कोंढवी ( kondhavi )

पोलदपूरहून खेड – चिपळूणकडे जातांना कशेडी हा प्राचिन घाटमार्ग लागतो. या घाटातून गोवा, रत्नागिरीकडे जाणार्‍या गाड्या रात्रंदिवस धावत असतात.पण या वर्दळीवर एक प्राचीन गड नजर रोखून बसला आहे, हे कोणाच्या गावीही नसते.
रायगड जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या पोलादपुर तालुक्यात कशेडी घाटमार्गात पुर्वबाजुला असलेल्या डोंगराच्या कुशीत कोंढवी हे प्राचिन गाव वसले आहे. गावात दिसणाऱ्या सतीशिळा,विरगळ,कोरीव मुर्त्या तसेच मंदिराचे कोरीव स्तंभ या गावाचे प्राचीनत्व अधोरेखीत करतात. कोंढवी गावाच्या उत्तरेला घाटमाथ्यावरील सातारा व महाबळेश्वर येथे जाणारा आंबेनळी घाट असुन कोंढवी- देवपूर दरम्यान एक लहानसा घाटमार्ग या मुख्य घाटमार्गाला मिळतो. या घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी कोंढवी किल्ल्याची बांधणी करण्यात आली असावी.

कोंढवी पोलादपुर परिसराचा नकाशा

मुंबई – पुण्याहून कोंढवी गडावर जाण्यासाठी प्रथम मुंबई – गोवा मार्गावरील पोलादपूर हे गाव गाठवे. पोलादपूरहून कोंढवी / आदेशपूर फाटा ७ किमी अंतरावर आहे. किंवा धामणदेवी येथे जाउन कोंढवी गाठता येईल. फाट्यापासून कोंढवी गाव ३ किमी अंतरावर आहे. पोलादपूरहून खाजगी वाहानाने किंवा सहा आसनी रिक्षाने कोंढवी गावात जाता येते. कोंढवी गाव गडाच्या पाऊण उंचीवर असल्यामुळे येथून गडावर जाण्यास अर्धा तास पुरतो. पोलादपुरवरुन कोंढवीसाठी एकच बस सकाळी आठ वाजता आहे.

पोलादपूर जवळील कोंढवी गाव उर्फ तळ्याची वाडी येथे कोंढवी किल्ला आहे. गावात शिरल्यावर उजव्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. गडावर पिण्यालायक पाणी नाही म्हणून पाणी गावात भरुन घेणे योग्य.गडाची तटबंदी व दरवाजा नष्ट झाले असुन या रस्त्याने आपण गडमाथ्यावर असलेल्या आठगाव भैरवनाथ या मंदिराकडे पोहोचतो.गावापासून ते गडापर्यंत थेट डांबरी रस्ता झाल्यामुळे स्वताची गाडी असेल तर सरळ किल्ल्याच्या माथ्यावर जाउ शकतो.
 या गडाचे गडपण दाखवणारे तसे अवशेष म्हणजे तटबंदी, दरवाजा, तोफा काहीही ह्या गडावर नाही.गडपण दर्शविणार्‍या वस्तू ज्या ठिकाणी होत्या, त्या ठिकाणावर आता नाहीयेत. बर्‍यापैकी वस्तू गावकऱ्यांनी भैरव मंदिराजवळ आणून ठेवलेल्या आहेत.

भैरवनाथ मंदिर
 मंदिराच्या आवारात जुन्या मंदिराचे कोरीव व घडीव दगड पडलेले आहेत. भैरव मंदिराचा नव्याने जिर्णोध्दार केलेला असुन मंदिराच्या गाभाऱ्यात भैरोबा व भैरी देवीच्या पाषाणात कोरलेल्या मुर्ती व एक महिषासुर मर्दिनीची मुर्ती पहायला मिळते. 
या डोंगराच्या पंचक्रोशीत कोंढवी, फणसकोंड, गांजवणे, खडपी, धामणदेवी, चोळई, खडकवणा व गोलदरा अशी आठ गावे असून या गावांचे हे श्रध्दास्थान असल्याने हे मंदिर आठगाव भैरवनाथ म्हणुन ओळखले जाते. गावातुन चालत येण्यासाठी मंदीरासमोरच पाऊलवाट आहे. 
 मंदिराच्या मागील भागात साचपाण्याचे एक लहान टाके आहे पण त्यात डिसेंबरपर्यंत पाणी असते. टाक्याच्या पुढील भागात उतारावर ढासळलेल्या तटबंदीचे दगड दिसुन येतात.
 मंदिराच्या उजव्या बाजुस जुन्या चौथऱ्यावर नव्याने बांधलेली एक खोली असुन त्यात नवनाथांच्या मुर्ती ठेवल्या आहेत. या पैकी आठ मूर्ती अतिशय सुस्थितीत असून एक मूर्ती भग्न झालेली दिसते. कदाचित त्यामुळेच त्याला कुलूप लावून बंद केलेले आहे. हे मंदिर ही पुरातन आहे. हे मंदिर मुस्लिम स्थापत्य शैलीचे आहे.
या खोलीच्या मागील बाजूस ४ X २ फूट आकाराचे शिल्प आहे पण ते नेमके कशाचे आहे ते कळत नाही. अश्या प्रकारचे शिल्प बहुतेकदा निजामशहाच्या ताब्यातील किल्ल्यावर पहाण्यास मिळते.असे शिल्प दापोलीजवळील मंडणगडावर देखील आहे.
 
