यांना तु शिवा काशीद म्हणूनच माहिती असलास तरी फार थोड्यांना तु हेर आहेस याची जाणीव आहे, त्यामुळे गडावरुन खाली उतरुन छावणीत जायला अडचण यायची नाही. उद्या रात्री रुस्तमचा निरोप आम्हाला दे”.
 त्यानंतर बराच वेळ राजे शिवाला काहीतरी सांगत होते.
—————————————————————————————————————–
      दुसर्‍या दिवशी छावणीत सकाळची नमाज झालेली होती. रुस्तमेजमान त्याच्या छावणीत खलिता लिहीत होता, इतक्यात बाहेर आवाज आला,”या खुदा इस फकीर को मदद हो. रहेम करो”. अचानक हा फकीर एन वेढ्यात आलेला पाहून शिपाई सावध झाला आणि त्याने फकीराला भाला आडवा घातला,”कौन हो तुम? यहाँ कैसे आये ? और किसने तुम्हे आने की ईजाजत दि ?”
    “बेटा इस अल्ला के बंदे को कौन इजाजत देगा. हमे तो ये पुरी जमीं खुदाने बक्ष दी है और तुम ईजाजत कि बात करते हो ?” फकीराने उलट सवाल केला.
  “ठिक है, लेकीन ये कोई गाव नही, यंहा सब सिपाही पहेरा दे रहे है, तुम्हे यहाँ घुमने की इजाजत नही दे सकते” पहारेकरी थोडा नरमला.
“कोई बात नही, मुझे बस आप के सरदार से मिलाओ. हम उन दुवा देंगे और चले जायेंगे” फकीर ठामपणे उभारला.
      “ठिक है, यही रुको. हम खानसाब को पुछ के आते है” पहारेकरी छावणीत गेला आणि रुस्तमेजमानला कुर्निसात घालून बाहेर उभ्या असलेल्या फकीराविषयी सांगितले. या एन वेढ्यात, फौजेत आपल्याला भेटायला फकीर आला आहे ? रुस्तमला थोडे आश्चर्य वाटले, तरीही त्याने पहारेकर्‍याला सांगितले, “ठिक है, भेज दो उसे”
   त्यानंतर फकीर आत गेला.पण खुप वेळ तो बाहेर आला नाही. एक फकीर खानसाहेबांना इतका वेळ कोणती दुवा देतो आहे याचे पहारेकर्‍याला आश्चर्य वाटले. बर्‍याच वेळाने तो फकीर हातात मोरपिस घेउन बाहेर आला, त्याच्या चेहर्‍यावर विलक्षण समाधान होते.
     रात्री शिवा पुन्हा एकदा राज्यांच्या महाली गेला. दार बंद करुन दोघांची चर्चा सुरु झाली. शिवाने आपल्या धोकटीतून मोरपिस काढून दाखवले आणि निरोप दिला, “पुनवेच्या रात्री पश्चिमेला चंद्र जाईल”. हा निरोप कोणी एकला असता तरी त्याच्या काही डोक्यात काहीही प्रकाश पड्ला नसता.पण राजांच्या चेहर्‍यावर स्मित उमटले. त्यांनी लागोलग शिवाला पुढची कामगिरी सांगितली, “शिवा, तुला विशाळगडाकडे जाणार्‍या जवळच्या आणि अवघड वाटेची माहिती आहे का ? शक्य तितक्या या वाटेने पोहचायला हवे.”
   “हो महाराज ! तसा रस्ता आणि समदी वर्दळ मलकापुर न्हाईतर आंब्याच्या वाटेने असतीया.पर मधली एक वाट ठाव हाय मला.धनगर्,कातकरी याच वाटंन अणुस्कुर्‍याला जात्यात आणि खाली कोकणात उतरत्यात. पर लई चिखुल. असल्या पावसात तर नवखा शेवटाला जायचा न्हाई. जळवा तर मोप. एकदा लागली की पोट भरुन रगात पिल्याशिवाय उतरायची न्हाई. वाटंत झाडी लई दाट हाय, वढं बी हायेत. पावसाळ्यात तट्ट फुगत्यात, पाय घालायला भ्या वाटतयं. जादा कोन या वाटंन जात न्हायी,पर विशाळगड जवळ हाय तो याच वाटंन”.
   “ठिक आहे, तू आणि बाबाजी या वाटेने दोन-तीनदा जाउन या. या वाटेचे प्रत्येक तपशील आम्हाला हवे आहेत.आम्ही तुला सांगतो त्या सर्व गोष्टी नीट निरखायच्या आणि चार दिवसांनी आम्हाला येउन भेट”.
   त्यानंतर राजे शिवाला बराच वेळ खुपकाही सांगत होते. मध्यरात्र उलटली तसा मान हलवून शिवा महालाबाहेर पडला.
    अखेरीस त्रयोदशीचा दिवस उजाडला. राजांनी सगळ्यांना मसलतीसाठी बोलावले आणि निर्वाणीचे सांगितले,”दोनच दिवसांनी पौर्णिमा आहे.आम्ही त्याच दिवशी गड उतार होउन विशाळगडावर जाणार आहोत. त्रिंबकपंत तुम्ही पन्हाळ्याचे गडकरी, गडाची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवतो आहोत. आमच्या सोबत आम्ही बांदलसेना घेउन जाणार आहोत. सहाशे बांदल्,बाजीप्रभु,फुलाजी प्रभु, रायाजी बांदल, शंभुसिंग जाधव हे वीर आमच्यासोबत येतील”.
     “महाराज आम्हालाही तुमच्या सोबत यायचे आहे.जीवावरचे हे धाडस तुम्ही करणार आणि त्यावेळी आम्ही तुमच्या सोबत नाही, हे शक्य नाही.आम्हालाही येउ द्या” सगळे सरदार पुढे होउन आर्जव करु लागले.
   “तुमच्या भावना आम्ही जाणतो, पण गड सांभाळणे हि तितकीच मोलाची जबाबदारी नाही का. आम्हाला सैन्य घेउन हा वेढा ओलांडायचा आहे.फार फौज बरोबर घेता येणार नाही.आम्ही राजगडी गेल्यावर पन्हाळा आदिलशहाला देउ, तेव्हा गड मोकळा करुन नवीन मसलतीसाठी आपण पुन्हा एकत्र येउन झुंजायचे आहे.स्वराज्यावर दुसरा शत्रु आधीच आपली वाट पहातो आहे.” राजे निश्चयी स्वरात बोललयावर सोबत्यांचा नाईलाज झाला.
   “पण राजे सिद्दी जोहरला कसे सांभाळणार ? पहारा तर चोख आहे. ” सोबत्यांच्या स्वरात काळजी आणि प्रश्नचिन्ह, दोन्ही होते.
 “त्याचाही विचार झाला आहे. आम्ही जोहरला बिनशर्त शरण जाणार !” राजे स्मित करत म्हणाले.
“काय ??? शरण ??” एकदम गोंधळ उडाला.
