पन्हाळघरदुर्ग ( Panhalghar Fort)

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडच का निवडला ह्यामागे अनेक भौगोलिक कारणं आहेत. रायगडाच्या चोहोबाजूंनी मानगड, दौलतगड पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची प्रभावळ असल्याने युध्दशास्त्राच्या दृष्टीने रायगड अधिकच बळकट झाला होता. या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. रायगडाभोवती उभा केलेले किल्ल्यांचे कडे नीट अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल कि मानगड ते दौलतगड या दरम्यान कोणता गड दिसत नाही. वास्तविक मुंबई, सुरतकडून येण्याचा मार्ग नागोठणे-पाली- कोलाड-पाणेसे असा होता, याचा अर्थ या बाजूने मोघली किंवा ईंग्रजांचा हल्ला झाला तर रायगडाला सावध करण्यासाठी शिवकाळात निश्चित किल्ला असावा असा आढाखा बांधून पुण्याचे दुर्ग अभ्यासक श्री.सचिन जोशी यांनी जि.पी.एस.च्या सहाय्याने या परिसराचा शोध घेतला.पुढे लोणेरेजवळच्या एका डोंगराचा आकार किल्ल्यासारखा आहे, हे लक्षात आल्यावर प्रत्यक्ष पहाणी केली. किल्ल्याला आवश्यक असणारे अवशेष आहेत अशी खात्री झाल्यानंतर एका नवीन किल्ल्याचा शोध लागल्याचे जाहीर केले गेले. अर्थात मुळ किल्ल्याला कागदोपत्री काय नाव आहे, याची कल्पना नसल्याने पायथ्याच्या पन्हाळघर गावावरुन त्याला पन्हाळघरचा किल्ला हे नाव देण्यात आले. सह्याद्रीच्या अजस्र डोंगररांगांच्या गर्दीत हा लहानसा किल्ला आजही आपले स्थान टिकवून आहे.

      मुळात गडाचे नक्की नाव काय आहे, याचीच कल्पना नसल्याने या गडाचा इतिहास सांगता येणार नाही. तसेच पन्हाळघर दुर्गाची निर्मिती ही नेमकी कोणत्या काळात झाली हे ही सांगणे शक्य नाही. तरीही हा किल्ला रायगडाच्या घेर्‍यात असल्याने राजधानीचा उपदुर्ग म्हणुन नक्कीच असणार.पन्हाळघर किल्ला ते रायगड हे अंतर फक्त १२ किलोमीटर एवढेच आहे (हे दोन किल्ल्यामधील थेट अंतर आहे. महामार्गवरून नव्हे). तसेच पन्हाळघर गावातून एक वाट गावापाठीमागच्या डोंगरधारेवरून सरळ रायगड खोर्‍यात उतरते व तिथून रायगड किल्ल्यावर जाते. गडाचे छोटेखानी आकारमान पाहता येथे मोजकी शिबंदी ठेऊन रायगडाला जाण्याच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजेच टेहळणीसाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असेल.पायथ्याचे पन्हाळघर गाव शिवकालीन असले पाहीजे कारण ह्या गावावर रायगडावरच्या घरांना पावसात लागणारे झाप (गवताच्या पेंढ्या) पुरवण्याची जबाबदारी होती. बहुदा पन्हाळघर किल्ल्याच्या किल्लेदारावर ह्या कामावर देखरेख करायची जबाबदारी दिलेली असेल. पन्हाळघर गाव तसेच आजूबाजूला खूप मोठा गवताळ भाग आहे त्यावरून रायगडावरच्या सर्व घरांना येथून गवत पुरवठा करता येऊ शकत असावा.
       माणगाव तालुक्यात असलेल्या पन्हाळघरला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे गाव गाठावे लागते. अर्थात फक्त पन्हाळघर किल्ला पहाण्यासाठी वेगळी मोहीम आखण्यापेक्षा या भागातील सोनगड, मानगड, दासगावचा किल्ला आणि त्याच्या जोडीला हा पन्हाळघर पाहील्यास बरेच गड खात्यावर जमा होतील.मुंबई – गोवा महामार्गावर माणगाव व महाडच्या मध्ये माणगावपासून ८ किमी वर लोणेरे गाव आहे. लोणेरे गावातून पन्हाळघर हे पन्हाळघरच्या पायथ्याचे गाव ५ किमी वर आहे. लोणेरे हे येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमुळे प्रसिध्द आहे.


लोणेरे फाट्यावरुन मोठ्या प्रमाणात रिक्षा आपल्याला युनिव्हर्सिटीकडे जाणार्‍या दिसतात.मात्र फार क्वचित रिक्षा पन्हाळघरकडे जातात.एकतर आपल्याला स्पेशल रिक्षा ठरवून पन्हाळघरकडे जावे लागते किंवा युनिव्हर्सिटीकडे जाणारी रिक्षा घेउन पन्हाळघर फाट्याला उतरुन चालत गड गाठावा लागतो.

      पुण्यावरुन यायचे झाल्यास ताम्हिणी घाट उतरून माणगाव येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागताच माणगाववरुन लोणेरेला येउ शकतो. हे गाव सुरु होण्याच्या फक्त ५०० मीटर आधी डावीकडे एक रस्ता पन्हाळघर नावाच्या छोट्या पाड्याकडे जातो.

 येथे पन्हाळघर नावाचे बुद्रुक आणि खुर्द असे दोन पाडे असून त्यापैकी पन्हाळघर खुर्द येथून किल्ल्यावर जाणारी मळलेली पायवाट आहे. पन्हाळघर खुर्द गावात किल्ल्याकडे तोंड करून उभे राहिल्यास डोंगराच्या पायथ्याशी अलीकडेच बसवलेल्या काळ्या रंगाच्या दोन सिंटेक्स टाक्या दिसतात. या टाक्यांच्या अगदी शेजारून एक मळलेली पायवाट किल्ल्यावर जाते.
      याशिवाय रेल्वेने ईथे यायचे झाल्यास कोकण रेल्वेची दिवा-मडगाव पॅसेंजर सकाळी ६,०० वाजता मुंबईवरुन सुटते,जी सकाळी १०:०० वाजता माणगावला पोहोचते. मानगड पाहून झाल्यावर लोणेरे गावाजवळील पन्हाळघर पाहून मडगाव दिवा पॅसेंजर (१७:०० वाजता) गोरेगाव स्थानकात पकडून परत येता येते.
     अर्थात सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वताच्या वहानाने या परिसराची भटकंतीचे नियोजन करणे. स्वत:च्या वाहनाने रात्री प्रवास करुन पहाटे माणगावला पोहचल्यास मानगड, कुर्डूगड, पन्हाळघर एकाच दिवशी पाहाता येतात, पण त्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते.

 किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ४८५ फुट आहे. किल्ल्याची उंची जरी कमी असली तरी किल्ल्यावर जाणारी पायवाट मात्र खड्या चढणीची आणि दम काढणारी आहे.
गडाच्या खालील भागात असलेली तटबंदी, बुरुज व दरवाजा पुर्णपणे नष्ट झालेला असुन या वाटेने अर्ध्या तासात आपण एका लहानशा सपाटीवर येऊन पोहोचतो.

येथे समोरच खडकात खोदलेली तीन पाण्याची टाकी आपले लक्ष वेधून घेतात. या सर्व टाक्यात फक्त पावसाळ्यातच पाणी साठते. इतरवेळी ही टाकी एकतर गाळाने भरलेली किंवा कोरडी ठणठणीत असतात.या टाक्यांच्या काठावर बांबू रोवण्यासाठी खळगे दिसुन येतात. उघडय़ावर असलेल्या टाक्यांतील पाण्याचे सूर्यप्रकाश किंवा वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मोठय़ा प्रमाणात बाष्पीभवन होते. ते कमी करण्यासाठी टाक्यांच्या बाजूला बऱ्याचदा कातळात काही भोके खोदलेली दिसतात. या भोकांचा उपयोग बांबू रोवण्यासाठी केला जात असे. बांबू रोवून त्यावर कापडाचे आच्छादन टाकल्यामुळे पाण्याचे झाडाझुडपांचा केरकचरा आणि बाष्पीभवनापासून संरक्षण होत असे. या टाक्यांना लागुनच दगडांचा एक चर बांधलेला असून तो थोड्या अंतरावर डोंगराच्या नाळेपर्यंत नेलेला आहे. याचे प्रयोजन मात्र लक्षात येत नाही.