 
 
या शिल्पापुढे काही अंतरावर दोन भग्न वास्तुंचे अवशेष पाहायला मिळतात. हे मंदिर राहण्यासाठी अतिशय चांगलं आहे. परंतु सध्या ते कुलूप लावून बंद केलेले असते.गड परिसरात प्रचंड वाढलेल्या गवतामुळे अजून काही अवशेष असतील तर सापडणे कठीण आहे.

कोरडा तलाव आणि चाफा
मात्र त्या कोरड्या तलावाच्या शेजारी चाफ्याचं झाड दिसलं. ही तशी महत्त्वाची खूण आहे. या तलावाच्या दुसर्‍या बाजूला एक वडाचे झाड आहे.

तुळशी वृंदावन, पिंड
    मंदिराच्या समोरच आपल्याला काही जुने दगड, मूर्ती दिसतात. त्यात एक नव्याने बांधलेलं तुळशीवृंदावनही आहे. त्याच्या शेजारी असलेली शंकराची पिंड सुंदर आहे. अतिशय छान नक्षीदार असलेली ही पिंड एका चौरंगासारखी आहे. मध्यभागी एक कमळ ही कोरलेलं आहे.

हनुमान मंदिर
   शिल्प पाहुन डांबरी रस्त्यावर येऊन काही अंतर चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजुला एका चौथऱ्यावर हनुमानाची मुर्ती पहायला मिळते.त्या मंदिरात जाणाऱ्या वाटेवर जुन्या अवशेषांचे काही भाग दिसत होते. ते वाड्याचे अवशेष वाटत होते. या मार्गावर जुन्या पायऱ्यांचे काही अवशेषही आहेत. इथे एक मूर्ती हनुमंताची आहे तर त्याच्या शेजारची छोटी मूर्तीही हनुमंता सारखीच वाटते.
    या चौथऱ्याच्या उजव्या बाजुस गाळाने भरलेला तलाव असुन या तलावात उतरण्यासाठी दगडात बांधलेल्या १६ पायऱ्या पहायला मिळतात.

     या मारुती मंदिरापासून पुढे आपण टेकडीच्या माथ्यावर जाउ शकतो. मात्र टेकडीवर कोणतेही अवशेष नाहीत.किल्ल्याची उंची समुदसपाटीपासून ७९० फुट आहे. साधारण गोलाकार आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला असुन गडाचा परीसर ५ एकरमध्ये सामावला आहे. गडावरील इतर अवशेष नष्ट झाल्याने इथेच आपली गडफेरी पूर्ण होते. मंदिरासमोरून आग्नेयेला रसाळगड, सुमारगड व महिपतगड हे किल्ले नजरेस पडतात.तर पुर्वेला प्रतापगड स्पष्ट दिसतो. गड पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.

कोंढवी गडाला भेट देण्याबरोबरच पोलादपुर गावात असलेल्या कविंद्र परमानंद यांच्या समाधीला ही भेट देता येईल.तसेच तानाजी मालुसरे यांच्या उमरठ गावालाही भेट देता येईल.
आदिलशाही काळात कोंढवी हा परगणा असुन कोंढवी किल्ल्यावरूनच या परगण्याचा कारभार चालत असे. पोलादजंग हा कोंढवी गडाचा किल्लेदार होता. पोलादजंगची पोलादपुर गावात कबर असुन त्याच्या नावानेच या गावाला पोलादपुर नाव पडल्याचे सांगण्यात येते. शिवकाळात हा प्रदेश जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. इ.स.१७७८-७९ मध्ये रायगड मधील २४४ गावे कोंढवी, महाड, बिरवाडी, तुडील, विन्हेरे व वाळण अशा सहा परगण्यात विभागली होती. यातील परगणा कोंढवी मधील उमरठ, ढवळे, खोपडी, दांदके हि चार गावे पंतप्रतिनिधीच्या ताब्यात होती.

( महत्वाची तळटीपः- काही प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )

कोंढवीगडाची व्हिडीओतून सफर

आपण माझे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
भटकंती सह्याद्रीची

संदर्भग्रंथः-
१ ) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
३) www.trekshitiz.com हि वेबसाईट
४) www.durgbharari.com हि वेबसाईट

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s