“होय, शरणागतीचा निरोप घेउन आजच गंगाधरपंत गडउतार होतील. गेले चार महिने एकाच जागी उभारुन विजापुरची फौज कंटाळली आहे. त्यात हा असा महामुर पाउस. शरणागतीची बातमी जरी वेढ्यात पसरली तरी आदिलशाही फौज खुशीने बेहोश होईल. आनंदाच्या भरात बेसावधपणा येतो. फौजेची हि मानसिकता असते, एकाच जागी उभारुन सैनिक कंटाळतो, त्याला सतत काही कामगिरी द्यावी लागते.जोहरने नेमकी हिच चुक केली आहे. या कंटाळ्यातून तह होणार हि बातमी समजली तर सैनिक शिथील पडतो. युध्दशास्त्र हेच सांगते.आम्ही नेमके याच मानसिकतेचा फायदा घेणार आहोत. एकदा वेढ्यातून पार झालो तर फार अवघड नाही, अर्थात तरीही पुढच्या सर्व संकटाचा विचार करुन पर्यायाची आखणीही आम्ही केली आहे. बस्स काही काळासाठी जोहर बेसावध व्हायला पाहीजे.”
    कान टवकारून सर्व सदर हा मनसुबा एकत होती. राजांनी सुक्ष्म विचार केला होता. बेत कारिगर होणार याची सर्वानाच खात्री पटली.मनातून सर्वांनीच आपआपल्या दैवतांना नवस बोलला असणार.
     आषाढ पुनव दिवस उगवली. गुरुपौर्णिमा ! आज चांगलाच धडा एक विजापुरकर शिष्य शिकणार होते.दिवस वर चढला आणि गडावरुन गंगाधरपंत एक थैली घेऊन निघाले. खुद्द महाराजांच्या शिक्का मोर्तबाची पत्रे त्या थैलीत होती.अर्थात हा खलिता होता खाश्या जौहरसाठी.गडावरुन गंगाधरपंत गड उतरताना जौहरचे छावणीला दिसत होते.सततच्या उनपावसात रात्रंदिवस पहारा करुन वेढ्यात उभारुन पुर्ण वैतागलेल्या सैन्याला हे दृश्य नवी आशा पालवणारे होते.सततची दमदाटी, आधी घामाच्या धारा काढून भाजून काढणारे उन आणि आता अंगावर एक दोराही कोरडा न ठेवणारा पाउस, याने वैतागलेल्या सैनिकांची नजर कायमच गडाच्या दरवाजाकडे लागलेली असायची. कधी त्या सिवाचा वकील येतो, बोलणी होतात आणि कधी आम्ही इथून निघतोय.
       गंगाधरपंत गड उतर होताना पाहून फौजेच्या आशा पालवल्या. “सिवाचा वकील अखेरीस आला.आता आपला हा वनवास संपणार.ईतके महिने उन्हा पावसात राबलो, शेवटी फतेह झाली तर!”
     गंगाधरपंत जोहरच्या छावणीत पोहोचले.त्यांनी थैलीतून खलिता काढून जौहरच्या हातात दिला.वकीलाला पाहून जोहरच्या मनात आनंदाने कारंजे थुईथुई उडायला लागले. तरीही चेहरा स्थितप्रज्ञ ठेवून खलिता उघडला आणि मजकुरावरुन नजर फिरवली.जसजसा तो वाचत गेला तसतसा त्याचा चेहरा उजळला. “शिवाजीने बिनशर्त शरणागती पत्करली होती !”. इतके परिश्रम घेतले त्याचे सार्थक झाले होते. आता विजापुरात ताठ मानेने जाता येणार होते.गेले काही दिवस बादशाहाची पत्र येत होती, त्यात जोहरवर थेट बंडखोरीचा आरोप केला जात होता.आता त्याला चोख उत्तर देता येणार होते.जोहर विचारात गढला होता, इतक्यात गंगाजीच्या उदगारांनी तो भानावर आला,” हुजूर, काय सांगू राजांना ?”
    “आप थोडे देर रुकीये. मै सला मशवरा करके आपको जवाब देता हुं” सिद्दीने थोडे धीराने घेण्याचा निर्णय घेतला.लगोलग त्याने फाझल्,रुस्तम यांना छावणीत येण्याचा निरोप दिला. दोघे आल्यानंतर त्यांच्या समोर शिवाजी राजांचा खलिता दाखवला आणि मत विचारले.
    फाझल ताडकन उत्तरला ,”सिवा ईतने आसानीसे हार कबुल करेगा, ये मै नही मानता. शायद ये उसकी यहांसे छूटने की कोशीश होगी. मी माझ्या वालिद खानसाहेबांबरोबर गेलो होतो तेव्हा अशीच बतावणी करुन त्याने आम्हाला जावलीच्या जहन्नुमसारख्या मुलुखात बोलावून घेतले आणि दगा दिला”.
    रुस्तमने मात्र वेगळाच सुर लावला, “खानसाहेब, माझ्या मते अर्जी मंजुर करावी. तसेही सिवाला आपण या पन्हाळ्यावर कोंडले आहे.जरी सिवा शरण आला नाही तरी तो वेेढ्यातून पळून जाणे शक्य नाही. आपले मोर्चे पहारे कडक आहेत.जर आता आपण अर्जी मंजुर केली नाही आणि उद्या पुन्हा नेतोजी चालून आला तर थकलेली फौज तोंड देईल ? शिवाय अली बादशहा आपसे वैसेही खफा आहेत. त्यांनी लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावायला सांगितला आहे.खानसाहेब, सुला मंजुर असल्याचा खलिता आजच रवाना केलेला बरा”
   एकूण परिस्थितीचा विचार केला तर रुस्तमचे म्हणने जोहरला पटले. मात्र फाझलला हि सुला मान्य नव्हती. पण अखेरचा निर्णय सेनापती या नात्याने जोहरचा असणार होता. निमुटपणे फैसला मान्य करुन चडफडत तो आपल्या तंबुकडे गेला.
   प्रसन्न चेहर्‍याने गंगाधरपंत खलिता घेउन गड चढू लागले. ईतकी महत्वाची बातमी वेढ्यात पसरली नसती तरच नवल होते. सगळ्या फौजेच्या चेहर्‍यावर तणाव दुर झाल्याने हास्य फुलले. तुफान पावसाने आणि रोगराईने बेजार झालेल्या सैनिकांना कधी आपल्या मुलुखात परत जातो आहे, याचे वेध लागले. सैनिक पहार्‍याएवजी जागोजागी एकत्र जमून चर्चा करु लागले.
