रायगडाच्या घेर्‍यात

६ एप्रिल १६५६ चा दिवस. एन आषाढ वणव्यात एका बलदंड आणि प्राचीन गडाच्या पायथ्याशी फौजा पोहचल्या आणि बघता बघाता त्यांनी गडाला मोर्चे लावले, मोक्याच्या जागा रोखल्या, गडाला वेढा पडला. अर्थात गडाचा फास हा असा आवळल्यानंतर गडावर कैद झालेला सरदार, त्याच्या दोन मुलांसह लगेचच शरण आला. हा जहागीरदार होता चंद्रराव मोरे आणि बरोबर होती त्याची दोन मुले कृष्णाजी व बाजी. अर्थात चंद्रराव हे याचे खरे नाव नव्हते, हि होती पदवी. जावळीच्या दुर्गम प्रदेशावर राज्य करणार्‍या मोरे घराण्याच्या राजपुरुषाला हि उपाधी लावली जात असे.याचे खरे नाव येसाजी मोरे. वास्तविक ज्याने या येसाजीला गादीवर बसण्यास ज्यांनी मदत केली त्याच्याशीच उलटल्याने हि वेळ आली होती. मोर्‍यांशी हा संघर्ष करणारे आणि अगदी पातशाही सैन्य ही ज्यांच्या प्रदेशात पाउल टाकायला धजावत नसे त्या जावळीला ताब्यात घेणारे होते, शिवछत्रपती.
वास्तविक इ.स. १६४८ मध्ये याच शिवाजी महाराजांच्या मदतीने येसाजी हा जावळीचा उत्तराधीकारी म्हणजे चंद्रराव मोरे झाला. मात्र या दुर्गम प्रदेशात आपल्याला कोण विरोध करणार ? या घंमेडीने त्याचा घात केला आणि जावळी मुक्त करुन स्वराज्याची पश्चिम सीमा थेट समुद्रापर्यंत सुरक्षित करण्यासाठी शिवाजी राजांनी जावळीवर आक्रमण केले. १५ जानेवारी १६५६ ला जावळी शिवरायांकडे आली व ३० मार्च पर्यंत राजे तिथे राहिले . चंद्रराव मोरे जावळीतून निसटला व रायरीला, म्हणजे रायगडला गेला. जावळीमधे काही प्रतिकार झाला असावा ज्यामुळे शिवरायांना तिथे ३० मार्चपर्यंत राहावे लागले. राजे तिथे असताना त्याच्या लोकांनी रायरीलाही वेढा घातला असावा. शके १५७७ मन्मथ संवछरी राजश्री सिवाजीराजे यांनी पौष चतुर्दशीस जाऊन जावली घेतली [१५ जानेवारी १६५६]
चंद्रराव (येसाजी) पळून रायरीच्या (आत्ताचा रायगड) किल्यावर आश्रयास गेला. शिवाजीराजांच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला. पुढे चंद्ररावाला आणि त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना शिवाजीराजांनी कैद केले.शरण आलेल्या चंद्ररावाने काही दिवसात पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजीराजांनी त्याला आणि कृष्णाजीला ठार केले. बाजी मात्र पळून गेला.जावळी घेतल्यावर लवकरच चंद्रगड,मकरंदगड,चांभारगड हे किल्ले स्वराज्यात सामिल झाले.
मोर्‍यांकडून रायरीचा डोंगर जिंकल्यानंतर शिवाजी राजे स्वतः गडावर गेले. महाराजांनी या वेळी हा संपुर्ण गड बारकाईने नजरेखाली घातला. ईथली मोक्याची जागा त्यांनी अचुक हेरली असणार. हे ठिकाण एक बळकट लष्करी ठाणे म्हणून बांधता येईल याची नोंद महाराजांनी नक्कीच घेतली असली पाहीजे. अर्थात तो काळ स्वराज्य उभारणीचा होता. सतत मोहिमा आणि वारंवार होणारी सुलतानी आक्रमण, यामुळे ईथे फार दुर्ग बांधणी झाली नसावी.

