काही वन्यानुभव

‘अन्नासाठी दाही दिशा| आम्हा फिरविसी जगदीशा’ हा भोग काही सन्माननीय अपवाद वगळता सगळ्यांच्याच नशिबी लिहिला असल्यामुळे सतत पैशाचा विचार करून धावपळ करण्याशिवाय पर्याय नसतो. अर्थात सहा दिवस राबल्यावर मिळणारी एक दिवसाची सुट्टी हे आकर्षण असल्यामुळे कष्ट थोडे सुसह्य होतात. बहुतेक जण आठवड्याचा शेवट जवळ आला की सुट्टीच्या दिवशी काय करायचे हे प्लॅनिंग सुरू करतात. एकतर भरपूर झोप काढायची, राहिलेली कामे करायची, कुटुंबासहित गावात भटकायचे किवा हॉटेलिंग करायचे, यात दिवस संपतो आणि पुढचा आठवडा आणि पोटासाठीची पळापळ पुन्हा सुरू होते.

मात्र आम्हा भटक्यांचे याबाबत वेगळेच धोरण असते. फक्त बुधवार, गुरुवार हे दोनच दिवस कामात लक्ष लागते. शुक्रवार-शनिवार भटकंतीच्या प्लॅनिंगमध्ये जातात, तर सोमवार-मंगळवार नुकत्याच केलेल्या ट्रेकच्या आठवणीत आरामात सरतात. बेभान निसर्ग, दाट वनराई, मुक्तपणे वाहणारे ओढे, नद्या, बेलाग कड्यावरून झोकून देणारे धबधबे, रौद्र सुळके, अलगद शिखरमाथ्यावर घेऊन जाणार्‍या डोंगरवाटा, पाताळवेरी गेलेल्या दर्‍या, डोंगरकुशीत वसलेली राउळे हा सर्व समृद्ध खजिना मनसोक्त लुटू देणारा अग्निपुत्र सह्याद्री. सर्व चिंता विसरायला लावणारी आणि जगण्याचे बळ देणारी ही सह्यगिरीतील भटकंती हे घुमक्कडांचे पहिले प्रेम. डोंगर फक्त दुरूनच नाही, तर जवळूनही तितकेच साजरे असतात, याचा प्रत्यय देणारी ही भ्रमंती पुन्हा पुन्हा साद घालते आणि या प्रेमाच्या सादेला नकार देणे केवळ अशक्य असते.

अर्थात एकदा घराच्या उबेतून आणि सुरक्षित कवचातून बाहेर पडून डोंगरात भटकायला सुरुवात झाली की विविध प्रकारचे अनुभव येणार, हे ओघानेच आले. निरनिराळ्या प्रकारचे मानवी नमुने भेटतात, गाडीतून जायचे तर त्याचे वेगळे किस्से होतात, खादाडीतून अनेक ठिकाणच्या चवी जिभेवर आणि मेंदूत नोंदल्या जातात, शिवाय बरोबर असलेले भिडू अचाट असले की काही विनोदी प्रसंगही निर्माण होतात. पण याबरोबरच आणखी एक संपूर्ण वेगळे जग सामोरे येते, ते म्हणजे वन्य प्राण्यांचे. मानवाने निसर्गावर जे प्रचंड आक्रमण केले, त्यामुळे वन्य प्राणी आता शहरातही येऊ लागलेत, पण हेच प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्यातच खरा आनंद आहे. भटकंतीत असे अनुभव नक्की येतात. याच वन्य अनुभवांविषयी लिहायचे मनावर घेतले आहे. अर्थात यात पक्ष्यांच्या दर्शनाविषयी लिहिणार नाही.

कोणत्याही गडाच्या पायथ्याच्या गावात पोहोचले की आपले स्वागत होते त्या गावच्या अनभिषिक्त राखणदारांकडून – अर्थात श्वान मंडळींकडून. मी दिसलो की यांना गतजन्मीचा वैरी भेटल्याचा आनंद होतो की काय, कोणास ठाऊक! लगेच ही मंडळी माझे जंगी स्वागत करायला आवेशाने पुढे येतात. अर्थात आज यांच्यावर काही लिहिणार नाही. मात्र एकदा गाव सोडून गडाच्या चढणीला लागले की वृक्षवल्ली आणि वनचरे भेटायला सुरुवात होते. अर्थात वनचरे म्हणजे अगदी जमिनीवरून वेगात पळापळ करणारे किडे, त्यांचे पंखधारी भाऊबंद, झाडांवरून स्वच्छंद विहार करणारे विहंग, मानवी चाहूल लागली की आपले नसलेले पाय ओढत पळून जाणारे सर्पराज आणि चार पायांचे वन्यजीव हे सगळेच भेटतात.

सर्वप्रथम कीटकांच्या विश्वात जाऊ या. सह्याद्रीच्या भ्रमंतीत मुंग्या दिसतात, त्यांचे अस्तित्व जाणवते ते त्यांच्या अनोख्या आकाराच्या वारुळामुळे. सह्याद्री आणि परिसरात आपल्याला एखाद्या गुलाब फुलाच्या आकाराचे वारूळ पाहायला मिळते. मागे २००१ साली माहुलीवर गेलो होतो, तेव्हा मुंग्यांनी त्यांच्या जा-ये करण्याच्या मार्गात कसली तरी पांढरी पूड पसरली होती, त्यामुळे त्यांचे हायवे स्पष्ट दिसत होते. गडाच्या परिसरात घेर्‍यात असलेल्या गावातील गावकरी गुरे चारायला आणत असल्यामुळे त्यांचे शेण सर्वत्र पसरते. साहजिकच या शेणाचे गोळे करून एक जण मागच्या पायाने, तर एक जण पुढच्या पायाने हे शेणगोळे ढकलत त्यांच्या बिळाकडे नेतात. मोठे मजेदार दृश्य असते. माहूरच्या रामगडाच्या उतारावर असे मोठ्या संख्येने शेणीकिडे बघायला मिळाले. रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळच्या सुरगडावरून उतरताना एका पानाआड काहीतरी लपलेले दिसले. उत्सुकता म्हणून पान बाजूला केले, तर विंचवाचे एक पिल्लू सरपटत गेले. त्याक्षणी ट्रेकिंगमध्ये बुटाचे महत्त्व समजले.