——————————————————————————————————————–
          पौर्णिमेच्या रात्रीचा पहिला प्रहर उलटून गेला होता.सज्जाकोठीजवळ सहाशे बांदल सेना शस्त्रास्त्रांसह सज्ज होउन निघायच्या तयारीत होती.आज स्वराज्याचे प्राण त्यांना आपल्या खांद्यावर वाहून न्यायचे होते. आजच्या त्यांच्या कामगिरीवर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलक्ष्मीच्या कुंकवाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. शिवरायांसाठी पालखीची व्यवस्था केली होती. इतक्यात राजे तिथे आले आणि सगळ्यांचा निरोप घेउ लागले “आम्ही आता येथून जातो.पुढचे राजकारण तडीला नेण्यासाठी आमची येथून सुटका जरुरीची आहे.आमच्या माघारी आपण सर्वजण हा गड सांभाळाल असा आम्हाला विश्वास आहे.त्रिंबकपंत गडाची चोख व्यवस्था ठेवतील. गोदाजी,हिरोजी,सिदोजी दुष्मनाला तसुभरही वर चढू देणार नाहीत याची खात्री आहे.आपण आमची चिंता न धरावी.आई भवानी आम्हाला यश देईल.भवानीच्या कृपेने गनीमाची फौज आज रात्री आदिमायेच्या मोहजालात असेल आणि आम्ही वेढा पार करुन सुखरुप जाउ”.एकाचवेळी काळजीने धास्तावलेले मन कसेबसे काबु करुन आणि राजे सुखरुप जावेत यासाठी वारंवार हात जोडत सर्वजण आपआपल्या तैनात केलेल्या जागेवर परतले. मावळ्यांनी पालखी उचलली आणि कोणताही आवाज न करता सहाशे जणांची ती सेना राजदिंडीची वाट जवळ करु लागली. वरुन पावसाची संततधार सुरु होती.ढगांच्या आडून अस्पष्ट चंद्रप्रकाश सगळीकडे पडला होता.गडाचे बुरुज मागे पडले आणि राजदिंडीच्या वाटेवरच्या चिखलात सहाशे जणांच्या पायाचा चप्प चप्प आवाज येउ लागला.गड उतरायला सुरवात झाली तसे न रहावून बाजी महाराजांना म्हणाले, “महाराज ! नेमका काय मनसुबा आहे. चाळीस हजाराच्या फौजेचा वेढा आहे.कसा ओलांडायचा आपण? बर बरोबर सहाशे जणं आहेत. त्यात हा तुफान पाउस आणि चिखलाने भरलेली वाट”
    “त्याचा विचार झालेला आहे.आपण चिंता करु नये बाजी. एकतर आम्ही शरण येउन तह करण्याची बातमी वेढ्यात पसरवल्यामुळे कंटाळलेली फौज आज नक्कीच बेसावध असणार आहे. शिवाय आणखी एक मह्त्वाची चाल आम्ही खेळली आहे. विजापुरच्या फौजेकडून रुस्तमेजमान आला तेव्हाच आम्हाला एक आशा होती.अहो, त्याच्याच कुडाळ, आचरा, खारेपाटण या मुलुखावर हल्ला करुन आम्ही तो प्रदेश काबीज केला तरी त्याने विरोध केला नाही. आम्हीही त्याला त्याचा फायदा दिला.कोल्हापुरला रुस्तम फाझलखानाबरोबर आला, तेव्हा आमच्या समोरुनच तो पाच-सहा सैनिकांबरोबर पळाला.दुसरा एखादा सरदार असता तर एव्हाना आमच्या जगंदबेखाली आला असता. आज पुन्हा एकदा रुस्तम आपल्या मदतीला आला आहे. पन्हाळा आणि हे मसाई पठार जोडणार्‍या धारेवर आज जी फौज तैनात आहे, ती सर्व रुस्तमची आहे.आपल्या एकाही शिपायाला तलवारीचा घाव काय, साधे बोटही लागणार नाही, याची खात्री आहे.मागे शिवाला फकीराच्या वेशात पाठवून आम्ही रुस्तमशी संधान बांधून हा बेत ठरवला आणि आजचा दिवसही मुक्रर केला. पण हा बेत पन्हाळ्यावर सगळ्यांसमोर सांगणे धोक्याचे होते.पन्हाळ्यावर एखादा जरी विजापुरचा हेर असेल तर सगळा बेत फसण्याचा धोका होता, शिवाय रुस्तमही अडचणीत आला असता. हा शिवाजी त्याच्या मित्राला कधी धोका देत नाही आणि शत्रुवर कधी विश्वास ठेवत नाही.आपण वेढापार होणार याबध्दल निश्चिंत रहा बाजी! आम्हाला स्वराज्याचे एक एक माणुस मोलाचे आहे.एकाही माणसाला गमवायची आमची तयारी नाही”.
    राजांच्या या दुरदृष्टीवर, नियोजनावर आणि कार्याला वाहून घेण्याच्या गुणावर बाजी थक्क झाले.असा राजा आपल्याला लाभला हे परमभाग्यच. खणखणीत आवाजात त्यांनी मावळ्यांना पावले उचलायचा हुकुम केला.
गडाचा निम्मा उतार संपला आणि पन्हाळगड व मसाईपठार जोडणारी धार जवळ आली.पहारा जवळ आला. प्रत्येक मावळ्याला आपल्याच उरातील धडधड स्पष्ट एकु येत होती, कोणाच्या पायात काटा मोडला तरी निमुटपणे सहन केले जात होते. आपल्याच पायाचा चिखलात होणारा आवाज मोठा वाटत होता. आणि वेढा जवळ आला.प्रत्येकजण मनात आई भवानीला साकडं घालत होता, शंभु महादेवाला विनवत होता. आणि काय आश्चर्य ? वेढ्याच्या जागेवर हशम नव्हतेच, कोणी पहारेकरी आसपास नव्हते.सहाशे मावळ्यांचे जीव एकदमच भांड्यात पडले.आता वेगाने उतरायचे होते. सर्वजण पन्हाळगडाचा उतार पार करुन सपाटीला आले.आता म्हाळूंगे गाव गाठून तिथून मसाईच्या पठारावर चढायचे होते. हा टप्पा पार केला तर विशाळगडाचा पायथा गाठेपर्यंत चिंता करायचे कारण नव्हते,ईतक्यात _ _ _ _ _ _ _
    घात झाला ! म्हाळूंगे गावाच्या दिशेने गेलेल्या काही आदिलशाही सैनिकांनी या तुकडीला बघीतले.पोषाखावरुन हे आपल्या फौजेतील नसून मराठे आहेत, हे त्यांच्या लक्षात आले आणि घाईघाईने ते आजुबाजुच्या शेतात गडप झाले. विजापुरच्या काही सैनिकांनी आपल्याला पळताना पाहिले, हे आघाडीवरच्या मावळ्यांच्या लक्षात आले.पण काही हालचाल करायच्या आत ते आजुबाजूच्या झाडीत गडप झाल्याने त्यांची तिथेच खांडोळी करायचा मौका गेला. आता वेळ घालवून उपयोग नव्हता. हि बातमी पटकन बांदल सेनेत पसरली आणि वेगात ते सर्व जण म्हाळूंगे मागे टाकून मसाईच्या पठारावर पोहचले.
  आज उत्तररात्र झाली तरी सिद्दी जोहरची छावणी जागी होती. जोहरच्या शामियानात फाझल, मसुद, सादतखान, भाईखान एकत्र जमले होते. मोठा खुशीचा माहोल होता.उद्या सिवा ताब्यात आला की लगेच विजापुरला रवाना व्हायचे आणि सिवाला दरबारात उभे केले आपली जबाबदारी संपली, हा मनसुबा जोहर रचत होता. अब्बुजानच्या कत्लचा बदला घेतला याचे समाधान फाझलच्या चेहर्‍यावर होते, तर एकदाची ही मोहीम संपली ह्या सुटकेच्या आनंदात बाकीचे होते. तहाच्या अटी काय असाव्यात याचा खल सुरु होता, तोच_ _ _ _
    बाहेरुन काही हशम आरडाओरडा करत सिद्दीच्या छावणीच्या दिशेने आले. परवानगीची वाट न बघता ते धाड्कन तंबुत शिरले. त्यांची हि गुस्ताखी बघून जोहरला संताप आला.तो काही बोलणार तोच, त्यांनी एकच गोंधळ करत बोलायला सुरवात केली.
“काय झाले ? ईतका गोंधळ कशासाठी ? आधी थोडे शांत व्हा आणि एकेकाने नीट सांगा पाहू” फाझल त्यांचावर डाफरला.
“हुजूर ! क्या बताये, सिवा भाग गया” एक शिपाई कसाबसा धापा टाकत म्हणाला.