वास्तविक रायगड हा अतिशय प्राचीन गड. याचे प्रमाण म्हणजे परिसरात असणारी गंधारपाले लेणी आणि महाड हे प्राचीन बंदर. त्याकाळी सावित्री नदीच्या पात्रामुळे आणि लगेचच असणार्‍या बाणकोटच्या खाडीमुळे या परिसरातून मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा. सह्याद्रीच्या रांगेत असणार्‍या घाटातून बैलांवर सामान लादून माल देशावरील नाशीक, पैठण, तेर, कर्‍हाड, करवीर अश्या शहरात नेला जाई. या व्यापारी तांड्याना लष्करी संरक्षण आवश्यकच असे, यासाठीच महाडच्या परिसरात बरेच दुर्ग उभारले गेले. बाकीचे दुर्ग आकाराने छोटे आणि तुलनेने दुय्यम होते. पण ऊंचीचा विचार केला तर थेट गगनचुंबी म्हणावा आणि विस्ताराने प्रचंड अश्या महादुर्ग रायगडाची उभारणी याच काळात झाली. मात्र गडाचे पहिले उल्लेख मिळतात, ते बाराव्या शतकातील ! त्या काळात विजयनगरच्या हिंदु राजांच अकींत म्हणवल्या जाणार्‍या पाळेगारांकडे गडाचा ताबा होता. अर्थात त्याच्याही आधी गड अकराव्या ते तेराव्या शतकात यादवांकडे असावा. चौदाव्या शतकाच्या आरंभी रायगडाचा ताबा गेला निजामशाहीकडे, त्यावेळी शिर्के देशमुख येथील हवालदार होते. पुढे निजामशाही नष्ट झाल्यानंतर महाराष्ट्राचा प्रमुख भाग दोनच शाह्यांनी वाटून घेतला, आदिलशाही आणि मोघल. रायगडाचा ताबा आला आदिलशाहीकडे.पण प्रत्यक्षात ईथे कोणी आदिलशाही अंमलदार नव्हता. या प्रदेशाचा आणि गडाचा ताबा होता जावळीच्या मोर्‍यांकडे. त्यांच्याकडून गड प्राप्त केला शिवाजी महाराजांनी आणि रायगडाने जणु त्याच्या सोनेरी कालखंडात प्रवेश केला.
रायगड हे काही या गडाचे मुळ नाव नाही. रायगडाचे प्राचीन नाव ’रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ’पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ’रासिवटा’ आणि ’तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दर्‍या यावरून त्यास ’नंदादीप’ असेही नाव पडले. दुर्गदुर्गेश्वर रायगडाला 15 विविध नावांनी संबोधिले गेले आहे. रायगड, रायरी, इस्लामगड,नंदादीप, जंबुद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर ही ती पंधरा नांवे आहेत.
निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. रायगड हा पुर्व बाजु, उत्तर बाजु आणि पश्चिम बाजुने अभेद्य अश्या सह्याद्रीच्या रांगानी गराडला आहे. तर दक्षीणेला गुयरीची डोंगररांग. हे सर्व पर्वत कडे अक्षरशः खडे आहेत. ईथे मानवी नजर देखील धड ठरत नाही, तेव्हा आक्रमण करुन या कड्यावरुन हल्ला करण्याची कल्पना हे फक्त दिवास्वप्न बघणारेच करु शकतात.
rayagd2
रायगडाला दोन नद्याच्या खोर्‍यांनी घेरले आहे,काळ आणि गंधार. कोकणातील नद्यांचे एक वैशिष्ट्य आहे. पावसाळा संपला आणि दसरा झाला की या नद्यांमध्ये जेमतेम पाणी शिल्लक रहाते, फारतर घोटा बुडावा ईतपतच पाणी नदीच्या पात्रात असते. कार्तिक ओलांड्ला कि ते ही नाहीसे होते आणि वैशाखापर्यंत या सरिता निपचीत पडतात.
raygad3
पण जेष्ठात पश्चिम वारा सुरु होते.समुद्राकडून काळे ढग ईशान्येकडे निघतात. पण ताठ मानेची सह्याद्रीची शिखरं या मेघांना अडवतात. ढगातून अखंड कोसळणारा जलौघ सह्याद्रीच्या राकट अंगावरुन खाली धावू लागते. उन्हाने पिवळेजर्द झालेले डोंगर आषाढ सरीनी हिरवेगर्द होतात. सह्याद्रीवरचे हे हिरवे आक्रमण मात्र सुखावह असते. मात्र श्रावण, भाद्रपदापर्यंत दाट ढगात लपेटलेली हि सह्यशिखरे दर्शनही देत नाहीत. दाट ढगांमध्ये माथा लपेटून बसलेली गिरीशिखरांच्या अंगावर चढलेल्या हिरव्या शेला एकाच रंगाचा वाटून निसर्ग भाद्रपदात फुलांची वेलबुट्टी सजवतो. सोनकीची पिवळा भंडारा, सीतेच्या आसवांचा नील नखरा, तेरड्याचा गुलमक्षी रंग आणि चिरायतीचा आणि गेंदाची श्वेत भुरभुर. हे सगळे रंग कमी म्हणून कि काय, कधी सात तर कधी पंधरा वर्षानी कारवीला जाग येते आणि जांभळ्या रंगाची उघळण भर घालते. पुन्हा एकदा कार्तिक उजाडतो आणि सह्यपर्वत आपले रुप पुन्हा पालटतो, हिरवा रंगाचे गवत पुन्हा पिवळे पडायला लागते आणि अग्निपुत्र सह्याद्रीचे एक ऋतुचक्र पुर्ण होते.