  टाक्याच्या पुढील भागात काही प्रमाणात तटबंदीचे दगड पहायला मिळतात. टाकी पाहुन पुढे आल्यावर या वाटेचे दोन भाग होतात. एक वाट सरळ वरच्या बाजुला जाते तर दुसरी वाट डावीकडे समांतर वळते. डावीकडील वाटेने कड्याला वळसा मारून सरळ पुढे आल्यावर मातीत बुजलेले अजुन एक टाके दिसते.

  येथुन वर पहिले असता समोर डोंगर कड्यावर एका उंच लोखंडी खांबावर भगवा ध्वज फडकताना दिसतो. हे टाके पाहुन आल्या वाटेने मागे फिरावे व ध्वजस्तंभाकडे जावे.

 या ध्वजस्तंभाच्या उजवीकडे कड्याला लागुनच कातळात खोदलेले अजुन एक टाके असुन त्याशेजारी मातीत बुजलेले दुसरे टाके आहे. गडावर पाण्याची एकुण ६ टाकी पहायला मिळतात.  ध्वजस्तंभाकडून वर जाणारी वाट आपल्याला गडमाथ्यावर घेऊन जाते. गडमाथ्यावर एका वास्तुचा चौथरा व तुरळक तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. गडाला फेरी मारत उत्तर बाजुला गेले असता या टोकावर बुरुजाचे अवशेष दिसुन येतात. समुद्रसपाटीपासून  490 फुट उंचीच्या या बुरुजावरून रायगड किल्ल्याचे सुंदर दर्शन होते.

बुरुजाशेजारील वाटेने गडाखाली उतरता येते. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. पायथ्यापासुन माथ्यापर्यंत यायला व परत जाण्यासाठी दोन तास पुरेसे होतात.गडावर अवशेष जरी मोजकेच असले तरी, हे अवशेष भयंकर वाढलेल्या झाडीझुडपात शोधणे म्हणजे थोडे अवघड काम आहे. गडाच्या उत्तर बाजुच्या दरीत  बाबासाहेब आंबेड्कर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचा परिसर पसरला आहे.
        गडावर फार कोणी दुर्गप्रेमी येत नाहीत. याच गडाचा परिसरात बाबासाहेब आंबेड्कर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे. दर १९ फेब्रुवारीला शिवज्योत नेण्यासाठी विध्यार्थी येथे येतात. आधी फक्त येथे गुराखी त्यांची गुरे घेउन चारायसाठी यायचे. त्यांची गुरे पाण्याच्या टाकीत पडायला लागली, म्हणून त्यांनी गडावरची टाकी बुजवली.
   एकंदरीत अचानक हरवलेला हा गड उजेडात आल्याने या परिसरातील भटकंतीत याला भेट द्यायलाच हवी.
https://www.youtube.com/embed/tYhfJg303Dg
   संदर्भः-

१) www.durgbharari.com   हि वेबसाईट
२) www.trekshitiz.com   हि वेबसाईट
३) रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव- श्री. सचिन जोशी

दौलतगड उर्फ दासगावचा किल्ला

सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे.
इतिहासकाळी महाड, खेड, गोवळकोट, चिपळूण ही नामांकित बंदरे होती. अरब, रूमशान, ग्रीस इथपासूनचा माल चौल, दाभोळ आणि नालासोपारा अश्या मोठ्या बंदरात यायचा. या मोठ्या बंदरातून मग तो माल छोट्या गलबतामधून महाडसारख्या आतल्या बंदरात आणला जायचा. सावित्री नदीच्या मार्गाने महाड परिसरात मालाची आवक-जावक होत असे. पण कालांतराने खाड्या ओहरल्या आणि नद्यांची पात्र अरुंद होऊन महाड बंदरावरून होणारी वाहतून बंद झाली. इतिहासकाळात या सावित्री नदीच्या तीरावरून होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दासगावचा किल्ला उर्फ दौलतगड उर्फ भोपाळगडाची निर्मिती झाली असावी. सावित्री नदीचा हा मार्ग गाळाने भरून गेल्याने महिकावंती बंदर आणि दासगाव बंदर या बंदरांचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत.यातील दासगाव बंदराचे रक्षण करण्यासाठी दौलतगड या किल्ल्यांची उभारणी केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केल्याने रायगडाच्या प्रभावळीत असलेल्या या किल्ल्याला राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले.    
या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. यातील दौलतगड किल्ल्याची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे सांगणे जरी कठीण असले तरी रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला खाडीमार्गावरील टेहळणीचा एक महत्वाचा किल्ला होता.रायगड किल्ला कितीही बळकट असला तरी फिरंगे, पोर्तुगीज, सिद्धी यांच्यामार्फत रायगडाला सागरी आक्रमणाची भीती ही होतीच. त्यामुळे शिवकाळात सावित्री नदीच्या बाणकोट खाडी किनाऱ्यावर पहारे देण्यासाठी दौलतगडाचा उत्तम उपयोग होत असावा. सागरी मार्गाने होणाऱ्या हालचालींचा प्रथम अहवाल दौलतगडाला मिळत असेल आणि तिथून पुढे तो सोनगड आणि चांभारगड या महाड परिसरातील इतर किल्ल्यावरून रायगडाला पोहोचत असण्याची शक्यता आहे.  इ.स.१७५६ मध्ये तुळाजी आंग्रे यांच्या विरुध्द नानासाहेब पेशवे यांनी काढलेल्या मोहीमेत इंग्रजांनी केलेल्या मदतीसाठी दासगाव व कोमाल हि गावे तसेच बाणकोट किल्ला त्यांना देण्यात आला.इ.स. १७७१ मध्ये बाणकोटच्या इंग्रज रेसिडेंटने किल्ल्यावर डागडूजी करून इथे बंगला बांधला आणि किल्ल्याचे नाव दासगाव फोर्ट असे ठेवले. पुढे १७७५ च्या सुमारास मराठ्यांनी किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यातून परत घेतला आणि पुढे सन १७८४ पर्यंत तो त्यांच्याकडेच राहीला.आज मात्र स्थानिकांना हा किल्ला दौलतगड म्हणुन परीचीत आहे व वर्षातुन फक्त एकदाच झेंडा लावण्यासाठी शिवजयंतीला आम्ही किल्ल्यावर जातो असे ते अभिमानाने सांगतात. महाड तालुक्यात असलेल्या दौलतगडला भेट देण्यासाठी आपल्याला मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे पुढे ८ कि.मी.वर असलेले दासगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. महाडकडून माणगावला जाताना महामार्गाला लागुन असलेली दासगावची खिंड व सावित्री नदी यांना लागुन असलेल्या टेकडीवजा डोंगरावर दौलतगडचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची २५५ फुट आहे. दासगावची खिंड पार केल्यावर लगेचच एक लहान रस्ता उजवीकडे दासगावात जातो. 


दुर्गभ्रमंती करणार्‍यांनासुध्दा फार माहिती नसणारा हा किल्ला बघायचा असेल तर आधी दासगाव गाठायला हवे. मुंबई गोवा महामार्गावर मुंबईहून १६२ किलोमीटरवर दासगाव आहे. (महाडच्या अलिकडे ११ किलोमीटर). कोकणात जाणार्‍या सर्व एसटी बसेस दासगावला थांबतात. याच गावात दासगावचा किल्ला आहे. दासगाव हे कोकण रेल्वेवरचे स्टेशन असल्याने ईथे रेल्वेनेसुध्दा जाउ शकतो. कोकण रेल्वेने वीर स्थानकावर उतरावे. वीरहून रेल्वे स्टेशन ते दासगाव अंतर ५ किलोमीटर आहे. सहा आसनी रिक्षा आणि एसटीने दासगावला पोहोचता येते.