       “क्या बकते हो ?सिवा भाग गया ? कैसे ?किले को हमने अभी भी पुरी तरह से घेर लिया है और इतनी फौज को धोका दे के सिवा कैसे भाग सकता है ?” आश्चर्याने थक्क झालेला फाझल म्हणाला.
    “जी हुजूर्,सचमुच भाग गया, हम कुछ खानेपिने का सामान लाने के लिये म्हालुंगे गाव गये थे, परत येताना सिवाची फौज दिसली. मराठ्यांच्या पोषाखावरुन आम्ही ओळखले”
      “क्या ?? तो सिवा सचमुच भाग गया! या अल्ला.अब मै क्या करु ? ये क्या हो गया ?अभी भी मुझे यकीन नही आ रहा है” जोहरचे डोळे खोबणीतून बाहेर येतील की काय असे वाटत होते,त्याला तीव्र धक्का बसला होता.हाताच्या मुठी वळवून तो आपल्याच कपाळावर मारत होता.रागारागाने त्याने आपला किमाँश डोक्यावरुन काढून जमीनीवर फेकला. चिडून पाय जमीनीवर आपटत तो इकडे तिकडे फेर्‍या मारु लागला.त्याचे क्रुध्द रुप बघून ते हशम घाबरले आणि मागच्या मागे कनातीतून पळून गेले.
   थोड्यावेळाने जोहर धक्क्यातून सावरला.कसाबसा तो बैठकीवर बसला.दोन्ही हातात डोके गच्च धरुन मान खाली घालून बोलला, “या खुदा ! ये कैसा गजब है. पहेली ही मै बगावतखोर हू, एसा ईल्जाम मुझ पे है, हा कलंक धुवून काढण्याची हि नामी संधी होती.सिवा पळाल्याने आता बादशहा सलामत मला कडी से कडी सजा देणार. अब मै क्या करूं ? क्या करू ?”
     “हौसला रखिये खानसाहब. मी तर आधीपासून सांगत होतो, सिवावर विश्वास ठेवू नका.दगाबाज आहे तो, माझ्या वालिदना गोड बोलून आणि घाबरल्यासारखे दाखवून त्याने असेच भुलवले आणि ठार मारले. तुम्ही त्याचा अजिबात यकीन करु नका असे वारंवार सांगत होतो.लेकीन आपने मेरी सुनी नही. अब अगर हम उसे पकड नही पाये तो हमारा जिंदा बचना मुष्कील है. हमारे वालिदने कल्याणी के किले मे औरंगजेब को एसेही जखड के रखा था. वो उसे मारना ही चाहते थे.पण खानजनानने त्या औरंगजेबाला सोडले, बडी बेगमला गुस्सा आला आणि विजापुरात खानजनान येत असतानाच त्याला मारला.आता आपलेही हाल तेच होणार आहेत.अजून वेळ गेलेली नाही.मी आणि मसुद त्या सिवाच्या मागे जातो. मसाई डोंगराकडून सिवा गेला म्हणजे तो विशाळागडाला गेला असणार.तिथे आपले सुर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर आहेतच. मसाई डोंगराकडची वाट कोणाला माहिती असल्यास तिकडून फौज पाठवतो.मसुद मलकापुरकडून घोडदळ घेउन जाईल.सिवाची फौज पायी चालली आहे,त्याना मलकापुरपाशी आपण अजूनही गाठू शकतो.लेकीन आप यही रहिये, कदाचित यातही त्या सिवाची काही चाल असेल, आपण सगळेच विशाळगडाकडे गेलो तर ईथे वेढ्यात कोणी असणार नाही, त्याचाच फायदा घेउन सिवा ईकडून पळून जायचा.चलो मसुद”
   फत्तेखानाने तातडीने सुत्रे हाती घेतली.जोहरचा चेहरा मात्र साफ पडला होता.संतापाने थरथरत तो छावणीतून बाहेर पडला.
—————————————————————————————————————
   रात्रीचा उत्तर प्रहर लोटून आता पुर्वेला तांबड फुटायला लागलं. पाउस मात्र उसंत घ्यायला तयार नव्ह्ता. सहाशे मावळ्यांची ती मृत्युला चकवा देणारी धाव अजूनही संपली नव्हती.सह्याद्रीचे आणि महाराष्ट्राचे प्राण विशाळगडाच्या कडेकोट तिजोरीत पोहचवल्याशिवाय ती संपणारही नव्हती. बर हि वाटचाल तरी सोपी होती का ? शत्रु मागावर असणार याची खात्री होतीच.पण तो कोठून हल्ला करणार काही माहिती नाही. एकवेळ नरकाची वाट सोपी अशी हि विशाळगडाकडे जाणारी आडवाट होती. जांगडभर चिखल, त्यात धड पाव कोससुध्दा सरळ नसणारी वळणाची वाट, मध्येच बांधावरून जायची तर कधी सुर्याचे किरणही खाली पोहचणार नाहीत अशी घनदाट झाडी, पर्जन्यकाळात ईथे जळवांचा मुक्त वावर, कधी पायावर चढली आणि आणि कधी रक्त प्यायला बसली कळायचे नाही, तीचा तरी काय दोष ? गेले तीनशे वर्ष पातशहा तरी काय वेगळ करत होते ? भरीला वाटेत येणारे कंबरभर पाण्याने फुफाटत वाहणारे ओढे, जरा पाउल चुकले कि क्षमा नाही, माणुस थेट धारेला लागणार. विशेष म्हणजे अश्या दुर्गम ठिकाणीही काही गाव वसली होती. झुंजार सह्यपुत्रांनी या अडचणीच्या भागातही वस्त्या उभारल्या होत्या.
     या वाटेने जायचे म्हणजे माणुस कितीवेळ दम धरणार ? कधी चिखलात पाय घसरून आपटायचे भय, तर कधी बांधावरुन तोल जाउन पाण्यात बुडायचा धोका, शेवाळाने माखलेल्या दगडावर पाय पड्ला तर मुरगाळणे तर ठरलेले, दाट जंगलाने वेढलेल्या वाट कधी गुडूप व्हायची, बरोबर वाट सापडली तर ठिक नाही तर चकवा लागलाच म्हणून समजा. या वाटेने पावसात जायचे म्हणजे प्रत्यक्ष भुतांनाही भिती वाटावी. पण सह्याद्रीच्या भुतांना हि भिती नव्हती, त्यांच्यावर कामगिरीच तशी होती.
   अश्या वाटेवरुन रात्रीची धावपळ करुन सहाशे मराठे अखेर पांढरपाण्याला पहाटे फटफटण्याच्या वेळी पोहचले. इथे मलकापुरकडून येणारी वाट अणुस्कुर्‍याकडे जात होती. आता दम नव्हता. पालखी पुढे पळत होती आणि कासारी नदीचे दरीतील पात्र समोर आले. पलिकडच्या तीरावर गजापुर होते. कासारी पावसाच्या पाण्याने तट्ट फुगली होती. पात्र मागे टाकून राजे आणि मराठे गजापुरच्या वेशीवर पोहचताहेत तोपर्यंत मागच्या डोंगर उतारावर घोड्यांचा टापा एकू येउ लागल्या.अखेरीस घात झाला तर ! रात्रभर दमलेली फौज घोड्यावरून बेभान होउन येणार्‍या आदिलशाही फौजेसमोर किती टिकाव धरणार होती ? अवघे सहाशे मावळे त्या लांडग्याना पुरे पडणार होते का ? मोठे प्रश्नचिन्ह होते. बाजींनी करड्या आवाजात आज्ञा दिली “पालखी थांबवा “
    भोई झालेले मावळे थांबले.बाजींनी हि अशी आज्ञा का दिली ? सार्‍यांनाच प्रश्न पडला. महाराज पालखीतून उतरुन बाहेर आले आणि बाजींना विचारले, “काय झाले बाजी ? का थांबलात ?”