rayagd 3
अर्थात जेष्ठ ते भाद्रपद या परिसरात महामुर पाउस कोसळतो, नद्यांना पुन्हा नवीन उर्जा मिळते. प्रचंड प्रमाणात पाण्याचा ओघ घेउन त्या अक्षरशः फुफाटात धावायला लागतात. फक्त काठावरुनच हा नजारा बघायचा, पाण्यात साधा पाय बुडावयचीही छाती होत नाही. अश्या या कोकणकन्या काळ आणि गंधार वर्षाकाळात केवळ आपल्या रौद्र रुपाने शत्रुला रायगडाजवळ फिरकु देत नाहीत. सह्याद्री, पाउस आणि या नद्या म्हणजे रायगडाला निसर्गाने पुरवलेले कवच. खुद्द शिवाजी महाराज या पर्जन्य काळाचे मोठे मार्मिक वर्णन करतात,” आमच्या या प्रदेशात कल्पनेचा घोडा नाचवणे कठीण. उडत्या पाखराच्या पंखावर शेवाळ उगवेल इतका पाउस इथे पडतो”.
raygad5
हाच पाउस उत्ताल सह्यकड्यांना स्नान घालता घालता, त्याच्या अंगाखांद्यावरुन धबधब्याच्या रुपात कोसळतो, तर माथ्यावरुन मिळेल त्या घळीतून पाषाण खंडाना फोडत ओढ्या, नाल्याच्या रुपात तळाकडे येतो. सह्याद्रीच्या वज्रासारख्या कठीण छातीला या जलधारा भेदतात आणि घळी तयार होतात. काहीवेळा या घळींचे उतार सौम्य असतात. द्विपाद मानव काय, पण चतुष्पाद गर्दभ आणि बैल या मार्गाने ये -जा करु शकतात. अश्या सोप्या वाटांना “घाट” अशी संज्ञा आहे. सह्याद्रीत असे असंख्य घाटवाटा आहेत. अगदी प्राचीन काळापासून मानवाने या घाटांचा मालाची ने-आण करण्यासाठी वापर केला. नाणेघाट, बोरघाट, थळघाट असे असंख्या घाट देशावरील शहरं आणि कोकणातील बंदरं जोडण्याचे काम अव्याहत करत आले आहेत. अर्थात काही वाटा मात्र विलक्षण कठीण. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाने पथ्थर फोडून केलेल्या या वाटांनी फक्त माणुसच जेमतेम पाय रोवत आणि कड्यात बोटे अडकवत, चढउतार करु शकतो. यांना म्हणायचे नाळ. खडतर असल्या तरी या वाटांनी पटकन देशावर जाता यायचे किंवा कोकणात उतरणे जमायचे.
Raygad 6
रायगडाच्या उत्तर दिशेला सह्याद्री रांगात असणारे घाट आणि नाळ

थेट रायगड परिसरात तीन घाटवाटा आहेत. एक आहे कावळ्या घाट. सांदोशीचे भुमीपुत्र गोदाजी जगताप आणि सर्कले नाईक यांनी केलेला प्रतिकाराचा क्षण जपणारी कावल्या-बावल्याची खिंड याच घाटाच्या सुरवातीला आहे. याशिवाय पुर्व बाजुला शेवत्या घाट आणि मढे घाट आहेत. या घाटांनी नेला जाणार्‍या मालावर रायगडाची करडी नजर असायची.
