पाणी हि मानवाची मुलभुत गरज, त्यामुळे प्राचीन काळी मानवी वस्ती वाढली ती नद्यांच्या काठी. पुढे निरनिराळ्या प्रदेशाची सीमा आखणी करायची वेळ आल्यानंतर सहाजिकच नदी हिच हद्द ठरविण्यासाठी वापरली गेली. सह्याद्रीत आंबोलीजवळ उगम पावून आणि पर्यटकांना धबधब्यात मनसोक्त भिजवून तेरेखोल नदी गोवा राज्याची उत्तर सीमा आखत समुद्रात विलीन होते. नदीच्या उत्तर काठावर आपण महाराष्ट्रात असतो, तर फक्त तरीने नदी ओलांडली तरी राज्य बदलून गोव्यात पोहचतो. पण नियमाला अपवाद असतो,तस चक्क नदीच्या उत्तर किनार्यावरचा अगदी समुद्राला खेटून असणारा भाग हा गोवा राज्याच्या हद्दीत येतो. नेमका ईथेच खडा आहे, “तेरेखोल किल्ला”. विशेष म्हणजे तेरेखोल गाव वेंगुर्ला तालुक्यात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात येतो मात्र याच गावातील तेरेखोल किल्ला मात्र पेडणे तालुक्याचा म्हणजे उत्तर गोवा जिल्ह्याचा भाग आहे. आज आपण तिथलीच सैर करणार आहोत.

आधी या टेकडीवर उभारलेल्या भुईकोटासारख्या चिमुकल्या किल्ल्याचा इतिहास समजून घेउया. १७ व्या शतकात सावंतवाडीच्या खेमसावंतांनी या किल्ल्याची उभारणी पोर्तुगिजांवर लक्ष ठेवण्यासाठी केली. पोर्तुगिजांना हे सहन न झाल्याने १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडा या चव्वेचाळीसाव्या व्हॉइसरॉयच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नुतनीकरण केले. किल्ल्यावरील सेंट अन्थोनी चर्च या व्हाईसरॉय अल्मेडा याने बांधल्याचे इतिहासकार सांगतात. पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेले कॅप्सुल बुरुज त्यावेळी बांधण्यात आले. १७९४ मध्ये थोड्या काळासाठी हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता पण पोर्तुगिजांनी तो परत जिंकून घेतला. किल्ल्याच्या ताब्याचा हा रस्सीखेचीचा खेळ सुरु असतानाच मध्येच अचानक पोर्तुगीजांना हुक्की आली कि गोव्यात जन्मलेल्या कोण्या सक्षम व्यक्तीला गव्हर्नर करावे. आणि त्यांनी डॉ बरनादी पेरेस डिसिल्वा यांना सन १८२५ मध्ये गर्व्हनर केले. पण मुळच्या या भुमीपुत्राने मातृभुमीचे ऋण जाणुन तेरेखोलच्या किल्ल्यातून पोर्तुगिजांविरुध्द उठाव केला, तो उठाव पोर्तुगिजांनी मोडून काढला. १९२५ मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध डॉ. बर्नाडो पेरेझ डिसूझा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पहिल्या वहिल्या गोवन बंडाची आखणी याच किल्ल्यावरुन केली गेली. १५ ऑगस्ट १९५४ रोजी अल्फ्रेड आल्फांसो यांच्या नेत्वृत्वाखाली गोवा मुक्ती संग्रामच्या कार्यकर्त्यांनी किल्ला १ दिवसासाठी ताब्यात घेतला होता. १५ ऑगस्ट १९५५ रोजी पनवेल येथील हिरवे गुरुजी (तुळशीदास बाळकृष्ण हिरवे) व शेषनाथ वाडेकर यांच्यासह १२७ निशस्त्र कार्यकर्त्यांनी किल्ल्यासमोर सत्याग्रह केला.

त्यावेळी पोर्तुगिजांनी केलेल्या गोळीबारात हिरवे गुरुजी व शेषनाथ वाडेकर शहीद झाले.



त्यांचे स्मारक किल्ल्यासमोर डाव्या हाताला आहे. १९६१ मध्येही पोर्तुगीजांविरुद्धच्या गोवा मुक्तिसंग्रामाच्या वेळी या किल्ल्याचा एक तळ म्हणून मुक्तिसैनिकांनी वापर केला. १९६१ ला गोवा मुक्त झाला आणि ९ डिसेंबर १९७६ ला किल्ल्याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले.
अश्याप्रकारे गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतीकारकांना निवारा देण्याचे मोठे काम तेरेखोल किल्ल्याने केले. त्यामुळे तेरेखोलचा हा किल्ला गोव्याच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान बाळगून आहे.

अश्या या छोट्याश्या पण देखण्या किल्ल्याला भेट देण्याचे दोन पर्याय आहेत. मालवण – पणजी सागरी महामार्गावर असलेले तेरेखोल गाव, मालवण पासून ६० किमी व पणजी ४० किमी वर आहे. मालवणहून वेंगुर्ले आणि वेंगुर्ल्याहून बसने तेरेखोल गावात जाता येते. किल्ल्याच्या अगदी दारापर्यंत गाडीरस्ता आहे. महाराष्ट्राच्या हद्दीतील शेवटचे गाव असलेल्या रेडीपासून तेरेखोल फोर्ट ५ कि.मी. अंतरावर आहे त्यामुळे वेळ असल्यास जवळच असणारा रेडीचा यशवंतगड देखील वाकडी वाट करून पाहता येतो. दुसरा मार्ग गोव्यातून आहे. पणजीवरुन म्हापसामार्गे आरम्बोल बीच आणि खेरी बीच पाहून फेरीने तेरेखोल नदी ओलांडून येथे येता येईल.याशिवाय थोड रमतगमत जायचे असेल तर पणजी ते कलंगुट ते सायोलीन (siolim) ते केरीम (querim) हा समुद्रालगतचा प्रवास आणि मैन्द्रेम (mandrem) शेवटी आरम्बोल खाडी केरीम गावातून फेरी बोट आहे.थेट गाडी घेवून खाडी पार करता येते आणि तेरेखोल किल्ल्यावर जाता येतं.