    “महाराज ! प्रसंग मोठा बाका आला आहे.गनीम पळभरात आपल्याला गाठणार हे निश्चित आहे. विशाळगड तर अवघे चार कोस राहिला आहे. थोडक्यासाठी सगळीच मसलत वाया जाण्याचा धोका आहे. गनीम संख्येने किती आहे, आपल्याला ठाउक नाही, पण आपण वेढ्यातून निसटलो आहे, त्यामुळे आदिलशाही फौज चिडली असणार. तेव्हा सगळ्यांनीच ईथे थांबण्यापेक्षा निम्मी फौज घेउन महाराज, आपण पुढे विशाळगडाकडे जावे, आम्ही तीनशे बांदल घेउन ईथे गजापुरापाशी घोडखिंड आहे, तिथे उभारतो. खिंड चिंचोळी आहे, एकच वाट वर चढते.अश्या बिकट जागेवर शत्रु संख्येने कितीही असला तरी पुढे येउ शकणार नाही. आपण फक्त विशाळगडावर पोहचल्यावर तोफेचे बार करावेत.आपण सुरक्षित पोहचल्याची खात्री पटताच खिंड सोडून आजुबाजुच्या जंगलातील वाटेने विशाळगडावर आपल्या मुजर्‍याला येतो. ” बाजी निश्चयाने म्हणाले.
   “नाही बाजी, आम्हाला हे मान्य नाही.आपल्याला एकटे सोडून जाणे मनाला पटत नाही.अहो आपण ईतक्या अडचणीत जीवावरच्या संकटात एकत्रच ईथपर्यंत आलो. आता बाका प्रसंग आला आहे, तर मिळून लढू. जे होईल त्याला एकत्रच तोंड देउ. आम्हीही ईथेच ठाम उभे राहुन या शाही फौजेला तोंड देउ.” महाराज निश्चयाने म्हणाले.
    “नाही महाराज ! गनीम जास्त आहे.आपल्यासारखे लाख मोलाचे प्राण कित्येक वर्षांनी मराठी मुलुखाला लाभले आहेत, ते या अश्या लढायांना तोंड देण्यासाठी पणाला लावणे योग्य नाही.त्यासाठी हा बाजी आणि हे बांदल पुरेसे आहेत. महाराज, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशींदा जगला पाहीजे.आमची चिंता न धरावी.लहानपणापासून हे बांदला आम्ही पहातो आहोत. जिथे उभारतील तिथे शत्रुला अंगठा ठेउ देणार नाहीत. ह्या बाजीच्या कुडीत जोपर्यंत प्राण आहेत, तोपर्यंत हि खिंड ओलांडून एकही गनीम पलीकडे येणार नाही. आपण चलावे महाराज ! आपल्याला आई भवानीची शपथ आहे.आजचा दिवस या बाजीची आज्ञा आपल्याला मानावी लागेल”
   महाराजांचा नाईलाज झाला.भर्रकन पालखी पुढे आली.एका क्षणाचीही उसंत नव्हती. राजांनी बाजींची गळाभेट घेतली आणि एकाच वाक्यात निरोप घेतला , “बाजी,आम्ही विशाळगडावर आपली वाट पहातो आहोत हे लक्षात घ्या,शक्य तितक्या लवकर विशाळगड जवळ करावा”.
  बघता बघता महाराजांची पालखी पावसाच्या झडीत वळणावर अदृष्य झाली.
बाजीनी तातडीने खिंड गाठली आणि मोर्चे लावायला प्रारंभ केला. खिंडीच्या दोन्ही उतारावर घनदाट झाडी होती. काही मावळ्यांना गोफणगुंडे घेउन वाटेच्या थोड्या ऊंचीवर बसवले.गोफणीसाठी दगड ? ते तर भरपुर होते. जरा पुढे धनुष्यबाण घेतलेले मावळे थोड्या जास्त उंचीवर बसले.इथून गनीम आरामात बाणाच्या ट्प्प्यात येणार होता. खिंड जेमतेम रुंदीची आणि चिंचोळी होती, एकदोन जण उभारले की प्रत्यक्ष यमही पलीकडे जायचा नाही. इथे बाजी, फुलाजी हातात पट्टे घेउन उभारले. खिंडीच्या अलिकडच्या वळणावर रायजी, शंभुसिंह दबा धरुन बसले. घोडखिंडीचा परिसर आता मृत्युचा सापळा झाला होता.आता गनीम कितीही संख्येने येउ दे, एकही परत जाणार नव्हता. तितक्याच घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज येउ लागले, दीन,दीनची ओरड कानावर येती आहे तोपर्यंत पावस, धुक्यातून गनीम दिसु लागला. प्रचंड पावसाने घसरड्या झालेल्या वाटेवर घोड्यांच्या टापाही ठरत नव्हत्या. आले, आले म्हणेपर्यंत विजापुर सैन्याची पहिली फळी खिंडीच्या नजीक आली.ईथे कोणी उभे आहे याची कल्पनाच मसुद आणि त्याच्या फौजेने केली नव्हती.तडाखेबंद पाउस आणि धुक्याने दहा हातापलीकडे धड दिसत नव्हते.वेगाने आलेली शाही फौजेची पहिली फळी अलगद बांदल सेनेच्या तडख्यात सापडली. काही कळायच्या आतच बर्याच जणांच्या मेंदुचा बाणांनी वेध घेतला होता, जरा पुढे गेलेल्यांना दगडाचा सडकून मार पडला, काही समजायच्या आतच जवळपास पहिली गारद झाली. पुढे मराठे उभे आहेत, हे लक्षात आल्यानंतर जे गनीम मागे पळायला लागले त्यांना रायाजी, शंभुसिंहानी आल्लद वरच्या वाटेला लावले.
 “पुढे मरहट्टे है, हुजुर ” एक वाचलेला, पण रक्तबंबाळ झालेला हशम घाईघाईने मसुदजवळ जाउन म्हणाला.
“क्या ? ये तो गजब हुआ.या खुदा ये मरहट्टे किस मिट्टीसे बने है. उधर सिवाभी मौजुद है क्या ?” मसुदला एक क्षणभर काय करावे समजेना.
  त्याने सावधपणे दुसरी फळी पाठवली. आता आदिलशाही सैन्याला अंदाज आल्याने ते चौकसपणे ईकडे तिकडे पहात पुढे सरकत होते, पण अचानक झाडीतून सटासट बाण येउ लागले. पावसाच्या थेंबाशी स्पर्धा करणारा तो बाणांचा मारा होता. धडाधड हशम घोड्यावरुन पडू लागले.
       “भागो”
   एकच गलका करुन शाही फौजा माघारी पळू लागल्या.इतक्यात _ _ _ _
   बाजूच्या कड्यावरुन मोठ मोठे दगड धड धड आवाज करीत येउन डोक्यात आपटु लागले. कित्येक सैनिक काय होते आहे, हे समजायच्या आतच खुदाला प्यारे झाले होते.रडत्,पडत जेमतेम दोनचार सैनिक मसुदपाशी पोहचले.