जसे रायगडाच्या घेर्‍यात घाट आहेत तसेच नाळाही आहेत. थेट उत्तरेला बोचेघोळ नाळ. नावाप्रमाणे उभ्याने उतरता येणार नाही, अशी हि खडतर वाट.कसाबसा अधार घेउन एक पाउल ठेवायला जावे, तो वीसेक पावलं घसरुनच थांबावे अशी हि वाट.सर्वसामान्यांनी त्याच्या वाटेला न जाणेच चांगले. त्याच्या मागून गाय नाळ आणि निसणीची वाट. चढ उतराईची रग जिरवायची असेल तर या वाटा नक्कीच ती हौस पुरवतात. रायगडाच्या घेर्‍यातील महत्वाचा संरक्षक दुर्ग म्हणजे लिंगाणा. याला वळसा घालून येते बोराट्याची नाळ. देशावरील मोहरी गावापासून हा उतार सुरु होतो आणि लिंगाण्याला वळसा घालून पाणे गावात उतरतो. मात्र बोराट्याच्या नाळेतून लिंगाण्याकडे चढायचा फाटा नेमका सापडायला हवा आणी जेमतेम पाउल रोउन पार करावी लागणारी वाट रोमहर्षक आहे. अन्यथा सरळ खाली उतरणारी वाट थेट दापोलीत आणुन सोडते.मात्र हे दापोली म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिध्द दापोली नव्हे बरं का! हे आपलं रायगडाच्या घेर्‍यातील ईटुकले गाव.
याच दापोली गावाच्या परिसरात एक निसर्गनवल आहे. काळ नदी वाहता वाहता एका पन्नास फुट कड्यावरुन झेप घेते. इथे एक पावसाळी धबधबा आहे. मात्र भिजायची सोय नाही, फक्त नेत्रसुख घ्यायचे.कारण धबधब्याच्या थेट खाली एक खोल डोह आहे.
Raygad7
या परिसराला ‘वाळणकोंड’ म्हणतात. निसर्गातल्या या चमत्काराला भोळ्या भाविकांनी श्रध्देची जोड दिली आणि एका देवस्थानाचा जन्म झाला. शहरी संस्कृतीच्या दृष्टीने या अंधश्रध्दा वाटू शकतात, मात्र याच अंधश्रध्दामुळे ईथले मुळ स्वरुप टिकून राहिले, इथल्या निसर्गाला मानवी हस्तक्षेपाचे नख लागले नाही, हे विसरुन चालणार नाही. या डोहात अक्षरशः दिड, दोन फुटी माझे दिसतात. वरदायिनी देवीचा हा डोह म्हणून इथल्या डोहामधल्या माशांना अभय आहे, त्यांना कोणी पागत नाही.
Raygad 9
डोहाच्या पुर्व किनार्‍यावर वरदायिनी देवीच्या राऊळ आहे. अलीकडच्या तीरावरुन पलीकडे मंदिराला जाण्यासाठी लोखंडी पूलावरुन उभा केलेला आहे.
Raygad 10
मंदिराचे पुजारी बुवांनी विशिष्ट पद्धतीनं आवाज काढत, डोहामध्ये अन्न टाकल्यावर मोठाल्या आकाराचे अक्षरश: शेकडो मासे गोळा होतात. आपणही हे दृष्य पाहू, अनुभवू शकतो.
याच दापोलीत दुसर्‍या एका नाळेतील वाट उतरते.हि नाळ म्हणजे सिंगापुर नाळ. सिंगापुर नाळेची वाट रायगडपरिसरातील सर्वात सोपी नाळेची वाट म्हणता येईल. हे सिंगापुर गाव एन रायगडाच्या कण्यात वसले आहे.गावात अगदी शाळा आहे. आता अगदी गावापर्यंत रस्ता झाला आहे आणि पुण्याहून स्वारगेटवरुन थेट ईथंपर्यंत एस.टी. बस येते.
Raygad 11
रायगडाच्या पुर्व बाजुला सह्याद्री रांगात असणारे घाट आणि नाळ

याच्यानंतर आणखी तीन जुन्या नाळा आहेत, आगी नाळा, फडताड नाळ आणि भीकनाळ. एकेकाळी या वाटेवरुन सह्यपुत्रांचा राबता होता. मात्र कालचक्र पुढे गेले. स्वयंपुर्ण असणारी गावे स्थानिकांना रोजगार देण्यात अक्षम ठरली. पोटापाण्यासाठी ईथला भुमीपुत्र पुण्या-मुंबईसारख्या शहरात स्थलांतरीत झाला. गावात तरुण औषधाला सापडत नाही, अशी परिस्थिती आली. कोणत्या वस्तीत प्रवेश करावा तो फक्त म्हातारी तोंडे सामोरी यावीत हे चित्र रायगडाच्या घेर्‍यातील काय, पुर्ण सह्याद्रीच्या रांगेत नवीन राहीले नाही. शिकारीनिमीत्ताने, औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी एखादा चुकला माकला सोडला तर या नाळेच्या वाटेवर कोणी फिरकेना झाले. राबता संपला आणि जुन्या वाटा मोडून गेल्या. आणखी काही वर्षांनी कदाचित कागदोपत्री या नाळांची नावे रहातील अशी परिस्थिती आहे. मात्र स्थानिकांनी या वाटांना वार्‍यावर सोडले असले तरी शहरी सह्यपुत्रांना घाटवाटा पालथे घालण्याचे नवे व्यसन लागले आहे. पुन्हा एकदा या वाटांवर मानवी वावर दिसु लागला आहे. थोडेफार आशादायक असे हे चित्र.