या कीटकमंडळींनी दोनदा मला चांगलीच आठवण राहील असे अनुभव दिले. रायरेश्वरला भेट देऊन रायरेश्वर-केंजळगड जोडणार्‍या धारेवरून एकटाच चालत निघालो होतो. मध्ये दाट झाडांचा एक पट्टा होता. सप्टेंबर महिना असल्याने झाडी दाट होती. अद्याप त्या वाटेवर मानवी वावर नसावा. साहजिकच झाडांना अंग घासत त्या परिसरातून पुढे गेलो. केंजळगड पाहून घरी आलो. मात्र काखेत काहीतरी चावत असल्यासारखे वाटत होते, म्हणून निरीक्षण केले तर एक गोचीड कातडीला घट्ट पकडून बसली होती, त्याच्या त्या वेदना होत्या. डॉक्टरांचा ऑपरेशनचा चिमटा माझ्याकडे होता. तो मेणबत्तीवर तापवून त्या गोचिडीला पकडले. भाजल्यामुळे त्या गोचिडीची पकड ढिली झाली आणि ओढून गोचीड जमिनीवर सोडली. थोडे निरीक्षण झाल्यावर मेणबत्तीचे मेण त्या गोचिडीच्या अंगावर ओतून तिची ममी तयार केली.:-)

पुन्हा गेल्या वर्षी माहुलीला गेलो असताना भांडारगडावर विश्रांती घेण्यासाठी आडवा झालो असताना एक गोचीड नकळत पोटावर चढून चिकटून बसली. बहुधा आधीच्या गोचिडीची मी ममी केल्याची या गोचिडीला माहिती असावी, कारण मला काहीही जाणीव होत नव्हती. आपल्यावर ममीफिकेशनची वेळ येऊ नये, म्हणून अगदी निमूटपणे ही गोचीड पोटावर ठाण मांडून बसली होती. अर्थात माझे वेळीच लक्ष गेले आणि या गोचिडीलाही मी स्वर्गाची वाट दाखवली.

पावसाळ्यात पुर्ण बहरात असलेला निसर्ग पाहिला की घरी बसणे केवळ अशक्य! पण पावसाळ्यात सह्याद्रीत भटकायचे, म्हणजे एका जिवापासून जपायला हवे, ते म्हणजे ‘जळवा’. हिंदी चित्रपटातील हिरॉइनचा जलवा कितीही आकर्षक असला, तरी सह्याद्रीतील मराठी जळवा मात्र लई डेंजर असतात, बरे का! विशेषतः पन्हाळगड ते विशाळगड या महाराजांच्या पाऊलखुणा शोधत जायच्या स्मरणयात्रेत यांचा प्रसाद हमखास मिळतो. मी याच ट्रेकमध्ये जळू हा प्रकार पहिल्यांदा बघितला. मुख्य म्हणजे जळू शरीराला चिकटते, तेव्हा आपल्याला जाणीव होत नाही; पण जेव्हा तिचे पोट भरते आणि ती आपल्या शरीरावरून खाली उतरते, तेव्हा तिने रक्त पातळ राहावे म्हणून आपल्या शरीरावर जो द्रव सोडलेला असतो, त्याने जळजळ सुरू होते. अर्थात तोपर्यंत जळूचे पोट भरलेले असते. एकतर आगकाडी पेटवून जळूला त्याचा चटका द्यायचा किंवा जळूच्या अंगावर हळद टाकायची. (माणसाच्या अंगावर हळद पडली की तो सरळ होतो, तिथे बिचार्‍या जळूची काय कथा?) किंवा जळवा असणार्‍या प्रदेशातून जाताना पायांना साबण चोळावा, म्हणजे जळवा शरीरावर राहत नाहीत.

उन्हाळी ट्रेकमध्ये हमखास दिसणारे दृश्य म्हणजे काजवांच्या चमचमत्या रोशणाईचे. कोकणात ट्रेक असेल तर दाजीपूर्, आंबोली, करुळ कोणत्याही घाटाने खाली कोकणात उतरताना या काजव्यांनी झाडे अक्षरशः लगडलेली दिसतात. असाच एकदा कोकणातील गड पाहून मित्राबरोबर कोयनामार्गे कराडला परत येत असताना अक्षरशः प्रत्येक झाड काजव्यांनी भरलेले होते. विशेष म्हणजे एकदा त्रिपुरी पौर्णिमा साजरी करायला राजगडावर गेलो होतो. संजीवनी माचीवर सूर्यास्त पाहून परत येत असताना बालेकिल्ल्याच्या परिसरात झाडीवर काजवे दिसले होते. असेच मित्रांसह महाबळेश्वरजवळच्या मधुमकरंदगडाकडे निघालो होतो. रात्रीचा प्रवास होता. ट्रेकिंग ग्रूप एका मिनीबसमध्ये भरून चतुरबेटकडे निघालो होतो. पण रस्त्याचा काहीतरी घोळ होऊन वाट चुकली. बस रिव्हर्स घ्यायला जागा नसल्याने सगळे जण खाली उतरलो आणि ड्रायव्हर बस उलट घेऊ लागला. पण तितक्यात रस्त्याच्या बाजूला एका झाडावर असंख्य काजवे लखलखताना दिसत होते. त्रासदायक प्रवास, वाट चुकल्याचा वैताग हे सगळे विसरून आम्ही ती काजव्यांची दिवाळी थक्क होऊन पाहत होतो.
याच काजव्यांची, विसरता न येणारी आणखी एक आठवण आहे ती तुंग उर्फ कठीणगडाची. इथे जायला लोणावळ्यावरून संध्याकाळी पाचला एकच बस सुटते, जी दुसर्‍या दिवशी सकाळी परत लोणावळ्याला जाते. त्यामुळे ऐन मे महिन्यात संध्याकाळी हा गड बघून दुसर्‍या दिवशी सकाळी परत जायचे प्लॅनिंग केले. गड बघून पायथ्याच्या तुंगवाडीत एका आजोबांच्या शेणाने सारवलेल्या अंगणात चादर पसरून झोपेची आराधना करत होतो. डोक्यावर एक झाड होते. पानगळीमुळे झाडाचा खराटा झाला होता. त्यावर असंख्य काजवे टिमटिमत होते. बहुधा अमावस्या जवळ असल्यामुळे निरभ्र आकाशात असंख्य तारे चमकत होते. त्या झाडाच्या निष्पर्ण फांद्यांतून दिसणारे तारे आणि फांद्यांवर चमकणारे काजवे हे आयुष्यभर न विसणारे दृश्य अनुभवले.