दासगावचा “दौलतगड” मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला अगदी खेटूनच उभा आहे. मुंबईहून महाडला जाताना मुंबई गोवा महामार्गावर दासगावची खिंड लागते . त्या खिंडीतल्या उजव्या बाजूच्या (सावित्री नदी आणि कोकण रेल्वेचा ट्रॅक असलेली बाजू) डोंगरावर दासगावचा किल्ला आहे. उलट बाजूने म्हणजे महाडकडून जायचे असल्यास माणगावकडून महाडकडे जाताना साधारण १८ किमी अंतरावर (महाड गावापासून साधारण ७ किमी) महामार्गावरच दासगावची खिंड लागते. दासगावच्या खिंडीच्या पुढे एक छोटा रस्ता उजव्या बाजूला दासगाव गावात जातो .
या रस्त्याने खिंडीपर्यंत परत चालत जायला ५ मिनिटे लागतात.खिंड ओलांडली की लगेच उजव्याबाजूला सिमेंटची एक पायवाट खिंडीला लागून असणाऱ्या डोंगरावर चढताना दिसते. या सिमेंटच्या पायवाटेने साधारण ५ मिनिटे चढून जाताच आपण रायगड जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या “आदर्श केंद्रशाळा, दासगाव” या शाळेच्या प्रांगणात येऊन पोहोचतो. दासगावची “आदर्श केंद्रशाळा” ही किल्ल्याच्या डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. शाळेचा स्वच्छ परिसर, सुंदर कौलारू इमारत, आजूबाजूला असणारी हिरवीगार झाडी आणि शाळेच्या मागेच उभ्या असलेल्या हिरव्यागार डोंगराचे लाभलेले सानिध्य यामुळे हा सर्व परिसर कमालीचा सुंदर दिसतो आणि नकळतच आपल्याला पुन्हा एकदा शाळेत जावे असे वाटायला लागते. पण आपल्याला मात्र किल्ला पहायचा असल्याने शाळेच्या मागच्या बाजूला असणाऱ्या फाटकातून बाहेर पडायचे आणि डोंगर चढणीला लागायचे.

 
मी किल्ला बघायला गेलो होतो, तेव्हा शाळेची मधली सुट्टी झाली होती.कंटाळलेली पोर बाहेर मनसोक्त धुडघुस घालत होती. मी त्यातल्या एकाला किल्ल्यावर जाण्याची वाट विचारली, तो एकाला चौघे उत्साही वीर मला वाट दाखवायला आले. शाळेच्या मुख्य दरवाजाने आत पटांगणात शिरून दुसऱ्या बाजुस असलेल्या लहान दरवाजाने बाहेर पडायचे व शाळेच्या इमारतीला वळसा घालुन आपण ज्या दरवाजाने आत शिरलो त्या बाजूस यायचे. येथुन समोरच डोंगरावर गेलेल्या पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात करायची.
ही पायवाट शाळेच्या वरच्या बाजुने डोंगर उजव्या बाजूला आणि शाळा खाली डाव्या बाजूला ठेवत पुढे जाते. यातली डाव्याबाजूची पायवाट पाण्याच्या टाक्याकडे, सरळ वर चढत जाणारी पायवाट किल्ल्याच्या माथ्याकडे तर उजवीकडे जाणारी पायवाट डोंगराला वळसा (ट्राव्हर्स) मारून किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे जाते. यात सगळ्यात आधी आपण डाव्याबाजूची पायवाट पकडायची आणि मोजून फक्त दोनच मिनिटात दगडात खोदलेल्या पाण्याच्या टाक्यापाशी पोहोचायचे.

पावसाळ्यात हे दगडात खोदलेले पाण्याचे टाके नितळ पाण्याने तुडुंब भरून वाहत असते. या टाक्यातले थंडगार पाणी पिऊन तृप्त व्हायचे आणि उरलेल्या गडभटकंतीसाठी निघायचे.मात्र गडाच्या परिसरात पाळीव जनावरांचा मुक्त वावर असल्याने पावसाळा सोडून इतरवेळी ते पिण्यायोग्य असण्याची शक्यता कमी. आता टाक्यापासून पुन्हा तीन वाटांच्या जंक्शनला परत येऊन गडमाथ्यावर जाणारी मधली पायवाट धरायची. पण गडावर जाणाऱ्या या पायवाटेवर प्रचंड झाडी माजलेली असल्याने पावसाळ्यात या वाटेने गडमाथा गाठणे थोडे अवघड काम आहे. त्यामुळे निराश न होता पायवाटांच्या जंक्शनवरून उजवीकडे डोंगराला वळसा (ट्राव्हर्स) मारून दक्षिण टोकाकडे जाणाऱ्या तिसऱ्या पायवाटेचा पर्याय समोर ठेवायचा. थोडक्यात काय तर गडाच्या मागच्या बाजूने देखील गडमाथा गाठता येऊ शकतो. टाके पाहुन परत चराकडे यावे व चर पार करून डावीकडील वाट धरावी.

या वाटेने २ मिनिटे चालल्यावर कातळात खोदलेले मध्यम आकाराचे टाके लागते. टाक्यात उतरण्यासाठी २-४ पायऱ्या कोरल्या आहेत. या टाक्याची दुर्गप्रेमींनी अलीकडेच सफाई केली असल्याने पिण्यायोग्य पाणी आहे पण काही स्थानिक सध्या याचा वापर कपडे धुण्यासाठी करत आहेत.

हे टाके पाहुन परत चराच्या वाटेवर यावे.

 उजवीकडे जात असलेली उरलेली तिसरी वाट आपल्याला डोंगराला वळसा मारत दासगावच्या विरुध्द दिशेला असलेल्या किल्ल्याच्या दक्षिण टोकावर घेऊन जाते. या टोकावरून वर चढत ५ मिनिटात आपण गडमाथ्यावरील ध्वजस्तंभाजवळ पोहोचतो.

किल्ल्यावर फारसे कोणी जात नसल्याने वाटा मोडलेल्या असुन त्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे त्यामुळे या झाडीतुन वाट काढत अवशेष पहाण्यापेक्षा शोधावे लागतात. ब्रिटीश गॅझेटीयरनुसार एका दगडाला शेंदुर लाउन गडावर आसरा देवीची स्थापना केली होती. आज मात्र देवीचा हा दगड पहाण्यास मिळत नाही.

 ध्वजस्तंभ,बुरुज,तटबंदी, तलाव सहज दिसत असले तरी उर्वरीत अवशेष मात्र सावधपणे शोधावे लागतात.

 गडमाथ्यावर पोहचताच सुंदर निसर्गाविष्कार आपल्या डोळ्या समोर उलगडायला लागतो.

सावित्री आणि काळ नद्यांच्या संगम, बारमाही वाहणाऱ्या सावित्री नदीचे विस्तीर्ण पात्र, त्यात तयार झालेली अनेक छोटी छोटी बेटे, बेटांच्या सुपीक जमिनीवर डोलणारी हिरवागार शेती, नदीकाठाने वसलेली छोटी गावे, या सगळ्यातून वाट काढत जाणारी कोकण रेल्वे आणि नदीचे पात्र ओलांडणारा रेल्वेचा देखणा पूल. अगदी एखाद्या निसर्गचित्रात शोभून दिसावं असं कमालीच सुंदर दृश्य.

आपण या टोकाशी उभे असतानाच नेमकी निळ्या रंगाची रेल्वे डौलाने शिट्टी वाजवत आली तर हा कॅनव्हास पुर्ण होतो. हा अनुभव मला घ्यायला मिळाला, तुम्हीही घ्या. गडाची उंची अवघी ४५० फुट असली तर ईथले सौदंर्य नक्कीच खेचून आणणारे आहे.
बहुदा किल्ल्यावरून दिसणाऱ्या या दृश्याच्या प्रेमात पडूनच ब्रिटीशकाळात जेव्हा हा किल्ला इंग्रजांकडे गेला तेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांना या किल्ल्यावर बंगले बांधण्याचा मोह झाला असावा.

 पायवाटेने आपण किल्ल्याच्या पिछाडीला जाईपर्यंत वरील वर्णन केलेले सुंदर निसर्गचित्र कायम आपल्या डोळ्यासमोर दिसत राहते आणि साधारण १० मिनिटात आपण किल्ल्याच्या पिछाडीला येऊन पोहोचतो. येथेच खाली दासगावची भोईआळी नावाची एक वस्ती आपल्याला दिसते. किल्ल्यावर येणारी दुसरी पायवाट या भोईआळीतून किल्ल्याच्या माथ्यावर जाते. आपण याच पायवाटेने किल्ल्याचा उरलेला १० मिनिटांचा चढ चढून गडमाथा जवळ करायचा.

गडमाथा आटोपशीर असला तरी सध्या किल्ल्यावर वावर कमी असल्याने प्रचंड झाडी माजलेली आहे.
 