यानंतर येतो शेवत्या घाट. मात्र सध्या ईथूनही फार वावर नाही. त्यानंतरच्या मढ्या घाट आणि उपांड्या नाळेची हिच परिस्थिती होती. वास्तविक सिंहगडावर सुभेदार तानाजी मालुसरेंचा देह पडल्यानंतर त्यांचे शव याच घाटाने त्यांच्या मुळगावी म्हणजे उमरठला नेले, म्हणून हा “मढे घाट” अशी याच्या नावाची उत्पत्ती सांगितली जाते. मात्र या दोन्ही वाटांच्या परिसरात असणारा “लक्ष्मी धबधबा” अचानक प्रसिध्दीच्या झोतात आला आणि केळद परिसरात गाड्यांची हि गर्दी सुट्टीच्या दिवशी दिसु लागली. फक्त धबधब्यात भिजून ज्यांची रग जिरत नाही, ते बहाद्दर उपांड्या नाळेतून उतरुन मढ्या घाटाने पुन्हा केळद असा ट्रेक करु लागले आणि या वाटांची वर्दळ पुन्हा सुरु झाली.
याशीवाय पुढे गोप्या घाट, आंबेनळी घाट, सुपे नाळ वगैरे वाटा आहेत, मात्र त्या रायगडापेक्षा राजगडाला जास्त जवळ पडतात.
Raygad 12
घाटवाटा आणि नाळाच्या वाटेबरोबरच रायगडाच्या घेर्‍यातील अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या विविध कालखंडात या परिसरात उभारलेले दुर्ग.
एखाद्या सम्राटाच्या संरक्षणासाठी अंगरक्षकांची नेमणुक केली असते. महत्वाच्या व्यक्तीच्या जीवाला निर्माण झालेला धोका स्वतःच्या शिरावर घ्यायचा आणि त्यासाठी प्रसंगी प्राणाचे मोल द्यायचे, हि अंगरक्षकांची जबाबदारी. नेमके हेच काम रायगडासारख्या महादुर्गाच्या परिसरात उभारलेले किल्ले करत होते.
चांभारगड, कोकणदिव्यासारखे प्राचीन दुर्ग आहेत. शिवाजी महाराजांनी उभारलेले लिंगाणा,सोनगड सारखे किल्ले सरंक्षकाची भुमिका पार पाडत आहेत. तोरणा, राजगडसारखे महाराजांचे जुने साथिदार पुर्वेला खडे आहेत. याशिवाय मानगड, पन्हाळघर्,दौलतगड्,मंगळगड उर्फ कांगोरी, कावळया किल्ला असे रायगडाभोवती किल्ल्यांची संरक्षक कडे आहे.
Raygad 13
या किल्ल्यांनी रायगडाभोवती सर्व बाजुने लष्करी फळी निर्माण केली आहे. थेट उत्तरेला कोकणदिवा, ईशान्येला लिंगाणा, पुर्वेला तोरणा उर्फ प्रचंडगड, महाराजांची पहिली राजधानी राजगड आहेत.
आग्नेयेला वरंधा घाटाची वाट रोखून कावळ्या तीक्ष्ण नजर रोखून बसला आहे, त्याच्या जोडीला थोडे खाली दक्षीणेला कांगोरी उर्फ मंगळगड आहे. थेट दक्षीणेला महाडकडून येणार्‍या वाटेवर चांभारगड उर्फ महेंद्रगड आणि मुख्यतः कैदखाना म्हणुन वापरला गेलेला सोनगड आहे. नैऋत्येला सावित्री नदीच्या तीरावर नितांतसुंदर परिसरात वसलेला दौलतगड आहे. पुर्वेकडचे आक्रमण रोखण्यासाठी अलीकडेच उजेडात आलेला पन्हाळघर आणि वायव्येला मानगड हे दक्ष आहेत.
Raygad 14
रायगडाच्या घेर्‍यातील गडांनी उभारलेले संरक्षक कडे

शत्रुने कोठूनही हल्ला करायचा ठरविला तरी यातील किमान एखाद्या किल्ल्याशी झुंज दिल्याशिवाय रायगडाच्या आसपासही पोहचणे कठीण.