सह्याद्री परिसरात आणखी दिसणारे अष्टपाद कीटक म्हणजे कोळी. यात जाळे विणून स्वत:ची सही करणारे सिग्नेचर स्पायडर आपले जाळे विणून शांतपणे भक्ष्याची वाट बघत बसलेले दिसतात. पण त्याहून मजेदार असतात ‘डॅडी लाँग लेग’.

बर्‍याच जणांनी हे नाव पहिल्यांदाच वाचलेले असले, तरी कदाचित हे कोळी बघितले नक्कीच असतील. साधारण गुहांमध्ये, वावर नसलेल्या गडावरच्या इमारतीत काळोख्या, दमट जागेत हे कोळी दिसतात. बुरशी, शेवाळ, वनस्पती, छोटे कीटक, मेलेल्या कीटकांचे / प्राण्यांचे / वनस्पतींचे अवशेष, पक्ष्यांची विष्ठा अशी फुल्ल व्हरायटीचे खाणे हे अनोखे नाव असलेले कोळी खातात. यांचे एक अनोखे वैशिष्ट्य आहे – आपल्या शत्रूंपासून रक्षण होण्यासाठी हे सर्व जण समूह करून राहतात. भक्षकाची चाहूल लागताच हे पायावर ताठ उभे राहून शरीराचा भाग एखाद्या स्प्रिंगप्रमाणे खाली-वर हलवायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांचा भक्षक गोंधळून जातो.

शेवटचा काहीशी दहशत असलेला कीटक म्हणजे मधमाश्या. बर्‍याच भ्रमंतीत मला या माश्यांची पोळी दिसली. सुरगडावर तर रिकामे झालेले पोळे सापडले. पण या मधमाश्यांचा एक अनोखा अनुभव मी घेतला तो सावंतवाडीजवळच्या मनोहरगडावर. रांगणा किल्ल्याच्या परिसरात एकाच डोंगरावर मनोहर-मनसंतोष हे जुळे किल्ले आहेत. वाट तुटल्यामुळे मनसंतोषगडावर जाता येत नसले, तरी मनोहरगडावर मात्र जाता येते. या मनोहरगडावर जायची वाट शेवटच्या टप्प्यात प्राण कंठाशी आणणारी आहे. मी कसेबसा चढून तर गेलो, पण त्या घसार्‍यावर उतरताना दिव्य करावे लागले. ऐन मे महिन्यात या गडावर मी गेलो होतो आणि दुपारची वेऴ होती. मनोहरगडावर एक बांधीव विहीर होती. गड बघत तिथल्या वास्तूंच्या नोंदी ठेवत, नकाशा तयार करत मी त्या विहिरीपाशी पोहोचलो, तर थक्क करणारे एक दृश्य मला पाहायला मिळाले. विहिरीच्या पाण्यात मधमाश्या झेप घेत होत्या आणि बाहेर येत होत्या. उन्हाच्या कडाक्याने तहानलेल्या मधमाश्या पाणी पीत होत्या! आवाज आणि हालचाल न करता शांतपणे हे दृश्य मी खूप वेळ पाहत होतो. हल्ली याच मनोहरगडाच्या परिसरात काळ्या बिबट्याचा वावर आहे.

किड्यांनी केलेले किडे वाचल्यानंतर, पृथ्वीवर प्राचीन काळापासून अस्तित्व राखून असलेल्या जिवांकडे जाऊ या.. खरे तर जायला नको, कारण सर्व जण यांची संगत टाळतात, ते म्हणजे अर्थातच साप. सन १८१८ला सह्याद्रीत इंग्रजांचा वरवंटा फिरला आणि नांदते, जागते गड ओस पडले. एकदा मानवी वावर बंद झाल्यावर साहजिकच इथे वावर सुरू झाला तो वन्य श्वापदांचा, साप-विंचवांचा. साहजिकच अशा वर्दळ कमी असलेल्या गडावर गेल्यास अपरिहार्यपणे सर्पकुळाची भेट होते. अर्थात, साप मानवाला घाबरत असल्यामुळे बहुतेकदा त्यांची पहिली प्रतिक्रिया पळून जायची असल्याने आपण शांतपणे उभे राहिल्यास साप त्यांच्या वाटेने सळसळत निघून जातात, असा स्वानुभव आहे.