या झाडीतच आपल्याला इंग्रज अधिकाऱ्यांसाठी बांधलेल्या विश्रामगृहाच्या बांधकामाची जोती, तटबंदीचे तुरळक अवशेष आणि दोन उध्वस्त बुरुज असे थोडकेच दुर्गाअवशेष अगदी मह्तप्रयासाने सापडतात आणि येथेच आपली साधारण ४५ मिनिटांची गडफेरी पूर्ण होते.


दासगावचा किल्ला पहाण्यासाठी फार वेळ लागत नसल्याने या भागातील ईतर दुर्गभ्रंमतीला जोडून हा गड बघता येईल. सोनगड, पन्हाळघर या किल्ल्यांच्या मोहीमेत दासगावचा किल्ला पाहून होईल. वेळ आणि ईच्छा असेल तर दासगावजवळ सव आणि कोंदीवटी गावात असणार्‍या गरम पाण्याच्या झर्‍याला भेट देता येईल. तर असा हा दासगावचा दौलतगड, अगदी तुरळक ऐतिहासिक अवशेष असले तरी किल्ल्यावरून दिसणाऱ्या अप्रतिम निसर्गदृशासाठी नक्की भेट द्यावा असा.

माझे सर्व लिखाण तुम्ही येथे एकत्र वाचु शकता.
भटकंती सह्याद्रीची

https://www.youtube.com/embed/ssecnCPy77E

संदर्भः-

१) रायगड जिल्हा गॅझेटीयर-

२) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर

३) www.durgbharari.com   हि वेबसाईट

४) www.trekshitiz.com   हि वेबसाईट

५) रायगड जिल्ह्याचे दुर्गवैभव- श्री. सचिन जोशी

६) दुर्गवास्तू- श्री. आनंद पाळंदे

सोनगड

“राज्याचे सार ते दुर्ग” असे अज्ञापत्रात सांगितले आहे. अर्थात दुर्ग हे मुलतः संरक्षणाची वास्तु म्हणून उभारले गेले. लष्करी ठाणी हा बहुतांश किल्ल्यांचा प्राथमिक उद्देश असला तरी काही किल्ल्यांचा इतरही कामासाठी उपयोग झालेला दिसतो. महाडजवळच्या आणि रायगडाच्या घेर्‍यातील सोनगडाचा मुख्यतः वापर कारागृह म्हणून झाला. अर्थात सोनगडाने युध्द पाहीली नाहीत असा मात्र याचा अर्थ नव्हे. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. बंदरावरील या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड,सोनगड,महेंद्रगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. उत्तरेकडे रायगडापासून जी डोंगररांग सुरू होते ती चांभारगड व सोनगड ह्या दोन गडांपाशी येऊन थांबते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केल्यावर रायगडाच्या घेर्‍यात समुद्राच्या दिशेने असलेल्या या किल्ल्यांना राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व प्राप्त झाले.         या किल्ल्यांच्या कड्यामुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. यातील सोनगडची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे सांगणे जरी कठीण असले तरी रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला खाडीमार्गावरील टेहळणीचा एक महत्वाचा किल्ला होता. या किल्ल्याचा उल्लेख अगदी फेरीश्त्याने सुद्धा केला आहे. त्यामुळे आजघडीला या किल्ल्याला किमान सहाशे वर्ष पूर्ण झाली असावीत असा अंदाज बांधायला हरकत नाही.

        महाराष्ट्रात एकाच नावाचे किंवा नावात साधर्म्य असणारे बरेच किल्ले आहेत. तसाच हा सोनगड किल्ला. सोनगड नावाचा एक किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या सोनेवाडी गावाजवळ उभा आहे तर दुसरा रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील पाले गावाजवळ, तर तिसरा सोनगड कणकवलीजवळ आहे.  महाड शहराच्या वायव्येला, महाड गावापासून साधारण ३ किमी अंतरावर, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या एका डोंगरात गांधारपाले ही बौद्धकालीन लेणी आहेत. ही लेणी महामार्गावरून सहज नजरेस पडत असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करताना प्रत्येक भटका या लेण्यांना भेट देतो. पण याच लेण्यांच्या डोंगरावर असणाऱ्या एका भव्य पठारावर सोनगड नावाचा एक इतिहासकालीन किल्ला ठाण मांडून बसला आहे हे मात्र फार कमी लोकांना माहिती असते. हा किल्ला तसा भटक्या लोकांमध्ये सुद्धा अपरिचित आहे. महाड पासून अवघ्या ५ किमी अंतरावर असणारा हा किल्ला गेली कित्येक वर्ष महाड, रायगड, सावित्री खोरे अशा मोठ्या भूभागावर नजर ठेऊन आहे.

  महाडच्या सोनगडाला भेट देण्यासाठी मार्गांचे चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. किल्ल्यावर जाणारी एक वाट गांधारपाले लेण्यावरून, दुसरी वाट गांधारपाले लेण्यांच्या थोडे अलिकडे असणाऱ्या बौध्दवाडीतून तर तिसरी वाट या दोन्ही वाटांच्या बरोबर विरुद्ध दिशेने म्हणजे मोहोप्रे गावातून किल्ल्यावर जाते. या तीनही वाटांनी सोनगडाचा माथा गाठण्यासाठी साधारण दीड तासांचा कालावधी लागतो. मोहोप्रे गावातून किल्ल्यावर जाणारी वाट ही खड्या चढणीची तर गांधारपाले लेण्यांच्या कातळमाथ्यावरून जाणारी वाट पावसाळ्यात थोडी अवघड व घसरडी आहे. त्यामुळे यापैकी गांधारपाले लेण्यांच्या अलिकडे महामार्गालगत असणाऱ्या बौध्दवाडी समोरून किल्ल्यावर जाणारी तिसरी वाट तुलनेने सगळ्यात सोप्पी आणि मळलेली आहे.

  वहुर गावातून दिसणारा सोनगड
   अर्थात या सर्वांपेक्षा सोयीची आणि बहुतेक दुर्गभटक्यांना माहिती नसणारी चौथी वाट आहे, मुंबई-गोवा मार्गावरील वहुर या गावातून. हे गाव तसे छोटे आणि महामार्गापासून थोडे आत आहे.

 मात्र गावाच्या पार्श्वभुमीवर असणार्‍या डोंगरावर आपल्या कातळमाथ्यावर डौलाने फडकणारा भगवा मिरवत सोनगड उभा आहे. महामार्गालगत असलेल्या वस्तीवरुन थेट सोनगडाला वाट चढते. या मार्गाने गड सतत समोर दिसत असल्याने चुकण्याचा प्रश्न येत नाही. साधारण तास-दीड तासाच्या चढणीनंतर आपण थेट सोनगडावर पोहचतो. खरतर या वाटेने जायचे झाल्यास वाटाड्याची गरज पडत नाही, मात्र तरीही कोणी स्थानिक व्यक्ती बरोबर घेतल्यास या वाटेवर असलेली घोडेखिंडीची पायर्‍यांची वाट व पाण्याची टाकी दाखवितो.       आपल्याला गडाचा संपुर्ण परिसर भटकायचा असल्याने आणि गंधारपाले लेणी बघायची असल्याने आपण महाडकडून पाले गावाच्या वाटेने येउया आणि वहुरकडून उतरुया. सोनगडावर जाण्यासाठी प्रथम महाडपासून ४ किमी अंतरावरील गांधारपाले लेण्यांच्या पायथ्याचे “पाले” गाव गाठावे. या गावाच्या साधारण १ किमी अलिकडे महामार्गालगत गांधारपाले लेण्यांची एक बौद्धवाडी लागते. या बौद्धवाडीच्या बरोबर समोर एक कच्चा गाडीरस्ता डोंगरावर चढताना दिसतो. या कच्च्या रस्त्याने बाईक किंवा जीप यासारखे वाहन गांधारपाले लेण्या ज्या डोंगरात कोरलेल्या आहेत त्या डोंगराच्या पठारावर असणाऱ्या धनगरपाड्यापर्यंत (गोलगडवाडी) जाऊ शकते. हा धनगरपाडा म्हणजे खऱ्या अर्थाने सोनगड किल्ल्याचा पायथा होय. महामार्गापासून कच्च्या रस्त्याचे हे अंतर वाहनाने फक्त २० मिनिटात पार करता येते. पण जर का या कच्च्या रस्त्याने जाण्यासारखे वाहन जवळ नसेल तर मात्र पायगाडीने धनगरपाड्यापर्यंतचे अंतर गाठण्यासाठी साधारण ४५ मिनिटे लागतात. किल्ल्यावर जाण्याऱ्या या वाटेवर ठराविक अंतराने किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचे काम करणाऱ्या “सह्याद्री प्रतिष्ठान” या संस्थेने दिशादर्शक बोर्ड लावलेले आहेत.

