प्रतापगड ( Pratapgad )

किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या देदिप्यमान इतिहासातील एक सुवर्णपान ! महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधला.सह्याद्रीच्या सपाट माथ्यावर ठाई-ठाई दुर्ग वसलेले आहेत. जगात कुठल्याही पर्वतावर एवढ्या संख्येने दुर्ग नाहीत. सह्याद्रीच मस्तक या दुर्गांनी नटलेली असल्यामुळे या परिसरातील क्षितीज रेषा चित्रकार झाल्या आहेत. सह्याद्री हिमालायाएवढा विस्तीर्ण व उत्तुंग नसला तरी वयाने वडील आहे. त्याचा भेद मजबूत आहे. संपूर्ण दक्षिणापथापर्यंत पसरलेला म्हणजेच संपूर्ण दक्षिण भारतापर्यंत पसरलेला हा सह्याद्री त्याचा उल्लेखसंस्कृत वाड्:मयामध्ये अपरांत म्हणजे ‘कोकण’ व दक्षिणपथ म्हणजे “दख्खन’ यातील सह्य प्रदेश असा आहे. या सह्याचेच पुढे सह्याद्री झाले.

दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणा यांचा एकत्रित मिलाफ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याच्या सीमा विस्तारतांना शिवरायांना विरोध करणार्‍या जावळीच्या मोर्‍यांनी उर्मटपणा करून स्वत:चा सर्वनाश ओढावून घेतला. शिवरायांनी वाघांची जावळी ऊर्फ मोर्‍यांची जावळी ऊर्फ जयवल्ली सुनियोजित हल्ला करून जावळी जिंकली. महाबळेश्‍वर ते रायगड असा विस्तृत भूभाग या विजयाने शिवरायांच्या ताब्यात आला. स्वराज्याची सीमा समुद्राला भिडली. शिवरायांची दृष्टी कोयनेच्या खोर्‍यात असलेल्या पार गांवाजवळ असलेल्या एका डोंगरावर गेली. त्या डोंगराचे मूळ नाव ‘रान आडवा गौर’ असे आहे. तसेच “ढोळपाळाचा डोंगर” असाही उल्लेख आढळतो. लोक त्यास ‘भोरप्याचा डोंगर’ म्हणत या भागाचे महत्व ओळखून पारघाटांवर नजर ठेवण्यासाठी या डोंगरावर एक भक्कम दुर्ग बांधला तो म्हणजे प्रतापगड होय. प्रतापगडाचे बांधकाम हे मोरोपंत पिंगळे यांनी केले. महाराजांनी स्वत: बांधलेला हा दुसरा दुर्ग. प्रतापगडाने उभ्या आयुष्यात एक महत्वाचे कार्य मात्र केले ते म्हणजे अफजलखानाचा वध. प्रतापगडाने आपले नाव सार्थक केलेल. शिवरायांनी आपल्या राज्य साधनेच्या प्रयत्नात जी काही युध्दे केली त्यामध्ये प्रतापगडाच्या युध्दाचे महत्व अनन्यसाधारण आहे.

या प्रसंगात स्वराज्य आणि त्याचा जनक या दोघांचे जिवीत पणाला लागले होते. या लढाईमध्ये शिवरायांनी निवडलेले युध्द क्षेत्र, तहाची बोलणी चालवून आपल्या हेतूची पुसटशीही कल्पना न येऊ देता चालवलेले मंत्रयुध्द, जावळीच्या जंगलात लपवलेले सैन्य व त्यांच्या सुनियोजित हालचाली, भेटीची जागा, वेळ, दिवस या गोष्टींचा बारकाईने विचार केला तर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे महाराजांची असामान्य प्रज्ञा. ज्ञात इतिहासामध्ये आतापर्यंतच्या अग्रगण्य लढाया लढल्या गेल्या त्यामध्ये प्रतापगडाची लढाई अव्वल दर्जाची आहे, असे सर्व लष्करी तज्ञांचे, जाणकारांचे आणि देशाच्या सेनानींचे ही मत आहे. पाच पातशाह्याच्या अंगणात स्वराज्याचे रोपटे लावणारे शिवराय. देव, देश, धर्म, भोसले वंशाचा कट्टर शत्रू बलाढ्य मातब्बर सरदार अफजलखान आणि दुसर्‍या बाजूला रूद्रभिषण प्रतापगडाची जावळी. या खोर्‍याच्या दक्षिणेला व उत्तरेला उंच उंच पर्वत व पश्‍चिमेला खोल दर्‍या. सह्याद्रीच्या मगरमिठीत प्रतापगडावर येण्याची चूक केली अफजलखानाने. त्याची किंमत त्यास मोजावी लागली. पसरणीचा घाट, रडतोंडीचा घाट, पारघाट, जावळी उर्फ जयवल्लीच्या जंगलात अफजलखानाचा पुरता बिमोड झाला. प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोंव्हेंबर १६५९ रोजी भोसले व्देष्टा अफजलखान ठार मारून धुळीस मिळविला. आदिलशाही सैन्याचा फार मोठ्या प्रमाणावर पराभव झाला आणि नवनिर्मित स्वराज्याचा आत्मविश्‍वास गगनाला भिडला गेला.
विमानातून पाहिल्यास किल्ल्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो.

प्रतापगडाच्या इतिहासात डोकावल्यास १६५६ मध्ये चंद्रराव मोऱ्याचा पराभव करुन महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर तिथले किल्लेही महाराजांनी जिंकले. त्यावेळी जावळीच्या खोऱ्यात पारघाटाच्या तोंडावर व रडतोंडी घाटाच्या नाकावर भोरप्या डोंगर एखाद्या रखवालदारासारखा उभा होता. शिवाजीमहाराजांनी जावळी खोरे जिंकल्या नंतर मोरो त्रिंबक पिंगळे यांनी २४ सप्टेंबर १६५६ मध्ये भोरप्या डोंगरावर हा बुलंद व अभेदय किल्ला बांधून पुर्ण केला असे चिटणीसाची बखर माहिती देते. यातील उल्लेख असा आहे, ‘प्रतापगडी मेट मेढा बांधीले होते.ते जागा फार चांगली पाहून किला वसविला, त्याचे नाव प्रतापगड ठेविले.’ ( पृष्ट क्रमांक- ५५) पण जुन्,जुलै, ऑगस्ट या कालावधीत या परिसरात पड्णारा पाउस लक्षात घेता हि माहिती योग्य वाटत नाही. याकाळात ईथे बांधकाम करणे अशक्य वाटते. कदाचित २४ सप्टेंबर रोजी येडका बुरुजाकडून किल्ला बांधण्यास सुरवात केली आणि १६५८-५९ रोजी बांधकाम पुर्ण झाले असावे.शिवाजीमहाराजांनी गडाच्या उभारणीमध्ये विशेष लक्ष दिले होते. नदीच्या परिसरातील प्रदेशाचे संरक्षण करता यावे आणि येथील घाटमार्गांवरून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण असावे, हा मुख्य उद्देश समोर ठेवून गडाची उभारणी करण्यात आली होती.
प्रतापगडचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव ह्यांची नेमणूक केली. इ.स १६५९ साली अफजलखान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. चढे घोडियानिशी त्या डोंगरातल्या उंदराला पकडून आणीन ! जिंदा या मुर्दा !’ अशा वल्गना करीत निघालेला अफजलखान, तुळजापूरच्या भवानीला अन् पंढरपूरच्या विठ्ठलाला उपद्रव देत, स्वराज्याकडे धावला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोऱ्यात आणले. १० नोव्हेंबर १६५९ म्हणजे मार्गशीर्ष शु.७ शके १५८१ रोजी शिवरायांची फत्ते झाली. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केल्यावर महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली पण जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. दूपारी २ वाजता शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून दिला. स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. जगाच्या इतिहासात जी अनेक युद्ध झाली त्यातील एक अप्रतीम युद्ध इथे झाले. भौगोलिक परिस्थितीचा फायदा स्वतःच्या बाजूने करुन घेऊन शिवाजीराजांनी त्याच्यापेक्षा काही पटीने बलाढ्य अशा आदिलशाही सेनेचा पूर्ण पराभव केला. प्रतिस्पर्ध्याला काही सुगावा लागु न देता काही तासांच्या लढाईत सगळे संपवले गेले. ह्यावेळी शिवाजीराजाकडे अंदाजे सात हजारांचे सैन्य असेल. ह्या युद्धाने आदिलशाहीला खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर राजांनी आदिलशाहीवर केलेल्या चौफेर आक्रमणाने उलटवार करण्याचे त्यांचे बळच खचले. प्रतापगड हा शिवशाहीचा भाग्यमणी ठरला. अफझलखानवधाने राजांचे नाव हिंदुस्थानभर झाले आणि खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया मजबूत झाला. इ.स. १६६१ मध्ये महाराजांनी गडावर मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते महिषासूरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली. छत्रपती राजारामसुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आले. पेशवाईत नाना फडणीसाने येथे सखाराम बापूस काही दिवस नजरकैदेत ठेवले होते (१७७८). पुढे ज्यावेळी नाना फडणीसाविरुद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले तेव्हा नानाने १७९६ मध्ये काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला. १८१८ च्या ब्रिटिश-मराठे युद्धानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. सन १६५७ मधे हा गड बांधल्यापासून ते सन १८१८ मधे इंग्रजांनी तो जिंकेपर्यंत तो अजिंक्य राहिला. ह्याला एकच अपवाद होता तो म्हणजे १६८९ साली काही महिने तो मुघलांकडे गेला होता. पण त्यावेळीही तो जिंकून घेतला नव्हता व लगेच परत मराठ्यांनी इ.स. १६९० मध्ये सातारा येथे मोंघलांचा दणदणीत पराभव करुन रामचंद्रपंत व शंकराजीपंत यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तो जिंकुन घेतला.
इ.स. १८६२ मध्ये ईंग्रज सरकारने डोंगरी किल्ल्याचा जो तक्ता तयार केला त्यात असे लिहीले आहे कि, ‘प्रतापगड किल्ला अतिशय बळकट असून, आत पाणी विपुल आहे व आत सातार्‍याच्या पोलिस खात्यापैकी १० शिपायांचे एक ठाणे आहे. ‘
स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ मी. उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने येथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे.बिकट वाट, दाट गर्दझाडी, उंच कडे, खोल-खोल दर्‍या अशा नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीने प्रतापगड नटला आहे. समसुद्रसपाटीपासून सुमारे 1080 मीटरवर हा किल्ला महाबळेश्‍वर पासून अवघ्या 21 कि.मी. अंतरावर आहे. गडावर महादरवाजा, भवानी मातेचे मंदिर, अफजल्या बुरूज, तलावाचा बुरूज, रहाट तलाव, महाव्दार माची, केदारेश्‍वर मंदिर, श्री शिवरायंचा पुतळा इ.वास्तू आहेत. सर्व बाजूंनी तटबंदिने बंदिस्त असलेला प्रतापगड शिवरायांच्या दुर्ग रचनेचे उत्तम उदाहरण आहे.

कसे जाल :-

रस्त्याने
1) पुणे – महाबळेश्वर हे अंतर १२० किमी आहे.
महाबळेश्वर – प्रतापगड : 22 किमी आहे
2) मुंबई – पुणे – महाबळेश्वर हे अंतर २६० किमी आहे.
महाबळेश्वर – प्रतापगड : 22 किमी आहे
3) मुंबई – प्रतापगड ( मार्गे गोवा महामार्ग – पोलादपूर) २१८ किमी आहे.
रेल्वेने
सातारा हे महाबळेश्वरला जवळचे रेल्वेस्टेशन आहे. सातारा – महाबळेश्वर ५७ किमी आहे.
प्रतापगड सातारा जिल्यातील गिरीदुर्ग आहे. सह्याद्रीच्या रांगेत जावळीच्या खोऱ्यात दाट जंगलामध्ये प्रतापगड किल्ला बांधलेला आहे.बिकट वाट, दाट गर्दझाडी, उंच कडे, खोल-खोल दर्‍या अशा नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीने प्रतापगड नटला आहे. समसुद्रसपाटीपासून सुमारे 1080 मीटरवर हा किल्ला महाबळेश्‍वर पासून अवघ्या २२ कि.मी. अंतरावर आहे. प्रतापगडाच्या पूर्वेस महाबळेश्वर पठार आणि घनदाट जंगल आहे. पश्चिमेकडे पार घाट आणि कोकण परिसर आहे.
महाबळेश्वर येथुन महाडला जाणारी गाडी कुंभरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. प्रतापगडावर असणाऱ्या सोयीसुविधा यामुळे किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. महाबळेश्वरवरुन सुटणारी पर्यटन स्थळांचे दर्शन घडवणारी बस आपल्याला थेट प्रतापगडावर सोडते.महाबळेश्वर बस स्थानकातून सकाळी ९.१५,९.३० व ९.४५ अश्या आहेत. अर्थात पर्यटकांना सोडून या बस लगेच परत येत असल्यामुळे सोयीच्या नाहीत, येताना तंगडतोड करत कुंभरोशीपर्यंत परत यावे लागते. महाबळेश्वर बस स्थानकाचा संपर्क क्रमांक- ( 02168 ) 260485.
दुसरा पर्याय म्हणजे महाबळेश्वरहून पोलादपूरला जाणारी एस.टी. (बस) कुंभरोशी म्हणजे वाडा गावाजवळ आपल्याला सोडते. तेथून प्रतापगडला जाता येते. आपले स्वतःचे वाहन घेवून गेल्यानंतर आपण गडाच्या पायथ्यापर्यंत जावू शकतो. गडाच्या पायथ्याजवळ वाहनतळ आणि इतर व्यवस्था आहेत. किल्ल्याची चढाई जास्त अवघड नसून, पायथ्यापर्यंत आपण वाहन घेऊन जावू शकतो. एकुण गड निवांत आणि व्यवस्थित बघायचा असला तर स्वताच्या वाहनाने गेलेलेच उत्तम.

नकाशा सौजन्य श्री. साईप्रसाद बेलसरे

अर्थात या वाटा झाल्या पर्यटकांसाठी. अस्सल डोंगरभटक्यांसाठी काही अंगातील रग जिरवणार्‍या, जावळीच्या अजूनही घनदाट जंगलाचे दर्शन घडवणार्‍या डोंगरवाटा आहेत.
१) रडतोंडीचा घाट- महाबळेश्वरवरुन मुंबईकडे जाणार्‍या डांबरी रस्त्याने निघाले की आंबेनळी घाटाच्या एका वळणावर एक वाट सुळकन खाली उतरुन प्रतापगडाकडे दाट झाडीतून जाते.हाच एतिहासिक रडतोंडीचा घाट.
२) निसणीची वाट- महाबळेश्वरच्या लॅडविक पॉईंटवरुन एक वाट दरे गावात उतरते , त्या वाटेने किंवा बरोबर एखादा स्थानिक जाणकार असेल तर निसणीच्या वाटेने कोयनेच्या खोर्‍यात उतरुन चंद्रराव मोर्‍यांचे जावळी गाव पाहून प्रतापगड गाठता येतो.
३) प्रतापगडाच्या दक्षिण पायथ्याशी पार नावाचे गाव आहे. तिथे रामवरदायीनी देवीचे मंदिर आहे. ईथून झाडीभरल्या डोंगरवाटेने आपण थेट अफझलखानाच्या थडग्यापाशी पोहचू शकतो.
४) पोलादपुरला उतरुन किनेश्वर गावातून पार घाटाने पार गावात जायचे आणि तिथून प्रतापगड असाही एक पर्याय आहे.

कोणत्याही मार्गाने प्रतापगडावर पोहचलो कि आधी डाव्या हाताला दिसते अफझलखानाची कबर. गडाच्या खाली डाव्या हाताला दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गाशरीफ म्हणजे अफजलखानाची कबर.अर्थात गेली काही वर्षे येथे प्रवेश बंद केला आहे.
गडाची माहिती घेण्यापुर्वी आपण या अफझलखानाच्या कबरीची माहिती घेउया. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी अर्थात १० नोव्हेंबर १६५९ हा दिवस अफझल खानाच्या भेटीसाठी महाराजांनी मुक्रर केला. अंगरख्याखाली चिलखत, पागोट्याखाली शिरस्त्राण आणि हातात वाघनखे घालून प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाचा कोथळा बाहेर काढला. दगाबाज खानासह त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा आणि वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचाही खातमा केला. पण शत्रूच्या मृत्यूनंतर वैर संपते असे मानणाऱ्या महाराजांनी अफझलखानाचा दफनविधी करून त्याची कबर बांधली. इतकच नाही तर कबरीच्या देखभालीसाठी तरतूदही करून ठेवली. ती कबर आजही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जे महत्वाचे प्रसंग घडले त्यातला सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे अफझलखानाचा शेवट. जर कोणी पराक्रमाचा पुरावा विचारला तर या कबरीच पराक्रमाच्या प्रतिक आहेत. पण हाच पराक्रम उद्धवस्त करण्याचा कोणाचा डाव तर नाही ना ? अशी शंका आजही येते. कारण या कबरीचा आकारच महाराजांच्या भव्य पराक्रमाची साक्ष देतो.
सन १८८३.तत्कालिन ब्रिटीश अधिकारी ग्रँड डफ याने महाबळेश्वर परिसरात फिरतानां प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफझल खानाच्या कबरीची दखल घेतली, त्याला या कबरींचे महत्व लक्षात आले. त्याने १९०५ साली छत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतिक बनलेल्या या कबरींचे संवर्धन करण्याची अधिसूचना काढली. या कबरीची नासधूस करणाऱ्यास पाच हजार रूपये दंड आणि तीन महिन्याची शिक्षा करणारा कायदाच केला. पुढे १९१८ साली तत्कालीन कलेक्टर बी ए ब्रॅडन यांनी वनखात्याच्या मालकीची २७ गुंठे जमीन “अफझल खान टोंब” या नांवाने वर्ग केली. पण ती जमीन नेमकी कोणाला केली याची नोंद आढळत नाही. ब्रिटीश सरकारने पुढे २३ नोव्हेंबर १९२३ रोजी “अफझल तुर्बत फंड ” स्थापन केला. त्यामार्फत कबरीची देखभाल होऊ लागली. त्यामध्ये महालकरी (तहसिलदार) आणि पोलिस अधिकाऱ्यांसह चार-पाच ट्रस्टींची नेमणूक करण्यात आली.
१९५२ साली “अफझल तुर्बत ट्रस्ट” स्थापन करण्यात आला. तो पुढे १९५९ ला रद्दही करण्यात आला. या ट्रस्टमधला एक ट्रस्टी गुलाम जैतुल आबेदिन इमामत हा पाकिस्तानात गेला. पण या घडामोडी सुरू असतानाच २० ऑक्टोबर १९६२ साली “ हजरत मोहमद अफझल खान मेमोरियल सोसायटी” या नवीन संस्थेला मुंबईच्या धर्मदाय आयुक्तानी परवानगी दिली. ७३, मेमनवाडा, मुंबई या पत्यावर नोंदणी झालेल्या संस्थेत महमद हुसेन हे सेक्रेटरी तर इम्तियाज कादर, सलिम पटेल, सलिम भाई, आणि युसुफ पटेल हे ट्रस्टी म्हणून कार्यरत होते. या संस्थेने कबरीभोवती अनेक बांधकामे सुरू केली. या ठिकाणी गँगस्टर हाजी मस्तान यानेसुद्धा इथल्या बांधकामानां देणगी दिल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे त्या त्या सरकारच्या काळात जमीनी आणि बांधकामानां परवानग्या मिळत गेल्या. पण पुढे खऱ्या अर्थाने वादाला सुरूवात झाली ती बाबरी मशिद पाडल्यानंतर. कबरीच्या भोवती झालेल्या बांधकामाना हिंदुत्ववादी संघटनानी आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. कबरीचे उदात्तीकऱण रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनाची आंदोलने सुरू झाली. त्यातूनच २००४ साली सातारा जिल्ह्यातील पाचवड इथं मोठी दंगल झाली होती. त्यावेळेच्या विधानसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड सुरू होती. हिंदूत्ववादी संघटनानी विजयोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतर प्रचंड मोठी दंगल आणिँ लाठीचार्ज झाला होता. हा अगाऊपणा कऱणाऱ्या नेत्यानां पोलिसानी चांगलेच सोलटून काढले होते. त्यानंतर या आंदोलनाने आजअखेर पुन्हा डोके वर काढले नाही.

तत्कालिन प्रशासनाने अफझल खानाच्या कबरीच्या वादाबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींची एकदा सहलही घडवून आणली होती. त्यानंतर माध्यमांतून वस्तूस्थिती सांगणाऱ्या बातम्या येवू लागल्या. त्यामुळे हिंदूत्ववादी संघटनांची गोची झाली होती. पण पाचवडच्या दंगलीवेळी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी पत्रकारांवर वचपा काढायचा प्रयत्नही केला होता.
खर तर संबधित ट्रस्टीने या कबरीचे उदात्तीकरण केल यात शंका नाही. संस्थेची स्थापना करतानाच ट्रस्टीनी चालूपणा केला होता. हजरत म्हणजे ‘संत’ आणि ‘मोहमद’ म्हणजे इस्लामचे अंतिम प्रेषित…या दोन शब्दांचा खोडसाळपणे आणि जाणिवपूर्वक वापर केला. जेणेकरून त्याला धार्मिक भावनां जोडल्या जातील, मुळात १०० वर्षापूर्वीची कागदपत्रे तपासली की कांहि हिंदू धर्मीय लोक मुलगा व्हावा म्हणून देवाला नवस बोलतात तसा या कबरीला कागदी पाळणा वाहण्याची प्रथा होती. तसेच खानाचा उरूस साजरा केला जायचा. त्यामुळे इतिहासापेक्षा वर्तमान वेगळाच होता. याचाच फायदा उठवत कबरीचे उदातीकरण सुरू झाले होते. त्यामध्ये वन विभागा इतकाच पुरातत्व विभागसुद्धा याला दोषी आहे. खरा इतिहास काय आहे हे ज्यांनी सांगायचे ते या वादापासून पळ काढत आहेत.
अफझलखानाच्या मुळ कबरीचे स्वरुप

द ब पारसनीस यांनी १९१६ मध्ये लिहलेल्या महाबळेश्वर या इंग्रजी पुस्तकात कबरींवर कौलारू छप्पर असल्याचे छायाचित्र आहे. इतिहासतल्या नोंदी आणि संशोधनांची सांगड घालून कबरीं संदर्भात सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. पण याबाबत कोणी गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यासंबधी सरकारने एकदा माहिती मागविली होती. पण पुरातत्व खात्याने स्पष्टपणे अहवाल न देता चालढकल केली आहे.
दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी या कबरीच्या उदात्तीकरणाबरोबर या परिसरात अतिरेक्यानां प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप सुरू केला होता. त्याबरोबर कबर उद्धस्त करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे सातारा पोलिस प्रशासनाला २४ तास बंदोबस्त नेमावा लागला. गेल्या अनेक वर्षापासून ८-१० पोलिस या कबरीच्या संरक्षणासाठी तैनात असतात. आजही ऊन, वारा आणि पावसात पोलिसांना जागता पहारा करावा लागत आहे. राज्यातला उच्चांकी पाऊस आणि अंग गोठवणारी बोचरी थंडी यामध्ये पोलिसांचे आतोनात हाल होत आहेत. पण त्यांची दखल घ्यायला कोणी तयार नाही. कबर उद्धवस्त करण्याच्या धमक्या देणाऱ्यानीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून समजून घेतला पाहिजे. कबरीचे उदात्तीकरण रोखलेत पाहिजे. त्यासाठी कबरच उद्ध्वस्त करण्याचा इशाराही गैरच आहे. विशेषतः २००४ पासून कडेकोट बंदोबस्त नेमण्यात आला.

PHOTO_20161024_125440.jpg

या कबरीच्या परिसरात अनेक इमारती अतिक्रमण करून बांधण्यात आल्या. त्यामुळे वन जमीनीवर बेकायदेशीरपणे उभारलेली बांधकामे हटविण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. पण वन विभागाने कोणताही कारवाई केली नव्हती. त्याविरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली होती. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ही अतिक्रमणे तत्काळ न हटविण्यात आल्यास तेथील वन अधिकाऱ्यांना वनात पाठवू, असा इशारा दिला आहे. आता या इशाऱ्यामुळे वन विभागाला आता कारवाई करावीच लागेल, आणि ती गरजेचीसुद्धा आहे. कारण या अतिक्रमणांच्या विळख्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही झाकला जातोय. गेल्या १५-१६ वर्षापासून या परिसराला १४४ कलम लागू केल्यामुळे कबरीच्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे. त्यामुळे नव्या पिढिला हा इतिहास सांगायचा तरी कसा असा प्रश्न आहे.
सरकारने ही सर्व मालमत्ता ताब्यात घेतली पाहिजे. तसेच अतिरिक्त बांधकामे पाडून अफझलखानाची कबर पाहण्यासाठी खुली केली पाहिजे. त्याठिकाणी सरकारने अधिकृत इतिहास सांगणारे एक दालन उभे केले पाहिजे.

विमानातून अथवा हेलिकॉप्टरमधून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार पंख पसरलेल्या फुलपाखरासारखा दिसतो. महाराष्ट्रातील इतर गडांपेक्षा प्रतापगडास भक्कम आणि आज ही चांगल्या अवस्थेत असलेली तटबंदी आहे. मुख्य किल्ला, माची आणि बालेकिल्ला असे या किल्ल्याचे तीन भाग होतात. मुख्य किल्ला व बालेकिल्ला भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३,६६० चौ. मी., तर मुख्य किल्ल्याचे ३,८८५ चौ. मी असून दक्षिणेकडील बुरूज १० ते १५ मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी अफझल, रेडका, राजपहारा, केदार इ. बुरुजांचे अवशेष टिकून आहेत. अफझल बुरूज हा वैशिष्ट्यपूर्ण असून तो निमुळत्या डोंगर धारेच्या शेवटी आहे. या भागाला माची म्हणतात. कारण अशाच स्वरूपाचे बांधकाम राजगड (सुवेळा व संजीवनी), तोरणा ( झुंजार) या किल्ल्यांवरील माच्यांना आहे.

किल्याचा दरवाजा जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. दरवाजा दोन बुरूजा मध्ये लपवला आहे. शत्रू पासून दरवाजा सुरक्षित करण्यासाठी सुरक्षा चोख आहे. त्या काळी जर शत्रू दरवाज्याजवळ पोहोचलो तर त्यांना थोपवण्यासाठी आतील बाजूस तोफ, किल्याच्या वरच्या बाजूने बाणांचा मारा आणि त्या सोबत बुरूजातून तेल सोडण्यासाठी चिरे सोडले आहेत. किल्ल्यावरचा बाजूला एक चौकट आहे. जर शत्रू दरवाजा जवळ आलाच तर तेथून अग्निबाणाचा मारा करता येतो. आजही दरवाजा मजबूत स्थितीत आहे. शिवकालीन परंपरेप्रमाणे आजही किल्ल्याचा दरवाजा रात्री आठ वाजता बंद होतो. दरवाजा वर दोन्ही बाजुला सिंहाचे चित्र कोरलेले आहे.

किल्ल्याचा सुप्रसिद्ध टेहळणी बुरूज लांबलचक पसरलेला आहे त्याचे शेवटचे टोक आकाशात घुसल्यासारखे वाटते. पावसाळ्यात पूर्ण गड धुक्यात नाहुन निघतो. त्यावर झेंडा मानाने फडकत आहे.

याच बुरूजा खाली आता वहानांच्या पार्किंगची सोय आहे.

या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरूज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो. प्रतापगडाचा नकाशा
प्रतापगडाचा नकाशा

येथून गडावर जाताना उजव्या बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत जागोजागी जंग्यांची रचना केलेली आहे. जंग्या म्हणजे तटबंदीत बनवलेली छिद्र, यात बंदूकी किंवा धनुष्य बाण ठेऊन शत्रूवर मारा केला जात असे. जंग्यांची रचना अशी असते की, गडावरून सुरक्षित राहून शत्रूवर सहज मारा करता येतो, पण शत्रूला खालून मारा करता येत नाही. जंग्यांच्या अशा रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे येणारा शत्रु, बंदुकीच्या व बाणांच्या टप्प्यात रहात असे. प्रतापगडाच्या प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूस गुहा आहे. वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. प्रतापगडाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शिवकालाप्रमाणे आजही महादरवाजा सूर्यास्तानंतर बंद केला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. या महाद्वाराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, तोफांचा मारा थेट दरवाजावर करता येऊ नये. जमिनीपासून उंचावर असल्यामुळे व दरवाजासमोर पायऱ्या असल्याने हत्ती किंवा ओंडक्यांनी धडका देवून दरवाजा तोडता येत नसे. महाद्वाराच्या आतील बाजूस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत.

प्रचंड तोफ

यातील उजव्या बाजूच्या देवडीत एक तोफ ठेवलेली आहे. महाद्वारातून आत आल्यावर समोरच लांबवर पसरलेली माची आणि चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. टेहळणी बुरुजावरुन प्रतापगडाच्या माथ्याचे दृष्य
टेहळणी बुरुजावरुन प्रतापगडाच्या माथ्याचे दृष्य
टेहळणी बुरुज : गडाच्या पायथ्याकडून महादरवाजाकडे जात असताना एक वाट टेहळणी बुरुजाकडे जाते. टेहळणी बुरुजावरून जावळीच्या खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य पाहता येते. याठिकाणी असलेला ‘भगवा ध्वज’ परिसरात दुरूनच दिसतो.
ह्या टेहळणी बुरुजाला चिलखती तटबंदी आहे म्हणजे मुख्य बुरुजाच्या भोवती आणखी एक चर्या बांधली आहे.तिथे जायला दरवाजे आहेत.इथे अधिकच्या संरक्षणात सैन्य तैनात करणे शक्य होत असे.जरुर जाउन पहावे असे हे दुर्गवैशिष्ट्य आहे.

या माचीवरील वाट टेहळणी बूरुजावर जाते. या बुरुजावर ध्वजस्तंभ असुन या बुरुजाखालीच वहानतळ आहे. बुरुजावरून प्रतापगडाचा बालेकिल्ला, जावळीचे खोरे व उजव्या बाजूला एका उंचवट्यावर असलेली अफजलखानाची कबर दृष्टीपथात येते.

इ.स. २०११ साली जिवा महाल बुरुजाच्या ( टेहळणी बुरुज) जवळ तट्बंदीच्या खाली ४० फुटावर चोर दरवाजा सापडला. पुण्याच्या मायभवानी संस्थेच्या श्री. आनंद उतेकर यांच्या नेतॄत्वाखाली उत्खनन केल्यावर ५ फुट उंच आणि ३ फुट र्रुंदीचा हा दरवाजा महादरवाज्यानंतर लगेचच दिसून आला. या दरवाज्या शेजारी अडीच फुट ऊंचीचे हनुमानाचे शिल्प दिसून आले.
टेहळणी बुरुज पाहून परत किल्ल्याच्या महाद्वारापाशी यावे. येथून पायऱ्याची वाट गडावर गेली आहे.

या वाटेच्या डाव्या बाजूस सध्या वापरात नसलेली वाट, दूसरा आणि तिसरा दरवाजा आहे.

दोन्ही दरवाजांवर शरभाच्या प्रतिमा दिसतात.

हा तिसरा दरवाजा ओलांडून आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो.

पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण श्रीभवानी मंदिरात पोहोचतो. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे.