तोरण्यावर मी व माझा मित्र दोघेच गेलो होतो. पूर्ण गड फिरून झाल्यावर परत जाताना दोघे वेगळ्या वाटेने गडाच्या दरवाजाकडे निघालो होतो. अचानक एक साप वेगाने माझ्यापासून जेमतेम तीन-चार फुटांवरून आडवा गेला. त्या क्षणी गडाच्या बांधणीच्या विचारात चालणार्‍या मला खाडकन वस्तुस्थितीची जाणीव झाली की ‘आपल्या आजूबाजूला साप आहेत.’ त्या क्षणी भीतीची लहर अंगात गेली, तरी नंतर मात्र या सापांवर बरेच वाचन केल्यावर बिनविषारी आणि विषारी साप ओळखता येऊ लागले आणि भीतीपेक्षा कुतूहल वाटू लागले.

पनवेलजवळच्या माणिकगडावर वडगावमार्गे एकटाच निघालो होतो. गडावर जायचा नेमका रस्ता सापडेना. एका शेतकर्‍याला विनंती केल्यावर तो रस्ता दाखवायला बरोबर आला. त्याच्याबरोबर शेतातून चालत होतो. अचानक एक काळसर पट्टेदार साप आडवा गेला. मण्यार होता तो. त्या शेतकर्‍याने चटकन ओळख सांगितली. अर्थात एव्हाना मी बराच सरावलो असल्यामुळे फार भीती वाटली नाही. याच माणिकगडावर चढताना पुन्हा दोन-तीन साप आडवे गेले, पण त्यांची तारांबळ बघायला मजा आली.

अलिबागजवळचा सागरगड एकटाच चढत होतो. धबधबा बघून सिद्धेश्वरच्या देवळाकडे निघालो होतो. एवढ्यात हिरव्या रंगाचा एक छोटा साप झाडावरून टपकन समोर पडला आणि काही कळायच्या आतच सळसळत दिसेनासा झाला. असा साप डोक्यावर पडू शकतो अशी जाणीव इथे झाल्यानंतर मात्र ट्रेक संपेपर्यंत टोपी डोक्यावर ठेवायची सवय लागली.

लोणावळ्याच्या आणि भुशी डॅमच्या गोंगाटी गर्दीतून एकदाचे बाहेर पडून आम्ही तिघे – म्हणजे मी आणि माझे दोन मित्र तुंगची वाट तुडवत होतो. या तुंग परिसरात महिंद्राचे हॉलिडे होम झाले असले, तरी तुंग गावात दिवसातून एकच एस.टी. बस जात असल्यामुळे घुसळखांब ते तुंगवाडी पायपीट करण्याला पर्याय नव्हता. शेजारून ऑडी, मर्सिडीज, बी.एम.डब्ल्यू, जॅग्वार जात होत्या. अचानक चालता चालता मला रस्त्यावर एक छोटा साप आडवा पडलेला दिसला. साप नक्की कोणता आहे ते त्या वेळी मला माहीत नसले, तरी त्याच्या जीव वाचवणे आवश्यक होते. पूर्ण खातरी नसल्यामुळे जेमतेम दहा इंचाच्या त्या सापाला मी दोन काटक्यांवर उचलले आणि शेजारी दाट झाडीत नेऊन सोडले. पुढे समजले की तुटकी शेपूट असल्यासारखा दिसणारा हा साप म्हणजे ‘खापरखवल्या’. अत्यंत निरुपद्रवी आणि बिनविषारी. पण पूर्ण खातरी असेपर्यंत प्रत्येक साप विषारी असेल ही शक्यता मनात ठेवून सावधगिरीने वावरणे योग्य.

खेडजवळचे रसाळगड-सुमारगड-महिपतगड हे दुर्गत्रिकूट तसे भटक्यांमध्ये प्रसिद्ध. यातील सुमारगड, महिपतगड आधीच झालेले असल्यामुळे आम्ही तीन मित्रांनी रसाळगडाचा प्लॅन केला. (आता या ट्रेकमध्ये काय काय धमाल झाली ते पुन्हा कधीतरी!) गड उतरून आंबिवलीच्या दिशेने निघालो होतो. मार्चचे दिवस आणि कोकणचे वातावरण, त्यामुळे घामटा निघाला होता. कॅमेरे बॅगेत गेले होते आणि हातात फक्त पाण्याच्या बाटल्या. खाली एक छोट वस्ती लागली. ती ओलांडून पुढे गेलो. अचानक धामणीचे एक जोडपे एकमेकांना वेटोळे घालून उभे असलेले दिसले. एकाच वेळी रोमांचक आणि धामणीच्या लांबीमुळे भयप्रद दृश्य होते. मात्र आमची चाहूल लागताच घाईघाईने वेटोळे सोडवून बाजूच्या बांबूच्या बनात ते धामण युगुल गायब झाले. कदाचित त्यांच्या एकांतात भंग आणल्यामुळे शिक्षा म्हणून आम्हाला शेवटची बस मिळाली नाही आणि चक्क एका सिंमेटच्या ट्रकमधून खेडपर्यंत यावे लागले.

पाटणजवळच्या मोरगिरीवर ऐन दुपारी चढाई सुरू केली. सकाळी पाटण गावाच्या मागच्या बाजूला असलेला दातेगड उर्फ सुंदरगड पाहून हा मोरगिरीचा बेत आखला. गडाच्या उतारावर एक गुराखी मुलगा भेटला, त्याला वाट विचारली तर तो बरोबर यायला तयार झाला. गड चढता चढता त्याने सांगितले की गडमाथ्याजवळ एक बीळ आहे आणि त्यात अजगर आहे. अजगर बघायला मिळणार याचा आनंद झाला, पण बहुधा भरपेट आहार झाल्यामुळे अजगर महाशयांनी बिळात पडी मारली असावी. मात्र त्याचे बीळ, त्याच्या वावराच्या खुणा पाहायला मिळाल्या.