       आता मात्र मसुदला विचार करणे भाग होते.बरोबर पंधरा हजाराची फौज असली, तरी प्रत्येक हल्ल्याला सैनिकांची एक तुकडी जायची आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतके हशम परत यायचे. त्यातच परत आलेल्या एका सैनिकाने पुढे सिवा नाही, तो निसटून विशाळगडाकडे गेला आहे, हि बातमी दिली होती.आता या घोडखिंडीपाशी फार वेळ घालवून चालणार नव्हता. त्याने थोडे सैनिक गजापुरला पाठवून विशाळगडाकडे जाणारी पर्यायी वाट आहे का, याची विचारण्या करण्यास सांगितले, पण अशी कोणतीही वाट नव्हती. आता घोडखिंडीवर धडक मारण्याखेरीज मार्ग नव्हता.अखेरीस त्याने एक मोठी तुकडी पाठवली.बरोबर बंदुकबाज दिले. एखाद्या पाण्याचा लोंढा यावा तसे हे सैन्य खिंडीवर येउन आदळले. वरुन अर्थातच दगडांचा आणि बाणांचा मारा झाला. अर्थात फौज मोठ्या संख्येने असल्याने बरेच सैनिक कामी आले तरी बर्‍यापैकी हशम खिंडीच्या तोंडापर्यंत पोहचले. बंदुकबाजांनी बेभान मारा चालु केला. अंधाधुंद अश्या त्या फैरींनी काही बांदल सैन्याला टिपले. मात्र बंदुका ठासणीच्या असल्याने एक बार उडवला कि दारु भरायला वेळ लागायचा, शिवाय पावसाच्या मार्‍याने दारु ओली व्हायची, त्यामुळे थोडे मावळे मारले गेले तरी तिखट प्रतिकार मात्र चालुच राहीला. वर उभ्या असलेल्या मराठ्यांनी पुन्हा दगड लोटून दिले. बरेच बंदुकबाज त्याखाली चिरडून मेले. जे विजापुरी सैन्य कसेबसे खिंडीपर्यंत पोहचले होते, त्यांना काकडी कापावी तसे बाजी, फुलाजींनी कापून काढले. रात्रभर पळून थकलेले मराठे प्राण पणाला लावून शाही सैन्याला घोडखिंडीत अडकवले होते. मसुदने पाठवलेल्या मोठ्या तुकडीचा जवळपास फडश्या उडाला. अर्थात या हल्ल्यात मराठ्यांचेही थोडे नुकसान झाले. मसुदला अजूनही समजत नव्हते, नेमके किती मराठे खिंडीच्या परिसरात आहेत. पण मोठी तुकडी पाठवली तरच निभाव लागणार आणि जस जसे ते सैतान मराठे मरणार तरच आपल्याला पुढे जायची वाट मिळणार हे नक्की झाले.बर खिंडीच्या अरुंद वाटेमुळे मोठी फौज पुढे नेता येत नव्हती. पुन्हा मनाचा हिय्या करुन मसुदने बरेच बंदुकबाज आणि भालाईत पुढे पाठवले. त्याचाही नतिजा तोच झाला.बरेच जण स्वर्गाच्या वाटेला लागले, मात्र त्यांनी मराठ्यांचीही हानी केली.त्यामुळे मसुदने पाठवलेली पुढची तुकडी बर्‍याच वेगाने खिंडीच्या जवळ जाउ शकली. अर्थात खिंड ओलांडणे त्यांना या जन्मी तरी शक्य नव्हते.दोन्ही हातात पट्टे घेउन उभारलेले बाजी, फुलाजी अगदी काळभैरव आणि मार्तंडभैरवाचे अवतार वाटत होते.दोन्ही हातांनी पट्टे फिरवणारे बाजी एखाद्या चक्रासारखे फिरत होते. थेट त्या पट्ट्याखाली आलेले हशम निदान सुटले तरी, त्यांना थेट मुक्ती मिळाली, मात्र ज्याचा एखादा हात्,पाय गेला त्याला वेदना सहन करत निमुटपणे मृत्युची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.
ईतक्या तुकड्या पाठवूनही विजापुरची फौज खिंड पार करु शकत नव्हती.हे मराठे आदमी आहेत कि शैतान
? स्वराज्यावर आक्रमण करुन मराठ्यांच्या तलवारीचा तडाखा खालेल्या बहुतेक पातशाही सरदाराला पडलेला प्रश्न आज मसुदला पडला. जवळपास पाच घटका हाच प्रकार सुरु होता. मसुदने आपली स्वताची सिद्द्यांची फौज खिंडीवर रवाना केली. काळेकभिन्न, जाड ओठांचे,आडव्या अंगाचे दैत्यासारखे भासणारे सिद्दी खस्सु! खस्सु ! अशी त्यांची युध्दगर्जना करित पुढे चालून गेले.अर्थात पुढे असलेल्या बर्‍याच जणांना काही समजायच्या आत मुंडकी हवेत उडाली. रायाजी,शंभुसिंह झाडी, दगडाच्या आडोश्याने चोख काम करत होते, त्यातून वाचून चढ चढून कसेबसे खिंडीपाशी पोहचावे तो बाजींचा पट्टा सपकन हवेत फिरायचा आणि काही समजायचा आतच वार कारिगर झालेला असायचा. पण __ _ _ _ _ _
     साक्षात चित्रगुप्ताने लिहीता लिहीता थांबावे, कळीकाळाच्या काळजाचाही ठोका चुकावा असा क्षण आला. एका बंदुकबाजाने दुसर्‍या हशमाच्या आडून झालेल्या गोळीने आपले काम चोख केले होते.थेट वज्रासारख्या बाजींच्या छातीचा वेध घेतला होता. रक्ताची चिळकांडी उडाली.बेभान वेगाने घोडखिंडीच्या तोंडावर फिरणारे सुदर्शन चक्र थांबले. बाजी त्या धडाक्याने मागे कोसळले. बाजी पडले तरी प्रतिकार संपला नव्हता, फुलांजीनी तातडीने त्यांची जागा घेतली. बाजींच्या पतनामुळे डोळ्यात रक्त उतरलेल्या आणि एन आषाढाच्या पावसात डोक्यात बदल्याचा वडवानल पेटलेल्या फुलांजीसमोर एकही सिद्दी सैनिक उभा राहू शकला नाही. मावळ्यांनी बाजींना घाईघाईने मागे एका झाडीखाली नेले. थोडे क्षण बाजी बेहोश होते.बाजींचा पुर्ण अंगरखा रक्ताने भरला होता. आजुबाजुच्या भागात थारोळे जमले होते. इतक्यात बाजींनी डोळे उघडले आणि विचारले, “तोफांचे बार झाले का ?”
   “अजून नाही” खालमानेने एका मावळ्याने उत्तर दिले.
“अजून नाही ? मग हा बाजी पडतो कसा ? स्वामीकार्य अजून पुरे झाले नाही.आता काळ समोर ठाकला तरी आम्ही एकणार नाही. तोफेचे बार एकेपर्यंत या बाजीच्या कुडीतील प्राणालाही बाहेर जाता येणार नाही” बाजी कसेबसे उठून बसले.
    “बाजी, तुम्ही विश्रांती घ्या. खिंडीची तुम्ही काळजी करु नका. शेवटचा मावळा पडेपर्यंत एकही गनीम या खिंडीपलीकडे यायचा नाही” मावळ्यांनी बाजीना थांबवायचा प्रयत्न केला.
