कुर्डुगड

सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. त्याकाळी वापरण्यात येणारी शिडांची गलबते समुद्रातून खाडी मार्गे नदीत आतपर्यंत येत. भिर्‍याला ऊगम पावणारी कुंडलिका नदी अरबी समुद्राला कोर्लई जवळ मिळते. प्राचीन काळा पासून कुंडलिका नदीतून व्यापार चालत असे. घाटावर जाणारा माल विविध (ताम्हणी, थळ घाट इत्यादी) घाटमार्गंनी घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी बंदर, घाटमार्ग व घाटमाथा अशी किल्ल्यांची साखळी उभारली जात असे. पुणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरून पसरत गेलेली सह्याद्रीची रांग ही भटक्यांना नेहमीच साद घालणारी. सह्याद्रीच्या या भागातुन अनेक घाटवाटा खाली कोकणात उतरताना दिसतात.

       पैकी ताम्हिणी घाटाच्या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्यासाठी कुर्डुगड (विश्रामगड) हा किल्ला बांधण्यात आला होता. कुर्डुगड ऊर्फ विश्रामगड किल्ला रायगड व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर पुण्याहून कोकणात उतरणाऱ्या ताम्हणी घाटाच्या वेशीवर आहे. सुळक्याच्या आकाराचा माथा असलेला कुर्डुगड किल्ला किंवा विश्रामगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेत नसुन सह्याद्रीधारेपासून वेगळा सह्याद्रीच्या कोकणात उतरणाऱ्या एका धारेवर वसलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यात माणगावच्या ईशान्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावरील सह्याद्रीच्या एका अलग झालेल्या समुद्रसपाटीपासून सुमारे ६१० मी. उंच सुळक्यावर हा किल्ला आहे. तो पंत सचिवांच्या भोर संस्थानात जाणा-या देव खिंडी वर नजर रोखून बसला आहे. जवळील कुर्डाई नामक देवीच्या मंदिरामुळे याला कुर्डू असेही म्हणतात.             कुर्डूगडाचा इतिहास पाहिल्यास कुर्डुगडाची बांधणी अंदाजे ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्याच्या कालावधीत झाली असावी. फारसा परिचित नसलेला कुर्डुगड मोसे खोऱ्यातील पासलकर या शिवाजीराजांच्या समकालीन आणि सहकारी घराण्याच्या अखत्यारीत होता. बाजी पासलकर कुर्डुगडाचा उपयोग विश्रांतीसाठी करीत म्हणून या गडाला विश्रामगड असेही म्हणतात. मराठा काळात शिबंदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होई. शिवाजीराजांचा धडाडीचा सरदार येसाजी कंक याचं कुर्डूपेठ हे जन्मस्थान.         इतिहासात या किल्ल्याविषयी एक महत्त्वपूर्ण आख्यायिका आहे. कुर्डुगडाच्या दक्षिण भागात खूप उंचावर एक घळ आहे. सध्या या घळीतील वर जाण्याचा मार्ग तुटला आहे. या घळीत एक तपस्वी साधू राहात होते. त्यांचेकडे एक शिवलिंग बाण होता. त्याची बारा वर्षे अखंड पूजा करणा-यास राज्यप्राप्ती होईल असे समजल्याने बाजी पासलकराने तो बाण मिळविला व शिवरायांना नजर केला. पुढे शिवरायांना राज्यप्राप्ती झाली. शिवरायांच्या निधनानंतर हा बाण राजाराम महाराजांच्या बरोबर सिंहगडावर आणला गेला व त्यांच्या मृत्यूनंतर तो राजाराम महाराजांच्या सिंहगडावरील समाधी मंदिरात तब्बल २५० वर्षे होता. इतिहासात चंद्रशेखर बाण या नावाने प्रसिद्ध असलेले हे शिवलिंग साता-याच्या जलमंदिरात पूजेसाठी ठेवले आहे. पुरंदर तहानुसार मुघलांना द्यावे लागलेले किल्ले स्वराज्यात दाखल करून घेण्याची मोहीम शिवाजी महाराजांनी १६७० मध्ये आखल्यावर जूनमध्ये माहुलीगड जिंकल्यावर कर्नाळा, कोहोज व कुर्डुगड स्वराज्यात दाखल झाले. या गडाशी वीर बाजी पासलकर, येसाजी कंक, बाजीचा विश्वासू सेवक येल्या मांग, बाजीचा आश्रित अनंता खुरसुले, जंजि-याचा सिद्दी, थोरले बाजीराव, खंडोजी माणकर, अमृता पासलकर, नाना फडणीस, रामाजी कारखानीस यांचा संबंध काही ना काही कारणांनी आला आहे. १८१८च्या मराठा युद्धात पुण्याच्या ९व्या रेजिमेंटमधील कॅप्टन सॉपीटने एका तुकडीसह देव खिंडीतून येऊन अचानक हल्ला करून हा किल्ला काबीज केला. त्यावेळी किल्ल्यावर किल्लेदार व ४० जणांची शिबंदी होती. त्यावेळी सॉपीटला किल्ल्यावर मोठा धान्यसाठा सापडला.