एकदा चाफळला श्रीरामाचे दर्शन घेऊन तासवडे टोलनाका ओलांडला. टोलनाक्यामुळे चारचाकी वाहने मागेच राहिली. त्यामुळे मोकळा रस्ता मिळाला व बाइकवरून सुसाट निघालो. पण जेमतेम अर्धा कि.मी. गेलो, तोच गाडीच्या हेडलँपच्या प्रकाशात पुढे शंभर-दीडशे फुटांवर एक घोणस रस्ता ओलांडताना दिसला. बाइक वेगात असल्यामुळे थांबवणे शक्य नव्हते. तेव्हा घोणस बाजूला राहील अशा बेताने गाडी वेगात दामटली. ‘नॅरो एस्केप’ म्हणजे काय, ते त्या दिवशी समजले.

पालीजवळचा सुधागड दुर्गभटके आणि पर्यटक यांच्यात चांगलाच प्रसिद्ध आहे. इथे मुक्काम करायचा, तर एकच पर्याय म्हणजे सरकारवाडा. या सरकारवाड्यापासून एक वाट सुधागडाच्या टकमक टोकाकडे जाते. या वाटेवर दाट झाडी आहे. इथे मोठ्या प्रमाणात साप आहेत. पण आम्ही गडावर गेलो असताना या सरकारवाड्याच्या बाहेर चापडा उर्फ बांबू पिट व्हायपर दिसला. खरे तर जहाल विषारी असलेला हा साप चावून मेल्याच्या घटना मात्र आश्चर्यकारकरित्या कमी आहेत. मात्र आत निवांतपणे झोपलेल्या मंडळींना भिंतीपलीकडे मृत्यू वावरतो आहे याची कल्पना नव्हती. त्या वाड्यातील पुजार्‍याला सांगून चापडा उर्फ हरा नागाला लांब नेऊन सोडून दिले.

सगळ्यात धोकादायक अनुभव आला तो पेठ उर्फ कोथळीगडावर. कर्जतजवळच्या गडावर पावसाळा संपता संपता गेलो होतो. गड उतरून जांबरुखच्या वाटेकडून परत येत होतो. या बाजूने गडाचे अनोखे रूप दिसते. बहुतेक दुर्गभटके आंबिवलीकडून येत असल्याने या बाजूने गडाची मागची बाजू दिसते. इकडून फोटो घेण्यासाठी योग्य कोन शोधत गडाकडे पाहत चालत होतो. अचानक नजर समोर वळली आणि हादरलोच.. जेमतेम पाच-सहा फुटांवरून एक काळाशार नाग वाट ओलांडत होता. अर्थात मला फक्त नागाचा शेवटचा शेपटीकडचा भाग दिसला होता. मनगटापेक्षा जाड, नागमोडी वळण घेत जाणारा तो साक्षात मृत्यू बघून तातडीने पाय थांबले. डोळे खोबणीतून बाहेर येतात की काय, असे वाटले. जेमतेम दोन-तीन सेंकदांत पूर्ण शरीर घामाने थबथबले. कापरे सुटले. विलक्षण भयंकर अनुभव होता तो. अर्थात नागाला माझी चाहूल लागली नाही की तो चाहूल लागली म्हणून घाईघाईने पळत होता ते समजले नाही, पण एक थरारक अनुभव गाठीशी जमा झाला होता.

गंमत म्हणजे हाच पेठचा किल्ला बघून मी जेव्हा तुंगीकडे निघालो, तेव्हा एका मोकळ्या शेतात माझी चाहूल लागल्यामुळे एक धामण बेभान वेगाने आपल्या बिळाकडे पळाली, मात्र हे दृश्य शांतपणे बघितले.

थरारक अशा सर्पकथा ऐकल्यानंतर सर्वात शेवटी बड्या वन्य प्राण्यांचे किस्से सांगतो आणि थांबतो. पहिला किस्सा तोरणा-रायगड ट्रेकला निघालो होतो त्याचा. त्या वेळी वेल्हा-हरपूड हा रस्ता विलक्षण कच्चा होता. कोणत्याही दुर्गम गावात जाणारा असतो त्याप्रमाणे दगडाच्या टेंगळांनी, मातीने भरलेला. बसमध्येही आम्ही मोजके जण होतो. कंडक्टरशी गप्पांचा फड रंगला होता. “बस कोणत्या रस्त्याने जाते आहे ते बघा” असे वाहकाने सांगितल्याने आम्ही रस्त्याकडे बघत होतो, तितक्यात फेंगड्या चालीने वेगाने पळत रस्ता ओलांडताना एक तरस दिसले. आयुष्यातील दुसर्‍याच ट्रेकमध्ये असा प्राणी बघायला मिळाल्याने भलताच आनंद झाला.

आता आपल्या पूर्वजांचे किस्से – अर्थात मर्कटकथा. वास्तविक मानवी वर्दळीमुळे हमखास खायला मिळण्याची शक्यता असल्यामुळे बहुतेक लोकप्रिय गडांवर माकडे मोठ्या संख्येने असतात. एकंदरीत त्यांचे हावभाव, खाणे मिळवण्यासाठी धडपड आणि हाणामार्‍या हे सगळे प्रेक्षणीय असते. अगदी फुल्ल मनोरंजन. पण काही वेळा ही माकडे विलक्षण धोकादायक ठरतात.