 “नाही ! आम्ही स्वामीनां वचन दिले आहे, तोफेचे बार एकेपर्यंत या बाजीला उसंत नाही.” कसाबसा झाडाचा आधार घेउन बाजी उठले, शेजारी मावळ्यांनी काढून ठेवलेले पट्टे पुन्हा चढवले आणि झाडाचा, कड्याचा आधार घेत कसेबसे खिंडीच्या तोंडाशी आले, तोच बर्‍याच गनीमांनी फुलाजींना वेढलेले दिसले. फुलाजी रक्ताचा अभिषेक केल्यासारखे दिसत होते, पण बेभानपणे पट्टा चालवत होते.काळ्या दैत्यासारखे दिसणारे सिद्दी हशम जवळ यायचे धाडस करित नव्हते.पण अचानक हवा चिरत आलेल्या एका भाल्याने नेमका वेध घेतला आणि फुलाजी पडले. डोळ्यासमोर सख्खा भाउ पडलेला, अजून तोफेचे बार नाहीत.अंगातील सर्व त्राण एकवटून बाजी वीजेच्या चपळाईने पुढे आले.पट्ट्याच्या पहिल्या केलेल्या हातात तीन सिद्दी सैनिक धाराशायी झाले. अचानक बाजींनी केलेल्या मार्‍याला बिचकून खिंडीपर्यंत पोहचलेल्या सैनिकांनी मागे पळ काढला. बंदुकीच्या गोळीने पडलेला हा मराठा पुन्हा लढायला उभा रहातो ? या खुदा ये मराठे किस मिट्टीसे बने है ? मसुदने पाठवलेल्या सैन्याची पुढची फळी तोपर्यंत धडकली. मसुदची जेमतेम एक चतुर्थांश फौज शिल्लक राहीली होती.हि खिंड आज पार करणार कि नाही ? मसुदला काहीच समजत नव्हते. मावळ्यांचा तडाखा जबर बसला होता, भरीला या मुलुखातला हा पाउसही गनीम झाला होता.चिखलाने भरलेल्या घसरड्या आणि निसरड्या वाटावर धड चालणे जमत नव्हते तिथे झुंज कशी द्यायची ?
   ईतक्यात _ _ _ _ _
  “धाड ! धाड !! धाड !!!
   तोफांचे पाच बार एकू आले. विजापुर फौजेला हे बार कशासाठी हे समजेना. पण हेच बार बाजीच्या कानी पडले आणि ईतक्यावेळ धरुन ठेवलेले पंचप्राण आता उडून जायला आतूर झाले. बाजींच्या डोळ्यासमोर अंधारी आली.अचानक बाजी खाली पडले, कसेबसे त्यांनी हात जोडले “राजे ! येतो. आपण सुखरुप पोहचलात, या बाजीच्या जीवाचे सोने झाले. आता कोणतीही चिंता नाही, निशंक मनाने आम्ही डोळे मिटायला मोकळे झालो” शांतपणे त्यांनी डोळे मिटले आणि क्षणभरात बाजींची मान कलंडली. मावळ्यांना हुंदका अनावर झाला, पण शोक करायला वेळ नव्हता.गनीमांची पुढची तुकडी खिंड चढताना दिसत होती.घाईघाईने बाजी,फुलाजी यांचे देह उचलून मावळे जंगलात गडप झाले.
     मसुदची हि तुकडी बिचकत खिंड चढली, पण त्यांना कोणताही प्रतिकार झाला नाही. बहुतेक मरहट्टे पळाले वाटतं. चटकन काही हशम हि खबर द्यायला मसुदकडे गेले.
——————————————————————————————————————–
    राजांची पालखी विद्युत वेगाने विशाळगडाकडे निघाली होती. बाजींना घोडखिंडीत गनीमाच्या तावडीत सोडून जाताना राजांचा जीव वरखाली होत होता. केव्हा एकदा विशाळगडावर पोहचतो आणि तोफेचे बार करतो असे त्यांना झाले होते.पण अजून चार कोस वाटचाल करायची होती.त्यात विशाळगडाच्या पायथ्याशी सुर्यराव सुर्वे आणि जसवंतरावांनी दिलेला वेढा फोडायचा होता.विजापुरी सैन्य बोलून चालून परके, पण हे सुर्वे,पालवणीकर तर आपलेच लोक, तरीही हे आपल्याविरुध्द नेटाने लढतात.कधी या लोकांच्या डोक्यातील हि गुलामगिरीची धुळ धुतली जाणार ? इतक्यात वळणावरुन विशाळगड डोकावला आणि राजांना हायसे वाटले. थोडे अंतर काटल्यावर सुर्वे,पालवणीकर यांनी घातलेला वेढा दिसायला लागला, त्यांच्या तंबुवरची ती आदिलशाही निशाने पावसाने भिजली होती. तातडीने राजे पालखीतून खाली उतरले आणि सप्पकन म्यानातून जगदंबा बाहेर आली. स्वतः राजे मोहरा घेत आहेत हे पाहिल्यावर तीनशे बांदलांच्या फौजेला आगळाच जोष चढला, प्रत्येक मावळा जणु रुद्राची सावली झाला.तो मार सुर्वे , पालवणीकराच्या फौजेला आवरेना.विशाळगडासमोर जिथे या दोघांनी छावणी केली होती ती जागा आधीच तोकडी होती, त्यात हा बेभान मारा. प्रत्येक मावळ्याच्या तलवारीतून राग बाहेर निघत होता, सिद्दी, जोहरवरचा राग, मसुदवरचा राग, फाझलवरचा राग आणि मुख्य म्हणजे या दोन गद्दारांवरचा राग. हा मारा दोन्ही फौजेला अजिबात झेपला नाही, सगळ्या फौजा आजुबाजुच्या रानात पळाल्या. मोठा अडथळा दुर केल्यानंतर राजे घाइघाईने गडाच्या मुंढा दरवाज्याकडे गेले.पहारेकर्‍याने दरवाजा उघडून मुजरा घातला.पण तिकडे अजिबात लक्ष न देता राजे घाइत तोफा तैनात केल्या होत्या तिकडे गेले आणि तोफा उडवायचा हुकुम सोडला. आणि मग महाराज शांतपणे गडाच्या सदरेकडे चालु लागले.
   सदरेवर महाराजांच्या गडकरी वाट बघत उभा होता. “महाराज, आपला संगावा होता,त्याप्रमाणे गडावर फौजा तयार आहेत. आपण थोडी विश्रांती घ्यावी.”
  “नाही किल्लेदार, आम्हाला बाजींची प्रतिक्षा आहे,ते आल्याशिवाय आमचे चित्त थार्‍यावर लागायचे नाही” राजे सदरेत बसुन राहीले.
    विशाळगडाखाली भीषण शांतता पसरली होती.गेली दोन महिने वेढा घालून बसलेल्या सुर्वे, पालवणीकरांच्या छावणीत कोणीही नव्हते.पण दोन घटका गेल्या,अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज एकू येउ लागला.आदिलशाही चांदतारा फडकवत फौज येताना दिसत होती.हि तुकडी झाडीतून सुर्व्यांच्या फौजेने पाहीली असेल.घाईघाइने दोन्हीकडचे सैन्य खाली उतरले. इतक्यात मसुदची तुकडी थेट खाली येउन पोहचली. पुन्हा एकदा लगबग सुरु झाली.विशाळगडाला नव्याने वेढा घालायची तयारी शाही फौजेने पुन्हा केली.आता मात्र विशाळगडाच्या किल्लेदाराच्या कपाळीची शीर ताडताड उडू लागली, त्याची भिवई चढली, त्याने आपली ताज्या दमाची फौज बाहेर काढली आणि या विजापुरच्या सैनिकांवर सोडली. प्रचंड दमलेल्या आणि पराभवाचे तडाके खालेल्या विजापुरी फौजेला दम निघालाच नाही. पहिल्याच दणक्यात फौज अर्धा कोस मागे हटली. मराठे जोशात आहेत असे बघून शाही फौजा पाठ दाखवून पळत सुटल्या.काही मावळे हि विजयाची खबर महाराजांना द्यायला गडावर परत गेले.