प्रतापगडावरील शिवाजी महराजांनी स्थापन केलेली तुळजाभवानीची मुर्ती व समोर काचपेटीत स्फटीकाचे शिवलिंग

अतिभंग अवस्थेतील हि अष्टभुजा महिषासुरमर्दानीची अतिशय देखणी मुर्ती आहे.देवीच्या उजव्या बाजुस सुर्य, डाव्या बाजुस चंद्र आणि मस्तकी शिवलिंग आहे. डाव्या हातात शंख, ढाल, धनुष्य आहे व एका हाताने महिषासुराची शेंडी पकडली आहे. देवीच्या उजवीकडील हातात खडग, बाण व चक्र आहे. एका हातातील त्रिशुळ महिषासुराच्या शरीरात खुपसले आहे. ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. भवानीची मूर्ती घडवण्यासाठी लागणारा दगड आणायला मंबाजी नाईक पानसरेना नेपाळ नरेश राजा लीलासेनकडे पाठवले होते. या मुर्तीचे प्रथम राजगडी आगमन झाले व नंतर तिची प्रतिष्ठापना मोरोपंताच्या हस्ते प्रतापगडी करण्यात आली. मोरोपंत पेशवे याने ललित पंचमीचा सुमुहूर्त गाठून देवीची स्थापना केली. या मूर्तीशेजारीच शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग आहे. जर उजेडात शिवलिंग किंवा बाण नीट निरखला तर त्यात बेलाचे व निरगुडीचे पान व शांळूखेतील गंगा दिसते. भवानी देवीच्या डाव्या हाताला एंद्रीय भवानीची प्राचीन मुर्ती दिसते.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. मंदिरात असलेल्या हंबीरराव मोहितेंच्या तलवारीवर सहा ठिपके आहेत. त्या तलवारीने सेनापतींनी युद्धात सहाशे लोकांचा खात्मा केला होता अशी आख्यायिका आहे. भवानी देवीचे मूळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्याचे होते. १८२० साली सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी इ.स.१८१८-३९ तेथे लाकडी मंडप बांधला. औरंगजेब दक्षिणेत आला असता या मंदिरास उपद्रव झाला आणि हा मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना असुन यांचा १९३५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला.मुर्तीची स्थापना होऊन जेव्हा ३६५ वर्ष झाली आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने ३६५ मशालीने पुर्ण प्रतापगड रात्रीच्या वेळेस उजळून निघाला होता. त्यावेळेस इतिहास प्रेमींनी गर्दी केली होती .

पाण्याचे घंगाळ व दगडी समई

श्रीभवानी मंदिराच्या आवारात ५ ते ६ छोट्या तोफा पाहायला मिळतात. गडावर वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या तोफा या मंदिरात आणून ठेवल्या आहेत. त्यात वाहून नेता येणारी तोफ आहे. त्यात खडक फोडणारी कुदळ सुद्धा दिसते.
 


मंदिरासमोर दगडी दिपमाळा आहेत. देवळाबाहेर मोठी दीपमाळही पाहण्यासारखी आहे. ह्या दीपमाळेवरच्या खुंट्या हत्तीच्या डोक्याच्या आकाराच्या आहेत. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. त्यानंतर सन १६७४ मध्ये राज्याभिषेकासमयी शिवरायांनी देवीला सोन्याची छत्री अर्पण केली होती. दुर्भाग्यवश सन १९२९ मध्ये देवीचे दागिने व ही सोन्याची छत्री चोरीला गेली.


  प्रतापगडाचा दक्षिण बुरुज

दक्षीण बुरुजच्या आत असलेले तळे.

मंदिरामागील पायवाटेने आपण गडाच्या टोकावर असलेल्या तळे व तटबंदीत असलेला चोर दरवाजा पाहू शकतो.या तलावातील पाणी गडावरच्या देवताच्या स्नानासाठी राखून ठेवले आहे.

ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते. मंदिरापासून शे-दोनशे पायऱ्या चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथून बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या दरवाज्यावर ‘श्रीराम’ अशी अक्षरे दिसतात.
बालेकिल्ल्याच्या दरवाज्यावर ‘श्रीराम’ अशी अक्षरे दिसतात.

या दरवाजावर देखील शरभाच्या प्रतिमा आहेत. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. हा किल्ला बांधला जात असताना जाईच्या मांडवाखाली एक शिवलिंग सापडले व त्याची स्थापना ह्या मंदिरात केली गेली. गडाच्या उत्तरेकडील तटबंदीमध्ये आणि केदारेश्वर मंदिरामागील तटबंदीमध्ये चोर दरवाजे आहेत.
नैऋत्य तलाव

नैऋत्य तलाव
माथ्यावर देवळासाठी व पिण्यासाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी लहानसा बांधीव तलाव आहे. असे आणखी काही पाणीसाठेही गडावर आहेत. तेथूनच किल्ल्यात राहणार्‍या लोकांना पाणी पुरवठा होतो. किल्याला किती जरी महिने वेढा पडला तरी पाण्याचा कमी होणार नाही याची दूरदृष्टी महाराजांना होती हे दिसून येते.


राजसदरेची जागा
राजसदरेची जागा

या मंदिरासमोरील पडीक चौथरा प्रशस्त सदरेचा असून कित्येक महत्वाचे निर्णय, न्यायनिवाडे, मसलती या सदरेतच झाल्या. केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस वाड्याचे अवशेष आहेत. बालेकिल्ल्यावर एक शाळा असुन त्याच्याजवळ वेताळाचे मंदिर आहे.

येथे उजवीकडे बागेच्या मधोमध शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५ मी. उंचीच्या भव्य अश्वारूढ पुतळयाची उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने तेथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे. या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. स्मारकाची देखरेख सातारा जिल्हा परिषद करते आणि बगीच्याची देखरेख वन विभाग करते. महाबळेश्वर मध्ये जे प्रवेश शुल्क घेतात त्यातील काही हिस्सा इथे वापरला जातो.
शिवाजी महाराज आरूढ असलेल्या घोड्याचा एक पाय हवेत आहे. त्याचा अर्थ अश्वारुढ योद्धा आजारपणात मृत्यु पावला असा होतो. घोड्याचे दोन पाय वरती असतील तर शहीद आणि चारही पाय जमिनीला टेकले असतील तर वार्धक्या मुळे मृत्यु पावला असा होतो.या पुतळ्याच्या कोरीवकामात एक चुक झालेली दिसते. शिवाजी महाराजांच्या हातात जी तलवार आहे ती बाकदार आहे तर कंबरेला जे म्यान आहे, ते सरळ आहे.अर्थात त्यात तलवार बसणे शक्यच नाही.
या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे.

रेडका बुरुज

गडाच्या वायव्येला तटबंदीमध्ये बांधलेला रेडका बुरूज दिसतो.

यशवंत बुरुज

गडाच्या ईशान्य टोकाला अनुक्रमे दुपदरी बांधणीचा रेडका बुरुज आहे.


यशवंत बुरुज व रेडका बुरुज या दोन बुरुजांमध्ये नासके तळे व गोडे तळे आहे. त्याच्यापुढे सूर्य बुरूज आहे.

तसेच प्रतापगडाला महादरवाज्याशिवाय घोरपडीचे चित्र असणारा चोर दरवाजा देखील आहे. या दरवाज्यास राजपहाऱ्याचा दरवाजा असे ही म्हणतात.
तसेच प्रतापगडाला महादरवाज्याशिवाय घोरपडीचे चित्र असणारा चोर दरवाजा देखील आहे. या दरवाज्यास राजपहाऱ्याचा दरवाजा असे ही म्हणतात. 

चोर दरवाज्याच्याजवळच रेडका बुरूज, त्यापुढे यशवंत बुरूज आणि सूर्य बुरूज आहेत. प्रतापगडावर कडेलोट करण्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी दोषी आरोपींना कडेलोटाची शिक्षा देण्यात येत असे.

PHOTO_20161024_114652.jpg

  प्रतापगडावरुन दक्षिणेला दिसणारा मधुमकरंदगड

प्रतापगडावरुन पश्चिम दिशेस असलेला रायगड आणि दक्षिण दिशेस असलेला मकरंदगड हवा स्वच्छ असल्यास दिसतो.

परंतु हिवाळ्यामध्ये याठिकाणी भरपूर थंडी आणि धुके असते. त्यामुळे परिसरातील प्रदेश दिसत नाही.

प्रतापगडावर दुर्गप्रेमींनी हिवाळ्यामध्ये जाणे आणि गडाचा परिसर पाहणे योग्य आहे. प्रतापगडावर गेलेल्या दुर्गप्रेमींना येथे खवय्येगिरीची मेजवानी देखील मिळते. गडावरील हॉटेल्समध्ये झुणका भाकरीसह ग्रामीण पद्धतीचे खास जेवण उपलब्ध आहे.
प्रतापगड येथील संपर्क क्रमांकः-

१) श्री. श्रीकांत फडनीसः- 9822215933
२) श्री. सुदीप फडानीस- 9850794633, 9405253173

या गडावरुन उत्तरेला रायगड तर दक्षिणेला मकरंद गड दिसतो. त्याच्या पूर्वेला महाबळेश्वरचे विस्तृत पठार, आजूबाजूला घनदाट जंगल, खाली पार घाट व पश्चिमेकडे कोकण आहे. येथे आपली ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते. प्रतापगडावर शिवनिर्मित गडांची सर्व वैशिष्ट्ये एकत्र पहाता येतात.
इथेच घुमली युद्धाची आरोळी
इथेच उलटले पेचावर डावपेच
इथेच झाली होती ऐतिहासिक लढाई
तोच गड खुणावतो, बोलावतो आहे. अफजलखानाला ठार मारलेला गड पाहण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यास यावे. https://www.youtube.com/embed/myNAVOh7Etw

( तळटीप- काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

व्हिडीओतून प्रतापगडाची सैर

माझे सर्व लिखाण आपण येथे एकत्र वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

संदर्भग्रंथः-
१) सातारा जिल्हा गॅझेटीयर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
३) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
४) www.trekshitiz,com हि वेबसाईट
५) www.durgbharari.com हि वेबसाईट
६) शोध शिवछत्रपंतीच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
७) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामणी गोगटे
८) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
९) http://chandrakantspatil.blogspot.com/2017/02/blog-post.html

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून

भाग १

अफझलखानाचा वध ! शिवचरित्रातील एक सोनेरी पान. ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे महाराजांच्या युध्दशास्त्राला, रणधुरंधरांना दिलेलं एक अजोड देणं!
शिवचरित्र हे कितीही वाचल-ऐकलं तरी त्याची गोडी कधी संपतच नाही. विररसाने ओतप्रोत भरलेले स्वधर्म आणि स्वदेशाभिमान, तसेच स्वातंत्र्य प्रेरणेने प्रेरित होऊन, शीर हातावर घेऊन प्राणपणाने लढणारे लढवय्ये, तुटपुंज्या आयुधाने आणि कमीत कमी सेनेच्या साथीने, आपल्यापेक्षा तीनचार पटीने बलाढय असणाऱ्या शत्रूशी मुकाबला करून जास्तीत जास्त पराक्रम करून प्रचंड मोठा विजय मिळविणे हे चमत्कार ठायी ठायी पहावयास मिळतात.
या चरित्रातील सर्वच प्रसंग असे आहेत की, त्या प्रत्येक प्रसंगावर स्वतंत्र विचार व्हावा. परंतु त्यातील दोन प्रसंग अत्यंत महत्त्वाचे आहेत. असे मला वाटते. एक म्हणजे आ याहून सुटका, व दुसरा अफजलखान स्वारीचे प्रतापगड युध्द. या दोन्ही ठिकाणी श्रीशिवछत्रपतींच्या कुशल राजकारणाचा अत्यंत भेदक असा प्रभावी पैलू दिसून येतो. केवळ अंदाज बांधण एकवेळ सोप असेल, परंतु विचारपूर्वक अंदाज बांधून त्याची योग्य आखणी करणे, आणि ते सारं आपला जीव धोक्यात घालून बेमालूमपणे प्रत्यक्षात उतरवणे व त्यात विजयी होणे, आणि परत आनंदी मनाने स्वराज्याच्या पुढील कामास लागणे. इथे मन कुंठीत होते आणि मग हे सारंच अजब वाटू लागत.
श्री भवानीदेवीच्या तेजस्वी प्रेरणेने स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवाजीमहाराज आणि त्यांचे मावळे साकार करीत होते. त्या स्वातंत्र्याचा घास घ्यावयास, तो स्वातंत्र्याचा प्रयत्न पायाच्या टाचेखाली चिरडून टाकावयाच्या गर्जना करीत एक महाभयंकर झंझावात प्रचंड शक्तिनिशी चालून आला. त्याची कर्तबगारीही तेवढीच प्रचंड होती. त्याच्या समशेरीचा दरारा असा होता की, सारी दख्खन आणि लंका त्याच्या धाकाने थरकापत होती.
औरंगजेबासारख्या महापाताळयंत्री कर्दनकाळालाही बीदर कल्याणीच्या मोहिमेत त्याने आपल्या लष्करी करामतीचा तडाखा दिला होता.अशा या अफजलखानाचा फिरंगी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी मध्यान्ही शिवाजी महाराजांनी मोठया कौशल्याने वध करून, त्याच्या प्रचंड फौजेचा आपल्या क्षुल्लक मावळी फौजनीशी धुव्वा उडविला, आणि प्रचंड विजय मिळविला. त्यांच्या या राजनितीला, गनिमी युध्दनितीला आणि शौर्याला उभ्या जगात तोड नाही.
युध्द शास्त्राच्या दृष्टीने जगातील पांच महत्त्वपूर्ण युध्दात शिवचरित्रातील अत्यंत कठिण अशा समरप्रसंगाचा प्रतापगड युध्दाचा समावेश आहे. ‘गनिमीकावा’ या पध्दतीने खेळले गेलेले हे युध्द जगातील एकमेव व पहिलेच उदाहरण आहे.
आदिलशहाने महाराजांना जिवंत किंवा मारुन पकडण्यासाठी पाठविले, पण महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला खानाचा वध केला इतकाच इतिहास बहुतेकांना माहिती असतो.पण या संघर्षाची मुळ काय होती.नेमक्या अश्या कोणत्या घटनांची मालिका आधी घडली,युध्दाचे लढवलेले डावपेच आणि मुख्य म्हणजे प्रतापगडाच्या या युध्दाचे दीर्घकालीन परिणाम काय झाले, या सर्व मुद्द्यांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

    शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेचे प्रयत्न सुरु केल्यावर अपेक्षेप्रमाणे आदिलशाहीकडून विरोध झाला. आदिलशहाकडून ऑगस्ट १६४९ मधील फत्तेखानाच्या स्वारीनंतर मात्र थेट एप्रिल १६५९ मध्ये अफझलखानाला पाठविले गेले. अफझलखानाच्या पारिपत्यानंतर लगेच जानेवारी १६६० मध्ये फत्तेखान आणि रुस्तम ए जमान आणि त्यानंतर पाठोपाठ एप्रिल १६६० मध्ये सिद्दी जोहर अश्या तीन स्वार्या केल्या गेल्या.सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातलेला असतानाच औरंगजेबाने औरंगाबादवरुन शाहिस्तेखानाला स्वराज्यावर पाठविले.म्हणजे १६४९ ते १६५९ या दहा वर्षात स्वराज्यावर एकही आक्रमण झालेले नाही,अर्थात याचा फायदा शिवाजी महाराज न उचलतील तरच नवल. केवळ पुणे  परिसर्,सासवड्,पुरंदर्,राजगड्,तोरणा,हिरडस मावळ आणि चाकण या परिसरापुरते मर्यादित असलेले स्वराज्य पश्चिमेला कल्याण ते कुडाळ अशी संपुर्ण कोकणपट्टी ( जंजिर्‍याचा सिद्दी,राजापुरची ईंग्रजांची वखार,रेवदंडा आणि कोरलईचा पोर्तुगीज अधिपत्याखालील प्रदेश, वेंगुर्ल्याचा डच वखारीच्या अखत्यारीतील प्रदेश हा अपवाद ) तर जावळी, शिरवळ्,सुपे आणि चाकणचा परिसर यामुळे स्वराज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला. या संपुर्ण दहा वर्षात नेमकी काय राजकीय स्थिती होती आणि अफझलखानाच्या स्वारीची पार्श्वभुमी याचा आढावा या लेखात घ्यायचा आहे.

मुहमंद आदिलशहा

  या संघर्षाचे मुळ जाते ते शहाजीराजांनी निजामशाही वाचवण्याच्या केलेल्या प्रयत्नात. माहुली गडाला वेढा घालून शहाजहान व महमद आदिलशहा यांनी
शहाजीराजांच्या स्वराज्याच्या प्रयत्नाला मुठमाती दिली.शहाजीराजांसारखा पराक्रमी सरदार ठार मारण्यापेक्षा त्यांना आदिलशाहाने स्वताकडे घ्यावे आणि मावळच्या प्रदेशात न ठेवता, लांब कर्नाटकात बेंगळुरची जहागिरी द्यावी असे ठरले.शहाजीराजे जरी शरण आले असले तरी त्यांनी त्यांच्या जहागिरीचा प्रदेश पुणे व चाकण हे दोन परगणे आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळवले.
६ मे १६३६ रोजी मोघल आणि आदिलशाही यांच्या दरम्यान तह झाला.त्यामध्ये बरीच कलम असली तरी आपल्या दृष्टीने महत्वाची दोन कलमे लिहीतो.
१) विजापुरच्या आदिलशहाने दिल्लीपतीचे मांडलिकत्व मान्य करावे.
२) विजापुरच्या सुलतानाच्या मुळच्या मुलुखाला निजामशाहीपैकी खालील मुलुख नव्याने जोडण्यात यावा. पश्चिमेकडे  सोलापुर व परिंडा या किल्ल्यासह सोलापुर, वांगी महाल ( भीमा व सीना नद्यांमधील प्रदेश ). ईशान्येकडील भालकी व चिटगुपा हे परगणे,निजामशाही कोकण्,पुणे व चाकण हे दोन परगणे हा सर्व मुलुख मिळून दरसाल २० लक्ष होन किंवा ८० लाख रुपये वसुलाचे ५० परगणे होतात.राहिलेला निजामशाहीचा मुलुख निर्विवादपणे मोगलांच्या राज्यास जोडावा.
थोडक्यात मोंगली सरहद्दीची सीमारेषा जुन्नरच्या दक्षिणेकडून निघून पुर्वेकडे सरकत परांड्याच्या उत्तरेकडून जाई.म्हणजे परांडा हे आदिलशाहीत तर पुर्वेकडचे औसा,उदगीर्,नांदेड हे मोघली राज्यात होते. विजापुर आणि कुतुबशाहीत काही वाद झाल्यास ते सोडवण्याचे हक्क मोघलांना देण्यात आले होते.

    औरंगजेब
शहाजहानने आदिलशाहीशी केलेला तह त्याला एकंदरीत महाग पडला असे त्यातील कलमांकडे पाहिल्यास लक्षात येईल.निजामशाहीचा मोठा हिस्सा विजापुरकरांना मिळाल्यामुळे त्यांची दख्खनेत जवळ्जवळ बरोबरी झाली होती. त्यावेळी जरी शहाजहानने हा तह मान्य केला तरी पुढे त्याने कल्याण्,भिवंडी,सध्याचा रायगड जिल्ह्याचा भाग मिळवण्याचा प्रयत्न केला.त्यासाठी शहाजहानने आपला मुलगा औरंगजेब याला दख्खनची जहागिरी दिली ( इ.स. १६५३ ). वास्तविक औरंगजेबाची हि दख्खनेत दुसरी नेमणुक होती.यापुर्वी १४ जुलै १६३६ ला शहाजहानने त्याला खडकीला पाठविले व त्याच्याच नावावरुन खडकी या मलिक अंबरने वसविलेल्या गावाचे औरंगाबाद असे नामकरण केले. औरंगजेब जरी पराक्रमी आणि सैन्य दृष्टीने तुल्यबळ होता तरी विजापुरचा मुलुख एकट्याने ताब्यात घेणे शक्य नव्हते.

मीर जुमला

मग यासाठी औरंगजेबाने संधान बांधले ते कुतुबशाहीचा वजीर मीर जुमला याच्याशी.हा मीर जुमला कोण होता ? ग्रँट डफच्या “हिस्टरी ऑफ मराठा” म्हणजे मराठ्यांची बखरप्रमाणे मीर जुमला हा मुळचा जोहारी होता.हिर्‍याचा व्यापार करायला तो मोठमोठ्या दरबारी जायचा. आपले चातुर्य आणि द्रव्यसंपत्ती याच्या जोरावर तो कुतुबशाहीचा वजीर बनला. हा मुळचा ईराणचा म्हणजेच पर्शियाचा होता आणि त्याचे मुळ नाव महमद सय्यद अरदास्तनी..जेव्हा मोघलांनी आदिलशाहीशी तह केला तेव्हा कर्नाटकचा बराचसा प्रांत हिंदु पाळेगारांकडे होता.त्यातील पश्चिम कर्नाटक विजापुरकरांनी तर पुर्व कर्नाटक कुतुबशाहीने जिंकायचे असे ठरले.कुतुबशहातर्फे पुर्व कर्नाटकाचा प्रदेश जिंकायचे काम हा मीर जुमला करत होता. पण नंतर हाच मीर जुमला डोईजड झाला. अब्दुल्ला कुतुबशहाला आपल्या या प्रबळ मंत्र्याचा संशय येउ लागला. त्यात विजापुर दरबाराच्या उपेक्षेने शहाजी राजांनी कुतुबशाहीत नोकरी पत्करण्याचा प्रयत्नचालवला.त्यामध्ये मीर जुमला याने मध्यस्थी केली. अर्थात शहाजी राजांना विजापुर दरबाराने सोडले नाही. हाच मीर जुमला औरंगजेबाला जाउन मिळाला आणि दोघांनी मिळून कुतुबशाही नष्ट करुन तो प्रदेश घशात घालण्याचा डाव रचला.मात्र असे झाले तर औरंगजेब दक्षिणेत प्रबळ होईल म्हणून शहाजहानने मध्यस्थी करुन कुतुबशाही वाचवली.
ह्या सर्व घडामोडी होत असताना ईकडे महाराष्ट्रात १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.सुरवातीची काही वर्षे शहाजी राजांबरोबर गेली असली तरी आपली पुणे जहागिरी सांभाळण्यासाठी शहाजी राजांनी त्यांना १६४२ मध्ये कर्यात मावळात पाठविले.शिवाजी राजांनी स्वताची मुद्रा करुन तोरणा,पुरंदर आदि प्रदेश ताब्यात घेउन आदिलशाहीविरुध्द बंड पुकारले.आदिलशाहीने पाठविलेल्या फत्तेखान आणि मुसेखान यांचा पुरंदरच्या उतारावर १० ऑगस्ट १६४९ ला हरविले.मात्र शहाजी राजांची सुटका करण्यासाठी कोंढाणा उर्फ सिंहगड आदिलशाहीला देउन टाकून तह केला आणि वडीलांना सोडविले.यादरम्यान शिवाजी महाराजांनी एक महत्वाचे राजकारण केले, ते म्हणजे जावळीतील आधीचा चंद्रराव मोरे मेल्यानंतर नवीन चंद्रराव मोरे कोण होणार असा वाद सुरु होता,त्यात शिवाजी राजांनी यशस्वी मध्यस्थी केली. चंद्रराव हे त्या पदाचे नाव होते.सत्ताधारी कोणीही असला तरी तो चंद्रराव हा किताब धारण करे.आधीच्या चंद्रराव मोरेंच्या पत्नी माणाकाईंनी शिवाजी राजांची मध्यस्थी घेउन नात्यातील यशवंतराव मोरेला नवीन चंद्रराव मोरे म्हणून मान्यता घेतली.शिवाजी राजांची हि चाल म्हणजे आदिलशाही दरबाराच्या अधिकारात ढवळाढवळ होती.
अर्थात यावेळी महमद आदिलशहा हा आजारी होता.पुढे ४ नोव्हेंबर १६५६ रोजी महमद आदिलशहा मृत्युमुखी पडला.या सर्व कालावधीत विजापुरच्या पुर्व सरहद्दीवर औरंगजेब, मीर जुमला संयुक्तपणे हल्ले करत असल्यामुळे विजापुर दरबाराचे बरेचसे लक्ष तिकडे होते.त्याचा फायदा होउन शिवाजी महाराजांना मावळात आपले बस्तान बसविणे सोपे गेले. एकदा १६४९ मध्ये आदिलशाहीशी तह झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुढे १६५५ पर्यंत कोणतीही फार मोठी हालचाल केलेली नाही.

   अलि आदिलशाह
महमद आदिलशहा मेल्यानंतर त्याचा मुलगा अलि आदिलशाही सत्तेवर आला. हा अवघा अठरा वर्षाचा होता.आणि ईथूनच खर्‍या संघर्षाला सुरवात झाली.मुळात विजापुर दरबारात या नवीन बादशहाच्या बाजुने असलेले आणि त्याला नसलेले पठाण असे दोन गट पडले. हा घरचा संघर्ष थोडा म्हणुन कि काय,याच संधीची वाट पहात असलेल्या औरंगजेबाने १६३६ च्या तहाचा आधार घेउन अली आदिलशाहीच्या राज्यारोहणाला आक्षेप घेतला.त्याने दोन मुद्दे काढले.
१) अली आदिलशहा हा मुहमद आदिलशहाचा मुलगा नव्हे,

२) अलि आदिलशहा याचे राज्यारोहण घोषीत करण्यापुर्वी मोघल सत्तेची परवानगी घ्यायला पाहिजे होती.
यावेळी अलि आदिलशहा जरी गादीवर बसलेला असला तरी खरी सत्ता चालवत होती ती बडी बेगम.वास्तविक हिचे नाव बडी बेगम नव्हते. हिचे नाव ताज उल मुखद्दीरात किंवा उलिया जनाबा असे होते.पण विजापुरात तीला बुबुवाजीखानम बेगम किंवा सरळ बडी बेगम म्हणत. या पाताळयंत्री बाईला विजापुरचे सर्व सरदार टरकून असत. अलीशहाची हि सख्खी आई नव्हती, पण आपल्या या सावत्र मुलावर तीचा विलक्षण जीव होता. ही मुळची कुतुबशहाची मुलगी. दरबारात असलेला गोंधळ आणि एकंदरीत वचक नसल्याचा फायदा घेउन औरंगजेबाने विजापुरची आदिलशाही बुडविण्याचा निश्चय केला.मीर जुमला मदतीला होताच,पण ईकडे मावळात शिवाजी महाराज जे स्वराज्यस्थापनेचे प्रयत्न करत होते,त्यात ते आदिलशाही मुलुख ताब्यात घेत होते,त्यामुळे विजापुर दरबाराजाच्या सैन्याला दोन आघाड्यावर लढावे लागत होते. मीर जुमला उत्तरेतून १८ जानेवारी १६५७ ला आला.

बसवकल्याणचा भुईकोट

 बिदरचा भुईकोट
आदिलशाही सैन्याचे बळ विभागलेले पाहून औरंगजेबाने आधी बिदरचा किल्ला २१ मार्च १६५७ ला ताब्यात घेतला आणि कल्याणीचा किल्ला उर्फ सध्याच्या बसवकल्याणचा किल्ला ताब्यात घेउन त्याने विजापुरवर हल्ला करण्याची तयारी सूरु केली.३१ जुलै १६५७ ला कल्याणीचा किल्लाही त्याच्या ताब्यात आला. फक्त लष्करी ताकदीचा उपयोग करुन औरंगजेब थांबला नाही तर त्याने विजापुर दरबारातील सरदारांना पैशाची लाच देउन फितुर करुन घेतले.रणदुल्लाखानाचा मुलगा आणि कित्येक सरदार फितुर होउन मोघलांशी पत्रव्यवहार करु लागले.यामुळे विजापुर दरबारात दुफळी पडून वजीर खानमहमद याच्याशी स्पर्धा करणारा गट निर्माण झाला.अहमदनगर येथील मोघली अधिकारी मुलतफखान याच्याकडे रक्कम देउन जो आदिलशाही अधिकारी मोघलांना फितुर होईल त्याला ती रक्कम देण्यास औरंगजेबाने हुकुम सोडला.याचवेळी आदिलशाहीचे गोवळकोंडा व पोर्तुगीजांबरोबर वाद सुरु होते.हे सर्व कमी म्हणून कि काय विजापुर राज्यातही अंतर्गत गोंधळ माजला होता. अथणी येथे लिंगायत व जैन यांची एकमेकांच्या देवास शिव्या देण्यावरुन वाद सुरु होता.
त्याचवेळी ईकडे मावळात शिवाजी महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे. १६५४ च्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी नीळकंठराव किल्लेदार याच्या मुलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली. पुढे महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला (१६५६). विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही महत्त्वाची ठिकाणे. जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यांना प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली (१६५६).
“राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहानमोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. तसेच विजापूरशी संपर्कही कमी होऊ लागला. पोर्तुगीज अंमलाखाली असलेला ठाणे, वसई हा भाग वगळता जव्हारपासून गोव्यापर्यंतचा बहुतेक कोकण प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे होता.
तिकडे औरंगजेब विजापुरवर हल्ल्याच्या तयारीत गुंतला आहे हे पाहून त्याच्याही अचुक फायदा घेतला. विजापुर दरबाराचा कल्याण येथील अधिकारी मुल्ला महमद आपली जहागिरी सोडून विजापुरला जाउन बसला होता. त्यात १६५७ च्या तहाप्रमाणे कल्याण्,भिवंडी हा प्रांत आदिलशहाने मोघलांना द्यायचा होता.मात्र या तहाची अंमलबजावणी अद्याप व्हायची होती.रायगडासारखे महत्वाचे लष्करी ठाणे हातात आल्यामुळे शिवाजी महाराजांनी श्यामराज निळकंठ रांजेकर यांचे चुलत बंधु दादाजी बापुजी यांना कल्याणवर आणि सखो कृष्ण लोहकरे यांना भिवंडीवर पाठवून कल्याण-भिवंडी हि दोन्ही ठिकाणे ताब्यात घेतली. जेधे करीन्यात सांगितल्याप्रमाणे “कल्याणजवळी बंदरी दुर्गाडीचा कोट बांधला.ते समयी राजश्री स्वामीस कल्याणात हरजिनस मता द्रव्य सापडले.फते झाली”.याच वर्षी पौष महिन्यात माहुलीचा दुर्ग जिंकून तिथे आबाजी महादेव यांना कल्याणवर नेमणूक करुन देखरेखीला ठेवले.अश्याप्रकारे विजापुर विरुध्द मोंघल यांच्या संघर्षाचा फायदा घेउन शिवाजी राजांनी चौल ते कुडाळपर्यंतचा प्रांत हाती घेतला.