कल्याणजवळचा मलंगगड ट्रेकर्सपेक्षा त्या दर्ग्याच्या भाविकांच्या जास्त वर्दळीचा आहे. दर्गा माचीवर असला, तरी देवणी सुळका आणि बालेकिल्ला अजूनही पाहण्यासारखे आहेत. पण इथे जाण्यात मुख्य अडचण आहे ती या परिसरात असलेल्या माकडांची. मानवी वावराची सवय असल्यामुळे त्यांना कोणतीच भीती वाटत नाही. मी बालेकिल्ला बघून खाली उतरत होतो. उभ्या कड्यात जेमतेम एक जण जाईल अशी कातळात कोरलेल्या पायर्‍यांची वाट आहे. खाली उतरत असताना एक माकड समोरून आले. मला वाटले, ते बाजूने जाईल. पण ते चक्क माझ्या समोरच आले आणि आपल्या दोन्ही हातांनी माझी पँट पकडून उभे राहिले. एक क्षणभर मी तर गोंधळून गेलो. उभ्या कड्यात असलेल्या वाटेमुळे पळायलाही जागा नव्हती. बरे, ते माकड काहीतरी खायला मिळेल या आशेवर समोर उभे. त्या परिसरातही मी एकटाच. मात्र काहीही प्रतिकार न करता शांतपणे उभा राहिल्यावर थोड्या वेळाने कंटाळून ते माकड निघून गेले आणि सुटकेचा नि:श्वास टाकून मी खाली उतरलो. गंमत म्हणजे माझ्या मित्राला पुढे याच मलंगगडावर माकडांनी असाच त्रास दिला. एक माकड चक्क त्याच्या सॅकवर उडी मारून त्याची कॅप पकडून बसले. अगदी सिंदबादच्या सफरीत तो म्हातारा त्याच्या पाठीवर ठाण मांडून बसतो, तसे. शेवटी काहीतरी खायला दिल्यावर त्याची सुटका झाली.

अशाच एका पावसाळ्यात आमचा एक ग्रूप तोरणा बघून उतरत होता. पाऊस पडल्यामुळे वाट ही एक मोठी घसरगुंडी झाली होती. त्यात गडावर कचरा नको म्हणून आमच्यातील एकाने खाणे संपलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या एकत्र करून सॅकच्या बाहेर बांधल्या होत्या. गड उतरताना एका ठिकाणी माकडांची टोळी एका झाडावर बसलेली होती. त्यातील एका माकडाला खाण्याचा वास आला आणि ते खाली उतरून सॅकशी झटापट करून ती पिशवी खेचायचा प्रयत्न करू लागले. आधीच निसरडी वाट, एका बाजूला दरी असल्यामुळे धोकादायक झालेली जागा आणि त्या माकडाची त्या पिशव्यांशी चाललेली झोंबाझोंबी.. तो मित्र चांगलाच अडचणीत आला. सुदैवाने ती पिशवी तोडण्यात माकडाला यश आले आणि माझ्या त्या मित्राची सुटका झाली.

अशाच मर्कटलीलांचे आणखी काही किस्से कथन करतो. अशाच एका मोकळ्या दिवशी लोहगडावर चक्कर टाकली. सुट्टीचा दिवस नसल्यामुळे संध्याकाळी गडावर कोणीही नव्हते. विंचूकाटा माची पाहून परत निघालो होतो, तो अचानक एक माकड मागे लागले. पूर्वानुभवामुळे हातात काठी होती, त्यामुळे माकड जवळ येत नव्हते, तरी खायला मिळेल या आशेने त्याने पाठलाग सोडला नाही. मात्र मी काही देत नाही हे पाहिल्यावर गडाच्या महाद्वारातून ते मागे फिरले. इथे माकडांनी विशेष त्रास दिला नसला, तरी हडसरवरचा अनुभव भीतिदायक होता. जुन्नरजवळचा हडसर हा प्राचीन गड आहे. इथे घुमक्कड मोठ्या संख्येने येतात. मात्र गडाच्या महाद्वारातून आत गेले की गडावरचे महादेव मंदिर ते जमिनीच्या खालच्या पातळीवर असलेल्या कोरीव कोठ्यांचा आसपास मोठ्या संख्येने माक्डे आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही आक्रमक आहेत आणि आलेल्या दुर्गभटक्यांना बर्‍याचदा यांचा उपद्रव होतो. मी नेहमीच्या पायर्‍याच्या वाटेने हा गड चढून मधल्या बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा घालून कोरीव कोठ्यांपाशी आलो. इथे माकडांचा एक गट बसला होता. माझी चाहूल लागताच त्यांनी गुरगुरायला सुरुवात केली. माझ्या दोन्ही हातांत जाडजूड काठ्या होत्या, हीच काय ती दिलासा देणारी गोष्ट होती. त्यामुळे मनाचा हिय्या करून त्यांच्याकडे न बघता पुढे चालायला सुरुवात केली. मी घाबरत नाही हे लक्षात येताच आणि हातातील काठ्या बघून माकडे धुमचकाट पळाली. पण दुर्गभ्रमंतीत किती सावध असले पाहिजे, याचे हे उदाहरण.

लाल तोंडाची ही बॉनेट माकडे बरी, अशी काळतोंडी लंगूर माकडांची दहशत असते. यांचा अनुभव घेतला तो मराठवाडा-विदर्भ यांच्या सीमेवर असलेल्या माहूरच्या रामगडावर. वास्तविक उदाराम देशमुख आणि रायबाघन, पंडिता सावित्रीबाई देशमुख यांच्या पराक्रमाने ओळखल्या जाणार्‍या या गडाला सध्या महत्त्व आहे ते देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकेमुळे, तसेच दत्त जन्मस्थानामुळे. क्वचितच कोणी दुर्गभटके रामगडावर जातात. भाविकांच्या गर्दीमुळे आणि सतत प्रसादाच्या नावाखाली खाणे मिळत असल्यामुळे इथे लंगूर मोठ्या प्रमाणात आहेत. भाविक वावरतात त्या मार्गावर ही वानरे दात वाजवत बसलेली असतात. शिवाय त्यांच्यामुळे परिसर घाण होतो, ते वेगळेच. देवीचे दर्शन घेऊन मी गड पाहायला निघालो, तेव्हा त्या भागात वानरांचा मोठा कलकलाट सुरू होता. मी जवळ जाताच त्यांनी दात विचकून मोठ्याने किचकिचाट सुरू केला. अर्थातच त्यांच्या वाटेला जाण्यात अर्थ नव्हता, त्यामुळे त्या वाटेचा नाद सोडून मी दुसर्‍या वाटेने गडाची उरलेली फेरी पूर्ण केली. विशेष म्हणजे परत आल्यावर याच माहूरच्या गडाच्या घनदाट जंगलात गावकर्‍यांनी विष घालून तीन बिबटे मारल्याची बातमी वाचली. वास्तविक माकडांच्या वाढत्या उपद्रवावर या बिबट्यांनीच नियंत्रण आणले असते.