एकुणच जुना जिवाभावाचा सखा सह्याद्री, धोंधावत वहाणार्‍या काळ, गांधारी सारख्या नद्या आणि जवळपास अकरा किल्ल्यांचे बळकट कोंदण लाभलेल्या या रायगडाची महाराजांनी राजधानीचा दुर्ग म्हणून निवड करावी हे स्वाभाविक नव्हे काय ? वास्तविक तोरण्यावर मिळालेल्या धनाचा उपयोग करुन महाराजांनी मुरुंबदेवाच्या डोंगरावर गड उभारला आणि नेमके नाव दिले “राजगड”. नावाप्रमाणेच राजस असणार्‍या या महादुर्गावर महाराज जवळपास वीस वर्ष राहीले. फत्तेखानाला तोंड देण्यासाठी पुरंदराची योजना, अफझलखानाचे संकंट निवारण्याचा खल, सलबतखान सिध्दी जोहरच्या वेढ्यातून सुटून आल्यानंतर स्वकीयांशी भेट, पुरंदरच्या शरणागतीची चार पावलांची माघार, औरंगजेबाच्या कराल कालमिठीतून आग्राहून सुटून आल्यानंतर झालेला पुर्नजन्म, तानाजीच्या पराक्रमाचा आणि त्याच्या कायमच्या दुराव्याचा अश्या महाराजांच्या आयुष्यातील सर्व महत्वाच्या घटनांचा साक्षीदार म्हणजे दुर्गराज राजगड. मात्र एक महदभाग्याचा क्षण राजगडाएवजी रायगडाच्या नशीबी लिहीले होते, “राज्यभिषेक सोहळा”.
शिवाजी महाराजांनी राजधानी राजगडावरुन रायगडावरुन का हलवली ? याचा ईथे आढावा घेणे उचीत ठरेल. राजगड हा भक्कम बांधणीचा दुर्ग खरा, पण त्याच्या आजुबाजुला पठारी प्रदेश आहे. सुरवातीच्या संघर्ष काळात शिवाजी राजांचे सैन्यबळ मोघल आणि आदिलशहा या प्रमुख शत्रुंच्या तुलनेत कमी होते. सहाजिकच उघड्या मैदानातील थेट लढाई म्हणजे आत्मघात होता. त्यातच त्यावेळी स्वराज्यावर हल्ला करणारे दोन सत्ता आदिलशाही ज्यांचे आक्रमण नैऋत्य दिशेने व्हायचे, ते थोपवायचे तर थेट पुरंदरला तो ह्ल्ला थोपवायला लागायचा. तर दुसरा प्रबळ प्रतिस्पर्धी अर्थातच मोंघल. यांच्या हल्ल्याची दिशा एकतर उत्तर किंवा त्यांचे प्रमुख ठाणे आजचे औरंगाबाद किंवा त्यावेळचे खडकी. साहजिकच मोघंलांचा हल्ला होणार तर तो ईशान्य दिशेने. या बाजुने झालेला हल्ला थोपवायचा तर चाकणसारखे ठाणे स्वराज्यात होते. राजगडाच्या या दोन्ही बाजुला पठारी प्रदेश आहे. सहाजिकच शत्रु सैन्य थेट गडाच्या पायथ्याशी येण्याचा धोका सतत होता. शिवाजी राजांना शाहिस्तेखानच्या आणि पुढे मिर्झाराजांच्या आक्रमणाच्या वेळी याचा अनुभव आला. मिर्झाराजे जयसिंगानी तर थेट रोहिड्याच्या पायथ्याच्या हिरडस मावळात फौजा पाठविल्या. म्हणजे राजगडाला दक्षीण बाजुनेही धोका निर्माण झाला होता.