  कुर्डुगडाला जाण्यासाठी चार मार्ग आहेत.     १)  कुर्डुगड ऊर्फ विश्रामगड किल्ला रायगड व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर रायगड जिल्ह्यात आहे. निजामपूरच्या ईशान्येस असलेल्या १३ कि.मी.वरील जिते खेडय़ातून किल्ल्यावर जाता येत असे. माणगावकडून एस.टी बसने अथवा गाडी मार्गाने डोंगराच्या पायथ्याचे जिते गाव गाठावे . माणगाव निजामपूर- शिरवली- जिते असा तासाभराचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास एस.टी. अथवा खाजगी वाहनानेही करता येतो. पुर्वी या गडावर जाण्याचा हाच सर्वात सोयीचा मार्ग होता.  परंतु २६ जुलै २००६च्या प्रलयंकारी पावसाने कुर्डुगडाच्या मुख्य वाटेवरील संपूर्ण डोंगर खचून वाहून गेल्यामुळे हा रस्ता बंद झाला असून आता माणगाव-निजामपूर-शिरवली असे एसटीने येऊन शिरवलीहून पायी पाच कि.मी. उंबर्डेपर्यंत यावे लागते. उंबडेंहून कुर्डू पेठ दोन-तीन कि.मी. अंतरावर आहे. जिते गावातून देखील उंबर्डीला जाता येते,यासाठी कुर्डुगडाचा डोगर उजव्या हाताला ठेवून दोन-तीन कि.मी. अंतरावरील उंबर्डी गाव गाठावे लागते. या उंबर्डी मधून सध्या गडावर जाणारी वाट आहे. कुर्डू पेठहून या गडावर जायला पायवाट आहे.

    जिते गावाच्या वाटेवरुन दिसणारा कुर्डुगड
   २ ) मुंबई -पनवेल – पेण मार्गे मुंबई- गोवा महामार्गावरील कोलाड गाव (१२० किमी) गाठावे. कोलाड गावाच्या पुढे डाव्याबाजुला ताम्हणी घाटमार्गे पुण्याला जाणारा रस्ता आहे तो पकडावा. ताम्हणी घाटाच्या अगोदर वरचीवाडी गाव आहे. तेथे मुख्य रस्ता सोडुन उजव्या बाजुला बागड गावाला जाणारा रस्ता पकडावा. हा रस्ता बागड एम आय डी सी – तासगाव – कांदळगाव- बामणवाडी मार्गे किल्ल्याच्या पायथ्याच्या जिते गावात जातो. जिते गावातून साधारणपणे २ ते २.३० तास चालल्यावर आपण चार सहा घरांच्या वाडी जवळ पोहोचतो. येथे शाळा आहे. वाडीतून ३० मिनिटात आपण गडाच्या प्रवेशव्दारात दाखल होतो. मुंबईपासुन पनवेल-पाली-कोलाड-बागड एमआयडीसी -तासगाव -कांदळगाव- बामणवाडी मार्गे १४६ किमी अंतरावर आहे.

    ३) समुद्र सपाटीपासून ८८२ मीटर उंचीच्या कुर्डुगडास जाण्यासाठी मोसे खोर्‍यातूनही जाता येते. त्यासाठी पुणे-पानशेत मार्गे गाडीने जावून मोसे खोर्‍यातील धामणव्हळ गाव गाठावे लागते. 

 धामणव्हळ गावाजवळ असलेले वरसगाव धरणाचे पाणी उर्फ बाजी पासलकर जलाशय. आता याच परिसरात लव्हासा सिटी उभारलेली आहे.
धामणव्हळ गावाजवळून पायवाटेने लिंग्या घाटाच्या माथ्यावर पोहचून लिंग्या घाटाने खाली उतरावे लागते. अर्ध्या घाटातच कुर्डुगडाचा किल्ला आहे. यासाठी धामणगावापासून तीन-तासांची पायपिट करावी लागेल. हा मार्ग जरी अडचणीचा असला तरी निसर्गाची सोबत आणि त्याचे रौद्रत्व मनाला भुरळ पाडणारे आहे. याच परिसरात लवासा सिटी झाल्यामुळे रस्ता वगैरे सोयी झाल्या आहेत.