धुळ्याजवळचा लळींगचा किल्ला चढत होतो. या गडाच्या खिंडीतून मुंबई-आग्रा महामार्ग जातो. त्या रस्त्यावरची वर्दळ बघताना चढत असल्यामुळे माझी वाट चुकली आणि गडाच्या मागच्या बाजूला पोहोचलो. पण तरीही नेट धरून माथ्याच्या तटबंदीची दिशा धरून चढायला सुरुवात केली. त्याच्या फायदा असा झाला की अचानक झाडीतून दोन भेकरे बाहेर आली. सुरुवातीला त्यांना माझे अस्तित्व जाणवले नाही, पण अचानक एकाची नजर माझ्यावर पडली आणि दोन्ही भेकरे उधळून झाडीत दिसेनाशी झाली.

असाच एक किस्सा घडला वाईजवळ असलेल्या धोम धरणाच्या पाण्यात जहाजासारख्या तरंगणार्‍या कमळगडाच्या बाबतीत. कमळगडावर चढाईचा मार्ग त्या वेळी एका सांदीतून अडचणीचा होता. आता तिथे शिड्या बसवल्या आहेत. कसेबसे सोपे प्रस्तरारोहण करून वर आलो आणि धोम धरणाच्या पाण्यावरून येणारे थंड वारे खात तटबंदीजवळ उभा होतो. गडाच्या माथ्याखालून उगवलेल्या झाडावर हालचाल झाली. बघतो तर शेकरू ही भली थोरली खार त्या झाडावर उड्या मारत होती. मी अगदी स्थिर उभा असल्याने नकळत माझ्या इतक्या जवळ आली की हाताने मी त्या खारीला आरामात स्पर्श करू शकलो असतो. मात्र माझी काहीतरी हालचाल झाली असावी. त्या शेकराला चाहूल लागली आणि झाडांच्या फांद्यावर उड्या मारत ते दिसेनासे झाले. कोयनेजवळच्या भैरवगडावर गेलो असताना जंगलात असेच शेकरू दिसले. पण ते खूप उंचावरून उड्या मारत नाहीसे झाले.

यापूर्वी तुंगच्या पायथ्याच्या गावातील काजव्यांचा किस्सा लिहिला आहे, त्याच ट्रेकमध्ये तुंग पाहून उतरताना एक प्रसंग घडला. आधी लिहिल्याप्रमाणे तुंगवाडीला जाणार्‍या एकमेव बसने गेल्यामुळे साधारण सहा-साडेसहा वाजता तुंग चढून सर केला आणि अंधूक उजेडात उतरायला सुरुवात केली. गडाच्या माचीवरून उतरत असताना अचानक गवतातून एक डुक्कर आडवे पळत निघून गेले. गावातील एखादे डुक्कर असेल असे समजून सुरुवातीला विशेष काही वाटले नाही. मात्र अचानक लक्षात आले की गावात डुकरे नव्हती आणि असली तरी गडावर नक्कीच येणार नाहीत.. म्हणजे ते रानडुक्कर होते! मग मात्र चटचट पावले उचलत पायथा गाठला.

साधारण २००५पर्यंत कास पठार प्रसिद्धीच्या फारसे झोतात नव्हते. काही दुर्गभटके आणि वनस्पतिशास्त्राचे अभ्यासक, हौशी पर्यटक सोडले तर फारसे कोणी इथे जायचे नाही. मात्र सोशल मीडियामध्ये प्रसिद्धी मिळाल्यावर आज तिथे काय परिस्थिती आहे, सांगायला नको. याच कास पठारावरून बामणोलीकडे जाताना डाव्या हाताला एक फाटा फुटतो. हा रस्ता जातो भांबवली वजराई धबधब्याकडे. बराच काळ हा धबधबाही वर्दळीपासून दूर होता. मात्र आज तो भारतातील सर्वात उंच धबधबा ठरल्यामुळे इथे गर्दी होऊ लागली आहे. आता तर थेट धबधब्यापर्यंत जायला थेट वाट आणि पर्यटकांसाठी गॅलरी अशा सोयी झाल्या आहेत. तर पाच-सहा वर्षांपूर्वी इथे एका मधल्याच दिवशी सहकुटुंब गेलो होतो. परत येताना आमच्या पुढे असलेली गाडी थांबली आणि ते लोक शेजारच्या गवताळ मैदानात काहीतरी बघत होते.

आम्हीही गाडी थांबवून पाहू लागलो, तर त्या मैदानाच्या टोकाशी दाट झाडी आणि मागे घनदाट झाडीने व्यापलेली टेकडी होती. मैदानात आणि झाडीत गव्यांचा मोठा कळप होता. जाताना आम्हाला तो दिसला होता, पण खूप लांब असल्यामुळे आम्हाला ती स्थानिक लोकांनी चरायला सोडलेली गुरे वाटली. आम्ही काही जण थोडे पुढे चालत जाऊन जवळून गवे पाहू लागलो. मात्र आमची चाहूल लागताच गवे वेगाने दाट झाडीत पळून गेले. आमच्या पुढच्या गाडीतील लोक वारंवार या रस्त्याने जा-ये करत असतात. त्यांनी सांगितले की मागच्या आठवड्यात त्याच परिसरात त्यांना एका बिबट्याने दर्शन दिले होते.