औरंगजेबाची काही फारसी पत्रे सातार्‍याच्या दफ्तरात आहेत्,त्यापैकी एका पत्राचे भाषांतर “शिवछत्रपतींची बखर” या मथळ्याखाली प्रसिध्द झालेली आहेत्,त्यातील हे एक पत्र

शिवाय औरंगजेब यावेळी विजापुरवर हल्ला करायच्या तयारीत होता, त्याला शिवाजी महाराजांनी पत्र पाठविले, “आम्ही दिल्लीपतीचे नोकर आहोत.या मोहिमेत आम्ही तुम्हाला लागेल ते सहाय्य करण्यास तयार आहोत.आम्ही विजापुरकरांचे जे प्रांत व किल्ले हस्तगत केले ते आम्हाकडे राहु द्यावेत.विजापुरकरांचे दाभोळ वगैरे समुद्रकिनार्‍याचे जे प्रांत आहेत ते आम्ही तुमच्यासाठी हस्तगत करतो आहोते”. शिवाजी महाराजांनी अहमदनगरचा सुभेदार मुलताफखान याच्यामार्फत औरंगजेबाशी स्नेहाचे बोलणे लावले.औरंगजेबासाठी शिवाजी महाराजांचे हे पत्र फायद्याचे होते. शिवाजी महाराजांची योग्यता औरंगजेब जाणून होता.त्याने २२ एप्रिल १६५७ रोजी शिवाजी राजांना पत्र पाठविले,”वास्तविक पहाता युमच्या ताब्यात असलेले विजापुरकरांचे सगळे किल्ले आणि महाल हे पुर्वीप्रमाणे तुमच्याकडे कायम करण्यात आलेले आहेत.दाभोळचा किल्ला आणि दाभोळच्या खालील प्रदेश यांचे उत्पन्न तुम्ही ईच्छील्याप्रमाणे मी तुम्हास देत आहे.तुमच्या उरलेल्या मागण्याही मान्य करण्यात येतील आणि तुमच्या कल्पनेबाहेर तुमच्यावर मर्जी आणि कृपा दाखविण्यात येईल.”
अर्थात औरंगजेबाने महाराजांना वश करुन घेण्याचा वारंवार प्रयत्न केला,मात्र शिवाजी राजांनी त्याला बिलकुल दाद लागु दिली नाही.उलट आज औरंगजेब विजापुरवरच्या स्वारीने अडचणीत सापडला आहे,उद्या तो आपले वचन पाळेलच असे नाही याची कल्पना शिवाजी राजांना होती.त्यातच शहाजहानचे औरंगजेबाला पत्र आले कि “तुम्ही (औरंगजेबाने ) विजापुरवर स्वारी करुन सर्व राज्य खालसा करावे,ते जमण्याजोगे नसल्यास १६३६ तहाप्रमाणे जो निजामशाहीचा मुलुख विजापुरकरांच्या मुलुखाला जोडण्यात आला, तो तरी जिंकून मोगलांच्या राज्याला जोडा. आणि दिड कोटी रुपये खंडणी देउन मांडलीक होण्याची तयारी असेल तर त्यांच्याशी तह करा आणि सैन्य घेउन गोवळकोंड्यावर आक्रमण करुन कुतुबशाही खालसा करा”.
या सगळ्या प्रकारात मोघलांचे लष्करी सामर्थ्य विजापुरच्या सरहद्दीवर एकवटलेले असल्यामुळे जुन्नर.अहमदनगर हा मुलुख मोकळा पडला होता.याच वेळी विजापुरचे सरदार मीनाजी ( कि मंबाजी) व काशी हे दोन सरदार मोघली मुलुखावर चालून आले.तर शिवाजी महाराज जुन्नरवर हल्ला केला,त्याचे वर्णन सभासदाच्या बखरीत असे आहे”जुन्नर शहर मारिले.घोडे दोनशे पाडाव केले.तीन लक्ष होनांची मत्ता,खेरीज कापडजिन्नस,जडजवाहिर हस्तगत करुन पुण्यास आले.त्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जेष्ठात शिवाजी महाराजांनी अहमदनगरवर स्वारी केली.तेव्हा तिथे मोगल सरदार नासिरखान होता,त्याचाही पराभव केला.”नगर शहर मारिले,सातशे घोडे पाडाव केले.हत्तीही पाडाव केले,द्रव्यही बहुत सापडले.”
हि बातमी समजताच औरंगजेब अर्थातच भयंकर चिडला,त्याने आपल्या सरदारांना जळजळीत पत्र पाठविले,”तुम्ही आता शिवाजीची हकालपट्टी तर ताबडतोब केली पाहीजे.पण एवढ्याने काम भागणार नाही.शिवाजीच्या मुलुखात शिरुन तुम्ही तो बेचिराख करा.लोकांची कत्तल करताना किंवा लुटताना यत्किंचितही दया दाखवू नका.पुणे व चाकण प्रांत यांची राखरांगोळी झाली पाहिजे.तेथील लोक हातात सापडतील त्यांना गुलाम बनवा,आणि मोघली मुलुखातील जे पाटील किंवा रयत जे शिवाजीला गुप्तपणे मदत करेल त्यांचा नायनाट करा”.
अर्थात या पत्रामुळे मोघली सरदार खडबडून जागे झाले तरी पावसाला सुरवात झाल्यामुळे नदी,नाले ओसंडून वाहु लागले.तेव्हा शिवाजीच्या मुलुखावर पावसानंतरच स्वारी करु असा विचार करुन हे सरदार गप्प बसले.
या सगळ्यात जो विजापुर आणि मोघल संघर्ष सुरु होता,त्यात या हल्ल्याचा मोठा मुद्दा होता.कारण या हल्ल्यामुळे औरंगजेबाला फटका बसून शिवाजी महाराजांनी विजापुर दरबाराला अप्रत्यक्ष मदत केली होती. मात्र याचवेळी विजापुर दरबाराचे मुत्सदी शहाजहानला भेटून त्याच्याशी तह करायला राजी झाले. शिवाय मोघल दरबारात शहजादा दाराच्या बाजुचे सरदार होते,त्यांना औरंगजेब नको होता,त्यांनी शहाजहानचे मन वळविले. सहाजिकच शहाजहानने हुकुम सोडला “देखत हुकुम विजापुरकरांशी चाललेले युध्द बंद करा” शिवाय औरंगजेबाच्या हाताखालील सरदारांना त्याने माळव्यात हजर रहाण्याचा हुकुम दिला.अर्थात पुढे महिनाभर औंगजेबाने युध्द सुरु ठेवले,मात्र नंतर त्याला तह करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.तहात ठरल्याप्रंमाणे “विजापुरकरांनी दिड कोटी रुपये खंडणी भरावी.बेदर्,परांडा,कल्याणी हे किल्ले व निजामशाही कोकणातील किल्ले,शिवाजीच्या ताब्यातील सुपे व पुणे प्रांत मोघलांनी घ्यावेत”. अर्थात हा तह अंमलात आलाच नाही.औरंगजेब बिदरला निघून गेला तर मोघली फौज माळव्यात निघून गेली.विजापुरकरांचा मुलुख जाणार असल्यामुळे त्यांना तहाची अमंलबजावणी करण्याची काहीही घाइ नव्हती.
याप्रकाराने शिवाजी राजे चांगलेच अडचणीत आले कारण विजापुरकरांना मदत करण्यासाठी औरंगजेबावर स्वारी केली तर आदिलशाही दरबार तह करुन रिकामे झाले.आता औरंगजेबाशी बोलणी करायची तर तो अपमानास्पद अटी लादणार.मोठा आणिबाणीचा प्रसंग उत्पन्न झाला.पण ईतक्यात एक महत्वाची बातमी आली.
शहाजहान आणि दारा

दिल्लीत शहाजहान आजारी असल्याच्या बातम्या दख्खनेत आल्या होत्या.औरंगजेबाची बहीण रोशनआराने हे पत्र औरंगजेबाला पाठविले.त्याच्यामागे सर्वात थोरला राजपुत्र दारा हाच मोघल बादशहा होणार हे नक्की होते. औरंगजेबाला याचा आधीच अंदाज आलेला होता.विजापुर किंवा कुतुबशाही बुडवून ते राज्य ताब्यात घेण्याचा त्याने जो प्रयत्न केला त्याच्यामागे हे एक कारण होते.जर दारा सत्ताधीश झाला असता आणि दिल्लीची गादी आपल्याला मिळणार नाही हे जाणून किमान दख्खनचा प्रदेश आपल्या ताब्यात रहावा हा त्याचा या स्वारीमागे मुळ हेतु होता.अर्थात कदाचित आदिलशाही आणि कुतुबशाही बुडवण्यात औरंगजेबाला यश मिळाले असते तर त्याने पुढचा मोहरा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याकडे वळविला असता हे नक्की होते.याच भावी राजकारणाचा विचार करुन शिवाजी महाराजांनी विजापुर दरबाराला मदत करायचा निर्णय घेतला, जो आदिलशहाने तह केल्याने चांगलाच फसला.पण विजापुरची गादी बुडविण्यात अपयश आल्याने औरंगजेबाला उत्तरेत जाउन दाराशी मुकाबला करुन दिल्लीची गादी बळकावण्याखेरीज पर्याय राहीला नाही.नेमक्या याच परिस्थितीचा फायदा शिवाजी राजांना झाला असे म्हणता येईल.
शाहजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे लागलेले लक्ष, हे पाहून महाराजांनी सरळ कल्याण व भिवंडी ही स्थळे हस्तगत केली (२४ ऑक्टोबर १६५७). पुढे १६५८ मध्ये माहुलीचा किल्लाही काबीज केला
शिवाजी महाराजांनी उत्तरेत जायच्या गडबडीत असलेल्या औरंगजेबाला पत्र पाठविले.”आम्ही दिल्लीपतीचा जो अपराध केला त्याबध्दल आम्हाला फार पस्तावा आहे.आम्ही इकडे पुष्कळ घोडेस्वार जमा केले आहेत.प्रस्तुतसारख्या प्रसंगी आपणास जरुरी असल्यास सहाय्य करण्यास आम्ही तयार आहोत.आणि दक्षिणेकडील तुमच्या मुलुखाचे रक्षण तुमच्या पश्चात करण्याचे काम आमच्यावर सोपवले असता आम्ही ते मोठ्या खुषीने पत्करु. परंतु आपल्या हाती गेलेल्या प्रांतात आमचे काही वंशपरंपरागत आलेले हक्क आहेत,ते आपण चालु करावेत.आमच्या घराण्याच्या जहागिरीचा काही भाग आपल्या कबजात गेला आहे तो आम्हास परत मिळावा.व जुन्नर आणि अहमदनगर प्रांतातील आमची देशमुखी आम्हास परत मिळावी.म्हणजे आम्ही आपल्या लोकानिशी दिल्लीपतीची जी नोकरी बजावू तीचा मोबादला आम्हास मिळाल्यासारखे होईल.त्याप्रमाणे कोकण प्रांत आदिलखानाच्या ताब्यात दिला आहे त्याची व्यवस्था त्याच्याकडून तितकीशी चांगली लागलेली नाही. हा प्रांत आमच्याकडे दिल्यास पुष़्कळ फायदा होणार आहे”.( यातील आदिलखान हा शब्द लक्षवेधी आहे)
हे पत्र शिवाजी राजांचे वकील घेउन गेले, त्यावेळी औरंगजेब घाईत होता.शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतलेला कल्याण,भिवंडी ह्या ताब्यात घेतलेल्या प्रदेशाला मोघलांनी मान्यता द्यावी असा आग्रह धरला होता,शिवाय तळकोकण जिंकल्यास त्याचा ताबाही शिवाजी राजांकडे राहील असा आग्रह धरला होता.या जाचक मागण्या मान्य करण्याशिवाय औरंगजेबापुढे दुसरा पर्याय नव्हता.अर्थात शिवाजी महाराज असाही विजापुरचा मुलुख ताब्यात घेणार आहेत आणि मोगली मुलुख सुरक्षित राहील असा विचार करुन त्याने या पत्राला मान्यता दिली.२४ फेब्रुवारी १६५८ रोजी उत्तरेला जाण्यासाठी औरंगजेबाने औरंगाबाद सोडले. त्यावेळी त्याने शिवाजी महाराजांना पत्र लिहीले.ते खाली दिलेले आहे.
हे पत्र घेउन रघुनाथपंत गेले होते तरीही ईथे कुष्णाजी भास्कर यांचा उल्लेख दिसतो.अर्थात हे कृष्णाजी भास्कर आणि अफझलखानातर्फे आलेले कृष्णाजी भास्कर निराळे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यापत्रातील सोनोपंत म्हणजे बहुधा सोनोपंत डबीर असावेत. ( अर्थात सोनोपंत डबीर कि आबाजी सोनदेव हा गोंधळ आहेच)पुढे यांनाच औरंगजेबाला द्यायचा नजराना घेउन शिवाजी महाराजांनी दिल्लीला पाठविले.
फेब्रुवारी १६५८ मध्ये औरंगजेब औरंगाबादेहून आगऱ्याकडे जाण्यास निघाला आणि २१ जुलै १६५८ मध्ये तो दिल्लीच्या तख्तावर बसला.अर्थात औरंगजेबाने वरकरणी शिवाजी राजांशी तह केल्याचे दाखविले असले तरी जाण्यापुर्वी त्याने मुलतफखान ,नौसिरीखान आणि मीर जुमला या तिघांनाही शिवाजी राजांपासून सावध रहाण्यासाठी पत्र लिहीले.तो मीर जुमल्याला लिहीतो,”नैऋत्येकडील प्रांतावर चांगले लक्ष ठेवा.तो कुत्र्याचा पोर टपून राहिला आहे”.
त्याचप्रमाणे औरंगजेबाने आदिलशहाला लिहीले,”या देशाचे रक्षण करा.शिवाजीने गुपचुपपणे या देशातील काही किल्ल्यांचा ताबा घेतला आहे.त्याला हाकलून लावा.त्याला तुमच्या चाकरीत ठेवायची तुमची इच्छा असली तर त्याला जहागिरी द्या ती लांब कर्नाटकात.मोघल साम्राज्याच्या सीमेपासून लांब.म्हणजे सीमांना त्याच्यापासून उपद्र्व होणार नाही.”.
स.न. १६५८ च्या आरंभी औरंगजेब वारसा युद्धांत सहभागी होण्यासाठी उत्तरेत रवाना झाला. तोपर्यंतची मोगलांची स्थिती अशी होती :- स. १६५७ च्या डिसेंबरमध्ये गुजरातचा सुभेदार शहजादा मुरादने स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत लष्करी तयारीकरता सुरतेची लुट केली. तिकडे बंगालमध्ये सुजानेही स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत गडबड उडवून दिली होती. दिल्लीला दारा शुकोहने बादशाही पद वा तख्त हाती न घेता फक्त सर्वाधिकार हाती घेऊन पडद्यामागील सूत्रधाराची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. जो त्याच्या अंगी आला. त्याउलट औरंगजेबाने आपलं धोरण आगाऊ जाहीर न करता परिस्थितीनुसार वागण्याचा निर्णय घेतला.
या चार शहजाद्यांच्या महत्त्वाकांक्षा, भूमिका काहीही असल्या तरी त्यांपैकी आपल्या बंडखोरीचा — यशस्वी झाल्यास न् झाल्यास हा भाग वेगळा — मोगल साम्राज्याला अधिक फटका बसू नये याची सर्वधिक काळजी औरंगजेब घेत असल्याचे दिसून येते. असो.औरंगजेबाने दख्खन सोडताना आपल्या पाठीमागे शिवाजी – आदिल परस्परांशी झुंजत बसतील असाही सोय केली होती असं म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही. कारण शिवाजी राजांची नव्याने उदयास येणारी सत्ता मोगल – आदिलच्या सरहद्दी दरम्यान असल्याने व शिवाजी राजांचा प्रमुख उद्योग आपल्या ताब्यातील भूप्रदेशास सलग असलेला भाग जिंकून घेण्याचा — विशेषतः आधीच्या निजामशाहीत मोडणारा प्रदेश ताब्यात घेण्याचा असल्याने आदिल व शिवाजी यांचा झगडा जुंपणे अपरिहार्य होते.
या संपुर्ण कालावधीत शिवाजी महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यात काही घटना झाल्या.माघ १६५७ महिन्यात शिवाजी महाराजांची कन्या सखुबाई उर्फ सखवारबाई व फलटणचे बजाजी नाईक यांचे पुत्र महादजी नाईक यांचा विवाह पार पडला.स्वतः महाराजांनी गायकवाड घराण्यातील सोयरिक केली( सकवारबाई ). पुढे इ.स. १६५८ मध्ये जेष्ठात यांचा जन्म शुध्द १२ गुरुवार घटीका १० या वेळी संभाजी महाराजांचा पुरंदरावर जन्म झाला. यावेळी सईबाईंना दुध कमी पडल्याने कापुरहोळच्या गाडे पाटील घराण्यातील धाराउंना दाई म्हणून ठेवले गेले व प्रतिवार्षीक १६ होनांची नेमणूक दिली गेली.त्या धाराउंच्या दोन मुलांपैकी एक पन्हाळ्यास व एक राजगडाच्या सुवेळा माचीवर नेमले होते.
औरंगजेब गेल्यामुळे आदिलशाही आणि शिवाजी महाराज यांच्यावरचा मोठा लष्करी दबाव नाहीसा झाला. आता शिवाजी महाराजांकडे पुरेसे लक्ष द्यायला विजापुरकरांना वेळ मिळाला.अर्थात शिवाजी महाराजांनी या गोंधळात जावळी सारखा लष्करीदृष्ट्या महत्वाचा प्रदेश हस्तगत केलाच होता शिवाय सिंहगड किल्ला आणि खेडेबारे प्रांतसुध्दा ताब्यात घेतले.शिवाजी महराजांनी जावळी जिंकल्याबरोबरच रायरीचा गड जिंकला,त्यामुळे उत्तर कोकणात हालचाल करायला त्यांना एक ठाणे मिळाले,त्यातच मुल्ला महमदने कल्याणची सारा वसुली विजापुरला पाठविली होती जी मध्येच अडवून लुटण्यात आली.हाच तो कल्याणचा खजिना.पुढे याच पैशाचा उपयोग करुन रायरीच्या डोंगरावर बांधकामे केली गेली आणि त्याला नाव दिले “रायगड”. त्याचवेळी महाराजांनी दंडा राजापुरीवर आक्रमण करुन सिद्दी फत्तेखानाला शह दिला व त्याचा बराचसा मुलुख ताब्यात घेतला.मात्र जंजिरा मिळाला नाही.हा फत्तेखान विजापुर दरबाराचा सरदार बनला. यानंतर महाराजांनी सरसगड्,सागरगड्,सुधागड,कर्नाळा,प्रबळगड हे उत्तर कोकणातील गड ताब्यात घेतले तर मावळातील राजमाची,लोहगड्,तुंग्,तिकोना,कोराईगड हे किल्ले घेतले. शिवाय तळगड्,घोसाळगड हे किल्ले घेउन जंजिर्‍या सिद्दीला शह दिला शिवाय बहुधा बीरवाडीचा किल्ला उभारुन तिथे एक लष्करी हालचालीचे केंद्र निर्माण केले.लोहगड्,राजमाची या गडावर आणि परिसरात कृष्णाजी भास्कर ( अफझलखानाचे वकील कृष्णाजी भास्कर वेगळे) यांची नेमणुक केली.एकंदरीत चौलपासून कुडाळपर्यंतच्या प्रदेशावर महाराजांचा अमंल सुरु झाला.इ.स.१६४६ ते १६५७ या ११ वर्षाच्या काळात शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार बऱ्यापैकी केला होता. त्यावेळी स्वराज्यात तळकोकणातील ३००० ताली, २४ बंदरे, २१ किल्ले होते. किल्ल्यांची संख्या अजुन जास्त असती पण १६४८ ला अफझलखानाने शहाजीराजांना अटक केली, आणि त्यांच्या सुटकेसाठी शिवरायांनी आदिलशाहीला ८ किल्ले सोडले. आणि चाकण, पुणे व सुपे या प्रांतात स्वराज्याचा बऱ्यापैकी विस्तार केला.
त्या काळात म्हणजे १६५७ साली, आदिलशाही ही तत्कालीन स्वराज्याच्या जवळपास २१ पट होती. अन मुघलसाम्राज्य हे विजारपूरच्या आदिलशाहीच्या जवळपास ३३ पट होते, म्हणजेच हिंदुस्थानच्या दोन तृतीयांश एवढा भाग मुघलांच्या अधिपत्याखाली होता. यावरुन आपल्याला मुघल सामर्थ्याची कल्पना येईल. याच दरम्यान औरंगजेबाचा दुसरा राज्याभिषेक ५ जुन १६५९ ला झाला.त्यासंदर्भात पत्र आणि पोषाख शिवाजी महाराजांना राजगडावर मिळाला.
   आदिलशाहीसाठी हि धोक्याची घंटा होती.आता काही हालचाल केली नाही तर त्यांचा विनाश अटळ होता.इ.स. १६५८-५९ या कालावधीत बडी बेगमेने खानमहमद या विजापुरच्या वजीराला वेशीतच मारेकरी घालून मारले तर फत्तेखानास विष देउन मारले,तर श्रावण महिन्यात बहलोलखान मारला.( जेधे शकावली ) यावेळी मुल्ला अहमद हा विजापुर दरबाराचा सुत्रधार बनला आणि अफझलखान त्याचा पक्षाचा असल्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले.याच वेळी शिवाजी महाराजांनी मासुर प्रांतावर ( हा प्रदेश धारवाडच्या दक्षिणेस आहे) स्वारी करुन तिथे थोडीफार लुटालुट केली.या स्वारीचा महाराजांना काही फार मोठा फायदा झाला नाही तरी त्यांनी या परिसरातील वाटांची माहिती घेतली ज्याचा उपयोग करुन पुढे अथणी-हुबळी लुटले.आदिलशाहीला हे एक प्रकारे आव्हान वाटले.त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या जावळीच्या सरहद्दीवरुन कुरबुर सुरु केली. शिवाजी राजांच्या मताप्रमाणे जावळीची सरहद्द वाईच्या दक्षिणेला बावधन गावापर्यंत होती.त्यात शिवाजी राजांनी नुरखान बेगला ओझर्डे गाव ईनाम म्हणून दिला होता.हे गाव आदिलशाही हद्दीत येते असे विजापुर दरबाराचे मत होते.त्यासाठी दिनायत राउ या विजापुरच्या अधिकार्‍याने शिवाजी राजांचा मुजुमदार निळो सोनदेव यांना पत्र लिहीले.

 एकुणच विजापुर दरबार आणि शिवाजी राजे यांचा संघर्ष टोकाला गेला आणि शिवाजी महाराजांचा कायमचा नायनाट हेच आदिलशाही दरबाराचे लक्ष राहिले.शिवाय आदिलशाही-मोघल यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे कल्याण-भिवंडी हा भाग मोघलांना द्यायचा होता जो शिवाजी राजांनी ताब्यात घेतला होता.त्यामुळे यावेळी शिवाजी महाराजांच्या मदतीला मोंघल येणार नव्हते.उलट शिवाजी राजांचा पराभव व्हावा यासाठी त्यांचा प्रयत्न असणार होता.( शाहिस्तेखानाला पुढे स्वराज्यावर पाठविण्याची बीजे ईथे आहेत)
अर्थात महाराजांची इतकी दहशत पसरली होती कि कोणी सरदार सहजासहजी शिवाजी राजांवर चालून जायला तयार होईना आणि ईथेच प्रवेश होतो तो अफझलखानाचा.

अफझलखानः-
अफझलखान हा मुळचा अब्दुल्लाखान.एका भटारीण बाईचा मुलगा.पण आपल्या अंगभुत गुणाने आणि पराक्रमाने तो मोठा झालेला होता. अफझलखान हि त्याला विजापुर दरबाराने दिलेली पदवी होती. स्वभावाने अत्यंत क्रुर असा हा ईसम.कपट आणि दगाबाजी हि त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच होती. ज्या शहाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून बसवपट्टणची लढाई जिंकली त्या शहाजी राजांना जिंजीच्या वेढ्यात कैद करताना त्याचे हात जराही थरथरले नाहीत.
खानाच्या कपटी स्वभावाची आणखी दोन उदाहरणे सांगता येतील.शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांच्या मृत्यस हाच अफझलखान कारणीभूत ठरला, कर्नाटक मध्ये संभाजीराजे आदिलशहकडून लढत असताना त्यांना कुमक कमी पडली, आदिलशहाने खानाला कुमक घेऊन जाण्यास सांगितले पण खान गेला नाही, अन त्यामुळे संभाजीराजे पडले.
तसेच रणदुल्ला खान अन कस्तुरीरंगन राजाचे तुंबळ युद्ध सुरू होते. दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान झाले होते अन शेवटी त्यांच्यात तह करायचा ठरला. रणदुल्ला खानाकडून अफजलखान तहाला बसला. अन कपटाने खानाने कस्तुरीरंगनचे मुंडके तलवारीने उडवले व बाहेर नेऊन सैन्याला दाखवले अन सैन्य शरण आले. असा हा खान महाकपटी अन कावेबाज होता. त्याची खूपच दहशत होती. त्यामुळे खानाला भयंकर अहंकार होता. त्यामुळे त्याने स्वतःचाच एक वेगळा शिक्का तयार करवून घेतला होता.

तो गर्वाने स्वताला कुफ्रशिकन आणि बुतशिकन म्हणवून घेइ. बुतशिकन म्हणजे ‘मुर्तीचा विध्वंस करणारा’ आणि कुफ्रशिकन म्हणजे ‘मुर्तीपुजकांचा नाश करणारा’.त्याला एक स्वतंत्र शिक्का होता त्याच्या शिक्क्यात मजकूर असा
“गर अर्ज कुनद सीपहर अअला फजल फुजला व फजल अफजल अझ हर मुलकी बजाए, तसबीह आवाझ आयद अफजल अफजल.” याचा अर्थ- उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं कि, या पृथ्वीतलावरचा श्रेष्ठ माणूस कोणय ? तर सगळीकडून आवाज येईल “अफजल” “अफजल.”
विजापुरजवळचे तोरवे हे गाव त्याने वसवले आणि त्याला नाव दिले अफझलपुर. विशेष म्हणजे हाच ईसम कर्तव्यकठोर मात्र होता.परमेश्वर मानवाला जन्म देताना त्याच्यात सदगुण आणि दुर्गुण यांचे आश्चर्यकारक मिश्रण करतो. 

अफझलची सातारा जिल्ह्यातील बोरखळ व किन्हई येथील ब्राम्हणांना दिलेले खुर्दखत उपलब्ध आहेत. अली आदिलशहाच्या कारकीर्दीत कोकणातील संगमेश्वरजवळ केसो व रंगो सरदेसाई यांचे ईनाम अब्दुल नबी फक्रुद्दीन पटीदार याने बळकावले होते.हा अन्याय दुर करुन ते पुन्हा सरदेसाई यांना मिळावे असे आदिलशाही फर्मान अफझलच्या शिफारसीवरुन दिले गेले. 

   तसेच हे पत्र शिरवळच्या निगडे देशमुखांना आलेले आहे,ज्यात अफझलखानाने एक तसु ही जमीन पडीक राहु देउ नका असे बजावले आहे. अर्थात हि वागणुक सहिष्णुतेची आणि न्यायाची असली तरी त्याला कारण बहुधा राज्यकर्ते मुसलमान असले तरी बरेच लढणारे सरदार हिंदू होते आणि मुख्य म्हणजे बहुसंख्य प्रजा हिंदु होती.त्यांना दुखावून चालणार नव्हते.

 नरसोभट बिन रंगभट चित्राव यास वडिलोपार्जित धर्मादाय सनद दिली…ती अफझलखानने पुन्हा नवी (renew) करून दिली !
अफझलखान हा १२-१५ वर्षे वाईचा सुभेदार होता,याने परगण्यातील कित्येत देवळांना,पुजार्यांना तसेच पूजेअर्चेसाठी सनदा दिल्याचे पुरावे आहेत.त्यातीलच एक हा वरील पुरावा.

शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर कोण बसणार यात हस्तक्षेप करुन विजापुर दरबाराला न भीक घालता आपल्या मर्जीतील यशवंतराव मोरेला चंद्रराव केल्यामुळे आदिलशाही भयंकर चिडली होती.त्यांनी अफझलखानाला वाईला पाठवून जावळी ताब्यात घ्यायचा आदेश  दिला.अशाप्रकारे अफझलखान वाईचा सुभेदार झाला.
शिवाजी राजांनी नेमलेला यशवंतराव या चंद्ररावला बाजुला करुन आदिलशाही दरबाराला सोयीची व्यक्ती नेमणे व जावळीचा प्रदेश पुन्हा ताब्यात घेणे यासाठी अफझलखानाची नेमणुक झाली होती, शिवाय जोर खोरे हणमंतराव मोरे याने काबीज केले होते.तेही ताब्यात घेणे हा अफझलखानाचा हेतु होता.अर्थात हे काम स्थानिक माहितगार व्यक्तिशिवाय होणे शक्यच नव्हते.म्हणून अफझलखानाने कान्होजी जेध्यांना जुलै १६४९ पत्र पाठविले ते असे.  या पत्रानंतर ३० जुलै १६४९ मध्ये दुसरे पत्र पाठविले.ते असे

   या पत्रात अफझलखान स्वतः जावळीवर जाणार असून आपल्या मदतीला येण्यासाठी त्यांने कान्होजींना अनेक सवलती व बक्षीसे देउ केलीत.कान्होजी प्रमाणे अशीच पत्रे बाकीच्या देशमुखांनाही गेली होती.त्यापैकी काहीजण मदतीला गेलेही होते.

पुढे हणमंतराव मोर्‍याला मारुन जोर खोरे ताब्यात घ्यायचा खानाचा इरादा होता.त्यासाठी कान्होजी जेध्यांची मदत पाहिजे म्हणून त्याने कान्होजींना सप्टेंबर १६४९ मध्ये आणखी एक पत्र लिहीले. मात्र कान्होजींनी शिवाजी राजांना स्वराज्य कार्यात मदत करायचे वचन दिले असल्यामुळे खानाच्या या पत्रांना भीक घातली नाही.अर्थात खानाला फार मोठी हालचाल करता आली नाही.दरम्यान इ.स.१६५५ मध्ये कर्नाटकात बंड झाल्यामुळे आदिलशहाने खानाला तिकडे पाठवून दिले.अफझलखान वाईत होता तोपर्यंत मोठी लष्करी हालचाल टाळणार्‍या शिवाजी महाराजांचा दाब आता नाहीसा झाला.त्यांनी तातडीने हालचाल करुन जावळी ताब्यात घेतली.
मोघलांशी तह झाल्यामुळे विजापुर दरबाराला उसंत मिळाली आणि त्यांनी आपले सगळे लक्ष शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्याकडे केंद्रीत केले. अर्थात या स्वारीला नामजद कोणाला करायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे नव्हता.शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे दुसरा विजापुरचा सरदार राजांवर चालून जायला तयार
नव्हता आणी वाई,जावळीचा माहितगार व वाईचा सुभेदार या नात्याने अफझलखानालाच हि जबाबदारी घ्यावी लागणार होती.
मोहीमेचा विडा उचलला:
मार्च १६५९ चा एक दिवस.विजापुर दरबार नेहमीप्रमाणे भरला. आदिलशहाचे आगमन दरबारात झाले, व अल्काबच्या आरोळ्या देण्यात आल्या. त्यावेळी दरबारात अनेक मातब्बर सरदार हजर होते जसे की रणदुल्ला खान, मुस्तफा खान, मुसेखान, अंकुश खान, पैलवान खान. तसेच काही मराठा सरदार मंबाजी भोसले म्हणजे शिवरायांचे चुलत चुलते हे त्यावेळी दरबारी उपस्थित होते. शिवरायांचे मेहुणे फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे दरबारात उपस्थित नव्हते. अन दरबार भरला, कोणत्याही सरदाराला दरबाराचे प्रयोजन ठाऊक नव्हते. नुसती कुजबुज चालू होती सगळीकडे. बडी बेगम ही आदिलशहाच्या डाव्या बाजूला बसली होती. आणि त्यात मागे एका तबकात एक विडा ठेवला, तो सर्वांना दिसला अन मग सरदारांना कळले की कोणतीतरी मोहीम असावी.
बडी बेगम साहिबा संतापून बोलली, “हमने ये दरबार क्यू बुलाया है जानकारी है किसीको?” सर्वांनी नकारार्थी माना डोलवल्या, “उस नाचीज सीवा को गिरफतार करना है, जिंदा या मुर्दा. है ऐसा कोई मर्द सरदार जो इस मूहिम को फतेह कर सके?” अन सगळा दरबार एकदम शांत झाला. सगळे सरदार घाबरले, कारण सर्वजण शिवरायांकडून कधी न कधी पराभूत झाले होते. सर्व आदिलशाही सरदारांचा असा समज होता की शिवाजी म्हणजे भूत. कधी येतो, कुठून येतो, मारतो, कुठे जातो, कोणालाही ठाऊक नव्हते. कोणीही त्यांना पाहिले नव्हते. शिवाजी म्हणजे एक अदृश्य माणूस अशी नोंद तत्कालीन सलातीन मध्ये आढळते. अन या सर्व कारणांमुळे कोणीही विडा उचलायला तयार होईना. बडी बेगम खवळली.
तेवढ्यात मागच्या रांगेतून एक सरदार उठला, अंगाने धिप्पाड, साडेसहा फूट उंच, जणू काही हत्तीचं. त्याच नाव होतं, खान ए मोहम्मद अफजलखान. तो पूढे चालू लागला अन चालताना त्याच्या जडावांचा कररर कररर असा आवाज येऊ लागला. सगळीकडे एकच कुजबुज सुरू झाली, अफझलखान, अफझलखान…. खानाने विडा उचलला आणि त्याने शपथ घेतली. खान म्हणाला “ये सिवा सिवा क्या लगा रखा है. कोण है ये सिवा, पहाड का चुहा.” सगळा दरबार खुश झाला, बडी बेगम खुश झाली. अन तेव्हा खानाला त्या दरबारात खिल्लत दिल्याची नोंद आहे, अन सोबतच आदिलशहाची रत्नजडित कट्यार अन एक लुगडं. लुगडं म्हणजे आपल्याकडे असत ते नाही, लुगडं हा पर्शियन भाषेतील शब्द आहे, सत्कार करताना आपण शाल वगैरे देतो ना त्याप्रकारे एक तलम रेशमी वस्त्र असते त्याला तिकडे लुगडं म्हणतात.
खानाने मोहिमेची तयारी चालू केली. त्यावेळी साधारणतः मार्च १६५९ चा काळ होता. खानाने सैन्याची जमवाजमव केली. खानाचे लष्कर असे होते बारा हजार घोडेस्वार, दहा हजार पायदळ,पंचहत्तर मोठ्या तोफा,चारशे छोट्या तोफा .शिवाय बरोबर अंबरखान्,याकुतखान्,मुसेखान,हसनखान पठाण,अब्दुल सैय्यद्,बडा सैय्यद्,तुझा पहिलवानखान,सैफ खान, सिद्दी हिलाल, अंकुशखान,घोरपडे, पांढरे नाईक, खराटे नाईक, काटे,झुजांरराव घाटगे, कल्याणजी यादव्,शिवाजी देवकांते, शहाजीचा चुलतभाउ मंबाजी भोसले,पिलाजी व शंकराजी मोहीते हे सगळे सरदार होते.वकील म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होते.