 धामणव्हळ परिसरात अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅकॅडमी उभारली आहे, शिवाय दरीचे रौद्र सौंदर्य दाखविणारा “बॉम्बे पॉईंट” हि उभारला आहे.

  लिंग्या उर्फ देव घाटातून दिसणारा कुर्ड्गड
   ४) पुण्यावरुन येण्यासाठी सर्वात सोयीचा मार्ग म्हणजे ताम्हिणी घाटातून आहे. ताम्हीणी घाटातील सर्वात दक्षिणेकडील एका वळणावरुन कुर्डुगड दिसतो. येथे उतरल्यास सर्वात सोयीचे आहे. येथून खिंडीतील वाटेने उंबर्डीला तासा दीडतासात पोहचता येते. त्यामुळे वेळ, श्रम व अंतराची बचत होवू शकते. उंबर्डी हे गडाचे पायथ्याचे गाव पुण्यापासुन मुळशी-विळे-जिते-उंबर्डीमार्गे १२६ किमी अंतरावर आहे

   उंबर्डीमधून सध्या गडावर जाणारी वाट आहे.

  गावाच्या थोडं बाहेर एक पुरातन आणि काहीसं भग्न असं काळ्या पाषाणातलं शिवमंदिर आहे. मंदिरा शेजारून चालायला लागल्यावर सपाटी सुरू होते.

या सपाटीवर एक छोटेसे तळे असुन खुप मोठया प्रमाणावर वस्तीचे अवशेष आढळुन येतात. या अवशेषांचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

   उंबर्डी गावातील मंदिर आणि शाहिद जवानांचा स्मारक . आणि कुर्डुगडावर जाणारा मातीचा रस्ता  दिसत आहे.

एकंदरीत येथील वीरग़ळीचे प्रमाण पहाता येथे नेमके कोणते युध्द झाले होते,हा प्रश्न पडतो.

  या अवशेषांमध्ये घडीव दगडाची लांबलचक भिंत, वाड्याच्या दरवाजाची कमान, घरांचे व मंदिराचे घडीव दगड पाया व इतरही बरेच काही दिसते पण बोध होत नाही. पंधरा-वीस मिनिटांतच किल्ल्याच्या खड्या चढणीला सुरुवात होते. गडाची पायवाट चांगली मळलेली आहे.

गडावर कुर्डुपेठ नावाची छोटी वस्ती असल्यानं पायवाट रोजच्या वापरातली आहे. पायथ्यापासुन कुर्डुपेठपर्यंत विजेचे खांब गेले आहेत त्यांचा माग काढत गेलो की साधारण दीड तासात आपण कुर्डुपेठेत पोहोचतो. वाट फारच दमछाक करणारी आहे. कुर्डुपेठ गावात महादेव कोळी जातीचे सांबरे, सांगळे, पारधी, जोरकर आडनावाचे लोक रहातात. गावातील बरेचजण काम,धंद्यानिमीत्ताने मुंबई-पुण्याला आहेत. जे गावात आहेत ते दुध व्यवसाय किंवा शेती करतात.

विश्रामगडाचा उत्तुंग सुळका गावाच्या मागेच उभा असुन त्याच्यावरचा बुरुजही गावातून स्पष्ट दिसतो. कुर्डुपेठेतुन गडाकडे निघालो की पाचच मिनिटांत डावीकडे कुर्डाई देवीचं अलीकडेच जीर्णोद्धार केलेले कौलारू मंदिर आहे.

 कुर्डाई देवीचे मंदिर आणि पार्श्वभुमीवर कुर्डुगड
या कुर्डाई देवीच्या नावावरूनच विश्रामगडाला कुर्डुगड असं नाव पडलं असावं. मंदिरात देवीची मुर्ती असुन मंदिराच्या बाहेर विरगळ, दीपमाळ व गजांतलक्ष्मीचं शिल्प आहे.

  कुर्डादेवी मंदिरापासून ५ मिनिटांवर झाडीत असलेल्या कुर्डेश्वर मंदिरात पार्वती, विष्णू, गणेश व इतर देवता मूर्ती, शिवलिंग, नंदी व कासव मूर्तीचे अवशेष दिसून येतात.

  लाल बाण  दाखवला आहे तिकडे गजलक्ष्मीची जुनी मूर्ती आहे.
 आता गडाची दिशा पकडून चालत रहायचे.