        कच्च्या रस्त्याने डोंगर चढत असताना कातळकड्यात कोरून काढलेल्या गांधारपाले लेण्यांची शृंखला फार सुंदर दिसते. विविध अंगाने लेण्यांचे अवलोकन करत पठारावर दाखल होताच कोणतेही निर्बंध नसलेला भर्राट वारा आपले स्वागत करतो व आत्तापर्यंत डोंगर चढून आलेला थकवा कुठल्या कुठे पळून जातो.

मग थंडगार वारे अंगावर झेलत कच्च्या रस्त्याने पठारावरून चालत निघायचे आणि पुढच्या १५ मिनिटात धनगरपाडा गाठायचा.

सोनगड किल्ला ज्या डोंगरावर बांधलेला आहे तो डोंगर दक्षिणोत्तर अवाढव्य पसरलेला असून या डोंगराची एक धार धनगरपाडयापर्यंत खाली उतरलेली आहे. या डोंगरधारेने चढायला सुरवात करायची आणि पुढल्या २० मिनिटात थोड्या सपाटीवर पोहोचायचे. या डोंगर सपाटीवर बरीच उंच झाडी वाढलेली असल्याने किल्ल्याचा माथा येथून देखील दृष्टीक्षेपात येत नाही.

त्यामुळे आणखी थोडा चढ चढत त्या झाडीभरल्या डोंगरमाथ्यावरून चालत राहायचे की पुढील १० मिनिटात आपल्याला किल्ल्याचा माथा आणि त्यावर फडकणारा भगवा ध्वज दिसायला लागतो. आता समोर दिसणारा छोटासा डोंगरमाथा म्हणजेच सोनगड किल्ला हे आपले पुढील लक्ष मानून किल्ल्यासमोर डेरेदाखल व्हायचे. गांधारपाले गावाच्या बौध्दवाडीत गाडीत लावल्यापासून या ठिकाणी पोहोचण्यास साधारण दीड तासांचा कालावधी लागतो. या वाडीत केवळ ४० माणसे वस्तीला असुन वाडीतील तरुणाई कामधंद्यासाठी शहरात असल्याने गावात किल्ल्यावर जाण्यासाठी वाटाड्या मिळत नाही. गडावर फारसे कोणी जात नसल्याने वाटा बुजलेल्या आहेत त्यामुळे आधी गावकऱ्याकडून वाट नीट समजून घ्यावी व नंतरच गडावर निघावे. गावकरी वाट सांगताना गडावरील झेंडा पहात गडावर जावे असे सांगतात पण गड चढताना हा झेंडा सतत नजरेसमोर राहत नाही. चिंचोळा माथा असलेला किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ८९० फुट आहे.

वाडीतून गवताने भरलेल्या वाटेवरून दोन लहान टेकाडे व छोटे जंगल व काही सपाटी पार करत अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या दक्षिण दिशेस असलेल्या बुरूजासमोर पोहोचतो.

या बुरुजाची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन बुरुजाशेजारी दरीच्या दिशेने असलेल्या पुर्वाभिमुख उध्वस्त दरवाजातून आपण गडावर प्रवेश करतो.

दरवाजाशेजारी असलेले बुरुज मोठया प्रमाणात उध्वस्त असुन त्यांचा काही भाग आजमितीला शिल्लक आहे.

   दरवाजातून आत शिरल्यावर वाटेच्या डाव्या बाजुला डोंगर उतारावर खडकात खोदलेली दोन पाण्याची टाकी दिसतात पण तिथे जाणारी वाट मात्र घसाऱ्याची असल्याने धोक्याची आहे.

वाटेच्या पुढील भागात थेट भिंतीवरून आपण एका इमारतीत प्रवेश करतो. हि दगडी इमारत चौथऱ्यावर बांधलेली असुन या इमारतीच्या भिंती व दरवाजाची चौकट आजही शिल्लक आहे.

या इमारतीच्या दरवाजाबाहेर आत येण्यासाठी आठ पायऱ्या आहेत.

हि इमारत गडाच्या सर्वात उंच ठिकाणी असुन या इमारतीच्या आत भगवा झेंडा रोवला आहे.

  हा भगवा ध्वज थेट महाड शहरातून दिसू शकतो.
सोनगडाचा वापर हा शिवकाळात कैदी ठेवण्यासाठी होत असे आणि याचा उल्लेख आपल्याला इंग्लिश रेकॉर्ड्स मध्ये मिळून जातो. या गोष्टीला भौतिक पुरावा कोणता असे विचारल्यास, सोनगडावरील उभी असलेली एकुलती एक वस्तू हे होय. या वास्तूशिवाय या किल्ल्यावर सांगण्याजोगे असे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत हे मात्र खेदाने सांगावे लागते.

  इमारतीच्या दुसऱ्या बाजुला काही प्रमाणात सपाटी दिसुन येते.

या सपाटीवर दोन उध्वस्त वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. सपाटीच्या पुढील भागात एक लहानसा उंचवटा असुन त्यापुढील भागात सपाटीवर किल्ल्याचा उत्तर टोकावरील बुरुज आहे.

  या बुरुजाच्या टोकावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो मात्र पायथ्यापासुन इथवर यायला अडीच तास लागतो. एकंदरीत या किल्ल्यावर राहण्यासाठी सोय नाही.फारतर पठारावरील धनगरवाडीत राहता येईल.

  किल्ल्यावर पाण्याची दोन टाकी आहेत त्यातील पाणी वर्षभर रहात नाही. पिण्याचे पाणी पठारावरील धनगरवाडीत मिळेल. त्यामुळे शक्यतो सकाळी लवकर महाडवरुन निघून संध्याकाळपर्यंत हा गड बघणे हेच सोयीचे.

 सोनगडाच्या शेजारचा डोंगर

      किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरून नजर फिरवताच पश्चिमेला सावित्री नदीचे विस्तीर्ण पात्र, त्याच्या शेजारून धावणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, महामार्गालगत पसरलेले महाड शहर, उत्तरेला गांधारी नदीचे खोरे तर पूर्वेला चांभारगड किल्ला असे विहंगम दृश दिसते.

हवा स्वच्छ असताना आपण सोनगडावर असु तर उत्तर दिशेला फार मोठा पॅनोरमा नजरेला पडतो.