शिवाजी महाराज आग्र्याहून जीवावरच्या प्रसंगातून सुटुन आले आणि एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेउन त्यांनी मोघंलाकडून आणि पर्यायाने औरंगजेबाकडून ईतका विश्वासघात होउनही पुढचे दोन वर्ष पुरंदर तह कायम ठेवला आणि थोडा शांततेचा काळ अनुभवला. यामध्ये त्यांना एका गोष्टीची निश्चीत जाणीव झाली, कि आपला खरा लढा मोघलांबरोबर आहे. औरंगजेबाच्या भविष्यातील आक्रमणाला तोंड द्यायचे तर राजधानी अधिक सुरक्षित गडावर हवी. आणि त्यांनी रायगडाची पहाणी केली. त्याचे वर्णनही सभासदाच्या बखरीत विलक्षण केले आहे. “राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, दीड गाव उंच, पर्जन्याकाळी कडीयांवर गवत उगवत नाही आणि धोंडा तर ताशीव एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरील चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका, दौलाताबाद्चे दशगुणी गड उंच असे देखोन (महाराज) संतुष्ट जाहले आणि बोलिले तख्तास गड हाच करावा”. रायगडावर ईशान्य किंवा नैऋत्य दिशेने यायचे तर सह्याद्रीची रांग उतरावी लागणार. ईथून उतरणार्‍या वाट्या कमालीच्या अवघड असल्याने थोडक्या सैन्यानिशी याच परिसरात शत्रुचा बीमोड करणे शक्य होई. शिवाय फारच आणिबाणीची स्थिती असलै तरी त्याचा माग या अवघड वाटांमुळे आधी आल्याने गरज असल्यास परिसरातील दुसर्‍या गडाचा आश्रय घेणे शक्य होई. स्वराज्याचा आणखी एक शत्रु म्हणजे जंजिर्‍याचा सिद्दी. याने रायगडावर पश्चिमेकडून हल्ला करायचा ठरविल्यास त्याबाजुला चांभारगड, सोनगड, दौलतगड अशी दुर्गसाखळी हजर होती. याशिवाय खुद्द रायगडाची उंची २९०० फुट इथे तोफगोळे थेट माथ्यावर पोहचणे कठीण. ( लक्षात घ्या, रायगडाची दुर्ग उभारणी १६६५ ते ७० च्या दरम्यान झाली तर त्यावर पुढे साधारण दीड्शे वर्षांनी म्हणजे १८१८ मध्ये ईंग्रजांनी तुलनेने प्रगत तोफांनी हल्ला करुनही सुरवातीला तोफगोळे गडाच्या माथ्यापर्यंत पोहचत नव्हते) शिवाय गडाचे बेलाग कडे, ज्यावरुन चढून जाउन आक्रमण करण्याचे मनात आणनेही कठींण. एकंदरीत संरक्षक वज्रमुठ असणारा रायगड हे आदर्श लष्करी ठाणे होते.
कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाला असता महाराजांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणार्‍या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे.या सर्व बाबी हेरूनच महाराजांनी राजधानी म्हणुन रायगडाची निवड केली.
याशिवाय रायगड परिसरातील इतर काही ठिकाणांची माहिती या लेखात घेतल्यास ते अवांतर होणार नाही. किल्ले रायगडच्या वैभवाचे सर्वानाच कुतूहल असते. महाराजांच्या काळामध्ये गडावर असलेली कोटय़वधी रुपयांची संपत्ती काळाच्या ओघात गायब झाली. इतिहास संशोधकांनी शिवकालातील असंख्य महत्त्वाच्या घटना जगासमोर आणल्या, परंतु किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी परिसरांतील अवशेष पूर्ण दुर्लक्षित राहिल्यामुळे शिवकालातील अनेक घटनांचा शोध अद्याप बाकी राहिलेला आहे. या परिसरातील भग्न अवशेषांचे संशोधन करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने भारतीय पुरातत्त्व विभाग आणि शासनाकडूनही वाडी परिसरांतील ऐतिहासिक पुराव्यांकडे पुर्ण दुर्लक्ष झाल्याने शिवकालांतील सुवर्णकाळातील पाऊलखुणा आज काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत.
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या घनदाट वनश्रीमध्ये रायगडवाडी गाव वसलेले आहे. महाडपासूनचे अंतर तीस किलोमीटर असल्याने पाचाड मार्गाने चित्तदरवाज्यापासून गावाकडे जाणारा पक्का रस्ता आहे. सुमारे ८०० लोकवस्ती असलेल्या गावामध्ये कोळी आवाड, हिरकणीवाडी, परडी, टकमकवाडी, नेवाळी, खडकी, शिंदेआवाड अशा सात वाडय़ा आहेत.