कुर्डुगडाचा नकाशा

मंदिरापासून पंधरा मिनिटांत आपण किल्ल्याच्या दरवाजात येतो.

  किल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या अगोदर डाव्या बाजूला पाण्याच बारमाही टाक असुन कुर्डुपेठ ह्या गावास येथुनच पाणीपुरवठा होतो.  कातळात खोदलेल्या पायऱ्या चढुन उध्वस्त प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यावर प्रवेश होतो.

येथे येताना वाटेत एक बुरूज, तटबंदीचे अवशेष व कातळात खोदून काढलेला गडाचा भग्न प्रवेशद्वाराचा मार्ग हे दुर्गावशेष पाहावयास मिळतात.

इथुन पुढे किल्ल्याच्या डाव्या अंगानी वाट पुढे जाते आणि वळुन वर उत्तरेकडील हनुमान बुरुजावर येते. येथे आल्यावर प्रथम एका उध्वस्त वास्तूचा चौथरा दिसतो.

याच्या समोर ४ फुट उंचीची कोरीव मिशा, कमरेला खंजीर आणि पायाखाली दैत्याला चिरडणारं मारुतीचं भंगलेली उघड्यावर असलेली हनुमान मूर्ती आपल्या नजरेस पडते. या हनुमानाने आपल्या पायाखाली पनवतीला जखडून ठेवलेले आहे.एकंदर घडणीवरून हि पेशवेकालीन मुर्ती असावी. ही देखणी मुर्ती मात्र सध्या एकसंघ राहिली नाही. मारुतीची अगदी अशीच मुर्ती कोलाडजवळील सुरगडावर  आणि खेडजवळच्या रसाळगडावर आहे. 

येथून पूर्व बाजूला आल्यास खालच्या दरीचे उत्तम दर्शन घडते. याच डोंगर रांगेपलीकडे ताम्हिणी घाट आहे.

येथून उत्तर कडय़ावरील हनुमंत बुरुजावर जाता येते.

कुर्डुगडाचे विशेष म्हणजे त्याच्या सुळक्याच्या पोटात असलेली नेसर्गिक गुहा. छताचा भाग हळुहळु कोसळून ही गुहा निर्माण झाली. मोठय़ा विस्ताराची ही गुहा जमीन समतल नसल्याने वापरण्यायोग्य नाही. दगडांनी भरलेल्या या गुहेत दोनशे माणसं सहजपणे बसू शकतील.हि गुहा साधारण ५० फुट रुंद, १० फुट उंच आणि १२० फुट लांब आहे.  या प्रचंड गुहेच्या छताने माथ्यावरच्या सुळक्याचे वजन कसे पेलले असेल हे पाहून मात्र आश्चर्य वाटते. या गुहेच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी व काही बांधकाम केलेले आढळते. एखाद्या दुर्गप्रेमी जोडप्याचे ईथे लग्न लाउन देता येईल इतकी हि गुहा मोठी आहे. गडाचा आणि गडाच्या मध्यभागी असलेल्या सुळक्याचा आकार त्रिकोणी असल्याने सहाजिकच सुळक्याच्या तीनही बाजुला अश्या कपारी आहेत. अर्थात गडाच्या पुर्व बाजुला असलेली गुहा सर्वात प्रशस्त आहे. या भागात पडणार्‍या महामुर पावसाचे प्रमाण गृहित धरले तरी ईथल्या दगडांची झीज किंवा विदारण का झाले हा प्रश्नच आहे.

 गडाच्या मागील बाजुस म्हणजे सह्याद्रीच्या कड्याच्या बाजुस एक उत्तम बांधणीचा बुरूज असून बुरुजाखाली प्रचंड खोल दरी असल्याने या बुरुजास स्थानिक लोक कडेलोटाचा बुरूज असे म्हणतात.

   हा बुरुज आपल्याला घनगडच्या माथ्यावरील बुरुजाची आठवण करून देतो. अर्थात गड छोटा असल्याने आणि ईथे कडेलोट करायची शिक्षा व्हावी असा फार मोठा इतिहास झाल्याचे उदाहरण नसल्याने हा कडेलोटाचा बुरुज असावा अशी शक्यता नाही.  मात्र अजून तरी ह्या बुरुजाची खणखणीत आहे. 

 या बाजुने दक्षीण बाजुचा विस्तृत परिसर दिसतो. जिते गाव, मानगडचा परिसर, कुंभा गाव आणि घोळ गाव असल्लेल्या डोंगररांगा असा सह्याद्रीचा मोठा पॅनोरमा नजरेत सामावत नाही. याच डोंगररांगेपलीकडे रायगड आहे. मात्र रायगड येथून दिसू शकत नाही.