अगदी पश्चिम बाजुला सह्याद्रीच्या मुख्य रांगेला चिकटलेला ईटुकला मानगड, त्याच्या थोड्या पुर्वेला त्रिकोणी शिखराचा कोकणदिवा, एखाद्या भिंतीसारखा पसरलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड, थोड्या बारकाईने पाहिल्यास नगारखान्याची आणि जगदीश्वर मंदिराची वास्तु ध्यानी येते, त्यानंतर थोड्या पुर्वेला मढ्या घाट आणि वरंधा घाटाचा परिसर, मंगळगड, रायरेश्वर्,कोल्हेश्वराचे पठार, आग्नेयेला महाबळेश्वर आणि प्रतापगड. शिवाय स्वच्छ हवेत राजगड आणि तोरणा दर्शन देतात, एकाच ठिकाणहून ईतका परिसर बघायला मिळणे हे तसे अविश्वसनीय !       सोनगडाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास शिवाजी महाराजांनी ऑक्टोबर १६५७ ते जानेवारी १६५८ च्या दरम्यान जावळीच्या खोऱ्यात उतरून चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केल्यानंतर जावळीच्या खोऱ्यातील चंद्रगड, कांगोरी, मकरंदगड, सोनगड, चांभारगड हे किल्लेही स्वराज्यात दाखल करून घेतले. ह्यातील काही गड केवळ टेहळणीसाठी वापरत असल्यामुळे ते घेणे फारसे अवघड गेले नसावे पण ते घेण्यासाठी त्यांनी नेमका कुठला मार्ग घेतला ते इतिहासाला माहित नाही पण हे सर्व किल्ले नोव्हेंबर व डिसेंबर १६५७ ह्या दोन महिन्यात घेतल्याचे दिसुन येते. महाराज पन्हाळगडावर अडकले असता राजापुरच्या इंग्रजांनी विजापूरकरांना केवळ दारुगोळाच पुरवला नाही तर सिद्धी जोहारच्या सैन्यात येऊन इंग्रजी निशाण फडकावीत तोफा डागल्या त्यामुळे पन्हाळ्याच्या कोंडीतून सुटल्यावर मार्च १६६१ मध्ये एक हजार घोडदळ व तीन हजार पायदळ महाराज राजापुरास धडकले. राजापुर वखारीचा रेसिडेंट रेव्हिंग्टन व काही इंग्रजाना पकडून कैद केले. त्यातील दोन इंग्रज कैदेतच मरण पावले. या कैद्यांना महाराजांनी रायगडजवळील सोनगड येथे आणले व त्यांना रावजी पंडितांच्या स्वाधीन केले. हे कैदी काही
काळ सोनगडावर कैदेत होते. शेवटी रेसिडेंट रेव्हिंग्टन आजारी पडला तेव्हा बरे होताच परत येण्याच्या अटीवर तो १७ ऑक्टोबर १६६१ रोजी सुरतेस गेला.
पुरंदर तहात मोघलांना दिलेल्या २३ किल्ल्यात सोनगडाचा उल्लेख येतो. मात्र महाराष्ट्रात तीन सोनगड असल्याने नेमका कोणता याचा गोंधळ होतो. अर्थात यावेळी कणकवलीजवळचा सोनगड आणि सिन्नरजवळचा सोनगड शिवाजी राजांच्या ताब्यात नसल्याने, रायगडाजवळचा सोनगड महाराजांनी मोघंलाना दिला असला पाहीजे. अर्थात पुढे लगेचच दोन वर्षांनी हे सर्व गड महाराजांनी परत घेतले. यानंतर सोनगडचा उल्लेख इ.स.१८१७ मध्ये पेशवे दफ्तरात मिळतो. यात रायगड ताब्यात घेतल्यावर पेशव्यांनी सोनगड भागाचा बंदोबस्त ठेवण्यासाठी ३०० पायदळ नेमल्याची नोंद आढळते.

गांधारपाले लेणी

रायगड किल्ल्याजवळच्या दक्षीण बाजुच्या डोंगरांगेत गंधारपाले ही बौद्ध लेणी असून महाडनजीक अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या आधीच तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या डाव्या बाजूच्या डोंगरातच,गांधारपाले गावाला लागून असलेल्या टेकडीवर ही लेणी आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर असलेल्या या लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत. त्यात ३ चैत्य आणि १९ विहार आहेत. पुरातत्त्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणा-या पाय-या आहेत. ही लेणी पूर्वाभिमुख आहेत.  ही लेणी तीन थरांमध्ये कोरलेली आहेत. ही लेणी कंभोग वंशातील विष्णू पुलित या राजाने खोदलेली आहेत. पुलित राजनावावरून पाले हे नाव रूढ झालं असावं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या लेणी समूहात तीन ब्राह्मी भाषेतील शिलालेख आहेत. पहिली लेणी ही चैत्य विहार आहे. या लेणीला सात कमानी आहेत.      सहा खांब आणि ओसरी असून ओसरीच्या मागे भव्य दालन आहे. सहा खांबापैकी एक खांब पूर्णपणे कोरलेला आहे. दालनात जाण्यासाठी तीन दरवाजे असून उजेड येण्यासाठी दोन खिडक्यांची रचना केलेली आहे. मध्यभागी गर्भगृह आणि गर्भगृहाच्या शेजारी दोन्ही बाजूंना दोन दोन खोल्या आहेत. गर्भगृहाच्या मध्यभागी बुद्धमूर्ती तोरणात बसवली आहे. मूर्तीच्या आसनाखाली धर्मचक्र, हरणे, चवरीधारी आणि आकाशात उडणारे यक्ष दिसतात. दुस-या लेणीचं काम अर्धवट आहे. प्रांगण, ओसरी, दोन दर्शनी खांब आणि खोली अशी रचना आहे.     तिस-या क्रमांकाची लेणी म्हणजे एक खोली आहे. लेण्यातील खांब, स्तंभ आणि अर्धस्तंभामध्ये कोरलेले आहेत. या लेणींमधून क्रमांक चारच्या लेणीतही जाता येतं. खोली, दालन आणि ओसरी अशी क्रमांक चारच्या लेणीची रचना आहे. दालन खोलीपेक्षा मोठं आहे. दोन स्तंभ आणि अर्धस्तंभ आहेत. ओसरीच्या उजव्या भिंतीवर शिलालेख आहे. मात्र त्यातील काही अक्षरं वाचता येतात. हा शिलालेख ब्राह्मी लिपीत आहे. पाचव्या क्रमांकाच्या लेणीची रचना मंडपासारखी आहे.     ओसरीच्या आत दालन असून ओसरीत दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ आहेत. सहाव्या क्रमांकाची लेणी ही खालच्या थरावर आहे. या लेणीचं खोदकाम अर्धवट सोडून दिलं आहे. सातव्या क्रमांकाची लेणी सहाव्याच्याच लायनीत आहे. ओसरी आणि त्यामागे खोली अशी त्याची रचना आहे. ओसरीचा दर्शनी भाग कोसळला आहे. या लेण्यांमधलं सगळ्यात महत्त्वपूर्ण अशी लेणी म्हणजे क्रमांक आठची लेणी. ही लेणी एक चैत्यविहार आहे.     दर्शनी भागात दोन मोडके खांब आणि दोन अर्धस्तंभ आहेत. डाव्या आणि उजव्या बाजूला दगडी बाक असलेल्या लहान खोल्या आहेत. सध्या येथे स्तूप नाही. मात्र दगडी छत्रावली अजूनही त्या छताशी आहे. गाभा-याच्या उजव्या भिंतीवर शिलालेख आहे. नवव्या क्रमांकाचं लेणं वरच्या पातळीवर असून दालनाला दरवाजा आणि दोन खिडक्या आहेत. दहाव्या लेण्याची रचनादेखील नवव्या लेणीप्रमाणेच आहे. दर्शनी भागाची पडझड झालेली दिसते. लेणीच्या पाय-या नष्ट झालेल्या दिसतात. तळाशी चौकोनी आणि वरच्या बाजूला अष्टकोनी खांब असून खांबावरती वाळूच्या घडयाळासारखी नक्षी आहे. या लेणीला खिडकी नाही.     क्रमांक अकरा आणि बारा क्रमांकाच्या लेणी एकाच पातळीवर आहेत. ओसरी आणि दालन अशी या दोन्ही लेण्यांची रचना आहे. तेरा क्रमांकाची लेणी खालच्या पातळीवर असून या लेणीला आयताकृती दरवाजा आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला खिडक्या खोदलेल्या आहेत. दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ आहेत. या लेणीतल्या अर्धस्तंभावरही वाळूच्या घडयाळासारखी नक्षी आहे. चौदावी लेणी तेराव्या लेणीला लागून असून याची रचना खोली आणि ओसरी अशी आहे.     पंधराव्या क्रमांकाची लेणी एका कोनाडयात खोदली आहे. यात असलेला स्तूप तीन थरांत असून स्तुपाच्या दंडाकृती गोलावर नक्षी, वरच्या अर्धगोलाकृती भागावर चौकोनी हर्मिका आणि छतापर्यंत जाणारा उलटया पाय-यांचा पाच थरांचा पिरॅमिड आहे. सोळाव्या क्रमांकाच्या लेणीची रचना ओसरी, दालन आणि खोली अशीच आहे. स्तंभाची रचना इतर लेण्यांप्रमाणेच आहे. सतराव्या लेणीचं खोदकाम अर्धवट सोडून दिलं असलं तरी त्याची रचना दालन आणि ओसरी अशी असल्याचं दिसतं.      अठरा आणि एकोणीस या लेण्यांचीदेखील ओसरी आणि दालन अशीच रचना असून त्यातील खोल्यांचं काम अर्धवट आहे. विसावी लेणी ही अर्धवट स्थितीत आहे. सुरुवात करून लगेच सोडून दिलेलं दिसतं. एकविसावी लेणी हे एक चैत्यगृह असून ते समोरच्या बाजूने खुलं आहे. या लेण्यात स्तुपासाठी मध्यवर्ती खोली असून खोलीच्या उजव्या भिंतीवर आसनस्थ बुद्धाची प्रतिमा आहे. बावीस आणि तेवीस क्रमांकाच्या लेण्यांची रचना ही ओसरी आणि दालन किंवा खोली अशीच आहे.       पंचविसावी लेणी ही काहीशी वेगळी आहे, म्हणजे ओसरीच्या मागे एकच खोली असून खोलीचा दरवाजा थेट छतापर्यंत पोहोचला आहे. सव्वीस क्रमांकाच्या लेणी रचना ही सर्वसाधारण म्हणजे खोली, दालन आणि ओसरी अशीच आहे.