याशिवाय अफझलखानाचा मुलगा फाझलखान व आणखी दोन मुल तसेच पुतण्या रहिमखानाला होता.याशिवाय जावळीचा प्रतापराव मोरे खानाला मदत करण्यासाठी होताच.त्याला शिवाजी राजांवर सुड उगवून जावळी पुन्हा ताब्यात घ्यायची होती.
खानाचा पहिला मुक्काम विजापूर वेशीवर पडला. तेव्हा खान युद्धाचे डावपेचआखत होता. अन तेवढ्यात त्याला एक खबर मिळाली की त्याचा निशाणाचा फत्तेलष्कर नावाचा हत्ती मरण पावला. खानाला जबर धक्का बसला. याशिवाय छावणीवर सारखे कावळे ओरडत होते, भर दुपारी सुर्य दिसेना झाला,परवा तर आकाशात ढग नाहीत तरी मोठा आवाज झाला, उल्का पड्ली , रात्री अपरात्री छावणीजवळ कोल्हे ओरडत आहेत, दोनदा निशाणाची काठी मोडली. खडे,धूळ उडवणारा वारा छावणीला नुकसान करुन गेला.  एक हत्ती अंकुश लावून ही उलटा पळत सुटला.असे अनेक अपशकून अफझलखानाला झाले हे सविस्तर शिवभारतात आले आहे.
त्यात खानाचा गुरु, काझी त्याला बोलला माझ्या स्वप्नात दोन दिवस झालं तुझं मुंडक नसलेलं धड येतंय, तू मोहिमेवर जाऊ नये, तुला धोका आहे. खान
रागावला अन खानाने काझीला मारले. खान अशा गोष्टी मानत नव्हताच मुळी.

खानाने स्वतासाठी बनवून घेतलेली कबर …पण बिचारा तेथे दफन नाही होऊ शकला !(शहाबाग,विजापूर )
स्वारीवर जाण्यापूर्वी निर्वाणीचे उपाय म्हणून त्याने आपल्या ६३ बायकांना जीवे मारले…हाच आकडा काहीजण २०० हि सांगतात नक्की माहिती नाही. स्त्रियांना मारायचे कारण असे कि आपल्या नंतर त्यांनी काही बदमामल करू नये किंवा दुसर्या पुरुषास आपले सुखाचा वारीस करून आपल्या नावास बट्टा लावू नये. Abe Carey’ने आपल्या प्रवास वर्णनात हे सर्व टिपून ठेवले आहे म्हणून आज आपल्याला हा इतिहास समजला.

 या कबरी विजापूर जवळील अफजलपूर येथे पहावयास मिळतात.

अफझलखानच का ?
अफझलच्या निवडीमागे बऱ्याच इतिहासकारांनी अफझल व भोसले घराण्याचा दावा असल्याचा एक सिद्धांत प्रचलित केला आहे. त्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याआधी काही गोष्टी येथे विचारात घेणे आवश्यक आहे. विजापूरची आदिलशाही मोडकळीस आली असून काही मोजके एकनिष्ठ सरदार अपवाद केल्यास उर्वरित आदिलशाहीसरदारांचा भर सवता सुभा निर्माण करण्यावरच होता. दुसरे असे कि, महंमद नंतर तख्तावर बसलेला अली हा अनौरस पुत्र असल्याने शहाजी, बहलोलखान, रुस्तमजमा इ. चा त्याच्या वारसा हक्कावर आक्षेप होता. अशा स्थितीत निव्वळ आदिलशाही अभिमानी व पराक्रमी असा अफझलखान आदिलशहास शिवाजीरुपी संकटावर उतारा वाटल्यास त्यात नवल ते काय !
शिवाजी महाराजांवर अफझखानास रवाना करण्यामागे आदिलशहा — विशेषतः बडी बेगमचे निश्चितच एक धोरण ठरलेलं होतं. शिवाजी राजांचे अस्तित्व व त्याचं वाढत जाणारं प्रस्थ आदिलशाहीच्या नाशास कारणीभूत ठरण्याची तिला रास्त भीती वाटत होती. जरी मोगल दख्खनी सत्तांचे स्वाभाविक शत्रू असले तरी समानधर्मीय तसेच प्रसंगी गोवळकोंड्याच्या मदतीच्या भरवशावर आदिलशाही स्वतःचा बचाव करू शकत होती. शिवाय अफझलची शिवाजी महाराजांवर नियुक्ती करेपर्यंत जरी वारसा युद्धाचा निकाल लागला नसला व अफझल विजापूरातून निघण्यापूर्वी औरंगजेब तख्तावर बसला असला तरी आधी म्हटल्याप्रमाणे धार्मिक कट्टरता वा प्रेमाच्या बळावर मोगली तडाख्यातून या शाहीचा बचाव करण्याची बडी बेगमला उमेद असावी. अर्थात, जास्त व्यावहारिक विचार केला असता शहजादा औरंगजेबाने स्वतःच्या मर्जीने अनाधिकारपणे का होईना विजापूरकरांना निजामशाही कोकणचा भूप्रदेश घेतल्याने जो सध्या शिवाजी राजांच्या ताब्यात होता — तो प्रदेश फिरून जिंकून घेऊन आपले बळ वाढवणे व भविष्यातील मोगल – शिवाजी अशा संभाव्य युतीला मुळातच खुडून टाकणे असाही दृष्टीकोन विजापूरकरांचा असू शकतो. तात्पर्य, शिवाजी – आदिलशहा यांच्यातील झगडा एका निर्णायक टप्प्याजवळ येऊन पोहोचला होता. या लढ्यात जो जिंकेल त्याचेच नंतर वर्चस्व राहणार होते, हे उघड आहे.
विजापूरकरांनी शिवाजी राजांवर स्वारी आखली खरी परंतु अलीकडच्या काळातील सततच्या मोहिमांमुळे लष्करीदृष्ट्या त्यांना आवश्यक तितके बळ जमवता न आल्याचे उपलब्ध साधनांवरून दिसून येते. अफझलच्या सैन्याचा सरासरी आकडा पंधरा ते वीस हजारांच्या दरम्यान जातो. त्याउलट शिवाजी राजांकडे याहून अधिक सैन्य असल्याचे दिसून येते. परंतु इतिहासकारांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने घटनेचं आकलन करून न घेता, या प्रकरणाचे एकंदरच काल्पनिक – अद्भुत वर्णन करण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते.
इ.स. १६५८-५९ च्या सुमारास शिवाजी राजांचे लष्करी सामर्थ्य, विजापूरच्या तुलनेने अधिक वाढले होते किंवा त्याच्या बरोबरीचे बनले होते. शिवाजीसोबत खुल्या मैदानात टक्कर देण्याची ताकद आता आदिलशाहीत तितकीशी राहिली नव्हती. वर्षानुवर्षे चालणाऱ्या अंतर्गत बंडाळ्या आणि निजामशाही, कुतुबशाही व मोगल तसेच कर्नाटकातील लहान – मोठ्या सत्ताधीशांशी वारंवार झुंजण्यात आदिलशाहीचे बरेच नुकसान झाले होते. एकेकाळी असलेला तिचा रुबाब, सामर्थ्य आता पार मोडकळीस आले होते. विजापूरच्या तुलनेने शिवाजी राजांच्या राज्याचा विस्तार जरी लहानअसला तरी लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत शिवाजी महाराजांची तयारी विजापूरकरांच्या तुलनेने अधिक होती. उदाहरणार्थ शिवाजी राजांवरील नियोजित स्वारीत अफझलखानाचे लष्कर घोडदळ व पायदळ मिळून सुमारे वीस – पंचवीस हजार इतके होते तरीही आदिलशाही दरबाराने अफझलखानास शिवाजी राजांसोबत प्रत्यक्ष लढाई न देता शक्यतो त्यांना भेटीच्या निमित्ताने बोलावून दगा करण्याचा कानमंत्र दिल्याचे उल्लेख मिळतात. यावरून असे दिसून येते कि, यावेळी शिवाजी राजांचे लष्करी सामर्थ्य बरेच वाढले होते. सभासद बखरीचा आधार घेतला असता या मोहिमेच्या वेळी खानाइतकेच सैन्य शिवाजी राजांच्या पदरी होते. परंतु या सैन्यात गड – किल्ल्यांवर असलेल्या शिबंदीचा अंतर्भाव केला आहे कि नाही याची निश्चिती होत नाही. असे असले तरी शिवाजी महाराज आणि तत्कालीन सत्ताधीशांच्या लष्करी व्यवस्थेत एक महत्त्वाचा फरक होता व तो म्हणजे त्याचे सैन्य हे खडे सैन्य असून त्यावर प्रत्यक्ष शिवाजी राजांची हुकुमत चाले ! त्याउलट तत्कालीन सत्ताधीशांकडे असे खडे सैन्य तुलनेने कमी असे. मोहीम किंवा युद्धप्रसंग उद्भवल्यास पदरी असलेल्या जहागीरदारांकडून लष्करात खोगीरभरती केली जात असे. या बाबतीत अफझलखानाची फौज देखील अपवाद नव्हती. शिवाजी राजांचे राज्य लहान असल्याने व पदरी बलाढ्य लष्कर असल्यामुळे या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांना वर्षभर शत्रूप्रदेशात मोहिमा आखाव्या लागत. सधन प्रदेशात लूटमार कारणे किंवा खंडणी गोळा करणे या दोन मार्गांनी शिवाजी महाराज आपल्या सैन्याचा बव्हंशी खर्च भागवत असत. याठिकाणी हे नमूद कारणे योग्य होईल कि, पूर्णवेळ पगारी सैन्य पदरी बाळगण्याची आर्थिक ताकद शहाजी राजांमध्ये असल्यामुळेच शहाजी महाराजाना एकाचवेळी मोगली आणि विजापुरी फौजांचा सामना करून पेमगीरीवर निजामशाहीची उभारणी करता आली होती !

शिवाजी राजांची वाढती सत्ता जमल्यास नियंत्रणात आणण्यासाठी वा नष्ट करण्यासाठी आदिलशाही विशेष उत्सुक असली तरी याकरता लागणारे पुरेसं सैनिकी सामर्थ्य त्यांच्याकडे अजिबात नव्हतं. त्यामुळेच हरप्रयत्ने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याकरता त्यांनी आपला सर्वोत्तम सरदार — अफझलखान याकामी नेमला.
विजापूर दरबाराने शिवाजीवरील नियोजित स्वारीसाठी अफझलखानाचीच का निवड केली असावी ? ‘ शककर्ते शिवराय ‘ या शिवचरित्राचे लेखक श्री. विजय देशमुख यांच्या मते त्यावेळी एक अफझलखान अपवाद केल्यास विजापूर दरबारी आता कोणी पराक्रमी, स्वामिनिष्ठ व शूर असा सेनानी राहिला नव्हता. उपलब्ध साधनांतील माहिती पाहता देशमुख यांचे मत अगदीच चुकीचे नसल्याचे दिसून येते. अफझलखान विजापुरातून रवाना झाल्याची बातमी शिवाजी महाराजांना त्याच्या हेरांकडून मिळाली असे म्हणता येईल. तसेच खानाच्या अंतस्थ हेतूंची कल्पना विजापूर दरबारातील शिवाजी राजांच्या मित्रांनी कळवली असण्याची अधिक शक्यता आहे. त्याशिवाय मोहिमेची सूत्रे हाती घेताच आदिलशहाने व अफझलखानाने मावळातील देशमुख – वतनदारानंना जी काही आज्ञापत्रे पाठवली त्यातील भाषा पाहता खान शिवाजी महाराजांचा पुरता बंदोबस्त करण्याच्या उद्देशानेच बाहेर पडल्याचे दिसून येते.
इकडे अफझलखानाचा काटा कोणत्याही परिस्थिती काढण्याचा बेत शिवाजी महाराजांनी मनोमन पक्का केल्याचे दिसून येते. कदाचित खानाला मारून टाकण्याची योजना आरंभापासून त्यांच्या मनात नसेल पण त्याचा एकदा सडकून समाचार घेण्याची / पराभव करण्याची इच्छा शिवाजी राजांच्या मनात नसेल असे म्हणता येत नाही. अर्थात, खानाचे भोसले घराण्याशी असलेले वैर, विजापूर दरबारातील त्याचे प्रस्थ आणि त्या दरबाराचे त्याच्यावर अवलंबून असणे व शिवाजी राजांचे तिशीच्या आतील वय लक्षात घेता महाराजांची इच्छा त्याच्या वयानुरूप अशीच होती.
शिवाजी – अफझलखान प्रकरणाचे साधार विश्लेषण श्री. विजयराव देशमुख यांनी आपल्या ‘ शककर्ते शिवराय ‘ या ग्रंथात केले आहे. ज्यांना या प्रकरणातील अधिक तपशील जाणून घ्यायचे आहेत अशा जिज्ञासू वाचकांनी त्या ग्रंथाचे वाचन करावे. श्री. देशमुख यांच्या मते, खान आरंभी जावळीमध्ये उतरण्यास तयार नव्हता. उलट शिवाजी राजांना खुल्या मैदानात खेचण्याचा त्याने भरपूर प्रयत्न केला. परंतु पुढे राजकीय परिस्थती इतक्या झपाट्याने बदलली कि खानालाच जावळी प्रांतात उतरणे भाग पडले. देशमुखांनी आपल्या निष्कर्षासाठी जे काही पुरावे दिले आहेत त्यावरून त्यांचे मत यथायोग्य असल्याचे दिसून येते. कित्येक इतिहासकारांचे देखील देशमुखांप्रमाणेच मत असल्याचे दिसून येते
खानाचे हे नियोजित बेत उधळून लावण्याची शिवाजी महाराजांनी दोन आघाड्यांवर तयारी चालवली. खान आला तर थेट वाई वा जावळी परिसराच्या रोखानेच येणार हे हेरून शिवाजी महाराजांनी जशी बचावाची सिद्धता चळवळी — ज्यामध्ये ओस पडलेला जासलोडगडाचे ‘ मोहनगड ‘ असे नामांतर करून तो वसवण्याची त्यांनी तजवीज केली — त्याचप्रमाणे खानाच्या जहागीर प्रदेशात — तेरदळ भागावरही एक आघाडी रवाना केली. जेणेकरून खान आपल्या जहागिरीच्या बचावार्थ पुण्याचा रोख सोडून कर्नाटकात गुंतून पडेल. परंतु शिवाजी महाराजांच्या सैन्याला त्या भागातील कृष्ण गौड देसाईने उधळून लावले व खानानेही या स्वारीची फारशी तमा बाळगल्याचे दिसून येत नाही.
या संदर्भात शिवचरित्र प्रदीप मध्ये पृष्ठ क्र. ८३ ते ८६ वर छापलेली पत्रं विशेष उपयुक्त असून त्यानुसार शिवाजी महाराजांनी या प्रांती सुभेदार गंगाजी महादेवला पाठवल्याचे स्पष्ट होते. या स्वारीत कृष्ण गौडा मारला गेल्याचा एका पत्रात उल्लेख आहे परंतु हा प्रकार नेमका कधी घडला म्हणजे दि. ७ ऑक्टोबर १६५९ चं अफझलचं पत्र तेरदळ परगण्याच्या कारकुनांना उद्देशन लिहिलेलं असून त्यानुसार शिवाजी राजांच्या सैन्याचा बंदोबस्त केल्याबद्दल कृष्ण देसाईला इनाम दिल्याचा उल्लेख आहे. परंतु कृष्ण देसाई मेल्याविषयीचा उल्लेख नाही. असो. परंतु यावरून असे दिसून येते कि, खान शिवाजी राजांला मोकळ्या मैदानात खेचायला बघत होता व शिवाजी महाराज खानला जावळीत ओढू पाहत होता, असा सर्वसाधारण समज असल्याप्रमाणे प्रकार नसून प्रत्यक्षात उभयतांचे डावपेच काही वेगळेच असल्याचे दिसून येते. असो.
विजयराव देशमुख आणि इतर इतिहासकारांचे मत काहीही असले तरी जी काही साधने उपलब्ध झाली, त्यांच्या अभ्यासावरून निष्कर्ष हा वेगळाच आहे. विजापुरातून खान जेव्हा बाहेर पडला तेव्हाच त्याला खुल्या मैदानात किंवा सोयीच्या ठिकाणी घेरून त्याचा नाश करण्याचा शिवाजी राजांचा आरंभीचा बेत होता. परंतु, ‘अफझलखान ‘ या नावाचा दरारा असा होता कि, शिवाजी राजांच्या मुत्सद्द्यांनी, सरदारांनी महाराजांच्या विरोधात आपले मत व्यक्त केले. खानाशी लढाई न करता तहाच्या वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवावा असे शिवाजी राजांच्या सल्लागारांचे मत होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपला मूळचा लढाईचा बेत बदलून नवीन डाव टाकला. याविषयी सभासद बखरीमधील उल्लेख मननीय आहे. या बखरीनुसार खान विजापुरातून बाहेर पडला तेव्हाच शिवाजीं महाराजांनी त्याला जावळीमध्ये घेरण्याचे ठरवले होते परंतु त्याच्या सल्लागारांनी लढाईच्या विपरीत सल्ला दिल्याने शिवाजी राजांनी तो बेत रद्द केला. पुढे भवानीमातेचा त्यांना दृष्टांत झाला व हे वर्तमान सर्व मुत्सद्द्यांना समजल्यावर त्यांना एकप्रकारे मानसिक बळ प्राप्त झाले व जावळीमध्येच खानाचा निकाल लावण्याच्या शिवरायांच्या बेतास त्यांनी संमती दिली.
अफझलखानास मारून टाकण्याची शिवाजी महाराजांची इच्छा आरंभापासून होती किंवा नव्हती पण, जावळीमध्ये जेव्हा खानाला येण्यास भाग पाडण्याचे ठरले तेव्हाच खानाचा काटा काढण्याचे शिवाजी महाराजांनी नक्की केले होते. या दृष्टीने सभासद बखरीत पंताजी गोपीनाथ व शिवाजी राजे यांचा जो संवाद आलेला आहे तो सूचक आहे. हा संवाद जसाच्या तसा घडला नसला तरी खानाचा निकाल लावण्याचे शिवाजी महाराजांनी आधीच नक्की केले असल्याचे यातून दिसून येते.
तुळजापुर्,पंढरपुर तिर्थस्थळांना उपद्रवः-
अफझल विजापूर येथून निघाला, पण शिवाजी महाराजांचा मुख्य जहागीर असलेल्या पुण्यात येण्याऐवजी त्याने तुळजापूर, पंढरपूर इत्यादी ठिकाणी हल्ला करुन तेथील मंदिरे नष्ट केली. शिवाजीं राजांना डोंगरावरून मोकळ्या मैदानावर खेचणे हा त्याचा हेतू होता, जिथे मराठ्यांचा पराभव करणे सोपे होईल. त्याचा मार्ग, हा थोडा हास्यास्पद वाटतो. असा प्रयत्न करणे ही एक चांगली रणनीती होती, परंतु मराठ्यांना त्यांची शक्ती आणि कमकुवतपणा यांचे उत्कृष्ट ज्ञान होते आणि म्हणूनच त्यांनी बाहेर येण्यास नकार दिला. 

  विजापुर ते वाई- अफझलखानाचा मार्ग

शिवरायांची मुत्सद्देगिरी
शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी येथे नोंद करावी. अफझलला विनाश थांबवण्यासाठी पत्र पाठविण्याची तसदीही घेतली नाही. अफझलला अशा प्रकारे ती योजना सोडावी लागली. काही अभ्यासकांच्या मते अफझलखानाने तुळजापुर्,पंढरपुराला उपद्रव दिला नाही.तुळजापुर तर त्याच्या मार्गात येतच नव्हते.मात्र एक लक्षात घेणे गरजेचे आहे कि हि चाल अफझलखानाने मुद्दाम केली होती.जावळीच्या बिकट मुलुखातून शिवाजी राजांना बाहेर काढणे यासाठी त्याला काहीही करणे आवश्यक होते,शिवाय सभासदाच्या बखरीत तसे स्पष्ट वर्णन आहे. आणखी एक मुद्दा ,हे युद्ध सोडले तर पुढे शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या परिसरात कोणतेही मोठे युध्द केले नाही आणि त्यांचा मुक्काम राजगडावर असायचा तरीही त्यांनी प्रतापगडावरच भवानी मातेची मुर्ती स्थापन करुन मंदिर उभारले ते घटनेची आठवण म्हणून असावे.
अफझलखानाचा मोहीम मार्ग विजापूर -तोरवे-डोन-माणकेश्वर-करकंव-भोस-शंभू महादेव-मलवडी-रहिमतपूर-वाई.
(भोसले बखर मध्ये खान भिमातीरी होता असा उल्लेख आहे, )
खान स्वराज्यावर चालून निघाला:-
अफझलखान जुन १६५९ मध्ये विजापुरवरुन स्वराज्याच्या दिशेने निघाला.त्यावेळी अलि आदिलशहाने मावळातील देशमुखांना खानास मदत करण्याची पत्रे
पाठविली.त्यात एक फर्मान कान्होजी जेधेंना आले ते असे.

हे मुळ फारसी फर्मान

     हे त्याचे भाषांतर
कान्होजी जेधे शिवरायांस मिळाले !      जेधे बाजी पासलकर यांचे जावई असल्याने जेधे आले कि पासलकर येतील असे खानाला वाटले, खानाने जेध्यांना आपल्या वाई प्रांत हवालदार त्र्यंबक कान्होच्या कडून निरोप पाठवला. “आपला जमाव घेऊन सिताबीने यावे,खर्चाची तरतूद स्थळी केली जाईल,आम्ही तायाघाट ओलांडून गेलो आहोत” खान तोपर्यंत वाईहून निघोन कुसगाव,चिखली,तायाघाट ,गुव्हेघर,गुताड असे करत लिंगमळ्यापर्यंत पोचला. खालील पत्र जेध्यांस खानकडून आलेले आहे, ते पत्र जोडून अजून एक पत्र जेध्यांनी शिवरायांना पाठवले व या कमी त्यांचा सल्ला विचारला.

जेध्यांना आलेले खानाचे पत्र जोडून जेध्यांनी शिवरायांना पाठवले. यावेळी साधारणतः ऑक्टोबरचा दुसरा आठवडा सुरू होता. नाईकांनी आपली पाचही मुलांना सोबत घेतलं अन राजगडच्या खोऱ्यात शिवापट्टण येथे ते महाराजांच्या भेटीस आले, त्यांनी राजांना फर्मान दाखवलं. राजे बोलले “कान्होजी काका तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. प्रतापराव मोरे गेले, खंडोजी खोपडे गेले, तुम्हीही जावं खानाकडे, वतन मिळेल.” अन राजांचे हे करारी शब्द कान्होजींच्या काळजाला लागले. मागेच ओसरीवर ठेवलेला पाण्याचा तांब्या त्यांनी हातात घेतला, अंगठ्यावर तो रिकामा केला व सगळं पाणी आपल्या पाचही मुलांवर शिंपडल. अन कान्होजी कडाडले, ” राज वतनाची गुडी न्हाई अमास्नी, रक्तात हरामखोरी न्हाई आमच्या. एकदा सबुद दिला की मागे हटणारी जात न्हाई या म्हाताऱ्याची. ” अन असे म्हणताच राजांनी कान्होजींना कडकडून मिठी मारली.
कान्होजी जेधे हे शहाजीराजांचा उजवा हात होते. बारा मावळांत त्यांचा शब्द मोडायची कोणाच्यात हिंमत नव्हती. अन राजांनी त्यांना जबाबदारी दिली की
मावळातील सर्व मराठा सरदारांना एक करून स्वराज्यात आणायची. अन कान्होजींनी सर्व सरदारांना एकत्र आणले, त्यात हैबतराव शिळीमकर, मोरे, काटके, बेचकर असेच अनेक सरदार होते.
जेधे आपल्या बाजूने आल्यावर राजांनी खलबते करण्यास मोरोपंत,सोनोपंत,नेतोजी पालकर,निळोपंत,रघुनाथ बल्लाळ,गोमाजी नाईक पानसंबळ,सुभानराव नाईक इ. मातब्बर बोलावले.
शिवराय आणि खानाची सरदारांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी केलेली मुत्सद्देगिरी: –
पांढरे,घाटगे,घोरपडे,इंगळे हे लोक तर खानच्या बरोबर होतेच त्या बरोबरच खानाने मोठी गौरवाची पत्रे लिहून मावळातील लोक आपल्या बाजूने वळविण्यास सुरुवात केली.शिळीमकर,जेधे ,बांदल,जगदाळे,धुमाळ इ. लोकास आपल्या हस्तका मार्फत आपल्या बाजूने घेण्यास सुरुवात केली.शिळींमकरांचा तंटा शिवाजी राजांनी सोडवला होता त्यामुळे ते २ भाऊ शिवाजी राजांच्या बाजूने आले तर विठोजी नाईक खानच्या बाजूला गेला. तसेच मंबाजी भोसलेला खानाने ओढला तर बाबाजी भोसलेला चिठ्ठी लिहून शिवरायांनी बोलावून घेतले.
अशी हि ओढाओढी दोन्ही बाजूने चालू होती पासलकर,ढोर (धुमाळ),मरळ,बांदल ,ढमाले यांना आपल्या बाजूने वळवून शिवाजी महाराजांनी त्यांस कडून शपथा घेतल्या!
(तळटीप:– ढमाले हे मुळचे मद्रासकडील तिरुनवेल्ली प्रांतात रहाणारे.मुळशी पेट्यातील पौड खोर्‍यात यांची शेकडो वर्षांची वस्ती आहे.यांचा किताब ‘राउतराव’ असा होता.यांचे नाव रामाजी राउतराव ढमाले.शिळीमकरांच्या शके १५७९ मधील शिवाजी राजांनी दिलेल्या एका महजरावर यांची साक्ष आहे.
मरळ-यांचे नाव बाबाजी बिन कान्होजी मरळ.हे झुंजारराव असा किताब लावीत.हे कानद खोर्‍यातील देशमुख.
ढोर- हे वेळवंड खोर्‍यातील देशमुख.मुळ आडनाव धुमाळ.यांचा भाउबंदकीचा तंटा शिवाजी महाराजांनी सोडवून दिला होता.सध्या भोरजवळील पसुर्‍यात यांचे वशंज आहेत.)
या युद्धात २ मराठा महिलांनी हि प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे भाग घेतला,दीपाबाई बांदल आणि बबई खोपडे.दीपाबाई यांनी म्हसवडे या बांदल यांच्या कारभाऱ्या सोबत आपले सैन्य राजांच्या बाजूने लढायला पाठवले ,तर बबई खोपडेंनी आपले सैन्य खानाच्या बाजूने लढविले !

अफझलखानाचे नियोजनः-
अफजलखानाने मे महिन्यात पुण्याजवळ शिवाजी राजांना त्वरित लढाईसाठी बाहेर काढण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. जून महिना सुरू झाला आणि शिवाजी महाराज राजगड येथे राहिले. काही आठवड्यांनंतर मुसळधार पावसाळा सुरू झाला, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मोठ्या सैन्याच्या हालचाली अशक्य झाल्या. आता अफझलखानाला काही नवीन सुरुवात करण्यापूर्वी चार महिने थांबावे लागेल.परंतु शिवाजी राजांनी मुत्सदीगिरीने एक डोकेदुखी टाळली होती – उघड्यावर अफझलखानचा सामना करणे.