किल्ल्यातच दोन सुळके असुन यातील मोठा सुळका म्हणजेच गडमाथा होय. या सुळक्यावर जायला वाट नाही. सुळक्याला पूर्ण फेरी मारता येते पण काही ठिकाणी वाट पूर्णपणे ढासळलेली आहे.

किल्ल्याच्या मुख्य सुळक्याला एक अजून छोटा सुळका बिलगला आहे. या दोघांच्या मध्ये एक घसाऱ्याची वाट असून ती पार केल्यावर आपण एका नैसर्गिक खिडकीशी पोहोचतो.

ही घळीतली वाट तशी अवघड आणि निसरडी असुन इथे मधमाशांची पोळी असल्यामुळे खबरदारी घ्यावी लागते.

येथुन कोकणातील दुरपर्यंतचा मुलुख सहज नजरेस पडतो. सुळक्याच्या पायथ्याशी बुरुज तसेच तटबंदी असे दूर्गावशेष पहायला मिळतात.

 सुळका पाहुन वळसा घालून पुढे गेल्यावर एक दरड कोसळलेली दिसते. येथुन पुढे जाणे धोकादायक आहे. दरड व मुख्य सुळका यांच्यामधे असलेल्या छोट्याश्या अरुंद खाचेतून सरपटत पलिकडे जावे लागते. यापेक्षा आल्या मार्गाने परत फिरून हनुमानाच्या मुर्तीपाशी याव. तेथुन सुळका डाव्या हाताला ठेवत सुळक्याला वळसा घालुन पुढे यावे. या भागात एक बुरुज व बांधकामाचे बरेचसे अवशेष पहायला मिळतात.

येथुन पुढे गेल्यावर एक पाण्याच टाक दिसत. पाण्याच्या टाक्यापुढेच त्या बाजुने पाहिलेली कोसळलेली दरड या बाजुने पहायला मिळते.          सुळक्यावर दक्षिण बाजुला कोप-यावर किल्ल्यापेक्षा ९० फुट उंचीवर लहानशी चौकोनी गुहा दिसते पण तेथे जाणारी वाट कोसळलेली आहे. गिर्यारोहणाच्या सामानाशिवाय तेथे जाणे शक्य नाही. 

कुर्डुगडाची हि गुहा तेथे जाण्याचा मार्ग ढासळ्याने कित्येक शतके मानवी वावरापासून अस्पर्श होती. मात्र महाडचे दुर्गअभ्यासक डॉ. राहुल वारंगे यांनी पुरातत्व संशोधक श्री. अजय धनावडे यांच्याबरोबर ह्या गुहेत दोर लावून मे २०१५ मध्ये यशस्वी आरोहण केले आणि बरीच नवीन माहिती उजेडात आली. हि गुहा म्हणजे व्यवस्थित कोरलेली दोन खोल्यांची लेणी आहेत. आतले दालन पाण्याने पुर्ण भरलेले आहे. या गुहेच्या पुढे उत्तरेला ६ फुट लांब, सात फुट उंच आणखी एक लेणे आहे. जेव्हा या बाजुचा कातळ काही कारणाने तुटला तेव्हा या लेण्यांकडे जाण्याची वाट नष्ट झाली असणार. अर्थात सध्यातरी आपण हि गुहा खालूनच बघु शकतो.  हे पाहुन परत प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याचा घेर लहान असुन सपाटी फारशी नाही. या किल्ल्याच्या तीन बाजू नैसर्गिक उभ्या कडय़ाच्या असल्याने त्यास नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले आहे.

किल्ल्याला एकुण चार बुरुज असुन खडकात खोदलेली पाण्याची तीन टाकी शिवाय काही धान्यकोठारेही आहेत. किल्ल्यावरुन संपूर्ण कोकण परिसर न्याहळता येतो. संपूर्ण गडमाथा फिरण्यास एक तास पुरतो. एकंदरीत फार महत्वाचा गड नसला आणि मोजके अवशेष असले तरी प्रंचड मोठ्या कपारीवजा गुहा आणि कुर्डुगडाचा सुळका आपल्या चांगल्याच स्मरणात राहील. संदर्भः-

१) रायगड जिल्हा गॅझेटीयर

२) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे

३) महाराष्ट्र देशातील किल्ले- चितांमणी गोगटे

४) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर

५) http://www.trekshitiz.com  हि वेबसाईट

६) http://www.durgabharari.com हि वेबसाईट

७) दुर्ग च्या दिवाळी अंकातील डॉ. राहुल वारंगे यांचा लेख

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s