        सत्तावीस क्रमांकाच्या लेणीत डाव्या भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे. लेखाची लिपी ब्राह्मी आहे. समोर ओसरी, त्यामागे दालन आणि दालनाच्या मागे खोली अशी रचना आहे. दोन खांब आणि दोन अर्धस्तंभ आहेत. याचप्रमाणे अठ्ठाविसाव्या लेणीचीदेखील अशीच रचना आहे. बहुतांश लेण्यांमधील खांब हे चौकोनी आणि अष्टकोनी असे आहेत. तर काही खांबावर वाळूसारखी घडयाळंही दिसतात. लेण्यांच्या इथून महाड शहर, चांभारगड, सावित्री नदी आणि सभोवतालची हिरवी शेती आणि झाडी असा सुंदर देखावा दिसतो.

( तळटिपः- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

माझे सर्व लिखाण तुम्ही येथे वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

संदर्भः-

१) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे

२) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट

३) रायगड जिल्हा गॅझेटीयर-

४)  www.durgbharari.com   हि वेबसाईट

५)  www.durgbharari.com   हि वेबसाईट

६) आडवाटेवरचा महाराष्ट्र- प्र.के.घाणेकर

चांभारगड उर्फ महेंद्रगड ( Chambhargad )

सावित्री नदीच्या तीरावर वसलेले महाड हे एक प्राचीन बंदर होते. इ.स.पुर्व २२५ मध्ये महाडची पहिली नोंद आढळते. त्यावेळी ते महिकावती नावाने प्रसिध्द होते. ईसवी सनाच्या पहिल्या शतकात ईथे कुंभोजवंशीय बुध्दधर्मीय राजा विष्णूपुलित राज्य करत होता. महाडच्या तीन कि.मी. वर गंधारपाले लेणी व दक्षीणेस तीन कि.मी.वर कोल येथील लेणी महाडचे प्राचीनत्व सिध्द करतात. बौध्द काळापासून महाडला महा-रहाट” म्हणजे मोठी बाजारपेठ म्हणत. ( आजही आपण बाजारहाट असा शब्द वापरतो )  या पाली शब्दाचा अपभ्रंश होत पुढे महाड हे नाव झाले अशी मान्यता आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड ही या परिसरातील मोठी बाजारपेठ होती. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. सावित्री नदीचा हा मार्ग गाळाने भरून गेल्याने महिकावंती बंदर आणि दासगाव बंदर या बंदरांचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत. बंदरावरील या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड,सोनगड,महेंद्रगड उर्फ चांभारगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली.बौध्द काळानंतर महाडचा फार ईतिहास ज्ञात नाही, परंतु नंतर क्षत्रप्,सातवाहन,कोकणचे मौर्य, शिलाहार ईत्यादी राजवटींनी कोकणवर राज्य केले. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांचा अंमल असताना महाड बंदराचे महत्व खुप वाढले. पुढे बहामनी राजवटीच्या विघटनानंतर महाड परिसर आदिलशाही राजवटीच्या अंमलाखाली आला. आदिलशाही राजवटीत बहुधा महाड शहराभोवती कोट उभारला असावा. सन १५३८ मध्ये पोर्तुगीज गव्हर्नरने महाडचा उल्लेख गव्हाची मोठी पेठ असलेले शहर आणि सावित्री नदीचा उल्लेख मधुसरिता असा केला आहे. त्याकाळी महाबळेश्वरवरुन गहु आणि जंगलातील मध खुष्कीच्या मार्गाने महाडला येउन जलमार्गाने निर्यात होत असे. स.न. १६५६ मध्ये मोर्‍यांची जावळी ताब्यात घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी महाडच्या भुईकोटाची डागडुजी करुन बर्‍याचदा वास्तव्य केले, 

       अर्थात महाडबंदरातून नेण्यात येणारा माल रायगडाजवळच्या कावळ्या घाटातून आणि मढ्या घाटातून नेला जात असे. सहाजिकच महाडवरुन उत्तरे दिशेने जाणार्‍या या मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि व्यापारी तांड्याच्या संरक्षणासाठी लष्करी ठाण्याची निर्मिती करण्यात आली. यापैकी एक चांभारगड उर्फ मंहेद्रगड.

महाड, सोनगड, चांभारगड परिसराचा नकाशा
महाडकडून रायगडच्या वाटेने निघाले कि उजव्या बाजुला डोंगर लागतो, त्यावरच या चांभारगडाची उभारणी झाली आहे.  उत्तरेकडील रायगडापासून सुरु होणारी डोंगररांग चांभारगड व सोनगड ह्या गडांपाशी येऊन थांबत असल्याने स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड झाल्यावर रायगडाच्या प्रभावळीत समुद्राच्या दिशेने असलेल्या या किल्ल्यांना राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व प्राप्त झाले.रायगडच्या या दक्षीण बाजुने सिद्दीच्या आक्रमणाचा सतत धोका असल्यामुळे सोनगड व चांभारगड या किल्ल्यांच्या साखळीमुळे येथून रायगडावर सहज हल्ला करणे कठीण होते.सह्याद्रीत कुंभ्याघाटाजवळून दक्षीणेला पसरलेल्या रायगड रांगेचे चांभारगड हे शेवटचे टोक आहे.भुशास्त्रीय दृष्ट्या हि काही कि.मी. पसरलेली डाईक आहे.

        यातील चांभारगडची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे सांगणे जरी कठीण असले तरी गडावरची खांबटाकी पहाता गड शिवपुर्व काळापासूनच अस्तीत्वात असावा. रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला खाडीमार्गावरील टेहळणीचा एक महत्वाचा किल्ला होता.शिवाय नजीक असणारी गंधारपालेची लेणी हि या गडाच्या प्राचिनत्वाचा आणखी एक पुरावा.

     चांभारगडावर जाण्यासाठी महाड गाठावे. महाड बसस्थानकातून समोरच गडावरचा भगवा डौलात फडकताना दिसतो.

  महाड- पोलादपूर हायवे ओलांडून पायथ्याच्या चांभारखिंड गावात पोहोचावे. गोवा महामार्गाला लागुन असलेल्या चांभारखिंड गावाच्या मागील बाजुस असलेल्या डोंगरावर या किल्ल्याचे अवशेष पहायला मिळतात. महाड एस.टी. स्थानकापासून येथे जाण्यास २० मिनिटे लागतात.

गडावर जाण्यासाठी गावातुनच वाट आहे. गावाच्या टोकाशी असलेल्या शाळेकडून एक वाट डोंगराच्या दिशेने जाताना दिसते.

या वाटेने ५ मिनिटे पुढे आल्यावर एक लहान धरण दिसते. या धरणाच्या डावीकडील टेकाडावर चढल्यावर गडाकडे जाणारी वाट सुरु होते. गडावर फारसा वावर नसल्याने वाट मळलेली नाही त्यामुळे गडाच्या उजव्या बाजुस असलेल्या खिंडीचा अंदाज घेतच त्या दिशेने चढाई करायची.

अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आपण या खिंडीत पोहोचतो. खिंडीत आल्यावर कातळकडा डावीकडे ठेवून थोडे पुढे जावे.

येथुन वर जाणारी वाट पकडुन १५ मिनिटात भग्न झालेल्या पायऱ्यांनी आपण गडमाथ्यावर पोहोचतो.

       गडावर प्रवेश केल्यावर ४-५ भल्या मोठ्या शिळा इकडेतिकडे पडलेल्या दिसतात.

गडमाथा म्हणजे एक छोटेसे पठार असुन गडमाथ्यावर भगवा झेंडा फडकताना दिसतो.

 पठारावर थोडे फार वास्तुंचे अवशेष असुन पठारावरून सरळ उत्तरेला गेल्यावर खालच्या भागात पाण्याची ३ टाकी दिसतात.

 एका ढासळलेल्या बुरूजाशेजारून पायवाट खाली या पाण्याच्या टाक्याकडे उतरते.