रायगडवाडी शिवकाळातील अत्यंत महत्त्वाचे गाव असल्यामुळे आजही गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या, वैभवाच्या जिवंत खुणा अस्तित्वात आहेत. या वाडीपासून गडाचा माथा २२५० फूट उंच असून समुद्रसपाटीपासून रायगडवाडी ६०० फूट उंचीवर आहे. त्या काळांतील व्यापारउदीम, जनजीवन, राहणीमान, सामाजिक परिस्थिती इत्यादी महत्त्वाच्या घटनांवर प्रकाशझोत टाकणारे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. शिवकाळांमध्ये किल्ले रायगडावर जाण्यासाठी या वाडीतूनच रस्ता होता. त्या काळातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याने मोठी बाजारपेठदेखील होती. महाराजांचे काही प्रमुख सरदार होते, त्यांचे वास्तव्य वाडींत होते. शिवकाळानंतर गडावर अनेक स्थित्यंतरे झाली. मोगलांनी उत्तरेकडे जाताना रायगड किल्ला सिद्दीकडे दिला होता. सिद्दीचे सरदारदेखील रायगडवाडीत राहत होते. त्यांच्या वाडय़ाचे अवशेष आजही भग्नावस्थेत आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव जोडले जाई त्या गोदावरीची समाधी वाडीपासून काही अंतरावर आहे. धान्याची कोठारे, तटबंदी वाडे, तोफगोळे, भंगलेल्या तोफा यांचे असंख्य अवशेष सभोवतालच्या परिसरांमध्ये आहेत. परंतु अनेक वर्षांत अवशेषांकडे लक्ष देण्यात आलेले नाही. पुराणवस्तू विभागाकडून योग्य ती दखल घेण्यात येत नसल्याने भविष्यात हा ऐतिहासिक ठेवा काळाच्या पडद्याआड होण्याची शक्यता आहे.
२५ एप्रिल ते ९ मे १८१८ साली इंग्रज सेनानी कर्नल प्रॉथरने गडाला वेढा घातला होता त्या वेळी गडावर अरब शिबंदीचा अधिकारी अबू होता. त्याने इंग्रजांशी तहाची बोलणी १० मे १८१८ रायगडवाडींमध्ये केली होती. जुन्या तटबंदीचे अवशेष, घरांची जोती इत्यादी ऐतिहासिक खुणा असल्याने इतिहासाच्या अभ्यासकांनी पाचाड परिसराचे संशोधन केल्यास शिवकाळातील अनेक घटना प्रकाशामध्ये येतील. टाकीमखाना, टकमक टोकाच्या खालच्या ठिकाणी असलेले रायनाक स्मारक, गोदावरीची समाधी, ब्राह्मण वाडय़ाचे अवशेष, भग्न झालेले शिवमंदिर त्या ठिकाणी असलेली गणपतीच्या हनुमानाच्या मूर्ती असे एक ना अनेक पुरावे दुर्लक्षित अवस्थेमध्ये वाडीच्या परिसरांत वर्षांनुवर्षे माळरानामध्ये पडलेल्या आहेत. रायगडावर व्यापार करणारा नागराज शेट याचे निवासस्थानदेखील रायगडवाडींत आहे. नाग्याबाग म्हणून गावकरी ओळखतात. गावापासून अध्र्या किलोमीटर अंतरावर पडके जोते असून जवळच एक विहीरदेखील आहे. जोत्याचे बांधकाम शिवकालीन असून आजही काही अवशेष शिल्लक आहेत. नाग्याबागेमध्ये असलेल्या विहिरीचे पाणी ग्रामस्थ वापरीत होते. परंतु पावसाळय़ात विहिरीचा काही भाग कोसळल्यानंतर विहिरीचा वापर बंद झाल्याने दुरवस्था झाली आहे. अत्यंत सुबक आणि चिरेबंदी दगडामध्ये बांधलेल्या विहिरीत आजही पाणी उपलब्ध असून संपूर्ण गावाला पुरून उरेल एवढा पाण्याचा साठा विहिरींत उपलब्ध असल्याची माहिती गावातील वयोवृद्ध नागरिक गणपत महादेव साटम यांनी सांगितले. या परिसरात अनेक घराण्याचा संबंध महाराजांच्या सेवेशी जोडलेला असल्याने ऐतिहासिक शस्त्रसामग्री घराघरांत असल्याने आपल्या पूर्वजांच्या आठवणी मोठय़ा अभिमानाने सांगितल्या जात असतात.
एकंदरीत राजधानी रायगड जसा निवांत वेळ काढून अनुभवायला लागतो, तसाच हा रायगडाचा परिसरही महत्वाचा आहे. जसजसे शक्य होईल तसा हा घेरा थोडा थोडा का होइना अभ्यासायला पाहिजे. आपल्याच प्रतिक्षेत हा परिसर आहे, चला तर मग “रायगडाच्या घेर्‍यात”.

तळटीपः- सर्व प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार

संदर्भग्रंथः-
१) श्री राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे
२) शिवतीर्थ रायगड- गो.नि.दांडेकर
३) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
४) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
५) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
६) आडवाटेवरचा महाराष्ट्र- प्र.के.घाणेकर
७) रायगडाची जीवनकथा- शां.वि.आवळसकर
८) रायगड जिल्हा गॅझेटीयर
९) शोध शिवछत्रपतीच्या दुर्गांचा- सतिश अक्कलकोट

Leave a comment