 अफझलखानाने शिवाजी राजांच्या स्वराज्यावर पाठविलेले सरदार

वाईजवळ आल्यावर खानाने शिवाजी राजांच्या प्रदेशात ठिकठिकाणी आपले सरदार रवाना करून शिवाजी राजांचे राज्य ताब्यात घेण्याची व त्याचे लष्करी बळ ठिकठिकाणी विखुरले जावे यासाठी कारवाई आरंभली. त्यानुसार पुणे प्रांती सिद्दी हिलाल, सुप्यावर जाधव, शिरवळवर नाईकजी पांढरे, सासवडवर खराटे तर तळकोकणात सैफखानास अफझलखानाने रवाना केले. या सरदारांच्या प्रतिकारार्थ शिवरायांनी काय योजना आखल्या याची पुरेशी माहिती मिळत नाही. लष्करी कारवाई सोबत खानाने — विशेषतः आदिलशहाने शिवाजी राजांच्या विरोधात राजकीय आघाडीवरही बरीच मुसंडी मारली होती. शिवाजी राजांना सामील झालेल्या व त्यांच्या राज्यातील बहुतांशी देशमुख वतनदारांना फितवण्याची त्याने पराकाष्ठा केली व त्याच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही आले. शेवटी दीडशे वर्षांच्या प्रस्थापित राजवटीचे जनमानसावरील परिणाम हे त्या राजवटीस अनुकूल असेच होणार !
वाईला तळ ठोकून खानाने जी काही राजकीय – लष्करी मोहीम महाराजांविरुद्ध चालवली होती त्यांस शक्य तितका प्रतिकार करण्याची शिवाजी राजांनी शिकस्त केली असली तरी या लढ्याचा निर्णायक टप्पा नजरेत येत नव्हता व या पद्धतीने निकाल लागणंही शक्य नव्हतं. लष्करीदृष्ट्या उभय पक्ष तुल्यबळ असले तरी एकाच लढाईत सर्व बळ एकवटण्याचा जुगार खेळणे शिवाजी राजांच्या नव्या सत्तेला परवडणारे नव्हते. त्याचप्रमाणे मोहिमेकरता आदिलशहाने कितीही प्रचंड प्रमाणात आर्थिक तसेच दारुगोळा, अन्नधान्याची तरतूद केली असली तरी औरंगजेब तख्तारूढ झाल्याने मोगलांच्या हस्तक्षेपाची शक्यताही नाकारता येत नव्हती.
तात्पर्य, मोहीम कशाही प्रकारे का होईना शक्य तितक्या लवकर आटोपणे उभयतांनाही आवश्यक झाले होते व त्यानुसार खानाने वाटाघाटीचा मार्ग अवलंबला. ज्यानुसार शिवाजी महाराजांनी तहास प्रवृत्त होऊन आपल्या भेटीस येण्यास तयार व्हावे अशी खानाने खटपट आरंभली. खानाच्या हेतूंची शिवाजी महाराजांना कल्पना असल्याने त्याने खानाच्या गोटात जाण्याचे अखेरपर्यंत टाळले व खानाचे आवडते भक्ष्य — म्हणजे जावळीचा प्रांत व स्वतः शिवाजी — यांची त्यांनी खानास लालूच दाखवत त्यांस जावळीत खेचण्याचा उपक्रम आरंभला. इथे जावळीचे रणक्षेत्र कोणाच्या सोई वा अडचणीचे हा प्रश्नच मुळी उद्भवत नाही. कारण हे रणक्षेत्र तसेही उभयतांच्या सोईचेच होते. शिवाजी महाराज व त्यांचे सरदार जसे या प्रदेशाचे जाणकार होते तद्वत खानाच्या फौजेतील मोरे, खोपडे प्रभूती मंडळीही इथली माहितीगार होती. शिवाय आरंभी खान जावळीकडे यावा अशी शिवाजी राजांचीच इच्छा असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. परंतु एकदा खानाचा कल त्या भागातच घुसण्याकडे विशेष असल्याचे लक्षात येताच शिवाजी महाराजांनी स्थिती अनुकूल बनवण्याकरता शक्य तितके प्रयत्न केले.
त्यानी प्रथम खानास हरप्रयत्ने ससैन्य जावळी खोऱ्यात, प्रतापगडानजीक येण्यास भाग पाडले. लष्करासह त्या प्रदेशात शिरण्याचे प्रलोभन खानास आवडणारेच होते. अनायासे त्या प्रदेशात होणारा शिरकाव व प्रत्यक्ष भेटीचा होणारा लाभ या गोष्टींचा मोह तो कसा काय टाळणार होता ? खान प्रतापगडानजीक येईपर्यंत त्याला कसलाही उपसर्ग पोहोचू नये याची शिवाजी राजांनी पुरेपूर काळजी घेतली. याचाच अर्थ असा कि, सावज टप्प्यात येईपर्यंत गप्प राहून वाट पाहण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. त्याचप्रमाणे अंतस्थरीत्या त्यांनी आणखी एका डावाची तयारी आरंभली होती ज्याची अफझल वा आदिलशहास बहुधा अजिबात कल्पना नव्हती !
नव्याने तयार केलेला जावळीमधला प्रतापगड राजांनी खानाविरुद्ध लढण्यास नक्की केला. एकतर सर्वश्रुत कारण म्हणजे खानाची जडशीळ फौज. पण अजून एक कारण म्हणजे शिवरायांची लढाईची रणनीती. शक्यतो लढाई ही आपल्या प्रदेशात न होता सीमेवर किंवा बाहेर व्हावी ह्या करता ते नेहमी स्वराज्याच्या सरहद्दीवरील किल्ले नक्की करीत. ज्या किल्ल्यावर मी असेन तिथे अफझलखान पोचणार हे राजांना ठावूक होते आणि म्हणूनच त्यांनी प्रतापगड जवळ केला. लढाईचे क्षेत्र खानाने नव्हे तर राजांनी निवडले होते. नकळतच खानाचा पहिला पराभव झाला होता.
दुखाचा आणखी एक घास :-
सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला एक वाईट बातमी राजगडावरून प्रतापगडी पोचली. गेली २-३ वर्षे दुखणे घेऊन आयुष्य ढकलणाऱ्या महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला होता. शंभू बाळाची आई गेली होती. राजांची राणी गेली. स्वराज्यावर दुख्खाचे आकाश कोसळले. राजगडावर ५ सप्टेंबर १६५९ ला स्वराज्याच्या महाराणी सईबाईसाहेबांचे निधन झाले. शिवरायांसाठी हा खूप मोठा धक्का होता, कारण शंभूराजे जेमतेम सव्वादोन वर्षांचे होते, सईबाईंचे दुःख अन त्यात हा राक्षस स्वराज्यावर चालून आला. दुःख करीत बसायला आता त्यांना अजिबात वेळ नव्हता.
खानाशी पत्रव्यवहारः-
या दरम्यान अफझलखान आणि शिवाजी महाराज यांच्यात जो पत्रव्यवहार झाला तो अत्यंत रंजक आहे,सभासदाच्या बखरीमध्ये हा मुळ पत्रव्यवहार सभासदाने लिहून ठेवल्याने तो आपल्याला जसाचा तसा वाचायला मिळतो. कृष्णाजी भास्कर प्रतापगडी राजांची भेट घ्यायला आला पण राजे भेटच देईनात. त्याने मोरोपंत पिंगळे याना विचारलं काय कारण, तेव्हा पंत बोलले, “खान आला हे ऐकून महाराजांनी भयंकर धसका घेतलाय, ते खूप आजारी पडलेत, जाम घाबरलेत, अशक्तपणा आलाय त्यांना, त्यांनी अन्नपाणी सोडलंय हो. काल तर चक्कर येऊन पडले, ताप सुद्धा खूप भरलाय.” कृष्णाजी दोन दिवस प्रतापगडावर होता पण महाराज काही त्याला भेटले नाहीत. गडावर सारखी धावपळ सुरू होती, राजांच्या महालाकडे सारखा लोकांचा अन राजवैद्यांचा राबता सुरू होता. आणि तिसऱ्या दिवशी राजे कृष्णाजीला भेटले, ते ही अंगावर जाड कांबळ घेऊन.कृष्णाजीने राजांना खानाच पत्र दिल. अफझलखानाचे पत्र त्यांच्याकडे येऊन पोचले होते ज्यात मजकुर आहे.
पत्रात खान म्हणत होता (स्वैर अनुवाद)
१. विजापूर दरबाराने निजामशहा कडून जिंकून घेतलेला आणि मुघलांना तहात दिलेला दुर्गम दुर्गांचा हा संपूर्ण डोंगरी प्रदेश तू बळकावून बसला आहेस. तो परत कर.
२. कोकणात राजपुरीच्या राजाला (दंडा राजपुरी येथील सिद्दी) त्रास देणे तू ताबडतोब बंद कर.
३. शत्रूस प्रवेश करण्यास दुर्गम असलेला हा चंद्ररावचा प्रदेश (जावळी) तू मला परत कर.
४. तू कल्याण आणि भिवंडी काबीज केलीस आणि मला कळलाय की तिथे तू मशीद सुद्धा जमीनदोस्त केलीस.
५. तू मुसलमानांना लुटलेस आणि त्यांचा अपमान केला आहेस.
६. इतकेच नव्हे तर तू इस्लामचा अपमान करून स्वतःच्या हाताखाली मुसलमानांना कामावर ठेवले आहेस.
७. तू स्वतःला एक स्वयंघोषित राजा म्हणून, कोणालाही न घाबरता हवे ते निर्णय देतो आहेस. म्हणून तुला संपवायला मला आदिलशहाने पाठवले आहे.
८. मुसेखान आणि माझे बाकीचे सैन्य तुझ्याविरुद्ध लढण्यास अतिशय उत्सुक आहे. मी कधी एकदा त्यांना जावळीवर हल्ला करावयास सांगतो असे झाले आहे.
९. सिंहगड आणि लोहगड सारखे बळकट किल्ले, पुरंदर आणि चाकण सारखे मोक्याचे किल्ले, या शिवाय भीमा आणि नीरा नद्यांच्या मधला सर्व प्रदेश मुकाट्याने दिल्लीच्या बादशहाला परत कर.
पत्र वाचल्यावर राजांनी काय विचार केला असेल? शरण जावे? कदापि नाही. तह म्हणजे साक्षात मृत्यू हे राजांना ठावूक होते. अश्या कसोटीच्या क्षणी राजांनी एक वेगळाच व्युव्ह रचला. कृष्णाजीने राजांना पत्राचे उत्तर विचारले, राजे बोलले आम्ही आमचा वकील पाठवू. पण कृष्णाजी भास्करची जवळपास खात्री पटली की राजे भयंकर घाबरलेत. अन हा डाव राजांच्या मनाप्रमाणे पडला.
इकडे कृष्णाजी भास्कर वाईला आला, अन शिवरायांची ही अशी अवस्था पाहून त्याला अतिआत्मविश्वास झाला असावा. तो खानाला बोलला की शिवाजी राजे तर भयंकर घाबरलेत, आपण एवढी रणनीती अशा घाबरट माणसासाठी का आखतोय. पण खानाला विश्वास वाटला नाही.
इकडे प्रतापगडावर महाराजांनी सदर बोलावली आपला वकील निवडण्यासाठी. त्यावेळी राजांकडे तीन वकील असावेत असा अंदाज आहे. या तिघांना सगळ्या भाषा यायच्या. परंतु राजांनी यातील कोणालाच वकील म्हणून खानाकडे पाठवले नाही. राजांनी वकील म्हणून निवड केली ती पंताजी गोपीनाथ बोकील. खूप अनुभवी माणूस. पंताजी हे मूळचे कारीचे. पण त्यांचे पूर्वज सिंदखेडराजा येथे स्थायिक झाले. पंताजी बोकील हे चौरस नावाच्या सोंगट्याच्या खेळात खूप हुशार होते. थेट आउसाहेब आणि शहाजी महाराज यांच्याशी त्यांचा घरोबा होता.अशा माणसाची निवड राजांनी या मोहिमेपुरती वकील म्हणून केली.पंताजी राजांचा निरोप घेऊन वाईस आले.
त्या पत्रात अस लिहल होत की
१. कर्नाटकाच्या सर्व राजांना हरवणारे खुद्द आपण माझ्या भेटीला आलात ह्या सारखा आनंद कोणता.
२. तुम्ही तर या पृथ्वीतलावरचे एक दागिने आहात. तुमच्या बरोबर युद्ध म्हणजे आगीशी लढाई.
३. तुम्ही खरच येथे या आणि मनभरून जावळीचे दर्शन घ्या.
४. तुम्ही लवकरात लवकर इकडे आलात तर बरे होईल, म्हणजे माझी सर्व भीती निघून जाईल.
५. मला मुघल आणि विजापूरच्या सैन्याबद्दल अतिशय आदर आहे ज्यांच्याकडे तुमच्यासारखे पराक्रमी योद्धे आहेत.
६. येथे नक्की या. मी तुम्हाला माझे सर्व किल्ले सुपुर्द करीन. अगदी जावळी देखील.
७. तुमचे रूप म्हणजे एखाद्या वीर योद्धयाप्रमाणे आहे. आपली भेट होईल तेंव्हा मी माझी तलवार तुम्हाला सुपुर्द करीन.
८. जावळीच्या ह्या घनदाट, खोल आणि दूरवर पसरलेल्या जंगलात तुमच्या सैन्याला जगातल्या सर्वोच्च सुविधा मिळतील.
पंताजी राजांचा निरोप घेऊन वाईला आले, अन खानाला बोलले, “खानसाहेब राजे तुम्हाला खूप घाबरलेत हो. राजे लपून बसलेत. भितात खूप तुम्हाला. कृपया तुम्ही जावळीत यावं अन राजाची भेट घ्यावी.”अन हे ऐकून खान अस्वस्थ झाला, जावळी म्हणजे भयानक जागा हे त्याला ठाऊक होतं अन तो पंताजींना म्हणाला. “पंत जी, नही नही, मै जावली कदापि नही जाऊंगा. बडी कदीम जगह है जावली. हम इस बारेमे सोचेंगे.”
त्यावर पंताजी काका बोलले, “आपण आपली सगळी फौज घेऊन या, आम्ही आपणास यायला रस्ता करून देऊ.” अन पंत प्रतापगडी आले. परंतु दोन दिवसांतच राजांनी पंताजींना पून्हा वाईला पाठवले. यावरून शिवरायांच्या चाणाक्ष बुद्धीची कल्पना आपण करू शकतो, शत्रूच्या डोक्यात घुसून त्याला आपल्या मनाजोगत पाऊल उचलण्यासाठी भाग कस पाडायचे अन त्यासाठी वकिलामार्फत वारंवार निरोप पाठवून जवळपास त्याचा विचारच बंद करायचा. अन पंताजींनी तसच केलं. ते पुन्हा वाईला आले अन खानाला म्हणाले “खानसाहाब आप बेवजह सोच रहे है, प्रतापराव मोरे आपके साथ है, वो तो इस इलाके का चप्पा चप्पा जनता है.” हे ऐकून मोरेची सुद्धा छाती फुगली, तो खानाला बोलला,” जी हुजूर, मै हु ना आपके साथ”. अन नाही नाही म्हणत सरतेशेवटी खान तयार झाला. हा शिवरायांचा सगळ्यात मोठा विजय होता, की खान जावळीत येतोय.
अफझलखान जावळीच्या जंगलातः-
सुमारे बारा हजार निवडक सैन्यासह अफझलखान अखेर जावळीत उतरला. शिवाजी राजांच्या विनंतीवरून खान प्रतापगडाकडे निघाला खरा परंतु मार्गातील मोक्याच्या जागा ताब्यात ठेवण्याचा त्याने काही प्रयत्न केल्याचे उल्लेख आढळून येत नाहीत. जर तो जावळी जिंकण्यास आत शिरला होता तर त्याने अशी बेपर्वाई दाखवावी याचं मोठं आश्चर्य वाटते. असो. प्रत्यंतर पुराव्यांअभावी याविषयी अधिक न लिहिणे श्रेयस्कर.

 वाई ते पारची छावणी-अफझलखानाचा मार्ग
शिवाजी महाराजांची युध्दनिती:-
शिवछत्रपतिंची युध्दनिती हा जगभरातील युध्दशास्त्राच्या संशोधकांच्या संशोधनाचा विषय आहे.शिवाजी महाराज त्यावेळी एका विशेष प्रकारच्या युध्दपध्दतीचे जनक होते. ते शास्त्र म्हणजे ‘गनिमीकावा’ होय. सावशीच्या लढाईचे वर्तमान ऐकल्यानंतर पुण्याहून पटवर्धनांच्या वकिलाने मिरजेस जे पत्र लिहिले त्यात गनिमी लढाईचा अर्थ आला आहे. तो असा – “शत्रूचे सामान भारी असल्यास बुणगे एकिकडे लावून द्यावे आणि सडी फौज करून आज या ठाण्याजवळ, उद्या दुसऱ्या ठाण्याजवळ याप्रमाणे गनिमाई करावी.”समर्थांनी वर्णिलेल्या महाराष्ट्रधर्मात गनिमी युध्दास ‘वृकयुध्द’ (लांडगेतोड) असे नाव दिले आहे. या युध्दात थोडया सैन्यानिशी मोठया सैन्याला तोंड देऊन त्याचा नाश करता येतो. शिवाय अशा युध्दास डोंगराळ प्रदेश असल्यास त्याची युध्द करणाऱ्यास चांगली मदत होते.
ज्या प्रदेशात युध्द करावयाचे असेल तेथील खडान् खडा माहिती सेनापतिस असावी लागते. ती माहिती महाराजांस जितकी होती, तितकी खानाला नव्हती. कारण स्वतः खान हा महाराजांइतका त्या प्रांतातून युध्दशास्त्रातील तजविजींच्या व हालचालींच्या दृष्टीने विचार करित फिरलेला नव्हता. दुसऱ्याने दिलेल्या माहितीवर विसंबून त्याला आपल्या मोहिमेच्या तजविजी व हालचाली ठरविणे भाग पडले होते. दहा वर्षे या भागात राहिल्यामुळे इथली थोडीफार माहिती त्याला होती. पण लढाईच्या वेळी खास प्रसंगी उपयोगी पडेल अशी या प्रांताची पहाणी त्याने केली नसावी.
महाराज लढाईशिवाय इतर वेळीही असल्या प्रदेशाच्या सर्व भागातून, दऱ्याखोऱ्यातून, जंगलांतून, घाटांतून फिरून वेळप्रसंगी कोणत्या जागेचे काय महत्त्व आहे व तिचा पुढे काय उपयोग होईल याचा आपल्या आरंभिलेल्या कार्यक्रमावर दृष्टी देऊन विचार करित असत. फौजा लपविण्यासाठी जागा कोठे आहेत, लहान लहान टोळयांनी रहाण्यामध्ये जंगलांचा व झाडीचा किती फायदा होतो, रात्रीचा व अंधाराचा फायदा घेऊन शत्रूचे पहारे व चौक्या लुटता येणे व चुकविणे कसे शक्य असते, त्या चुकवून त्याच्या छावणीमध्ये सडया टोळयांनी आंत घुसून त्याची नासधूस कशी करता येते, त्यामुळे शत्रूचा गोंधळ होऊन त्या धावपळीत अंधारामुळे त्याच्याच गोळागोळीने त्याचीच माणसें कशी जायबंदी होतात, अशा अचानक हल्ल्याने धाडशी सेनापतिचा वचक शत्रूवर कसा बसतो, यामुळे शत्रूचा जोम व हिम्मत कशी कमी होते, त्याच्या गोळागोळीने झालेली त्याचीच हानी ही स्वतःच्याच माऱ्यामुळे झाली हे न कळून प्रतिपक्षाच्या छाप्यामुळे झाली असे वाटून हल्ला करणाऱ्या सैन्याचा दरारा व भय त्याला कसे वाटते, ह्या कारणांमुळे हल्लेवाल्या छोटेखानी सैन्याचा जोम कसा वाढतो वगैरे सर्व गोष्टी व युध्दातील खाचाखोचा महाराजांना पूर्णपणे स्वानुभवाने माहित होत्या. अशा रितीने भौगोलिक माहितीचा फायदा घेऊन महाराजांनी आपला हेतू तडीस नेऊन खानाची कशी दुर्दशा केली हे या प्रतापगड युध्दामुळे लक्षात येते.(आपले उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेले रणक्षेत्र निवडून काढणे व तेथे शत्रूशी लढाई देणे हे सेनापतीचे मुख्य काम व युध्द शास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे.)
आपण ठरविलेल्या रणक्षेत्रात शत्रूस लढाई खेळण्यास भाग पाडणे हे युध्द शास्त्रातील एक मोठे महत्त्वाचे तत्त्व आहे. महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने ते साधून घेतले ही गोष्ट महत्त्वाची आहे. राजकारणाचा युध्दकौशल्याशी किती व कसा निकटचा संबंध असतो त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कालक्षेप करणें हे जसे युध्दकलेतील एक तत्त्व आहे, त्याप्रमाणे शत्रूचा उत्साह कमी करणे, आपली तयारी वाढविणे, शत्रूला गोंधळात पाडून आपला कार्यभाग साधणे ही सुध्दा त्यापैकीच दुसरी तत्त्वे आहेत.
विजापूर दरबारने ‘आम्ही तुमच्यावर मोहिम करतो वा तुमचे बरोबर युध्द करतो’ असे महाराजांस कळविले नव्हते. महाराजांचा कोणीही वकिल विजापूर दरबारात नव्हता. तरीसुध्दा त्यांचे हेर खाते इतक्या श्रेष्ठ प्रतीचे होते की, शत्रूच्या दरबारात ठरलेली प्रत्येक गोष्ट त्यांना तात्काळ कळत असे. विजापूर दरबारने आपल्या विरूध्द युध्द पुकारल्याची बातमी महाराजांना त्यांच्या हेरखात्याकडून समजली. आणि येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी महाराजांनी सुरू केली.
प्रतापगडाच्या पायथ्याशी खानः-
इकडे खानाच्या फौजेसाठी रस्ते बनवायचं काम चालू झालं, वाई ते सावित्रीचे खोरे असा रस्ता बनवला गेला. पण रस्ता अशाप्रकारे बनवला की प्रत्येक डोंगर उतारावर दर तीन फुटांवर एक झाड कापून वळण बनवलं होत. त्यामुळे हत्ती व घोडे नीट येणारच नाहीत. असा अवघड रस्ता असल्यामुळे तोफा आणता येणार नाहीत. फार फार तर सुतरनळ्या म्हणजे लहान तोफा फक्त आणता आल्या असत्या. तत्कालीन सलातीन मध्ये असलेल्या नोंदीप्रमाणे खान २५००० एवढी फौज घेऊन जावळीला निघाला. त्याचे खूप सारे हत्ती, घोडे जखमी झाले. खानाला ते सर्व डोंगर उतरत यायला जवळपास ७ दिवस लागले. म्हणजे जवळपास ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात खान जावळीत आला. अन वाईहून जावळीला येत असताना खानाचे १९७ लोक ठार झाले. इकडे खान सावित्रीच्या खोऱ्यात आला. मागे महाबळेश्वर, सूर्य मावळताना डोळ्यावर सूर्य येतो अन वरच काही दिसत नाही पण वरून सगळं दिसत अशा जागी महाराजांनी खानाची छावणी बसवायला जागा करून दिली. पण इथे सुद्धा राजांनी एक मेख मारली. खानाच्या छावणीसाठी जी झाडे तोडली गेली व त्या झाडांचे ओंडके हे तेथील घाटवाटांवर टाकले वर सगळे रस्ते बंद करून टाकले, जवळपास पोलादपूर घाट, रणतोंडी घाट, पारचा घाट, बोचेघळ आणि बाकी घाटवाटा बंद केल्यामुळे खानाला जी रसद येऊ शकणार होती ती राजांनी बंद केली.
आता या युध्दात हेरखाते सगळ्यात महत्वाचे. खानाच्या भटारखान्यात राजांनी आपले विश्वासू विश्वासराव मुसेखोरेकर यांना पाठवलं. महाराजांना बहिर्जी नाईक अन आबाजी सोनदेव हे महत्वाच्या खबरा देत होतेच पण विश्वासरावांकडे राजांनी वेगळी जबाबदारी दिलेली ती म्हणजे खान कसा आहे ते सांगणे, त्याच्या शरीराची रचना, वजन, उंची, त्याच वर्णन आम्हाला सांगणे.

   
प्रतापगडाच्या पायथ्याशी जवळपास दीड – दोन कोसांच्या अंतरावर पार गावनजीक कोयना नदीच्या काठी खानाच्या फौजेचा तळ पडला. खानाची फौज जावळीत येण्यापुर्वीच शिवाजी राजांनी आपल्या लष्कराचा पेरा केला होता. त्यानुसार कोयनेच्या पूर्वेस बोचेघोळीच्या घाटात बालाजी शिळमकर याची नेमणूक करण्यात आली होती. प्रतापगडाच्या नैऋत्य दिशेला असलेल्या पार घाटात मोरोपंत पिंगळे, शामराजपंत रांझेकर व त्रंबक भास्कर यांची नियुक्ती करण्यात आली. नेताजी पालकर यांना जावळी व वाईच्या दरम्यान घाटमाथा सांभाळण्यास सांगितले होते. प्रसंगी वाई येथील अफझलखानाच्या मुख्य छावणीवर चालून जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. भेटीच्या प्रसंगी खानाची फौज प्रतापगडावर जर चालून आली तर तिला रोखण्याची जबाबदारी कान्होजी जेधे व बांदल देशमुखांवर सोपवण्यात आली. तसेच वेळप्रसंगी शिवाजी महाराजांना मदत करण्याची जबाबदारी देखील कान्होजी जेधेवर टाकण्यात आली होती. याखेरीज भेट झाल्यावर गडावर तोफांच्या इशारतीचे आवाज करण्यात येतील. तोफेचा आवाज ऐकताच सर्वांनी खानाच्या छावणीवर हल्ला करावा अशी आज्ञा देखील शिवाजी राजांनी आपल्या सरदारांना दिलेली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या लष्कराची जी काही रचना केली होती ती पाहता, कोणत्याही परिस्थितीमध्ये खानाच्या सैन्याला बचाव करण्याची संधी मिळू न देण्याची त्यांनी खबरदारी घेतली असल्याचे दिसून येते. एकूण, नुसता खानच नाही तर त्याच्या लष्कराला देखील बुडवण्याची त्यांनी पुरेपूर तयारी केली होती. खानाला मात्र याची अजिबात कल्पना नसल्याचे दिसून येते.
( ईथे बोचेघोळीचा घाट या उल्लेखावरुन गैरसमज होण्याची शक्यता आहे.रायगडाच्या उत्तरेला असलेल्या डोंगररांगेत चांदर या गावाजवळून बोचेघोळ नाळ नावाची वाट उतरते.मात्र या वाटेचा वरील उल्लेखाशी काहीही संबंध नाही.या ठिकाणी म्हणजे रायगडाजवळ सैन्य ठेवून काहीही उपयोग नव्हता.अफझलखानाचा वध या श्री.वि.ल.भावे यांच्या पुस्तकात हा बोचेघोळ घाट , महाबळेश्वरला जिथून आपण सुर्यास्त बघतो त्या मुंबई पॉईंटच्या दक्षिणेला असलेल्या कर्नाक पॉईंट्च्या खाली आहे असा उल्लेख आहे.अशी वाट आज अस्तित्वात आहे कि नाही ? याची वैयक्तिक मला माहिती नाही,पण कदाचित ईथे शिळीमकरांची तुकडी लपवून भेटीच्या दिवशी जंगलातून पुढे आणून तसेच त्या बाजुला पळणार्या आदिलशाही फौजेला कापायला तैनात केली असु शकते. )
वकिली बोलाचाली होऊन खान – शिवाजीच्या भेटीचा तपशील, सावधगिरीच्या उपाययोजना कशा प्रकारे ठरल्या याची तपशीलवार चर्चा बऱ्याच शिवचरित्रांत आल्याने त्याची इथे उजळणी करत नाही. मात्र प्रत्यक्ष भेटीच्या आरंभी उभयपक्षी परस्परांना दगा करण्याची इच्छा मनात भरपूर असल्याचे सूचक निर्देश करणारे तपशील मात्र उपलब्ध साधनांत भरपूर प्रमाणात आढळत असल्याचे नमूद करतो.
ससैन्य खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ येताच शिवाजी राजांनी चौफेर लष्कराचा पेरा करून ज्या प्रकारे त्याची छावणी वेढून घेतली होती, त्यावरून भेटीचा निकाल काहीही लागला तरी खानाचे सैन्य बुडवण्याचा त्यांचा निर्धार यातून स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे खान शक्यतो एकाकी भेटीस कसा येईल याकडेही त्यांनी विशेष लक्ष पुरवले होते. शेवटी विजापुरी दरबारचा तो मुख्य आधारस्तंभ होता. त्यालाच फोडल्याशिवाय विजापुरी सत्ता नरमणार नाही, याची शिवाजी राजांना पुरेपूर जाणीव होती.

भेटीसाठी शामियाना उभारिला:-

भेटीसाठीजी जागा शिवाजी महाराजांनी निवडली ती सुध्दा अतिशय मोक्याची होती.टेहळणी बुरुजाच्या खाली सपाटी होती जीला “जनीचा टेंबा” म्हणत.हि जागा प्रतापगडावरुन व्यवस्थित दिसते तर पार गावात जिथे अफझलखानाची छावणी होती तिथून मात्र अजिबात दिसत नाही.म्हणजे पार गावातील छावणीतील सैन्याला वर काय चालले आहे ते लगेच समजणे शक्यच नव्हते.शिवरायांनी अशी जागा निवडली की सदरेत होणारी मसलत सर्वांना दिसेल, बुरुजावरील तोफ अशी ठेवली कि भेटीचा शामियाना आणि खानाचे सैन्य दोन्ही टप्यात येईल. व सहज दिसतील.

  भेटीसाठी शामियाना उभारलेले जनीचा टेंबा हे ठिकाण.हे गडावरुन स्पष्ट दिसते मात्र पायथ्यातून अजिबात समजत नाही.

 
शिवरायांनी त्या ठिकाणी सपाट जागेत उत्तम सदर तयार करण्यास अण्णाजी रंगनाथ मालकरे यांस सांगितले, येण्याची वाट झाडे तोडून दगड हटवून सोपी करून दिली,पण जिथे जिथे वाट रुंद होती तिथली वाट जाणून बुजून अरुंद केली गेली कि जेणेकरून जास्त लोक एका वेळी येऊ शकणार नाहीत.शिवाजी महाराजांनी खुद्द प्रतापगडावरही नियोजन पूर्वक बंदोबस्त आखला होता. दर बुरजास ५० मावळे, मागील व पुढील बाजूस १०० मावळे, दरवाजावर तसेच कचेरी नजीक तोफा ठेवल्या, तोफांचा आवाज होताच सर्वांनी हुशार व्हावे असा इशाराच देवून ठेवला. [ संदर्भ – शिवद्विग्विजय १६५]भेटीच्या सदरेच्या मागच्या अंगाला एका खोल दरीत, गर्तेत हिरोजी फर्जंद असे विश्वासू ४० माणूस लपविले.

सदर
– तयार केलेली सदर शाही इतमामास साजेशी होती. डेरे,बिछाने, अस्मान्गिरी गिर्द्या ,तक्के ठेवून जागा सजविली होती.डेर्यास चंद्रराई कळस सोन्याचे बसवले होते .मोत्याच्या झालरी लावल्या होत्या ,उंची मखमली पडदे होते.शामियान्यात एक चौथरा तयार करोन खाशांस बसण्याची व्यवस्था लावली होती.चौथरा ३३ फुट रुंद ,दक्षिणोत्तर ४० फुट असा होता. शामियान्यात काय चालले आहे हे जवळच्या बुरुजावरुन नीट पाहिले जाऊ शकत होते. शिवाजीं राजानी शरीररक्षकांना भेटीच्या जागेपासून काही अंतरावर आणि सैन्याच्या तुकडी आणखी दूर म्हणजेच बाण सोडण्यापेक्षा टप्प्याच्या पुढे ठेवली. शिवाजी राजांनी खानाच्या माणसांना भेटीच्या दोन दिवस आधी शामियान्याची व्यवस्था तपासण्यासाठी परवानगी दिली!

      तयारी – सैन्य चौफेर पसरेल असे ठेवले होते,”चौकशीस हवालदार ,किल्लेदार,कारकून,कारखाननिस आदिकरून जातीने राहून चौकशी करावी,राखावी,यावे-जावे. वाड्यापर्यंत दरवाजाचे आत ठायी ठायी चौकी-पहारे असावे,दरवाज्यावरी-कचेरीनजीक तोफा ठेविल्या . बार होताच हुश्शार व्हावे ” अशी ताकीद राजांनी दिली .

बुरुजाच्या आतल्या बाजूस पन्नास तोंडाशी शंभर, मोकळ जमिनीस शे-पन्नास अशी किल्ल्यावर व्यवस्था.तर किल्ल्याखाली व सभोवताली व्यवस्था अशी होती. चंद्रगडावर जमाव ठेवला,हैबतराव व बालाजी शिलीमकारास बोचेघोळ घाटी ठेवले, नेतोजी पालकर घाटमाथ्यावर थांबले,जावळीच्या अंगाला बांदल सैन्य थांबले.हिरोजी फर्जंद मंडपाजवळील दरडीत पन्नास माणसानिशी लपले.

     
शिवाजी राजांनी सैन्य व्यवस्था अशीच का केली ?दूर महाबळेश्वर पठारावर नेताजी पालकर आणि मोरोपंत पिंगळे पार घाटाजवळील का? बोचेघोळ येथील बांदल देशमुख आणि कन्होजी जेधे प्रतापगड येथे हबशी सैन्याच्या तोंडी का? या प्रत्येक लहान तपशीलामध्ये एक तर्क आहे, एकही दल मनमानी पद्धतीने ठेवलेले नाही.