टाक्याजवळ खांब रोवण्यासाठी काही खळगे कोरलेले दिसतात. खाली उतरल्यावर या टाक्याशेजारी अजुन एक पाण्याचे टाके पहायला मिळते. खडकात खोदलेली हि खांबटाकी पहाता गड पुरातन असल्याचा अंदाज करता येतो. याशिवाय गडाच्या पुर्वेला व त्याच्या विरुध्द बाजूस म्हणजे पश्चिमेला प्रत्येकी एक अशी दोन टाकी पहायला मिळतात. पठारावर आपण वर चढलो त्या खिंडीच्या दिशेला एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. गडमाथ्यावरून दौलतगड,सोनगड,मंगळगड,रायगड हे किल्ले तसेच पोटला, गुहिरी व कळकाई डोंगर इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो.


माथ्यावरून संपुर्ण महाड शहर नजरेस पडते. चाभारखिंड गावातुन गडावर येण्यास एक तास तर गड फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो.         गडावर ना मुक्कामायोग्य ना जागा ना काही खाण्याची व्यवस्था. फक्त पिण्यायोग्य पाणी आहे. तसेही महाडपासून अडीच ते तीन तासात गड फेरी होत असल्याने त्याची फार गरज नाही. पुन्हा आल्या वाटेने महाडला जाउ शकतो किंवा पुन्हा चांभारगड उतरुन खिंडीत यायचे. खिंडीतुन पलीकडे रस्ता उतरतो. या वाटेने उतरताना दोन खांब टाकी दिसतात तसेच पुढे आणखी एक टाके दिसते. ईथून तासाभराच्या चालीनंतर आपण महाड-रायगड रस्त्यावर येतो.
     चांभारगडबद्दल इतिहासात फारशा नोंदी उपलब्ध नाहीत. शिवाजी महाराजांनी इ.स. १६५६ मध्ये चंद्रराव मोर्‍यांकडून जावळी ताब्यात घेतली, त्यावेळी या चांभारगड उर्फ मंहेद्रगडाचा ताबा घेतला असा उल्लेख येतो.

कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहीलेल्या सभासदाची बखरमध्ये “नवे गड राजियांनी वसवले,त्याची नाव निशीवार सुमारी सुमार १११”. या दुर्गांच्या यादीत महींद्र्गड किंवा महिधरगड हे नाव येते. पुढे इ.स. १६७१-७२ मध्ये स्वराज्याच्या किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी जे अंदाजपत्रक तयार केले होते, त्यात महिधरगडासाठी २००० होन ईतक्या रकमेची तरतुद केलेली होती.
      पुढे संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर झुल्फीकारखान रायगड घेण्यासाठी येथे आल्यानंतर त्याने शहाजादा आलम याला लिहीलेल्या पत्रात उल्लेख असा आहे,” मी पाचाड येथे पोहचलो असून येथे रतनगडाचा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ठाणी पण उध्वस्त केली. आजही महाडच्या वाटेवर सोनगडाच्या डोंगरावर शत्रु जमले आणि त्यांनी आमच्यावर तोफांचा व बंदुकीचा मारा केला. आमच्या सैनिकांनी शत्रुना मार देत किल्ल्याच्या दरवाज्यापर्यंत रेटले”. वरील पत्रात रतनगडाचा उल्लेख आहे, तो बहुधा चांभारगडाशी संबधीत असावा. पण त्यावेळी झुल्फीखारखानाने दोन्ही किल्ले घेतले हे नक्की.         मात्र या गडाबध्दल एक मजेदार दंतकथा आहे. शिवाजी महाराजांनी रायगडावर राजधानी वसविल्यानंतर  रायगडाच्या रक्षणासाठी त्यांना परिसरात नवे किल्ले वसवायचे होते. हे काम महत्वाचे असल्याने त्यासाठी कोणावर हि जबाबदारी न सोपवता स्वतः महाराज वेष पालटून डोंगरदर्‍यात फिरत होते. एक दिवस ते फिरता फिरता चांभारखिंडीजवळच्या झोपडीपाशी आले.त्या झोपडीत एक वृध्द बाई एकटीच रहात होती. शिवाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्याबरोबरचे लोक झोपडीत शिरले आणि जेवणाची व्यवस्था होउ शकेल का? याची विचारणा केली. तीनेही मोठ्या आपुलकीने सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली. जेवणाचा बेत अगदी साधा होता, कढी आणि भात. वेषांतर केलेले शिवाजी महाराज जेवायला बसले. वृध्द बाईने आधी भात आणी मग कढी वाढली. शिवाजी राजांच्या ताटातील कढी भातातून पसरून ताटाबाहेर वाहू लागली. त्यावर ती वृध्दा महाराजांना म्हणाली, “साध कढीला पाल घालायला जमत नाही ! तुझं अगदी त्या शिवाजी राजासारखं आहे, तो एकीकडे गड-मुलुख जिंकत जातो अन दुसरीकडून शत्रु हल्ला करुन तो भाग पुन्हा ताब्यात घेतो”. म्हातारीच्या या परखड बोलण्यामुळे महाराज चांगलेच चपापले. राज्याला बळकट गडांची किती गरज आहे ते त्यांच्या चांगलेच लक्षात आले. चांभाराने पारणी टोचावी तसे त्या म्हातारीचे बोल त्या जाणत्या राजाच्या चांगलेच लक्षात राहीले. पुढे महाराजांनी त्या टेकडीवर गड उभारला व त्याला नाव दिले चांभारगड.
      अर्थातच या दंतकथेत कोणतेही तथ्य नाही. एकतर शिवाजी महाराज पहिल्यापासून किल्ल्यांचे महत्व जाणत होते,प्रत्येकवेळी मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी नवे दुर्ग उभारले, त्यासाठी अश्या कोण्या वृध्देच्या सल्ल्याची गरज नव्हती. दुसरे महत्वाचे म्हणजे चांभारगड आधीच अस्तित्वात होता, शिवाजी राजांनी त्याची उभारणी केली नाही.

      याच चांभारगडासंदर्भात आणखी एक दुर्गकथा. चांभारगडावर शिवाजी महाराजांनी एका शुर चर्मकाराची गडकरी म्हणून नेमणूक केली. शत्रु आला तर गडमाथ्यावर जाळ करुन त्याची सुचना रायगडाला देण्याची व शत्रुसैन्याचा हल्ला झाला तर प्रसंगी त्यांचा मुकाबला करण्याची कामगिरी या वीरावर सोपवली होती. अर्थात या वीरपुरुषाने त्याच्यावर सोपवलेली कामगिरी चोख बजावली. त्यावर महाराजांनी खुष होउन त्याला ईनाम देण्याचे ठरविले. त्यावर शुरपुरुष म्हणाला, ‘मला गायवाट चामड्याच्या दोर्‍याईतक्या लांबीची जमीन बक्षिस द्यावी’. अर्थातच हि मागणी महाराजांनी मान्य केली. त्याने एखाद्या कसबी कारागिराकडून बारीक दोर काढून घ्यावा आणि तो चांभारखिंडीतील एखाद्या जागी बांधून दोर तुटेल तिथंपर्यंत चालत जायचे. जिथे तो दोर तुटेल तिथपर्यंत जमीन त्या चर्मकार वीराची असे ठरले. हा दोर तुटला तो महाडच्या वीरेश्वर मंदिरापाशी. ती सर्व जमीन अर्थातच त्याच्या मालकीची झाली. या हि दंतकथेत फार अर्थ नाही.

    असे म्हणतात कि चांभारगडावर एक शिलाखंड असून त्यावर चांभारकामासाठी लागणार्‍या हत्याराच्या आकृती कोरल्या आहेत. तसेच महाडच्या चवदार तळ्याशेजारी पुर्वी चांभारतळे होते. या तळ्यातील पाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पाण्याने हत्यारांना धार लावली तर ती उत्तम लागत असे.

( तळटीप- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

चांभारगडाची व्हिडीओतून सफर

माझे सर्व लिखाण तुम्ही येथे एकत्र वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

संदर्भः-

१) सांगाती सह्याद्रीचा-यंग झिंगारो ट्रेकर्स
२) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
३) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
४) रायगड जिल्हा गॅझेटीयर-
५) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर
६) www.durgbharari.com   हि वेबसाईट
७) www.trekshitiz.com   हि वेबसाईट