असाच एकदा एन कडाक्याची थंडी सहन करत वर्षाअखेरीच्या प्रसन्न वातावरणात आमचा ग्रूप रात्री आंबेवाडीच्या दिशेने निघाला होता. लक्ष्य होते कळसुबाई रांगेतील मदन आणि कुलंगगड. पुणे-नाशिक रस्ता सोडून जेमतेम भंडारदर्‍याच्या वाटेला लागतो, तोच गाडीच्या प्रकाशात एक भलामोठा लांडगा आडवा गेला. तातडीने गाडी थांबवून टॉर्च घेऊन आम्ही त्याचा माग काढायचा प्रयत्न केला, पण तो वेगाने झाडीत नाहीसा झाला होता. याच रस्त्यावर रतनगड पाहायला काही वर्षांपूर्वी आलो होतो, तेव्हा एका कोल्ह्याच्या जोडीने दर्शन दिल्याची आठवण झाली.

सगळ्यात शेवटी येऊ या प्राण्यांच्या अन्नसाखळीच्या सर्वोच्च शिखरावर असणार्‍या मार्जारकुलीन प्राण्यांकडे. यात पट्टेरी वाघ आणि बिबटे येतात. अर्थात महाराष्ट्रापुरते बोलायचे तर पट्टेरी वाघ फक्त विदर्भातच दिसू शकतात. कर्नाटकातील दांडेली अभयारण्याशी आंबोली, दाजीपूर्, कोयना असा जंगलाचा पट्टा जोडला गेल्याने तिकडचे वाघ सह्याद्रीत अधूनमधून येतात, पण इथे कायमचा निवास असल्याची खातरी नाही. त्यामुळे भटकंतीत पट्टेरी वाघाचे दर्शन बहुधा शक्य नाही. मात्र असंख्य अडचणींना तोंड देऊन तगलेला दुसरा मार्जारकुलीन वन्यजीव म्हणजे बिबट्या. याचा मात्र उपद्रव हल्ली सर्वत्र जाणवतो आहे. झाडावर चढण्याची क्षमता, चपळता, लवचीक शरीर आणि धूर्तपणा यामुळे भटकंतीत याच्यापासून सावध राहिलेले चांगले. इतक्या वर्षांच्या भटकंतीत मला या बिबट्याचे अस्तित्वही कधी जाणवले नाही. मात्र ‘ट्रेकक्षितिज’ या डोंबवलीच्या ग्रूपबरोबर बागलाणातील दुंधा, कर्‍हा, बिष्टा आणि अजमेरा या ट्रेकला गेलो होतो. अतिशय अनवट आणि बहुतेक नियमित ट्रेकर्सनीही न बघितलेले हे गड. सकाळी बिष्टा आणि कर्‍हा बघून दुंधा गडाच्या पायथ्याशी मुक्काम आणि दुसर्‍या दिवशी अजमेरा बघून परत, असा कार्यक्रम होता. पहिल्या दिवशी भल्यापहाटे बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याच्या कोटबेल गावी पोहोचलो. गावातून एक वाटाड्या घेऊन उजाडायच्या आत गडाकडे निघालो. गडाच्या पायथ्याशी पोहोचेपर्यंत उजाडले होते. वाटाड्याशी गप्पा मारत मी आणि आमचा ट्रेक लीडर चाललो होतो. अचानक वाटाड्याने आम्हाला थांबायचा इशारा केला. आम्हाला कारण कळेना. त्याने सांगितले की त्याला बिबट्याचे गुरगुरणे ऐकू आले. त्याच्याबरोबर असूनही आम्हाला काहीही ऐकू आले नव्हते. अर्थात गडाच्या दुसर्‍या बाजूच्या उतारावर मोठ्या संख्येने झुडपे आणि बाभळीची झाडी होती, त्यात तो बिबट्या कोठे गायब झाला, समजले नाही.

हा गड, त्यानंतर कर्‍हा आणि देवळाणेचे अप्रतिम मंदिर पाहून दुंधा गडाचा पायथा गाठायला संध्याकाळ झाली. अर्थात दुसर्‍या दिवशीचे वेळापत्रक आणि परतीचा प्रवास लक्षात घेता आम्ही संध्याकाळीच दुंधा पहायचा निश्चय केला. बरोबर दोन स्थानिक वाटाडे घेऊन गडावर निघालो. गडाच्या मध्यभागी असलेले शिवमंदिर आणि पाण्याचे भूमिगत टाके पाहून गडाच्या उत्तरेला असलेले टाके पाहायला निघालो. आमच्या ग्रूपमधील एक जण थोडा पुढे होता. एका वळणावर त्याला एका बिबट्याने दर्शन दिले. माणसाची चाहूल लागताच तो बिबट्या घाईघाईने झाडीत दिसेनासा झाला. एकाच दिवसात बिबट्याचे सह्याद्रीत जाणवलेले हे दुसरे अस्तित्व. मात्र वैयक्तिक मला काही बिबट्या पहायला मिळाला नाही. बघू या जंगलातील हे देखणे जनावर केव्हा दर्शन देते ते.

अनेक वर्षांच्या भटकंतीत वन्यप्राण्यांचे जे काही किस्से अनुभवला आले, ते इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हे वाचून दुर्गभ्रमंती म्हणजे साप-विंचवांशी गाठ आणि काहीतरी धोकादायक प्रकार असे कोणीही समजू नये. हे वन्यजीवही आपल्या निसर्गाचा एक भाग आहेत. आपण त्यांच्या राज्यात जात असतो आणि जोपर्यंत आपण त्यांना काही त्रास देत नाही, तोपर्यंत ते सहसा आपल्या वाटेला जात नाहीत असा बहुतेकांचा अनुभव असतो. तेव्हा आपल्या सृष्टीच्या भाग असलेल्या या जिवांच्या सहजीवनाचा आदर केला, तर भटकंती हा आनंद देऊन जाईल यात शंका नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s