     मोरोपंत पिंगळे हे प्रामुख्याने पायदळ सैन्याचे नेतृत्व करीत होते. ते प्रतापगडच्या पायथ्यावरील खोल घळी आणि जंगलांसाठी योग्य होते. शिवाय, मोरोपंतनी स्वतः प्रतापगड बांधण्यात सक्रिय पुढाकार घेतला होता आणि म्हणूनच त्यांना किल्ल्याची व त्याभोवतीची सखोल माहिती होती. नेताजी पालकर यांची घोडदळ वाईच्या वेगाने प्रगती करण्यासाठी आणि तिथे ठेवलेल्या अफझलखानाच्या तळावर आणि तोफखान्यांवर हल्ला करण्यासाठी योग्य
होती. शिवाय अफजलखानच्या सैनिकांच्या जवळ असलेल्या झुडुपामध्ये घोडदळ ठेवणे आणि प्रतापगड येथे पायद्ळ ठेवणे इतकी चांगली कल्पना असू शकत नाही. बांदल देशमुख हे रोहिडा भागातील देशमुख होते आणि म्हणूनच बोचेघाली आणि पार घाट या अरुंद ठिकाणी गनिमी युद्धाला योग्य होते. शेवटी, कान्होजी जेधे यांना हब्शी सैन्याचा सामना करण्याचे सर्वात कठीण काम सोपविण्यात आले होते ज्यांच्या ताब्यात छत्रपती शिवाजी होते. शमियानात घडत असलेल्या घटनांचे आकलन करण्याची आणि त्यानंतर स्वत: च्या अनुभवावर आणि निर्णयावर आधारित संपूर्णपणे सैन्याचे संचलन करण्याची जबाबदारी कान्होजींवर होती. छत्रपती शिवाजी राजांना वाचवण्यासाठी हब्शी सैन्यावर पूर्णपणे हल्ला करायचा की गनीमी कावा करायचा, हा त्यांनी घेतलेला त्वरित निर्णय असणार होता. शिवाजी राजांकडे असलेल्या सर्व योद्धांपैकी सर्वात अनुभवी आणि सक्षम म्हणून छत्रपती शिवाजीं राजानी त्यांना हुशारीने निवडले होते.

      हि सगळी लष्करी तयारी सुरु असताना शिवाजी महाराज आणखी एक महत्वाची चाल केलेले दिसता. राजांना ठाऊक होतं लढाई जर जिंकायची असेल तर सैन्याला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढणे खूप गरजेचे आहे. जोपर्यंत सैन्याचा तुमच्यावर विश्वास नसतो तोपर्यंत कोणताही राजा युद्ध जिंकू शकत नाही.

          राजे सदरेवरती सर्वांना बोलले, “काल दुपारी आराम करत असताना आमचा अचानक डोळा लागला. अन आम्हाला अचानक आई भवानीने दर्शन दिले. भवानी आम्हाला बोलली की शिवबा मी तुझ्या तलवारीत प्रवेश करत आहे, मला त्या बत्तीस दातांच्या बोकडाचा बळी हवाय. अन आई भवानी विजेचा लोळ होऊन आमच्या तलवारीत शिरली.” राजांनी ही आवई उठवली ती फक्त एवढ्यासाठी की जेणेकरून आपल्या मावळ्यांचा दृष्टिकोन बदलेल. आणि झालेही तसेच, बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मावळ्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा सगळ्या मावळ्यांमध्ये मोठा जोश संचारला. साक्षात आई भवानी महाराजांसोबत आहे, आता खान वाचत नाही. आणि सैन्याच्या या सकारात्मक मानसिकतेसह सगळे युध्दासाठी सज्ज झाले.

      
इकडे पंताजी काकांनी खानाची मस्त खातीरदारी चालू केली. खानाकडून हिरे जवाहिर विकत घेऊन त्यालाच भेट दिले. खानाला वाटलं आपला दुहेरी फायदा होईल, आपले धन आपल्याला मिळेल अन सोबत पैसा सुद्धा मिळेल. ते सर्व धन घेऊन अन जवाहिराना घेऊन पंताजी काका गडावर आले. ते जवाहिर मोरोपंतांकडे पैसे
मागायला गेले, तर पंत त्यांना बोलले आता पैसे नाहीत, आम्ही सावकारांच्या नावाच्या हुंड्या लिहून देतो, त्या महिनाभरात वठतील. आणि राजे असेही शरण येणार आहेत, मग हा सर्व मुलुख खानाचच होणार, तुम्हाला त्यावेळी तुमचे पैसेही मिळतील.
भेटीचे तपशीलः-

 
प्रतापगडाजवळ छावणी केल्यावर खानाने शिवाजी राजांना आपल्या भेटीसाठी बोलावले. परंतु, शिवाजी महाराजांनी पंताजी गोपीनाथच्या मार्फत खानालाच प्रतापगडावर येण्यास भाग पाडले. तेव्हा दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या माचीवर दुपारच्या वेळी शिवाजी राजांच्या भेटीस जाण्यासाठी खान तयार झाला. त्यानुसार भेटीचे तपशील देखील आगाऊ ठरवण्यात आले. भेटीच्या प्रसंगी तंबूमध्ये दोन्ही बाजूंचे वकील आणि प्रत्येकी दोन हुद्देदार ( शस्त्रवाहक, मानकरी ) सोबत हजर असणार होते. तसेच दोघांनीही प्रत्येकी दहा अंगरक्षक सोबतीला आणायचे असून भेटीच्या जागेपासून ते बाणाच्या टप्प्याइतक्या अंतरावर ते उभे असणार होते.

     भेटीचा सर्व तपशील ठरल्यावर आणि त्यानुसार वागण्याचे खानाने मान्य केल्यावर शिवाजी महाराज पुढील तयारीस लागले. भेटीच्या वेळी सोबत दोन हुद्देदार असणार होते पण अशा प्रसंगी सामान्य मानकरी जवळ न बाळगण्याइतके शिवाजी महाराज धुर्त होते. पट्टा चालवण्यात सराईत असलेल्या जिवा महाल यास त्यांनी आपल्या सोबत घेण्याचे नक्की केले. तसेच संभाजी कावजी याची देखील आपल्या सोबत येण्यासाठी निवड केली. संभाजी कावजी हा अंगबळाच्या बाबतीत अफझलखानाच्या तोडीचा होता असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. याशिवाय वैयक्तिक बाबतीत देखील शिवाजी राजांनी बरीच खबरदारी घेतल्याचे दिसून येते. भेटीच्या दिवशी पोशाख करताना त्यांनी मुद्दाम अंगामध्ये चिलखत चढवले होते. उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये बिचवा / कट्यार लपवली होती. अर्थात, खानाचा विश्वासघातकी स्वभाव शिवाजी राजांच्या परिचयाचा असल्याने त्याने अशी खबरदारी घेतल्याचे सांगितले जाते पण ते अर्धसत्य आहे. खानाच्या छावणीभोवती शिवाजी राजांच्या सैन्याचा पडलेला विळखा लक्षात घेता आणि खुद्द खानास त्यांनी प्रतापगडाच्या माचीवर भेटीस येण्यासाठी भाग पडणे याच अर्थ उघड आहे. आरंभापासूनच खानासोबत कसे वागायचे याविषयीचे धोरण शिवरायांनी निश्चित केले होते.
     शिवाजी महाराज – खानाच्या या ज्या काही चाली चालल्या होत्या, त्या सावधगिरीच्या उपाययोजनाही म्हणता येतील परंतु त्यांचे अंतिम हेतू लक्षात घेता यांना सावधगिरीच्या उपाययोजना म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. भेटीत दगा न व्हावा अशी शिवाजी राजांची इच्छा होती असं क्षणभर जरी गृहीत धरलं तरी या भेटीअंती त्याच्या हाती नक्की काय येणार होतं ? शिवाजी महाराजांच्या सत्तेचा नाश हाच खान तसेच आदिलशाहीचा मुख्य हेतू, उद्दिष्ट असल्याने या भेटीतून निष्पन्न काहीच होणार नव्हतं. दुसरीकडे खानाने भेटीत दगा न व्हावा असं ठरवून भेटीस येण्याचं मान्य केलं असलं तरी फारतर शिवाजी राजां आदिलशाही मांडलिक बनेल यापलीकडे दुसरं काय पदरी पडणार होतं ? शिवाय या भोसले पिता – पुत्रांचे उद्देश खानास बऱ्यापैकी माहिती होते. परिस्थिती पाहून आज जरी शिवाजी राजांनी माघार घेतली तरी पुन्हा आपली पाठ वळताच ते मूळ पदावर येणार नाही याची काय शाश्वती ? शिवाय तेरदळ प्रांती शिवाजी राजांचे हल्ले, कर्नाटकातील शिवाजी राजांचा वाढता प्रभाव व पुणे व आसपासच्या भूप्रदेशावर विस्तारत जाणारी शिवाजी राजाची सत्ता, यांच्यादरम्यान विजापूरची सत्ता आकुंचित होतं कोंडली जाणार होती, हे त्यांस दिसत नव्हते काय ?

 तात्पर्य, भेटीच्या निमित्ताने प्रतिपक्षाचा संहार करण्याची मनीषा उभयपक्षी सारखीच वसत होती हेच खरे. त्यामुळेच खानाने स्वसंरक्षणार्थ म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांना पकडून नेण्यासाठी वा संधी साधून प्रतापगडासह शिवाजी राजांचा ताबा घेण्यासाठी बंदुकधारी पथकं सोबत घेतली असंच म्हणावं लागेल. खानाचा पूर्वलौकिक व त्यांस दाखवलेलं आमिष लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनीही प्रत्येक पावलावर त्याचे बेत हाणून पाडत त्यांस स्वतःच्या अटींवर भेट घेण्यास भाग पाडले व दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या या भेटीत खानाचा निकाल लावला.

   
उभयतांच्या मगरमिठीची वर्णनं विजापुरी व मराठी साधनांत विपुल प्रमाणात असली तरी प्रत्यक्ष भेटीत नेमकं काय झालं याची निश्चित माहिती कशातच आढळून येत नाही. खरोखर खानाने दगा केला कि शिवाजी राजांने प्रथम चाल केली, याचा निकाल करणे शक्य नाही व असा वाद उत्पन्न करणेही योग्य ठरणार नाही. उलट या दोघांची प्रत्यक्ष भेटीपूर्वीची मनोभूमिका व त्यात अंती नियोजित उद्दिष्ट पूर्तीत कोण यशस्वी झाले हे लक्षात घेऊनच या घटनेकडे बघणे योग्य ठरले. 

 भेटीचा दिवसः-

      शके १५८१ मध्ये मार्गशीष शुद्ध सप्तमी दिवशी भेटीचा संकल्प ठरला. त्या दिवशी सकाळी ब्राम्हण बोलावून द्रव्य,धर्म हस्तके,गोदाने दिली.केदारेश्वराची पूजा-प्रार्थना केली.सकाळी पूजा अर्चा करून शिवरायांनी सर्व विश्वासू सरदाराना एकत्र बोलविले, आम्हाला काही दगाफटका झाल्यास काशीस जावून उत्तर कार्य करावे, धर्म हस्तके व गोदानें सुद्धा दिधली. स्वताची तयारी करताना दाडी लांब होती ती लहान केली, अंगात चिलखत व जरीची कुडती घातली. डोक्यात बखतर टोप घातला. डाव्या हातात बिचवा लपविला तर अस्तनीत नवटाकी पट्टा घातल, पायात चोळणा घालून कास कसली. अशा मजबुतीने राजे गडाखाली येण्यास तयार झाले. राजांचे सोबती महाराजांना बरोबर घेण्यासाठी आग्रह धरु लागले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले “काही वावडे झाल्यास घाबरे न होता, गर्दी करून शत्रूस बुडवावे. राज्य रक्षावे. तुम्ही सर्व शूर पराक्रमी आहात आमची मदार तुमच्यावरच आहे….सर्वांनी आपली शर्त करावी, राज्य वृद्धीस न्यावे ते तुमचेच आहे.

     इकडे खानही काही कमी नव्हता. भेटीचे तपशील, स्थळ निश्चित झाल्यावर प्रत्यक्ष भेटीच्या वेळी छावणीतून बाहेर पडताना त्याने प्रत्येक अटीचा भंग करण्यास आरंभ केला होता. भेटीच्या दिवशी अफझलखानाला प्रतापगडावर आणण्यासाठी शिवाजींनी पंताजी गोपीनाथास पाठवले. पंत ज्यावेळी खानाकडे गेला तेव्हा खान तयार होऊन बसला होता. अशा राजकीय भेटींची खानाला सवय होती. अशा भेटींमध्ये दगाबाजी करण्यात आजवर तो यशस्वी झाला  असल्यामुळे अंगावर शस्त्रे लपवणे, भेटीच्या अटींची पायमल्ली करणे इ. किरकोळ बाबी त्याने त्या दिवशी देखील करण्यास आरंभ केला होता. आधी ठरल्यानुसार सोबत वकील, दोन मानकरी आणि दहा अंगरक्षक नेण्याचे अफझलखानाने मान्य केले असले तरी प्रत्यक्ष भेटीच्या वेळी दीड हजार बंदुकधारी पायदळ सोबत नेण्याची त्याने तयारी चालवली होती. परंतु, पंताजी गोपीनाथ सावध असल्यामुळे खानाचा हा बेत फसला. पंताजी पंत पुढे होऊन अर्ज केला कि, ‘ इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धाशत खाईल. माघार गडावरी जाईल. भेटी होणार नाही. शिवाजी म्हणजे काय ! यास इतका सामान काय करावा, राजा दोघा माणसानिशी तिकडोन येईल. तुम्ही इकडोन दोघानिशी चालावे. दोघे बैसोन भेटावे. तेथे तजवीज करणे ते करा !’

( वास्तविक पहाता हेच गोपिनाथ पंतांना खानाला पारच्या छावणीपाशीच सांगता आले असते पण ईथे एक धुर्तपणाची चाल दिसते.अफझलखान विजापुरावरुन बरेच सैन्य घेउन आला असला तरी त्याचे बळ शिवाजी महाराजांनी युक्तीने 
चार ठिकाणी विभागलेले दिसते.खानाच्या आधीच्या मुक्कामी म्हणजे वाईला काही सैन्य जनान्याच्या रक्षणासाठी राहिले हा सैन्याचा पहिला भाग बाजुला झाला.त्यानंतर पारचा छावणीत दुसरी तुकडी बाजुला पडली, प्रतापगडाच्या खड्या उतारावर हि तिसरी तुकडी गोपिनाथ पंतांनी हुशारीने बाजुला केली.ना वर गडावर ना खाली छावणीत अशी त्रिशंकु अवस्थेत असलेली हि तुकडी आजुबाजुच्या झाडीत लपलेल्या मावळ्यांनी सहज कापली असणार.अर्थात खानाच्या सैन्याची शेवटची तुकडी म्हणजे स्वतः खान आणि त्याचे दहा अंगरक्षक )

     पुढे प्रतापगडाच्या माचीवर गेल्यावर नियोजित ठिकाणी त्याचे नऊ अंगरक्षक उभे राहिले तर दहावा बडा सय्यद उर्फ सय्यद बंडा हा मात्र खानाच्या सोबत भेट ठरलेल्या तंबूमध्ये घुसला. अर्थात, खानाच्या संमतीनेच हे सर्व घडले होते आणि खानाच्या बरोबर आधी निश्चित केलेल्या हुद्देदारांपेक्षा एकजण अधिक आहे हे पंताजी गोपीनाथच्या लक्षात आले नाही !

    अफझल सदर पाहून मनात जळाला कि, ‘ शिवाजी म्हणजे काय? शाहाजीचा लेक. वजीर यास असा जरी बिछाना नाही ! अशी मोतीलग सदर म्हणजे काय? पादशहास असा सामान नाही, येणे जातीचा त्याने सामान मेळविला ! ‘

    असे बोलताच पंताजीपंत बोलिला जे, ‘ पातशाई माल पाद्शाहाचे घरी जाईल, त्याची इतकी तजवीज काय? ‘ असे बोलून सदरेस बैसले. राजियास सिताब आणवणे म्हणून जासूद, हरकारे रवाना केले.

      अफझलखान प्रतापगडाच्या माचीवर दाखल होताच शिवाजी राजे गडावरून खाली आले, पण ते तडक भेट ठरलेल्या ठिकाणी न जाता बराचसा अलीकडेच थांबले व पंताजी गोपीनाथास त्यांनी बोलावून घेतले. किंवा असेही म्हणता येईल कि शिवाजी महाराजांना आणण्यासाठी पंताजी गोपीनाथ यावेळी तंबूतून बाहेर आले होते. यावेळी शिवाजी राजांनी अफझलखानाविषयी पंताजी गोपीनाथकडे अधिक माहिती विचारली असेल किंवा पंताजी गोपीनाथांनी त्यांना अफझलखानाच्या कारवायांची कल्पना दिली असावी.

         एकूण, अफझलखानाने भेटीसाठी ज्या काही अटी मान्य केल्या होत्या त्या मोडण्यास पद्धतशीरपणे आरंभ केल्याचे शिवाजी राजांच्या लक्षात आले व त्यामुळे ते अधिक सावध झाले. खानाच्या भेटीसाठी पुढे जाण्याआधी त्यांनी सहजपणे म्हणा किंवा अधिक चौकसपणे, पण पंताजीना विचारले कि, तंबूमध्ये खानासोबत आणखी कोण आहे ? यावेळी गोपीनाथना आठवण झाली कि, खानाने आपल्यासोबत एक मानकरी अधिक आणला आहे. तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रथम खानासोबत आलेल्या अतिरिक्त हुद्देदारास बाहेर काढण्याची कामगिरी पंताजी गोपीनाथावर सोपवली. सभासद बखरीमध्ये सय्यद बंडाचा उल्लेख येत असला तरी जेधे शकावली किंवा जेधे करीनामध्ये या सय्यद बंडाचा नामोल्लेख येत नाही. शिवाजी राजांच्या आज्ञेनुसार पंताजी गोपीनाथ पुढे गेले व खानास सांगून त्याने सय्यद बंडा उर्फ बडा सय्यद यास तंबूतून बाहेर काढून ज्या ठिकाणी खानाचे उर्वरीत ९ अंगरक्षक उभे होते तिकडे पाठवून दिले. या ठिकाणी हे देखील नमूद करणे गरजेचे आहे व ते म्हणजे खानाच्या  सोबत जो वकील होता त्याचे नाव कृष्णाजी भास्कर असल्याचा उल्लेख जेधे शकावली, जेधे करीना मध्ये येत नाही. तसेच या भेटीच्या प्रसंगी कृष्णाजी भास्करने शिवाजी राजांवर शस्त्र उचलल्याचा उल्लेख जेधे शकावली मध्ये किंवा सभासद बखरीत न येता जेधे करीन्यामध्ये येतो. पण त्यात कृष्णाजी भास्कर असे वकिलाचे नाव न येत ‘ हेजीब ‘ या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. श्री. विजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार वाईच्या यादी नाम्यात शिवाजीने कृष्णाजी भास्कर यास पट्ट्याने मारल्याचा उल्लेख येतो.

शिवाजी महाराज – अफझलखान यांची भेट :-

सभासद बखरीमध्ये शिवाजी व अफझल यांच्या भेटीचे जे वर्णन आलेले आहे किंवा जेधे करीन्यात उभयतांच्या भेटीची जी माहिती आलेली  आहे ती  सर्वांनी  जवळपास  जशीच्या तशी गृहीत धरलेली आहे. परंतु अधिक विचार केला असता असे दिसून येते कि, जेधे करीना मध्ये किंवा सभासद आणि तत्सम बखरीत जी काही या घटनेची वर्णने आलेली आहेत ती कपोलकल्पित आणि अतिरंजित अशा स्वरूपाची आहेत. वस्तुतः जेधे करीना किंवा सभासद बखर सांगते त्यानुसार शिवाजी आणि अफझलखान यांची प्रत्यक्ष अशी गळाभेट झालीच नाही!

             शिवाजी राजे आपल्या दहा अंगरक्षकांच्या सोबत नियोजित स्थळी आले. ठरवून दिलेली जागी त्यांचे दहा अंगरक्षक उभे राहिले आणि दोन हुद्देदारांसह, म्हणजेच जिवा महाल आणि संभाजी कावजी यांच्या संगतीने शिवाजी राजे खानाच्या भेटीसाठी तंबूध्ये गेले. शिवाजी राजे तंबूमध्ये गेल्यावर तत्कालीन रिवाजानुसार खानाने आपल्या जवळ असलेली तलवार सोबतच्या हुद्देदाराच्या हाती दिली व त्यास दूर जाण्याचा इशारा केला. इकडे शिवाजी महाराजांनी देखील आपली तलवार आपल्या हुद्देदाराकडे सोपवली. शिवाजी आणि
अफझल यांच्याकडे जी छुपी शस्त्रे होती, कट्यार / बिचवा, त्यांचा मारा करण्यासाठी उभयतांना एकमेकांच्या निकट, निदान काही अंतरापर्यंत तरी, येणे अतिशय गरजेचे होते. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या जवळ आले.दोघेही समोरासमोर आले,दोघांनी तीनदा एकमेकांना डाव्या उजव्या बाजूला आलिंगन दिले. तिसऱ्या वेळी आलिंगन देताना अचानक खानाने राजांना ओढलं व राजांचा तोल गेला. खानाने राजांची मान डाव्या बगलेत दाबली व आदिलशहाने दिलेल्या रत्नजडित कट्यारीने राजांवरती वार केला. त्या वारामुळे राजांचा अंगरखा फाटला अन कट्यार चिलखताला घासल्याने खर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्र असा कर्कश आवाज झाला. चिलखत असल्यामुळे राजे बचावले, खान दुसरा वार करणार त्याआधी राजांनी आपली मान खानाच्या बगलेतून सोडवली. खानाने राजांवर दुसरा वार केला तो डोक्यावर. तो वार जिरेटोप फाडून आतील लोखंडाची पट्टी चिरून आत गेला आणि याक्षणी अफझलपेक्षा शिवाजी राजे अधिक सावध आणि चपळ असल्यामुळे त्यांनी आपल्या उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये लपवलेला बिचवा बाहेर काढून सरळ खानाच्या पोटात खुपसला. शिवाजी राजांचे हे कृत्य अफझलखानास अनपेक्षित असे होते. आश्चर्याचा धक्का आणि प्राणघातक असा हल्ला यांमुळे त्याला शिवाजी राजांवर शस्त्र उगारण्याचे भान राहिले नाही किंवा त्याला तशी संधीही प्राप्त झाली नाही. खानावर एक किंवा दोन घाव घालून शिवाजी महाराज मागे सरकले. दरम्यान बिचव्याचा पहिला वार होताच खान किंचाळला  “ दगा दगा, खून खून.” खानाच पोट फाटलं. रक्ताचा धबधबा कोसळू लागला आणि त्याबरोबर त्याचे मानकरी सावध झाले व शिवाजी राजांच्या दिशेने शस्त्रे उपसून धावले. परंतु, ते शिवाजी महाराजांच्या जवळ पोहोचण्यापूर्वीच जिवा महाल आणि संभाजी कावजी यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तंबूमध्ये हा गोंधळ सुरु होता त्यावेळी पंताजी गोपीनाथ आणि खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हे काय करत होते ?

      
तत्कालीन प्रघातानुसार राजकीय बोलाचालींसाठी वकील म्हणून जाणारी व्यक्ती जवळ शस्त्र बाळगत असली तरी ती शस्त्र चालवण्यात कुशल असतेच असे नाही. शिवाजी व अफझलखानाच्या भेटीच्या प्रसंगी पंताजी गोपीनाथ आणि कृष्णाजी भास्कर हे दोघे, दोन दरबाराचे वकील म्हणून हजर होते. यापैकी कृष्णाजी भास्कर याने या संघर्षात सहभाग घेतल्याचा उल्लेख जेधे करीन्यामध्ये येतो पण त्यात त्याचे नाव न येत वकील या अर्थी हेजीब या शब्दाचा उल्लेख केला गेला आहे. कृष्णाजी भास्करने आपल्या जवळील कट्यार सदृश्य शस्त्राने किंवा तलवारीने शिवाजी राजांवर हल्ला केला आणि स्वसंरक्षणार्थ शिवाजी महाराजांनी त्यावर हत्यार चालवले असे उपलब्ध माहितीवरून म्हणता येते. पंताजी गोपिनाथनी देखील या संघर्षात थोडाफार सहभाग घेतला असावा. कारण तो जखमी झाल्याचा उल्लेख जेधे करीन्यामध्ये येतो पण सभासद बखर व जेधे शकावली याविषयी मौन बाळगून आहेत. यावरून निश्चित असे काही सांगणे अवघड असले तरी ज्याअर्थी कृष्णाजी भास्कर शिवाजी राजांच्या हातून मारला गेल्याचा अस्सल साधनात उल्लेख आहे त्याअर्थी पंताजी गोपीनाथने या संघर्षात थोडाफार सक्रीय सहभाग घेतला होता असे म्हणता येते.

         इकडे शिवाजी महाराजांनी खानास ठार केले आणि हि गडबड एकून त्याचे अंगरक्षक तंबूच्या दिशेने धावून गेले. त्याच वेळी शिवाजी राजांचे अंगरक्षक देखील खानाच्या अंगरक्षकांच्या रोखाने चालून गेले व तंबूच्या बाहेर त्यांची झुंज सुरु झाली. बाहेर
हातघाईची लढाई सुरु झाली असताना आतमध्ये देखील जोरदार धुमश्चक्री चालू होती. खानाचा वकील शिवाजी राजांवर चालून आला तेव्हा पंताजी गोपीनाथ त्याच्या मदतीस गेला. दरम्यान जिवा महाल व संभाजी कावजीने खानाच्या हुद्देदारांचा पुरता निकाल लावला होता. दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांना वाचवण्याच्या प्रयत्नात पंताजी गोपीनाथ जखमी झाले. तेव्हा शिवाजी राजांनी हाती असलेल्या कट्यारीच्या सहाय्याने किंवा जिवा महालकडून पट्टा घेऊन कृष्णाजी भास्करला कापून काढले. खानाचे सर्व साथीदार मारले गेल्यावर शिवाजी राजे,पंताजी गोपीनाथ, जिवा महाल व संभाजी कावजी यांच्यासह तंबूतून बाहेर पडले आणि गडाच्या दिशेने निघून गेले. दरम्यानच्या काळात खानाचे दहा अंगरक्षक शिवाजी राजांच्या सैनिकांकडून मारले गेले किंवा जखमी अवस्थेत पळून गेले. मेलेल्या खानाचे प्रेत भोई पालखीत बसून छावणीकडे नेत होते. परंतु, संभाजी कावजीने पालखीच्या भोयांवर हल्ला चढवल्यामुळे  ते मारले गेले. अफझलखान मृत अवस्थेत तिथेच पडून राहिला. अफझलखानाचे मस्तक संभाजी कावजीने कापल्याचा उल्लेख जेधे शकावली किंवा करीन्या मध्ये येत नाही. पुढे शिवाजी महाराज गडावर पोहोचल्यावर तोफांची इशारत झाली आणि पाठोपाठ खानच्या कोयनेकाठच्या बेसावध छावणीवर मराठी फौज चारी बाजूंनी तुटून पडली. 

     गडावर तोफेचे तीन बार काढण्यात आले. तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले,कान्होजी जेधे,बांदल यांनी पारघाटाच्या सैन्यावर हल्ला केला,मोरोपंत कोकणच्या बाजूने घुसले.अशी सगळी रण-धुमाळी माजली,तोफेला बत्ती कुणी आणि का दिली हे खानाच्या सैन्याला समजलेच नाही. सावध झाल्यावर खानाच्या सैन्यानेही नेटाने प्रतिहल्ला केला. शामराज पद्मनाभी व त्र्यंबक भास्कर हे मोठे सरदार कामी आले. “कोणी हत्यार धरू असेल त्यास जीवे मारावे प्राणानिशी ठेऊ नये” असे आदेशच मिळाले होते.

    ‘अलिशान अफझलखान महमदशाही’ ची पार दुर्दश करून टाकली,महादिन पठाण,उज्दिन पठाण,रोहिले ,अरबी मुसलमान दुलीस मिळवले. झुंझारराव घाटगे,सुलतानजी जगदाळे हे मातब्बर आदिलशाही सरदार पाडाव झाले,तसेच मंबाजी भोसले आणि जगताप हि पाडाव झाले. अफझलचा पोरगा फाझल जीव वाचवायला कृष्णाकाठाने कऱ्हाडच्या दिशेने पळत सुटला. कापड ,हत्यारे, वाईला असलेला तोफखाना, बाराशे उंट,४-५ हजार घोडे, ४ लाखाहून जास्त जवाहीर, ७-८ लाख रोकड असा बराच मुद्दे माल सरकारात जमा झाला.

     राजांनी सर्वात आधी युद्धात जायबंदी झालेल्यांची पूस केली,कोणाला २००,१००,५०,२५ होन अशी जखम पाहून दिले, कामी आलेल्यांच्या मुलास चाकरीस घेतले.पुत्र नाही त्यांच्या बायकांस अर्धे वेतन चालू ठेवले.त्यांचे कार्य करून दिले.सांत्वन केले,रण गाजवलेले मोठे धारकरी होते त्यांस कोणाला हत्ती,घोडे ,सोन्याचे कडे,माळा,तुरे चौकडे असे नावाजले.पंताजी गोपिनाथांना सासवडजवळचा हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले तसेच १ लक्ष होन बक्षीस दिला.

 राजगडाच्या बालेकिल्ल्याचा दरवाजा

     खानाचे मुंडके राजगडावर पाठवून दिले व राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या महद्वाराच्या बुरुजात त्याला स्थान दिले, यावेळी राजगडाचे बांधकाम सुरु होते. 

 मुळ कबरीचे चित्र

 नंतर बांधकाम केलेली कबर

शरीर पडले तेथे कबर बांधली त्याच्या दिवा बत्तीची सोय भवानी मंदिरातर्फे करण्यात येते.कबरी पुढे उरुसात नारळ फोडण्याचा मन देवी संस्थानाला असतो,दसर्याला पालखी इथे सदरेजवळ थांबते पूजा अर्चा होऊन पुन्हा गडावर जाते.

(उत्तरेतील बर्याच इतिहास करांचे म्हणणे पडले कि
शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला,कहर म्हणजे मुसलमान इतिहासकारांनी तर असे लिहिले कि राजांनी खानास एकट्यास जेवायला गडावर बोलाविले, खान आल्यावर गडाचे दरवाजे लाऊन घेऊन राजांच्या माणसांनी खानाला मारिले. :

    सर जदुनाथ सरकारांनी सुद्द्धा अप्रत्यक्षपणे असेच सुचविले आहे.महम्मद खाफीखान ,साकी मुस्तैद खान,अडोल्फ बेंडसर,भीमसेन सक्सेना या मोगलांच्या तर्फेच्या लोकांनी सुद्धा शिवरायांनाच या प्रकरणी दोषी ठरवत ठपका ठेवला. परंतु खानाकडे राजांना मारायचे फर्मान होते हे माहित असताना शिवरायांनी जे केले ते योग्यच होते.वरील लोकांचा मराठी साधनाचा अभ्यास कमी असल्याने स्थानिक राजकीय स्थितीचा आणि खानाच्या पूर्वीच्या दगाबाजीच्या इतिहासाचा विचार या लोकांनी केला नाही.

शिवभारतातील भेटीचा तपशीलः-
शिवचरित्र अभ्यासायचे तर एक अस्सल साधन म्हणजे कविंद्र परमानंद लिखित शिवभारत. कविंद्र परमानंद नेवासकर हे शहाजी राजांच्या पदरी होते.शिवाजी महाराज सन १६४२ मध्ये पुणे जहागिरीत आले त्यांच्याबरोबर ते आले असावेत.त्यांनी लिहीलेले शिवभारत उर्फ अनुपुराण हे संस्कृत काव्य हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे एक अस्सल साधन मानले जाते.कारण एकतर परमानंद हे थेट शिवाजी महाराजांचे समकालीन होते.प्रत्यक्ष शिवरायांना भेटून त्यांनी हे प्रसंग त्यांच्याच तोंडून एकले असणार.सहाजिकच या वर्णनाची अधिकृतता जास्ती आहे.एकप्रकारे कविंद्र परमानंद हे शिवरायांचे अधिकृत चरित्रकार मानायला हवेत. शिवभारत या ग्रंथात या अफझलखान भेटीचे नेमेके काय वर्णन आहे ते पाहू. 