गोव्यातील गावाचे नावाचे एक मजेदार वैशिष्ट्य आहे, गावांच्या नावाचा मराठी उच्चार वेगळा आणि त्याचे ईंग्लिश स्पेलिंग भलतेच असते. गोव्यात फिरताना हा गोंधळ फार होतो. हा तेरेखोल किल्लादेखील त्याला अपवाद नाही. तेरेखोल नदीच्या नावाचे स्पेलिंग Terekhol River असले तरी किल्ल्याच्या नावाचे स्पेलिंग मात्र Tirakol किंवा Tirakhol असे आहे. असे का ? सोडवा कोडे.


तेरेखोल हा तसा एक आटोपशीर किल्ला आहे. गोवा सरकारने या छोटेखानी किल्ल्याचे तारांकीत हॉटेलमध्ये रुपांतर केल्यामुळे किल्ला अतिशय स्वच्छ व नीटनीटका ठेवलेला असला तरी सामान्य पर्यटकांना संपूर्ण किल्ला पाहण्याची परवानगी नाही. तसेच किल्ला पाहण्यासाठी सकाळी १० नंतरच परवानगी मिळते आणि तेही फक्त काही जणांनाच.

समुद्राच्या टोकाशी असलेल्या टेकडीवर या किल्ल्याची उभारणी झाल्याने तटबंदीचा एक भाग थेट खाली खाडीपर्यंत नेला आहे.
किल्ल्यात हॉटेल असल्यामुळे सगळीकडे आकर्षक रंगरंगोटी केलेली असली तरी किल्ल्याचे मूळ स्वरुप बऱ्याच प्रमाणात तसेच ठेवले गेले आहे. जांभ्या दगडात बांधलेल्या या किल्ल्याच्या स्थापत्यकलेत कोकणी, पोर्तुगीज व गॉथीक शैलीचा प्रभाव आढळतो.

सुस्थितीत असणाऱ्या गडाच्या दक्षिणाभीमुखी प्रवेशद्वाराने गडात प्रवेश करताच प्रवेशद्वाराच्या समोरच भिंतीलगतच ठेवलेला एक भला मोठा जुना पेटारा आपले लक्ष वेधून घेतो.

आता हा जादूचा पेटारा आहे का? या विचारात न पडता पुढे जाउया.

भिंतीना दोन्ही बाजूंनी भाले अडकवले आहेत.

प्रवेशद्वाराचे दरवाजे जुने दिसत असले तरी रंगरंगोटी करून आकर्षक केलेले असल्यामुळे मुळचे आहेत कि हॉटेलसाठी जुन्या पद्धतीने बनवून घेतले आहेत ते कळत नाही.


किल्ल्यात प्रवेश करताच समोर दिसते ते पोर्तुगीज धाटणीचे सेंट अँथनी चर्च / चापेल (Church of Holy Trinity) व किल्ल्याच्या तटबंदीला लागून हॉटेलसाठी बांधण्यात आलेल्या आखीवरेखीव खोल्या. पण या खोल्या आणि चर्च कायमच बंद असतात.

किल्ल्याच्या आत प्रवेश करताच एक St. Andrew यांचा पुतळा लक्ष वेधून घेतो

प्रवेशद्वारावरील सज्ज्यावर जाण्यासाठीचा जिना केलेला आहे तर समोर असणाऱ्या चर्चच्या मागे उजव्या बाजूस असलेल्या जिन्याने देखील मागील बुरुजावर जाता येते.

किल्ल्याचा एवढाच काय तो परिसर सामान्य पर्यटकांसाठी खुला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या तटावरुन प्रवेशद्वारापर्यंत फेरी मारुन गड दर्शन आटोपते घ्यावे लागते.




पोर्तुगिज बांधणीचे वैशिष्ट्य असलेला कॅप्सुल आकाराचा बुरुज, मध्यभागी असलेले एक चॅपल, गडाची चौरस तटबंदी, एक भरभक्कम दरवाजा आणि किल्ल्यावरील सैनिकांच्या व अधिकाऱ्यांच्या निवासासाठी बांधलेल्या खोल्या एवढे मोजके अवशेष पाहून साधारण २० मिनिटांत गडफेरी उरकता येते. किल्ल्याच्या आवारात एक जिवंत पाण्याचा झरा असून त्याकाळी किल्ल्यातील शिबंदीला लागणाऱ्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था या झऱ्याच्या पाण्यातूनच होत असे.

किल्ल्यावरून दिसणारा खेरीचा समुद्रकिनारा, त्यावरील पांढरी शुभ्र रेती आणि अरबी समुद्राचे निळेशार पाणी असे दृश पाहून मन सुखावते.
(महत्वाची तळटीप :- काही प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार )
तेरेखोल किल्ल्याची व्हिडीओतून सैर
संदर्भः-
१) जलदुर्गांच्या सहवासातः- प्र.के. घाणेकर
२) https://itsgoa.com/forts-in-goa-know-more-about-them/ हे संकेतस्थळ
३) www.durgwedh.blogspot.in हा श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग
४ ) पोर्तुगीज-मराठा संबंध- श्री. स.शं. देसाई
५) चला माझ्या गोव्यात- मिलींद गुणाजी
६ ) ईंटरनेटवरुन मिळालेले संदर्भ