   राजांना मसुदच्या फौजेला मार दिल्याचे एकून आनंद झाला, पण अजून त्यांचे लक्ष बाजी आणि बाकी बांदलसेना कधी येते, याकडेच होते. दिवस मावळत आला होता. इतक्यात समोरच्या झाडीतून राहिलेले बांदल सैनिक गडाच्या दिशेन उतरले आणि गड चढू लागले.
    काही मावळे सदरेवर राजांसमोर जाउन उभारले. राजांनी मोठ्या आतूरतेने विचारले, “बाजी,फुलाजी,रायाजी कोठे आहेत ?आम्हाला त्यांना लगेच भेटायचे आहे”
“राजे बाजी, फुलाजी आणि रायाजी तिघेही घोडखिंडीत गनीमाला तोंड देताना धारातिर्थी पडले.बाजीना बंदुकीचा बार लागला, पण तरीही उठून त्यांनी झुंज दिली.फुलाजी, रायाजी गनीमाने केलेल्या दग्याने गेले” खालमानेने मावळा म्हणाला.
   “काय ? बाजी गेले ? आम्हाला संध्याकाळी विशाळगडावर भेटायचा शब्द देउन वचन मोडून बाजी गेले” राजांच्या मुखावर विषाद दाटून आला.भावना तीव्र झाल्याने राजे महालात निघून गेले.
   किल्लेदार पुढे झाला आणि त्याने बाजी,फुलाजी प्रभूंच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. अग्नी द्यायला राजांना बोलावले गेले. शेवटी राजेच या प्रत्येकाचे मायबाप होते. ‘रायरेश्वरावर शपथ घेतल्यानंतर आम्ही संघर्षाला सुरवात केली. हि वाटचाल सोपी नाही याची आम्हाला कल्पना होतीच. वतनदारीची फुले असलेली वाट सोडून आम्ही हि काटेरी वाट पकडली तेव्हाच आम्हाला त्याग करायला लागणार याची कल्पना होतीच. स्वराज्य स्थापना करायची म्हणजे रुद्राला रुधीराभिषेक करावा लागतो. नुसत्या फुले वहाण्याने तो प्रसन्न होत नाही. हे कार्य करताना अपेक्षेप्रमाणे पातशाह्यांनी सरदार पाठविले. प्रत्येक झुंजीत आमचे असंख्य मावळे पडले, जीवाभावाचे सखे गेले. बाजी पासलकर, सुर्यराव जेधे किती सांगावे.स्वातंत्र्यसुर्य प्रसन्न करायचा तर ही आहुती द्यावी लागते. आम्हाला अजून किती जणांना कायमचे मुकावे लागणार आहे ?’
   राजांच्या मनातील प्रश्न संपायला तयार नव्हते.जड अंतकरणाने त्यांनी मशाल पुढे करुन दोन्ही चितांना अग्नी दिला आणि शांतपणे एका बाजुला उभारले.आषाढाच्या सरी अजून कोसळत होत्या, त्या राजांच्या चेहर्‍यावरुन वहाताना अश्रूंना सोबत घेउन विशाळगडाच्या भुमीत मिसळत होत्या.
( मह्त्वाचे निवेदनः- वरील कथानक हे खाली दिलेल्या संदर्भाचा आधार घेउन लिहीले आहे. कथानक पुढे नेण्याच्या दृष्टीने काही लेखनस्वातंत्र्यही घेतले आहे. यामध्ये वेढ्यातून सुटून जाताना शिवा काशिद यांचा प्रसंग का नाही ? असा वाचकांना प्रश्न पडेल. शिवभारत, एकन्नव कलमी बखर, जेधे शकावली अश्या कोणत्याच ग्रंथात या प्रसंगाचा उल्लेख नाही, पण याचा अर्थ या समरप्रसंगात शिवा काशिद यांचा सहभाग नव्हताच असे म्हणणे चुकीचे होईल. पन्हाळ्याच्या सावलीत शिवा मोठे झाले, याचा अर्थ पन्हाळा आणि परिसराची त्यांना खडानखडा माहिती असणार. याचा महाराजांनी नक्कीच वापर केला असणार. समोरच्याशी उत्तम संवाद साधने ह्या त्यांच्या गुणाचाही यथोचित वापर या प्रसंगी झाला असणे शक्य आहे.वेढ्यात महाराजांचे हेर म्हणून शिवा काशिद वावरले असावेत.स्थानिक असल्यामुळे त्यांना वेढ्यातील कमजोरी सहजगत्या समजली असेल. म्हणजे शिवा काशिदांनी पन्हाळ्याच्या वेढयातून शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या प्रसंगी महत्वाची कामगिरी बजावली असणार. शिवा काशिद दुसर्‍या पालखीत बसुन जोहरच्या वेढ्यात गेले हि शक्यता यासाठी कथानकातून वगळली आहे कि इतक्या मोलाचा माणसाला शिवाजी महाराज स्वतःसाठी प्राणार्पण करायला लावणार नाहीत. सिंहगडाच्या मोहीमेवर तानाजी मालुसरे यांच्या एवजी स्वत महराज जाणार होते, आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगी महाराजांनी स्वताची एकुण एक माणसे सुरक्षित परत आणली, मागे औरंगजेबाच्या तावडीत सापडलेल्या वकीलांना सोडवण्यासाठी पत्रव्यवहार केला, कोंडाजी फर्जंदसारख्या वीराचा तर मोहीम सुरु होण्यापुर्वीच सत्कार केला, पुरंदरावर मोलाची माणसे बळी जात आहेत हे लक्षात आल्यावर तह पत्करला.यावरुन महाराज एकाही पदरच्या व्यक्तीला जीवावरच्या प्रसंगाला सामोरे जाउ देणार नाहीत. उलट शिवा काशिद या गुणी हिर्‍याचा त्यांनी आणखी उपयोग केला असणे शक्य आहे. कदाचित एखाद्या समरप्रसंगात त्यांना वीरमरण आले असणे शक्य आहे. वीर शिवा काशिद यांचा अनवधानाने सुध्दा अपमान होउ नये अशी भावना आहे. पुढे काही अस्सल कागदपत्रे उप्लब्ध झाली तर शिवा काशिद यांच्यासारख्या स्वराज्यावर प्राणपुष्प अर्पण करणार्‍या वीराच्या पराक्रमाची गाथा समोर येईल.कृपया कोणताही गैरसमज नसावा हि विनंती. आपल्या प्रतिक्रीया जरुर कळवा. )
लेखन- श्री स्वप्निल जिरगे
संपर्क क्रमांकः- 9960022621
संदर्भ ग्रंथः-
१) शिवभारत:- कविंद्र परमानंद नेवासकर
२) जेधे शकावली
३) जेधे करिना
४) एकन्नव कलमी बखर
५) मराठ्यांची बखर- ग्रँट डफ
६) छत्रपती शिवाजी -सेतुमाधवराव पागडी
७) शिवचरित्रनिंबधावली

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s