शिवभारतातील या पानावर शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या प्रत्यक्ष भेटीत काय घडले याचे वर्णन वाचायला मिळते.

प्रत्यक्ष अफझलखानाच्या भेटीत काय घडले याचे वर्णन वरील पानावर आपण वाचु शकतो.यामध्ये शिवरायांनी अफझलखानाला मारले ते तलवारीने वाघनखांनी नाही हे स्पष्ट होते.

   इथे शिवाजी राजांनी अफझलखानाला मारल्यानंतर प्रतिक्रीया म्हणून कृष्णाजी भास्कर यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या तलवार हल्ल्याचे वर्णन आहे.तसेच स्वतः शिवाजी महाराजांनी पट्ट्याचा वार खानाच्या डोक्याचे तुकडे केले हा ही उल्लेख वाचायला मिळतो आहे.

 अफझलखानाच्या भेटीनंतर सय्यद बंडा उर्फ बडा सय्यद व खानाचे इतर सरदार शिवाजी महाराजांवर कसे चालून आले आणि त्यांचा निकाल राजे व त्यांचे साथीदार यांनी कसा लावला ते आपण वाचु शकतो.
वाघनखांचे तथ्यः-
अफझलखानाला शिवाजी महराजांनी वाघनखांनी पोट फाडून कोथळा बाहेर काढला हे वर्षानुवर्षे चालत आलेला समज.पण यात फार तथ्य वाटत नाही.एकतर वाघनख लोखंडाची बनलेली असतात.

वाघनखे परिधान केल्यावर

जरी अंगठीसारखी ती बोटात बसत असली तरी जिथे एकमेकांना भेटायचे आहे तिथे ती स्पष्ट दिसणार.
.

मुळ वाघनख

अफझलखान -शिवाजी राजे यांची भेट निशस्त्र ठरलेली असताना, खानाला सहज दिसतील अशी वाघनखे महाराज परिधान करतील असे वाटत नाही.
.


शिवाय स्वतः महाराजांनी हा प्रसंग शिवभारतकार कविंद्र परमानंदांना सांगितला असावा.कारण काव्य असलेल्या शिवभारतमध्ये फक्त दोनच तिथी येतात.एक शिवाजी महाराजांच्या जन्माची आणि एक अफझलखानाच्या वधाची.शिवभारत या ग्रंथात दिल्याप्रमाणे महाराजांनी बिचव्याचा उपयोग करुन पोट फाडले.
.

 
बिचवा

अफझलखानाची आडदांड शरीरयष्टी ध्यानात घेता वाघनखांचा फार उपयोग झाला असता असे वाटत नाही,ईथे बिचवाच उपयोगी पडेल.पुढे अज्ञानदासने पोवाडा रचताना तो अधिक रंजक व्हावा म्हणून वाघनख्यांची कल्पना घुसडली असावी.

बीतपशील :-
६५ हत्ती व हत्तिणी सुमार ४००० घोडे सुमार
३,००,००० जडजवाहीर १,२०० उंटे सुमार
२,००० कापड वोझी ७,००,००० नगद व मोहोरा व होन सोने रुपये.
भांडी तोफखाना सर्वही घेतले. कलम १. वजीर पाडाव जाहले :
१ सरदार व वजीर मातबर. १ मंबाजी भोसले, १ अफझलखानाचे पुत्र १ नाटकशाळेचे पुत्र, १ राजेश्री झुंजारराव घाडगे, १ या खेरीज लोक कलम १ येणे प्रमाणे पाडाव केले. या खेरीजही जिन्नस मालमत्ता, गुरेढोरे, बैल, मबलग मत्त पाडाव केले. भांडते लोकांनी तोंडी तृण धरून शरण आले त्यासी व बायकामुले, भट-ब्राह्मण, गोरगरीब असे अनाथ करून सोडिले. राजा पुण्यश्लोक शरणागतास मारीत नाही. याजकरिता त्याचे लोकांनीही कित्येक अनात सोडिले. अफझलखानाचा लेक फजल हा पायी चिरगुटे बांधून झाडीत पळोन गेला. तसेच कित्येक भले लोक पळोन गेले. संख्या न करवे.

जखमी सैनिकांची विचारपूस
ऐशी फत्ते करून जय जाहला. मग राजे याणी खानाचे पुत्रास व सरदार पळून गेले होते, त्यास धरून आणिले. राजा खास प्रतापगडाखाली उतरोन कुल आपले लोक व अफझलखानाचे लोक व त्याचे पुत्र, भांडते माणूस होते, तितकियास भेटून, पोटाशी धरून, दिलासा करून, भांडते लोक जे पडले होते, त्यांच्या लोकास चालविले. पुत्र नाही त्यांच्या बाय्कास निमे वेतन करून चालवावे असे केले. जखमी जाहले त्यास दोनशे होन व शंभर होन, दर आसामीस जखम पाहून दिधले. मोठे मोठे लोक धारकरी जुमले होते, त्यास बक्षीस हत्ती, घोडे दिधले. हस्तकडी, कंठमळा, तुरे, पदके, चौकडे, मोत्यांचे तुरे, कित्येकास बक्षीस फार दिले. ऐसे देणे लोकास दिधले. कित्येकास गावमोकासे बक्षिस दिधले. लोक नावाजिले. दिलासा केला.

विजयोत्सव
मागे कौरवाचा क्षय पांडवांनी केला. असा वीरावीरास झगडा जाहाला. खासा खान राजियाने एकांगी करून मारिला. अफझलखान सामान्य नव्हे. केवळ दुर्योधनच जातीने होता. आंगाचा, बळाचाही तैसाच ! आणि दुष्ट बुद्धीने तैसाच ! त्यास एकले भीमाने मारिला, त्याचप्रमाणे केले. शिवाजी राजाही भीमच ! त्यांनीच अफझल मारिला. हे कर्म मनुष्याचे नव्हे. अवतारीच होता. तरीच हे कर्म केले. यश आले, असे जाहाले. खानाकडील वजीर पाडाव केले होते त्यास वस्त्रे, भूषणे, अश्व देऊन अनाथ करून सोडिले. त्या उपरी राजश्री पंताजीपंतासही उदंड वस्त्रे, अश्व, अलंकार दिधले. अपर द्रव्यही दिधले. खुशाली केली.
राजगडास मातुश्रीस व सर्वासही फत्तेची खबर लिहून पाठविली. त्यानीही वर्तमान ऐकून साखरा वाटून नगरे – करणे केले. भांडी मारिली. मोठी खुशाली केली. येणे रीतीने राजियाकडील वर्तमान जाहाले.

विजापुरी एकच आकांत! :-
त्या उपरि विजापुरास चवथे दिवशी जासूद – हरकारे यांनी खबर पाद्शाहास व पाद्शाहाजादीस जाहीर केली कि, ‘ अफझलखान खासा मारून शिर कापून नेले. कुल लष्कर लुटून फस्त केले, ‘ असे सांगताच अली अदलशाहातक्तावरोन उतरोन महालात जाऊन पलंगावरी निजला. त्याणे बहुत खेद केला. असेच पाद्शाहाजादीसखबर लागताच पलंगावरी बैसली होती तेथेच ” अल्ला ! अल्ला ! खुदा, खुदा ! ” म्हणून अंग पलंगावरी टाकून रडत पडली. ” मुसलमानाची पादशाही खुदाने बुडविली,” ऐसा कित्येक विलाप करून बहुत शोक केला. पाद्शाहाजादीने तीन दिवस अन्न – उदक घेतले नाही. तसेच कुल मोठमोठे वजीर व लष्कर व कुल शहर दिलगीर जाहाले. म्हणू लागले कि, ‘ उद्या राजा येऊन शहर मारील व कोट घेईल ! ‘ ऐसे घाबरे जाहले. खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून मराठ्यांसी दिली असे वाटते ‘ असे म्हणो लागले.

प्रतापगडी देवीची स्थापना :-
त्या उपरांत मग राजियासी स्वप्नात श्री भवानी तुळजापुरची येऊन बोलू लागली कि, ‘ आपण अफझल तुझ्या हाते मारविला व कित्येक पुढेही आले त्यास पराभवात नेले. पुढेही कर्तव्य उदंड कारण करणे आहे. आपण. तुझ्या राज्यात वास्तव्य करावे. आपली स्थापना करून पूजा – पूजन प्रकार चालविणे. ‘
त्या उपरी राजियाने द्रव्य गाडियावरी घालून ; गंडकीनदीहून गंडकी पाषाण आणून श्री भवानी सिद्ध करून प्रतापगडावर देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला. देवीस रत्नखचित अलंकार भूषणे नानाप्रकारे करून दिली. महाल मोकाशे देऊन सचंतर हवालदार व मुजुमदार व पेशवे देवीचे करून महोच्छाव चालविला. नवस यात्रा सर्वदा तुळजापुरच्याप्रमाणे तेथे चालती झाली. आणि तुळजापूरचे यात्रेस लोक जातात त्यास दृष्टांत स्वप्ने होतात कि, ‘ आपण प्रतापगडास आहे. तेथे तुम्ही जाऊन दर्शन घेणे व नवस फेडणे, ‘ असे देवी बोलू लागली. मोठे जागृत स्थान जाहाले.
युद्धानंतर कारागीर तुळजापूरला पाठवून तुळजाभवानी प्रमाणेच मूर्ती प्रतापगडावर घडविण्यास महाराजांनी सांगितले होते,यावरून असे म्हणण्यास जागा आहे कि मुळ तुळजाभवानीच्या मूर्तीला अपाय झाला नसावा.

प्रतापगड युध्दाचा लष्करीदृष्ट्या विचार :-

प्रतापगडाच्या लढाईत बचावाच्या धोरणाच्या दृष्टीने महाराज्यांना पारघाटाचा व प्रतापगडसारख्या तटबंदीच्या जागेचा अतिशय उपयोग झाला. या युध्दाचा जास्त बारकाईने अभ्यास व विचार करायचा असेल, तर गडाच्या पूर्वेच्या २४ मैलांच्या व उत्तर दक्षिणेकडील ८/१० मैलांच्या सर्व टापूतील प्रदेशाची सूक्ष्म दृष्टीने पहाणी करावी लागेल.
पहाडांच्या सोंडांचा, किल्ल्याचा, नद्यांचा, घाटांचा व खोऱ्यांचा युध्दकौशल्याच्या दृष्टीने किंवा स्थानिक डावपेचांचा विचार करण्याच्या दृष्टीने कसा उपयोग होतो हे युध्दात दिसून येते. महाराजांचे दोन सेनापती शामराजपंत पद्मनाभी व त्रिंबकपंत युध्दात पडले असतानाही त्यांच्या फौजांनी घाबरून जाऊन पळून न जाता शत्रूला तोंड देत आपली कामगिरी फत्ते केली. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्या वेळच्या मानाने कौतुकास्पद आहे. शिवाजीमहाराजांनी आपल्या सैनिकांची मानसिक ताकद अशी वाढविली होती. शिवकालातच या अशा गोष्टी घडू शकल्या. पूर्वी व त्यावेळीही इतर सैन्यांमध्ये सेनापति वा सरदार पडला तर सैनिक पळून जात अशी परंपरा होती.
नंतरच्या काळातही व पुढेही १८०३ पासून १८४३ पर्यंत मराठयांची इंग्रजांबरोबर जी युध्दे झाली त्यातील कांही युध्दात मराठयांचा जय झाला. परंतु त्याचा यथायोग्य फायदा न घेता व माघार घेतल्यामुळे इंग्रजांना यश मिळून मराठयांचा मोड झाला. असे इतिहास सांगतो.
अशा प्रकारच्या घोडचुका महाराजांच्या शिस्तीखाली तयार झालेल्या सेनापतिनी व फौजांनी न केल्यामुळे व आपल्यावर सोपविलेली कामगिरी उत्कृष्ट रीतीने तंतोतंत पार पाडल्यामुळे आपल्याहून दुप्पट-तिप्पटीन असलेल्या शत्रूवरही महाराजांना विजय मिळविता आला.
“हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा!” असा कानमंत्र सामान्य माणसांना देऊन आपल्या नेतृत्वाने त्याच सामान्य माणसांकडून असामान्य इतिहास घडविणारे छत्रपति हे महान राष्ट्रपुरूष होत. त्यांचे चरित्र म्हणजे सावध राजकारणाची, पार्थ पराक्रमाची, पुरोगामी विचारसरणीची, नव-नवोन्मेषशालिनी प्रतिभेची, भगिरथ उद्योगाची, उदात्त चारित्र्याची, दक्ष व निष्कलंक राज्यकारभाराची, अतुल शौर्याची, असीम त्यागाची, समतेची, ममतेची व निस्वार्थी लोकसेवेची गाथाच!

विजापुर मुलुखावर आक्रमण :-
आता खान मेला म्हणून राजे शांत बसले नाहीत, राजांना माहीत होतं, लोखंड गरम आहे तोपर्यंत हातोडा मारला तर कमी ताकदीत जास्त फायदा होतो. एक मोठे युध्द जिंकले म्हणून स्वस्थ न बसता लगेच पुढची चढाई केलेली दिसते.अर्थात याचे नियोजन प्रतापगडाच्या समरप्रसंगाची तयारी करत असताना झाले असणार.एखादा श्रेष्ठ सेनापती कसा विचार करतो याचे हे उत्तम उदाहरण.
इ.स. १६५९ च्या अफझल प्रकरणानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाही प्रदेशात चढाईचे धोरण स्वीकारले. त्यानुसार सैन्याचे तीन भाग करत एक मोठी तुकडी घेऊन स्वतः शिवाजी राजे पन्हाळ्यावर गेले तर दुसरी तुकडी कोकणातून खाली दक्षिणेला राजापूरपर्यंत गेली. या सैन्यदलाच्या अधिकाऱ्याच्या नाव जरी मिळत नसले तरी दोरोजी म्हणून एक अधिकारी या मोहिमेत सहभागी असून त्याने राजापूर पर्यंत धडक मारल्याचे स्पष्ट होते. कोकणातील या स्वारीचे मुख्य प्रयोजन म्हणजे अफझलच्या आगमनामुळे दक्षिण कोकणातील शिवाजी राजांचे जे अंकित संस्थानिक विजापूरकरांना पुन्हा एकदा रुजू झाले होते, त्यांना नरम करणं हे होय. घाटावर पसरलेल्या इतर तुकड्यांच्या मानाने कोकणातील सैन्य जरी फार मोठं नसलं तरी या मोहिमेत शिवाजी राजांच्या एका राजकीय मुत्सद्देगिरीची, राजकारणाव्यतिरिक्त मैत्रीचीही एक बाजू होती. विजापुरी सरदार रुस्तमजमान हा शिवाजी राजांचा मित्र. त्याच्या हुकेरीच्या जहागिरीला लागूनच बांदा, कुडाळ, वाडी व देवगड तसेच आचरे हि स्थळे असून कुडाळ, वाडी प्रांत देसाई लखम सावंताचा होता. नजीकचे वेंगुर्ला बंदर विजापुरी सरदार खवासखानाच्या अंमलाखाली होते. आचरे हे संस्थान विजापूरचे मांडील होते. म्हणजे उत्तरेतून येणारे शिवाजी राजांचे सैन्य व राजापूरपर्यंतचा प्रदेश जहागिरीदाखल कमवून बसलेला रुस्तम यांच्या एकप्रकारे चिमट्यात विजापुरी मांडलिक, बंदरे अडकली होती.
शिवाजी महाराजांच्या कोकणातील हालचालींकडे शक्य तो दुर्लक्ष करणे हा रुस्तमचा वर्तनक्रम म्हणा वा त्याच्या धोरणाचा भाग असल्याने शिवाजी राजांनीही आपल्या सरदारांना रुस्तमच्या प्रदेशास उपद्रव न देण्याची ताकीद दिली होती. याचा परिणाम म्हणजे महाराजांचे सैन्य कुडाळ पर्यंत येऊन धडकलं व तो भाग त्यांनी ताब्यात घेण्यास आरंभ केला. लखम सावंताने यावेळी इतर लहान मोठ्या संस्थानिकांची मदत घेऊन शिवाजी राजांच्या सैन्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महाराजांच्या पथक्यांनी कुडाळचा किल्ला जिंकून घेतला. परंतु शत्रूचा फिरून प्रतिहल्ला आल्याने व जवळचे युद्धोपयोगी सामान संपत आल्याने तसेच शिवाजी राजेही पन्हाळ्यावर अडकून पडल्यामुळे कुमकेची आशा खुंटून त्यांनी किल्ला सोडून दिला. हाच प्रकार थोड्या फार फरकाने आचऱ्यास घडून तेथील राजाने शिवाजी राजांच्या लोकांना पिटाळून लावले. मात्र याच सुमारास रुस्तमने कोकणात स्वारी काढून फोंडा व कुडाळ ताब्यात घेत विजापुरास कळवले की, कोकांतील शिवाजी महाराजांच्या सैन्याचा पराभव माझ्या मदतीने व हुकमाने झाला आहे. रुस्तमचे यावेळचे धोरण, वर्तन शिवाजी राजांना अनुकूल असेच होते. त्याने कुडाळकराला मदत करण्याऐवजी त्यालाच रगडून काढण्यास आरंभ केला.
.

कोकणातील या वृत्तांताचा मुख्य आधार पसासं मधील ले. क्र. ८१२ असून स. १६६० च्या एप्रिल मधील या डच पत्रात मराठी साधनांच्या तुलनेने शिवाजी राजांच्या हालचालींची बरीच तपशीलवार माहिती आली आहे.
इकडे तिसरी आघाडी उघडून नेताजींनी १५ दिवसात बराच विजापुरजवळचा प्रांत काबीज केला, राजांनी स्वतः कराडवर हल्ला चढवला, स्वराज्याची सीमा जवळपास पन्हाळ्याजवळ नेला. सगळीकडे महाराजांची दहशत निर्माण झाली. त्या १५ दिवसात राजांनी कृष्णा, वेण्णा, वारणा नद्या ते कर्नाटक पर्यंतचा मुलुख काबीज केला, कराडजवळील वसंतगड अन वर्धनगड स्वराज्यात सामील करून घेतले, म्हणजे मूळ स्वराज्याच्या जवळपास अडीच पट मुलुख राजांनी त्यानंतरच्या पंधरा दिवसात स्वराज्याला जोडला.

या युद्धाने राजांना काय मिळालं??
१) खान आपल्या सैन्यासकट जावळीत बुडाला हे ऐकून विजापूर दरबारात हाहाकार माजला. बडी बेगम तर चक्कर येऊन पडली असे म्हणतात. तर बादशहा औरंगजेबाचे धाबे दणाणले, कारण याच अफझलखानाने एके काळी या औरंगजेबाला वेढ्यात पकडलेले होते. अफझलखान वध हि राजकीय दृष्ट्या फार मोठी गोष्ट घडली,कारण त्यानंतर विजापूरकर या धक्क्यातून सावरायच्या आतच शिवरायांनी स्वराज्य एकाच महिन्यात दुपटीने वाढविले. राजांनी खानाला मारलं ही बातमी वाऱ्यासारखी अवघ्या हिंदुस्थानात पसरली. अन अनेक प्रतिस्पर्धी शाह्यांनी राजांच्या नावाचा धसका घेतला.
२) तर या लढाईत राजांना ३००० गाठी कापड, वर मिळालेले जडजवाहीर, खाली छावणीत सात लक्ष रुपये रोकड, ९० उंट, १४०० घोडी, ४० हत्ती तसेच तोफा ह्या गोष्टी राजांनी जप्त केल्या.
३) प्रतापगडाच्या या युद्धात शिवाजी महाराजांचा आर्थिक, नैतिक, राजकीय असा लाभ बराच घडून आला. तात्कालिक लाभ म्हटल्यास अफझलचा सारा खजिना, दारुगोळा, युद्धोपयोगी जनावरे त्यांच्या ताब्यात आली. खानाचा मृत्यू व शिवाजी राजांची चढती कमान पाहून सिद्दी हिलाल, पांढरे, खराटे आदि सरदार त्यांच्या सेवेत दाखल झाले. नैतिक लाभ म्हणजे या घटनेमुळे शत्रू – मित्रांवर त्यांचा भयंकर वचक बसला व राजकीय फायदा म्हटल्यास या धक्क्यातून त्याचा मुख्य शत्रू — आदिलशाह सावरण्याच्या आतच शिवाजी महाराजांनी आपल्या पूर्वनियोजित मोहिमेस आरंभ केला. त्यानुसार खानाच्या वाईच्या तळाचा कब्जा घेऊन त्यांची पथके चंदन – वंदन किल्ले काबीज करून खटाव, वडूज, मायणी, मसूर, विसापूर, तासगाव वरून अष्टयाच्या पुढे पन्हाळ्यास येऊन धडकली व दि. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी त्यांनी पन्हाळ्याचा ताबा घेतला. अफझलच्या मृत्यूनंतरचा हा आदिलशाहीवर दुसरा मोठा आघात होता !
४) यानंतर स्वराज्यावर चालून आलेल्या कोणत्याही सरदाराने पुन्हा मंदिराची नासधूस केलेली दिसत नाही.शाहिस्तेखान पुण्यात लालमहालात रहात असूनही त्याने शेजारीच असलेल्या कसबा गणपती किंवा तांबडी जोगेश्वरी मंदिराला उपद्रव दिल्याची नोंद नाही.तसेच बहादुरखान कोकलताश जाफरजंग या औरंगजेबाच्या दुधभावाने दौंडजवळ भीमा नदीच्या काठी भुईकोट बांधला व त्याला स्वताचेच नाव दिले, बहादुरगड.( याच गडात पुढे संभाजी महाराजांना पकडून आणून त्यांचे हाल करण्यात आले ) पण या भुईकोटातील मंदिरेही सुस्थितीत दिसतात.अफझलखान वधाच्या प्रकरणाची हि दहशत म्हणावी काय?

प्रतापगडाच्या युध्दाच्या विश्लेषणाचा शेवट या काव्यपंक्तीने करतो.

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला …
दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.||
वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,
प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,
हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१||
खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती,
उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती !
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||२||
तुळजापुरची भवानी माय महान मंगला,
राउळात आदमखान दैत्यासह पोचला,
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3||
श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले,
रक्त तापले करात खडग सिध्द जाहले,
देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||४||
सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !!
काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही,
मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||५||
केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला

संदर्भग्रंथः-
१) शिवभारत- कविंद्र परमानंद
२) सभासदाची बखर- कृष्णाजी अनंत सभासद
३) ९१ कलमी बखर
४) राजाशिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे
५) शिवचरित्र निंबधावली
६) अफझलखानाचा वध- वि.ल.भावे
७ ) छत्रपती शिवाजी-सेतु माधवराव पगडी
८) युगप्रवर्तक शिवाजी महाराज-वा.कृ.भावे
९ ) मराठ्यांची बखर- ग्रँट डफ
१०) शिवाजी अँड हिज टाईम्स- जदुनाथ सरकार
११) पत्रसार संग्रह भाग १,२,३
१२ ) नेताजी पालकर यांचे युध्दातील योगदान
१३) शिवकाल- वि.गो.खोबरेकर
१४) चंद्रराव मोर्‍यांची बखर
१५) मराठ्यांचा इतिहास- अ.रा.कुलकर्णी,ग.ह.खरे
१६) शिवाजी महाराज चरित्र- कृ.अ.केळुसकर

मंगळगड उर्फ कांगोरी (Mangalgad/ Kangori )

सह्याद्रीतल्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी मंगळगड उर्फ कांगोरी गड जावळीच्या खोर्‍यातील एका उंच पहाडावर बांधण्यात आला. महाबळेश्वर, मकरंदगड, मंगळगड, चंद्रगड, प्रतापगड, कावळा किल्ला व पारघाटाचे प्रचंड पहाड यांच्या दाटीत जावळीच खोर वसलेल आहे. हा भाग उंच पहाड, घनदाट जंगल व खोल दर्‍यांनी नटलेला आहे.
सावित्री नदीकाठी वसलेल्या महाड शहरातून परदेशांशी व्यापार चालत असे. महाडात उतरलेला माल अनेक घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांत जात असे. ह्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी घाटमार्गाच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीवर व घाटमाथ्यावर अनेक किल्ले बांधण्यात आले. कांगोरी उर्फ मंगळगड हा किल्ला जावळीच्या खोर्‍यातील भोप घाट, वरंध घाट व अस्वल खिंड यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आला. कोकणात उतरणाऱ्या वाटेवरील रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला टेहळणीसाठी एक महत्वाचा किल्ला होता.
खालील फोटोमध्ये रायगडाच्या प्रभावळीमधील किल्ल्यांचे स्थान दाखवले आहे. मंगळगड आणि कावळा थोडे दूर असल्याने त्यांच्या दिशा दाखवल्या आहेत.

रायगडाच्या घेर्‍यातील गड

कांगोरीगड चंद्रराव मोर्‍यांनी जावळीच्या खोर्‍यात बांधला. त्याचा उपयोग घाटमार्गाच्या संरक्षणासाठी व टेहाळणीसाठी केला गेला. १५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला केला व जावळी ताब्यात घेतली. त्याबरोबर ८ जानेवारी १६५८ रोजी कांगोरी गड, ढवळगड, रायरी इत्यादी किल्लेही महाराजांच्या ताब्यात आले. मुरारबाजीसारखा कसलेला योध्दा मिळाला. कांगोरीगडाची डागडूजी करुन त्याचे नाव बदलून ‘‘मंगळगड’’ ठेवले. स्वराज्यांची राजधानी रायगडच्या जवळ असल्यामुळे याचा उपयोग राजकीय गुन्हेगारांना तुरुंगवासात ठेवण्यासाठी केला गेला. संभाजी महाराजांचा वध केल्यावर औरंगजेबाने इतिकदखान उर्फ जुल्फीकारखानास रायगड घेण्यास सांगितले.रायगडाच्या वेढ्यातून राजाराम महाराज निसटून वासोट्यामार्गे पन्हाळगडावर गेले. त्यांचा एकनिष्ठ सेवक गिरजोजी यादव रायगडाहून सोने व मौल्यवान वस्तु वेढ्यातून सहीसलामत बाहेर काढून मंगळगडाच्या आश्रयाला आले व तेथून चीजवस्तु काढून पन्हाळ्याला नेल्या. रायगडची नाकेबंदी करण्यासाठी मार्च १६८९ मध्ये खानाने आजूबाजूचे किल्ले व प्रदेश ताब्यात घेतला.त्यावेळी मंगळगड मोघलांच्या ताब्यात गेला. इ.स १६९० मध्ये छ. राजाराम महाराजांचे अमात्य रामचंद्रपंत यांनी ‘मंगळगड’ जिंकून घेतला. इ.स. १७७४ च्या एप्रिलमध्ये रायगडाच्या शिंबदीने कांगोरीवर स्वारी केली, याचे कारण बिरवाडी येथील निम्मा अंमल ‘रायगडचा’ व निम्मा कांगोरीचा असा होता.तर्फ बिरवाडीचा अंमल पेशव्यांनी जप्त केल्याने कांगोरकर रागावले आणि त्यांनी दंगे करुन रायगड परिसरात उपद्रव देण्यास सुरवात केली. कांगोरीकरांशी दोन तीन चकमकी झाल्यानंतर हा दंगा मिटला.
इ.स. १७७५ -७६ मध्ये येथे चोरट्यांचा उपद्रव झाल्यानंतर त्याचा बंदोबस्त रायगडाच्या शिंबदीने केला. इ.स. १७७९ मध्ये श्यामलने म्हणजे जंजिर्‍याच्या सिद्दीने रायगड परिसरात दंगे आरंभले तेव्हा त्याचा बंदोबस्त करण्याचे काम रघुनाथ सदाशिव याने केले.त्यावेळी मंग़ळगड उर्फ कांगोरी गडावरील शिंबदी मदतीला आली.
इ.स. १७७८-७९ मध्ये रायगड सुभ्यातील २४४ गावे होती. ती पेशव्यांनी जप्त करुन तात्पुरते परत घेतले.त्यापैकी तर्फ बिरवाडीची ६ गावे पंतप्रतिनिधींच्या ताब्यात असून ती कांगोरी संरजामास लावून दिली.
इ.स. १७८१-८२ मध्ये मंगळगडकर यांच्याशी बिरवाडीकडील वसुलीवरुन पुन्हा वाद आणि चकमक झाली.
इ.स. १० फेब्रुवारी १८११ मध्ये सातारा छत्रपती प्रतापसिंह यांचा भाउ चतुरसिंह यांनी पेशव्यांविरुध्द उठाव केल्याने पेशव्यांचा ( दुसर्‍या बाजीराव ) सेनापती त्रंबक डेंगळे यांनी त्याला मालेगाव येथे अटक केली.चतुरसिंह १८१२ मध्ये कांगोरी किल्ल्यावर कैद होता.कैदेत असताना १५ एप्रिल १८१८ रोजी त्याचा मृत्यु झाला.
इ.स.१८१७ मध्ये सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजीमेंट मधील कर्नल हंटर व मॉरीसन हे इंग्रज अधिकारी हैदराबादहून पुण्यास येत असताना वाटेत उरूळी येथे अटक करुन मंगळगडावर कैदेत ठेवले होते. पुढे बापु गोखले यांच्या हुकुमावरुन त्यांना वासोटा किल्ल्यावर नेउन ठेवण्यात आले.पुढे वासोटा ईंग्रजांनी घेतला तेव्हा त्यांची सुटका झाली.
मे १८१८ मध्ये इंग्रजांनी रायगडला वेढा दिला असता मंगळगडावरून एक तुकडी रायगडाच्या संरक्षणासाठी आली असता बिरवाडीजवळ तिची इंग्रज सैन्याबरोबर लढाई झाल्याचा उल्लेख आढळतो. इ.स. १८१८ मध्ये रायगडच्या पराभवानंतर कर्नल प्रोर्थर या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला ताब्यात घेतला.

मंगळगडावर येण्यासाठी निरनिराळे मार्ग

या गडावर जाण्यासाठी तीन-चार मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव मुर्‍ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर मंगळगडाला पोहोचता येते. या पायी मार्गावर दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो.

पिंपळवाडीच्या वाटेवरुन दिसणारा मंगळगड

१) मुंबईवरुन जायचे असेल तर ठाण्याहून रात्री सुटणार्‍या पिंपळवाडी बसने दुधाणेवाडी/कांगोरीगड या बस थांब्यावर उतरावे. बस थांब्यावरच कांगोरी सिध्देश्वराचे मंदिर आहे. मंदिराला लागूनच टेकडी आहे. मंदिरामागून शेताच्या बांधावरुन जाणारी वाट आपल्याला टेकडीच्या माथ्यावर अर्धा/पाऊण तासात घेऊन जाते. (टेकडीवर जाताना जेथे वाटेला २ फाटे फुटतात तेथे उजव्याबाजूची वाट पकडून टेकडीच्या माथ्यावर जावे. (डाव्या बाजूला जाणारी वाट मोठी (ठळक) आहे. परंतू ती डाव्या हाताला दूर दिसणार्‍या घराकडे जाते.) टेकडीच्या माथ्यावर विस्तिर्ण पठार आहे. हा झाला पहिला टप्पा. इथून डाव्या हाताला गडावर कांगोरी देवीचे मंदीर व समोर पश्चिम टोकावरील बुरुज दिसतो. त्या बुरुजाकडे तोंड करुन सरळ चढत जाणार्‍या वाटेने चालत गेल्यावर मध्ये छोटासा दगडांचा टप्पा(रॉक पॅच) पार करावा लागतो. तो चढून गेल्यावर आपण दुसर्‍या टप्प्यावर येतो. इथून डावीकडे जाणारी वाट आपल्याला गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाते. या टप्प्यावर उभा चढ चढावा लागतो.
२) दुधाणेवाडीतील कांगोरीसिध्देश्वराच्या मंदिरा समोरुन एक वाट पायर्‍या पायर्‍यांनी बनवलेल्या शेतातून टेकडीवर जाते. टेकडीच्या माथ्यावर कमी वेळात या वाटेने जाता येते. परंतु या या वाटेने टेकडीवर जाताना उभा चढ चढावा लागतो. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच खुप दमछाक होते या वाटेचा उपयोग टेकडी उतरताना करावा.
अर्थात या मार्गे जायचे असल्यास काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ठाणे सीबीसी ते गोठावली ही एसटी रात्री १२.३०ची आहे. ही एकच गाडी असल्याने बुकिंग करणं गरजेचं आहे. ही सकाळी ५.३०ला गोगावले वाडीत उतरवते जेथून ट्रेक चालू होतो. परतीच्या प्रवासासाठी १०.३० – महाड, १२.३० – बिरवाडी (शाळेची गाडी, रविवारी सुट्टी), २.३० – महाड, शेवटची. वाहने खूप कमी आहेत या गावात. रिक्षा वैगरे नाहीच.

वरंधा घाटातून दिसणारा कांगोरी

३) भोर-महाड मार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावर माझेरी गाव आहे. या माझेरीतूनही डोंगरदर्‍या, ओढे नाले ओलांडीत सहासात तासांच्या जंगलातील पायपिटी नंतर मंगळगड गाठता येतो.

वडघर गावातून होणारे मंगळगडाचे दर्शन

४ ) चौथा रस्ता हा पोलादपूर या तालुक्याच्या ठिकाणापासून अंदाजे २४ किलोमीटर अंतर असलेल्या सडे या गावातून आहे. सडे गावाच्या पुढे वडघर गावातूनसुद्धा मंगळगडावर जाण्यास दोन रस्ते आहेत. पोलादपुरातीलाच ढवळे या गावातून कांगोरीगडावर जाण्यासाठी ६ तास लागतात. गोठवली इथून येणारी वाट आणि सडे इथून येणारी वाट ह्या दोन्ही वाटा एका खिंडीत मिळतात.आणि दीड तासाने पिंपळवाडीतून येणारी वाटही तिला मिळते.
असे असले तरी, प्रत्यक्ष किल्ल्यावर जाण्यासाठी शेवटी एकच वाट आहे आणि ती ओळखणे सोपे आहे. मान उंच करून पहिले तर माणसाच्या आकाराचे नवरा-नवरीचे दोन सुळके दिसतात. गडावर जाण्याची एकमेव वाट ह्या सुळक्यांच्या खालूनच जाते. हे सुळके नजरेच्या टप्प्यात ठेवले तर साहसवीरांसाठी कुठूनही गडावर चढाई करता येईल. पिंपळवाडीतून जाणारी गडावर जाणारी वाट ही प्रसिद्ध मळवाट आहे आणि आता तिकडून गडावर जाण्यासाठी अर्धा रस्तासुद्धा बांधला आहे परंतु साहसाची आवड असणाऱ्या तरुणांनी सडे या गावातून चढण्यास हरकत नाही.सरासरी २ तासांत चढाई पूर्ण होते.
अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ला आडवाटेला असल्यामुळे, वेळेत पूर्ण करून परत येण्यासाठी स्वतःचे वाहन गरजेचे आहे.

पिंपळवाडी गावातील गोगावलेवाडी येथुन एक कच्चा रस्ता किल्ल्याखालील टेकडीवर असलेल्या विस्तीर्ण पठारावर जातो. या टेकडीमुळे गोगावले वाडीतुन किल्लादर्शन होत नाही.

पिंपळवाडीतून दिसणारी सह्याद्री रांग आणि त्यातील घाटवाटा

बिरवाडीच्या फाट्यावरून रुपावली १० किमी आहे. रुपावलीहुन पिंपळवाडी अथवा गोगावलेवाडीस जावे. हे अंतर साधारण ५ किमी आहे. पिंपळवाडीमध्ये डावीकडे कांगोरी सिद्धेश्वराचे मोठे मंदिर आहे मागे शाळेचे मोठे पटांगण आहे समोरच पत्र्याची शेड घातलेली आहे. या ठिकाणी राहण्याची सोय होऊ शकते.

पिंपळवाडीतील कांगोरीनाथाचे मंदिर मागे शाळा

पायथ्याच्या कांगोरीनाथ मंदिरातील देवता

  गोगावलेवाडीत असलेल्या सिध्देश्वर मंदिराच्या मागील बाजूस विरगळ व प्राचीन मुर्ती पहायला मिळतात.

गोगावलेवाडीत गाडी लावून गडाकडे जायला दोन वाट आहेत. पहिली अगदी मंदिराच्या समोरून जाणारी पायवाट आणि दुसरी थोडे पुढे जाऊन उजवीकडे असणारी गाडीवाट.

पहिल्या वाटेने छातीवर येणार चढ असून हि वाट दमछाक करणारी आहे. दुसरी वाट गाडीवाट म्हणले असले तरी कच्ची सडक असून ठिकठिकाणी गाडी जाण्यास अवघड आहे. फक्त ह्या वाटेचा फायदा असा कि हि वाट मोठी असून, कमी चढणीची आहे.

जीपसारखे वाहन थोड्या प्रयत्नांनी ह्या रस्ताने जाऊ शकते. चालत साधारण ४०- ४५ मिनिटात आपण हा रस्ता पार करून आपण एका पठारापाशी येतो. येथे गाडीवाट संपते.

टेकडीवर जाताना जेथे वाटेला २ फाटे फुटतात तेथे उजव्याबाजूची वाट पकडून टेकडीच्या माथ्यावर जावे. (डाव्या बाजूला जाणारी वाट मोठी (ठळक) आहे. परंतू ती डाव्या हाताला दूर दिसणार्‍या घराकडे जाते.) ठळक खुण म्हणजे या वाटेवर हा लाकडी पुल दिसतो. या पुलावरुन पलीकडे जायचे आहे.
वाडीतून टेकडीच्या पठारावर जाण्यास अर्धा तास लागतो. हा रस्ता पठारावर जेथे संपतो त्या ठिकाणी किल्ला असलेल्या डोंगराची सोंड उतरली आहे. कच्चा रस्ता बांधताना हि सोंड काही प्रमाणात तोडली असल्याने सोंडेवर चढणारी वाट लगेच लक्षात येत नाही.

कांगोरी उर्फ मंगळगडाचा नकाशा

या सोंडेवरून चढायला सुरवात केल्यावर समोरील डोंगरावर डाव्या बाजुला कांगोरी देवीचे मंदीर व समोर टोकावरील बुरुज दिसतो. या बुरुजाच्या दिशेने चढत गेल्यावर वाटेत छोटासा दगडांचा टप्पा पार करत आपण बुरुजाखालील कातळ टप्प्यावर पोहोचतो.

प्रवेशद्वार अगदीच भग्नावस्थेत असल्याने ओळखू येत नाही परंतु शेजारील विटांचे गोलाकार बांधकाम बघून प्रवेशद्वाराची कल्पना आपण करू शकतो.

महाद्वार
या टप्प्यावर चढताना एका ठिकाणी कातळात कोरलेल्या चार-पाच पायऱ्या दिसुन येतात. हा चढ चढुन आपण बुरुजाखालील टप्प्यावर येतो. येथुन डावीकडे जाणारी वाट आपल्याला उभा चढ चढत गडाच्या दरवाजात घेऊन जाते. या वाटेवर मोठया प्रमाणात झाडे असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही. वाटेवर काही ठिकाणी तुटलेले लोखंडी कठडे दिसतात. बुरुजाखालुन अर्ध्या तासात उध्वस्त पुर्वाभिमुख दरवाजाच्या अवशेषातुन आपला गडात प्रवेश होतो. गड समुद्रसपाटीपासून २४६५ फुट उंचावर असुन गडाचा परीसर ९ एकरमध्ये पुर्व-पश्चिम पसरला आहे. दरवाजाच्या खालील बाजूस दहाबारा पायऱ्या बांधलेल्या असुन दरवाजा शेजारील बुरुज व तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहेत. गडाचा विस्तार बऱ्या‌पैकी असुन डावीकडे गडाची माची तर उजवीकडे बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यावर जाण्याआधी माचीचा भाग फिरून घ्यावा.मंगळगडाची पूर्वपश्चिम लांबी १४८५ फूट व दक्षिण-उत्तर रुंदी २६४ फूट आहे   माचीच्या उंच भागात कांगोरी देवीचे मंदीर असुन या मंदिराकडे जाताना वाटेच्या उजव्या बाजुला पायऱ्या असलेले खडकात खोदलेले टाके पहायला मिळते.
कांगोरी मंदिरासमोर असलेले टाके   या टाक्याच्या पुढे वाटेवरच दुसरे टाके असुन या टाक्याजवळ किल्ल्यावरील झीज झालेल्या अनेक मुर्त्या ठेवल्या आहेत. कांगोरी देवीचे मंदीर उंचवट्यावर असल्याने १२ पायऱ्या चढल्यावर गोलाकार कमानीतुन आपला मंदिरात प्रवेश होतो.
  मंदिराची गर्भगृह व सभामंडप अशी रचना असुन सभामंडपावरील छत कोसळलेले आहे. गाभाऱ्यात काळभैरव व कांगोरीदेवीच्या मुर्तीबरोबर अजुन दोन दगडी मूर्त्या असुन गाभाऱ्याबाहेर काही भग्न दगडी मुर्ती ठेवल्या आहेत. कांगोरीनाथाचे मंदिर कधीकाळी चांगले प्रशस्त असावे, त्याच्या बाहेरील बांधकामावरून हे लगेच लक्षात येते. आत गाभाऱ्यात कांगोरीनाथाची शस्त्रधारी मूर्ती आणि शेजारी मातृदेवता आहे . कांगोरीनाथ हे येथील पंचक्रोशीचे दैवत, त्यामुळे आजूबाजूच्या गावकऱ्यांचा राबता येथे असतो. मंदिराबाहेर शंकराचे स्थान म्हणून शिवपिंड आहे, शैवपंथाची खूण त्रिशूळ आणि डमरू आहे. तसेच जुन्या मूर्तीही आहेत.
. डावीकडील वरच्या कोपऱ्यापासून clockwise १. कांगोरीनाथाची मूर्ती २. मातृदेवता ३. मंदिराबाहेरील आयुधधारी मूर्ती नि मातृदेवता ४. शिवपिंड 

  मंदीरासमोर लहानशी दीपमाळ आहे. मंदिरात दरवर्षी यात्रा भरत असल्याने गावकऱ्यानी मंदिरात स्वयंपाकाची भांडी ठेवली आहेत. गडावर रहायचे झाल्यास पावसाळा सोडुन येथे रहाता येईल.
  मंदिरामागे असलेली छोटी माची तटबंदीने बांधुन काढली असुन या तटबंदीत मंदिराशेजारी दोन्ही बाजुला दोन बुरुज व टोकाला अर्धगोलाकार बुरुज पहायला मिळतो.
  मंदिरामागुन खाली उतरणारी पायवाट थेट माचीच्या टोकाशी असलेल्या या बुरुजावरील ध्वजस्तंभापर्यंत जाते. माचीच्या या टोकावरुन जावळीच्या खोऱ्यातील दूरवरच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. या उंचीवर येवून कांगोरीदेवीचे दर्शन घेणे अतिशय कष्टप्रद असल्याने भक्तांनी खाली दुधाणेवाडीत या मुर्तीचे प्रतिरुप स्थापन करुन आपली सोय करुन घेतली आहे. गडावर वर्षातून एका देवीचा उत्सवही साजरा करतात. माचीवरून कांगोरीनाथ नि मागे बालेकिल्ला माचीचा हा भाग पाहुन झाल्यावर मुख्य दरवाजाकडे येऊन उजवीकडील वाटेने माचीपासून उंचावलेल्या बालेकिल्ल्याकडे निघावे.
    बालेकिल्ल्याची सुरुवातीची वाट अत्यंत निमुळती असुन एकावेळी एकच माणूस जाऊ शकतो. दरवाजा जवळून उजवीकडे गडावर वाट कशी जाते ते पिवळ्या रेषेत दाखवलं आहे. सुरवातीनंतर वाट वर वळते आणि सरळ गडावर जाते. तर एकवाट उजवीकडे जाते आणि पुढे डावीकडे वळते तेथे पाण्याचा दोन टाक्या आहेत. त्यातील एक खांब टाकी आहे त्यातील पाणी आम्ही पिण्यास वापरले. टाक्या जेथे आहे तेथे २ बाणाचे चिन्ह जुळताना फोटोत दाखवले आहे.
या वाटेने पाच मिनिटात घसाऱ्याच्या वाटेने आपण बालेकिल्ल्याखाली असलेल्या सर्वात मोठया टाक्यापाशी येऊन पोहोचतो. येथुन वर जाणारी वाट बालेकिल्ल्याच्या टोकावर जाते तर उजवीकडील वाट बालेकिल्ल्याला वळसा मारत उत्तर दिशेला बालेकिल्ल्याच्या पोटात असलेल्या पाण्याच्या टाक्याकडे जाते.
  येथे खडकात खोदलेली दोन खांबटाकी असुन यातील एका टाक्यांत वर्षभर पिण्यायोग्य पाणी असते. खांबटाकी पाहुन आल्या वाटेने पुन्हा आधीच्या टाक्याकडे यावे व तेथुन थोडासा चढ चढून बालेकिल्ल्याकडे जावे. बालेकिल्ल्यावर चढून गेल्यावर दोन वास्तुंचे अवशेष दिसतात. चौथऱ्याच्या अलीकडे एक उंचवटा असुन या उंचवट्यावर दोन घडीव शिवलिंग आहेत. शिवलिंगापासून काही अंतरावर भग्न झालेला नंदी पहायला मिळतो. या नंदीला लागुन एक मुर्ती ठेवलेली आहे. यात एक वाड्याचा चौथरा असुन दुसऱ्या वास्तुच्या पडक्या भिंती शिल्लक आहेत.
  वाड्याचा चौथरा   वाड्याच्या मागेच अर्धवट पडझड झालेले बांधकाम आढळते.काही लोकांच्या मते हे दारुकोठार असावे तर काहींना वाटते कि हा कैदखाना असावा. यापासून थोडे खालच्या बाजूस उतरून गेले कि आपण चढून येताना जो कडा दिसतो त्याच्या टोकाशी आपण जाऊन पोचतो.
या भिंती आठ ते दहा फुट असून त्यात एक खिडकी असलेली दिसते. येथुन थोडे खालच्या बाजूस उतरून गेल्यावर आपण चढून येताना दिसत असलेल्या बुरुजाच्या टोकाशी जाऊन पोहचतो. हा बुरुज २०-२५ फुट उंच बांधकाम करून बांधला आहे. या बुरूजाच्या खाली दोन लहान सुळके असुन स्थानिक लोक त्यांना नवरानवरीचे सुळके म्हणतात. मंगळगडावरुन दिसणारा पायथाचा गोगावलेवाडीचा परिसर आणि वाटेत लागणारे पठार ईथून दूरवर दिसणारे वरंध घाटाचे पहाड, खाली पसरलेले कोकण, त्यात दिसणाऱ्या छोटुकल्या वाड्या वस्त्या, उतरत्या छपराची घरे असा मस्त नजारा दिसतो. दक्षीणबाजुला दिसणारा प्रतापगड ईशान्येला दिसणारा तोरणा किंवा प्रचंडगड   पुर्वेला असणारे रायरेश्वर व कोल्हेश्वर पठार
गडावरुन मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा हे किल्ले व रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरचे पठार पहायला मिळते. पायथ्यापासुन गडावर येण्यास २ तास तर संपुर्ण गड फिरण्यास १ तास पुरेसा होतो. बालेकिल्ला उतरुन माचीवर आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. ( टिपः- सर्व फोटो आंतरजालावरुन घेतले आहेत. ) मंगळगडाची व्हिडीओतून सैर https://www.youtube.com/embed/4u4USK_ZxA0माझे सर्व लिखाण तुम्ही एकत्रित वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची
संदर्भग्रंथः-
१) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३) रायगड जिल्हा गॅझेटीयर
४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
५) निलेश भिंगे यांचा ब्लॉग
६) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७) www.durgbharari.com हि वेबसाईट

जननीचा दुर्ग

शिवछत्रपतींची तब्बल वीस वर्ष राजधानी असलेल्या राजस दुर्ग राजगडाच्या संरक्षणासाठी आजुबाजुला गडांचा घेरा असणे आवश्यक होता. तसा तो आहे देखील. पश्चिम बाजु तोरण्यासारख्या बलदंड गडाने रोखून धरली तर उत्तर बाजु सिंहगडाने सांभाळली.पुर्वेला पुरंदर सर्व आक्रमणे आपल्या पोलादी छातीवर झेलण्यासाठी समर्थ होता. राहिली दक्षीण बाजु. या बाजुला तुलनेने दुय्यम गड असले तरी तीन गडांची एक साखळी असल्यामुळे एक भक्कम फळी निर्माण झाली आहे. यातील आग्नेयेला रोहिड खोर्‍यातील रोहिडा उर्फ विचित्रगड खडा आहे, तर गोप्या घाट, वरंध घाट आणि सुपे नाळीवर देखरेख करण्यासाठी कावळ्या किल्ला नजर रोखून बसला आहे. या सर्वांच्या तुलनेत काहीश्या दुय्यम घाटवाटा या परिसरात आहेत. यामध्ये वाघजाई, चोरकणा,चिकणा, कुंभनळी आणि अस्वलखिंड या वाटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या परिसरात एका गडाची उभारणी करण्यात आली. या गडाचे नाव आहे “जननीचा दुर्ग”.
अर्थात “जननीचा दुर्ग” हे कागदोपत्री नाव असले तरी परीसरात अथवा गावात किल्ल्याचा पत्ता विचारला तरी उत्तरही अपेक्षित मिळते, “मोहनगड? नाही बा. असलं काही न्हाई इथ्ये. ह्यो डोंगुर दुर्गाडीचा. त्याला जन्नीचा डोंगुरबी म्हणत्यात. ह्ये असं जा रानातून”. त्यामुळे उत्तम म्हणजे पत्ता विचारताना दुर्गाडी किल्ला अथवा जननीचा डोंगर असा उल्लेख करावा.
गडावर चढण्यासाठी वाटा दोन. पहिली वाट दुर्गा मंदिरासमोरूनच सुरु होवून नैऋत्येकडून चढणारी. दुसरी वाट दुर्गामंदिरापासून अजून ४ किमी पुढे जात ‘दुर्गाडी’ गावातून.

या गडासंदर्भात अलीकडच्या काळात झालेली घडामोड म्हणजे पुण्याच्या सचिन जोशीं यांनी २००८ साली केलेल संशोधन. त्यांच्या मते पुर्णपणे विस्मरणात गेलेला मोहनगड उर्फ जसलोडगड म्हणजेच दुर्गाडी/जननीचा डोंगर. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये बाजी प्रभू देशपांडे ह्यांना लिहिलेल्या पत्रात हिरडस मावळातील मोहनगड किल्ल्याचा उल्लेख आहे. पण या किल्ल्याची स्थाननिश्चिती झाली नव्हती. त्यामुळे कावळ्या किल्ला हाच मोहनगड उर्फ जासलोडगड असल्याचे मानले जात होते. (काही अभ्यासकांचे हे मत आजही कायम आहे.) सचिन जोशीच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी जननीचा डोंगर येथे उपलब्ध असलेल्या अवशेषांचा अभ्यास करून व दुर्गस्थापत्याचे निकष लावून मोहनगड हा किल्ला वरंधा घाटातील जननी देवीच्या डोंगरवर होता असा शोधनिबंध ‘ भारत इतिहास संशोधक मंडळात सादर केला. अर्थात वैयक्तिक मला हे मत मान्य नाही. एकतर महाराजांनी लिहीलेल्या पत्रात स्पष्टपणे तटबंदी व इतर बांधकामे करावी असा आदेश आहे. जननीच्या गडावर नावाला देखील तटबंदी दिसत नाही.शिवाय गडही दुय्यम आहे. तेव्हा हा गड बांधण्यात महाराज सुरवातीच्या कालखंडात फार खर्च करतील असे वाटत नाही. कारण तेव्हा स्वराज्याची उभारणी सुरु होती. तेव्हा अश्या दुय्यम गडावर बांधकाम न करता प्राधान्य महत्वाच्या गडाला दिले जाणार हे ओघाने आलेच. जननीच्या दुर्गच्या तुलनेत कावळ्या केव्हाही महत्वाचा गड असल्यामुळे शिवाय कावळ्या किल्ल्यावरुन मोठा परिसर दिसत असल्यामुळे सहाजिकच बांधकाम करण्यासाठी कावळ्या गडाला झुकत माप दिले जाईल हे नक्की. शिवाय कावळ्या गडाचे क्षेत्रफळही जास्ती आहे. तेव्हा कावळ्या किल्ला हाच मोहनगड उर्फ जासलोडगड असणार.
याशिवाय या गडाचा आणखी एक संदर्भ म्हणजे प्रख्यात साहित्यिक आणि दुर्गप्रेमी श्री. गो.नि.दांडेकर उर्फ अप्पा यांनी गडांच्या पार्श्वभुमीवर काही पुस्तक लिहीली. उदा. राजमाचीच्या पार्श्वभुमीवर “माचीवरील बुधा”, राजगडाच्या पार्श्वभुमीवर “वाघरू”, तुंगच्या पार्श्वभुमीवर “पवनाकाठचा धोंडी”, कर्नाळ्याच्या पार्श्वभुमीवर “जैत रे जैत”. तसेच त्यांनी या जननीच्या दुर्गच्या पार्श्वभुमीवर एक कांदबरी लिहीली आहे, “त्या तिथे रुखातळी”.

जननीचा दुर्ग परिसराचा नकाशा

मुंबईहुन जननीचा दुर्ग किल्ल्यास भेट देण्यासाठी सर्वप्रथम महाडमार्गे वरंधा घाट गाठावा लागतो. मुंबई ते वरंधा घाट हे अंतर १९२ कि.मी असुन वरंधा घाटात आल्यावर तेथुन ८ कि.मी अंतरावर शिरगाव आहे. शिरगाव पार केल्यावर पुढील वळणावर उजवीकडे दुर्गाडी गावाचा फाटा लागतो. पुण्याहुन भोरमार्गे आल्यास हा फाटा शिरगावच्या अलीकडे डाव्या बाजुस आहे.

शिरगावातून दिसणारा दुर्गाडी / जननीचा दुर्ग ईथून जाताना उजव्या हाताने वर चढायचे.दुर्गाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव शिरगाव पासुन ४.५ कि.मी. अंतरावर आहे. पुण्याहून भोरमार्गे दुर्गाडी हे अंतर १०२ कि.मी आहे पण भोरपासून वरंधा घाटाचा रस्ता अतिशय खराब आहे.

गावकरी याला दुर्गाडीचा किल्ला म्हणून संबोधतात.

शिरगाव गावातून देखील एक वाट आहे परंतु तेथे उभा चढ आहे. दुर्गाडी गावातून किल्ल्याला जायची वाट सोपी आणि कमी चढाची आहे. शिरगाव गावातून किल्ल्याच्या दिशेने पाहता, डावीकडे जी खिंड दिसते त्याच्या पलीकडे दुर्गाडी गाव आहे.

  दुर्गाडी गावात हनुमान मंदिराकडे आल्यावर रस्त्याच्या उजवीकडे एक कच्चा रस्ता गावामागील टेकडीवर असलेल्या जननीदेवीच्या मंदिराकडे जातो. गावकऱ्यांनी किल्ल्यावरील देवीचे मंदिर अलीकडील काळात या टेकडीवर बांधले आहे. हे अंतर साधारण १.५ कि.मी. असुन खाजगी वाहनाने आपल्याला या मंदीरापर्यंत जाता येते. यामुळे गड चढण्याचा अर्धा तास कमी होतो. मुक्कामासाठी मंदिर योग्य आहे पण पाण्याची सोय नाही.
मंदिरात ‘जनी अंधारी बाजी’ अशी पाटी. मूळच्या देवळीवर सभामंडप बांधून काढलेला. मंदिरासमोर काही मूर्ती आणि ५-६ वीरगळ मांडून ठेवलेले.
      दुर्गाडीहून 
दुर्गाडीहून त्या खिंडीपर्यंत एकदम सोप्पा रस्ता आहे.

या वाटेने थोडे वर आल्यावर समोरच दक्षिणोत्तर पसरलेला गडाचा डोंगर दिसतो. या डोंगराची एक धार पुर्वेकडे आपल्या डाव्या बाजुस असलेल्या खिंडीत उतरलेली दिसते. खिंडीत उतरलेल्या या धारेवरूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे.याठिकाणी एक वीरगळ पहायला मिळतो.वीरगळावर शिवलिंगपूजा करणारे साधक आणि वीराला स्वर्गात घेऊन निघालेले देवदूत/ अप्सरा हे नेहमीचे दृष्य दिसते. वास्तविक हा गड तसा दुय्यम, इथे कोणती लढाई झाल्याची नोंद नाही, तरीही हा वीरगळ कोणाचा ? याचे उत्तर मिळत नाही. शिरगावातुन किल्ल्यावर येणारी वाट या खिंडीतच येते.

मंदिराच्या मागील बाजुने वर चढत जाणारी वाट जननीच्या गडावर जाते. या वाटेने गावकऱ्यांची सतत ये-जा असल्याने वाट चांगलीच मळलेली आहे. पुढची वाटचाल उघड्या-बोडक्या उभ्या दांडावरून आहे.सहाजिकच उन्हा असेल तर हा टप्पा त्रासदायक होतो.

या ठिकाणी गडावर जाण्याची दिशा बाणाने दर्शविली आहे. येथुन डोंगर चढुन दोन तीन पठारे पार करत आपण किल्ल्याच्या डोंगराखाली येतो. येथुन थेट किल्ल्यावर जाणारी वाट नसुन किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला या डोंगराला वळसा घालुन जावे लागते. हि वाट घनदाट जंगलातुन जाते. या वाटेने आपण किल्ल्याखालील डोंगराच्या दुसऱ्या टोकावर येतो.
या ठिकाणी गावकऱ्यांनी लहानशी घुमटी उभारलेली आहे. शिरगावातुन गडावर येणारी दुसरी वाट या घुमटीकडे येते. माथ्याला अर्धवळसा घालत आडव्या वाटेने गडाच्या ईशान्य धारेवर आपण पोहोचलेलो असतो.धारेवरून पल्याड जननी दुर्गाचा कातळमाथा आणि पदरातल्या गर्द देवराईची झाडी खुणावू लागलेली असते.
आपण पोहोचलेलो असतो.धारेवरून पल्याड जननी दुर्गाचा कातळमाथा आणि पदरातल्या गर्द देवराईची झाडी खुणावू लागलेली असते. 

येथुन गडावर जाण्यासाठी एकच वाट असुन हि वाट कड्याला लागुन पुढे जाते.त्या पुढे धारे वरून चढायच आणि मग कड्याला डावीकडे ठेऊन हिरव्यागार जंगलातून वळसा मारायचा.

  
खांब टाके
माथ्याच्या २० मी अलिकडे आहे डावीकडे उतरत जाणारी वाट. या वाटेने खाली उतरले असता कातळात कोरलेली पाण्याची तीन टाकी दिसतात. यातील दोन टाकी मातीने बुजलेली असुन तिसऱ्या खांबटाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. कातळात खोदत नेलेलं दोन साधे खांब असलेलं पाण्याचं टाके. नक्कीच जुनं. फार उपसा नसल्याने प्यावसं वाटावं, असं नितळ नाही. अगदीच पाणी जवळ नसेलच, तर पाणी गाळून घेता येईल.


शेजारी एक कोरडं टाकं अर्धवट खांबांची खोदाई करून सोडलेलं. पल्याड ओहोळापाशी तिसऱ्या टाक्याची खोदाई सुरुवातीलाच सोडलीये. टाकी पाहुन मागे फिरावे व जननी देवीच्या मंदिरात यावे. मोहनगडाची यापुढची वाट बहुतांशी कातळातून, त्यामुळे ठिकठिकाणी कातळात साध्या पायऱ्या खोदलेल्या.


 

कुठेकुठे पायऱ्या खणताना लावलेल्या सुरुंगासाठी खणलेले खळगे. इतक्या सगळ्या पायऱ्या आणि सुरुंगाच्या खुणा बघता या पायऱ्या नक्की कधीच्या – मूळच्या किल्ल्याच्या, की अलिकडच्या काळात गडावर देवीला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी खणलेल्या हे सांगणं अवघडचं.
पायथ्यापासुन मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी दिड ते दोन तास लागतात.

गडावर मुक्काम करायचा असल्यास ४-५ जण या मंदिरात राहू शकतात. मंदिरात जननी मातेची सुंदर घडीव मुर्ती असुन आवारात तुळशी वृंदावन व नंदी आहे. भिडे नामक स्थानिक भक्ताने इथल्या जुन्या जोत्यावर नवीन जननीचं मंदिर बांधून काढलंय. ते जुनं जोतं मंदिराचंच होतं, की किल्लेदाराच्या घरट्याचे हे सांगणे अवघड.मंदिराच्या मागील बाजुने माथ्यावर जाण्यासाठी वाट असुन माथ्यावर गवतात लपलेला एक लहान चौथरा वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही.

मंदिरा मागील पाउल वाटेने वर चढल्यावर आपण किल्ल्याच्या टोकावर पोहोचतो. दुर्गाडी पायथ्यापासून ३०० मी आणि समुद्रसपाटीपासून ११०० मी उंचावर आलेलो. गडावरून अग्गदी जवळ बघितल्यास ६-७ घाटवाटा सहजी दिसल्या – वाघजाई, चिकणा, कुंभेनळी, चोरकणा, कामथे, न्हावणदीण आणि वरंध. या घाटांवर नजर-नियंत्रण ठेवणारं, टेहेळणीचं ठिकाण म्हणून जननीचा दुर्गाचे महत्त्व. इथून नैऋत्येला प्रतापगड, वायव्येला रायगड-पोटला डोंगर ,तळ्ये गावाजवळचं जननीचं शिखर,खाली कोकणात मंगळगड उर्फ कांगोरी दुर्ग उठवलेला,वायव्येला कावळ्या व दक्षीणेला रायरेश्वरचे पठार आणि उत्तरे व पश्चिमेला सह्यकण्यामधील घाटवाटा (फडताड, शेवत्या, भिकनाळ, मढेघाट, उपांड्या, आंबेनळी, गोप्याघाट) आणि उत्तरेला तोरणा-राजगड सहजीच नजरेसमोर होते. ३६० अंशातल्या सह्याद्रीदर्शनाने आणि भर्राट वाऱ्याने आपण फ्रेश झालेले असतो.
गडावर सपाटी अशी नाहीच शिवाय तटबंदी, बुरुज यासारखे कोणतेही बांधकाम दिसत नाही त्यामुळे हा किल्ला असावा का? असा मनात प्रश्न आल्याशिवाय रहात नाही. फारतर मोहनगड जावळीच्या खोऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने, प्रतापगडाच्या युद्धाच्या आधी मोहनगडावरही थोडी पूर्वतयारी केली गेली असू शकेल. त्यामुळे पत्रात उल्लेख केल्या प्रमाणे बाजींनी दुर्गाडी / मोहनगड / जासलोडगड कितपत वसवला असेल या बद्दल शंकाच येते. एकूण केवळ घाट वाटांवर लक्ष ठेवण्याकारीताच दुर्गाडी चा वापर झाला असेल. तोच मोहनगड वा जासलोडगड आहे का याबद्दल अजूनही शंकाच येते.
तरीही ईथला अनवट निसर्ग अनुभवायला आणि भन्नाट भटकंतीचा अनुभव घेण्यासाठी जननीच्या दुर्गला जरुर भेट द्या. https://www.youtube.com/embed/XhGqNGdb36k

जननीच्या दुर्गाची व्हिडीओतून सफर

माझे सर्व लिखाण तुम्ही एकत्रित वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

संदर्भग्रंथः-
१) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
२) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट
३) साईप्रसाद बेलसरे, समीर पटेल यांचे लिखाण
४) त्या तिथे रुखातळी- गो.नि.दांडेकर